सिनेमाची गोष्ट १८९५ साली सुरू झाली, आणि बघता बघता या हलत्या चित्रांनी जग व्यापलं. टॉलस्टोयनं सिनेमाला 'गतिमानतेचं गूढ ईश्वरी वरदान लाभलेलं एक महान माध्यम' असं म्हटलं होतं. या हलत्या चित्रांनी माणसाला कितीतरी अद्भुत गोष्टी दाखवल्या. माणसाची निरनिराळी रूपं दाखवली. जणू एक नवीन प्रतिसृष्टी निर्माण केली.
एक कला आणि माध्यम म्हणून सिनेमा भारतात कसा रुजला, हे बघणं गंमतशीर आहे. पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असणार्या श्री. अनिल झणकरांनी काही वर्षांपूर्वी 'सिनेमाची गोष्ट' हे सुरेख पुस्तक लिहिलं होतं. राजहंस प्रकाशनाने ते प्रसिद्ध केलं होतं. सिनेमाचा जागतिक इतिहास, या इतिहासाचे मानकरी असलेले लेखक, दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, संगीतकार, छायालेखक, संकलक आणि प्रेक्षक यांचा इतका समग्र व सखोल वेध मराठीत त्यापूर्वी घेतला गेला नव्हता. सिनेमाची ओळख सिनेमाच्याच भाषेत करून देणारं हे अफलातून पुस्तक होतं.
राजहंस प्रकाशनानं नुकतंच 'सुंदर ती दुसरी दुनिया' हे श्री. अंबरीश मिश्र यांचं पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. भारतीय चित्रपटाचा इतिहास या पुस्तकात आहे. मात्र या इतिहासाचं स्वरूप फार वेगळं आहे. भारतीय प्रेक्षकानं सिनेमाला कायम मानाचं स्थान दिलं. किंबहुना सिनेमा आणि त्यातली गाणी हा प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हा सिनेमा प्रत्येक भारतीयाला एका समान पातळीवर आणून ठेवतो. जात, धर्म, भाषा यांच्यातील सीमा भेदण्याचं फार मोठं काम हा सिनेमा करतो. तीन तासांचा सिनेमा बघताना प्रेक्षक एका दुसर्याच दुनियेत जातो, आणि सिनेमा संपल्यावर एका नवीन जोशानं या दुनियेत परत येतो.
१९३० ते १९६० हा भारतीय चित्रपटांचा सुवर्णकाळ समजला जातो. या काळात भारतात सिनेमा रुजला, आणि मोठाही झाला. या काळात अनेक तंत्रज्ञ, दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, गायक-गायिका काहीतरी नवीन करण्याच्या ध्यासापोटी, सिनेमाच्या प्रेमापायी राब राब राबले, आणि एक विलक्षण मयसृष्टी निर्माण झाली. म्हणूनच आजच्या चित्रपटांचं मूळ जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे.
भारतात चित्रपट कसा रुजला, आणि चित्रपटसृष्टीचा विस्तार कसा झाला, याचं सामाजिक - सांस्कृतिक विवेचन करणारे लेख व मुलाखती 'सुंदर ती दुसरी दुनिया' या पुस्तकात आहेत. धनिक शेठियांनी स्थापन केलेला 'रणजीत फिल्म कंपनी' आणि हिमांशु रॉय - देविकाराणींचं 'बॉम्बे टॉकीज' हे आजच्या व्यावसायिक चित्रपटांचे जनक. या दोन्ही संस्थानांमुळे चित्रपटसृष्टीनं भारतात बाळसं धरलं. 'बॉम्बे टॉकीज'च्या चित्रपटांनी तर सामाजिक परिवर्तन घडवून आणलं, असंही म्हणता येईल. आपण आज जी हिंदी भाषा बोलतो, चित्रपटांत ऐकतो, ती या 'बॉम्बे टॉकीज'चीच देणगी.
'बॉम्बे टॉकीज'च्या चित्रपटांतून अशोककुमार, देवानंद यांसह अनेक नटनट्यांनी चित्रपटसॄष्टीत प्रवेश केला. अशोककुमार हे भारतीय चित्रपटांतले पहिले चॉकलेट हीरो. पहिले सुपरस्टार. चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचला तो अशोककुमार यांच्यामुळे. सिनेमा आणि अशोककुमार यांच्यातल्या अद्वैतामुळे अशोककुमार यांची गोष्ट म्हणजेच भारतीय सिनेमाची गोष्ट, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या पुस्तकातले 'रणजीत फिल्म कंपनी', 'बॉम्बे टॉकीज' आणि अशोककुमार यांच्या कथा सांगणारे पहिले तीन लेख म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण ठरतात.
बंगाली व हिंदी चित्रपटांत सुपरस्टारपद भूषवणार्या काननदेवी यांची गोष्ट त्यांच्याच शब्दांत या पुस्तकात आहे. पल्लेदार आवाजानं आजही सर्वांना भूरळ पाडणार्या थोर गायिका शमशाद बेगम यांची सुंदर मुलाखत हा या पुस्तकाचा मानबिंदू आहे. अफाट यश मिळवूनही माणूसपण जपणार्या या थोर गायिकेबद्दल वाचताना अक्षरशः भरून येतं. 'लेके पहला पहला प्यार', 'कजरा मुहब्बतवाला' ही गाणी तर कधीच विसरली जाणार नाहीत, पण ही गाणी अजरामर करणार्या शमशाद बेगम यांचं माणूसपण या गाण्यांपेक्षाही चिरंतन ठरावं, असं वाटत राहतं.
'गाईड', 'तेरे घर के सामने', 'तीसरी मंजिल' अशा अप्रतिम चित्रपटांचे दिग्दर्शक विजय आनंद यांची मुलाखतही अशीच विलक्षण आहे. उत्तम अभिनय, गाणी आणि दिग्दर्शन यांच्यामुळे विजय आनंद यांचे चित्रपट आजही सामान्य प्रेक्षक, समीक्षक व अभ्यासकांकडून नावाजले जातात. या चित्रपटांची जन्मगाथा म्हणजे प्रत्येक चित्रपटरसिकाला बरंच काही शिकवून जाणारा एक सृजनशील असा विचार आहे.
सिनेमा हा प्रत्येक भारतीयाचा प्राण आहे. 'सुंदर ती दुसरी दुनिया' या हिंदी सिनेमाची कूळकथा सांगतं इतिहासाच्या तपशिलांपेक्षा अफाट सृजनशीलता आणि सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीवर भर देत. या पुस्तकातली ही काही पानं...
हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात विक्रीसाठी उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Sundar-ti-Dusari-duniya.html

'रणजित’नं हिंदी चित्रपटसृष्टीला पैसा दाखवला. ’बॉम्बे टॉकीज’नं तिला रुबाब दिला, ऐट दिली. चित्रपटसृष्टीला दोन्ही गोष्टींची गरज असते. प्रतिष्ठेशिवाय पैसा छचोर वाटतो, अन् निर्धन प्रतिष्ठा अनाथ असते.
हिमांशु राय यांनी १९३५साली मुंबईत ’बॉम्बे टॉकीज’चा झेंडा रोवला. ’प्रभात’ आणि ’न्यू थिएटर्स’चा दबदबा होताच. भारतीय सिनेमानं तेव्हा विशीचा उंबरठा नुकताच ओलांडला होता. हे बहकण्याचं वय. नासमझ, नादान फिल्म इंडस्ट्रीला या तीन कंपन्यांनी वळण लावलं. शिस्त आणि नियोजनाचं महत्त्व शिकवलं. एखाद्या सुविद्य, सुसंस्कृत स्त्रीनं आपल्या बेवकूफ़, श्रीमंत नवर्याला वठणीवर आणावं तसं झालं.
’न्यू थिएटर्स’ आणि ’प्रभात’ म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीची विद्यापीठं. ’बॉम्बे टॉकीज’ हा फिल्म इंडस्ट्रीचा ’ब्रॅण्ड’ होता. थेट युरोपला जाऊन हिमांशु राय यांनी जर्मनीसमोर सिनेमाच्या सह-निर्मितीचा करार ठेवला. ब्रिटिश वसाहतवादी राजकारणाचा हा करकरीत निषेध होता. भारतीय सिनेमाला ’ग्लोबल’ करण्याचा हा प्रयोग होता. म्हणूनच ’बॉम्बे टॉकीज’ हे भारतीय सिनेमाचं ’साहेब-पर्व’ आहे.
’बॉम्बे टॉकीज’ हे एक डेरेदार झाड होतं. हिमांशु राय यांनी या झाडाला आपलं रक्त दिलं, घाम दिला. त्यांना देविकाराणींची साथ होती. पती-पत्नीच्या सुखद सहजीवनाचं, प्रेमाचं प्रतीक म्हणजे ’बॉम्बे टॉकीज’. ते प्रेम बिनसलं आणि झाडाला कीड लागली. तो सगळा भाग दु:खद आहे.
आर्थिक उलाढाल ही सिनेमाची मुख्य गोम आहे, हे ’शेठिया-पर्व’नं सिद्ध केलं. ’बॉम्बे टॉकीज’नं सिनेमाला ’कॉर्पोरेट’ उद्योगाचं स्वरूप दिलं. अर्थकारण आणि नियोजनात सुसूत्रता आणली. हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवी शैली दिली, नवा ’मेटॅफर’ दिला. करमणुकीला दर्जा असतो हे ’बॉम्बे टॉकीज’नं सिद्ध केलं. १९५० ते १९७० या दोन दशकांतले हिंदी सिनेमे थोड्याबहुत फरकानं ’बॉम्बे टॉकीज’नं आखून दिलेल्या मार्गावरनं गेले. गुरुदत्त, शशधर मुखर्जी, अमिया चक्रवर्ती, नासीर हुसेन, बी.आर.चोप्रा ही मंडळी हिमांशु राय घराण्यातली आहेत. यांपैकी काही आपल्या मार्गानं पुढे गेले असतील, परंतु मूळ प्रेरणा ’बॉम्बे टॉकीज’च. रायसाहेबांचं हे यश अपूर्व आहे.
’बॉम्बे टॉकीज’ सुरू झाली त्या काळात अख्ख्या भारतात तीनशेच्या आसपास सिनेमाची थिएटर्स होती. शिवाय मोजदाद करता येणार नाहीत इतके तंबूतले सिनेमे. हॉलिवूडवरनं सिनेमे येत. अमेरिकेच्या ’युनिव्हर्सल स्टुडिओ’ची भारतात निरंकुश सत्ता होती. सगळीकडे ’युनिव्हर्सल’चेच सिनेमे. भारतीय कलावंत-तंत्रज्ञ घेऊन भारतीय कथाविषयांवर उत्तम सिनेमे काढायचे आणि परदेशी कंपन्यांची सत्ता मोडून काढायची हा हिमांशु राय यांचा एक-कलमी कार्यक्रम होता. सिनेमात भारतीय माणसाची मान ताठ असली पाहिजे हा ध्यास होता.
’बॉम्बे टॉकीज’ची कथा हिंदी सिनेमासारखी जाते. प्रणय, महत्त्वाकांक्षा, कर्तृत्व, यश, फसवणूक आणि दु:ख असे बरेच पेच असलेली ही गोष्ट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवते... मनाला चरे पाडते.
हिमांशु राय कलकत्त्यात जन्मले. साल: १८९२. काही अभ्यासकांच्या मते १८९६. राय कुटुंब सुखवस्तू, प्रतिष्ठित होतं. इंग्रजी शिक्षणामुळे नावारुपाला आलेल्या मध्यमवर्गातलं. हा ’मध्यबित्तो’ (मध्यमवर्ग) पुढे ’भद्रलोक’ म्हणून गाजला. कलकत्ता विद्यापीठातनं कायद्याची डिग्री मिळवल्यावर हिमांशुबाबू काही काळ शांतीनिकेतनला होते. मुलं मोठी झाली की वर्षं-दोन वर्षं त्यांना शांतीनिकेतनला रवींद्रनाथांकडे पाठवायचं हा बंगाली ’भद्रलोक’चा रिवाज होता.
शाळा-कॉलेजात असताना हिमांशुबाबूंना नाटकाचं जबरदस्त व्यसन होतं, असं म्हणतात. रंगभूमीवर वावरणारी पात्रं मानवी आयुष्याबद्दल काय काय सांगत असतात अन् प्रेक्षक ते सगळं खरं मानतात याचा हिमांशुबाबूंच्या बालमनाला मोठा विस्मय वाटत असे.
त्या काळातलं कलकत्ता म्हणजे रत्नांनी भरलेली नौकाच. राजधानीचं शहर म्हणजे सत्तेचं केंद्र. धन होतं, प्रतिष्ठा होती. अमीर-उमराव आणि अंमलदारांचा सततचा डेरा. विद्येला मान होता. संगीत, नाटक, नृत्य या कला बहरत होत्या. रवींद्रनाथांचं जोरासांकोचं घर म्हणजे बंगाल्यांचं तीर्थक्षेत्र होतं. जमीनदारांच्या वाड्यावर गाण्याच्या मैफली नित्य होत. मिस गौहरजानला व्हिक्टोरिया राणीच्या खालोखाल मान होता. काडेपेटीवर मिस गौहरजानचे फोटो. तिच्या मैफलींना शहरातले धनाढ्य व्यापारी हजर असत. कलकत्त्याला गायला मिळालं की स्वर्ग लाभला असं भारतातल्या प्रत्येक कलावंताला वाटायचं. ’जात्रा’चे प्रयोग तर होतच असत. शिवाय पारशी-उर्दू ड्रामांची आतषबाजी. ’खूने-जिगर’, ’बेवफा मोहब्बत’ अशी नाटकांची रोमहर्षक नावं अन् चित्तथरारक ’ट्रिक-सीन्स’.
’भद्रलोक’ कुटुंबाचं स्वत:चं नाट्यगृह असायचं. हे प्रतिष्ठेचं मानलं जायचं. मोठाली, टोलेजंग घरं, ऐसपैस जागा. नाटकासाठी निमित्त लागत नसे. एक पावसाळा सोडला तर महिन्याकाठी दोन-चार सण ठरलेलेच. घरातला एखादा उत्साही काका नाटुकलं लिहून द्यायचा. आठ-पंधरा दिवस तालमी चालत. बाल-गोपाळांच्या अंगात अक्षरश: संचारत असे. वडील सेटचं सगळं बघत. मेकअप, चादरी, साड्या-चोळ्या अन् खाणं-पिणं ही जबाबदारी घरातल्या बायाबापड्यांवर असायची. खूप मजा असायची. रवींद्रनाथांच्या घरी असं नाट्यगृह होतं. हल्ली बर्याच घरांत ’होम थिएटर’ असतं तसंच हे. रायसाहेबांच्या घरीसुद्धा नाटकाचं थेटर होतं.
कॉलेज आणि शांतीनिकेतन झाल्यावर रायसाहेबांनी नाटक कंपनीत जाण्याचा आपला मनोदय एके दिवशी जाहीर केला अन् घरात खटकेबाज संवादांचा तिसरा अंक सुरु झाला. वडीलधार्या मंडळींनी 'चॉलबे ना' असा सज्जड दम भरला. घरातल्या घरात नाटक- चेटक करणं ठीक आहे. दोन घडीची मौज. पण तोंडाला रंग फासून 'मादन कंपनी'च्या स्टेजवर नाचायचं म्हणजे भलतंच. 'भद्रलोक' मुलानं इंग्रजी विद्या ग्रहण करून बॅरिस्टर व्हावं, वकिली करावी, सरकारी- दरबारी मोठा मान हासिल करावा, जमलं तर कायदेमंडळात जावं, भाषणं करावीत, विद्यापीठात सन्मानाची नोकरी करावी.. असं बरंच समजावल्यावर रायसाहेब इंग्लंडला जायला तयार झाले. शेक्सपिअर, शेरिडन आणि शॉचं इंग्लंड..
रायसाहेबांना 'इनर टेंपल'मध्ये प्रवेश मिळाला. कायद्याचा अभ्यास सुरु झाला. सुदैवानं, अभ्यास एके अभ्यास हा 'भद्रलोकीय' दुर्गुण त्यांच्यात नव्हता. नाटकाच्या वेडानं परत एकदा उचल खाल्ली. लंडनच्या सांस्कृतिक जीवनात तेव्हा खूप काही घडत होतं. कला अन् रंगभूमीवर नवनवे प्रयोग होत होते. वातावरण भारलेलं असे. लंडनच्या रंगभूमीनं मोहम्मद अली जीनांना भुरळ घातली होती, तर मग रायसाहेबांचं काय झालं असेल! नाट्यवर्तुळात ये-जा सुरू झाली. पुष्कळ ओळखी झाल्या. इतकंच नव्हे तर 'चिन चिन चाऊ' या लोकप्रिय संगीत नाटकात कामही केलं. भालदाराच्या भूमिकेत का असेना, परंतु हिमांशु राय लंडनच्या रंगभूमीवर एकदाचे अवतरले. 'द गॉडेस' हे त्यांचं दुसरं नाटक. या नाटकामुळे रायसाहेबांना निरंजन पाल हा मित्र भेटला. ही मैत्री पुढे बरीच वर्षं टिकली.
निरंजन पाल लंडनला कसे पोचले तीही गोष्ट मजेशीर आहे. बिपिनचंद्र पाल हे निरंजनबाबूंचे वडील. टिळकयुगात बिपिनचंद्रांची बंगालच्या राजकारणावर पकड होती. 'लाल - बाल - पाल' या त्रिमूर्तींपैकी ते एक. मुलगा मात्र क्रांतिकारकांच्या कारवायात अडकला होता. सरकारविरूध्द कट रचल्याचं एक प्रकरण बरंच तापलं. कलकत्ता पोलिसांचा निरंजनबाबूंवर दाट संशय होता. हे समजल्यावर बिपिनबाबूंनी मुलाला लंडनला पाठवलं. 'सेफ टेरिटरी'. कार्ल मार्क्ससकट सगळ्याच क्रांतीकारकांसाठी.
लंडनला गेल्यागेल्या निरंजनबाबूंनी तिथल्या रंगसृष्टीशी सलगी केली. नाटकं लिहायला घेतली. 'द गॉडेस' हे त्यांचंच नाटक. 'द गॉडेस'मुळं हिमांशु रायशी परिचय झाला. ओळखीचं रुपांतर स्नेहात व्हायला फार वेळ लागला नाही. एका बंगाल्याला दुसरा बंगाली भेटला अन् तेही परक्या भूमीवर. मग सुरू झाली गुप्त खलबतं... नव्या योजना.. नवे इरादे.
देविकाराणी चौधरी आल्या अन् त्रिकोण पूर्ण झाला; अन् पाहता पाहता त्रिकोणाचं झालं वर्तुळ. निरंजन पाल रायसाहेबांच्या मागे धावताहेत अन् रायसाहेब देविकाराणीच्या मागे धावताहेत असं झालं.
देविकाराणींचा जन्म ३० मार्च १९०८ रोजी दक्षिण भारतातल्या एका सुविद्य, ब्राह्मोसमाजिस्ट कुटुंबात झाला. चौधरी कुटुंब रवींद्रनाथांच्या नात्यातलं. म्हणजे देविकाची आजी (आईची आई) इंदुमतीदेवी ही रवींद्रनाथांच्या थोरल्या बहिणीची मुलगी. दूरचं असेल, परंतु त्या नात्यामुळे चौधरी कुटुंबाचा दबदबा होता. देविकाचे वडील मद्रास इलाख्यातले प्रख्यात डॉक्टर. पुढे ते इलाख्याचे सर्जन जनरल झाले. डॉक्टरसाहेब पुरोगामी विचारांचे होते. मुलगा-मुलगी असा भेद मानत नसत. मुलींनी शिकावं, स्वतंत्र वृत्ती जोपासावी आणि स्वावलंबी जगावं असे त्यांचे विचार. म्हणूनच तर त्यांनी मुलीला शिक्षणासाठी लंडनला पाठवलं. तेव्हा देविका जेमतेम दहा-बारा वर्षांची होती. एका ओळखीच्या कुटुंबात राहून तिनं दक्षिण हॅम्पस्टीडच्या शाळेत प्रवेश घेतला.
शाळेचं शिक्षण झालं आणि देविकाला 'रॉयल अकॅडमी ऑफ ड्रमॅटिक आर्ट्स' या विख्यात संस्थेची शिष्यवृत्ती मिळाली. तसंच, स्थापत्यशास्त्राचाही अभ्यास तिनं सुरू केला. कपडेलत्ते आणि फॅशन या विषयांतही तिला उत्तम गती होती. एका कापड गिरणीसाठी डिझाईनचं काम करून तिनं बरे पैसे मिळवले; अन् 'पैसे पाठवू नका. आता माझा खर्च मी स्वतः करू शकेन' अशी घरी तारही करून टाकली. हुशार मुलगी.
देविकाला खूप काही करायचं होतं. तिच्याभोवती अनेक स्वप्नांचा गराडा पडला होता. लंडनचं क्षितिज तिला खुणावत होतं. ती सुंदर होती. 'मृगनयना रसिक-मोहिनी' अशी. तिच्यात एक जबरदस्त 'ग्रेस' होती. सौम्य व्यक्तिमत्त्व, संभाषणचातुर्य, आत्मविश्वास, कलेची उपजत समज या गुणांमुळे लंडनच्या प्रतिष्ठित वर्तुळात तिला खूप मित्र मिळाले. तिनं नृत्य शिकावं असा अॅना पावलोवाचा आग्रह होता. अॅना पावलोवा म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीची नर्तिका. पंधरा-सोळा वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलीला अॅनाबाई आपलीशी मानतात यात देविकाचं मोठेपण आहे. लहान वयात देविकानं मोठा पल्ला गाठला हेच खरं.
देविका चतुर होती. स्वतःमधलं सुवर्ण तिनं ओळखलं होतं. तिच्यात एक सहजसुंदर मोकळेपणा होता. तसंच महत्त्वाकांक्षेचा एक कोंभ तिच्या काळजात लसलसत होता. सर्पाच्या हिरव्या डोळ्यासारखा. या महत्त्वाकांक्षेनंच तर पुढे सगळा घात केला. पण ती फार पुढची गोष्ट. देविकाला तातडीनं हवा होता एक सल्लागार; एक ज्येष्ठ, समजूतदार मार्गदर्शक. त्यासाठी नियतीनं रायसाहेबांना निवडलं. हिमांशु राय आणि देविकाराणी चौधरी यांनी एकत्र येणं गरजेचं होतं. एकमेकांसाठी नव्हे, तर 'बॉम्बे टॉकीज'साठी.
हिमांशु राय आणि देविकाराणी चौधरी यांची पहिली भेट लंडनमध्ये १९२८ साली झाली. देविका तेव्हा कामाच्या शोधात होती. त्या वेळच्या रिवाजाप्रमाणे तिनं एका इंग्रज एजंटला आपला 'बायोडेटा'ही दिला होता. त्यानं तिला ब्रूस वुल्फकडे पाठवलं. वुल्फ तेव्हा रायसाहेबांकडे कामाला होता. त्यानं दोघांची भेट घडवून आणली. रायसाहेबांच्या नावावर तेव्हा दोन सिनेमे जमा होते. दोन्ही जर्मनीत झाले. 'द लाइट ऑफ एशिया' आणि 'शिराज' बर्यापैकी गाजले होते. नव्या दमाचा कल्पक दिग्दर्शक म्हणून रायसाहेबांची युरोपभर ख्याती झाली होती. अन् ते तिसर्या चित्रपटाची जुळवाजुळव करत होते. 'अ थ्रो ऑफ डाइस'च्या कपडेपटाची जबाबदारी त्यांनी देविकावर सोपवली. इतकंच नव्हे, तर कलादिग्दर्शक प्रमोद रॉय यांची प्रमुख साहाय्यक म्हणून ती 'अ थ्रो ऑफ डाइस'च्या पहिल्या युनिटमध्ये दाखल झाली. वर्षभरातच हिमांशु राय आणि देविकाराणी विवाहबद्ध झाले.
सगळं घाईत झालं. सिनेमात दाखवतात तसं...
'द लाइट ऑफ एशिया', 'शिराज' आणि 'अ थ्रो ऑफ डाइस' हे रायसाहेबांच्या कलाकीर्दीतले तीन मैलाचे दगड. या चित्रपटांमुळे त्यांनी भारत आणि जर्मनी असा संयुक्त चित्रनिर्मितीचा प्रयोग केला. तो बर्यापैकी यशस्वी झाला अन् युरोपभर गजला. पहिल्या चित्रपटासाठी रायसाहेबांनी स्वतःचे पैसे टाकले. बाकीचे दोन सिनेमे मात्र त्यांनी पूर्णपणे जर्मन भांडवलावर काढले. अन् हे सगळं झालं तेव्हा रायसाहेबांनी तिशीचा उंबरठा ओलांडला नव्हता हे विशेष.
रायसाहेबांनी १९२४ साली म्युनिखमधल्या 'इमेल्का फिल्म कंपनी'कडे सह-निर्मितीचा प्रस्ताव ठेवला. जगातल्या सगळ्या धर्मांवर एकेक सिनेमा काढायचा अशी योजना ठरली. गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर आधारित 'द लाइट ऑफ एशिया' हा या योजनेतला पहिला चित्रपट. 'इमेल्का'नं रायसाहेबांशी रीतसर करार केला. दिग्दर्शन आणि छायाचित्रण, एडिटिंग वगैरे तांत्रिक बाजू 'इमेल्का' सांभाळणार. कलावंत सगळे भारतीय असतील ('चीप लेबर' ना!) आणि शूटिंग भारतात करायचं अन् त्याची जबाबदारी रायसाहेब घेतील असं दोन्ही पक्षी ठरलं. राहिला प्रश्न वितरणाचा. म्हणजे पैशाचा. तर युरोपातल्या वितरणाचे सगळे हक्क 'इमेल्का'नं स्वतःकडे घेतले. भारतीय वितरकांना दोन प्रिंट्स द्यायचं असं ठरलं. त्यातला पैसा त्यांचा. शूटिंगचा खर्च रायसाहेबांकडे लागला. त्यांनी भारतात जाऊन चित्रीकरणाची सगळी पूर्व-तयारी केली आणि ९०,००० रुपये उभे केले, एकरकमी.
२६ फेब्रुवारी, १९२५ रोजी हिमांशु राय आणि 'इमेल्का'ची टीम मुंबईला निघाली. दिग्दर्शक फ्रान्ज ऑस्टन, कॅमेरामन विली किएरमिए, जॉर्ज वर्शिंग अन् इतर तंत्रज्ञ साहाय्यक असा सगळा फौजफाटा वीस दिवसांच्या प्रवासानंतर मुंबईच्या बंदरावर उतरला. इंग्रजांनी वसवलेल्या मुंबईत इण्डो-जर्मन सहनिर्मितीचा प्रयोग सुरू झाला.
'इमेल्का फिल्म कंपनी'चे साहाय्यक दिग्दर्शक बर्टल शूल्ट्स यांनी 'द लाइट ऑफ एशिया'च्या चित्रीकरणाची डायरी लिहून ठेवली आहे. शूल्ट्ससाहेब लिहितात :
'एकही दिवस वाया जाऊ नये, असं ठरलं. त्यानुसार शूटिंगचं वेळापत्रक करण्यात आलं. कसंही करून पावसाळ्यापूर्वी सिनेमा पूर्ण करणं गरजेचं होतं...बहुतेक वेळा मुंबईत ४४ डिग्री सेंटिग्रेड तापमान असायचं...तशाही परिस्थितीत शूटिंग करावं लागायचं...ऑस्टनना उन्हाळा बाधला. डोक्यावर बर्फ ठेवून ते शूटिंग करत असत...'
'द लाइट ऑफ एशिया'चं जर्मनी आणि मध्य युरोपात जोरदार स्वागत झालं. 'इमेल्का'ला घसघशीत फायदा झाला. बर्लिन, बुडापेस्ट, व्हिएन्ना, ब्रुसेल्स या शहरांत चित्रपटाची खूप वाहव्वा झाली. जर्मन वर्तमानपत्रांनी 'द लाइट ऑफ एशिया' च्या 'दैवी गुणां'ची तारीफ केली. लंडनचा प्रतिसाद मात्र कोमट होता. चार महिने सिनेमा चालला खरा, परंतु गल्ला जेमतेमच झाला.
भारतात 'द लाइट ऑफ एशिया' साफ पडला. विलायती सिनेमा अशी जोरदार भुमका उठल्यामुळे चित्रपट चालला नाही. मुंबईतही बुकिंग नव्हतं. हजारो वर्षांपूर्वी गौतम बुद्धाला देशाबाहेर हाकलून लावल्यानंतर त्याचा सिनेमा कोण पाहणार? भारतीय वितरकांना खोट आली. 'द लाइट ऑफ एशिया'चा एकूण खर्च १,७१,४२३ रुपये झाला. इथल्या वितरकांचे पन्नास हजार बुडाले. त्यामुळे रायसाहेबांच्या सहनिर्मितीच्या प्रयोगाला खीळ बसली. भारतातनं फार मोठं भांडवल मिळण्याची शक्यता मावळली. पुढचे दोन सिनेमे रायसाहेबांनी जर्मन भांडवलावर काढले, ही फार मोठी गोष्ट आहे.
रायसाहेबांनी 'इमेल्का'कडे नवा प्रस्ताव दिला. तो मान्य झाला अन् करारही झाला. 'द लाइट ऑफ एशिया' युरोपभर गाजल्यामुळे 'इमेल्का'ला यशाची चटक लागली होती. कंपनीनं पैशाचा सगळा भर उचलला. बाकीच्या सगळ्या अटी नेहमीच्या. कलावंत भारतीय आणि तंत्रज्ञ जर्मन, तांत्रिक सोपस्काराची जबाबदारी 'इमेल्का'ची. 'द लाइट ऑफ एशिया' प्रमाणेच 'शिराज'ची पटकथा निरंजन पाल यांची होती आणि फ्रान्ज ऑस्टन दिग्दर्शक. मुख्य भूमिकेत हिमांशु राय आणि सीतादेवी. म्हणजे मूळची रेनी स्मिथ. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी रेनी 'द लाइट ऑफ एशिया'ची नायिका म्हणून कॅमेर्यासमोर उभी राहिली. या अँग्लो-इंडियन मुलीनं रायसाहेबांसवे तीन सिनेमे केले. पुष्कळ नाव झालं तिचं. रेनीचा चेहरा एक्स्प्रेसिव्ह होता. टॉकी आली आणि हिंदीवर प्रभुत्व नसल्यामुळे ती मागं पडली, विस्मरणात गेली. सायलेंटच्या जमान्यात आणि टॉकी-युगातही अनेक अँग्लो-इंडियन, ज्युइश नट्या भारतीय चित्रपटसृष्टीत गाजल्या, त्यात रेनी स्मिथ हे एक मोठं नाव.
'इमेल्का'साठी 'शिराज' केल्यानंतर रायसाहेबांनी 'अ थ्रो ऑफ डाइस' हा चित्रपट 'उफा स्टुडिओ'साठी केला. 'इमेल्का फिल्म कंपनी' आणि 'उफा स्टुडिओ' या त्या काळातल्या दोन मातब्बर कंपन्या. परंतु 'उफा स्टुडिओ'चा रुबाब न्याराच होता. घसघशीत सरकारी अनुदान मिळत असल्यामुळे साधनांची रेलचेल होती. आधुनिक सुखसोयी आणि उपकरणांनी सुसज्ज असा न्यूबॅबेल्सबर्ग इथला 'उफा'चा स्टुडिओ म्हणजे जर्मनीचं भूषण होतं. एरिक पॉमर, फ्रिट्ज लँग आणि जी.डब्ल्यू. पॅब्स्ट असे थोर, प्रतिभाशाली दिग्दर्शक पटावर असल्यामुळे 'उफा'चा झेंडा डौलानं फडकत होता.
'अ थ्रो ऑफ डाइस्'चा बहाणा पुढे करून नियतीनं नवे फास टाकले. या चित्रपटाच्या निमित्तानं हिमांशु राय आणि देविकाराणी एकत्र आले, मैत्रीला प्रणयाचा वर्ख चढला. भारतात 'अ थ्रो ऑफ डाइस'चं शूटिंग सुरु असताना दोघांनी मद्रासला जाऊन लग्न केलं. तेव्हा देविकाला विसावं लागलं होतं. शूटिंग संपवून दोघं जर्मनीला रवाना झाले. तिचं 'उफा स्टुडिओ'त चित्रपटाचं एडिटिंग वगैरे तांत्रिक काम सुरु झालं. दोघंही स्टुडिओत छान रमले. परंतु हा आनंदाचा काळ फार टिकला नाही. जगभर आर्थिक मंदीचं थैमान सुरू होतं. 'उफा'ला त्याची झळ लागली होती. खर्चात कपात करण्याशिवाय गत्यंतर नाही अशी परिस्थिती झाली. भारतीय प्रॉडक्शन करायचं नाही, असं 'उफा'नं ठरवलं. दुसरीकडे, 'इमेल्का फिल्म कंपनी'सुद्धा अरिष्टात सापडली होती. अखेरीस जर्मनीला रामराम ठोकून राय दांपत्यानं 'गड्या आपुला गाव बरा' म्हणत लंडनची वाट धरली. तीन इण्डो-जर्मन चित्रपटांची पुण्याई गाठीशी होती. रायसाहेबांचं बर्यापैकी नाव झालं होतं. लंडनला रायसाहेबांनी 'कर्मा' काढला. ही एका अर्थी इण्डो-ब्रिटिश सहनिर्मिती होती. 'कर्मा'चं ८० टक्के शूटिंग भारतात झालं. बाकीचं इन-डोअर काम लंडनच्या स्टोल स्टुडिओत पार पडलं. या सगळ्यांत दोन-तीन वर्षांचा काळ सहज गेला. लंडनच्या राखाडी आकाशाखाली रायसाहेब आणि देविका यांचं सहजीवन रंगत गेलं. तिथं जर्मनीत नाझी भस्मासुराचा उदय होत होता.
'कर्मा'चा प्रिमिअर लंडनला १९३३च्या मे महिन्यात झाला. अगदी थाटामाटात. हा देविकाराणीचा नायिका म्हणून पहिला चित्रपट. रुपेरी पडद्यावरचं तिचं रुप विलोभनीय होतं. 'कर्मा'च्या कथेबद्दल इंग्रज समीक्षकांनी थोडी कुरकुर जरुर केली, परंतु देविकाराणीवर खूप स्तुतिसुमनं उधळली. 'A glorious creature' असं 'इरा' या प्रतिष्ठित नियतकालिकाचं निर्णायक मत झालं. 'इरा'नं पुढं म्हटलंय : 'देविकाराणीचे मोठाले, मखमली डोळे प्रत्येक भाव अगदी सहज व्यक्त करु शकतात...' 'न्यूज क्रोनिकल'नं तर कमालच केली : 'She totally eclipses the ordinary film star. All her gestures speak, and she is grace personified.' असं म्हटलं. Rich praise म्हणतात ती ही.
'कर्मा'च्या केशरी यशाचा अंमल ओसरण्यापूर्वी हिमांशु राय आणि देविकाराणी भारतात परतले. स्वतःची सिनेमा कंपनी काढण्याचा मनसुबा घेऊन. रायसाहेबांनी तर नव्या कंपनीचं नावसुद्धा नक्की करुन टाकलं होतं: 'बॉम्बे टॉकीज.'
'बॉम्बे टॉकीज'चं प्रकरण सुरु करण्यापूर्वी हिमांशु राय यांच्या जर्मनीतल्या कारकीर्दीवर पुन्हा एक नजर टाकणं गरजेचं आहे. काही निष्कर्ष काढता येतील.
एक, चित्रपटाचं एक समग्र, सुजाण असं भान रायसाहेबांना जर्मनीच्या वास्तव्यात आलं. चित्रपटात अर्थ-पुरवठा, नियोजन, कथेची मांडणी, नॅरेशन, तांत्रिक बाबी, प्रदर्शन, वितरण असे बरेच घटक काम करत असतात. त्यांचं संघटन करावं लागतं. हे सगळं राव साहेब 'इमेल्का' आणि 'उफा' मध्ये शिकले. कलेची मूळ प्रेरणा तर होतीच. तिच्यावर तेज चढलं.
लंडन हे रंगभूमीचं केंद्र आहे. सिनेमासाठी मात्र जर्मनीत जायला हवं, असं रायसाहेबांनी ठरवलं असावं. म्हणजे लंडन सुटलं, आणि एक अंक संपला. दुसरा अंक जर्मनीत सुरू झाला. 'रेडिओ, वर्तमानपत्रं आणि सिनेमा हे विसाव्या शतकातले अग्रदूत आहेत. या नव्या माध्यमाला उज्ज्वल भविष्यकाळ आहे', असं रायसाहेबांनी देविकाराणींना पहिल्याच भेटीत सांगितलं होतं. म्हणजे रंगभूमीचा विचार मागे पडला, आणि सिनेमावर त्यांचं लक्ष गेलं. हे सगळं ट्रॅन्जिशन लंडनमध्ये झालं. सिनेमा हे माध्यम तेव्हा नवंनवं अन् नवलाईचं होतं. त्याचे डावपेच वेळीच शिकून घ्यावेत, असा रायसाहेबांचा विचार झाला असणार.
'उफा स्टुडिओ' ही जर्मनीतली फार मातब्बर कंपनी पहिल्या महायुद्धानंतर भरभराटीस आली. 'वायमार रिपब्लिक'कडून 'उफा'ला भरघोस अनुदान मिळत असे. वर्षाकाठी ६०० सिनेमे निघत. दहा लाख प्रेक्षक 'उफा'चे सिनेमे बघत. मूकपटाच्या जमान्यात 'उफा'चं हॉलिवूडला जबरदस्त आव्हान असायचं. एरिक पॉमर, फ्रिट्ज लँग, एफ. डब्यू मार्नी, पॅब्स्ट असे श्रेष्ठ, प्रतिभासंपन्न निर्माते-दिग्दर्शक 'उफा'च्या पटावर झगमगत होते. ही मंडळी सिनेमाचं व्याकरण निश्चित करत होती. चित्रपट संस्कृतीची सांगोपांग मांडणी करण्यात दंग होती. या थोर दिग्दर्शकांचा रायसाहेबांवर अतिशय सघन असा प्रभाव पडला. सिनेमाची स्वतःची एक परिभाषा असते, metaphor असतं, हे त्यांना प्रत्यक्ष अनुभवानं कळलं.
'अ थ्रो ऑफ डाइस'च्या काळात हिमांशू राय आणि देविकाराणी 'उफा' स्टुडिओत रोज काम करत. लँग, पॅब्स्ट यांना जवळून पाहण्याची सुवर्णसंधी होती. मर्लिन दिएत्रिच तिथे शूटिंग करत असे. देविकाराणी मर्लिनला रंगभूषेत मदत करत असत. पॅब्स्ट तर मास्तरच होते. कॅमेर्याची भाषा विस्ताराने समजावून सांगत. हा अनुभव अनमोल होता.
एक्स्प्रेशनिज्म हा युरोपियन चित्रकलेतला एक रसरशीत प्रवाह. 'उफा'नं तो सिनेमात आणला; अन् कचकड्याच्या पडद्याला अभिजात कलेचा कनकस्पर्श झाला. पॉमर, लँग यांनी हे काम केलं. एक्स्प्रेशनिज्ममध्ये बाह्य गोष्टी नगण्य ठरतात. प्रत्येक कलाकृती ही कलाकाराची खाजगी, उत्कट अशी प्रतिक्रिया असते. कलावंत आपल्या अंतर्मनातले हंसध्वनी कॅनव्हासवर रेखाटतो. स्वतःला पिंजून काढतो आणि चित्राला आशय देतो. रुपेरी पडद्यावर 'एक्स्प्रेशनिज्म'ला लँग यांनी एक नवी चित्रभाषा दिली. छाया-प्रकाशाचा खेळ, किंचित कललेले अँगल्स, स्वप्नवत वातावरण अशी लँगच्या सिनेमाची मांडणी असते. 'द मेट्रॉपॉलिस' हे याचं उत्तम उदाहरण आहे. ही surrealistic मांडणी शेवटी गुढतेकडे, तरलतेकडे अन् अध्यात्माकडे जाते. जर्मनीची ही अध्यात्माची ओढ रायसाहेबांनी अचूक ओळखली होती. बर्लिन आणि बुडापेस्टमध्ये गौतम कौतुक होईल, इंग्लंडमध्ये नाही, हे त्यांना ठाऊक होतं. झालंही तसंच. लंडनमध्ये 'द लाइट ऑफ एशिया' फार टिकला नाही. सगळी सुखं पायाशी असताना राज्य नाकारणारा, सिंहासन नको म्हणणारा राजपुत्र लंडनला समजलाच नाही अशी त्या वेळच्या एका समीक्षकाची नोंद आहे.
म्हणून रायसाहेबांनी पहिल्या तीन चित्रपटांसाठी जर्मनीची निवड केली.
इंग्लंड हा व्यापार्यांचा देश. उत्तम धन कमवायचं अन् उत्तम नाटकं पाहायची ही तिथली परंपरा. अभिजात संगीत, तत्त्वज्ञान, संस्कृती हा ऐवज मात्र जर्मनीकडे होता. दोन्ही देशांतला संघर्ष हे युरोपियन इतिहासातलं घगधगतं पर्व आहे. हा झगडा जीवनधर्माचा, मूल्यांचा होता. नित्शेचा हवाला देऊन 'अष्टदर्शन'मध्ये विंदांनी म्हटलंय ते फार मार्मिक आहे :
सर्व लोकांमध्ये इंग्रज निकृष्ट
जर्मन उत्कृष्ट तुलनेनं...
जर्मन लोकांचा स्वभाव अजून
गंभीर, गहन निसर्गतः
रायसाहेबांनाही असंच वाटत असावं. 'गंभीर, गहन' स्वभावाच्या जर्मनीनं भारतातल्या प्राचीन विचारपरंपरेचा गौरव केला. वैदिक वाङ्मयाचा नव्यानं अभ्यास केला. भारताचं श्रेष्ठत्व जगापुढे मांडलं. रायसाहेबांना हा सगळा तपशील ठाऊक होता. इंग्लंडला नाकारून नित्शे आणि हरमान हेसच्या जर्मनीला जवळ करताना हा विचार होता. हा विचार प्रखर राष्ट्रभक्तीचा होता.
रायसाहेबांनी 'कर्मा' हा चित्रपट इंग्लंडमध्ये काढला. ब्रिटिश भांडवलावर. तेव्हा त्यांच्या गाठीला तीन सिनेमांचं यश होतं, प्रतिष्ठा होती. 'आता बोला' अशा आविर्भावात ते होते. 'कर्मा'चं कौतुक झालं. देविकाराणींच्या रूपाची, अभिनयाची भरपूर तारीफ झाली. 'The screen's most beautiful star' अशी 'डेली हेरल्ड'ची सलामी देविकाराणींना मिळाली. बी.बी.सी.च्या खास भारतीय श्रोत्यांसाठी सुरू झालेल्या शॉर्ट वेव्हलेंग्थ सर्व्हिसचं उद्घाटन देविकाराणींनी केलं, तर 'कर्मा'च्या प्रिमिअरला लॉर्ड आयर्विन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यापारी इंग्लंडनं राय दांपत्याचं मोल जोखलं. रायसाहेबांवर पैसा लावायला ब्रिटिश वितरक तयार झाले. 'फॉक्स फिल्म कॉर्पोरेशन'नं देविकाराणींना एका मोठ्या पिक्चरसाठी विचारलं. रायसाहेबांना भारतात परतायचं होतं. ते देविकाबाईंना म्हणाले, 'आपल्याला इथं राहायचं नाहीये. आपल्या अनुभवाचा उपयोग भारताला झाला पाहिजे..' रायसाहेब इंग्लंड नाकारतात, ब्रिटिश साम्राज्यशाही नाकारतात अन् बोटीत बसतात. हे मन राष्ट्रप्रेमानं भारलेलं आहे. रायसाहेबांच्या या राष्ट्रवादी विचार-व्युहानं चित्रपटसृष्टीला एक वेगळं परिमाण दिलं.
*****
सुंदर ती दुसरी दुनिया
लेखक - श्री. अंबरीश मिश्र
राजहंस प्रकाशन
पृष्ठसंख्या - १९१
किंमत - रुपये २५०
*****
टंकलेखनसाहाय्य - अश्विनी के, साजिरा, श्रद्धा, अनीशा
*****
चिन्मय पुन्हा एकदा एक सुंदर
चिन्मय
पुन्हा एकदा एक सुंदर पुस्तक परिचय. तुमच्या लेखांची अनेक वाचक अगदी वाट पाहात असतात, मी त्यातील एक. आणि प्रत्येक वेळेस तुमचे अभ्यासपूर्ण लेख ही प्रतिक्षा अगदी सार्थ ठरवतात. धन्यवाद!
प्रिया!
धन्यवाद चिनूक्स! आवडता विषय
धन्यवाद चिनूक्स!
आवडता विषय त्यामुळे हे पुस्तक घेणारच!
मस्तच चिनूक्स, चित्रपट हा
मस्तच चिनूक्स, चित्रपट हा अगदी जिव्हाळ्याचा विषय. या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल तुला व टंकलेखनास सहाय्य करण्यार्यांना धन्यवाद.
प्रस्तावना फार छान लिहिली
प्रस्तावना फार छान लिहिली आहेत. लगेच पुस्तक वाचावस वाटलं.
बाकी नेहेमीहि छान ओळख असते पुस्तकाची.
चिन्मय...एका मस्त पुस्तकाचा
चिन्मय...एका मस्त पुस्तकाचा परिचय करून दिलास.
ह्या पुस्तकातल्या 'शमशाद बेगम' च्या लेखावर (मुलाखतीवर) मी टोट्टल फिदा ! त्या एका लेखासाठी हे पुस्तक संग्रही असायला हवं... आपने याद दिलाया सर, आता आज मी परत एकदा वाचणार तो लेख
सुरेख परिचय आणि पानं. वाचायला
सुरेख परिचय आणि पानं. वाचायला पाहिजे आता.
उत्तम परिचय. पुस्तक वाचताना
उत्तम परिचय. पुस्तक वाचताना पाँपी, द्वारका यांसारख्या अस्तंगत झालेल्या संस्कृतीचे दर्शन घेतो आहेसे वाटते. या हरवलेल्या जगाबद्दल जिव्हाळा असलेल्या बहुतांश व्यक्ती आता काळाच्या पडद्या आड गेल्या आहेत.
अशी पुस्तके वाचताना त्या त्या काळाचे इत्थंभूत वर्णन वाचण्याची , त्या काळाबद्दल कल्पना करण्याची गंमत तर वाटतेच. पण याचबरोबर "आपले याचे नक्की काय नाते ? " आणि एकंदरच "काळाचे नि आपले काय नाते ?" असे प्रश्न डोकावायला लागतात असा माझा अनुभव आहे.
पुन्हा एकदा, सुंदर परिचय.
काही भाग वाचायचा राहिला होता.
काही भाग वाचायचा राहिला होता. तो आज वाचला. गुंगायला झालं.
प्रस्तावना नेहेमीप्रमाणेच सुरेख.
धन्यवाद. राहिलंच होतं हे
धन्यवाद.
राहिलंच होतं हे वाचायचं.
छान ओळख करुन दिलीयस
छान ओळख करुन दिलीयस पुस्तकाची.
आता पुस्तक वाचणं मस्ट झालय!
छान !
छान !
आवडता विषय. लवकरच वाचेन.
आवडता विषय. लवकरच वाचेन. धन्यवाद तुम्हा सर्वांना !
धन्यवाद चिनूक्स. सुंदर पुस्तक
धन्यवाद चिनूक्स.
सुंदर पुस्तक परिचय. पुस्तक लगेच मागवले.
कालच अंबरीश मिश्र यांचे
कालच अंबरीश मिश्र यांचे निवेदन ऐकण्याची संधी मिळाली. अतिशय सहज निवेदनशैली आणि प्रचंड रसाळ आवाज लाभलाय त्यांना. पण त्या आवाजत गुंगून जातानाच त्यांची अभ्यासू वृत्तीही जाणवत रहाते. त्या अभ्यासू वृत्तीमु़ळेच हे पुस्तक सुंदर झाले असणार. नक्की वाचणार आता.