जोहार

Submitted by विजयकुमार on 27 September, 2010 - 04:38

मळवटभरल्या आकाशातून
जोहार करावे तश्या
चांदण्या पृथ्वीच्या
अंग्नीकुंडात कोसळत
जातात
अन
सतीत्वाच्या भावनेचे
काळेकभिन्न आकाश
रिकामे होते.

सर्वत्र शुष्क एकांतभावना
पसरून राहते,
रक्तास आसुसलेली
पिशाश्चवाघळे फिरू
लागतात
अन
अजस्त्र उल्कापातासम आग
सर्वत्र भरून राहते
त्यात मन मारल्या
शरीराच्या आहुती
पडत राहतात.

जीवनहीन अस्तित्व
सर्वत्र भरून राहते,
आवेगी दुखाचे हिम कोसळून
सारा आसमंत
पांढूरका होतो
शरीरमारल्या विधवेच्या
कपाळासारखे
सुन्न पडलेले अस्तित्व
मग
निकाराने झुंजू लागते
अणुमात्र उरल्या
पेशीसाठी.

पराकोटीच्या काट्यांवर
शरपंजरी पडले शरीर
मरणाला कौल लावते
पूर्व पश्चिम
उत्तर दक्षिण
डावे उजवे
सारे सारे कौल
फोल ठरतात,
विलक्षण ओढीच्या
वासनेचा
कडेलोट होतो
अन
उरते ते
आत्मा त्यागले
निष्प्राण शरीर.......

विजयकुमार........

१६/०९/२०१०, मुंबई

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

!!

आभार