वाईटाशी वाईट!!!!

Submitted by हर्ट on 16 May, 2010 - 05:38

प्रत्येकालाच मिळालेली वाईट वागणूक सहन होते असे नाही? वाईटांना धडे शिकवणे, त्यांना उलटून बोलणे, त्यांची तक्रार करणे, शाब्दीक मार देणे -- यापैकी कुठलीच वागणूक देणे प्रत्येकालाच जमते असे नाही. उदा - मला वाईटाशी कसे वागावे बोलावे हे कळत नाही. परिणाम मला त्याचा आणखीनच जास्त त्रास होतो. टाळता येत तेवढे मी त्या व्यक्तीला टाळतो पण रोजचं ज्या व्यक्तीशी संबंध येतो अशा व्यंक्तींशी कसे वागावे कळत नाही. तुमचे विचार तुमचे उपाय कदाचित मला उपयोगी पडतील आणि माझ्यासारख्या अनेकांना!!!!!!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज संबंध येत असेल ती व्यक्ती तुमच्या कार्यालयातली असेल तर वागणे अगदीच सोप्पे. कारण ती व्यक्ती ही काही तुमची जवळची नव्हे (कुटुंबियांपैकी नव्हे). तेव्हा जेवढ्यास तेवढे संबंध ठेवणे उत्तम. कारण अशी व्यक्ती तुमची कुणीच नसते.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला वडीलधार्‍या व्यक्तींकडून जी शिकवण मिळाली ती सांगतो. "आपल्याशी वाईट वागलेल्या प्रत्येकाला शिक्षा करण्याची जबाबदारी किंवा मक्ता तुला देवाने दिलेला नाही". ह्या शिकवणीचा मला अतिशय उपयोग झाला. कारण अशा प्रकारे वाईट वागलेल्या व्यक्तीला देवाने परस्पर शिक्षा दिली, मला काहीही करावं किंवा बोलावं न लागता.

अर्थात हे असे प्रत्येकाच्याच बाबतीत झाले असे नाही. आणि असा अनुभव प्रत्येकालाच यईल असं नाही.

तुम्ही यावर अधिक लिहिले तर त्यावर बोलणे सोपे होईल, कारण वरील लिखाण अपुरे वाटत आहे.

कारण अशा प्रकारे वाईट वागलेल्या व्यक्तीला देवाने परस्पर शिक्षा दिली, मला काहीही करावं किंवा बोलावं न लागता.>>> Happy

जो दुसर्‍यासाठी खड्डा खणतो, तोच त्यात पडतो हे नक्की! देर है पण अंधेर नही, हे नेहमीच खरे होते.

कधी कधी संयम सुटतो, पण शेवटी आपण सामान्य माणसेच!

मला ह्याबाबतीत २-३ ''मंत्र'' वाईटपणाच्या बाबतीत आपले डोके त्यातल्या त्यात ताळ्यावर ठेवायला उपयोगी पडतात. (तरीही कधी कधी पेशन्सची कसोटी लागते.)

१. As You Sow, So Shall You Reap.

2. Educate such people and then ignore them.

3. साम - दाम - दंड - भेद.

त्यातील दंडाचा भाग आजपर्यंत तरी कधी अनुसरावा लागलेला नाहीए. पण तो दंड त्या व्यक्तीला आपोआपच घडतो असा मात्र अनुभव आहे!

आमच्या वरच्या मजल्यावर राहणार्‍या लोकांनी आपल्या घरात सर्व फर्निचर अगदी किचन मधे ही घडीचे केले आहे. (फोल्डिंग) ते उलगडताना किंवा पुन्हा बंद करताना ते लोक प्रत्येक वेळी दाणकन पाडून टाकतात, किंवा सामान काढता ठेवताना वारंवार जोरजोरात सरकावतात, नारळ जमिनीवर आपटून फोडतात.माझे आई वडील (वय आता ७५,८०) आणि मी गेली १५ वर्षे हा त्रास सहन करीत आहोत. आवाज आला की वर भांडायला जाणे, फोन करणे, ओरडणे, सोसायटीला तक्रार करणे हे सर्व प्रकार वडिलांनी करून झाले. पण परिणाम शून्य. उलट तक्रार केली तर त्रास वाढला.(मी या काळात नोकरीमुळे घराबाहेर वा मुंबईबाहेर होतो आता घरीच आहे). मी यावर्षी पासून नवा उपाय शोधून काढला.
वरून आवाज आला, की खिडकीतून वा दार उघडून त्यांचे नाव घेऊन 'गॉड ब्लेस यू, कॅरी ऑन द गुड वर्क' असे जोरात ओरडायचे. रात्री ११-१२ वाजता झाले की सगळ्या शेजार्‍यांनाही ऐकू जाते(कोणी मधे पडत नाही वा बाहेर येत नाही ते सोडा). एकदा असे ओरडूनही अर्धा तास आवाज चालू राहिला, तेव्हा दुसर्‍या दिवशी सकाळी त्या घराची मालकीण कामावर जात असताना दारात उभे राहुन तिच्या कडे पाहून मी 'गॉड ब्लेस यू फॉर हॅरॅसिंग अस ; गॉड, प्लीज लेट हर हॅव अ गुड डे अ‍ॅट वर्क' असे म्हटले.' पुन्हाही असेच चालू ठेवले, रात्री उशिरा आवाज आला, तर दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांचा मुलगा(वय १५ वर्षे) शाळेत जाताना किंवा बाई कामाला जाताना खिडकीतून ओरडून असे करणे चालू ठेवले.(त्या घरातला पुरुष सहा महिने परदेशात तर सहा महिने घरी असतो) आता हा त्रास खूपच कमी झाला आहे, पण अधून मधून डोस द्यावा लागतो. मधे पोलिसात जायची धमकीही दिली.
हे सगळे करताना आपण खिडकीतून जोर्जोरात ओरडण्यासारखे अशोभनीय वर्तन करावे लागते, पण असे करताना माझी नाही तर त्यांची लाज जाते, असे मी मानतो.
तात्पर्य :१)कोणी आपल्याशी वाईट वागत असेल आणि तो त्रास टाळता येत नसेल तर शिंगावर घेतलेच पाहिजे.
२)दुसरा धडा, इतर कुणाला असा त्रास होत असेल तर आपण त्याच्या मागे उभे राहिले पाहिजे.
३) गांधीबाबांचा मार्ग आजही अनुसरणीय आहे.
कधी कधी देवाने दंड देण्याचे काम आपल्यालाही दिलेले असू शकेल. आठवा छत्रपती शिवाजीमहाराज .सद् रक्षणाय खलनिग्रहाय. शिवाजी राजे अवतरायची किंवा शेजारच्या घरात जन्म घेण्याची वाट पाहण्याऐवजी कधी कधी आपणही शिवाजी व्हावे. पण पहिली कृती संवादातून सुधरण्याची संधी देणे हेच असावे.

भरत, यावरून मला माझ्या आजोबांचा किस्सा आठवला. त्यांना वयाच्या ७५-८० व्या वर्षी असाच वरच्या मजल्यावर राहणार्‍यांचा खूप त्रास व्हायचा. वरच्या घरातले सर्व लोक दाणदाण पावले आपटत चालायचे, वेळी-अवेळी खलबत्त्यात कुटणे चालू असायचे, त्यांच्या खिडकीतून टाकलेले केसांचे गुंतवळ आजोबांनी खिडकीत हौसेने वाढवलेल्या तुळस व ओव्याच्या रोपांमध्ये अडकायचे, धाप्पकन वरच्या खिडकीतून एखादा पदार्थ खाली ओतला जायचा. एक ना दोन गोष्टी!

असे काही झाले की आजोबा बाहेर येऊन अक्षरशः सर्व इमारतीला ऐकू जाईल एवढ्या आवाजात ठणाणा करत असत. त्याचा त्या वरच्या मजल्यावर राहणार्‍या लोकांवर काहीही परिणाम दिसत नसे. पण आजोबांचे डोके मात्र नंतर जाम ठणकत असे. आजोबा निवर्तल्यानंतरही ते कुटुंब तसेच वागत राहिले. काहीही फरक नाही! Sad

अकु Sad

बहुतेक वेळा संभाषणा मुळे अर्धी कामे होतात. आता मला माहितच नसेल, माझ्या कुठल्या वागण्यामुळे तुला त्रास होतो आहे तर मला कळणार कसे. बोलायचा प्रयत्न करायचा.

मी जाणते पणी कधी कुणाला त्रास दिला नाही, तसेच सहनही नाही केला.

अर्थात जगात फार कमी लोकं असतात ज्यांना दुसर्‍याला त्रास देतांना एक असुरी आनंद होतो, अशांना दुर ठेवणे उत्तम.

बी, महत्वाचा विषय निवडलाय ...धन्यवाद !
माझ्या मते, आपली सहनशक्ती किती आहे, यावर आपण दुसरयांचा होणारा त्रास सहन करतो ,कसा करतो हे ठरवता येईल ...ही एक बाजु .
बरेचदा ऐकायला मिळतं ,की लोखंडाला घाव सहन केल्याशिवाय त्याचं सोनं होत नाही ...पण यासाठी काही लोकांचा विनाकारण त्रास नुसता सहन करायचा का ?
गांधीजींच्या 'अहिंसे'मध्ये तर तशी ताकद खुप आहे, पण तेवढी सहन करण्याची आपली तयारी असते का ?
मी अलिकडे उशीरा "गजनी" पाहिला(..पाहतच राहिलो होतो),
आणि "वेन्स्डे" ही पाहिला,की ते चुकीच आहे असंही वाटत नाही ...शेवटी हे कशाला म्हंटलय ..
शेरास ...सव्वाशेर
जशास ..तसे
ठोश्याला ठोसा ...
बदला हा घेतलाच पाहिजे ...
अन्यायाविरुद्ध आवाज हा उठवलाच पाहिजे ...
शेवटी माणुस काही मर्यादे पर्यंत सहन करतो,त्यानंतर मात्र तो कुणाचही ऐकणार नाही,काहीही करेल....ही मर्यादा मात्र प्रत्येकाची वेगळी असेल ,ती कशा-कशावर अवलंबुन आहे याविषयी कुणीतरी लिहावं ...
कारण अशा प्रकारे वाईट वागलेल्या व्यक्तीला देवाने परस्पर शिक्षा दिली, मला काहीही करावं किंवा बोलावं न लागता.
मंदार, हे ही काहीवेळा पटतं ...

अनिल७६, अगदी अनुमोदन

शिवाय समर्थांनी म्हणून ठेवलंच आहे की...
कधीतरी "खटासी असावे खट, उद्धटासी उद्धट' हे धोरण स्वीकारावच लागेल.

अरे पण याचा 'घर पहावे बांधुन' शी काय संबंध ?? मला वाटले काहीतरी बिल्डर नी फसवले आणि त्याला कसे वठणीवर आणले असे काही आहे की काय.

"अर्थात जगात फार कमी लोकं असतात ज्यांना दुसर्‍याला त्रास देतांना एक असुरी आनंद होतो, अशांना दुर ठेवणे उत्तम."

पण आपल्या वागण्याने दुसर्‍यांना त्रास होतो हे गावी नसणारी मंडळी पदोपदी भेटतात.
मोटारीचा किंवा मोटारबाइकचा हॉर्न वाजवून घरातील लोकांना खिडकीत बोलवणारे दर गृह्संस्थेत मिळतील. गळके कपडे खिडकीत सुकत घालणारे, झाडांच्या कुंड्यात घातलेले पाणी खाली वाहू देणारे उदा: द्यावी तितकी थोडी. सगळी माणसे पूर्णतः वाइट वा दुष्ट नसतील, पण बेजबाबदार, बेपर्वा मात्र बरीच असतात. आजकाल 'बोलणार्‍याचं तोंड दिसतं' किंवा कशाला कुणाच्या भानगडीत पडा, किंवा आम्हाला वेळ कुठेय असे म्हणून आपल्याला त्रास होत नाही असे भासवण्याचा कल आहे. कदाचित आपणही असे काही त्रासदायक वर्तन करीतच असू.

भरत,

'ग्रुपवर टिचकी मारली -- 'वाचकवर्ग' येतो. वाचकवर्गात - समाज असा विभाग नाही नाही. काल मी घर पहावे बांधून बाफ वाचला आणि त्यानंतर हा बाफ उघडला म्हणून 'घर पहावे बांधून' हाच ग्रुप दिसतो आहे.

नेमस्तक/प्रशासक/मदत समिति - तुम्ही मला मदत कराल का?

वाईट = जे आपल्याला नकोसे असते ते/ज्याने दु:ख किंवा यातना होतात ते.
वाईट शब्दाची सोपी व्याख्या आपण अगदी न विचार करता ठरवून टाकली आहे, पण दुसर्‍या बाजूने विचार करता तसं वर्तन करणार्‍याला ते 'योग्य' वाटत असतं म्हणूनच तो वागतो, त्यामुळे तो आपल्याला हवं तसं वागत नाही म्हणून तो वाईट?

सोसायटीत कचरा, हॉर्नचे आवाज, फर्निचरची हलवाहलव याने 'त्रास' होतो हे मान्य पण तसं करणारे 'वाईट' हे मला अयोग्य वाटतं. आणि हे मुद्दे फार छोटे आहेत असं वाटतं. क्रुरपणे आयुष्य हिरावणारे, कोवळ्या स्त्रियांवर आत्याचार करणारे लोक खरे वाईट. आपन तुलनेत चुकतोय का?

जशास तसे वागून आपण त्या माणसाला पुढची चाल करण्यास मोकळिक देतोय असं मला वाटतं. त्यामुळे त्याला हवं तसं वागु दे, शेवटी कंटाळून गप्प बसेल. कारण एकटा माणूस खेळ खेळायला लागला की पटकन बोर हा होतोच. शह द्यायला समोर कोणी असला की मग खेळाला रंगत येते. आपण ठरवायला हवं कोणता खेळ रंगवायचा आणि कोणता मध्येच सोडायचा ते.

त्यातूनही ठोशास ठोसा द्यावासा वाटला तर शब्दाचा मार द्यावा, समोरचा 'शहाणा' असेल तर ऐकेल, नसेल तर पहिले पाढे पंचावन्न, आणि आपले शब्द वाया.. इतकंच.

जशास तसे वागून आपण त्या माणसाला पुढची चाल करण्यास मोकळिक देतोय असं मला वाटतं. त्यामुळे त्याला हवं तसं वागु दे, शेवटी कंटाळून गप्प बसेल. कारण एकटा माणूस खेळ खेळायला लागला की पटकन बोर हा होतोच. शह द्यायला समोर कोणी असला की मग खेळाला रंगत येते. आपण ठरवायला हवं कोणता खेळ रंगवायचा आणि कोणता मध्येच सोडायचा ते. >>> पटलं, पण अनुकरण करणे मला तरी अत्यंत कठीण जातं. आपला स्वभाव म्हणजे रोकठोक आहे. जशास तसे बोलुन मोकळं होणे. त्यामुळे डोक्यात ताण साठून राहात नाही. व पुढचं काम करायला तणावरहीत मेंदु उपलब्ध असतो. कुणी आरे म्हटलं कि आपण कारे म्हणणा-या पैकी आहे मी.

"दुसर्‍या बाजूने विचार करता तसं वर्तन करणार्‍याला ते 'योग्य' वाटत असतं म्हणूनच तो वागतो, त्यामुळे तो आपल्याला हवं तसं वागत नाही म्हणून तो वाईट?"

आपल्या वर्तनाने दुसर्‍याला त्रास होतो हे कळून आणि तसे वागणे टाळणे सहज शक्य असताना न करणे हे वाईट नाही का? यामुळे लोकांच्या आरोग्यावर्(मानसिकच नाही तर शारीरिक ही )परिणाम होतो . शांततेचा म्हणूनही काही हक्क आहे. ऑस्ट्रेलियाच्या भारतीय दूतावासात ५ वर्षे बदलीनिमित्त काढुन आलेल्या एका मराठी बाईंनी आकाशवाणीवर बोलताना सांगितले की तिथे आपल्या घरात वजणार्‍या गाण्याचा आवाज जरी शेजारच्या घरात /अंगणात गेला तरी पोलिस बोलवता येतो आणि बोलवला जातो. अकारण हॉर्न वाजवणे हा प्रदूषण नियंत्रण आणि मोटार अधिनियम खाली दंडनीय अपराध आहे.
जोपर्यंत कुणी तुम्हाला हात किंवा शस्त्र घेऊन शारीरिक इजा पोचवत नाही तोवर तो वाईट नाही का?
"क्रुरपणे आयुष्य हिरावणारे, कोवळ्या स्त्रियांवर आत्याचार करणारे लोक खरे वाईट. आपन तुलनेत चुकतोय का?""
नाक्यावर उभे राहून किंवा येता जाता मुलींवर कमेंट्स करणार , त्यांना नखशिखांत न्याहाळणारे सुद्धा मग चांगलेच का?
चांगले आणि वाईट यातली सीमारेषा स्पष्ट असते, ती नजरा ओलांडली की ओलांडून खूप पुढे गेला यावर समोरच्याची प्रतिक्रिया बदलेल्(दुर्लक्ष करणे/सहन करणे किंवा विरोध करणे) पण म्हणून वाईट काही चांगले ठरणार नाही.

माझ्या मते वाईट म्हणजे ज्याने इतरांना शारीरिक, मानसिक, आर्थिक अपाय/ इजा होते ते.
हॉर्न जरूरीपेक्षा जास्त वाजविणे, खास करून शाळा - इस्पितळे इत्यादी एरियात वाजविणे, रात्री दहा नंतर लाऊडस्पीकर्स वरून मोठमोठ्याने गाणी बडविणे, रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणे, रात्री उशीरा रस्त्यावर मोठमोठ्या आवाजासहित क्रिकेट खेळणे, आपली गाडी इमारतीच्या प्रवेशद्वारात उभी करणे, लिफ्टचे दरवाजे उघडे टाकणे, कचरा खिडकीतून खाली फेकणे असे असंख्य प्रकार आजूबाजूला घडत असतात.

त्या त्या वेळेला (आपल्याला वेळ असला तर) त्या व्यक्तीस समज देणे, पुन्हा पुन्हा समज दिल्यावरही उपयोग होत नसेल तर मग अ‍ॅक्शन घेणे हा उपाय मलाही भावतो.

परंतु बघण्यात आले आहे की अशी ''अ‍ॅक्शन'' घेऊनही निगरगट्ट लोक सुधारत नाहीत. उलट आपल्यावर डूख धरतात. असा कांगावा करतात की त्यांना काही सांगणे महापाप वाटावे! अशा लोकांना युक्तीनेच सरळ करावे लागते.

बी - ईसापनीती मधल्या गोष्टी वाचा. त्यातुन तुम्हाला कदाचित काही चांगला उपाय सापडु शकेल. बाकी मला सुचतेय ते असे
१. तुमचे बळ (तुमच्या समस्येनुसार - शारीरीक / मानसिक / आर्थिक / जॉब मधिल पोझिशन / नातेवाईक असेल तर वय , नाते ई ) जर त्रास देणार्‍या व्यक्तीपेक्षा जास्त असेल आणि ती व्यक्ती कोण्त्याही परिस्थितीत तुमचे काहीही बिघडवु शकत नसेल , तर तिला उत्तम धडा शिकवा. इतका की परत तुम्हाला त्रास द्यायचे सोडाच पण तसा विचारही ती व्यक्ति मनात आणणार नाही.
२. तुमची बळ जर त्रास देणार्‍या व्यक्तीपेक्षा खुप कमी असेल आणि त्या व्यक्तीला धडा शिकवणे दुरच पण सुनावणे देखिल तुम्हाला शक्य नसेल तर युक्तिचा वापर करुन बघा. जसे की साप भी मर जाये और लाठी भी ना तुटे !
३. वरचे २ न्ही शक्य नसेल तर , साधारण पणे अशी त्रासिक माणसे जवळच्या सर्वानाच असा त्रास देत असतात. तेव्हा त्या व्यक्तिच्या त्रासाने पीडलेले तुमच्या सारखेच समदु:खी शोधुन काढा आणि एकत्रितपणे त्या व्यक्तिला समजावण्याचा , धडा शिकवण्याचा प्रयत्न करा.
४. किंवा तुम्हा दोघाना तुमची ओळखणारी कोणी अधिकारी व्यक्ति असल्यास तिला तुमची समस्या समजावुन द्या. व त्या व्यक्तीकरवी काही काम होते का बघा. 'सोनारानेच कान टोचलेले बरे' असे म्हण्तात ना .
५. यापैकी काहीच शक्य नसेल तर मात्र शक्य असल्यास त्य व्यक्तीला टाळाणे आणि तेही शक्य नसल्यास सहन करणे एव्हढाच पर्याय उरतो. त्यामुळे सहनच करायचे असेल तर स्वतःचे मनोबल वाढवुन त्याचा तुम्हाला कसा कमीत्कमी त्रास होईल ते बघा. नाहीतर पुल म्हण्तात तसे , शेजार्‍याचा रेडिओ ठणाणा करायला लागला की तो माझ्यासाठीच लावला आहे असे समजुन मी तो ऐकायला लागतो Happy

"हॉर्न जरूरीपेक्षा जास्त वाजविणे, खास करून शाळा - इस्पितळे इत्यादी एरियात वाजविणे, रात्री दहा नंतर लाऊडस्पीकर्स वरून मोठमोठ्याने गाणी बडविणे, रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणे, रात्री उशीरा रस्त्यावर मोठमोठ्या आवाजासहित क्रिकेट खेळणे" - रात्री उशीराच का सोसायटीच्या आवारात कुणी खेळावे यावरही नियम आहेत, सोसायटीत राहणारी १२ वर्षापर्यंतची मुले.
या सर्व गोष्टीत पोलिसांची मदत घेता येते. अज्ञान मुले असे नियमबाह्य वर्तन करीत असतील तर त्याला त्यांचे पालक जबाबदार असतात.

आम्ही पुण्यात कोथरूडला रहायला आल्यानंतर आमच्या खिडकीच्या दोन काचा फुटलेल्या दिसल्या. आणखी दोन माझ्यासमोर फुटल्या. कारण अर्थातच क्रिकेट व फुटबॉल वीर. बरंच समजावून झालं की अरे इथे खेळू नका, काचा फुटतात. मग ओरडूनही झालं. हा प्रकार दीड वर्ष सुरु होता. पोरं नेहेमी उद्धटासारखी उत्तरे देत. एकदा खिडकीला फुटबॉल लागताच मी ताब्यात घेऊन फोडला आणि अवशेष त्यांच्याकडे फेकले. शेवटचं भांडण झालं तेव्हा एक निर्ल्लज्ज वाक्य ऐकावं लागलं "काचाच फुटताहेत ना". जणू फुटल्यावर फुलं बाहेर पडणार होती त्यातून!! मी मग रुद्रावतार धारण केला. त्या वेळी माझा आवाज इतका प्रचंड चढला होता, आठवलं की मलाच आश्चर्य वाटतं. शेवटी मी फुटबॉल ताब्यात घेतला आणि सरळ पोलीस स्टेशन गाठलं. पण आत जाण्याआधीच घरून फोन आला की पोरांनी न खेळण्याचं कबूल केलंय. परत येऊन बॉल परत केला आणि शेवटची ताकीद दिली. तेव्हापासून आमच्या खिडक्यांजवळ खेळ होत नाही.

आमच्या रस्त्यावर शनिवार रविवारी दुपारभर वय वर्ष १० ते वय वर्ष ५० असे सगळे क्रिकेट खेळत असतात. रस्त्यावर २ मिनिटं कोणी उभं असेल, रिक्षा थांबवली असेल की झालीच यांची दमदाटी सुरू. परत विकेंडच तर मिळतो खेळायला ही मखलाशी. आमच्या दुसर्‍या मजल्यावरच्या घरात यांचे क्रिकेटचे शॉट येतात.
एकदा बॉल आला तेव्हा मी दिला. तर रोजच यायला लागला. मग देणं बंद केलं. बोंब्ला काय बोंबलायचंय ते.
आम्ही भाड्याच्या घरात रहातो, सगळ्या मोठ्या मोठ्या काचेच्या खिडक्या आहेत. सगळ्या रिप्लेस करताना जेवढा खर्च येईल तेवढं डिपॉझिट ठेवा आणि मग बॉल घेऊन जा असं सांगितल्यावर. त्या पोराचा तिथेच खेळणारा बाप माझ्याशी भांडायला आला. मग त्याला वॉचमनकरवी हाकलून दिला आणि पोलिस कंप्लेंट करण्याची धमकी दिली.
कुणाला हवे असल्यास माझ्याकडे अर्धा डझन टेनिस बॉल जमलेले आहेत. Happy

चुकीच्या गोष्टी सहन न करण्याच्या बाबतीत मला माझ्या आईचा आदर्श घ्यावासा वाटतो, पण अजून तसे, तिच्यासारखे वागायला जमत नाही. ती लोकांचे जेवढे प्रेमाने, अगत्याने, आपुलकीने करते तेवढेच वेळप्रसंगी त्यांना सुनवायला, त्यांच्याकडून चुकीची दुरुस्ती करून घ्यायला मागेपुढे पाहत नाही. ह्या बाबतीत तिला तिचा ठेवणीतला, करडा आवाज खूप उपयोगी पडतो. अगदी चुकार वॉचमन, सारखे खाडे करणारी मोलकरीण, बिल्डिंगच्या दारात व पायर्‍यांवर आपल्या दुकानातला कचरा लोटणारा खालच्या मजल्यावरचा मारवाडी, अवाजवी भाडे आकारणारा रिक्षावाला, लिफ्टचे दरवाजे उघडे टाकणारी बिल्डिंगमधील मुले, सोसायटीचा मेन्टेनन्स चुकविणारे शेजारी....
सर्वांना ती फार मस्त दमात घेते. तिचा रुद्रावतार असा भारी असतो की चूक करणाराच घाबरतो. ती वेळप्रसंगी आरडाओरडा करायला, गर्दी जमवायला, आवाज चढवायला अजिबात घाबरत नाही. पण ते कारण संपले की तिची गैरमर्जीही संपते. ते भांडण ती पुढे रेटत नाही. उलट अनेकदा त्या व्यक्तीला प्रेमाने जिंकते.
मला अजूनही असे वागणे जमत नाही. Uhoh पण तिच्यासारखी हिंमत दाखवायचा प्रयत्न जरूर करते!

ह्म्म..
१. आमच्या घराच्या इथे (बावधन) मराठा मंडळ आहे.. लग्नं असली की रात्री बाराला फटाक्यांच्या माळा फोडतात... लोकांना सेन्स नावाची गोष्टच नाहीये असं वाटतं मला..
२. सकाळी सकाळी हास्यक्लबाच्या नावाखाली सोसायटीत बिल्डिंगखाली हसणारी माणसं (मोठ्ठा ग्रुप आहे चांगला Sad )
३. एका दिवाळीत चुकून बेडरूम ची खिडकी उघडी राहिली.. घर सातव्या मजल्यावर.. बाण घरात घुसला आणि पडदा जळायला लागला.. Sad नशीब आम्ही घरी होतो आणि वास येतोय हे लगेचच सेन्स केलं.. नाहीतर काय झालं असतं, विचार करववत नाही.. (पुन्हा एकदा सोसायटीत बिल्डिंगच्या खाली फटाके फोडणारी माणसं (चिडचिड))
४. घराच्या इथेच बावधन गाव आहे.. कुठल्यातरी एका महिन्यात दररोज रात्रभर लाऊडस्पीकरवर घाणेरड्या आवाजात भजनं म्हणतात.. देवाला लाऊडस्पीकर शिवाय ऐकू जात नाही ही समजूत कुठून रुजली देव जाणे! मोअरओव्हर त्यांचा आवाज, भजनं म्हणण्याची पद्धत आणि लाऊडस्पीकर ह्या कारणानं देव असला तरी त्या काळाकरता त्या देवळातून पळून जात असेल ह्याची खात्री वाटते मला!

Pages