उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग ३ - कुंभळगड़ मार्गे ठंडीबैरी ... !

Submitted by सेनापती... on 2 November, 2010 - 06:10

उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग १ - मालघाट मार्गे फूटादेवल ... !
उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग २ - वीरों का मठ मार्गे कुंभळगड़ ... !

कालरात्री आमच्या 'एक्टिंग एपिसोड' नंतर सुद्धा आम्हाला थोडेसे 'घोरायण' ऐकावे लागले होतेच. ह्या ट्रेकमध्ये सकाळी खाणे आणि रात्री घोराख्यान ऐकणे हेच सुरू होते. गेल्या २ दिवसात रणकपूर मार्गे फूटादेवल आणि तिकडून कुंभळगड़ असा पल्ला आम्ही गाठला होता. आज सकाळी लवकरच निघायचे म्हणून आवरा-आवरी सुरू होती इतक्यात ग्रुपमधले एक काका शुजची जोड़ी घेउन आले. 'अरे ये शुज मेरे बैग मी शायद २ दिन से है. मेरे तो नहीं है. आपमेसे किसके है क्या?' २ दिवसापासून अभिचे गायब असलेले शुज कुठे गेले होते ते आम्हाला आत्ता समजले. ह्या काकाने स्वतःचे समजुन ते बैगमध्ये घातले होते आणि अभि आपला २ दिवस फ्लोटर्सवर ट्रेक करतोय. अखेर अभिच्या शुजची आणि पायाची भेट झाली. अभि मात्र वाटत असुनही त्या काकांना काही विशेष बोलला नाही. संजूने मात्र त्याचा ठेवणीतला शब्द वापरलाच. 'जड़ बुद्धि'च आहे हां. 'जड़ बुद्धि' हा संजूचा खास शब्द. कोणी काही मंदपणा केला की तो झाला जड़बुद्धि.

आज ट्रेकचा महत्वाचा दिवस होता. आम्ही निघालो आणि ८ वाजता कुंभळगड़चा पहिला दरवाजा 'हनुमान पोल' पार करून आत प्रवेश करते झालो. प्रवेश केल्या-केल्या समोर जे दिसले ते अतिभव्य होते. किमान १० माणसी उंच असा 'राम पोल' हा गडाचा दुसरा दरवाजा आणि त्याला संरक्षित करणारे त्याचे बुलंद भक्कम तट-बुरुज. अवर्णनीय आणि अप्रतिम असे ते दृश्य होते. डोळ्यात साठवलेले ते दृश्य मग कमेरा मध्ये सुद्धा साठवले. आम्हाला गड़ बघायला ३ तास दिले होते शिवसिंगने. मग सामान तिकडेच ठेवले आणि आम्ही त्या बुलंद किल्ल्यात प्रवेश करते झालो.

कुंभळगड़ --- राजा कुंभा यांनी १५व्या शतकात हां किल्ला बांधला. ह्या किल्याला ३६ किमी लांब तटबंदी आहे... होय..होय.. मी '३६' बोलतोय. ३.६ नाही... चीनच्या भिंतीनंतर जगातली ही सर्वात लांब सलग भिंत आहे. नव्हते ना माहीत.. तिकडे जाईपर्यंत आम्हाला सुद्धा माहीत नव्हते. ती संपूर्ण तटबंदी बघून ट्रेकचे सार्थक झाले एकदम. बालेकिल्यावरून ह्या संपूर्ण तटबंदीचे आणि त्यावर असणाऱ्या बुलंद बुरुजांचे दृश्य एकदम जबरदस्त दिसते. तटबंदी चांगली ६-८ मीटर रुंद आहे. शिवाय आतल्या बाजूने सुद्धा १० एक मीटर खोल. किल्यात उतरायला ठिकठिकाणाहून बांधीव वाटा आहेत. किल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला गणपतीचे मंदीर आहे. तिकडून पुढे बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. मार्ग म्हणजे प्रशत्र बरं का.. एकावेळी २ हत्ती जातील डुलत-डुलत जातील ईतका. तो सुद्धा अतिशय सुस्थितीत.

दोन्ही बाजूला छानपैकी तांबडया रंगाच्या दगडांची तटबंदी आणि फुलांच्या बागा. आपण जस-जसे वर-वर जातो तसा उजव्या हाताला असणारा किल्ल्याचा प्रशत्र भाग दृष्टीक्षेपात येतो. किल्यात दुरवर असणारे 'जैनतीर्थ' हे या गडामधील सर्वात जून बांधकाम आहे. त्या अलीकडे निळकंठेश्वर महादेवाचे मंदीर आहे. यात असणारी शिवपिंडी ५ फुट उंच आहे.


निळकंठेश्वर महादेवाचे मंदीर आणि त्यातील शंकराची पिंड.

राजा कुंभा म्हणे इतका उंच आणि भारदस्त होता की तो जमीनीवर बसून पिंडीवर अभिषेक करत असे. बाजुलाच प्रचंड मोठा सभामंडप आहे. एकामागुन एक दरवाजे पार करत आपण वर-वर जात असतो. मध्ये एकेठिकाणी 'भैरू का शीर' म्हणुन समाधीस्थळ आहे. शीर इकडे आणि त्याच्या भैरूचे धड मात्र वरती 'बदाम महल'मध्ये आहे. ह्या मागची कथा काही कळली नाही. ६ व्या दरवाज्यानंतर डाव्या हाताला एक वास्तू आहे. हे आहे 'महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ' ...


महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ.

७ व्या दरवाज्यानंतर मात्र रस्ता लहान होतो. इकडून बालेकिल्ला सुरू होतो. बालेकिल्ल्यावर 'बदाम महल' आहे. अर्थात राजनिवासस्थान. आजही संपूर्ण वास्तु नीट जपलेली आहे. महालाचा काही खाजगी भाग सोडला तर संपूर्ण महाल बघता येतो. मौर्य साम्राज्याच्या राजा संप्रती याचे दुसऱ्या शतकात येथे राज्य होते असे काही पुरावे आहेत. पण सध्या जे अतिभव्य रूप या किल्ल्याला आहे त्याचे संपूर्ण श्रेय राजा कुंभा यांचे आहे.

अवघ्या ३ तासात सर्व किल्ला बघून ३६ किमी. तटबंदीवरुन फेरा मारणे अशक्य होते. तेंव्हा गडावरील सर्व महत्वाची स्थळे बघून आम्ही खाली परतलो संपूर्ण गड़ बघून झाल्यावर तिकडेच असणाऱ्या राजस्थान टुरिझमच्या होटेलमध्ये गेलो. किमान ऑमलेट तरी मिळेल ह्या आशेने. आणि काय आश्चर्य... होते की तिकडे. मग आम्ही ३ दिवसांपासून सुरू असलेला आमचा 'नॉन-व्हेज उपवास' मोडीत काढला.ऑमलेट नाश्ता झोडला आणि ११ वाजता आम्ही पुन्हा एकदा 'राम पोल'कडे परतलो. शिवसिग आमची वाट बघत होताच. "चलो चलो. आप सबसे पिछे हो. बाकी सब आगे निकल गये." आम्ही म्हटले,"जाने दो. जिसके लिए यहातक आये कमसे कम वो किला तो ढंग से देख लेते. आप चलो हम आते है." पुन्हा एकदा 'राम पोल'चे ते अतिभव्य दृश्य डोळे भरून बघून घेतले आणि पुढच्या वाटेला लागलो.

आता खरंतरं आमचा परतीचा ट्रेक सुरू झाला होता. आज दुपारभरात १३ किमी.चे कुंभळगड़ जंगल पार करत 'ठंडीबैरी' या ठिकाणी असणाऱ्या कैंपसाइटला पोचायचे होते. कुंभळगड़ मागे टाकत आम्ही आता जंगलाच्या दिशेने निघालो. जस-जसे पुढे जात होतो तशी वाट उतरत होती. गडाचा बदाम महाल मात्र मागे अजून सुद्धा साद घालत होताच. आमच्या बराच वेळ आधी निघालेले पुढच्या ट्रेकर्सचे आवाज येऊ लागले होते. नंतर तर वाट एकदम खाली उतरायला लागली. बघतो तर काय... पुढे शिवसिंग पाठीवर ३ सॅक्स घेउन वाट उतरत होता. कोणा दोघा ट्रेकर्सनी ( ह्यांना ट्रेकर्स का म्हणावे???) त्यांचे सामान उचलत नाही म्हणुन शिवसिंग गाइडकडे दिले होते. ते २ कोण असणार हे सुद्धा आम्हाला ठावूक होते. शिवसिंगपर्यंत जाउन पोचलो आणि त्याला म्हणालो,"आपका बैग हमें देदो. थोड़ा सामान कम हो जाएगा" तो मात्र काही तयार झाला नाही. त्याला आणि इतर २ जणांना पार करत आम्ही वेगाने उतरु लागलो. बघता-बघता अवघ्या २० मिनिट्समध्ये अनेक जणांना मागे टाकत खालच्या सपाटीला पोचलो सुद्धा. कुठे जाउन थांबायचे ते शिवसिंगला विचारून ठेवलेले होतेच. बोराची झाडे आणि शेजारी एक थंड पाण्याची विहीर होती. तिकडे जाउन टेकलो. शिवसिंग आणि मागुन येणाऱ्या काही लोकांकडून समजले की २-३ जण रस्ता चुकले. मग शिवसिंग, अभि आणि संजू पुन्हा त्यांना शोधायला मागे गेले. आम्ही तोपर्यंत जेवणाची तयारी केली. बाकी लोक परत आले तसा आम्ही यथेच्छ पोटोबा केला आणि थोडा वेळ निवांत पडलो.

तासभर झाल्यावर शिवसिंगने 'आगे बढो'चा इशारा दिला. ह्यावेळी मात्र आम्ही सर्वात पुढे सटकलो. रस्ता अगदी सरळ होता. चुकायचा प्रश्न नव्हता. आम्ही आज खाताना गप्पा कमी मारत होतो. जंगलातून जाताना आवाज जितका कमी कराल तितके वन्यजीव दिसायची शक्यता अधिक. थोड्याच वेळात बाजूच्या झाड़ीतून काहीतरी पळाले. बघतोय तर मोठी जंगली कोंबडी होती. फोटो काढता येइल इतका अवसर मात्र तिने काही दिला नाही. आमच्यात सर्वात पुढे दिपक होता. त्याला स्पष्टपणे आणि मला ओझरते रानडुक्कर दिसले. चाहुल लागल्या-लागल्या ते पसार झाले. नंतर काही दिसले नाही. अगदी माकडे सुद्धा नाही. पक्षी साद घालायचे मात्र दर्शन द्यायचे नाहीत. आज आमचा चालायचा वेग जोरात होता. एकतर वाट सरळ आणि जंगलातील होती. ४ च्या सुमारास कुंभळगड़च्या जंगलातून बाहेर पडून ठंडीबैरी गावाकडे पोचलो. छोटेसे गाव होते एकदम. गावाच्या थोडेच पुढे राजस्थान वनखात्याचे गेस्टहाउस आहे. तिकडे जाउन पोचलो.

संध्याकाळ झाली तसे आम्ही आसपास भटकायला बाहेर पडलो. जास्त लांब जाऊ नका असे आम्हाला सांगितले होते. जवळच एक तलाव होता तिकडे गेलो आणि अंधार पड़ेपर्यंत परत आलो. मध्ये-मध्ये मोरांचे आवाज ऐकायला यायचे पण दिसत नव्हते कुठे. आज ट्रेकची शेवटची रात्र होती. उदया सकाळी इकडून निघून मुछाला महावीर बघून पुन्हा रणकपूरला पोचायचे होते. तेंव्हा आजचा डिनर ख़ास राजस्थानी होता. 'दाल-बाटी-चोरमा' ... बाटी थोड़ी कड़क झाली होती पण मग एकदाच सर्व फोडून घेतल्या आणि मग नरम होण्यासाठी दाल मध्ये बुडवून ठेवल्या. तेवढ्या वेळात आपला 'चोरमा' खाणे सुरू होतेच. त्यानंतर पुन्हा दाल-बाटी. चांगले ४५ मिनिटे जेवण झाले. जेवण झाल्यावर ९ वाजता गेस्ट हाउसच्या गच्चीवर जाउन बसलो. इतर कोणी कैंपफायर करायला नव्हतेच. काही वेळाने अभिला डोंगरामागून उजेड येताना दिसला. आम्हाला आधी वाटते की कुंभळगड़च्या लाइट्सचा प्रकाश इथपर्यंत येतोय की काय.पण नाही लाईट डोंगरातून वर आला तेंव्हा कळले की तो तर चंद्र होता. Lol नंतर झोपायला गेलो तर घोरायण सुरू झाले होते. संजू मध्येच जोरात ओरडायचा की सर्व शांत व्हायचे आणि पुन्हा काही सेकंदात सुरू... मी आणि दिपक हसून हसून वेडे झालो होतो. दिपक जास्त हसला की मी 'राजू'च्या स्टाइलमध्ये दिपक.. ए.. दिपक... असे बोलायचो की मग संजू फुटायचा.. अभि मात्र 'चायला गप्प बसा रे' आता असे बोलायचा मध्येच. स्वतःला कितीही त्रास झाला तरी लोकांना त्रास होऊ नये ह्यासाठी अभि सदैव तत्पर... पण मी मात्र जे लोक आम्हास त्रास देतील त्यांस आम्ही कसे ते सोडावे??? रात्री बऱ्याच उशिराने आम्ही गुडुप झालो. उदया सकाळी-सकाळी निघून परतीच्या मार्गाला लागायचे होते... आणि मग तिथून 'माउंट आबू'ला जायचे बाकी होतेच की...

'माउंट अबू'कडे प्रयाण ...

ट्रेकच्या चौथ्या दिवशी सकाळी अखेर सर्व 'जडबुद्धी' लोकांचे शेवटचे घोराख्यान संपले. आम्ही उठून निघायची तयारी केली. गेस्टहाउसच्या बाहेर पडलो. जंगलातली सकाळ म्हणजे कशी एकदम आल्हाददायक ताजीतवानी असते. हळूवार वाहणारे वारे आणि पानांची होणारी सळसळ, त्यामधून येणारे पक्ष्यांचे गुंजन, सर्वच कसे एकदम मनाला नवी चेतना देणारे. नळावरती थंडगार पाण्याखाली हात घालून तोंड धुवून घेतले आणि ब्रश तोंडात घातला तर... अररर... हे काय टूथपेस्टच्या जागी झाडपोला मलम...!!! Lol डोळ्यावर होती-नव्हती ती झोप उडली. सकाळ-सकाळ तोंडाची चव बिघडली. नशीबाने दिपककडे एक ब्रश होता. मग तो घेतला आणि दात घासले. ख़राब झालेला ब्रश कागदात गुंडाळून सामानात कोंबला. लक्ष्यात ठेवा... निसर्गात काही म्हणजे काहीही टाकायच्या विरोधात आहोत आम्ही.

"मागे ठेवायच्या त्या फ़क्त पाउलखूणा आणि सोबत घ्यायच्या त्या फ़क्त आठवणी."

नाश्त्याला चक्क पोहे बनवले होते. ते सुद्धा अनुजाने. आज नाश्ता काय आहे ते बघायला घुसली किचनमध्ये आणि पोहे बघून मग त्याला ज़रा आपला 'होममेड टच' देत बसली. मस्त झाले होते पोहे. आटपुन तिकडून निघालो आणि 'मुछाला महावीर'कडे निघालो. आज फ़क्त ३ किमी. ट्रेककरून आमचा प्रवास संपणार होता. तेंव्हा घाई तशी नव्हतीच. वाट सुद्धा सपाट होती. जंगल विरळ होत चाललेले स्पष्ट दिसत होते. तासाभरात ट्रेक संपवून बाहेर पडलो आणि 'मुछाला महावीर'कडे मोर्चा वळवला. हे एक जैनमंदीर आहे. मार्बलवरील अतिशय सुंदर कारागिरी येथे बघायला मिळते. तिकडून निघालो ते थेट ट्रकमध्ये बसून पुन्हा बेसकैंपकडे. ४५ मिं.मध्ये रणकपुरला पोचलो. भाटीकडून ट्रेक पूर्ण केल्याची सरटिफिकेट्स घेतली आणि फालना स्टेशनकडे निघालो. जाता-जाता 'माउंट आबू' आणि जगप्रसिद्ध 'दिलवाडा मंदिर' बघायला निघालो.

समाप्त.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवर्णनीय आणि अप्रतिम असे ते दृश्य होते >>> मित्रा.. कसला दरवाजा आहे.. पुन्हा पुन्हा तो फोटो पाहिला.. सहीच..
३६ किमी. तटबंदीवरुन फेरा मारणे अशक्य होते. >> करायचे होते यार..

वर्णन नि फोटो मस्तच.. नि खुप धन्यवाद !! Happy

यो.. जितका वेळ होता त्यात ३६ किमी फिरणे अशक्य होते.. मी एकदा फक्त हा किल्ला बघायला २-३ दिवस मुक्काम ठोकणार आहे जाऊन... Happy

मंजूडी... होय गं.. चालणे होते जास्त... अवघड काहीच नाही. खादाडी भरपूर झाली... Lol

रोचीन.... शेवट तसा वाटतोय ना जरा... 'माउंट अबू' फिरलेलो पण लिहायला हवे होते बहुदा... Happy

कविता... अजून तर ५ टक्के पण नाही बघून झालंय.. अजून तर खूप भारत दर्शन बाकी आहे... Happy

पहिला फोटो एकदम जबरी.
वर्णन खुप छान केलत.

चीनच्या भिंतीनंतर जगातली ही सर्वात लांब सलग भिंत आहे>> मला वाटतं Great Wall of Gorgan इरान, ही दुसर्‍या नंबरची सगळ्यात मोठी भिंत आहे.

आहाहा! काय भव्य भिंत आहे! जंगलातुन चालायला मजा येत असेल नाही!
वर्णनावरुन वाटतय हा ट्रेक तसा सगळ्यांनी करण्यासारखा आहे (जडबुद्धी सकट Happy )

टिल्लू Great Wall of Gorgan इरान बद्दल थोडी माहिती दे ना.... Happy

कुंभलगडला जगातली दुसरी सर्वात लांब भिंत असे लिहिले आहे तसा एक फोटो देखील आहे...

खूपच छान माहीती व फोटो व त्यानुसार माहीती . खूप खूप धन्यवाद परंतु अशा प्रकारच्या ट्रेक मधे सहभागी कसे होता येईल या विषयी माहीती फोन नं सह मिळू शकेल का?