सैनिकाच्या गोष्टी - मी अनुभवलेलं सिक्किम (२)

Submitted by शरद on 29 October, 2010 - 08:00

पहिल्या भागाचा दुवा इथे मिळेल: http://www.maayboli.com/node/17258
...................................................................................................................
हिमालयात बर्फवृष्टी थांबल्यानंतरचे वातावरण अत्यंत सुंदर असते. विशेषत: रात्री पिठुर चांदणे असते. आणि सगळीकडे बर्फ असल्यामुळे ते जास्तच पिठुर दिसते. निरभ्र आकाश खूपच चांगले वाटते. पण मी त्या वेळेस ते विहंगम दृश्य पहायला उत्सुक नव्हतो; किंबुहना त्याकडे माझे लक्षही नव्हते. मला फक्त उरलेले जवान शोधायचे होते. आता वाट माझ्या पायाखालची झाली होती. पण तरी मी रेडियोसेट घेऊन निघालो होतो; म्हणजे कुणी आढळले तर मला संदेश देता आला असता. रात्रीचे दोन वाजले होते. मी चालत होतो. कुणी आढळतंय का ते पहात होतो. पण जिथे मला ते सगळे जवान भेटले तिथंपर्यंत तर कुणी आढळले नाहीत. म्हणजे तशी अपेक्षा पण नव्हती. खरी कसोटी पुढेच होती. आणखी एक किलोमीटरभर पुढे गेलो. एके ठिकाणी दोन वाटा झालेल्या आढळल्या. म्हणजे काही जवान वाट चुकून दुसर्‍याच डोंगरमाथ्याकडे गेले होते. तिकडे वळलो. चार पाचशे मीटर चढून गेल्यावर एके ठिकाणी लाल धुगधुगी असल्याचा भास झाला. थोडे पुढे गेल्यावर लक्षात आले की तो भास नव्हता तर खरोखरच एके ठिकाणी विस्तव होता; पण जवळपास कुणी नव्हतं. बर्फ सगळं विस्कटलेलं होतं. ते माझेच जवान असणार हे मी ओळखलं. वाट चुकून भलत्याच डोंगरमाथ्यावर चढले होते. मी परत ओरडत पाऊलखुणांवरून चालत गेलो. ते जरी अर्धा तास माझ्या आधी निघाले असले तरी मी फ्रेश होतो, त्यामुळे मी सहज त्यांना गाठू शकलो असतो. आणि पंधरा मिनिटांतच मला त्यांची चाहूल लागली. माझ्या ओरडण्याचा आवाज पोचला असेल कारण ते थांबले होते. मला पाहिल्यावर त्यातला लेफ्टनंट विरेन्द्रसिंग भाटिया तर अक्षरश: रडायलाच लागला. म्हणाला, 'आम्ही जिवाच्या करारावर चाललो होतो; कुठं जायचं ठाऊक नव्हतं. वादळ आत्ता थांबलंय. त्यापूर्वीचे हाल बघायला हवे होते, सर. तुम्ही देवासारखे आलात'. मी त्यांना रस्ता चुकल्याचे सांगितले आणि त्यांना परत योग्य मार्गाने घेऊन आलो. दुसर्‍या बाजूने कुणीतरी आलंय म्हटल्यावर सर्व जवानांना परत उत्साह आला. हळूहळू आम्ही सर्वजण योग्य त्या शिखरावर पोचलो. तोपर्यंत झुंजुमुंजु झालं होतं.

रात्रभरात सगळीकडे बातमी गेली होती. मदत पथके तयार होऊन गांतोकवरून आली होती. सर्व जवानांची गिनती झाली. एकून अडतीस जवान कमी होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या कमांडो प्लाटूनचे वीस जवान त्या अडतीसमध्ये होते. कमांडो प्लाटून म्हणजे बटालियनमधील सर्वात तगडे आणि प्रशिक्षित जवान. ते कसे काय मागे राहिले? गौडबंगालच होतं. त्या सर्व अडतीस जवानांना शोधणं हे मदतपथकांचं काम होतं. आणि मदतपथकांना रस्ता कोण दाखवणार? 'त्या' शिखराचा आणि 'वाटेचा' ज्याला सगळ्यात जास्त अनुभव आहे अशी व्यक्ती .. म्हणजे परत चालणे आले.

मदतपथकांना घेऊन निघालो. उजाडले होते. बर्फवृष्टी थांबली होती. त्यामुळे सर्व काही स्पष्ट दिसत होते.
शिपाई उदयनचा मृत देह मदतपथकाला दाखवला. त्यांनी चार जवानांसह तो पाठवला. पुढे गेलो. एके ठिकाणी पायवाटेपासून पंचवीस तीस फुटांवर एका झाडाखाली काळे काहीतरी दिसले. जवळ गेलो. नायक गणेशन. झाडाखाली विश्रांतीसाठी बसला होता. कधी त्याला झोप लागली आणि कधी त्या झोपेचे काळझोपेत रुपांतर झाले ते देव जाणे. त्याच्याही मृतदेहाला स्ट्रेचरवरून पाठवलं. असे एकूण सात जवान मृतावस्थेत वेगवेगळ्या ठिकाणी आढळले.

थोडं पुढे गेल्यानंतर कमांडो प्लाटूनचे जवान का आले नव्हते ते समजले. ते मागे पडणार्‍या आणि थकलेल्या जवानांना अक्षरश: उचलून आणण्याचे काम करत होते. ते स्वत: अशक्य थकले होते; पण तरी बाकीच्या जवानांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या हत्यारांसह त्याना आणण्यासाठी ते प्रयत्नांची शर्थ करत होते. त्यांना सगळ्यांना चहा, ग्लुकोज देऊन त्यांना घेऊन परत यायला निघालो. तसा रेडियो मेसेज पाठवला. पाठीमागून परत मेसेज आला की आणखी एक जवान पाहिजे. मग सगळ्या जवानांची नावे घेतली तर सदतीस निघाली. म्हणजे आणखी एक - हवालदार नंबियार - डेल्टा कंपनी - कुठेतरी होता. आठजणांचे एक मदतपथक बरोबर ठेवले आणि बाकीच्यांना परत पाठवून दिले. ते उरलेल्या जवानांची हत्यारे आणि इतर किट घेऊन गेले.

शोध शोध शोधले, पण हवालदार नंबियार काही केल्या सापडेना. शेवटी एकाचे लक्ष एका झाडावर लटकलेल्या जंगल कोटाकडे गेले. त्यात नंबियार होता. तिथे तो कसा गेला देव जाणे. कदाचित बर्फात पाय रुतत असल्याने त्याने झाडावर रात्र काढण्याचे ठरवले असेल. म्हणून तो झाडावर चढला आणि तेथेच गोठून गेला.

मनुष्य जिवंत असेतोवर त्याला कसेही उचलून नेता येते. पण मेलेल्या मनुष्याला काही तासांनंतर उचलणे हे महाकठिण काम असते. शरीर ताठून लाकडासारखे बनते. आणि नंबियारचे शरीर तर झाडावर अडकले होते. तिथून त्याला खाली काढायला आम्हा नऊजणांना दोन तास लागले. शेवटी त्याला काढून बेसवर परत नेले.

दुसर्‍या दिवशी सगळ्यांचे अंत्यविधी. (जवानांचे मृतदेह कॉफिनमध्ये घालून त्यांच्या घरी नेऊन इतमामाने त्यांची अंत्ययात्रा काढून सर्व विधी करण्याची पद्धत कारगील युद्धाच्यावेळेपासून वाजपेयी सरकारच्या काळात सुरू झाली. आमच्या वेळी तेव्हा नव्हती.) मृत जवानांपैकी पाच हिंदू, दोन ख्रिश्चन आणि एक मुसलमान होता. त्या सगळ्यांच्या वेगळ्या स्मशानभूमी, वेगळे विधी. त्याशिवाय शंभर एक जवान आणि दोन ऑफिसर्स हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमिट झाले. पैकी दहाजणांची बोटे कापावी लागली. इतर सर्व उपचारांनंतर परत फिट झाले.

सगळ्या बटालियनवर अवकळा पसरली होती. त्या दिवशी कुणी जेवले नाही. दुसर्‍या दिवसापासून ऑर्डर काढून सगळ्यांना जेवायला भाग पाडावे लागले. आर्मी आहे. असे बुळ्यासारखे रडत बसून कसे चालणार? कर्नक पृथ्वीराज सिंग ने सैनिक सम्मेलन घेतले. सर्व मृत जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि बटालियनला समजावून सांगितले की रुटीन ट्रेनिंग चालू राहिले पाहिजे. त्याप्रमाणे रुटीन सुरू झाले.

या प्रसंगाचे पुढे विश्लेषन झाले. काय काय चुका घडल्या, त्यांचा ऊहापोह झाला. असे परत घडू नये म्हणून काय करावे लागेल ते ठरवले गेले.

हा प्रसंग घडण्याचे ठळक कारण म्हणजे सर्वांनी गृहित धरले होते की ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बर्फ पडणे म्हणजे निव्वळ अशक्य! मग बर्फात घालण्याच्या कपडयांचे ओझे नेण्याचे कारणच काय? त्यामुळे अनेकांनी लोकरीचे कपडे घेतले नव्हते. पण ज्यांनी घेतले होते त्यांची अवस्था अत्यंत चांगली होती असे नव्हे. त्यातले सुद्धा काही जवान हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमिट झालेच; हां - त्यातले कुणी गतप्राण झाले नाही.

त्या भागातील भौगोलिक आणि प्राकृतिक रचना पाहिली तर एक लक्षात येते. साधारणपणे सात हजार ते अकरा हजार फूट या उंचीवर ज्या वेली (Rhododandrum) असतात त्या झाडांप्रमाणे सात आठ फूट उंचीच्या असतात. त्यांच्या खालून सहज जाता येते. दहा-अकरा हजार फूट उंच प्रदेशात त्यांची वाढ खुंटते. फक्त दीड दोन फूट वाढतात. त्यावेळी बर्फ पडले बर्फात त्या दबल्या गेल्या. दिसत नव्हत्या. पायात अडकू लागल्या आणि जवानांना चालणे अशक्यप्राय होऊन बसले. वरून पडणारे भुसभुशीत बर्फाची फुले, पाय अडखळत, धडपडत, पडत उठत ते पुढे पुढे जात होते. नंतर नंतर बर्फातील वादळाने काही दिसायचेच बंद झाले तेव्हा ते पुढे जाऊ शकले नाहीत.

तिसरी गोष्ट म्हणजे communication. जसा पाऊस बंद होऊन बर्फ सुरू झाले तसे रेडियोसेट काम करायचे बंद झाले. त्यामुळे काहीही बातमी कळाली नाही. नाहीतर वेळेवर मदतपथके तयार करता आली असती.

अजून तो प्रसंग आठवला की भारावून जातो; आपोआप हृदय भरून येते; त्याबरोबरच अभिमानाने माझी छाती दोन इंच जास्त फुगते.
..................................................................................................................

गुलमोहर: 

सर्व मा.बो.करांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा! हा भाग प्रकाशित करायला उशीर झालाय खरा. पण समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. Happy

शरद, चांगलं लिहिता. जवानांच्या आयुष्याची चांगल्याप्रकारे ओळख करून देताय. फक्त एक विनंती, दोन भागांमध्ये खूप वेळ जातोय, शक्य झाल्यास ते कमी करा.

दोन्ही भाग मी आत्ता वाचले.

शरद, छान लिहिले आहेत दोन्ही भाग. आर्मीमधले जवान किती प्रचंड कष्ट करतात हे अशा प्रकारच्या किश्शांनी आम्हाला कळते.

तुम्ही लेखन चालू ठेवावे ही विनंती. Happy

अगो, फचिन, निलीमा धन्यवाद.
आऊटडोअर्स, कामातील व्यस्ततेमुळे मी मा.बो. ला फार काळ सध्या देऊ शकत नाही. पण चांगले आणि वेळेत लिखान करायचे ठरवलेय. पुढे सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. Happy

शरद,
किती खडतर आयूष्य ! प्रत्येक भारतीयाला याची जाणीव ठेवावीच लागेल.
आणि हो, अभिमान आम्हालाही आहेच.

शरद,
दुसरा भाग पण खूप छान लिहला आहात. या खडतर जिवनाची आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. असच लिहीत रहा. दिवाळीच्या खूप शुभेच्छा!

शरद, आपल्याला आणी आपल्या कुटुंबियांना दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा!!
तुमचे लेख वाचून नेहमीच सुन्न व्हायला होतं.. लहानपणी 'हकीकत' सिनेमा पाहतांना मनावर इतका खोल परिणाम झालाय तो अजून जसाच्यातसाच आहे.. असा काही लेख वाचला कि डोळे भरून येतात..
तुम्हाला आणी तुमच्या सैनिकांना सलाम!!

भारतातहि २ वर्ष नहि तरि किमान ६ महिने सैनिकि सेवा अनिवार्य करावी.
tarunana ek yogy valan lagel... samajik bandhilkichi Deshabhiman ni Asmitechi janiv drudh hoil.
aani Rajkarnyanani Desh chalavne ha porkhel nahi tar ek jababdar nagrik mhanun aapan Deshach den lagto hyachi janiv hoil...ni aaj bhrastcharane je Desh vikayla nighalet tyala nakkich aala basel.
ma bo var audio / video thr articles takta yetil ka? ektar vel vachel type karne etc. kiva handwritten files scan karun upload karavya ka... ek tar hati likhanacha feel kahi veglach asto nahika...
arthat chubhu dyaghya... mi just mala je suchal te lihite ahe, kshama asavi!
Sharadsir tumche lekh apratim... sainyat bharti nahi hota aal hyachi rukhrukh ajunhi jat nahi manatun. Thats why if we get opportunity to serve as volunteer... dudhachi tahan takavar tari bhagel hi supt ichha!
Sharadsir, shtashaha dhanyavad, vel hoil tevha asech lihit raha plz.

शरद, तुम्हाला व कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा!!

मी मागल्या भागात लिहिल्याप्रमाणे 'ही अशी तयारीच खर्‍या कसोटीच्या क्षणी तुम्हाला प्रचंड काम करवण्यास तयार करते'. काही शंका: सराव मोहिमेत इतके जवान गमावणे ही फार मोठी हानी नाही का? ह्याची जबाबदारी कुणाकडे जाते? लष्करांतर्गत चौकशी होते का?

शरदराव,

१. संपूर्ण मायबोलीलाच तुमचा अभिमान वाटायला हवा व वाटतही असणार!

२. थक्क करणारे अनुभव!

३. सहज लेखन शैली!

४. अशा आयुष्याचे पडसाद उमटलेली गझल वाचायला आवडेलच!

-'बेफिकीर'!

बापरे.. किती कष्टदायक आहे हे सगळे...
आणि अशा तर्‍हेने जवान गमवावे लागणे.. Sad
तुम्ही लिहित आहात म्हणून जवानांच्या खडतर आयुष्याची ओळख होत आहे.. लिहित रहा.

<<सराव मोहिमेत इतके जवान गमावणे ही फार मोठी हानी नाही का? ह्याची जबाबदारी कुणाकडे जाते? लष्करांतर्गत चौकशी होते का?>>

या प्रश्नाचे उत्तर मी टाळत होतो. त्या वेळी अर्थातच अंतर्गत चौकशी झाली; म्हणजे अशा वेळी होतेच होते. पण दोष कुणाला द्यावा हे subjective निर्णय असल्याने मतभेद होऊ शकतात. माझ्यासारख्री माणसे असतील तर नक्कीच होतात.

हा विषय कटु असल्याने मी आणखी काही लिहिणार नाही. फक्त इतकेच सांगतो की तारखा आणि नावे बदलून लिहिली आहेत; काही भौगोलिक संदर्भ थोडेसे बदलले आहेत. बाकी सर्व (मला आठवते त्याप्रमाणे) सत्य वर्णन आहे.

चिनु | 10 November, 2010 - 01:18 नवीन
भारतातहि २ वर्ष नहि तरि किमान ६ महिने सैनिकि सेवा अनिवार्य करावी.
>>
idea चांगली आहे पण दीड दोन कोटी ची सैन्यभरती होइल.

अग निलिमा आपली सीमा खुप मोथी आहे... नि आपल्याकदे समस्याही अनन्त आहेत... पुर्वान्चल जम्मु कश्मिरच कशाला अग्दि गदचिरोलि मधेहि... आनि नैसर्गिक आपत्ती हि सतत येतच असतातनाग... प्रत्येकवेली लश्कर/ पोलिस कुथे नि किती पुरेसे पदनार? आनि सुखसीन आयुष्य जगताना आपल्याला आपल्या असन्ख्य जवानाच्या त्यागची जानिव राहील.

btw... mi sahaj mazi pratikriya lihiliy... mazya hatat jar decision ghen asat tar tamam bhrashtachryana kalyapanyachi shiksha mhanun border var hakalal asatg... tehi ain hivalyat when temp. drops to -40.... mast ekekacha statue hoil!

होय चिनु Selective Service जास्त योग्य होईल म्हणजे आव्श्यकतेप्रमाणे सैन्यभरती करता येइल.
आपली सीमा मोठी हे खरेच पण एवढे सैन्य manage, train, sponsor करणेही अवघडच जाईल.

चिनु | 11 November, 2010 - 02:19
btw... mi sahaj mazi pratikriya lihiliy... mazya hatat jar decision ghen asat tar tamam bhrashtachryana kalyapanyachi shiksha mhanun border var hakalal asatg... tehi ain hivalyat when temp. drops to -40.... mast ekekacha statue hoil!

>>
बापरे चिनु तु चीनमधुन तर पोस्ट करत नाहीस ना? मला आपल्या सैन्याचा अभिमान आहे पण भारतीयांचा तुला एवढा राग का की हिवाळ्यात तु सर्वांना हिमालयात पाठवतेस?

सॉरी bhrashtachryana मी भारतीयांना असे वाचले. आता पुर्ण अनुमोदन. मगासचा मेसेज नाही लिहीला असे समज.

जब देस में थी दिवाली, वो खेल रहे थे होली
जब हम बैठे थे घरोंमे, वो झेल रहे थे गोली .....

आपल्या भारतीय जवानांना कोटी कोटी सलाम!!!!!!

इतक्या अवघड दुर्गम प्रदेशात, बिकट परिस्थितीत, कठीण हवामानात अपुर्‍या सामग्रीनिशी जीवावर उदार होऊन भारताच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज जवानांना कोटी कोटी सलाम!

शरददा, सुंदर लेखन. हे अनुभव शब्दांकित करणं खूप कठीण असतं. परिस्थिती आणि मनस्थिती, दोन्ही कठीण, कातर.
आपल्या पथकातला, हाताखालचा एक जवान गमावणे हे किती मोठं दु:खं असणार. एखाद्या मोठ्ठ्या कुटुंबातलं जवळचं माणूस गमावण्यासारखच.
तुम्हाला सलाम. आपल्या देशाच्या रक्षणासाठी झटलेल्या तुमच्यासारख्या प्रत्येकाचे आम्ही सुरक्षित नागरिक ऋणी आहोत. हे ऋण प्रत्यक्षं फेडण्यासारखं नाही.
पण एक सुजाण नागरिक म्हणून अंतर्गत देश सगळ्याच "घाणी"पासून स्वच्छं ठेवायचा प्रयत्नं करीत राहिलो तर अंशतः फेडू असं खरच वाटतं.
असो... सुंदर लेख. खूप उशीराने वाचतेय.

थरारक अनुभव !
शरदजी, तुमचं हे मूळ रूप मला माहीत नव्हतं !:)
माझ्या गझलेला ( गंधफुले ) अगदी सहजपणे डागडुजी करणारे अनुभवी कवी हीच ओळख मला माहीत होती.:)
लेख वाचतानाच काटा आला अंगावर...तुम्ही कसे गेला असाल ह्या आणि अशाच अनुभवांतून !
सलाम !!

हे वर्णन कसले ? हा तर एक बेहतरिन चलत चित्रपटच की. एक सैनिक इतके सुन्दर प्रवस वर्णन लिहितो. अगम्य अन अदभुत सुध्हा. आमच्या साठी तरी लिहित रहा.

शरद जी
अभिमान वाट्ला तुमची कर्तव्यनिष्ठा पाहून.
बिकेसर
हे प्रवास वर्णन नाहिये हो्. हे स्वानुभवावर आधारीत आहे,
सॉरी ,गैरसम्ज करून घेऊ नका.

Pages