इथला पसंतीचा दर्शनसमय सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणताही आहे. मोबाईल फोनचित्रकास प्रकाशचित्रण शुल्कही नाही, इतर स्थिर आणि चल-चित्रकांस मात्र ते लागू आहे. जवळचे रेल्वेस्थानक हावरा आहे तर जवळचे मेट्रो स्थानक एस्प्लनेड. इथे श्यामबाजार, राजाबाजार आणि धरमतल पासून ६१, ६१अ, ६२ या सीटीसीच्या बसेसमधून पोहोचता येते. बघायला किमान ४५ मिनिटे वेळ तरी हवाच. वनस्पतीशास्त्रातील अभ्यासकांना मात्र कितीही वेळ असला तरी पुरेसा ठरेल अशी खात्री देता येणार नाही.
ईस्ट इंडिया कंपनीने लेफ्टनंट कर्नल रॉबर्ट यांना, इंग्रज अधिकार्यां करता निसर्गाच्या सान्निध्यात विहाराचे स्थान निर्माण करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ६ जुलै १७८६ रोजी हे काम पूर्णत्वास नेले. तेव्हाच आशियातील या सर्वात मोठ्या वनस्पती उद्यानाचा जन्म झाला. मग चहासारख्या नकदी पिकाचा इथे चीनमधून प्रवेश झाला. पुढे इथूनच चहा दार्जिलिंग आणि आसामात गेला. आज चहा भारतभर चवीने चाखला जातो. कलकत्त्यातील हुगळी नदीच्या किनार्या वरील या उद्यानात "विशाल वट" नावाने विख्यात असलेला जगातील सर्वात विस्तीर्ण छत्रछाया असलेला प्रचंड वड उभा आहे.
तो अंदाजे २०० ते २५० वर्षे वयाचा असावा. त्याच्या मूळ खोडाची परिमिती १.७ मीटर होती आणि जमिनीपासूनची उंची १५.७ मीटर होती. १८८४ आणि १८८६ सालच्या वादळांमधे त्याच्या प्रमुख फांद्या क्षतिग्रस्त होऊन त्यास बुरशी लागली. १९२५ साली वीज पडून या वृक्षाचा मध्यभाग जळाला, कीडग्रस्त झाला, म्हणून इतर भाग वाचवण्याकरता तो कापून टाकण्यात आला. या घटनेपूर्वी विशालवट, वरील प्रकाशचित्रात दिसत आहे तसाच दिसत असे.
त्यानंतर तो एखादा वृक्ष भासण्याऐवजी वृक्षवसाहतीच्या स्वरूपात राहू लागला. त्याच्या परिमितीवर एक ३३० मीटर लांबीचा डांबरी रस्ता बनवण्यात आला. मात्र वृक्ष त्याच्या बाहेरही विस्तार पावतच आहे. आज त्याची छत्रछाया १४,५०० वर्ग मीटर किंवा १.५ हेक्टर अथवा ४ एकर इतकी विशाल आहे. आज त्याची परिमिती १ किलोमीटर इतकी असून सर्वात उंच फांदी २५ मीटर उंच आहे. त्यास, आज २,८८० अंतरिक्ष मुळे (पारंब्या) आहेत, जी जमिनीपर्यंत पोहोचलेली आहेत.
गेल्या दोनशे वर्षांपासून हे उद्यान, दक्षिण आशियातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे वनस्पती उद्यान, तसेच वनस्पती आणि उपवन संशोधनातील भारतातील प्रमुख संस्था राहिलेले आहे.
येथील प्रेक्षणीयता आणि सुंदरता, तसेच हिरवळ; जगभरातून वर्षभर येत राहणार्या लाखो पर्यटकांकरता प्रशिक्षण, संशोधन आणि विहारार्थ एक प्रेरणास्त्रोतच बनून राहिलेली आहे. हुगळी (गंगा) नदीच्या पश्चिम तीरावरील २७३ एकर जागेत हे पसरलेले आहे. १८७२ मधे सर जॉर्ज किंग यांनी संकल्पित केलेले हे उद्यान कृत्रिम तळी आणि भूमिगत नलिकांनी जोडलेल्या जलाशयांमुळे जगभरातील सर्वोत्तम वनस्पती उद्यान मानले जाते. पूर्वी यास ईस्ट इंडिया कंपनीचे उद्यान किंवा "कंपनी-बागान" म्हणत, पुढे कलकत्ता-उद्यान म्हणू लागले, मग याचेच नामकरण रॉयल-वनस्पती-उद्यान असे करण्यात आले, स्वातंत्र्योत्तर काळात १९५० मधे यास भारतीय-वनस्पती-उद्यान नाव दिले गेले. १ जानेवारी १९६३ पासून ते भारतीय वनस्पती सर्वेक्षण या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली कार्यरत आहे.
येथे १,४०० जातींची १२,००० झाडेझुडुपे, शिवाय हजारो औषधी वनस्पती यांची खुल्या २५ विभागांत, हरितगृहांत आणि संधारणागृहांत लागवड करण्यात येते. ही बाग; बांबू, बोगनवेली, संत्रलिंबूवर्गातील झाडे, मोगरा, पाणवनस्पती, कमळे आणि नारळाच्या १०९ जातीच्या संग्रहार्थ विख्यात आहे. हा संग्रह दक्षिण आशियातील सर्वात मोठा संग्रह मानला जातो. याशिवाय जास्वंदे, सुगंधी वनस्पती, वेली, सावलीतील वनस्पती, फुलझाडे आणि इतर वनस्पती इथे सांभाळल्या जातात. औषधी वनस्पतींच्या विभागास "चरक उद्यान" असे नाव आहे. या बागेतील नाव घेण्याजोग्या वनस्पती म्हणजे फांद्यांचा नारळ, ब्रेडफ्रूट ट्री, दुहेरी नारळ, भव्य कमळे, शिवलिंग वृक्ष इत्यादी आहेत. याव्यतिरिक्त इथे वनस्पतींची ओळख, गुणन, औषधी उपयोग आणि संधारण याबाबतीत संशोधनही केले जाते.
आम्ही हाजरारोडवरच्या महाराष्ट्रनिवासात उतरलेलो असल्याने तिथपासून भारतीय-वनस्पती-उद्यानात जाणे, तासभर थांबणे आणि परत येणे याकरता रुपये ५०० देऊन पाच जणांकरता एक टॅक्सी करून गेलेलो होतो. दुपारी १२ च्या सुमारास तिथल्या एका दरवाजाशी पोहोचलो. मात्र टॅक्सीचालकाने त्या दरवाजाशी पार्किंगची व्यवस्था नसल्याने मुख्य दरवाजापर्यंत नेले. याकरता आणखी दहा मिनिटांचा तरी अतिरिक्त वळसा पडला. तिथे पोहोचलो. कॅमेर्यांची तिकिटे काढली आणि अपुराच वेळ हाताशी असल्याने झपाट्याने विशालवटाकडे कूच करू लागलो. मार्गात जागोजागी दिशादर्शक पाट्या होत्या. तरीही १० मिनिटे झाली, पंधरा मिनिटे झाली, ३० मिनिटे झाली आम्ही आपले चालतोच आहोत. विशालवट तर नजरेच्या टप्प्यातही दिसत नव्हता.
एवढा थोर जगप्रसिद्ध वृक्ष, पण त्यास ’कुठे बरं शोधावा’ अशा चिंतेत पडलेले आम्ही, अशी काहीशी विपर्यस्त स्थिती निर्माण झालेली होती. तेवढ्यात काही शब्द मराठीत बोललेले ऐकू आले. मग त्यांनाच विचारले ’काहो हा विशालवट कुठे आहे?’ ते म्हणाले, “अहो, आम्हाला काय विचारता, आम्ही पण गेल्या पंधरा मिनिटांपासून त्याच्याच तर शोधात आहोत.” दरम्यान आम्हाला विलोभनीय तळी आणि विस्तीर्ण बागा बघायला मिळाल्या.
या सार्या वनाउपवनांचा काय फायदा, हे सांगणारा सुंदरलाल बहुगुणां यांचा एक नाराही दिसला. त्यात म्हटले होते की:
क्या है जंगल के उपकार?
मिट्टी, पानी और बयार ।
मिट्टी, पानी और बयार,
जिन्दा रहने के आधार॥
बयार म्हणजे हवा. ती सुद्धा आपल्याला जंगलांचीच भेट असते. तेव्हा जंगले ही हवीतच. असा मनोमन पटणारा हा संदेश आम्ही मनात रुजवला.
अशाप्रकारे सुमारे ४५ मिनिटे चालल्यावर अचानकच तो दिसला. सकृतदर्शनी भव्य वाटावे असे त्यात खरोखरच काही दिसले नाही. मात्र उपलब्ध माहितीनुरूपच तो विशाल होता. ३३० मीटर परिमितीच्या वर्तुळाकार डांबरी सडकेने वेष्टीत होता. जेव्हा आम्ही त्या रस्त्यावरून जाऊ लागलो तेव्हा त्याच्या विस्ताराची पुरेशी कल्पना येऊ लागली. सडकेच्या वर्तुळाबाहेरही शाखा वाढून, त्याबाहेरही पारंब्यांनी धरलेली मुळे जागोजाग खोडात रुपांतरित झालेली दिसत होती. एखाद्या थोर व्यक्तीला भेटतांना मन भरून यावे तसेच माझे मन त्या विशालवटास भेट देत असता भरून आले होते.
परतताना पुन्हा ४५ मिनिटांची पदयात्रा करण्याची उमेद आणि वेळ आमच्याकडे नव्हता. तेवढ्यात एक सायकल रिक्षा बागेत दिसला. सारेच पर्यटक तो आपल्याला मिळेल का या दृष्टीने चाचपणी करू लागले. त्याने कुणालाच आत घेतले नाही. मात्र जवळच बागेचे एक दुसरे दार असल्याचा महत्त्वपूर्ण शोध लागला. त्या दाराचे नाव स्थानिक भाषेत “बोकुलताल बायसेंटेनरी गेट” म्हणजेच मराठीत “बकुळ-तळ्या-जवळील द्विशताब्दीस्मारक दरवाजा”. या दरवाजासमोरच पेट्रोलपंप असल्याची खूणही समजली. अक्षरशः ५ मिनिटांतच आम्ही तिथवर पोहोचलोसुद्धा. मग लक्षात आले की आम्ही इथूनच तर गेलो होतो सुरवातीला. आता तर तिथे वाहनेही उभी दिसत होती. आम्ही वाहनचालकास तिथे बोलावून घेतले आणि आमच्या भारतीय-वनस्पती-उद्यानाच्या फेरफटक्याचे समापन केले.
या सार्यातून बोध घ्यायचा तो असा, की ज्या पर्यटकास संपूर्ण भारतीय-वनस्पती-उद्यानात रुची असण्यापेक्षा, विशालवटाचे दर्शन उण्यापुर्या तासाभरात उरकायचे असेल, त्याने “बोकुलताल बायसेंटेनरी गेट” वरच उतरून दर्शन घ्यावे. दुसरे असे की, आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी असा तो महाकाय वृक्ष आहे. अशा या महावृक्षाची वाढही या इथेच शक्य आहे. केवळ गंगेच्या मुखाजवळच्या म्हणजेच हुगळीच्या किनार्यावर. कलकत्त्यास. म्हणूनच धन्य तो विशालवट. धन्य हुगळीतीर. आणि धन्य कोलकाता.
अशा रीतीने आमच्या सिक्कीम सहलीची ही साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होत आहे. आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल.
.
या मालिकेतील इतर लेख खालील दुव्यांवर सापडतील.
सिक्कीम सहल-१: पूर्वतयारी http://www.maayboli.com/node/15650
सिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन http://www.maayboli.com/node/15651
सिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन http://www.maayboli.com/node/15652
सिक्कीम सहल-४: चहाचे मळे http://www.maayboli.com/node/15653
सिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था http://www.maayboli.com/node/15654
सिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन http://www.maayboli.com/node/15670
सिक्कीम सहल-७: बनझांकरी धबधबा http://www.maayboli.com/node/15678
सिक्कीम सहल-८: ऐकत्या कानांची खिंड http://www.maayboli.com/node/15686
सिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जल पैगुडी प्रवास http://www.maayboli.com/node/15687
सिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान http://www.maayboli.com/node/15688
http://nvgole.blogspot.com/
या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
मस्त. मध्यंतरी पुण्यात तवांग
मस्त. मध्यंतरी पुण्यात तवांग वरच्या पारदर्शिका (स्लाईड शो) पाहिल्या होत्या. त्यांची आठवण झाली.
धन्यवाद सुस्मिता!
धन्यवाद सुस्मिता!