पदरगड-भीमाशंकराचा द्वारपाल!

Submitted by चिन्मय कीर्तने on 8 June, 2010 - 05:54

उन्हाळा मस्त मी म्हणत होता, पण तुम्हाला माहीत असेलच, आपण गड-दुर्गांच्या धारकर्‍यांना घरी बसवेल तर शप्पथ!! शनिवार,रविवार आला की पाठीला लगेच पाठपिशवीचे भास व्हायला सुरुवात!!! तर मी अभियांत्रिकीचा विद्यार्थी आणि परिक्षा संपल्याने सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळण्यास मस्त वेळ मिळाला होता!! लगेच mumbaihikers.org पिंजुन काढायला सुरुवात झाली आणि समजले की "ट्रेकमेट्स" नावाचा ग्रूप येत्या रविवारी पदरगडावर जाणार आहे. गेल्यावर्षी मी पदरगड कोथळीगडावरुन न्याहाळला होताच! लगेच "मनसुबा" ठरला,चलो पदरगड!! मी लगेच ही "मसलत" माझा "सह्यमित्र" सलीलशी केली. तो सुद्धा एका पायावर तयार!! शनिवारी रात्री "शस्त्रसज्ज" होवुन दादर स्थानकावरुन मी,सलील आणि आणि आणखी दोन "डोंगरभाउ" कर्जत लोकलमधे बसलो.मग काय गप्पांना नुसता उत आला! आमचा सलील म्हणजे बोलण्याचे इंजिन आहे. ते एकदा धडाडत सुटले की प्रवास सुरु केव्हा होइल आणि संपेल केव्हा याचे भान राहणार नाही. कल्याण येईपर्यंत एक-एक "ट्रेकमेट" दाखल होवु लागला.कल्याणनंतर ड्ब्यात फ़क्त "ट्रेकमेट्स"! मग काय?? असा काही आम्ही डबा दणाणुन सोडला की केव्हा कर्जत आले ते समजलेच नाही.

कर्जतला लीडर्सनी(विक्रम सिंग आणि प्रीती पटेल) "टमटम" मागवल्या होत्या.त्यामधुन आम्ही ३०"ट्रेकमेट्स" पायथ्याच्या "खांडस"या गावी मार्गस्थ झालो.( मी रिक्शामधे मस्तपैकी एक झोप काढली. इतर आपल्या "सुरेल" आवाजाचे प्रदर्शन करत होते Happy ) गावातुन "गणेश घाटाच्या" मार्गाने आम्हाला भीमाशंकर आणि पदरगड यांमधील एका छोट्या पठारापर्यंत जायचे होते. ३.३० च्या सुमारास अंधारातच ओळखपरेड झाली आणि पाउले गणेश घाट आक्रमू लागली. सर्वत्र नीरव शांतता पसरली होती. चोहोबाजुंचे डोंगर जणू काही ध्यानस्थ बसले होते!
आकाशात पुनवेचा चंद्र आपल्या मायेच्या आणि शीतलतेच्या चांदण्याचा स्निग्ध वर्षाव आम्हावर करत होता! तो सुद्धा कधी ढगांच्या पांघरुणामधे दडुन बसायचा!! रातकिड्यांचे "पार्श्वसंगीत" होतेच!पावले चढावर होती आणि मन मात्र निसर्गाच्या या असीम "शांततेशी संवाद" साधत होत. मागुन साथीदारांचे हास्यकल्लोळ आणि कॅमेर्‍यांचे "क्लिकक्लिकाट" ऐकु येत होते!! अजिबात हवा नसल्यामुळे रात्री चढताना सुद्धा अंग घामाने ओलेचिंब झाले!वाटेत एका गणेशमंदीराभोवती दोन क्षण थांबुन पुन्हा मार्गक्रमणा सुरुवात केली. मग छोटे-छोटे टप्पे ओलांडत फ़टफ़टु लागेपर्यंत आम्ही पठारावर आलो सुद्धा! मस्त गार वारा सुटला होता. इथे आम्हाला विश्रांती घेण्याचा "हुकुम" आला! मग काय, काही लोक आपल्या मॅट्स अंथरुन निद्रादेवीची आराधना मोठ्या तन्मयतेने करु लागले!..:) मी "निशाचर" असल्यामुळे झोप लागणे शक्यच नव्ह्ते!!...:) एव्हाना पुर्वा उजळू लागली होती. वा काय द्रुश्य होते!! अजस्त्र भीमाशंकराच्या माथ्याला दाट धुक्याने वेढले होते! जणु काही त्याच्या जटाच! पदरगडाचा माथादेखिल धुक्याच्या बुरख्याआड होता. हळु हळु उजेड वाढु लागला, सुर्य भिमाशंकराच्या अजस्त्र भिंत्तीआडुन वर सरकत असल्याचे जाणवत होते.पोटातले कावळेसुद्धा एव्हाना जागे झाले होते! Happy "ट्रेकमेट्स" ने दिलेल्या इडली-चटणी आणि पुरणपोळ्यांचा फ़न्ना उडवला! हळुहळु निद्रेचे उपासक सर्व जागे झाले होते.....:) सुमारे ७ च्या सुमारास आमच्या दुसर्‍या टप्प्याच्या चढाईला सुरुवात झाली.आता आम्ही थेट पदरगडाला भिडणार होतो.

वाट मस्त दाट झाडीमधुन जात होती. दोन्ही हातांना "करवंदीच्या जाळींची" भरमार होती! त्यांचा यथेच्छ आस्वाद घेत,गप्पाटप्पा करत चढत होतो. एका झाडावर पदर असे कोरले होते आणि बाण दाखवला होता! आणि अकस्मात चढण अक्षरशः उभी झाली! त्या पाणलोटाच्या मार्गाने जाताना दोन हात, दोन पाय सर्वांचा वापर करावा लागत होता! आता "ट्रेकमेट्स" ची एक लांबच्या लांब रांग तयार झाली! काही ठिकाणी घसारा इतका होता कि चढताना इतरांचा आधार काही घेत होते. आधीच्यामुळे जर दगड-गोटे कोसळले तर "watch out" चे नारे घुमत होते!...:) असे चढता-चढता त्या सुप्रसिद्ध " चिमणी" पाशी आलो! " चिमणी क्लाईंब" हे पदरगडाचे खास आकर्षण! "चिमणी" म्हणजे दोन कातळभींतींमधील अत्यंत अरुंद अशी भेग किंवा घळ!
इथे जेमतेम एक माणूस एका वेळी जावु शकतो. विक्रम आधी पुढे गेला एखाद्या सराइताप्रमाणे ती चिमणी चढुन त्याने दोर खाली सोडला! आधी सर्वांच्या पाठपिशव्या वर चढवल्या! मग एक एक जण त्या चिमणीशी झोंबु लागला! दोन्ही बाजुंच्या कातळांमधील भेगा(holds) हेरुन पाय रुतवुन, प्रसंगी दोराच आधार घेत,वरुन विक्रमच्या सुचना follow करत ती " चिमणी" एखाद्या "घोरपडी"प्रमाणे पार करताना मजा आली! आता एक-एक करत ही चिमणी चढुन येइपर्यंत सर्वांना खुप वेळ लागणार होता! मग आम्ही पुढे निघालो.अजुन चढण मात्र संपली नव्ह्ती बर का!! खुप घसारा असलेले थोडे कातळटप्पे पार केल्यानंतर कुठे आम्ही माथा गाठला!

माथ्यावर दोन कातळात कोरलेल्या गुहा आहेत. निःसंशयपणे त्या शिवपूर्वकालीन आहेत.बहुधा यादव राजवटीकालीन असाव्यात. दोन सुकलेली पाण्याची टाकी आणि एक उध्वस्त चौथरा वगळता पदरगडावर किल्ल्याची कसलीच निशाणी नाही. सगळ काळाच्या खोल उदरात गेल आहे! माथ्यावर दोन बेलाग अश्या कातळभिंती आहेत. त्यावर आमची उत्साही वानरसेना rock climbing ची प्रात्यक्षिके दाखवत होती!! एका कातळभिंतीचा आकार थेट बुद्धिबळातील घोड्याच्या आकारासारखा होता!....:) चौफेर दिसणार्‍या सुंदर नजार्‍याचे वर्णन कसे करु???
दक्षिणेला कोथळीगडाचा कोथळा आम्हाला साद घालत होता तर उत्तरेला सिद्धगडाचा चौरंग खुणावत होता! पश्चिमेला पायतळी कोकण बसले होते. पुर्वेला तर भिमाशंकरची अजस्त्र कातळभिंत खडी ठाकली होती! काय ते अजस्त्र कडे!! काय त्या पाताळावेरी गेलेल्या खोल-खोल दर्‍या! ते भीमाशंकराचे घनदाट अरण्य पाहुन मला बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या उद्गारांची आठवण आली की :" एकवेळ हिडिंबेच्या केसातील उ सापडेल पण या रानात लपलेला हत्ती शोधण अशक्य!"

एव्हाना ११ वाजले होते. उन्हे डोक्यावर येवू लागली होती.मग आमचे दोन गट पाडले गेले. एक किल्यावरच आपली "पोटपूजा" करुन नंतर उतरणार होता आणि दुसरा आधी पठारापर्यंत उतरल्यानंतर पोटोबा शांत करणार होता.मी दुसर्‍या गटात होतॊ. उतरताना खरी मजा आली!! घसारायुक्त कातळटप्पे उतरून चिमणी पर्यंत उतरायचे होते. कातळ मनस्वी तापले होते.
पाउल तर स्थिरावत असेल वाटेवर तर शप्पथ! शेवटी कसातरी त्या चिमणी पर्यंत आलो. विक्रम आणि प्रीती मागेच लोकांना कातळटप्प्यांवरुन उतरवत शेवटी येणार होते,मग आम्ही ३-४ ट्रेकमेट्स पुढे झालो! ती "चिमणी" उतरताना माझा "पोपट" करेल की काय अशी एक धास्ती होती...!!:) पण दोराला लोंबकळत ती चिमणी आम्ही पार केली. मग होती मोठीच्या मोठी घसरगुंडी!! त्या "bumpy ride" वर एकमेकांना आधार देत आम्ही पठारापर्यंत उतरलो. मस्तपैकी आमच्या गटाने अरण्यभोजन उरकेपर्यंत दुसरा गट उतरुन आला होता!
ते इतके हावरट की गडावर खावुन परत आमच्यामधेसुद्धा त्यांचा "share" मागत होते!!...:) हे सर्व उरकेपर्यंत ३ वाजले. गणेश घाटाने उतरायचे की पाणी कमी असल्याने पदरवाडी गाव गाठून पाणी भरुन "शिडी घाटाने" ह्याचा निर्णय "लोकशाही" मार्गाने चक्क "voting" ने घेण्यात आला.!!!!......:)त्यात "शिडी घाटाचा" विजय झाला!

पदरवाडी गावापर्यंत जाईपर्यंत चालताना दोहोबाजुंना दाट झाडी होती त्यामुळे चालताना खुप मजा आली. पदरवाडी गाव म्हणजे ५-१० घरांचा समूह!! तेथील एका डबक्याच्या पाण्याने
तृप्त झालो. विक्रम आणि इतर लोक "लिंबु सरबत" बनवायच्या खटपटीला होते तोवर मी मस्त ताणुन दिली!! लिंबु सरबताचा आस्वाद घेउन "शिडी घाटाकडे" मार्गस्थ व्हायला ४.३० वाजले.आता सुरु झाला शिडी घाटाचा घळघळीत उतार! छोटे-छोटे कातळट्प्पे पार करत आणि तोंडाचे पट्टे चालवत उतरत होतो.या मार्गाचे आकर्षण म्हणजे ३ शिड्य़ा!! मला त्या उतरताना थेट माहुली आणि पेब किल्ल्यांची आठवण आली. त्यानंतर झाडी असलेला उतार गप्पाटप्पा करीत पार करण्यात चक्क रात्रीचे ८.१५ झाले कधी ते समजलेच नाही.
खांडस गावात पोहोचेपर्यंत आकाशात देवाघरचे दिवे लखलखु लागलेदेखिल! पाहतो तर काय गावात पुन्हा तेच टमटमवाले! त्यामधुन पुन्हा कर्जतकडे मार्गस्थ झालो! आता मात्र रात्रीच्या प्रवासातले "सुर" दास शांत होते!!...:) तर असा हा एक अतिशय सुंदर ट्रेकच्या रम्य आठवणी घेउन घरी आलो तो नव्या "मोहीमेचे" बेत आखतच!!

या ट्रेकचे फोटो पाहण्यासाठी ही लिंक पाहा:
http://picasaweb.google.com/chinu234/PADARGADWITHTREKMATES30thMAY2010#

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्यक्ष अनुभवलेलं शब्दांमधून जिवंत करण हे बिकट काम आहे. परंतु तू ते उत्तम रीतीने साध्य केलयस गड्या. हा लेख वाचून आता माझेही पाय लौकरच पदरगडाकडे पळतील.. मी त्यांना आवरतो.. तू पुढचा गड सर करून ये.

हा ट्रेक पावसाळ्यात करु शकतो का ? >> रोहित.. पावसात कठीण नि तितकेच धोक्याचे काम आहे.. कारण एक दोनतीन पॅच खुपच डेंजर आहेत असे ऐकुन आहे.. खासकरुन त्या चिमणी चा भाग..

चिन्मय.. जर "त्या" दिवशी मी व्यस्त नसलो असतो तर आपली भेट तिकडेच झाली असती.. बाकी मायबोलीवर अजुन एक ट्रेक मेट असल्याचे पाहुन आनंद झाला.. Proud

@ yo rocks!!

मी सुद्धा सर्व लेख वाचले आहेत अतिशय छान आहेत!!! खास करुन अलंग-मदन आणि कुलंग

धन्यवाद!!!! हा पहिलाच प्रयत्न!!!
पुढल्या वेळपासून फोटोसुद्धा येथेच डकवतो!!!...:)