पुन्हा वाटते की तुला गुणगुणावे
तुला गुणगुणण्या तुझे ओठ व्हावे
दिले कोवळे स्वप्न मी जीवनाला
तुझे स्वप्न माझ्या उशाला असावे
तुझी याद आली अवेळी अशी की
जसे चांदण्याने दुपारीच यावे
परवा कोणीतरी एसएमएसने ह्या ओळी पाठवल्या तेव्हा मित्रपरिवारातली दोघं आठवली. ती कुठे आहे माहित नाही, तो कुठे आहे ते पण नाही माहित. पण ती दोघं एकत्र नाहीत एव्हढं माहित आहे. माझ्या डोळ्यांसमोरच दोघं दोन दिशांना निघून गेली होती आणि आता आयुष्यभर त्यांच्या वाटा एकमेकांना समांतरच धावणार आहेत हे लक्षात येताच माझ्याही मनात कुठेतरी गलबललं होतं.
कथा-कादंबर्यांतून, कवितांमधून आयुष्याला नेहमी प्रवासाची उपमा देण्यात येते. जन्माने सुरू होणार्या आणि मृत्यू न्यायला येईतो चालणार्या ह्या प्रवासात किती जण भेटतात. कोणी आईवडील म्हणून, कोणी भावंडं म्हणून, काही नातेवाईक, मित्रमैत्रीणी....अश्यातच कधी कोणी तो किंवा ती...बघताबघता खास बनून जाणारं, जीव ओवाळून टाकावासा वाटणारं आपलं माणूस. आत्ता आत्त्तापर्यंत अनोळखी असलेलं पण साताजन्माची खूण घेऊन आलेलं माणूस. काही भाग्यवंताच्या नशीबात ही साथ जन्माची सावली बनून येते. पण बर्याचदा हीच सोबत सुटते आणि उभ्या आयुष्याचं वैराण वाळवंट करून जाते. वर आयुष्य म्हणा किंवा नशीब म्हणा, हे दु:ख सहजासहजी विसरू पण देत नाही. कुठल्यातरी एका वळणावर पुन्हा ते दोघे अचानक समोरासमोर येतात आणि जुन्या जखमा पुन्हा ओल्या होतात, पापण्यांच्या कडांसोबत.
रगोंमे दौडने-फिरनेके हम नही कायल
जब आंखहीसे ना टपका तो फिर लहू क्या है
हाच अनुभव कित्येकांच्या गाठी जमा होत असेल कदाचित. म्हणूनच अनेक गीतकारांनी ही वेदना शब्दात मांडली, संगीतकारांनी स्वरबध्द केली आणि गायकांनी प्राण स्वरात ओतून गायली. आनंद शब्दात नाही व्यक्त करता येणार एकवेळ पण दु:खाचा निचरा कधीकधी फक्त हे शब्दच करू शकतात.
कधी विचार केलाय? काही प्रेमकहाण्याच साठा उत्तरी सुफळ संपूर्ण का होतात? बर्याच जणांची कहाणी अधुरीच का रहाते? त्यांचं प्रेम कमी पडतं म्हणून? त्यांचे प्रयत्न कमी पडतात म्हणून? त्यांचं नशीब कमी पडतं म्हणून? का ते तसंच घडणार असं कुठेतरी लिहिलेलं असतं म्हणून? असंच घडणार असतं तर त्यांच्या भेटण्याला, जीव ओतून प्रेम करण्याला, एकत्र घालवलेल्या क्षणांना, घेतलेल्या आणाभाकांना काय अर्थ असतो? "यही होता है तो आखिर यही होता क्यो है"? आहे उत्तर? आपल्या डोळ्यांसमोर आपलं प्रेम दुसरीच्या ओंजळीत रितं होताना पाहणारी कोणी अभागिनी हाच प्रश्न विचारतेय - अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतम.
ह्या प्रश्नाचं उत्तर जो तो आपापल्या परीने शोधतो. कोणी एखादा स्वतःलाच दोष द्यायला लागतो. मीच मूर्ख. सगळं जग सांगत होतं - तिच्याकडे अमाप पैसा आहे आणि पैसा पैश्याकडेच जायचा ही दुनियादारीची रीत आहे.पण मी विश्वास ठेवला नाही, नको तिथे जीव लावला. आता जीव जायची पाळी आली आहे त्याला माझा हा हटवादीपणाच जबाबदार आहे. दुनियेला का बोल लावू? मी अनाडी होतो, अनाडीच राहिलो - सब कुछ सिखा हमने ना सिखी होशियारी, सच है दुनियावालो के हम है अनाडी.
कधीकधी 'त्या'च्या आणि 'ति'च्या ताटातूटीला कोणी तिसराच जबाबदार होतो - कधी कळत, कधी नकळत. मग एकटा राहिलेला 'तो' विचार करत राहतो की तिचं आपल्यावर प्रेम होतं की नाही? का आपल्याच मनाचे खेळ होते? आपण आपलं प्रेमाचं माणूस निवडण्यात चुकलो की काय? का आपण प्रेम करावं इतकी तिची लायकीच नव्हती? त्यातून हा "तिसरा" त्याचा जिवलग मित्र असेल तर? "दोस्त दोस्त ना रहा"
असं त्या मित्राला सुनावण्यापलीकडे त्याच्या हातात काही रहात नाही.
कधी ही प्रेमकहाणी संपते त्यात दोष कोणाचाच नसतो, असलाच तर नशीबाचा असतो. मग छोटासा गैरसमज विकोपाला जातो. कुठे डोळ्यांना जे दिसलं तेच खरं असं मानून नातं तोडलं जातं. कुठलंही स्पष्टीकरण ते नातं वाचवू शकत नाही. एरव्ही जे प्रश्न मोकळेपणी बोलून सोडवता आले असते ते गहन होऊन बसतात. काट्याचा नायटा होतो. कारण वेळ बरी नसते. तेच तर सांगतंय हे गाणं - वक्त करता जो वफा आप हमारे होते.
बरं असंही नाही हं की हे ह्याच्या एकट्याच्याच बाबतीत झालंय. प्रेमाचा हा खेळ शतकानुशतकं चालू आहे. म्हणून प्रेमभंगाचं दु:खही तितकंच जुनं आहे. कित्येक शायरांनी धोक्याच्या सूचना आधीच देऊन ठेवल्या आहेत:
सम्भलके हात बढाओ जरा गुलोकी तरफ
के इनके सायेमे काटोंको निन्द आती है
पण प्रेमात पडणारे कशाला लक्ष देताहेत? त्यांना जाग येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. फूल दुसर्याच कोणी नेलेलं असतं आणि ह्यांचे हात मात्र काट्यांनी जखमी झालेले असतात.
एखाद्याचं नशीब ह्याहून फुटकं. तिच्या विरहाचं दु:ख तर असतंच पण वर तिच्याच लग्नाच्या महफिलीमध्ये त्याला गावं लागतं. मन रडत असताना आनंदाचे सूर येणार कुठून? सगळीकडे अंधार दाटलेल्या जगात प्रकाशाची किरणं मिळणार नाहीतच. ज्याच्या सगळ्या इच्छा-आकांक्षांचा चुराडा झालाय अश्या एखाद्याने दुसर्याच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रार्थना करून काय उपयोग आहे? म्हणूनच तो विचारतोय - रंग और नूरकी बारात किसे पेश करू, ये मुरादोंकी हसी रात किसे पेश करू?
स्वत:ला, दुसर्याला किंवा नशीबाला दोष देऊन तरी काय साध्य होतं म्हणा? ती आता दुसर्याच कोणाबरोबर आहे ही वस्तुस्थिती नाकारता तर येत नाही. पण आता यापुढे येणारी पावसाची प्रत्येक सर, प्रत्येक पहाट, प्रत्येक सोनेरी संध्याकाळ ही त्या दोघांचीच असणार आहे आणि आपल्याला असलंच तर कधीकाळी पडलेल्या आणि विस्मरणात गेलेल्या स्वप्नाइतकंच स्थान उरलेलं आहे हे कळत असलं तरी त्याला सहन होणारं नसतंच. हे दु:ख विसरायला मग तो एक पण करतो - तिच्या घराजवळ आता जायचंच नाही, आसपास फिरकायचंच नाही - तेरी गलियोमे ना रखेंगे कदम आजके बाद. काय बिशाद आहे मग की तिची आठवण येईल?
पण तिच्यावर ह्याचाही काहीच परिणाम होत नाही. त्याचं दु:ख पाहून तिचं काळीज तुटत नाही. त्याच्या डोळ्यात दाटून आलेला पाऊस पाहूनही तिचे डोळे कोरडेच रहातात. ह्रदय फाटून जाईल अश्या वेदना त्याला होत असतात पण तिच्या चेहेर्यावर दु:खाचा लवलेश नसतो. आपल्या जीवाचा एक तुकडा कोणीतरी काढून नेतंय असं त्याला वाटत असतं पण ती निश्चल असते. मुठीतून सुटू पाहणार्या वाळूप्रमाणे झरझर निसटणार्या स्मृतींना बिलगून रहाण्याचा निष्फळ प्रयत्न तो करत रहातो पण ती मान वर करून त्याच्याकडे पहात सुध्दा नाही. ह्या असल्या दगडाच्या मूर्तीवर आपलं प्रेम बसलंच कसं ह्याचंच मग त्याला आश्चर्य वाटतं. आणि मग उद्विग्न होऊन तो म्हणतो - किसी पत्थरकी मूरतसे मुहोबतका इरादा है.
एखादा दिवाना मात्र तिला विसरू शकत नाही. त्याच्या ह्र्दयात तिला कायमचं स्थान मिळतं - ती दुसर्या कोणाची झाली तरी. ती नाही तरी तिच्या आठ्वणी ह्यापुढे त्याच्या प्रियतमेच्या रूपात असणार ह्याची त्याला खात्री असते. ती ह्यापुढे दिसो ना दिसो, त्याच्या स्वप्नात येऊन ती त्याला भेटणार असते. ती ज्या डोलीत बसून निघून गेली तिला बांधलेल्या फुलांचा घमघमाट ह्याच्या श्वासात दरवळणार असतो. म्हणूनच तो म्हणतो - दिलके झरोकेमे तुझको बिठाकर, यादोको तेरी मै दुल्हन बनाकर, रखूंगा मै दिलके पास, मत हो मेरी जा उदास.
खरं तर ही कहाणी दोघांची नाही, ती तिघांचीच. त्रिकोणाचे तीन कोन, तिघांची दु:खं वेगळी. त्याच्या आठवणीतून अजूनही त्यांचे एकत्र घालवलेले क्षण जायला तयार नाहीत. तिचं खळखळून हसणं त्याच्या कानांत अजूनही घुमतंय. प्रेमाचा हा रंगलेला खेळ असा अचानक मध्येच मोडला गेलाय हेच त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडलं. तिचीही अवस्था ह्याहून वेगळी नाही. नशिबाचे फासे असे पडले की "दु:ख म्हणजेच प्रेम आणि प्रेम म्हणजेच दु:ख" अशी आपल्यापुरती तिने व्याख्या बनवून टाकली. आणि तो तिसरा? रूढार्थाने आज तिचा जन्माचा सोबती आहे. पण ती मनाने आपली नाहिये, कदाचित कधीच होणार नाहिये हे त्याच्या केव्हाच लक्षात आलंय. तरीही त्याचं तिच्यावर मनापासून प्रेम आहे. आणि त्यामुळेच दु:खाच्या एका हुंदक्यानेसुध्दा त्या प्रेमाचा अपमान होईल असं त्याला वाटतंय. म्हणूनच नियती आपल्या क्रूरपणाला जागून तिघांना एकमेकांसमोर आणते तेव्हा तिघांच्याही उरातल्या जखमा पुन्हा ठसठसायला लागतात - दिलने फिर याद किया बर्कसी लहरायी है.
ती ज्या वाटेने निघून गेली तिथे थांबण्यात खरं तर काही अर्थ नसतो. ती परत येणार नसते. मग ती स्वतःच्या इच्छेने निघून गेलेली असो किंवा नाईलाजाने गेलेली असो. पण आपल्या वाटेने निघून जाण्यातच शहाणपण आहे हे त्याला कळत नसतं. त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली तरी त्याच्या मनावर अजूनही तीच राज्य करत असते. म्हणूनच त्याची पावलं तिथून हलायला तयार नसतात. तिथून निघून तरी काय होणार असतं? शेवटच्या श्वासापर्यंत तो तिची वाट पहातच रहाणार असतो. त्याची नजर सगळीकडे तिलाच शोधणार असते. म्हणूनच तो म्हणतो - किसी नजर को तेरा इंतजार आजभी है.
असफल प्रेमिकांच्या ह्याच गर्दीत काही अवलिये भेटतात. प्रेम तर त्यांचंही हरपलंय. आभाळातून वीज कोसळून क्षणात सगळं बेचिराख व्हावं तसं त्यांचं जगही पार उध्वस्त झालंय. जगण्यासाठी काही उरू नये आणि मरणही येऊ नये अशी त्यांचीही स्थिती झाली आहे. पण तरीही डोळ्यातलं पाणी थोपवत ते उभे आहेत - कोणालाही बोल न लावता. एका शायराने दोन ओळींत कसलं सुरेख वर्णन केलंय पहा:
जखमा अश्या सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा
हा असाच एक अवलिया बघा. त्याचं प्रेम आता त्याचं राहिलं नाही. ती आता दुसर्याची झालेय. पण त्याबद्दल त्याला असूया नाही, राग नाही, तिरस्कार नाही, कुठेही कसलाही कडवटपणा नाही. उलट ह्या अनुभवाने त्याचं मन अधिक उजळलंय. ती आहे तिथे खूश रहावी असं त्याला खरंच वाटतंय. त्याची खात्री आहे की त्याच्या मनात डोकावून पहाणार्याला हे आणि फक्त हेच दिसेल. त्याच्या ओठावरचं हसू त्याच्या
डोळ्यातले अश्रू लपवण्यासाठी नाहीच आहे मुळी. प्रेमाचं दान कोणा दुसर्याच्या का होईना पण पदरात पडलंय ह्याचाच त्याला आनंद झालाय. म्हणूनच तो म्हणतोय - गीत गाता हू मै, गुनगुनाता हू मै, मैने हसनेका वादा किया था कभी, इस लिये अब सदा मुस्कुराता हू मै.
बरीच वर्ष झाली ह्या गोष्टीला. एका हिंदी सहकार्याकडून मोठ्या उत्साहाने "देवदास" आणलं. वाचून परत करतेवेळी "कसं वाटलं" असं त्याने विचारलं. मी अजिबात आवडलं नसल्याचं सांगताच "गाढवाला गुळाची चव काय" अश्या थाटात त्याने माझ्याकडे पाहिलं होतं. पण मी तरी काय करू? देवदासने एक तर पारोशी लग्न करायला हवं होतं नाहीतर तिला पूर्णपणे विसरून आयुष्याची नवी सुरुवात करायला पाहिजे होती असंच मला आजही वाटतं.
जीव ओवाळून टाकूनच प्रेम करावं नाहीतर त्या प्रेमाला अर्थ नसतो. ते सफल झालं नाही तर दु:ख जरूर करावं कारण त्याशिवाय जखम बरी होणारच नसते. पण त्या दु:खात बुडून जाऊ नये. कारण नियती माणसाचं नशीब घडवताना आधी मणभर दु:ख भरते आणि मगच कणाकणाने सुखाचे चार क्षण आत झिरपवते. दु:ख तर मिळणारच पण त्याने लुळंपांगळं होऊन सायासाने मिळालेले हे सुखाचे चार क्षण वाया घालवायचे का? म्हणूनच "कौन कमबख्त बरदाश्त करने के लिये पीता है" म्हणून जीवन दारूच्या पेल्यात बुडवून संपवून टाकणारा देवदास माझ्या लेखी हिरो नाही. तर "वो रिश्ता जिसको अंजाम तक लाना न हो मुमकिन उसे इक खुबसुरत मोड देके छोडना अच्छा" असं सांगणारा गुमराहमधला सुनिल दत्तच मला जास्त भावतो.
अर्थात विसरतो म्हटलं तरी काही गोष्टी विसरता येत नाहीत. एखादं गाणं, एखादा चित्रपट, वेळी अवेळी पडणारा पाऊस किंवा रात्रीची अनाम शांतता कधी कधी तीच आठवण घेऊन येतात. पावसाचे थेंब केसातून झटकणारी एखादी ती, गालाला खळ्या पाडत हसणारा एखादा तो, एखाद्याचं मान मागे फेकत हसणं, एखादीचं डोळ्यातून हसणं - ही यादी ज्याची त्याची आहे. पहिली ओळख, त्यानंतरच्या भेटी, गुजगोष्टी, रुसवेफुगवे, मनधरणी, गैरसमज, अखेरची भेट सगळं सगळं फेर धरून मनात नाचायला लागतं. किती निग्रह केला तरी डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. आपलंच मन ओढाळ वासरासारखं भूतकाळात रमायला लागतं. 'जे झालं नाही ते झालं असतं तर' हा विचार पिच्छा पुरवतो. आणि मग मनात येऊन जातं - कुठे बरं असेल ती? कशी असेल? आपली आठवण काढत असेल का? जागेपणी नसली तरी स्वप्नात तरी? तिच्या डोळ्यातल्या एखाद्या आसवावर माझंही नाव असेल का?
ऐसा भी नही के मुझे उससे मिला दे कोई
कैसी है वो बस इतना बता दे कोई
सुखी है बडी देरसे पलकोंकी जुबां
बस आज तो जी भरके रुला दे कोई
वि.सू. या लेखातल्या सर्व काव्यपंक्ती फॉरवर्डेड आहेत. कोणा कवी वा शायराच्या आहेत ह्याबद्दलचं अज्ञान सर्वस्वी माझं.
सुरेख लिहिलयं. <<कारण नियती
सुरेख लिहिलयं.
<<कारण नियती माणसाचं नशीब घडवताना आधी मणभर दु:ख भरते आणि मगच कणाकणाने सुखाचे चार क्षण आत झिरपवते. दःख तर मिळणारच पण त्याने लुळंपांगळं होऊन सायासाने मिळालेले हे सुखाचे चार क्षण वाया घालवायचे का<<>> खासचं!
इथे 'दु:ख' असे हवे का?
संयोजक, हा लेख 'सर्व
संयोजक, हा लेख 'सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची सूची' मध्ये दिसत नाहीये, आणि त्यामुळे 'नविन लेखन' मध्येही दिसत नाहीये.
स्वप्ना, सुंदर लेख. खूप आवडला. आता किती वेळा ह्या लेखाचं पारायण होईल, सांगता येत नाही. सगळी गाणी मनाच्या कोपर्यात वाजायला लागलीत.
स्वप्ना, मस्त लेख साहीर
स्वप्ना, मस्त लेख
साहीर लुधियानवी म्हणुनच तर लिहून गेलाय 'प्यासा' मध्ये..'जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला'. अर्थात ह्यात त्याच्या स्वतःच्या प्रेमभंगाचं दु:खही होतंच.
वा.. काय मस्त लिहिलेस गं..
वा.. काय मस्त लिहिलेस गं.. मंजु म्हणते तशी सगळी गाणी वाजायला लागली.. मी तर गात गातच वाचला लेख. आता घरी जाऊन बघत बघत परत वाचेन..
सुनिल दत्तचे गुमराह मधले गाणे माझे अतिशय आवडते. महेंद्र कपुरने काय गायलेय... अतिशय सुंदर. आणि गजल मधलेही 'रंग और नुर की बारात....'.
काय अवीट गोडीची गाणी बनवलीत त्या लोकांनी आणि स्वप्नासारख्या आजच्या पिढीतल्या मुलीलाही त्या गाण्यावर लिहावेसे वाटते यातच सगळे आले.
स्वप्ना तुझ्या पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.....
वरवर पहाता लेख चांगला असावा
वरवर पहाता लेख चांगला असावा असं वाटतयं
जास्त खोलात शिरुन वाचेन कधीतरी !
आणि मग मनात येऊन जातं - कुठे
आणि मग मनात येऊन जातं - कुठे बरं असेल ती? कशी असेल? आपली आठवण काढत असेल का? जागेपणी नसली तरी स्वप्नात तरी? तिच्या डो़ळ्यातल्या एखाद्या आसवावर माझंही नाव असेल का?>>>>........ सुरेख लिहलयं, पुन्हा पुन्हा वाचण्यासारखं
स्वप्ना, नेहमीप्रमाणेच झक्कास
स्वप्ना, नेहमीप्रमाणेच झक्कास जमलंय. चित्रपटसृष्टी आणि त्यावरील लेखन यांवर तुझी चांगलीच मास्टरी आहे.
अरेच्चा! हा लेख प्रसिध्द
अरेच्चा! हा लेख प्रसिध्द झाल्याचं मला सुध्दा माहित नव्हतं.
आजच संयोजकांना मेल केलं की हा लेख गणेशोत्सवात प्रसिध्द झाला नसेल तर दिवाळी अंकासाठी पाठवू का म्हणून.
vrusha, मंजूडी, आशुतोष०७११, साधना, टवाळ - Original, प्रसिक, आऊटडोअर्स - तुम्हाला हा लेख कसा काय दिसला बुवा? प्रतिसादाबद्द्ल खूप खूप धन्यवाद!
मी पण एकदा बघितला, आणि सवडीने
मी पण एकदा बघितला, आणि सवडीने वाचू या म्हंटलं, तर गायबच झाला.
चलो इकबार फिरसे, माझे अत्यंत आवडते, उसे इक खुबसुरत मोड देकर, ...ना देखू गलत अंदाज नजरोंसे, अशा ओळी मला खुप आवडतात.
प्रेमाच्या वेगळ्या तर्हा म्हणून दूरदर्शनने काहि वेगळे चित्रपट लागोपाठ दाखवले होते, त्यात शारदा, बावरे नैन, सरस्वती चंद्र आणि बंदीनी वगैरे होते.
विरहानंतर सुद्धा अर्थपुर्ण जीवन जगणारे ते दोघे, सरस्वतीचंद्र मधले,
छोड दे सारी दुनिया, किसी के लिये ...
खरे तर हि दोन्ही गाणीच, वास्तवाला जास्त जवळची, हरपलेल्या प्रेमासाठी वेडे होणे, आजकाल परवडत नाही बॉ.
अर्थात लेख आणि गाणी, नेहमीप्रमाणेच छान
मस्त लिहीलेस स्वप्ना!!
मस्त लिहीलेस स्वप्ना!!
"जखमा अश्या सुगंधी झाल्यात
"जखमा अश्या सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा" - कोणाची गझल बरं ही? कॉलेजमधे ऐकली होती. भीमराव पांचाळे का?
बाकी लेख छान!
मस्त लिहिलं आहेस.
मस्त लिहिलं आहेस.
जखमा अश्या सुगंधी झाल्यात
जखमा अश्या सुगंधी झाल्यात काळजाला>>गजलकार-इलाही जमादार, गायक्/संगीतकार- भिमराव पांचाळे.
स्वप्ना, लेख मस्त झालाय, आवडला.
मस्त लिहिल आहे..
मस्त लिहिल आहे..
वा! सुरेख लिहिलयं, उल्लेखलेली
वा! सुरेख लिहिलयं, उल्लेखलेली सगळीच गाणी मस्तच. आधीच्या अशाच लेखांना एकत्र करून एखादी लेख मालिका कर ना
खूपच छान!!!
खूपच छान!!!
दिनेशदा, ज्ञाती, तेजस, सावली,
दिनेशदा, ज्ञाती, तेजस, सावली, श्यामली, अजय जवादे, रंगासेठ, Gulavanibai खूप खूप आभार! श्यामली, माहितीबद्दल खास आभार!
रंगासेठ, ह्या सगळ्या लेखांची लिंक माझ्या प्रोफाईलवर आहे. मालिका करायची म्हणजे काय ते प्लीज सांगाल का?
स्वप्ना खूप सुंदर लेख... अजीब
स्वप्ना खूप सुंदर लेख...
अजीब दास्ता प्रिय गाणे : किसीका साथ लेके तुम नया जहाँ बसाओगे, ये शाम जब भी आएगी, तुम हमको याद आओगे.
रंग और नूर की बारात किसे पेश करू हे गझलमधे तीन वेळा येते. आधी मीनाकुमारी आपल्या सख्यांसोबत मैफिलीत गाते - नग्मा ओ शेर की सौगात किसे पेश करु...ते फाटकाशी उभा राहून सुनील दत्त ऐकतोय्....तिचे गाणे आणि त्याचे ऐकणे दोन्ही प्रेक्षणीय. मग मुशायर्यात तो पुन्हा अशीच गझल पेश करतो.
गुमराह पुन्हा सुनील दत्त !
चलो इक बार साहिर ने अमृता प्रीतम साठी/वर लिहिले होते (म्हणे?)