दिवाळी.. 'त्यांची'!

Submitted by आशूडी on 28 October, 2010 - 01:35

'दिवाळी' या विषयावर श्याम मनोहर, श्री.दा. पानवलकर आणि भालचंद्र नेमाडे यांनी काय लिहिले असते असा विचार करता करता तयार झालेले हे गद्य विडंबन. Happy
झक्कू हा पानवलकरांच्या 'अपील' या कथेचा कथानायक इथे थोड्या नव्या रुपात.

***
***

नोहेंबर महिना चालू आहे. मी 'नोव्हेंबर' असे लिहित नाही. कुणी मला तसे लिहावे असा आग्रहदेखील करत नाही. तो अर्धा 'व' (इथे तर पूर्णच 'व' टाईप होतोय. अर्धा व टाईप कसा करतात? मला पाय वगैरे मोडायचा नाहिय. अर्धाच व हवा आहे. बॅकस्पेस दाबला की आख्खा व गायब होतोय. पूर्ण हे एकदम येत नाही. अंशा अंशाचे मिळून पूर्ण बनते. हाताने लिहीले की अर्धा व येतो लिहीता पण कॉम्प्युटरवर नाही. हे कायाय? आपण हाताने लिहायचे का थांबवले? आता अमेरिका, युरोपात टीव्हीवर कार्यक्रम बघता बघता टायपिंग करायचे तंत्रज्ञान येईल तेव्हा एकदम संपूर्ण शब्दच उमटतील. आपल्याला तेही चालेलच.) मी बोलतानाही म्हटले नाही तरी कुणाच्या लक्षात येत नाही. बारीक बारीक गोष्टींचा आपल्याला कंटाळाच आहे. भव्य दिव्य गोष्टीनी आपल्या डोळ्यांना विस्फारण्याची दिपून जाण्याची सवयच झालेली आहे. त्यामुळे छोट्या चुका, छोटे बरोबर आपोआप निसटत राहते. छोट्या चुका असतात. छोटे बरोबर कधी ऐकल्याचे आठवत नाही. म्हणजे आपण करतो ते सारे बरोबर यासारखेच आपण करतो ते सारे मोठे असे आपल्या लोकांना वाटत असावे. त्यामुळे छोटे बरोबर असे काही कुणी म्हणत लिहीत वाचत नसेल. नोहेंबर महिना म्हणजे दिवाळी. दिवाळीत आपल्याकडे बायका घराची स्वच्छता करतात, फराळाचे नाना पदार्थ करतात, पोरांना शाळेला सुटी असते. ते किल्ला करतात. दिवाळीतच किल्ला का असावा असा प्रश्न मला पडतो. शिवाजी महाराज असताना दिवाळी होती का? मग ते बालपणी किल्ला करत असत का? किल्ल्यावर राजा म्हणून कुणाचा पुत़ळा ठेवत? ही माहिती उपलब्ध नाही. महाराजांनंतर ही प्रथा अस्तित्वात आली असेल तर तिच्या उगमाचे कारण काय? उपयोग काय? किल्ला बनवण्याचे शास्त्र असे पुस्तक आपल्याकडे नाही. कोणत्या किल्ल्याला सर्वोत्कृष्ट म्हणावे हे संभाजी बागेतल्या स्पर्धेच्या परीक्षकांना कसे कळते याची नोंद हवी. वेळ घालवण्यासाठी मुलांना मातीत खेळून द्यायचे याला काही शास्त्रीय आधार आहे का? दिवाळी संपल्यावर त्या किल्ल्याचे काय करावे? किल्ला बनवण्यातून जर कलात्मक सर्जनशील वृत्ती वाढीस लागत असेल तर नंतर मोडून टाकण्यातून आपण मुलांना विध्वंसकतेचे धडे देत आहो असा सूक्ष्म विचार न करण्यामागचे कारणही किल्ल्याच्या सुबकतेतून डोळे दिपून जाणे हेच असावे. दिवाळीत घरामध्ये फराळ, मिठाई अशा तर्‍हेतर्‍हेचे पदार्थ असतात. एरवी वर्षभरही ते असतात पण दिवाळीत ते असावेतच असे न लिहीलेले शास्त्र आहे. अलिखित शास्त्र असे सहसा म्हणू नये. शास्त्र हे बर्‍याचदा लिहीलेले, वाचलेले असते. पण आपल्याकडे सतत 'असे शास्त्र आहे' असे म्हणतात त्याचे कारण, परिणाम कुठेही लिहीलेले सापडत नाहीत. युरोपात,अमेरिकेत शास्त्राची पुस्तके असतात ती आपली रेफरन्स बुक्स म्हणून प्रसिध्द होतात. ती वाचायला आपल्याकडे हुशार लोक लागतात. लिहायच्या भानगडीत कुणी पडत नाहीत. कुटुंबव्यवस्थेचा पाया दिवाळीत भक्कम केला जातो. सगळ्यांसाठी नवीन कपडे घ्यायचे. घरात एखादी मोठी वस्तू मोठ्या दिवाळी महोत्सवातून, त्यावर काहीतरी फ्री मिळवूनच आणायची. दिवाळी अंक आणून शेल्फ मध्ये नीट लावायचे, पुढच्या दिवाळीपर्यंत वाचायचे असतात ना! दिवाळीत घरात आनंद असतो. नवराबायकोतही सहसा भांडणे करत नाहीत.नरकचतुर्दशीच्या दिवशी रेडिओ, टीव्हीवर नरकासुरवधाची कथा ऐकायची असते. पन्नास वर्ष ऐकून नक्की कुणाच्या तपश्चर्येने कोण प्रसन्न झाले हे त्या ऐनवेळी आठवले तरी कुणाला काही वाटत नाही. दिवाळीत मोती साबणाने आंघोळ करतात. एरवी या साबणाची जाहिरातही नसते आणि कुणी कानीकपाळी ओरडल्याशिवाय मनाने आम्ही काही विकत घेत नाही. आंघोळ करताना मुलांनी फुलबाज्या उडवाव्यात. प्रसन्न तेजोमय आंघोळ वर्षातनं एकदाच असते. त्यानंतर पेपरमध्ये आनंदी कुटुंबांचे फोटो पाहायचे. तेव्हा राजकारणात, शिक्षणक्षेत्रात, क्रीडाक्षेत्रात फारसे काही महत्त्वाचे घडत नाही बहुतेक, त्यामुळे पेपर पणत्या आणि आकाशकंदिलांनी नटून थटून येतो.गुळगुळीत पानांवरच्या जाहिराती वाचायच्या. कोणती बेस्ट ऑफर आहे यात मेंदूला शिणवायचे. आंघोळ फराळ झाले की रिकाम्या दिवसाचे काय करायचे हे इतक्या वर्षात कुणालाही सुचले नाही. म्हणून मग वेळ घालवायला लोक देवळात नाहीतर नातेवाईकांकडे जातात. तिथेही आनंदी आनंद असतो. दुपारी जेवून झोपून संध्याकाळी नवीन कपडे घालायचे. रांगोळ्या काढायच्या, पणत्या लावायच्या. लक्ष्मीपूजन करुन फटाके उडवायचे. फटाके उडवताना मुलांना जपायचे, सांभाळायचे, ओरडायचे. जीव वर खाली होऊ द्यायचा. दरवर्षी पिशवीभर फटाके आणायचे. आवाजी, रोषणाईचे. मुलांना प्रदूषणाचे महत्त्व पटवून द्यायचे. दुसर्‍या दिवशी रस्ते भरभरुन झालेला कचरा बघताना दोन सेकंदच तोंड वेंगाडायला विसरायचे नाही. घरी रात्री टीव्हीवर दिवाळी विशेष कार्यक्रम चालू असतात ते पाहायलाच हवेत. नाहीतर उद्या ऑफिसमध्ये जाऊन चर्चा करायला आपल्याला दुसरे विषय कुठून आठवणार? आपण काही संशोधक नाही की सतत नावीन्य शोधत त्यावर चर्चा करत रहावी. आईनस्टाईनला जशी १६ वर्षांनी त्याची गणितातली चूक सापडली तशी आपल्याला सबंध आयुष्यात एकदाही नाही सापडत. १६ वर्ष ते गणित, तो प्रश्न त्याच्या सतत डोक्यात होता! आपण सतत टीव्हीविषयी बोलत असलो तरी ठामपणे हे चूक किंवा हे बरोबर असे नाही सांगू शकत. पण आपल्याला चर्चा करायला कोण रोखू शकतो? त्यातून निष्पन्न व्हावे असा काही नियम नाही. असला तरी आम्हाला तो माहित नाही. युरोप अमेरिकेत असे काही सांगत नाहीत. त्यामुळे सेलेब्रिटीजचे दिवाळी कार्यक्रम पाहायलाच हवेत. त्यांची दिवाळी कशी झाली, परधर्मीय असून परप्रांतीय असून ते आपल्याला शुभेच्छा देतायत याचे गहिवर येऊ द्यावेत, टीव्हीवरच्या मालिकांतल्या घरात पण दिवाळी असते ती पहावी. मन अगदी प्रसन्न होऊन जाते. अशा प्रसन्न मनाने इतरांनाही हसून दिवाळीच्या अशा शुभेच्छा द्याव्यात.. "ही दिवाळी तुम्हा सार्‍यांना आनंदाची, सुखासमाधानाची व भरभराटीची जावो!"

-राम बरोबर

***

अणकुचीदार पिवळ्याधमक चांदण्या अग्रावर घेतलेल्या एकसंध रेषा तीक्ष्ण सुयांसारख्या करकचून डोळ्यात घुसल्या. कोणतीही पूर्वकल्पना न देता दृष्टीपल्याड असलेल्या कुणीतरी अज्ञाताने अचानक धनुष्यातून सोडलेला बाण जसा सप्पकन नजरेसमोर यावा तसं समोरच्या गुदमरलेल्या काळ्या पटलावर क्षणभर काहीतरी चमकून गेलं. पाठोपाठ ढॉप्प असा आवाज होऊन चुरचुर्चुर करत शंभर दीडशे रंगीबेरंगी चांदण्यांनी एकच गलका केला. सोपा प्रश्न विचारला की वर्गातली सारी मुले एकाच वेळेस बोलायला सुरुवात करतात आणि गोंधळ होऊन मास्तराला काहीच नीट ऐकू येत नाही तसं काहीसं त्याचं झालं. काही उमजायच्या आत समोर साकार झालेला तो चांदण्यांचा तेजोगोल हवेत विरुन गेला. तो रस्त्याच्या कडेने नेहमीप्रमाणे पावलांचा आवाज होऊ न देता खाली मान घालून चालत होता. त्यानं डोळ्यांच्या पिंगट हिरव्या बाहुल्या बारीक केल्या अन पांढर्‍या शेंड्याची काही लांबसडक शेपूट पाठ आणि पोटाच्या मधेपर्यंत आणून खाजवलं. इतक्यात कानठळ्या बसवणारा स्फोट पाठीमागे झाला. तो झप्पकन उलटा फिरला अन कान टवकारुन सेकंदभर थांबून अंधारातच कुठेतरी टक लावली. काहीच हालचाल झाली नाही. रस्त्यावर खस्फस आवाज आला. सफेद कान हलला. झक्कूनं आपले हिरवेपिंगट डोळे किलकिले करुन रुंदावले. समोर फणश्यांचा राजू उदबत्ती घेऊन येत होता. कागदाच्या कपट्यांच्या पसार्‍यात न जळलेले फटाके शोधत होता. कागदिच्चा! गुर्रर्र.. तो जळाऊ उग्र श्वास नाकपुड्यात भरुन राहिला होता.मऊ पावलं टाकत तो रस्त्याच्या कडेशी गटारापाशी आला. स्वत:ला मोकळं करुन गटाराच्या पलीकडे कुंपणाच्या भिंतीवर झक्कूनं झेप घेतली. भिंतीवरचं तारांचं कुंपण त्याच्या काळ्या कुळीकुळीत तलम पाठीशी सलगी करत असतानाच त्यानं पाठीची आतली कमान केली आणि खाली सुळकांडी मारली. कोपरकरांच्या स्वयंपाकघरातल्या खिडकीतून निघालेला बेसनाचा खमंग वास भरुन राहिला होता. त्या स्वादिष्ट वासानं केव्हापासून रिकाम्या असलेल्या पोटाची जाणीव आणखी खोल झाली. पुढच्या दोन पायांवर मागे रेलत झक्कूनं शेपूट उंचावून 'म्यॉंव' केलं. मानेला जोरात घुस़ळत दोन्ही कान आणि नाकाच्या पोकळ्या फ्सकन उच्छवास सोडून साफ केल्या. कानांचा टाळूवर टपटप आवाज झाला. लखलखणार्‍या बंगल्याच्या गेटातल्या गजांमधून अंग चोरत बाईंच्या रांगोळीला धक्का न लावता अंधाराच्या कडेने खिडकीखाली जाऊन हाक मारल्यासारखं क्रँव केलं. त्यांनी सवयीनं 'आले रे, झक्कू!' साद दिली. नखशिखांत नटलेल्या बाई नवीन साडीची सळसळ करत पणत्यांमधून वाट काढत आल्या. हातात झक्कूची दुधाची बशी होती. ती पुढ्यात ठेवत झक्कूच्या टाळूवरनं गोजिरवाणा हात फिरवला. त्यानं सफेद कान टवकारला आणि म्यॉव केलं. "घे रे राजा, आज दिवाळीची करंजीची पुरी कुस्करलीये.. घे" त्या त्याच्या टाळूवरुन मानेवर हाताने गोंजारत राहिल्या. लपलप करत भुकेल्या झक्कूनं दिवाळीचा फराळ फस्त केला. बशी सायीसकट चाटून, निरपून खाल्ल्यावर त्यानं बाईंकडे पाहिलं. त्या गोडसं हसल्या. हसताना त्यांच्या डोळ्यांकडेला चुण्यांची गर्दी झाली. ती पाहताना झक्कूला नेहमीच गंमत वाटायची. बाईंनी जिवणी तशीच रुंद ठेवत त्याला थोपटलं. झक्कूनं मिश्या साफ केल्या आणि उठून खिडकीशेजारच्या पाईपजवळ गेला. "हं.. लोळा आता!" अतीव प्रेमानं त्याच्याकडे पाहात बाई बशी घेऊन निघाल्या. अर्धगोल आडवा होताना झक्कूनं डाव्या पंजानं सफेद कान खाजवला आणि जाणार्‍या बाईंकडे पाहत 'म्यँ ऊऊ' केलं..वळून पहात बाई म्हणाल्या, "हो रे सोन्या, दिवाळीच्या शुभेच्छा तुलाही!" दिवाळी डोळ्यात साठवत त्या अंधार्‍या कोपर्‍यात शेपूट पोटाजवळ घेत झक्कू गोल विसावला.

-मानवलकर

***

इ.स. नऊ हजाराव्या शतकातील इ. सहावीच्या 'इतिहास एकविसाव्या शतकाचा' पुस्तकातील पान क्र.४२

त्या काळात नवरात्रानंतर वर्षातला मोठा सण दिवाळी असे. तरी अजून 'दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा' उक्तीवर सांगोपांग विचार कसा झाला नाही हे भूतकाळातले एक आश्चर्य आहे. महामहोपाध्यायांच्या संशोधनावरुन असे समजते की, या काळात 'अस्तीलनस्तील्तेवढेखर्चकरा' या विषाणूची बाधा होऊन खरेदीची साथ यायची. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला उदाहरणार्थ 'मान्सून सेल्स आलाओ' मोहीम असायची. त्याची लस टोचून घेतल्यावरही दर हंगामात काही विशिष्ट वर्ग या साथीला बळी पडल्याच्या बातम्या सापडतात. त्यामुळे दुकानदार व विक्रेते यांच्यासाठी उदाहरणार्थ ग्लुकॉन डी, पारले जी यांचा खप वाढल्याचे पुरावे आहेत. दिवाळी या शब्दाची फोड दिव्य अळी अशी नसून 'दिव्यांची आळी' अशी आहे. त्यावरुनच पुढे आळीपाळीने लागणार्‍या दिव्यांच्या माळा खिडकीत लावण्याची पध्दत रुढ झाली. दिवाळी आणि रांगोळी यांचा परस्परसंबंध यमकापुरताच नसून उदाहरणार्थ रांगेतल्या दिव्यातही आढळतो. दिवाळी हा स्त्रीपुरुषआबालवृध्द श्रीमंत गरीब सर्व जातीपंथीयांनी साजरा करण्याचा उत्सव असे. तेव्हा सारे एकमेकांना खालील श्लोकातून अभिष्टचिंतन करीत असत.
"दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!"

-पेमाडे

***
***

गुलमोहर: 

Lol नोहेंबर, अर्धा व, विध्वंसकतेचे धडे, मोती साबण, नरकासुरवधाची कथा.. इत्यादी पंचेस अफाट आहेत..! ते मनोहर पण दचकतील, हे वाचून. Proud
ते पानवलकरांचे तर फार भारी जमले आहे. "अणकुचीदार पिवळ्याधमक चांदण्या अग्रावर घेतलेल्या एकसंध रेषा तीक्ष्ण सुयांसारख्या करकचून डोळ्यात घुसल्या" हे म्हणजे फुलबाज्यांबद्दल आहे, हे चार वेळा वाचल्यावर कळलं. आणि ते 'कागदीच्चा!' Lol खूप गोड आहे तो झक्कू. त्या बोक्याच्या नजरेतली दिवाळी फारच भारी! (पानवलकरांची ती 'अपील' कथा वाचल्यावर हे वाचायला जास्त मजा येईल खरेच. तिथल्या व्हिलन बोक्याला हिरोच केलेस की इथे!)

अतिभारी जमले आहे.. सिंपली ग्रेट! हे असे फक्त तूच लिहू शकतेस. Happy

आशुडी, भालचंद्र नेमाडे म्हणजे तेच का ? कोसला वाले. ते रटाळ वाचुन मी त्यांच नाव टाकल. आता पानवलकर आणि श्याम मनोहर यांच साहित्य वाचायला हव. त्या शिवाय हे विडंबन कस समजणार. बाकी पुणेकरांच काही वेग्ळ्च हो.

मस्त जमलयं.. Happy
अर्धा व,मोती साबन, गुळ्गुळीत पेपर, छोटे बरोबर,पाठीची आतली कमान.. भारीच.
पण नेमाडे तितकेसे नाही आवडले..

77.gif77.gif77.gif77.gif77.gif

भन्नाट, रच्याकने पानवलकरांचं लेखन कुठे वाचायला मिळेल? मी मागे एक पानवलकरांच्या कथांचा संग्रह का असं काहीतरी नाव असलेलं एक पुस्तक वाचलं होत. पण मला आवडल्या होत्या त्या कथा !

मनोहर आणि नेमाडे एकदम करेक्ट... :हहपुवा:
पानवलकरांचं मी कमी वाचलंय त्यामुळे सांगू शकत नाही पण वरचं मस्तंय...
Happy

जबरदस्त अभ्यास आहे या तिघांच्या शैलीचा. तिघांना दाखवले तर हे आपण लिहिलेच नाही, असे कबूल करणे अवघड जाईल, इतके मस्त जमले आहे.

मस्त. खूप आवडले. पानवलकरांचे फार काही वाचले नाही त्यामुळे ते फारसे कळले नाही पण बाकीची दोन एकदम भारी.

Lol
मस्त! Happy

पानवलकर, मनोहर वाचलेले नाहीत त्यामुळे शैली ओळखता आली नाही पण मोती साबण वगैरे आवडलं.
पहिली ओळ वाचून टण्याला काय आवडेल हे मात्र लगेच कळलं. Proud

Pages