वेग

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

समोरून निघालेली प्रकाशाची एक प्रदीर्घ शलाका त्याच्या अंतराळ पोशाखाच्या सुरक्षा काचेवर आदळली. काचेचे अनेक लंबगोलाकृती तुकडे तिच्या वाटेतून बाजूला झाले, शलाकेमधली काही किरणे त्यावर पडून परावर्ती किरणांनी ते लखलखले. ती लखलख ईतकी प्रखर होती की दोन क्षण त्याला कळलेच नाही, पण रिफ्लेक्स अ‍ॅक्शनने त्याने उजवा हात वेगाने डोळ्यापुढे नेण्यासाठी उचलला.

**
डोळ्यापुढचा हात त्याने काढला, तेव्हाही डोळ्यापुढचा प्रकाश अंधारी आणत होता. झटक्यात त्याने मान वळवून खाली बघितले तेव्हा पायाला स्पर्शणारी सोनेरी तप्त वाळू जाणवली तशीच घशाला पडलेली कोरडही. त्याने एक आवंढा गिळला. तो गिळतानाही कसनुसा चेहेरा झाला त्याचा. समोर किती अंतर जायचे आहे त्याला ठाऊक नव्हते. कुठून सुरूवात केली वाळवंटाला तेही त्याला कळत नव्हते. इथून बाहेर पडायचे आहे, एवढे एकच त्याला ठाऊक होते. एकाएकी त्याला जाणवले, पायाखालची वाळू हलत होती. तो घाबर्‍याघुबर्‍या, हलणार्‍या वाळूपासून लांब जायचा प्रयत्न करू लागला. तो जिथे हलत होता, तिथली वाळूही हलत होती. या हलणार्‍या वाळवंटातून त्याला कसेही करून बाहेर जायचे होते. कुठे पाणी मिळते का बघायला त्याने पावले मोठ्या कष्टाने उचलली.
**

हातातल्या मिक्सीपात्रात एक त्रितियांश ज्युपिनी आणि दोन तृतियांश टकिला भरून त्याने एक जोरदार झटका दिला. मग ते निळसर झाक आलेले द्राव्यमिश्रण समोरच्या इंग्रजी एल आकाराच्या ग्लासमध्ये भरताभरता, घड्याळावर नजर फिरवली. चार तास होऊन गेले होते. डाव्या पायावर जास्त भार पडल्याने तक्रार सुरू व्हायच्या आत माईकला सांगून ब्रेक घ्यायला हवा १० मिनीटाचा, त्याने ग्लासमध्ये दोन पेट्रोमचे थेंब बुडवताना स्वतःशीच विचार केला. तयार झालेल्या निळसर ड्रिंकमध्ये आता दोन पिवळी वलये दिसू लागली होती.
माईकला, ड्रिंक न्यायला आल्या आल्या त्याने सांगितले, "ब्रेक. १० मिनीट्स."
"ओक्के मुकी, गो" कानावर पडेपर्यंत स्मोक मारायला तो इंटरगॅलच्या मागच्या दरवाजाने उजवा पाय खेचत बाहेर पडतही होता.
**

तो घाईघाईने बाहेर आला, आणि काही कळायच्या आत मागून कुणीतरी पिस्तोल टेकवली. धातूमय आवाजात पुढचे वाक्य आले "हँड्सप,जाँटी मॅकेंझी. यू आर अंडर अ‍ॅरेस्ट". पोरॉट
[पोलिस रोबॉट] गोळी मारू शकत नाही आणि रबरी गोळी आपल्याला काही करू शकत नाही हे माहिती असल्याने त्याने तसेच सुस्साट पळ काढला. त्याने कितीही हुलकावे देण्याचे प्रयत्न करूनही पोरॉट त्याची पाठ सोडत नव्हता. किंबहुना त्याचं पुढचं पाउल कुठे वळेल हे त्याला आधीच कळत होतं. त्याने सगळा धीर एकवटून एका अंधार्‍या गल्लीत मुसंडी मारली, आणि दिसलेल्या पहिल्या शिडीवरून झरझर वर चढून गेला. कठड्यावरून कोसळून तो गच्चीत लपला तेव्हा खाली पोरॉटच्या थांबणार्‍या पावलांचा आवाज येत होता. त्याला हुश्श वाटले. जरावेळ कानोसा घेत तो बिल्डींगच्या गच्चीत, एका कोपर्‍यात निपचीत पडून राहिला. पोरॉटची पावले लांब जाताना ऐकू आली तसा तो सावधपणे, कानोसा घेत बाहेर आला खरा, पण दोन पोलिसांची उडी काही तो चुकवू शकला नाही. एकाने त्याला खाली दाबला, तसा दुसर्‍याने त्याला हातकड्या अडकवल्या आणि कपाळावर डिटेक्टर बसवला. आता तो पूर्णपणे पोलिसांच्या नियंत्रणात होता. पळून गेल्याचा वेडेपणा भोगावा लागेल असे स्पष्ट दिसत होते.
**

त्याच्या डोळ्यासमोर तिचे लालचुटूक ओठ तरळले. ती हसली की कसे हलकेच विलग व्हायचे. तिच्या गोर्‍या गालांनी बोलता बोलता बदललेला रंग आठवून तो अजूनच खूष झाला. तिचे केस खांद्यांवरून छातीवर रुळणारे आणि हाताने, किंवा मानेला झटका देत हलवणरी ती, आय हाय!. फिगर तर काय सेक्सी आहे !! आता कुठे असेल, काय करतेस विचारायला फोन करूया, म्हणून त्याने आपला सेलफोन उचलला. "गॉड्डॅमीट दीज xxxxx !" सेलफोन कंपनीला जोरात शिवी घालत त्याने फोन आपटला. त्याचं क्रेडीट संपल्यानंतर, परत वाढवलंच नव्हतं त्याने. मग पे फोनवरून नंबर फिरवला आणि पैसे टाकले.
"हाय हनी ......"
"हूज धीस ......"
"माय स्वीटहार्ट, आज कुठला ड्रेस घातला आहेस तू?"
"शॅडप ... हू द हेल ईज धीस?"
"ओ क्मॉन, चिडतेस कशाला. मीच बोलतो आहे"
वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच फोनची लाईन कट झाल्याचा बीपबीप आवाज ऐकून तो स्वतःशीच हसला, चिडल्यावर कित्ती सुरेख दिसत असेल असा विचार करून!

************************
लातूरच्या जवळच असलेल्या छोट्याश्या गावात एका टपरीवर सायबूतात्या विडी फुकत बसला होता. विडीचा कसदार झुरका मारत त्याने बाजूला पडलेल्या एक मोठ्या चौकोनी यंत्राकडे बघून कचकावून शिवी घातली. त्याच्या टपरीच्या शेजारी ते भकास धूळखाऊ यंत्र येउन पडल्यापासून त्याचा टिव्ही बंद पडला होता. टिव्ही बंद म्हणून गिर्‍हाईकही कमी झालं होतं. ते कसलं मशीन होतं कुणालाच माहिती नव्हतं. तिथं तरी का येऊन पडलं यावर बर्‍याच लोकांनी वावड्या उठवल्या होत्या. कुणी म्हणायचं टिव्हीचं केंद्र आहे, तर कुणी म्हणायचं फोनयंत्र आहे. ब्याद साली, म्हणत विडीचे थोटूक फेकून, सायबूतात्या वळला, आणि यंत्रातून धडाधड आवाज येऊ लागले. दचकलेला सायबूतात्या वळून बघेस्तोवर, धुळीच्या मागून पिवळ्या, पांढर्‍या दिव्यांचे झोतच्या झोत ओतू लागले होते. २ मिनीटात सगळं गाव जमा होऊन ही दिवाळी बघू लागलं. आता आतनं धाड धुड आवाज येत होते. तसे सायबूतात्याने धसकावून पोलिसाला फोन लावला. तो समोरच उभा होता. मग त्याला बाजूला घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावले तसे त्याने फोनाफोनी सुरू केली. अर्ध्या तासात टिव्हीवाले समोर उभे होते. सावकाशीनं येतो म्हणणारे एसिपी, टिव्हीवरची न्यूज बघून धापा टाकत पोचले. पोलिसांनी बघ्यांची गर्दी हटवली. सुरक्षाकडे उभे केले. वरतून सूत्रे हलत होती भराभरा. सायबूतात्याकडे टिव्हीवाल्यांची रीघ लागली होती, चापायला आणि त्याला प्रश्न विचारायला. तो खूष होता. एका टिव्हीवाल्याला बोलताना त्याने ऐकले की ते यंत्र म्हणजे तीस चाळीस वर्षापूर्वीचे ट्रांस्पोर्टल यंत्र होते. महाराष्ट्र सरकारने, एक गाव एक ट्रान अशा अभियानाखाली ते यंत्र कुठल्याश्या फ्रेंच कंपनीकडून खरेदी केले होते. "जुनी यंत्र गळ्यात मारतात अजूनही" असे स्वतःशीच पुटपुटत तो ९ नंबरच्या टेबलचे बील करण्यात गुंतला. थापांचे आवाज अजूनही येतच होते. बाहेर जरा आरडा ओरडा ऐकू आला, तसा त्याने कानोसा घेतला, कुठलासा मंत्री आला असेल. "आता काय फुकट मागणार" अशी आठी चढवत तो बघायला लागला. जे कोण आले होते ते मात्र एकदम यंत्रापाशीच गेले. "एक्सपर्ट आलेत" अशी कुणाकडूनतरी वार्ता त्याने ऐकली. १०/१५ मिनिटांनी टिव्हीवाल्यांचा गलका एकदम वाढला, एक अँब्युलन्स आली आणि हाहा म्हणता गेलीदेखील. कुणीतरी उपटसुंभ ट्रांस्पोर्टलमधून इकडे आला, आणि आता त्याच्या शरिराचे सगळे भाग आले नाहीत म्हणून अँब्युलन्समधून नेले आहे अशी माहिती त्याला टेबल नं ३ वरून मिळाली तसा त्याचा वासलेला "आ" बंदच झाला नाही.
************************

पाय दमले होते, तरी तो तसेच ओढवत ओढवत चालल होता. तहानेने जीव व्याकूळ झाला होता. दिवस काळ वेळ दिशा कशाचाच पत्ता नव्हता. दूरवर त्याला मृगजळाचा भास झाला. तशी कुठेतरी खोल दडपून असलेली शक्ती वापरून तो स्वतःला त्या दिशेने ढकलू लागला. झोक जात होते, शेवटी वाळूत लोळला, पण खुरडत खुरडत हातांनी स्वतःला ओढत मृगजळाकडे पोचला. ते एक पाण्याचे छोटे डबके असावे असे त्याला दुरून वाटले होते. पण तो एक छोटास खड्डा निघाला. सगळी वाळू इथे खड्ड्याला चुकवून बाजूने जात होती. त्याला एकदम हायसे वाटले. खड्डा किती खोल आहे बघायला त्याने हात उचलला, तशी समोर वाळूच आली. घाबरून त्याने दुसरा हात बघितला. तो देखील वाळूमयच होता. त्याने वाळू झटकण्याचे अतोनात प्रयत्न केले, पण व्यर्थ ! हताश होऊन तसाच त्याने हात खड्ड्यात घातला, तशी तो त्या खड्ड्यात ओढला गेला. क्षणार्धात त्याला आपल्यात शोषून तो खड्डाही नाहीसा झाला. आणि त्याच वेळेला सायबूतात्याने हातातले विडीचे थोटूक फेकले होते.
**

त्याच्या बोटांना स्पर्श जाणवला, खुर्चीचा, लोखंडी दाराचा, कंप्युटरच्या कीजचा. तो यानात बसला होता, मोठ्या कंप्यूटर स्क्रीनसमोर. सरकारात बेकार म्हणून नोकरीसाठी अर्ज करण्यापासून ते उंप्क्वा कंपनीच्या या एम.वेस्ट यानात, ईलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करणे, वर्गीकरण आणि विल्हेवाट लावण्याच्या यानात, त्याला प्रमुख म्हणून नोकरी मिळेस्तोवर दिलेल्या परिक्षा त्याला आठवल्या. त्याला त्याचे नवल वाटावे ईतक्या सहजतेने, त्याने त्या परिक्षांमध्ये यश मिळवले होते. त्याच्या हाताखाली, ५ कचखाऊ रोबॉट्स होते ते वर्गीकरण करण्यात प्रशिक्षीत होते. त्याला नविन ग्रहावरून कचरा गोळा करण्याची असाईनमेंट मिळाली, तो ग्रहही त्याला इप्सित ठिकाणाजवळून जात होता. सगळे कसे मनासारखे जुळून येत होते. त्याने मग आपला पोर्टेबल थिंकपॉड व्यवस्थित चालतो आहे की नाही ते बघितले. विचार-रुपातले प्रश्न जाणून त्याची उत्तरे शोधून देण्याची कामे हा थिंकपॉड अगदी चुटकीसरशी करत होता. तो विकत घेतानाही १०,००० मधले एक, आणि एकच, उत्तर चुकेल असे त्या थिंकपॉडची ख्याती ऐकून आणि पारखून त्याने तो सेकंडहँड विकत घेतला होता. गेल्या ५०० वर्षांचा इतिहास, गणित, भूगोल, खगोल वगैरे सर्व माहिती त्या थिंकपॉडवर उपलब्ध होती. त्याचा विचार एव्हाना पक्का झाला होता. हजार एक प्रश्न विचारून खात्री करून त्याने थिंकपॉडची पांढरी बॉडी पाठीवर अडकवत पुढच्या वाटा निश्चित केल्या. मॅप बघून, दर दोन तासानी तीन क्लिपमधली एक क्लिप मदरशिपला पाठवायची सोय करत, यान पार्क करायची जागा त्याने निश्चित केली. त्या क्लिप्समुळे मदरशिपला त्याचा माग, सहा तास तरी कळला नसता आणि तेवढे त्याच्यासाठी पुरेसे होते. एम.वेस्ट नियोजित ठिकाणी पार्क करून, पांढरा स्पेससूट आणि हेल्मेट घालून तो ईमर्जंसी राईडवरून छोट्याश्या ग्रहावर उतरला, तेव्हा एक तास लोटला होता. ऑक्सिजनचा साठा पुरेसा आहे ना आणि थिंकपॉड बरोबर उत्तरे देतो ना, याची अनेकदा खात्री करत तो ग्रहावर उतरला. त्याला थोडेसे दूर 'ते' घर आणि बाहेर उभा असलेला यक्ष दिसला. "ऑल्द बेस्ट मुकी" स्वतःशीच त्याने हास्तांदोलन केले.

**

त्याच्या नाकात सिगारेटचा उग्र वास शिरला. ही सिगारेट इथली नाही हे त्याने ताडले. नकळतच, प्लॅस्टीकच्या निस्तेज डोळ्याने मंदपणा दाखवत तो सावधपणे बोलणे ऐकू लागला. त्याच्या आधीच आलेले दोघे आरामात बोलत होते.
"अरे इथून अँड्रोमिडाच्या दिशेने दोन आकाशगंगा पलिकडे, पण तिसर्‍या, जे.हब आकाशगंगे अलिकडेच एक छोटी ग्रहमालिका आहे गुलजार तिथे एक छोटासा ग्रह आहे, तिसरा. आता हे सगळे यूगलवर सापडणार नाही. पण मी तिथे जाऊन बघून आलो आहे. त्या ग्रहावर एक घर आहे, आणि तिथे बाहेर एक यक्ष. तो प्रश्न विचारतो. विचारलेल्या कुठल्याही ३ प्रश्नांची योग्य उत्तरे दिलीत तर त्या घरातले अशक्य संपत्ती तुमची. आणि कुठल्याही ३ प्रश्नांची अयोग्य उत्तरे दिलीत तर तुमचं नखही कुणाला दिसत नाही."
"मग हे तुला कसे कळले?"
"मी एका मित्राबरोबर जाउन आलोय. तो मित्र गेला ... म्हणजे गेलाच" बोटाने आकाश दाखवत पहिला म्हणाला.
त्याच्या अफाट संपत्ती मिळवण्याच्या आशेने जबर उचल खाल्ली. इथे ४ ४ तास पाणीदेखील न पिता रहावे लागते. निदान प्रयत्न तरी करू. झाले तर चांगलेच, नाहीतर हे अर्धा प्लॅस्टिकचा चेहेरा, डोळा लाऊन, उजवी बाजू लंगडवत जगायचे दिवस तरी जातील अशा विचारांनी त्याला उत्साह आला. आता ही बारमधली नोकरी सोडून दुसरी मिळावी यासाठी त्याने सरकारात अर्ज दिला. अर्जात मला कचरा व्यवस्थापना असे क्षेत्र त्याने निवडले की जेणेकरून अवकाशाशी संपर्क यावा. पण त्याच्या शारीरिक व्यंगामुळे ते कितपत जमेल याबद्दल तो साशंक होता.

**

आपले काहितरी हरवल्याचे जाणवून त्याला अतिशय खिन्नता आली. ती कुठे असेल हे त्याला शोधायचे होते. त्याने त्याचा छोटेखानी कंप्यूटर बाहेर काढला. मंगळावरच्या ह्या बबल अवकाश वसाहत क्र. १० मध्ये शाळा, घर, हॉस्पिटल, कार, सगळ्याला एक संगणकीय पत्ता [आय.पी] होता. कोण कुठून गेले हे पोलिसांना सहज शोधून काढता यावे यासाठी, एक स्पेशल ट्रॅकर लावला की तो आपला माग या पत्त्यांवर सोडायचा. तसा ट्रॅकर त्याने त्याच्या कचरा वर्गीकरण केंद्रावरच्या जॉबवरून मिळवला होता. पोलिसांना कल्पना येऊ नये म्हणून त्याची खूण [सिग्नेचर] बदलून मग तो ट्रॅकर तिच्या हातात असलेल्या अंगठीत अगदी बेमालूमपणे लपवला होता. कंप्यूटरवरती त्याने दोन मिनीटात माग काढला. ती तिच्या घरीच होती.त्याला हुश्श झाले. कुठे पब, शाळेत गेली तर तिच्या आजूबाजुला कोण असेल या विचाराने त्याचा जळफळाट व्हायचा, फार राग यायचा. आता फोन करायला हरकत नाही हा विचार भेटूनच येऊ की यात पटकन बदलला. कंप्यूटर वर अजून दोन चार गोष्टी करून तो उठला, दोन बिल्डींग पलिकडेच तिचे घर होते, तिकडे निघाला. तिच्या दारावर टकटक करताना, त्याच्या डोळ्यात हसू होते. दार उघडायला तीच आली होती. दार उघडताच तिच्या प्रश्नार्थक चेहेर्‍याकडे पहात तो घरात घुसला आणि खुर्चीवर बसला. "अरे अरे, कोण तू? घरात काय घुसतोस बाहेर हो..." ती त्वेषाने ओरडली. तिचा आवाज ऐकून आतमधून "काय झालं हनी" असं विचारत एक पुरूष आला. झालं, लगेच त्याचं डोकं सटकलं. त्याने दोन ढांगात तिचा गळा धरला, "असं का केलंस, माझं प्रेम नाकारलंस?". तो पर्यंत दुसरा पुरूष त्याच्याशी झटापट करू लागला. गळ्यावरचा जोर कमी झाला, तसा तिला घशातून आवाज काढायला श्वास घेता आला आणि जोरदार किंकाळी घुमली. उघड्या दारातून दोन शेजारी आले, तिघांविरुद्ध तो एकटा पडला. तिच्या घरातून पोलिसांना फोन लागेना, तसा शेजार्‍यानी त्याच्या घरातून लावला. त्यांचे लक्ष फोनवर गुंतले आहे असे बघून हिसका देऊन तो घरातून बाहेर पळाला.

**

विचित्रशा दुखण्याने त्याला जाग आली तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. त्याने दुखतेय असे सांगायचा प्रयत्न केला पण ना आवाज फुटला, ना हात हलला. नर्सचे लक्ष गेले तसे तिने डॉक्टरला बोलावले. डॉक्टरने जुजबी प्रश्न विचारले पण त्याला ते कळेना, आणि डॉक्टरला सांगताही येईना. त्याला अशक्तपणाने ग्लानी आली आणि तो निपचीत पडला. बर्‍याच काळाने जाग आली, तेव्हाही दुखणे होतेच. त्याने सांगायचा प्रयत्न केला, तसा आवाजही फुटला. पण पूर्ण वाक्ये न येता, काही शब्द आले. आणि तो परत पांढरे डगले धूसरसे बघत ग्लानीत गेला. किती तरी काळाने जाग आली, तेव्हा दुखत काही नव्हते. वाक्येही पूर्ण येत होती. आणि समोर पांढर्‍या कोटातील डॉक्टर आणि काळ्या ड्रेसमधले पोलिस होते. डॉक्टरांनी त्याला समजावले की त्यांनी त्याचे न आलेले अवयव कृत्रीमरित्या बसवले आहेत. ते सुरळीत होईपर्यंत वेळ जाईल तोवर त्याला बेडरेस्ट आहे. त्यांचे बोलणे संपते न संपते तोवर पोलिस पुढे सरसावला. कोण कुठला, कसा आलास, तिथेच कसा आलास? काय करत होतास. सगळ्याची उत्तरे एकच "माहित नाही". मग परत तेच प्रश्न, क्रम वेगळा. उत्तरही तेच. शेवटी डॉक्टरने जरबेने सांगितले की त्याची थोडी स्मरणवही, मेंदूतून गायब आहे. चेहेरा, डोळादेखील प्लॅस्टीकचा बसवला आहे. त्याला त्रास देऊ नका. हॉस्पिटलमध्ये त्याला नाव मिळाले किशोर मुकादम, उर्फ मुकी. याच नावाने मग त्याची रवानगी, एका महिन्याने, पुनर्वसनगृहात झाली. तिथे त्याला बारटेंडींगचे काम शिकता आले, आणि मग नोकरीपण लागली, ईंटरगॅल नावाच्या पबमध्ये.

**

"नमस्कार, मी यक्ष तुमचे येथे स्वागत करतो" काचेपलिकडच्या ओठातून आलेले शब्द त्याच्या मनात स्पष्ट उमटले.
"मी आपल्याला प्रश्न विचारणार आहे. त्याची तीन योग्य उत्तरे आपण दिलीत तर मी आपला नोकर, आणि मी राखण करतो ती सर्व संपत्ती आपली. पण जर तीन प्रश्नांचे अयोग्य उत्तर आले तर आपण इथून परत जाऊ शकणार नाही. आपले उत्तर आपल्या मनात आपल्या परवानगीनेच वाचू शकतो. ह्या अटी कबूल असतील तरच आपण पुढे जाऊ. अन्यथा येथून आपण परत फिरू शकता. ही आपली पहिली आणि शेवटची परत जाण्याची संधी आहे"
"ठीक आहे. मला कबूल आहे" तो धडधडत्या हृदयाने म्हणाला.
"मग करूया सुरूवात?"
"हो"
"भारताचे पंतप्रधान कोण?"
थिंकपॉडने उत्तर दिले "पं जवाहरलाल नेहेरू"
"पं. जवाहरलाल नेहेरू"
"तुमचे पहिले उत्तर अयोग्य आहे"
त्याच्या चेहेर्‍यावर राग, असहाय्यता दाटून आली. उत्तर बरोबरच आहे. असे कसे म्हणतो हा? पण इथे अपील करायला जागाच नव्हती.
"आता दुसरा प्रश्न. दुसर्‍या जागतिक महायुद्धात जर्मनीने वापरलेल्या एका गस्ती विमानाचे नाव सांग"
थिंकपॉडने उत्तर दिले "डीएफेस २२८"
धडधडत्या छातीने त्याने उत्तर दिले
"डीएफेस २२८"
"तुमचे दुसरे उत्तर अयोग्य आहे"
आता तर तो जाम चिडलाच. पण चिडून उपयोग नव्हता.
"आता पुढचा प्रश्न "पाणी कसे बनते?"
थिंकपॉडने उत्तर दिले
"घानाच्या जंगलात"
हे उत्तर चक्क चुकीचे होते. थिंकपॉडने नेमके १००००तले एक चुकीचे उत्तर आत्ताच दिले. तो कात्रीत पडला. काय करावे सुचेना. योग्य/अयोग्य काही कळत नव्हते. विचार पक्का झाला. या प्रश्नाचे उत्तर चुकले तर काय होईल ? आपण मरू. निदान या पंगू जगण्यातून प्लॅस्टीकच्या डोळ्यातून सुटका तरी होईल. नाही मिळाली संपत्ती, हरकत नाही.
त्याने उत्तर दिले
"घानाच्या जंगलात"
"तुमचे हे उत्तर योग्य आहे"
त्याला किल्ली सापडली होती. साधंच लॉजिक होतं, अयोग्य नाही ते योग्य. असंबद्ध बोलण्यासारखंच होतं हे.
"आता पुढचा प्रश्न. वाघाच्या पट्ट्यांचा रंग कुठला?"
"हिटलरच्या मिशा बारीक होत्या"
"तुमचे हे उत्तर योग्य आहे"
त्याला हुरूप आला.
"आता पुढचा प्रश्न. पृथ्वीवर पाणी किती टक्के आहे"
नेहेमी ९०% उत्तर दिले असते त्याने, पण आजची स्थिती वेगळी होती.
"बा बा ब्लॅकशिप हॅव यू एनी वूल"
"तुमचे हे उत्तर योग्य आहे. तुम्ही तिन्ही प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेली आहेत. मालक मी तुमचा दास आहे. आत असलेली संपत्ती तुमचीच आहे"
त्याला आता हर्षवायूच व्हायचा बाकी होता. घरातली संपत्ती बघून त्याचे डोळे दिपले. काय घेऊ काय नको असे झाले. एवढ्या सर्व संपत्तीचा मालक मी. फक्त आणि फक्त मी, मुकी उर्फ किशोर मुकादम, तुम्ही अब्जाब्जाधीश झालात !! या कल्पनेने त्याला उत्साहाचे भरते आले. जवळची पिशवी भरून घेता येतील तेवढे सोने, हिरे पाचू, माणके सगळे घेऊन तो निघाला. ती जड पिशवी हाताला दुखावत होती पण मनाला सुखावतही होती.

**

करकचून बांधलेल्या , दुखणार्‍या हातांकडे त्याची नजर गेली. समोर जज्जसाहेबांचा होलोग्राम निकाल ऐकवत होता. नोकरीचा दुरूपयोग करून जमा केलेली बरीच माया सापडली होती त्याच्या घरी. कंप्यूटरवरून त्याने केलेल्या नियमबाह्य गोष्टी, जीव घेण्याचा प्रयत्न या सगळ्यांमुळे त्याला तुरूगात पाठवायचे हे निश्चीत होते. १० वर्षे का २५ वर्षे ते ठरत नव्हते. शेवटी त्याच्या वकिलांनी, त्याची मनोवस्था असंतुलित असल्याने, त्याला ट्रीटमेंटची गरज आहे हा केलेला दावा, न्यायाधिशांनी मान्य करून १० वर्षे शिक्षा आणि त्यातले पहिले वर्ष मनोरुग्णालयात काढायचे अशी शिक्षा केली. तेव्हा त्याची नजर जमिनीवर खिळून होती. "मि. जाँटी मॅकेंझी तुम्हाला काही बोलायचे आहे का?" या जज्जसाहेबांच्या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देऊन त्याने शिक्षा मान्य असल्याचे सांगितले. पोलिस त्याला घेऊन निघाले तेव्हा तो पडला, पण परत त्याला उचलून त्यांनी ट्रांस्पोर्टलकडे नेले. त्यालाही तेच हवे होते. ट्रांस्पोर्टलमध्ये बंद केल्यावर, पोलिस कंट्रोलवर जाऊन परवानगीची मोहोर उमटवेपर्यंत, मगाशी पोलिसाच्या ड्रेसवरून तोडलेली एक छोटी धातूमय गोष्ट त्याने ट्रांस्पोर्टलच्या इंडिकेटर पॅनेलमध्ये एका विशिष्ट रितीने ठेवली. अभिनय तर असा केला की लोकांना वाटावे त्याला दु:ख झाले आहे. ट्रांस्पोर्टलचे काम सुरू झाले तेव्हा मोठा आवाज झाला, आता दरवाजा उघडेल हि त्याची आशा फोल ठरली आणि त्याचे एकएक अवयव दिसेनासे होऊ लागले. तो कुठे जातोय हे त्याला अज्ञात होते आणि पोलिसांनाही. त्या धातूमय गोष्टीने मात्र आपले काम चोख बजावले होते. त्याला परत स्वत्वाची जाणीव झाली तेव्हा तो एका वाळवंटात येऊन पडला होता.

**

जगात असतील त्या सगळ्या गोष्टी त्याला आता विकत घेता येणार होत्या. उंची दारू, कपडे यांपासून अतिशय दूरच्या प्रवासाची टोलेजंग आरामादायी याने यांपर्यंत काहीही. अक्षरशः काहिही. तो प्रचंडच खूष होता. आता त्याला ट्रीटमेंटसाठी सरकारच्या तुटपुंज्या पैशावर अवलंबून रहायची गरज नव्हती. प्लॅस्टीकचा चेहेरा, डोळे जाऊन तिथे त्याला त्वचारोपण, नेत्ररोपण करता येणार होते. उंची सिगार, मदिरा आणि मदिराक्षी यांच्या विचारानेच चेहेरा हरखला त्याचा.
"साहेब, येवढ्या संपत्तीचे आपण काय करणार? " यक्षाने विचारले
त्याने किंचितही विचार न करता, सोन्यावरची नजर न काढता, त्रासिकपणे सांगितले
"तुला काय करायचंय? नोकर आहेस तू माझा" .......
"हे आपले तिसरे अयोग्य उत्तर आहे" हे यक्षाचे शब्द मनात उमटले तशी त्याने नजर वर केली.तेव्हा यक्षाच्या मुकुटातला मणी चमकत होता.

**

त्या तेजाची लकेर अंतराळ पोशाखाची सुरक्षा काच भेदून आत शिरली. उजवा हात त्याने रिफ्लेक्स अ‍ॅक्शनने वर आणायला सुरूवात केली, पण दुसर्‍याच क्षणाला ते हेल्मेट, हातातली पिशवी आणि तो पांढरा स्पेससूट, वर केलेल्या उजव्या बाहीसकट खाली ढिगार्‍यात कोसळला.

** समाप्त **

प्रकार: 

खतर्‍या.. असाम्याने म्हटल्याप्रमाणे पॅरा वेगवेगळे कर (डॉट डॉट टाक फक्त एंटर मारायच्या ऐवजी.. म्हणजे पॅरा नीट दिसतात)..

(पल्प फिक्शन-मेमेंटो सप्ताह केलास की काय.. एकदम non-chronological कथा लिहिलीस ते)..

भन्नाट!

सगळीच समजली असं म्हणण्याचं धाडस करणार नाही, पण जे काही समजू शकलं, ते आवडलं.

(दोन घटनांच्यामध्ये एक चांदणी देण्यास अनुमोदन!)

रच्याकने, तुझी पहिलीच कथा आहे ही नंदन?

खुप छान लिहीलंय! Happy पहीलीच कथा वाटत नाही ब्वॉ... माबो वर पहीली असावी... पण मस्तच... पुढील कथेच्या प्रतिक्षेत.

हे रच्याकने काय प्रक्रण असतं बुवा? Uhoh

धन्यवाद लोकहो. ही मी लिहीलेली पहिलीच कथा. शाळेच्या वाचनालयात वाचलेल्या गोष्टीतला यक्षाचा प्रसंग मी इथे वापरला आणि त्या भोवती ही कथा बनली.

मरण्यापूर्वी आपल्याच आयुष्यातील घटना डोळ्यासमोरून सरकतात, आणि आपली मेमरी असोशिएटीव्ह आहे तर तो प्रवास दाखवायचा प्रयत्न केला आहे.

कथेला फिनिशिंग टचेस देण्यास मदत केल्याबद्दल लालू, पूनमवैनी आणि ट्यूलिपचे अनेक आभार Happy

नंद्या, यो. जा. चांदण्या टाकून आता नेटकी दिस्तेय. मुख्य म्हणजे कळली. Happy आवडली. कथाबीज तर मस्तच आहे, आणि छान खुलवली देखिल आहेस.

सलग, वेगवान फ्लो आहे कथेला. मस्त झालीय. सायबूतात्याचा पॅरा सुरुवातीला खटकला तसा पुन्हा वाचताना नाही वेगळा वाटला.

लगे रहो नंद्या. अजून येऊद्यात.

(ते सिग्नेचर, आयपी आणि असेच अर्थ कंसात टाकलेत ते कशाला?)

मस्त लिहिली आहेस. Fractured timeline नेहमीच इंटरेस्टिंग असते, पण तिला वापरण्याची आवश्यकता सिद्ध करावी लागते, जसे की इथे 'मरण्यापूर्वी डोळ्यांसमोर सरकणारे आयुष्य'. ते तू अचूक केल्याने न्याय मिळाला.
असले काही पडद्यावर बघायला मिळेल या अपेक्षेने इन्सेप्शन बघायला गेलो आणि तो फारच सरधोपट निघाला.