समर्थशक्ती

Submitted by टाकाऊ on 20 August, 2010 - 12:03

एखादी नवनिर्मिती होण्यासाठी काही विशिष्ट रसायनं किंवा योग जुळून यावे लागतातच असे नाही. वर्तमानातील सद्यस्थिती किंवा भूतकाळातील घडलेली एखादी घटनासुद्धा ठिणगी पाडून जाते. प्रस्तुत काव्य लिहिण्याआधी मात्र यापैकी काहीच झालं नव्हतं. नेहमीप्रमाणे माझी कृष्णा घोडी मी कचेरीतून वाड्याकडे फेकली आणि मजल दरमजल करत हायवेवर आलो. डोक्यात नेहमीप्रमाणे विचारांचे गोंधळी त्यांची कला सादर करत होते. पण काय झालं ठाऊक नाही अचानक विचार आला की समजा परिस्थितीने गांजलेला, नशिबाने अवकृपा केलेला एखादा आत्मसमर्पण करायला निघालाय आणि त्याला समर्थ भेटले तर? आणि अक्षरशः समर्थांना हे कळल की काय माहित नाही पण पुढच्याच क्षणी दोन मोडक्या तोडक्या ओळी डोक्यात चमकल्या
'टाळण्या प्रसंग अनर्थ .... उच्च रवे बोलीला कोणी जय जय रघुवीर समर्थ ' आणि अगदी दोन दिवसात मेंदूचा भुगा पाडून उर्वरित रचना पूर्ण झाली. तुम्हाला म्हणाल की काय थापा मारताय राव.. पण मला हे लिहिताना समर्थांच अस्तित्व खरंच कुठेतरी जाणवत होतं.
खरतर समर्थांच्या आतल्या गोटातली मंडळी इथे समर्थांवर जाड जाड प्रबंध रचत असताना मी माझं खेळणं घेऊन वाग्विलास करणं म्हणजे हंसांच्या दरबारात कावळ्याने काव काव करण्यासारखं आहे. पण जिथे समर्थच म्हणतात,'तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती | तेथे माझी वित्पत्ती किती | बुद्धिहीण अल्पमती | सलगी करतो ||' तिथे माझी ही खटपट आपण समजून घ्याल ही आशा आहे.. बाकी उरले सुरले मी आपल्या अभिप्रायांवर सोडतो.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

--------------------
जीवनअस्ताचे नाते घट्ट, सूर्यास्ताशी जोडावया
डोहाकाठी आयुष्य कोणी,कष्टी उभा डूबवावया
तो कष्टला बहुत तरी, अंगणी फुलला दुःखवृक्ष
आता न सुचे मार्ग दुजा, त्यास मागे फिरावया

निबिड जंगल भवती साचले,जागा उत्तम ही दिसे
आता येईल शांत मृत्यू, अडवाया मज कोणी नसे
पाऊल उचलले ऐसे म्हणूनी, परी क्षणैक थबकला
खडावांचा ध्वनी कोठूनी, दाट निबिडातूनी गुंजला

प्रसंग ठाकला मोठा बाका, होता क्षणाचा अवकाश फक्त
वेगे न केल्या उपाय काही, गदळून जाईल तरुण रक्त
सावरिण्या दीनदुबळ्यास त्या, टाळण्या प्रसंग अनर्थ
उच्च रवे बोलीला कोणी, जय जय रघुवीर समर्थ

पाऊल तयाने घेतले मागे, परी तेथेची उभा राहिला
कंपित स्वरे वदला तेथुनी " तू कोण? का येथे पातला?"
नको मज सांत्वन तुझे, भोगिले अपार दुःख किती
करिण्या बरा अंत ह्या, मृत्यूच आता पुजितो मी

एकचित्ते ऐकून व्यथा, साधू निश्चये बोलीला
हेच तुझे मन जर तर, त्वरे कवटाळ डोहाला
कैक जीव रोज जन्मिती, कैक पाविती मृत्यू इथे
तुझे जाणे कोण जाणे, काय अडेल कोणाला?

रे आम्ही मुक्त अनिकेत, गमतो पंथ राघवाचा
माळूनी सुमने भक्तीचीचं, भूषवितो नरदेहाला
वैराग्य आमुचे विभूषण, देह अर्पिला रामचरणी
परी खेदिलो अंतःकरणी, पाहोनी तुझी मूढ करणी

कितेक मेला समुदाव मोठा, परी दुःख ना इथले आटले
आपण ठरलो सामान्य गड्या, येथे देवेही दुःख भोगिले
भले न पुजीसी मृत्यूस तरी,जाणे काही चुकणार नाही
तरी करूनि कार्य भले, तू कीर्तिरूपे का न राही?

आता ढळला निश्चय त्याचा, तसाच तेथे बैसला
म्हणला दिसशी तू पुरुष ज्ञानी, सांग माझे हीत मला
मी विसंबून नशिबी माझ्या, जोखील्या हातच्या गूढ रेषा
किती कष्टलो इतरांपरी, तरी भाग्य न देई साथ मला

ऐकून त्याची हताश वाणी, स्मितवदने पुरुष बोलला
ऐक, जो दुसर्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला
अन काय भुलतो रेषांस ह्या, सैराट तयांची धाव दिसे
हात नसती जयांस त्यांसही, अटळ एक भाग्य असे

कस्तुरी नाभित विलसे तरी, मृग हुंगे चोहीकडे
तैसेच बा झाले तुझे, हातचे कंकण तुवा न दिसे
झटक वेड्या क्षीण विचार, तुझेच आहे तुजपासी
तरी चेतवून ज्ञानदीप तू, जाळूनी टाक क्षुद्र मनासी

ऐकून सारे त्वरे उठला, येउनी साधूचरणी रुजला
रडवे झाले तोंड तयाचे, पश्चाताप मुखी उमटला
कृतज्ञतेने फुल अर्पुनी, चरण धरिले साधूचे
काय दक्षिणा देऊ तुम्हा, म्लान वदने पृच्छीले

रोखुन नजर साधू वदला, बरे हा तू शब्द बोलला
चल आता संग त्वरे, शूरास येका भेटवितो तुला
आक्रीत झाले चोहीकडे, हे तर तुजला ठाव आहे
हे उधळण्या पाप घातकी, एक वादळ फिरत आहे

शिवबा आहे नावं तयाचे, काळरूप तो म्लेंच्छाला
समाधान मी पावतो तरी, जर तू अर्पिसी शक्तीला
शक्ती युक्तीचा जोड अजोड. सूख घरा आणेल रे
तु लढावे शिवबासाठी, हेच दान मला शोभेल रे

हात हाती घेऊन तयाचा, साधू प्रकटला राजगडी
वाहून तयास राजाचरणी, निघोन गेला गुप्तस्थळी
पुढे तळपली तरवार तयाची, पराक्रम ऐसा गाजला
शिवबाचाच शेला तयाच्या, छातीवरुनी शोभला

सद्कीर्तीचा डंका तयाच्या, गर्जून राहिला सह्यातुनी
विचार नेटके रुजले पाहून, साधू तोषला बहुत मनी
पुनःश्च जाणिले अंतर्ज्ञाने, कुणी अभागी जातोय व्यर्थ
तडक उठोनी पुनः गर्जला, जय जय रघुवीर समर्थ

गुलमोहर: 
शब्दखुणा: