तू आत कुठेतरी
खोल काट्यासारखा
रुतलायसं
अन् आता त्या आठवणींचा
नायटा झालायं ठुसठुसणारा !
जगण्याची कसरत कराव्या
लागणा-या जगात
आता तुझी सर्कस चालू आहे,
माझ्या कोवळ्या मनाचा
प्रवास
जुन होत चाललेल्या
शरीराला घेवून तारेवरची
कसरत करत आहे !
तू उमटवलेल्या
काळोखरेघांची
आता नक्षी झालीयं,
नक्षीदार गुंत्यात
गुंतून,
मी स्वत:लाच शोधात आहे !
तू दाखविलेल्या शिसारी
स्वप्नात
अडकलेलं माझं मन
आरशीसारखं स्वच्छ,
पारा उडाल्यासारखं
चित्रविचित्र प्रतिबिंब
दाखवीत आहे !
पिवळसर कागदावरच्या
धूसर शब्दातलं पत्र
उघड गुपित सांगून गेलं
आता सर्कस बंद पडली आहे,
खोल कुठेतरी
शब्द रुतलेत,
" पत्र वाचताच जाळून टाक "
राखेसारख्या भुसभुशीत
झालेल्या भावना
धगधगत सांगत असतात
"सर्कस संपली असली तर कसरत चालूच राहणार "
चुरगाळलेला कागद
माझे आश्रु शोषून
रेघनरेघ अधोरेखित करत असतो
तू शब्दात मांडलेलं चित्र अधिकच
गडद करत असतो
मग सारे शब्द डोळ्यावाटे
वाहणा-या आश्रुत
विरघळून जातात
उरते ती तुझी आठवण
अन् तू दाखविलेले
अघोरी स्वप्न !
विजयकुमार.........
०९.०९.२००९, मुंबई