पहिल्या भागाचा दुवा इथे मिळेल: http://www.maayboli.com/node/17258
...................................................................................................................
हिमालयात बर्फवृष्टी थांबल्यानंतरचे वातावरण अत्यंत सुंदर असते. विशेषत: रात्री पिठुर चांदणे असते. आणि सगळीकडे बर्फ असल्यामुळे ते जास्तच पिठुर दिसते. निरभ्र आकाश खूपच चांगले वाटते. पण मी त्या वेळेस ते विहंगम दृश्य पहायला उत्सुक नव्हतो; किंबुहना त्याकडे माझे लक्षही नव्हते. मला फक्त उरलेले जवान शोधायचे होते. आता वाट माझ्या पायाखालची झाली होती. पण तरी मी रेडियोसेट घेऊन निघालो होतो; म्हणजे कुणी आढळले तर मला संदेश देता आला असता. रात्रीचे दोन वाजले होते. मी चालत होतो. कुणी आढळतंय का ते पहात होतो. पण जिथे मला ते सगळे जवान भेटले तिथंपर्यंत तर कुणी आढळले नाहीत. म्हणजे तशी अपेक्षा पण नव्हती. खरी कसोटी पुढेच होती. आणखी एक किलोमीटरभर पुढे गेलो. एके ठिकाणी दोन वाटा झालेल्या आढळल्या. म्हणजे काही जवान वाट चुकून दुसर्याच डोंगरमाथ्याकडे गेले होते. तिकडे वळलो. चार पाचशे मीटर चढून गेल्यावर एके ठिकाणी लाल धुगधुगी असल्याचा भास झाला. थोडे पुढे गेल्यावर लक्षात आले की तो भास नव्हता तर खरोखरच एके ठिकाणी विस्तव होता; पण जवळपास कुणी नव्हतं. बर्फ सगळं विस्कटलेलं होतं. ते माझेच जवान असणार हे मी ओळखलं. वाट चुकून भलत्याच डोंगरमाथ्यावर चढले होते. मी परत ओरडत पाऊलखुणांवरून चालत गेलो. ते जरी अर्धा तास माझ्या आधी निघाले असले तरी मी फ्रेश होतो, त्यामुळे मी सहज त्यांना गाठू शकलो असतो. आणि पंधरा मिनिटांतच मला त्यांची चाहूल लागली. माझ्या ओरडण्याचा आवाज पोचला असेल कारण ते थांबले होते. मला पाहिल्यावर त्यातला लेफ्टनंट विरेन्द्रसिंग भाटिया तर अक्षरश: रडायलाच लागला. म्हणाला, 'आम्ही जिवाच्या करारावर चाललो होतो; कुठं जायचं ठाऊक नव्हतं. वादळ आत्ता थांबलंय. त्यापूर्वीचे हाल बघायला हवे होते, सर. तुम्ही देवासारखे आलात'. मी त्यांना रस्ता चुकल्याचे सांगितले आणि त्यांना परत योग्य मार्गाने घेऊन आलो. दुसर्या बाजूने कुणीतरी आलंय म्हटल्यावर सर्व जवानांना परत उत्साह आला. हळूहळू आम्ही सर्वजण योग्य त्या शिखरावर पोचलो. तोपर्यंत झुंजुमुंजु झालं होतं.
रात्रभरात सगळीकडे बातमी गेली होती. मदत पथके तयार होऊन गांतोकवरून आली होती. सर्व जवानांची गिनती झाली. एकून अडतीस जवान कमी होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या कमांडो प्लाटूनचे वीस जवान त्या अडतीसमध्ये होते. कमांडो प्लाटून म्हणजे बटालियनमधील सर्वात तगडे आणि प्रशिक्षित जवान. ते कसे काय मागे राहिले? गौडबंगालच होतं. त्या सर्व अडतीस जवानांना शोधणं हे मदतपथकांचं काम होतं. आणि मदतपथकांना रस्ता कोण दाखवणार? 'त्या' शिखराचा आणि 'वाटेचा' ज्याला सगळ्यात जास्त अनुभव आहे अशी व्यक्ती .. म्हणजे परत चालणे आले.
मदतपथकांना घेऊन निघालो. उजाडले होते. बर्फवृष्टी थांबली होती. त्यामुळे सर्व काही स्पष्ट दिसत होते.
शिपाई उदयनचा मृत देह मदतपथकाला दाखवला. त्यांनी चार जवानांसह तो पाठवला. पुढे गेलो. एके ठिकाणी पायवाटेपासून पंचवीस तीस फुटांवर एका झाडाखाली काळे काहीतरी दिसले. जवळ गेलो. नायक गणेशन. झाडाखाली विश्रांतीसाठी बसला होता. कधी त्याला झोप लागली आणि कधी त्या झोपेचे काळझोपेत रुपांतर झाले ते देव जाणे. त्याच्याही मृतदेहाला स्ट्रेचरवरून पाठवलं. असे एकूण सात जवान मृतावस्थेत वेगवेगळ्या ठिकाणी आढळले.
थोडं पुढे गेल्यानंतर कमांडो प्लाटूनचे जवान का आले नव्हते ते समजले. ते मागे पडणार्या आणि थकलेल्या जवानांना अक्षरश: उचलून आणण्याचे काम करत होते. ते स्वत: अशक्य थकले होते; पण तरी बाकीच्या जवानांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या हत्यारांसह त्याना आणण्यासाठी ते प्रयत्नांची शर्थ करत होते. त्यांना सगळ्यांना चहा, ग्लुकोज देऊन त्यांना घेऊन परत यायला निघालो. तसा रेडियो मेसेज पाठवला. पाठीमागून परत मेसेज आला की आणखी एक जवान पाहिजे. मग सगळ्या जवानांची नावे घेतली तर सदतीस निघाली. म्हणजे आणखी एक - हवालदार नंबियार - डेल्टा कंपनी - कुठेतरी होता. आठजणांचे एक मदतपथक बरोबर ठेवले आणि बाकीच्यांना परत पाठवून दिले. ते उरलेल्या जवानांची हत्यारे आणि इतर किट घेऊन गेले.
शोध शोध शोधले, पण हवालदार नंबियार काही केल्या सापडेना. शेवटी एकाचे लक्ष एका झाडावर लटकलेल्या जंगल कोटाकडे गेले. त्यात नंबियार होता. तिथे तो कसा गेला देव जाणे. कदाचित बर्फात पाय रुतत असल्याने त्याने झाडावर रात्र काढण्याचे ठरवले असेल. म्हणून तो झाडावर चढला आणि तेथेच गोठून गेला.
मनुष्य जिवंत असेतोवर त्याला कसेही उचलून नेता येते. पण मेलेल्या मनुष्याला काही तासांनंतर उचलणे हे महाकठिण काम असते. शरीर ताठून लाकडासारखे बनते. आणि नंबियारचे शरीर तर झाडावर अडकले होते. तिथून त्याला खाली काढायला आम्हा नऊजणांना दोन तास लागले. शेवटी त्याला काढून बेसवर परत नेले.
दुसर्या दिवशी सगळ्यांचे अंत्यविधी. (जवानांचे मृतदेह कॉफिनमध्ये घालून त्यांच्या घरी नेऊन इतमामाने त्यांची अंत्ययात्रा काढून सर्व विधी करण्याची पद्धत कारगील युद्धाच्यावेळेपासून वाजपेयी सरकारच्या काळात सुरू झाली. आमच्या वेळी तेव्हा नव्हती.) मृत जवानांपैकी पाच हिंदू, दोन ख्रिश्चन आणि एक मुसलमान होता. त्या सगळ्यांच्या वेगळ्या स्मशानभूमी, वेगळे विधी. त्याशिवाय शंभर एक जवान आणि दोन ऑफिसर्स हॉस्पीटलमध्ये अॅडमिट झाले. पैकी दहाजणांची बोटे कापावी लागली. इतर सर्व उपचारांनंतर परत फिट झाले.
सगळ्या बटालियनवर अवकळा पसरली होती. त्या दिवशी कुणी जेवले नाही. दुसर्या दिवसापासून ऑर्डर काढून सगळ्यांना जेवायला भाग पाडावे लागले. आर्मी आहे. असे बुळ्यासारखे रडत बसून कसे चालणार? कर्नक पृथ्वीराज सिंग ने सैनिक सम्मेलन घेतले. सर्व मृत जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि बटालियनला समजावून सांगितले की रुटीन ट्रेनिंग चालू राहिले पाहिजे. त्याप्रमाणे रुटीन सुरू झाले.
या प्रसंगाचे पुढे विश्लेषन झाले. काय काय चुका घडल्या, त्यांचा ऊहापोह झाला. असे परत घडू नये म्हणून काय करावे लागेल ते ठरवले गेले.
हा प्रसंग घडण्याचे ठळक कारण म्हणजे सर्वांनी गृहित धरले होते की ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बर्फ पडणे म्हणजे निव्वळ अशक्य! मग बर्फात घालण्याच्या कपडयांचे ओझे नेण्याचे कारणच काय? त्यामुळे अनेकांनी लोकरीचे कपडे घेतले नव्हते. पण ज्यांनी घेतले होते त्यांची अवस्था अत्यंत चांगली होती असे नव्हे. त्यातले सुद्धा काही जवान हॉस्पीटलमध्ये अॅडमिट झालेच; हां - त्यातले कुणी गतप्राण झाले नाही.
त्या भागातील भौगोलिक आणि प्राकृतिक रचना पाहिली तर एक लक्षात येते. साधारणपणे सात हजार ते अकरा हजार फूट या उंचीवर ज्या वेली (Rhododandrum) असतात त्या झाडांप्रमाणे सात आठ फूट उंचीच्या असतात. त्यांच्या खालून सहज जाता येते. दहा-अकरा हजार फूट उंच प्रदेशात त्यांची वाढ खुंटते. फक्त दीड दोन फूट वाढतात. त्यावेळी बर्फ पडले बर्फात त्या दबल्या गेल्या. दिसत नव्हत्या. पायात अडकू लागल्या आणि जवानांना चालणे अशक्यप्राय होऊन बसले. वरून पडणारे भुसभुशीत बर्फाची फुले, पाय अडखळत, धडपडत, पडत उठत ते पुढे पुढे जात होते. नंतर नंतर बर्फातील वादळाने काही दिसायचेच बंद झाले तेव्हा ते पुढे जाऊ शकले नाहीत.
तिसरी गोष्ट म्हणजे communication. जसा पाऊस बंद होऊन बर्फ सुरू झाले तसे रेडियोसेट काम करायचे बंद झाले. त्यामुळे काहीही बातमी कळाली नाही. नाहीतर वेळेवर मदतपथके तयार करता आली असती.
अजून तो प्रसंग आठवला की भारावून जातो; आपोआप हृदय भरून येते; त्याबरोबरच अभिमानाने माझी छाती दोन इंच जास्त फुगते.
..................................................................................................................
शरददा, तुम्हाला व सर्व
शरददा, तुम्हाला व सर्व जवानांना मानाचा मुजरा, सलाम, दंडवत - सर्व.
तुम्हा लोकांमुळे आम्ही सर्व सिव्हिलियन आरामात रहातो, पण तुम्ही मंडळी काय परिस्थितीत रहाता याची थोडी फार जाणीव झाली व मन आदराने व कृतज्ञतेने अगदी भरुन आले.
बापरे.. तुमच्या हिमतीला दाद
बापरे.. तुमच्या हिमतीला दाद कशी द्यावी कळत नाही आहे.. हॅट्स ऑफ टू यु गाईज .. परत एकदा सलाम _/\_
रिस्पेक्ट _/\_
रिस्पेक्ट _/\_
चार पाच वर्षे हा धागा खाली
चार पाच वर्षे हा धागा खाली गेला होता . कसा सुटला कोण जाणे . पहिल्यांदाच वाचला. ग्रेट केवळ ग्रेट आणि कल्पनेपलिकडचे. मी माझ्या ऑफिस मध्ये आलेल्या लष्करी लोकाना नेहमीच रिस्पेक्टफुल वागणूक देतो. अगदी जवान असला तरी.
रिस्पेक्ट _/\_
रिस्पेक्ट _/\_
दोन्ही भाग काल वाचले. भारतीय
दोन्ही भाग काल वाचले. भारतीय सैनिकांच्या खडतर प्रशिक्षणाची आणि परिश्रमाची आम्हा सामान्यजनांना काहीच कल्पना नसते ती काल लेख वाचताना आली. त्या सैनिकांमुळेच आज आम्ही इथे सुरक्षित आहोत ही जाणीव आणि प्रत्येक सैनिकाबद्दल मनात नेहमीच आदर आहे. त्या सर्व आजी, माजी आणि भावी सैनिकांना सलाम.
परत एकदा सर्व सैनिकांना सलाम!
परत एकदा सर्व सैनिकांना सलाम! त्यांच्यामुळेच आम्ही सुरक्शित रहातो हे त्रिवार सत्य आहे.
धागा वर काढल्याबद्दल
धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद...
परत वाचून काढला, तपशील जितके लक्षात ठेवता येतिल तितके ठेवलेत.
खडतर आयुष्य....!
Pages