पुन्हा दिवाळी..

Submitted by प्राजु on 4 November, 2010 - 16:54

लखलखती त्या दीप कळ्या, अन पहाट ओली नवी नव्हाळी
मांगल्याचे समृद्धीचे, गीत छेडते पुन्हा दिवाळी..

चमचमती ते बिंदू ओले.. ओल्या नवथर सोनसकाळी
सलज्ज हिरव्या तृणांवरती, विसावते बघ पुन्हा दिवाळी

सजून जाते अंगण अवघे, रंग रंगूनी फ़ुले कळ्यांनी
दारी तोरण ऐश्वर्याचे, लावून जाते पुन्हा दिवाळी

अभ्यंगाची लज्जत ऐसी, गुलाब, चंदन, घेत ओंजळी
आणि प्रीतीचा दरवळ न्यारा, घेऊन येते पुन्हा दिवाळी

प्रेम-मायेचा झरा वाहू दे, परमेशा! भर माझी झोळी
चराचराला दान सुखाचे, देऊन जावो पुन्हा दिवाळी..

- प्राजु

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्राजु, मस्त गं ....नेहेमीसारखीच ....प्रसन्न, टवटवीत कविता!
दिवाळीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!