दिनांक ६ जुन रोजी रायगडावर ” राज्याभिषेक सोहळा ” पार पडणार आहे याची बातमी मित्राकडून कळाली आणि मनोमन रायगडावर जाण्याचा बेत आखला. प्रथमच राज्याभिषेक इंग्रजी तारखे प्रमाणे साजरा होत होता. मनामध्ये सोहळ्या विषयी खुप उत्सुकता होती. कारण आजपर्यंत हा सोहळा प्रत्यक्ष कधी बघितला नव्हता. हो नाही हो नाही करता करता मी आणि योगेश असे दोनच मावळे उरलो.( बाकी सगळ्यांनी नेहमीप्रमाणे टांग दिली)
५ जुन रोजी (शनिवार) मी आणि योगेश संध्याकाळी ६ वाजता डेक्कन ला भेतलो आणि आमची ” रायगड राज्याभिषेक सफ़ारी ” सुरु झाली. मी प्रथमच रायगडावर चाललो होतो , तर योगेश मात्र ३-४ वेळा रायगडावर जाउन आला होता. गप्पा मारत आमचा प्रवास खेड शिवापूर, नसरापूर, कापूरहोळ मार्गे भोर कडे सुरु झाला. भोर मध्ये पोहचेपर्यंत संध्याकाळचे ७.३० झाले होते.
य़ेथून पुढे मात्र आमची खरी कसोटी लागणार होती. कारण ३० -३५ कि.मी चा भाटघर धरणाच घाट आणि वरांधा घाट आम्हाला रात्री पार करावा लागणार होता. योगेश मात्र ब-याच वेळा इकडे येउन गेल्यामुळे त्याला परिस्थितीची पूर्ण जणीव होती. मात्र नंतर नंतर एकही गाडी रस्त्यावर दिसत नसल्यामुळे मी ही जरा टरकलोच. परिस्थितीच तशी होती. रात्री ८-८.३० चा सुमार , चहु बाजुंणा किरर अंधार, उजव्या हाताला उभा डोंगर आणि डाव्या बाजुला भाटघर धरणाचे बॆक वाटर.(मला समोरचा डांबरी रस्ता सोडून काहीही दिसत नव्हते. योगेश मागे बसून मला हे वर्णन सांगत होता. )
वरांधा घाटाच्या सुरवातीस मात्र आम्हाला २-३ कार आणि १ लक्झरी बस दिसली आणि आमच्या जीवात जीव आला. या गाड्यांवरती “किल्ले रायगड- राज्याभिषेक सोहळा” असा फलक होता. या सोहळ्याच्या प्रचंडतेविषयी पुसटशी कल्पना आली. या गाड्यांच्याबरोबरच वरांधा घाट पार करण्याचे ठरवले. मागे बसून योगेश वरांधा घाट, शिवथघळ, त्याची पहिली रायगड वारी यांचे रसरशीत वर्नण करीत होता. वरांधा घाट संपला आणि आम्हाला महाडचे वेध लागले. गाडी शक्य तेवढ्या वेगाने दामटत आम्ही महाड जवळ करीत होतो. आणि एकदाचे ९.३० वाजता आम्ही महाड ला पोहचलो.महाड मधून रायगड २५ कि.मी. म्हणजे अर्ध्या-एक तासाचा रस्ता असल्यामुळे महाड गावात निवांत जेवण करून ११ वाजता आम्ही रायगडाकडे आगेचुक केली.
साधारणतः कुठलाही किल्ला दुरून कसा दिसतो याचे निरिक्षण करण्यात विशेष मजा येते. मात्र या रात्रीच्या अंधारात रायगडाचे असे दर्शन नशिबात नव्हते. रात्री ११.३० वाजता आम्ही रायगडाच्या पायथ्याला म्हणजे पाचाड गावी पोहचलो आणि आम्हाला आश्चर्याचा पहिला धक्का बसला. पाचाड गावाला जत्रेच्गे स्वरूप आले होते. सगळीकडे राज्याभिषेकासाठी आलेल्या शिवभक्तांची आणि गाड्यांची गर्दी पाहूण मनाला हूरुप आला.
पाचाड गावात गाडी लाउन रात्री १२ वाजता “जय भवानी जय शिवराय” च्या गजरात आम्ही रायगड चढायला सुरवात केली.अंगामध्ये उत्साह संचारला होता. दरमजल करत आम्ही कपारीच्या मार्गापर्यंत आलो आणि पावसाला सुरवात झाली.रिमझिम सरींमध्ये आम्ही पुढची चढण चढायला सुरवात केली.
वाटेत भरपुर शिवभक्त भेटले. कोणी अहमदनगर, सोलापूर, सातारा कोणी सांगली, कोल्हापूर तर कोणी तळकोकणातून. मात्र पुण्या-मुंबईचे जास्त लोक दिसले नाहित, याचे फार वाईट वाटले.बेटरीच्या प्रकाशात फक्त समोरची वाट दिसत होती आणि डाव्या बाजुच्या खोल दरीचा अंदाज येत होता.पण त्या बाजुने लोखंडी रेलिंग असल्यामुळे त्याची एवढी चिंता वाटत नव्हती.
रात्री २ – २.३० च्या दरम्यान आम्ही महादरवाज्याजवळ पोहचलो. दुरूनच महादरवाज्याच्या दोन्ही बुरुजांची भव्यता लक्षात येत होती. महादरवाज्यातुन आत गेल्यावर लागणारया सिमेंटच्या पाय-यांवर आम्ही थोडा वेळ पहुडलो. शरीर एवढे थकले होते होते की टेकताक्षणी डोळ्यांवर झापड येउ लागली. शेवटी तेथेच झोपुन पहाटे बालेकिल्यावर जाण्याचा नको तो निर्णय घेतला. नुकताच पावसाळा सुरू झाल्यामुळे कडाक्याची थंडी पडली होती. योगेश काही कोकणी लोकांबरोबर शेकोटी करून गप्पा मारत बसला. त्यांच्यातल्या एका बहादरची ही राज्याभिषेकाची ३२ वी वेळ होती. मला कधी झोप लागली हे माझे मलाच कळाले नाही. थोड्या वेळाने अचानक जाग आल्यावर बघतो काय तर योगेश अजुन जागाच होता. अंगावरुन काही तरी सरपटत गेल्यामुळे त्याने न झोपण्याचा निर्णय घेतला. मी मात्र पुन्हा चादर ओढुन चंद्रावर जाउन बसलो. पहाटे ४.३० च्या दरम्यान धो धो पाउस कोसळू लागला. योगेशने धक्के मारुन जागे केल्यावर अंगावर चादर गुंडाळुन जवळच एका झाडाखाली जाउन उभे राहीलो. तरीही पाउस अंगावर येतच होता. “पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणीचा… कधी उधाणता… अन केव्हा थेंबांच्या संथ लयीचा….” अशा कविता निरर्थक वाटू लागल्या. जन्मात जेवढी थंडी अनुभवली नसेल तेवढी थंडी त्या वेळेस जाणवत होती. चादर पूर्णपणे भिजून गेली. अंगावर काटा उभा राहीला. य़ोगेशने मात्र शहाणपणा करून जर्किन बरोबर घेतले होते. अनुभवाने आलेले शहाणपण बाकी काय?
सुमारे अर्ध्या तासाने पाउस थांबला आणि आम्ही पुढची चढाई सुरू केली. शेवटी सकाळी ६ वाजता आम्ही बालेकिल्ल्यावर पोहचलो. संपूर्ण रायगड सकाळच्या सोनेरी किरणांनी न्हाउन निघाला होता.
( सकाळच्या सोनेरी किरणांनी न्हाउन निघालेला रायगड )
काही लोक डोक्यावर मोठी वाद्य घेउन गड चढून आअले होते.
गडावर शिवभक्तांची ब-यापैकी गर्दी जमली होती.
होळीच्या माळावरील सिंहासनाधिष्टीत पुतळ्याला फ़ुलांची आरास करण्यात आली होती. सकाळ्च्या उन्हात न्हाउन निघालेली शिवप्रभुंची चर्या विलक्षण तेजामय दिसत होती.
( होळीच्या माळावरील महाराजांचा सिंहासनाधिष्टीत पुतळा )
शिवप्रभुंच्या चरनांचे दर्शन घेउन आम्ही नगारखान्याचा रस्ता पकडला. तिथे प्रचंड असा भगवा ध्वज, ध्वजस्तंभावर चढवण्याची लगबग चालु होती. ध्वज पकडण्यासाठी सुमारे २० लोक उभे होते, यावरुनच या ध्वजाच्या प्रचंडतेविषयी कल्पना येते.
कुठेही ध्वज खाली न लोळवता तो फडकवण्यात आला आणि क्षणार्धात थरकून उठलेल्या सदरेवर एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत किलकारी दिली ” क्षत्रिय कुलवतांस.. छत्रपती शिवजी महाराज कि जय! ” भवतीच्या सार्यांनीच ती उचलून धरली. अशा अनेक ललका-यांनी आसमंत दनानून सोडले. प्रत्येक क्षण अंगावर शहारे निर्माण करत होता. उगवतीच्या सुर्याची किनार घेउन भगवा जरीपटका ताठ मानेने आभाळाला थपडा देत पहाटवार्यावर फडफडू लागला. आपोआपच मस्तक झुकले गेले…. आणि मनात लहानपणी ऐकलेल्या काही ओळी आठऊन गेल्या… ” रणी फड़कती लाखो झेंडे , अरुणाचा अवतार महान, विजयश्रीला श्री विष्णुपरी , भगवा झेंडा एकची हा !!!!!!!! ”
नगारखान्यातून आत प्रवेश करताच फुलांनी सजवलेली राजसदर नजरेस पडली.) ठिकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले होते. संपूर्ण सदरेवर मांडव टाकण्यात आला होता.
( नगारखाना )
( नगारखाना )
पुढे राजसदरेवर जाउन, युवराज संभजी राजांच्या (कोल्हापूर) पुढाकारातून बसवण्यात आलेल्या मेघडंबरीतील सिंहासनाधिष्टीत पुतळ्याचे दर्शन घेतले. मेघडंबरीला कराण्यात आलेल्या फुलांच्या आरासेने, ति एकदम शोभून दिसत होती.
( राजसदरेवरील महाराजांचा मेघडंबरीतील सिंहासनाधिष्टीत पुतळा )
आदल्या दिवशी गडावर वेगवेगळे कार्यक्रम पार पडले होते. पण त्यांची कल्पना नसल्यामुळे आम्ही त्यांना मुकलो होतो.
( कार्यक्रमपत्रिका )
मग तेथून आम्ही आमचा मोर्चा जगदिश्वराच्या मंदिराकडे वळवला. जगदिश्वराचे काळ्या पाषाणातले मंदिर सुद्धा फुलांनी सजवण्यात आले होते. बाहेर रेलिंगला भगवे झेंडे लावले होते. येथे फोटु काढण्याचा मोह मात्र आम्हाला आवरला नाही.
( जगदिश्वराचे मंदिर )
मागे पुन्हा सदरेवर नजर टाकली. अता सकाळचे धुके हटल्यामुळे नगारखाना, त्यच्यापुढे भगवा ध्वज, आणि मागील बाजुस राजसदर अगदी स्पष्ट दिसत होते.
(राजसदर, नगारखाना, भगवा )
जगदीश्वराच्या दर्शनानंतर महाराजांच्या समधिचेही दर्शन घेतले.
जगदीश्वराच्या मंदिराच्या बाहेर बैठक घेउन आम्ही येणा-या जाणा-या शिवभक्तांचे निरिक्षण करत होतो. लोकांचे जथ्थेच्या जथ्थे दर्शनासाठी येत होते. सर्वजण छत्रपतिंच्या घोषणा देत होते. न जाणे कोनास ठाउक, ” तुमचे आमचे नाते काय ? जय जिजाउ जय शिवराय ! ” ही घोषणा मात्र मनात घर करुन गेली.
अगदी प्रत्येक वयोगटातील स्त्रि-पुरुष, लहान मुले या सोहळ्यासठी, कोणीही न बोलवता उपस्थित झले होते. हे नाते होते शिवरायांच्या प्रेमाचं. गड-कोटांच्या ओढीच. पंढरीचे वारकरी आणि या शिवभक्तांमध्ये एक प्रचंड साम्य आढळूण आले. दोघांचीही आपापल्या दैवतांवर निस्सिम भक्ति आहे.
बराच वेळ तेथे घालउन आम्ही टकमक टोकाकडे निघालो. टकमक टोकावरील दृष्य विलोभनीय होते. उजव्या बाजुला ढगांचे साम्राज्य होते. तर डाव्या बाजुला रायगडाचा उभा कातळ दिसत होत. येथुनच रायगडावर येणा-या वाटेचे मस्त चित्र दिसते. टकमक टोकावरुन रायगडाचा संपूर्ण घेर लक्षात येतो.
( टकमक टोक )
( रायगडाचा महादरवाजा आणि उभा कातळ)
( मी आणि योगेश )
एव्हाना ९.३० झाले होते. आम्ही पुन्हा राजसदरेवर परतलो. तिथे राज्याभिषेकाचा कार्यक्रम सुरू झाला होता. संपूर्ण राजसदर शिवभक्तांनी फुलुन गेली होती. सर्व लोक हा सोहळा आपल्या डोळ्यांत साठवून घेत होते. राजपरिवाराच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.
( युवराज संभाजी महाराज )
यानंतर छत्रपतिंच्या प्रतिमेची ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यास प्रचंड जनसमुदाय लोटला होता. पालखी नगारखान्यातून बाहेर पडून जगदिश्वराच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली. तेथेच या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
( छत्रपतिंच्या प्रतिमेची ढोल ताशांच्या गजरतील पालखी मिरवणूक )
( छत्रपतिंच्या प्रतिमेची ढोल ताशांच्या गजरतील पालखी मिरवणूक )
( ढोलपथक )
( ढोलपथक )
( ढोलपथक )
दरम्यान होळीच्या माळावर सा-या मावळातून आलेली मंडळी आपले दांडपट्यातील, तलवारबाजीतील व अन्य कसब पेश करत होते.
( छोटे मावळे )
एव्हाना सुर्य डोक्यावर चढत आला होता. गडाचा उरलेला फेरफटका मारून आम्ही परतीचा रस्ता पकडाला. गडावरून पाय निघत नव्हता. मनोमन पुढच्या वर्षी या सोहळ्यासाठी दोन दिवस येण्याचे पक्के ठरवून टाकले.
फोटो पण टाका की राव..
फोटो पण टाका की राव..
मस्तच रे सोहळा.. छान वर्णन
मस्तच रे सोहळा..
छान वर्णन नि फोटोज.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर सोहळा वर्णन नि फोटो पण
सुंदर सोहळा
वर्णन नि फोटो पण मस्तच.
जेब्बात... आता कसा पूर्ण
जेब्बात... आता कसा पूर्ण वाटतोय लेख... मस्त..
मस्तच मात्र पुण्या-मुंबईचे
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मात्र पुण्या-मुंबईचे जास्त लोक दिसले नाहित >>> गर्दि पासून लांब रहाण्याचा परिणाम असेल... तरी ठाण्यातून घारूअण्णा गेले होते...
अतिषय सुंदर वर्णन आणि फोटोही.
अतिषय सुंदर वर्णन आणि फोटोही.
सुंदर हर हर महादेव!!!
सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हर हर महादेव!!!
@इंद्रधनुष्य मान्य निसर्गात
@इंद्रधनुष्य
मान्य निसर्गात एकट्याने भटकायला मजा येते... पण सोहळा, सण म्हटल तर गर्दी हवीच... बरोबर ना?
छान फोटो आणी वर्णन
छान फोटो आणी वर्णन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वराज्य तोरण चढे.... मराठी
स्वराज्य तोरण चढे.... मराठी पाऊल पडते ...मराठा तितुका मेळवावा !