सन १६५५ - १६५६...
दख्खनेमधल्या राजकीय घडामोडींचा फायदा उचलून राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी मारली. शिवरायांनी 'तुम्ही कुठले राजे' असे म्हणणाऱ्या मोरेची मुजोरगिरी मोडून काढली. खुद्द मोरे स्वतःच्या दोन्ही मुलांसकट ठार झाला. वाई ते थेट रायरी असा विस्तीर्ण प्रांत स्वराज्यात सामील झाला. राजांसाठी दक्षिण कोकणद्वार खुले झाले. राजांनी तातडीने पावले उचलत भोरप्याच्या डोंगराचा कायापालट करीत प्रतापगड बांधायला घेतला. बांधकामाची सर्व जबाबदारी मोरोपंत पिंगळे यांसकडे दिली. मराठ्यांच्या कोकणातील हालचालींना वेग आला. ह्या सर्व प्रकाराने संतप्त झालेल्या औरंगजेबाने २२ एप्रिल १६५७ रोजी राजांना पत्र धाडले आणि कोकणातले सर्व महाल (प्रांत) मुघलांच्या हवाली करण्यास बजावले. औरंगजेब त्यावेळेस दख्खनेचा मुघल सुभेदार होता. ह्या पत्रास प्रत्युतर म्हणून राजांनी थेट जुन्नर येथे हल्लाबोल करत मुघली बाजारपेठ लुटली. आता औरंगजेब प्रचंड भडकला. मुघलांनी पुणे, चाकण आणि आसपासच्या प्रदेशात लुट चालवली.
दुसरीकडे मुघलांनी विजापूर विरुद्ध युद्ध सुरू केले होते. त्यांचे कल्याणी आणि बिदर किल्ले मुघलांनी जिंकून घेतले होतेच. मात्र स्वतःला तख्तनशीन करून घेण्यास आतुर असलेला औरंगजेब दिल्लीकडे रवाना होण्यासाठी आतुर झाला होता. त्याने विजापूर बरोबर तह केला आणि तो उत्तरेकडे निघाला. जाता जाता पुन्हा एकदा मराठ्यांनी उत्तर कोकणात उतरत कल्याण-भिवंडी-शहापूर काबीज करत मुघल आणि विजापूरला दणका दिला. माहुली हा अत्यंत महत्वाचा असा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. १६५७ च्या आसपास विजापूरला अली अदिलशाह मरण पावला. वाई प्रांताचा सुभेदार असलेला अफझलखान आता दक्षिणेत मोहिमेवर होता. ह्या दरम्यान शिवरायांनी आपली संपूर्ण ताकद कोकणात वर्चस्व वाढवण्यात घालवली. सोबतीने आरमाराची सुरवात होत होतीच. पहिल्या २० युद्ध नौका त्यांनी बांधायला घेतल्या होत्या. सिद्दी आणि पोर्तुगीझ सतर्क झाले होते. अशा प्रकारे अवघ्या ३-४ वर्षात मराठ्यांनी स्वतः प्रबळ होता होता आपले शत्रू वाढवून घेतले. मुघल, आदिलशाह, पोर्तुगीझ आणि सिद्दी हे मराठ्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष्य ठेवून होते.
बादशहा झाल्या-झाल्या औरंगजेबाने आपला मुलगा मुअझ्झम यांस दख्खनेचा सुभेदार म्हणून औरंगाबाद येथे पाठवले. ही बहुदा मुघली रीत होती. कुठलाही बादशाहा आपल्या मुलाला दिल्लीपासून दूर आणि सर्वात कठीण अश्या दख्खन सुभेदारी वर पाठवत असावा बहुदा. मुअझ्झम मात्र विजापूर विरुद्ध लढायच्या अजिबात तयारीत नव्हता. मुघल आता एक वेगळीच खेळी खेळले. त्यांनी विजापूरला मराठ्यांविरुद्ध युद्ध करण्यास भाग पडले. पूर्वी वाईचा सुभेदार राहिलेला आणि आता विजापूर दरबारातला मानाचा सरदार अफझलखान २२ हजाराची फौज घेऊन १६५९ च्या पावसाळ्याआधी स्वराज्यावर हल्ला करायला, त्याला नेस्तोनाबूत करायला निघाला होता. 'शिवाजी बरोबर कुठल्याही प्रकारे तह करू नकोस. त्याला जिवंत नाहीतर मृत विजापूर दरबारात हजर कर' असे स्पष्ट आदेश त्याला होते. येता-येता खानाने तुळजापूर येथे विध्वंस करीत स्वतःच्या 'बुतशिकन' असल्याची द्वाही फिरवली. वाटेवरून त्याने १६ जून १६५९ रोजी कान्होजी नाईक जेधे यांना पत्र लिहिले आणि 'मावळातल्या सर्व वतनदारांबरोबर आम्हास येऊन मिळा' असा निरोप पाठवला. कान्होजी जेधे चिंताग्रस्त होऊन राजांना भेटायला राजगडी पोचले. आता लढाईची अंतिम रणनीती ठरवणे भाग होते.
नव्याने तयार केलेला जावळीमधला प्रतापगड राजांनी खानाविरुद्ध लढण्यास नक्की केला. एकतर सर्वश्रुत कारण म्हणजे खानाची जडशीळ फौज. पण अजून एक कारण म्हणजे शिवरायांची लढाईची रणनीती. शक्यतो लढाई ही आपल्या प्रदेशात न होता सीमेवर किंवा बाहेर व्हावी ह्या करता ते नेहमी स्वराज्याच्या सरहद्दीवरील किल्ले नक्की करीत. ज्या किल्ल्यावर मी असीन तिथे अफझलखान पोचणार हे राजांना ठावूक होते आणि म्हणूनच त्यांनी प्रतापगड जवळ केला. लढाईचे क्षेत्र खानाने नव्हे तर राजांनी निवडले होते. नकळतच खानाचा पहिला पराभव झाला होता.
सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला एक वाईट बातमी राजगडावरून प्रतापगडी पोचली. गेली २-३ वर्षे दुखणे घेऊन आयुष्य ढकलणाऱ्या महाराणी सईबाईंचा मृत्यू झाला होता. शंभू बाळाची आई गेली होती. राजांची राणी गेली. स्वराज्यावर दुख्खाचे आकाश कोसळले. राजे राजगडी पोचले आणि आवश्यक ते विधी पूर्ण करून जिजाऊ मासाहेबांचा 'यशस्वी भव:' आशीर्वाद घेऊन ते पुन्हा प्रतापगडी येऊन ठाकले. दुख्ख करीत बसायला आता त्यांना अजिबात वेळ नव्हता. अफझलखानाचे पत्र त्यांच्याकडे येऊन पोचले होते.
पत्रात खान म्हणत होता (स्वैर अनुवाद)
१. विजापूर दरबाराने निजामशहा कडून जिंकून घेतलेला आणि मुघलांना तहात दिलेला दुर्गम दुर्गांचा हा संपूर्ण डोंगरी प्रदेश तू बळकावून बसला आहेस. तो परत कर.
२. कोकणात राजपुरीच्या राजाला (दंडा राजपुरी येथील सिद्दी) त्रास देणे तू ताबडतोब बंद कर.
३. शत्रूस प्रवेश करण्यास दुर्गम असलेला हा चंद्ररावचा प्रदेश (जावळी) तू मला परत कर.
४. तू कल्याण आणि भिवंडी काबीज केलीस आणि मला कळलाय की तिथे तू मशीद सुद्धा जमीनदोस्त केलीस.
५. तू मुसलमानांना लुटलेस आणि त्यांचा अपमान केला आहेस.
६. इतकेच नव्हे तर तू इस्लामचा अपमान करून स्वतःच्या हाताखाली मुसलमानांना कामावर ठेवले आहेस.
७. तू स्वतःला एक स्वयंघोषित राजा म्हणून, कोणालाही न घाबरता हवे ते निर्णय देतो आहेस. म्हणून तुला संपवायला मला आदिलशहाने पाठवले आहे.
८. मुसेखान आणि माझे बाकीचे सैन्य तुझ्याविरुद्ध लढण्यास अतिशय उत्सुक आहे. मी कधी एकदा त्यांना जावळीवर हल्ला करावयास सांगतो असे झाले आहे.
९. सिंहगड आणि लोहगड सारखे दणकट किल्ले, पुरंदर आणि चाकण सारखे मोक्याचे किल्ले, या शिवाय भीमा आणि नीरा नद्यांच्या मधला सर्व प्रदेश मुकाट्याने दिल्लीच्या बादशहाला परत कर.
पत्र वाचल्यावर राजांनी काय विचार केला असेल? शरण जावे? कदापि नाही. तह म्हणजे साक्षात मृत्यू हे राजांना ठावूक होते. अश्या कसोटीच्या क्षणी राजांनी एक वेगळाच व्युव्ह रचला. स्वतःशीच स्मित करीत त्यांनी हे पत्र खानाला लिहिले असावे. (स्वैर अनुवाद)
१. कर्नाटकाच्या सर्व राजांना हरवणारे खुद्द आपण माझ्या भेटीला आलात ह्या सारखा आनंद कोणता.
२. तुम्ही तर या पृथ्वीतलावरचे एक दागिने आहात. तुमच्या बरोबर युद्ध म्हणजे आगीशी लढाई.
३. तुम्ही खरच येथे या आणि मनभरून जावळीचे दर्शन घ्या.
४. तुम्ही लवकरात लवकर इकडे आलात तर बरे होईल, म्हणजे माझी सर्व भीती निघून जाईल.
५. मला मुघल आणि विजापूरच्या सैन्याबद्दल अतिशय आदर आहे ज्यांच्याकडे तुमच्यासारखे पराक्रमी योद्धे आहेत.
६. येथे नक्की या. मी तुम्हाला माझे सर्व किल्ले सुपूर्त करीन. अगदी जावळी देखील.
७. तुमचे रूप म्हणजे एखाद्या वीर योद्धयाप्रमाणे आहे. आपली भेट होईल तेंव्हा मी माझी तलवार तुम्हाला सुपूर्त करीन.
८. जावळीच्या ह्या घनदाट, खोल आणि दूरवर पसरलेल्या जंगलात तुमच्या सैन्याला जगातल्या सर्वोच्च सुविधा मिळतील.
ह्या पत्राने अफझलखानावर नेमका काय परिणाम झाला माहित नाही पण स्वतःचे संपूर्ण जडशीळ सैन्य वाई तळावर ठेवून मोजक्या सैन्यासह खान जावळीमध्ये शिरला. योजिल्याप्रमाणे उन्मत्त हत्तीला जंगलात खेचून आणून मारायचा डाव लवकरचं फत्ते केला जाणार होता.
पहाटे-पहाटे शिवरायांनी नक्कीच आई तुळजा भवानीची मनोभावे प्रार्थना केली असणार. ठरल्याप्रमाणे शिवाजी राजे आणि अफझल खान एका शामियान्यात भेटले. राजांचा वकील 'पंताजी पंडित' तर खानाचा वकील 'कृष्णाजी भास्कर' यांच्याशिवाय दोघांसोबत १०-१० अंगरक्षक होते. शिवाजी राजांच्या अंगरक्षकांमध्ये संभाजी कावजी, कातोजी इंगळे, सिद्दी इब्राहीम असे काही (जीवा महालाचे नाव माझ्या तरी वाचण्यात आलेले नाही) तर खानाच्या अंगरक्षकांमध्ये रहीमखान, पहलवानखान, शंकराजी मोहिते (सय्यद बंडाचे नाव देखील माझ्या तरी वाचण्यात आलेले नाही) आणि असे काही सैनिक होते.
गडावरून निघताना राजांनी स्वतःकडे एक तलवार, कट्यार आणि वाघनखे ठेवली होती. खानाकडे देखील एक तलवार आणि कट्यार होती. राजांना बघतच तो म्हणाला.'मी तुला प्रत्यक्ष सर्व शक्तिशाली विजापूर दरबारात घेऊन जाऊन आदिलशहासमोर हजर करतो. घाबरू नकोस. हात मिळवणी कर आणि मला आलिंगन दे.' असे म्हणून त्याने राजांना मगरमिठीत घेतले. उंचीला जास्त असणाऱ्या खानाने राजांचे डोके दाबून तो आता पाठीवर कट्यारीने वार करणार तेवढ्यात राजांनी एका क्षणात आपली मान त्या मगरमिठीतून सोडवून घेऊन वाघनखे खानच्या पोटात खुपसली. काही अंतरावर उभे असणाऱ्या अंगरक्षक आणि कृष्णाजी भास्कर यांनाच नव्हे तर खुद्द खानाला देखील अनपेक्षित असा हा हल्ला असणार. पापणी लावण्यास वेळ लागत नाही इतक्या कमी वेळात राजांनी खानाचा कोथळा बाहेर काढला होता. पुढच्या काही क्षणात संभाजी कावजीने खानाचे मुंकडे धडावेगळे केले. कृष्णाजी भास्कर आणि खानाचे सर्व अंगरक्षक तिथल्या तिथे कापले गेले. राजे पंताजी आणि अंगरक्षक घेऊन गडाकडे त्वरित रवाना झाले असणार.
********************************************************************************
१.
कवी भूषण म्हणतो,
एक कहे कल्पद्रुम है, इमि पूरत है सबकी चितचाहे ।
एक कहे अवतार मनोज, की यो तनमे अति सुंदरता है ।
भुषण एक कहे महि इंदु यो, राजविराजत बाढयौ महा है ।
एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह सिवा है ॥
भाषांतर :
यास कोणी कल्पवृक्ष म्हणतात, कारण हा सर्वांचे मनोरथ पूर्ण करतो.हा सौंदर्यसंपन्न असल्याने कोणी याला मदनाचा अवतार म्हणतात. भूषण याला पृथ्वीवरचा चंद्र म्हणतो, कारण याचे राज्य कलेकलेने वाढत आहे. कोणी याच्या युद्धातील पराक्रमामुळे यास सिंह म्हणतात तर कोणी प्रत्यक्ष नृसिंह भगवानच समजतात. कारण ज्याप्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडले तद्वतच शिवरायांनी आपल्या वाघनखांनी अफजलखानाची आतडी बाहेर काढली.
*********************************************************************************************************************
अवघ्या काही क्षणात चित्र पालटले होते. शिवाजी आता खानाला भेटणार म्हणजे तह करणार ह्या विचारात असलेल्या खानाच्या फौजेला कसलाच मागमूस लागला नव्हता. तिकडे मराठ्यांनी इशाऱ्याचे कर्णे फुंकले. फौज तयार होतीच. खानाच्या सोबत आलेल्या उरल्या-सुरल्या फौजेवर बांदल - शिळीमकर यांनी हल्ला चढवला, वाई तळावर असलेल्या फौजेचा सेनापती नेताजी पालकरने धुव्वा उडवला. त्याने मुसेखान आणि फाझलखान यांची दाणादाण उडवून दिली. मोरोपंतांनी पारघाटावर संपूर्ण नियंत्रण मिळवले. अवघ्या काही तासात मराठ्यांनी विजापूरच्या फौजेचा विनाश करत एक प्रचंड मोठा विजय मिळवला. प्रतापगडाच्या साथीने शिवप्रताप घडला. ६५ हत्ती, ४००० घोडे, १२०० उंट, ३ लाख रुपयाचे दागिने, मोठ्या प्रमाणावर उंची कापड, ७ लाख रुपये नकद याशिवाय तोफा, बंदुका आणि सर्व प्रकारचे युद्ध साहित्य मराठ्यांच्या हाती लागले. खानाचे मुंडके राजांनी राजगडी जिजाऊ मासाहेबांना भेट म्हणून पाठवले असे म्हणतात. राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या डाव्या कोनाड्यात ते पुरलेले आहे अशी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. (शहाजी राजांना अटक करणारा आणि थोरल्या संभाजी राजांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या खानाचा मृत्यू हे जिजाऊ मासाहेबांचे एक ध्येय होते. ते राजांनी पूर्ण केले.) मराठ्यांचा आत्मविश्वास कैक पटीने वाढला. नव्या जोमाने राजे पुढच्या मोहिमेच्या आखणीला लागले. नेताजी पालकर ला कोकणात पाठवून ते खुद्द सातारा, सांगली आणि कोल्हापूर प्रांती धडक मारायला निघाले...
*********************************************************************************************************************
२.
इतिहासाचे अभ्यासक 'नरहर कुरुंदकर' यांनी अफझलखान वध याबद्दल अतिशय उत्तम विचार मांडले आहेत. ते म्हणतात,"खानवधात एक प्रश्न नेहमी विचारला जातो ते म्हणजे दगा कोणी दिला? राजांनी की खानाने? समजा खान सुरक्षित परतला असता तर पुढच्या भेटीत शिष्टाचार म्हणुन राजांना खानभेटीस त्याच्या गोटात जाणे भाग पडले असते. प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला... नव्हे आणलेला खान परत जिवंत जाणे शक्य नव्हते. ती व्यवस्था शिवरायांनी करून ठेवली होती. खानवधापाठोपाठ त्याच्या फौजेवर बांदल - शिळीमकर यांनी हल्ला चढवणे, वाई तळावर नेताजी पालकरने विध्वंस करणे, मोरोपंतांनी पारघाटावर हल्ला करणे आणि पूर्ण ताकदीनिशी शक्य तितक्या लवकर कोल्हापुर प्रांती धडक मारणे एवढा व्यापक दृष्टिकोन आणि नेमके नियोजन ह्यामागे आहे. अनापेक्षित घाव घालून जग थक्क करता येते पण त्या थक्क अवस्थेतून बाहेर येईस्तोवर शिवराय काही स्थिर कामे करत असतात. ते विजयोस्तव साजरे करत बसत नाहीत. खानवधापाठोपाठ कोल्हापुर - पन्हाळा जिंकणे, कुडाळ मारून विजापुर प्रांती धडक मारणे आणि पुढच्या १८ दिवसात १२०००च्या फौजेचा पराभव करून लूट मारणे व ती फौजा दुप्पट करण्यात वापरणे, आणि ह्या सर्वातून आदिलशाही सावरेपर्यंत जास्तीत जास्त प्रदेश जिंकणे, हे सैनिकी कौशल्य.
"स्थायी यश मिळणाऱ्या मोहिमेचा आरंभ म्हणुन अनपेक्षित धक्याला अर्थ असतो पण तो धक्का देऊन थक्क करणे आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तववाद म्हणजे छत्रपति शिवराय... "
*********************************************************************************************************************
३.
खाली महाराजांना लिहीलेल्या पत्राची काही कवनं आहेत. यातील प्रत्येक ओळीतील पहिल्या शब्दाच्या, पहिले अक्षर एकत्र करून एक वाक्य तयार होते ते म्हणजे - 'विजापूरचा सरदार निघाला आहे'. हे समर्थ रामदास स्वामींनी अफझलखानाबाबत लिहिलेले असल्याचे ईमेल फिरत असतात. तसे असल्यास हे पत्र १६५९ चे असावे असा अंदाज बांधता येतो. अर्थात, रामदासांचा संपर्क महाराजांशी तेंव्हापासून होता असे काही पुरावे उपलब्ध नाहीत.. फक्त माहिती म्हणून सदर पत्र येथे दिले आहे.
विवेके करावे कार्यसाधन ।
जाणार नरतनू हे जाणोन ।
पूढिल भविष्यार्थी मन ।
रहाटोची नये ।।१।।
चालू नये असन्मार्गी ।
सत्यता बाणल्या अंगी ।
रघुवीर कृपा ते प्रसंगी ।
दास महात्म्य वाढवी ।।२।।
रजनीनाथ आणि दिनकर ।
नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदिशे ।।३।।
आदिमाया मूळ भवानी ।
हे सकल ब्रम्हांडांची स्वामिनी ।।
१. ओंकार यांच्याकडून साभार.
२. नरहर कुरुंदकर यांच्या 'छत्रपती शिवाजी महाराज - जीवन रहस्य' आणि 'श्रीमान योगी' मधील पत्रातून साभार.
३. राजेश खिलारी यांच्याकडून साभार.
दुसरा आणि तिसरा फोटो राजेश खिलारी यांच्याकडून साभार...
मस्त माहिती. ते शेवटचे पत्र
मस्त माहिती.
ते शेवटचे पत्र मस्तच. त्याबद्दल पहिल्यांदाच ऐकले. समर्थ रामदासांनी महाराजांना अफजलखान विजापुराहून निघाल्याची आगाऊ कल्पना दिली होती असे ऐकून आहे, पण अशा फॉरमॅट मध्ये पत्र लिहिले हे नवीन कळले.
काहि विषय परत परत वाचायचा
काहि विषय परत परत वाचायचा कंटाळा येत नाही. बर्याच गोश्ति माहित असूनही लेख पूर्ण वाचावासा वाटला....... लिहिल्याबद्दल खूप धन्स ...!
अमूल्य अशा माहिती बद्द्ल
अमूल्य अशा माहिती बद्द्ल आभार.....!! जय शिवाजी !!
छान लेख!!
छान लेख!!
रोहन, या रोमांचकारी
रोहन,
या रोमांचकारी पर्वाबाबत, जितके लिहावे तेवढे थोडेच. पण सातत्याने लिहिले पाहिजे.
अफझलखानाचा, देव होऊ घातलाय !!
समर्थ रामदासांनी महाराजांना
समर्थ रामदासांनी महाराजांना अफजलखान विजापुराहून निघाल्याची आगाऊ कल्पना दिली होती असे ऐकून आहे, पण अशा फॉरमॅट मध्ये पत्र लिहिले हे नवीन कळले.
मी हे पत्र अनेक वर्षांपुर्वी पाहिले आहे. दुर्देवाने अजुन संत रामदासांना हिन शब्दांनी लेखणार्या ( त्यांची नावे इथे लिहणे अप्र्स्तुत आहे ) मान्यवरांना दिसो तो सुदिन.
मध्यंतरी अफजल्खानाचे पोट फाडतानाचे पोस्टर व त्याखाली दशहतवाद असाच संपवावा लागतो हे वाक्य वाचले. अतिशय चांगला संदेश या निमित्ताने दिला होता.
अफजलखान वध आणि आग्र्याहुन
अफजलखान वध आणि आग्र्याहुन सुटका याबद्दल कितीही वेळा वाचलं तरी प्रत्येक वेळी तो प्रसंग तितकाच ताजा वाटतो, घशात आवंढा येतो आणि काहीतरी चुक झाली असती तर काय ही भिती वाटतेच..
शिवरायांची युद्धनीती, राजकारण करण्याची पद्धत सगळंच महान.
प्रभो शिवाजीराजा!
"स्थायी यश मिळणाऱ्या मोहिमेचा
"स्थायी यश मिळणाऱ्या मोहिमेचा आरंभ म्हणुन अनपेक्षित धक्याला अर्थ असतो पण तो धक्का देऊन थक्क करणे आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तववाद म्हणजे छत्रपति शिवराय... " >>> अगदी समर्पक
खरेच आवडले मी बाबासाहेब
खरेच आवडले
मी बाबासाहेब पुरंद्रेंचे वाचले आहे
दिनेशदा.. त्याचा सुफी संत
दिनेशदा.. त्याचा सुफी संत होतोय ते आपल्याला रोखायला हवे... राजांनी शत्रूसकट शत्रुत्व संपले म्हणून त्याचे दफन न करता त्याचे तुकडे करून गिधाडांना खायला द्यायला हवे होते...
इंद्रा... नरहर कुरुंदकरांनी खूपच समर्पक लिहिले आहे. खानाचे आक्रमण तर १६४९-५० सालीच व्हायचे होते ते कसेबसे पुढे ढकलण्यात राजांना यश आलेले. नंतर १६५६ पर्यंत ५-६ वर्ष शांततेत गेली. जावळी घेतली की खानाचे आक्रमण होणार हे साहजिक होते. त्यासाठी राजे १६५७ नंतर मात्र तयार होते...
वा वा ... पत्राचं नव्याने
वा वा ... पत्राचं नव्याने कळलं.... खूप आवडलं..
पक्क्या.. छान लिहीलेस..
पक्क्या.. छान लिहीलेस..
१० नोव्हेंबर १६५९ दिवसाचे
१० नोव्हेंबर १६५९ दिवसाचे आणखी काही तपशील
१. पंताजी बोकील वेळे आधी आले, पण शिवाजी महाराज भेटीच्या ठिकाणी उशीरा आले. हे त्यांनी मुद्दाम केले असे म्हणतात.
२. खानाने १५०० ची फौज भेटीच्या स्थळी आणली पण ती शिवाजीने ती गडावरुन पाहिली, पंताजी बोकीलांना निरोप पाठवून ते सैन्य मागे घ्या अन्यथा मी येणार नाही असा निरोप पाठवला. खानची ही चाल होती पण बोकील वकिलांनी परत एकदा कौशल्याने ती हाणून पाडली.
३. महाराजांना कपाळवर खोच पडली होती. त्यामुळे त्यांना भोवळ आली होती. ही जखम कृष्णाजीने केली असे काही म्हणतात तर काही खानाने. नक्की मत नाही.
४.. खानाला मारल्यावर तो पळत पालखीकडे गेला. पालखीत स्वार होऊन निघून जाताना संभाजी कावजीने पाहिले व त्याने भोयांच्या पायवर तलवार चालवली. मग खानाचे डोके मारले.
५ शिवाजी मेला असता तरी जावळीत युद्ध झालेच असते.
छान लिहिले आहे रे. चित्रांसकट
छान लिहिले आहे रे. चित्रांसकट वाचायला मस्त वाटले.
(सय्यद बंडाचे नाव देखील माझ्या तरी वाचण्यात आलेले नाही)
>>
मागे इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर यांचे एक व्याख्यान मला इंटरनेटवर ऐकायला मिळाले होते. त्यात ते असं म्हणाले की काही समकालीन लिखाणांमध्ये 'सईद बडा' अश्या मनुष्याचा उल्लेख आहे. तोच हा सय्यद बंडा असावा.
केदार.. आकडा १५०० आहे की
केदार.. आकडा १५०० आहे की २०००? ही फौज जिथे होती तिथे ती बांदल-शिळीमकर यांनी मारली. आणि हो फौज होती म्हणूनच राजे उशिरा आले असावेत... पंताजी ते निस्तरायला आधी आले असावेत.
३ >>> मला नाही वाटत कृष्णाजी काही करू शकला असेल. पहिली गोष्ट वकीलाकडे कुठलेही शस्त्र नसावे. तेंव्हा हे काम खुद्द खान नाहीतर एखाद्या अंगरक्षकाचे असू शकते.
५ वा मुद्दा मस्त मांडलास.. काहीह्जी झाले तरी पुढे काय करायचे ह्याची संपूर्ण योजना तयार होती...
छान लिहले आहेस...
छान लिहले आहेस...
केदार, हे वाक्य फक्त नीट
केदार, हे वाक्य फक्त नीट लिहावे हि नम्र विनंती. ५ शिवाजी मेला असता तरी जावळीत युद्ध झालेच असते.
नितीनचंद्र, शिवाजी लिहले
नितीनचंद्र, शिवाजी लिहले म्हणून आदर कमी होत नाही.
खरेतर इतिहास लिहिताना व वाचताना अभ्यासकाला त्या माणसाच्या वलयातून बाहेर येऊन पाहावे लागते. मी इतिहासाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता अभ्यास म्हणून पाहतो त्यामुळे शिवाजीने असे केले, संभाजी पळून दिलेरखानाला मिळाला, चिमाजी आपा ने जबरदस्त डाव योजला, बाजीराव पेशवा खूप चांगला नेता होता असे काहीसे माझ्याकडून नेहमी लिहले जाते. पण म्हणून ह्या व्यक्तींबद्दल आदर नाही असे नाही. त्यामुळे "महाराज" हे संबोधन जसे येते तसे कधी कधी फक्त शिवाजी हे पण ( तृतियपुरूषी भूमिकेतून) येते.
शिवाय आपण एकेरी तर राम व कृष्णालाही म्हणतो. मग त्यांचाबद्दल आदर नाही असे काही आहे का?
भटक्या बांदल- शिलिमकरांच्यां फौजेनेच ह्यांचा धुव्वा उडवला पण अटित ठरल्याप्रमाणे फक्त १० लोकांना घेऊन यायचे असताना व ते ही शामियान्या बाहेरच ठेवायचे असताना खानाने उगाचच १५०० लोक आणले होते. बोकील आणि कृष्णाजी हे आधिपासूनच खाली शामियान्यात होते कारण अटी पाळल्या जातात की नाही हे वकिल मंडळी पाहायचे.
कृष्णाजीचा रोल एकुणच अनाकलनिय आहे. काहींच्या मते कृष्णाजीने खानाला जावळीत येण्यास भाग पाडले कारण कृष्णाजी आतून मराठ्यांना सामिल झाला, तर काही मात्र त्याला पक्का विजापुरी वकिल माणतात. शस्त्र त्याच्याकडे नसले तरी खानाची तलवार - जी मोठ्या अंहकाराने शिवाजी आल्याबरोबर खानाने वकिलाकडे दिली व माझ्याकडे कुठलेही शस्त्र नाही असे शिवाजी महाराजांना सुचित केले ती कृष्णजी कडे वा तिथेच जवळपास शामियान्यात असावी, धनी पडला म्हणून कृष्णाजीने ती उचलली असण्याची शक्यता आहे. कृष्णाजी बद्दल नक्की काहीच लिहता येत नाही त्यामुळे सद्या तरी मी दोन्ही थेअरी कदाचित खर्या असाव्यात हे पकडून चालतो.
कृष्णाजी बद्दल नक्की काहीच
कृष्णाजी बद्दल नक्की काहीच लिहता येत नाही >>>
हे भलतेच ...
" कृष्णाजी बामण होता ."
हे लिहिता येते ....अन हे पुरेसे आहे !
____________________________________________________ ब्रिगेडीयर
( मधुकरचा आयडी बंद केल्याने त्याचा आवाज दबुन रहात नाही. आणि माबोवर चर्चा केल्याने समाजात जातिवादी विष पसरायचे थांबत नाही )
चान्गला लेख
चान्गला लेख
ते पत्र रुपी अभन्ग्/कविता
ते पत्र रुपी अभन्ग्/कविता आम्हाला शालेय इतिहासाच्या/मराठीच्या धड्यात होते असे पुसटसे आठवते आहे!
नन्तरच्या काळात सर्वधर्मी की निधर्मी राज्यकर्त्यान्कडून ते धडेच शालेय इतिहासातुन गायब करण्यात आले!
हे खरय... कृष्णाजी भास्कर
हे खरय... कृष्णाजी भास्कर बद्दल ठोसपणाने काहीच सांगता येत नाही... बर पुढे ह्या संभाजी कावजी ने सुद्धा मुघलांची कास धरली. प्रतापरावांना त्याला मारावे लागले...
अजून एका कृष्णाजी भास्कर चा १६७१ च्या एका पत्रात उल्लेख होतो. तेंव्हा हा कृष्णाजी अलिबाग किंवा आसपासचा सुभेदार होता. हा निश्चित वेगळा कृष्णाजी असावा...
>>>> अजून एका कृष्णाजी भास्कर
>>>> अजून एका कृष्णाजी भास्कर चा १६७१ च्या एका पत्रात उल्लेख होतो. तेंव्हा हा कृष्णाजी अलिबाग किंवा आसपासचा सुभेदार होता. हा निश्चित वेगळा कृष्णाजी असावा...
कुणी सान्गाव? कृष्णाजी तेव्हा मेला/मारला गेला नसेलच, उगा आग्र्याहून सुटकेवेळी सम्भाजीबाबत जशी हुल उठवुन दिली तशी दिली नसेल कशावरुन?
तसही, तेव्हान्च्याच काय पण आत्ताच्या "खबर्यान्बाबतही" कुठे लेखी पुरावा असत नाही, तर समर्थान्च्या भारतभर, व खास करुन महाराष्ट्रातील खेडोपाडी पसरवलेल्या "मठान्चा वा मारुती मन्दीर सिस्टीमचा" लेखी पुरावा तीनचारशे वर्षानन्तर उपलब्ध होणे म्हणजे गवतात सुई शोधण्यासारखेच आहे. असो.
हे बाकी खरय... राजांच्या
हे बाकी खरय... राजांच्या तत्कालीन गुप्तहेर खात्याचे वैशिष्ट्य हे आहे की आजही आपण बहिर्जी नाईक वगळता बाकी कोणाचीही नावे खात्रीने घेऊ शकत नाही... त्या खात्यात कोण काम करत होते हे कधीच समजू शकणार नाही...
नितिनचंद्र यांच्या वरील
नितिनचंद्र यांच्या वरील विनंतीला दुजोरा; त्यावर केदार यांचं स्पष्टीकरण पटलं नाही. कुठल्याही आदरणीय व्यक्तीबाबत अशी भाषा, कुठेही आणि केंव्हाही अत्यंत अशोभनीय. कृपया बदल करावा.
...
...
इथले लिखाण उडवले आहे. उगाच
इथले लिखाण उडवले आहे. उगाच कुणाच्या भावना दुखावल्या तर माझ्याबरोबर मायबोलीला गोत्यात आणायचे नाहीये, म्हणून.
धन्यवाद.
झक्की... तुमच्या भावना
झक्की... तुमच्या भावना पोचल्या.. समजू शकतो. माझ्या भावना काही वेगळ्या नाहीत..
आणि 'लाख मेले तरी चालेल, पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये' हे वाक्य कोणी निर्माण केले माहित नाही पण ते चुकीचे आहे असे माझे मत आहे...
रोहन.. फार सुंदर रीतीने
रोहन.. फार सुंदर रीतीने लिहिलेस्..या विषयाचा मला ही कधीच कंटाला येत नाही वाचायचा.. बरोबर फोटो टाकतोस ते फार छान करतोस
पक्क्या एकदम निवडक आणि तरी
पक्क्या एकदम निवडक आणि तरी सुंदर लेख
Pages