रानभाजी ११) तालिमखाना

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 July, 2010 - 02:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तालिमखानाची भाजी स्वच्छ धुवुन चिरुन
२ कांदे
४-५ लसूण पाकळ्या
२-३ मिरच्या
हिंग
हळद
पाव चमचा साखर
चविपुरते मिठ
पाव वाटी ओल खोबर किसुन

क्रमवार पाककृती: 

प्रथम कढईत तेलात लसणाची फोडणी द्यावी मग त्यातवर मिरची, हिंग, हळद घालून थोडे परतून चिरलेली तालिमखानाची भाजी घाला. वर झाकण ठेउन थोड्या वेळाने परता. आता त्यात मिठ व साखर घालून थोडावेळ वाफेवर ठेवा. मग त्यात ओल खोबर घालून थोड परतुन गॅस बंद करा.

अधिक टिपा: 

* कोणतीही रानभाजी ओळख पटल्याशिवाय घेउ नका.

ही तालिमखाना ओसाड जमिनीत येते. ही मोठी झाल्यावर ह्याला काटे येउन निळी फुले येतात. बर्‍याच जणांनी पाहीली असेल. मोठी होउन फुले आली की परत मी फोटो टाकेन.

ही भाजी अजुन विकायला आलेली पाहीली नाही. पण ही भाजी माझ्या माहेरी परंपरेप्रमाणे खातात. ही भाजी कंबरदुखीसाठी गुणकारी असते असे म्हणतात म्हणून माझी आई न चुकता ही भाजी दरवर्षी करते. आता मी पण करते.

ही भाजी पावसाळयाच्या सुरवातीलाच येते. म्हणजे जी जुनी झाड असतात त्याला बोके येतात आणि काही बिया रुजुन झुडपे आलेली असतात. पण ही कोवळी असतानाच काढायला लागते कारण नंतर त्याला काटे येतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला काटे कोरांटी माहितीये! अबोली कलर ची फुले येतात ती!
तिचाच दुसरा प्रकार निळी कोरांटीची फुले ही पाहिलीये....पण तीची भाजी करतात? Uhoh
की ही भाजीची वेगळी आहे?

कृती छान आहे, तुमच्याकडे जेवायला यायला पाहिजे वेगवेगळ्या भाज्या करता ज्या मला माहित ही नाही Happy

कोरांटीची फुलं लांबट आणि केशरट पिवळी असतात ना? आणि ते झाड तर शोभेला पण लावतात घराच्या आवारात.

जागू, ही वेगळी कोरांटी दिसतेय.

आर्या, अश्विनी ती कोरंटी केशरी फुलांची. ती वेगळी त्याचे पांढरेही फुल येते. आता मोठी होउन फुल आल्यावर टाकेन मी फोटो.
ह्याच्या बिया सब्जा सारख्या असतात. आमच्याकडे एक बाई त्याची पेज करायची.

हसरी कधी येताय ?

जागु,

मी कोरांटिचे बरेच प्रकार पाहिलेत (पिवळा, पांढरा, निळा वगैरे) माझ्या माहितिप्रमाणे सगळ्यांनाच काटे असतात (नक्कि आठवत नाहि आता). ह्यापैकि फक्त निळ्या कोरांटिचिच भाजि करतात का? त्याच कारण काय असाव?

जागू, हे असे दस्ताऐवजीकरण होणे खरेच गरजेचे आहे.
हि भाजी औषधी असते. पावसात या सर्व भाज्या खाव्यात असे म्हणतात.
या भाज्या विकायला आणणार्‍या बाईपैकी कुणाचीतरी जास्त ओळख वाढवून, त्यांच्या ज्ञानाचे संकलन होणे आवश्यक आहे. (अर्थात योग्य ते श्रेय देऊनच.)

पहिला एक गोष्ट म्हणजे वरील फोटो निट पाहा. ह्या कोरांटीला मोठे झाल्यावर जवळ जवळ १ इंचाचे मोठे टणक काटे येतात. तुम्ही जी सुंदर फुलांची झाडे समजताय त्याची पाने लंबगोलाकार असतात. हिवाळ्यापर्यंत ह्या झाडाला फुले येतील तेंव्हा मी परत फोटो टाकेन.

दिनेशदा धन्यवाद.
आहो त्या कातकरणी माझ्या आता ओळखिच्या झाल्या आहेत. खुप जणी असतात त्यामुळे मी जिच्याकडून भाजी घेते तिला मला नसलेल्या ज्ञानाबद्दल विचारते.

ओह्ह.. म्हणजे आम्ही जिला कोरांटी म्हणतो, जिला बिनवासाची पण अतिशय मोहक अशी फुले येतात ती आणि तु ज्याची भाजी करतेस ती कोरांटी वेगळी तर....

मी पाहिलेली कोरांटी रस्त्यावर वाढलेली होती. (मी शेवटची १०-१२ वर्षांपुर्वी पाहिली. हल्ली दिसलीच नाही कुठे) धुळीने माखलेल्या झाडाकडे लक्ष गेले तेव्हाच जेव्हा तिने सुंदर फुलांचा साज अंगावर चढवला..... आता तिची पाने कशी राहणार लक्षात.

तुझ्याकडे जर ती दुसरी फुलवाली कोराटी असेल तर तिचाही फोटो टाक इथे. म्हणजे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे कळेल.

दिनेश म्हणताहेत तसे द्स्ताऐवजीकरण होणे खरेच गरजेचे आहे. आज मला कोरांटी हे नाव माहित तरी आहे, उद्या नावही शिल्लक राहणार नाही... तु फोटोसकट माहिती टाकतेय म्हणुन संग्रह होतोय. ही माहिती उद्या कोणाला कशी उपयोगी पडेल सांगता येणार नाही...