बबनची "दुसरी" गोष्ट

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

"दुसरी गोष्ट अशी तुमाला सांगतो बाबा अहो खुर्पणीला बाया मिळंना...धा धा दरानं बी दोघी-तिघीच आल्या..."

शुक्रवारी बाजार करण्यासाठी बबन श्रीरामपूरला येतो. बाजारातली कामं झाली की त्याची घरी एक चक्कर असते. बाबा वर्‍हांड्यात असतील तर थेट पुढच्या दाराशी नाही तर बैठकीतल्या दिवाणाला टेकून बसायचे आणि आईने दिलेल्या चहाचे नाही तर पन्ह्याचे भुरके मारत बाबांना सगळ्या आठवड्याची उस्तवार सांगायची. ह्या हकिकतींमध्ये बबनच्या सगळ्या गोष्टी दुसर्‍याच असतात. त्याला पहिली गोष्ट सांगताना आम्ही कुणी कधीच ऐकलं नाहीये. बियाणं मिळत नाही, कामाला बाया मिळत नाहीत, वळवाने आंबा झोडपला अगदी गायीला झालेली पहिली कालवड सुद्धा "दुसरीच". ह्या बबनच्या स्वतःच्या आयुष्यात मात्र भलतीच दुसरी गोष्ट घडली होती. तेव्हाच्या बबनच्या निर्णयाचे आम्हाला सगळ्यांना खूप कौतुक वाटले, अभिमान वाटला तरी त्याला स्वतःला मात्र आपल्या वागण्याचा पश्चाताप होतो.

बबनचे पूर्ण नाव बबन देविदास भिलारे. मराठवाड्यातल्या उस्मानाबादहुन बबन आणि त्याचे आई-वडिल, सहा बहिणी असं कुटुंब मोलमजुरीसाठी मालुंज्याला आलं. ते आले तेव्हापासून आमच्याकडे कामाला आहेत. सुरुवातीची काही वर्ष विशेषत: मुलींची लग्न होइपर्यंत त्याचे आई-वडिल तिथेच होते. पुढे ते परत उस्मानाबादला गेले. बबन मात्र इथेच राहिला. त्याचं लग्न झालं, मग बायको इथे आली. सगळा प्रपंच उभा राहिला. ही भिलारे कुटुंबातली माणसं सगळी देखणी. त्यामुळे त्याच्या बहिणींची पटापट लग्न झाली तशी त्याला स्वतःला सुद्धा बायको नाकी डोळी निटस शिवाय शिकलेली- पाचवी पास- मिळाली. मंगल तिचं नाव. मंगल कामाला अगदी वाघ होती. नवर्‍याच्या बरोबरीने कष्ट करायची. दोघं मिळून अनेक उद्योग करत. थोडी फार वहिवाटीची मिळालेली जमीन होतीच. त्याबरोबरीने लोकांचे आंबे, चिंचा उतरवायला घ्यायच्या, मोंढ्यावरुन भाज्या घेऊन त्या आठवडी बाजारात विकायच्या असे पण काही ना काही उपजिविकेचे उद्योग सुरुच असायचे.

मंगलला लग्नानंतर वर्षा दोन वर्षांत मुलगा झाला. सगळा आनंदी आनंद असतानाच दुर्दैवाने ते पोर देवाघरी गेलं. त्यानंतर दोन मुली झाल्या. तिनही बाळांतपणात सी-सेक्शन झालेलं. त्यामुळे तिसर्‍या खेपेनंतर आता अजून बाळांतपण नको असं डॉक्टरांनी सुचवलं. आता चांगल्या मोठ्या शहरांमध्ये डॉक्टरचे सल्ले धुडकावून बाईच्या जीवाशी खेळ करणारे 'सुशिक्षित' लोक बघितले आहेत. खेड्यापाड्यांमध्ये तर कल्पनाच करायला नको. पण बबनचा बायकोवर भारी जीव. तिच्या तब्येतीची हानी व्हायला नको म्हणून त्यांनी कुटुंब नियोजन करायचे ठरवले. मुलगा मुलगी भेद करायचा नाही. आपल्या मुलींनाच खूप शिकवू, मोठं करु असा त्यांचा विचार. पण त्याच्या आई-वडिलांना कुठलं चैन पडायला. सहा बहिणींमध्ये हा एकुलता एक मुलगा. त्याच्या वंशाला दिवा तर हवाच. मग दुसरं लग्न कराव म्हणून त्यांनी बबनच्या मागे लकडा लावला. बबनच्या काही मनास नव्हतं दुसरं लग्न करण्याचं. त्यामुळे गावी गेलं की काही ना काही करुन हा विषय टाळणे हे एकच काम त्याच्या मागे लागलं. गंमत म्हणजे मंगलच्या माहेरी सुद्धा सगळ्यांचं म्हणणं होतं की त्याने दुसरं लग्न करावं. तिच्या थोरल्या भावाचा तर फारच आग्रह होता.

बबन ऐकत नाही म्हंटल्यावर एकदा सगळ्या नातेवाईकांनी संगनमत केलं आणि दाखवायला म्हणून मराठवाड्यातलीच एक मुलगी मालुंज्याला घेऊन आले. गोरी गोमटी अशी ती मुलगी बबनपेक्षा वयाने बरीच लहान होती. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु असताना अचानकच सगळ्यांनी घेराव घालून बबनला गाडीत कोंबला आणि बेलापूरच्या केशव-गोविंद मंदिरात घेऊन गेले. हे केशव-गोविंदाचे मंदीर गंधर्व विवाहांसाठी फार प्रसिद्ध आहे. तिथे 'माळ घातली' की लग्न अधिकृत समजतात. तिथे बळजबरीने ह्या दोघांचं लग्न लावलं. मागून मंगलही तिथे आली होती, तिच्या देखतच हा प्रकार घडला. लग्न लागून सगळी वर्‍हाडी मंडळी घरी परत गेल्यावर तिनेच बिचारीने गोड-धोड करुन सगळ्यांना जेऊ घातलं. जेवणावळी आटोपल्या. इप्सित साध्य झालंच होतं. मंडळी आपापल्या वाटेला लागली. घरी राहिले हे तिघे, एक नवरा आणि दोन बायका. एक सोळा-सतरा वर्षांची नवी नवरी तर दुसरी दोन मुली पदरात असलेली आणि आता नव्यानेच सवत झालेली.

नवरा बायकोसमोर फारच मोठा पेच पडला. बबनने तर तिला बायको म्हणून वागवायला सरळ नाही सांगितलं. मग दोघांनी मिळून तिला ह्या बंधनातुन मोकळं करायचं असं ठरवलं. दोघांचं असं म्हणणं पडलं की ही मुलगी एक तर वयाने लहान आहे. आपलं वय तिच्यापेक्षा जास्त, दोन मुली आहेत आपल्याला. आटोपशीर म्हणावा असा संसार आहे. दोन वेळचं सुखासुखी पोटात जातय. त्यात अजून ह्या मुलीची, पुढे मुलाबाळांची भर घालून तिची आणि आपल्या संसाराची तरी का परवड करा.

तिला लग्नबंधनातुन मोकळं करणं सोपं नव्हतं. नवर्‍याने टाकलेली बाई म्हणून तिचे हाल झाले असते. मग तिच्या दुसर्‍या लग्नाचं सुद्धा बबननेच अंगावर घेतलं. त्याने स्वत: प्रयत्न करुन, चार नातेवाईकात शब्द टाकून तिच्यासाठी एक चांगला मुलगा बघितला आणि तिचं त्याच्याशी लग्न लावून दिलं. हे लग्न जमेपर्यंत तिला उस्मानाबादला आपल्या आई-वडिलांकडे ठेवलं. तिच्या आई-वडिलांवर भार नाही टाकला. आज ती आपल्या संसारी सुखात आहे. तिला दोन मुलं आहेत. अशा प्रकारे बबनने आपल्या परीने "दुसर्‍या" गोष्टीला पूर्णविराम दिला. ज्या समाजात आजही मुलगा नाही म्हणून बाईला तुच्छ वागणूक मिळते, बायकोवर हात उगारणे मर्दुमकी समजली जाते त्या समाजात त्याने आपल्या वागण्याने एक आदर्श पायंडा पाडला.

पुढे बबनच्या दोन्ही मुली भरपूर शिकल्या. मोठ्या मुलीने संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली आहे आणि आता तिला पुण्यात एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली आहे. धाकटीने एम ए केलय. ती एखादा लघु उद्योग सुरु करता येइल का ह्याची चाचपणी करते आहे. तिथे गावात एक छोटंसं ब्युटी पार्लर चालवते आहे. पंधरा-वीस वर्षांपुर्वी एका लहानशा खोपटात रहाणार्‍या बबनने स्वतःचं टुमदार घर बांधलय. दोन चाकी गाडी घेतलीये. ह्या सगळ्या बदललेल्या परिस्थितीत माणसं मात्र होती तशीच आहेत. सगळं कुटुंब अजुनही कष्ट करतं. त्याची मोठी मुलगी सुट्टीत घरी येते तेव्हा आईला मदत म्हणून डोक्यावर भाजीची टोपली घेऊन आठवडे बाजारात जाते. बबन अंगठे बहाद्दर आहे पण सरासरा नोटा मोजतो. सरासरा मोजण्याइतक्या नोटा त्याच्या हातात येतात हे महत्वाचे. बाकी सगळा हिशेब मंगल ठेवते.

असे सगळे आलबेल आहे. परंतु आजही त्या "दुसर्‍या" गोष्टीची आठवण निघाली की बबनचा चेहरा कसानुसा होतो. आई-वडिलांच्या आग्रहाला बळी पडून एक दिवसा साठी का होइना दुसरी मुलगी लग्न करुन घरात आणली हा मंगलवर मोठाच अन्याय केला असे त्याला वाटते. त्या नव्या नवरीवर काही कमी अन्याय नाही झाला ह्याची पण त्याला जाणीव आहे. त्यातल्या त्यात सुख एवढेच की तिच्या भावी आयुष्यावर ह्या प्रसंगाचा काही विपरीत परिणाम नाही झाला.

खरं तर खेड्यात लहानाचा मोठा झालेला अशिक्षित तरुण. मुलगाच हवा म्हणून हट्टाला पेटला असता तर आश्चर्य नव्हते. लग्नाची बायको म्हणून घरात आलेली तरुण सुंदर मुलगी. आई-वडिलांनीच करुन दिलेली. पहिली बायको स्वभावाने गरीब. तिने काही विरोध केला नसता. तिच्या माहेरच्यांचा पण पाठिंबाच होता. आजुबाजुला अशी दोन-दोन लग्न झालेली जोडपी राजरोस दिसत नसली तरी अगदीच विरळी पण नाहीत. त्यामुळे तिच्याशी संसार करण्याचा बबनला मोह पडणे सहज शक्य होते. पण तरी त्या नव्या नवरीचे उमलते आयुष्य आपल्या हातून कोमेजू नये अशी तळमळ त्याला होती. बर्‍या-वाईटाची त्याची समज, बायकोवरचे प्रेम लक्षणीय म्हणायचे.

आपण अनेकदा सुसंस्कृतपणाची जोड माणसाच्या शिक्षणाशी, पुस्तकी ज्ञानाशी लावतो. पण मग एवढा समजुतदारपणा कुठल्या शाळेत शिकला असेल हा अंगठे बहाद्दर ? विचारांची इतकी परीपक्वता कुठली पुस्तकं वाचून आली असेल त्याला ? अनाकलनीयच !!!

विषय: 
शब्दखुणा: 

छान लिहीले आहे. अशा लोकांमुळेच वाटते माणुसकी अजुन शिल्लक आहे. हे खरे 'सुशिक्षित'.

मस्त!!!

शिकलेल्यांना सुशिक्षित करणे हीच ह्या देशाची गरज आहे... --- काय द्याचे बोला मधून... Happy

माणुसकीचे कमाल दर्शन घडवलेस सिंडी ! बबनची ही गोष्ट वर्तमानपत्रात छापून यायला हवी खरं तर. नाव बदललं तरी चालेल पण त्याने घालून दिलेला आदर्श पोचला पाहिजे लोकांपर्यंत.
आमच्या नात्यात एका बाईंनी त्या काळी घरच्यांचा विरोध पत्करुन जातीबाहेर लग्न केले. दोघे नवरा बायको उच्चविद्याविभूषित. पुढे दोन्ही मुलीच झाल्या म्हणून सासरच्यांनी रग्गड शिकलेल्या मुलाचे गावी नेऊन दुसरे लग्न लावले. इतकेच नव्हे तर दुसर्‍या बायकोचेही नाव बदलून तेच ठेवले. म्हणजे दोघींची नावे सारखी होऊन इस्टेटीवरुनही वाद उभे करता येतील. त्या दुसर्‍या बायकोपासून दोन मुलंही झाली. अशा वेळी जबरदस्तीने लग्न लावले हा शब्दप्रयोगच हास्यास्पद वाटतो मला खरा तर ! तीस-पस्तीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट. त्या बाईंनी डिव्होर्स घेतला नाही. शहरातल्या घरात संसार चालू राहिला ( कर्तव्यभावनेने आणि मुलींच्या हितासाठी ) माहेरुन फारसा आधार नव्हता. नवरा अधूनमधून गावी जाई. पुढे मुली चांगल्या शिकल्या. आपापल्या संसारात सुखी आहेत. आता ते काकाही गेले. पण अजूनही हे आठवलं की फार त्रास होतो.

हे खरे असेल तर खरेच कौतुकास्पद आहे. ह्याला वर्तमानपत्रात प्रसिध्दी मिळायलाच हवी. it is worth!!!

मस्त.
अशिक्षित कशाला! आयुष्याच्या आणि माणुसकीच्या शाळेत शिकलेला आहे बबन. शाळेत शिकुन सुद्धा बर्‍याच जणांना माहीत नसते अशी माणुसकी दाखवली आहे. खरच सलाम Happy

बबन ला हॅट्स ऑफ. खरं तर बबन ला अशिक्षित म्हणवत नाहिये मला. हीच खरी सुशिक्षित माणसं. नुसतं डिग्र्या घेऊन सुशिक्षित पणा येतोच असं नाही.

सत्यकथा असेल तर खूपच प्रभावी....मनाचा मुजरा बबनला...खरं सांगायचं तर बरेच सुशिक्षित म्हणवणारे लोकसुद्धा असं वागू शकत नाहीत...तसा विचार करायची कुवतच नसते त्यांची...वाह!!

शिकलेल्यांना सुशिक्षित करणे हीच ह्या देशाची गरज आहे... --- काय द्याचे बोला मधून... >>
खरं आहे.. बबन सारखी माणसे सुशिक्षितांचे डोळे उघडण्याचे काम अनेक पिढ्यांपसुन करत आहेत. यश मिळो हीच इश चरणी प्रार्थना Happy

छान लिहिलेय..

असे 'जबरदस्तीने दुसरे लग्न' लावले गेलेले काही महाभाग मी ही पाहिलेत. पण नंतर त्या दुसरीलाही व्यवस्थित मुले झाली. 'जबरदस्तीने लग्न' केवळ त्यावेळी बोलायला, आतुन सगळे हवेच होते.

Pages