रांका बुद्धमठ अतिशय भव्य आहे. सोबत विस्तृत ओवर्यांचे निवासी संकुलही आहे. मठाच्या मुख्य दालनात शेकडो विद्यार्थ्यांच्या उभ्या-आडव्या ओळींतून बसण्याची सुरेख आसनव्यवस्था आहे. दोन्ही बाजूस पुरूषभर उंचीचे आडवे ढोल ठेवलेले आहेत. बुद्धमूर्ती तसेच गुरू पद्मसंभव (गौतम बुद्धाचे परम शिष्य, ज्यांनी तिबेटमधे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला.) म्हणजेच रिंपोचे यांची मूर्तीही, सुवर्णवर्णी असून समोर दिवे उजळलेले असतात. अतिशय स्वच्छ, टापटीपीचे आणि पवित्र वातावरण इथे निर्माण केलेले आहे. मठाच्या आवारात अनेक फिरते दंडगोल भिंतीलगत लावलेले आहेत. पुण्यसंचयाकरता, गुरू पद्मसंभव यांचे नामस्मरण करून ते फिरवावेत अशी प्रथा आहे. गुरू पद्मसंभव यांची एक गोष्टही दरम्यान माहीत झाली. ती अशी.
गुरू पद्मसंभव, ल्हासा (तत्कालीन तिबेटची राजधानी) इथे जात असता उत्तर सिक्कीम जिल्यातील तिस्ता नदीच्या मुळाशी एक सरोवर होते, तिथवर पोहोचले. ते सरोवर त्या काळी वर्षाचे बाराही महिने कायमच गोठलेले असे. स्थानिक लोकांनी पद्मसंभव यांना आपली ही व्यथा सांगितली, की जवळच पाण्याचा इतका प्रचंड साठा असूनही पिण्याला पाणी मिळत नाही. त्यावर पद्मसंभव यांनी सरोवरास चरणस्पर्श केला. आणि काय आश्चर्य, त्या सरोवराचे वितळून, पाण्यात रुपांतर झाले. त्यानंतर ते सरोवर कधीही, अगदी हिवाळ्यातही, गोठेनासे झाले. त्या सरोवरास गुरू पद्मसंभव यांचे नावावरूनच हल्ली ’गुरूडोंगमार’ म्हणतात. नामची ही दक्षिण सिक्कीमची राजधानी आहे. भुतिया भाषेत "नाम" म्हणजे "आकाश" आणि "ची" म्हणजे "उंच". म्हणून नामची म्हणजे "उंच आकाश". नामची येथे सिक्कीमचे तारणहार रिंपोचे, यांची ३६ मीटर (१२० फूट) उंचीची जगातील सर्वात भव्य मूर्ती आहे. गुरूडोंगमार अथवा नामची या दोन्हीही ठिकाणी आम्ही गेलेलो नाही. मात्र, गुरू पद्मसंभव यांच्या उचित उल्लेखाविना सिक्कीम सहलीचे वर्णन संपन्न होणार नाही म्हणून हे लिहीत आहे. गुरू पद्मसंभव यांचे हे चित्रही महाजालावरूनच साभार घेतले आहे.
सिक्कीम सरकारने निर्माण केलेला बनझांकरी (म्हणजे शुद्ध मराठीत वनाची झलक दाखवणारा) कृत्रिम धबधबा आणि सोबतचे सर्वच उद्यान सौर ऊर्जेवर संचालित आहे. इथे ऊर्जेच्या सर्वच स्वरूपांची, त्यांच्यातील परस्पर विनिमयांची आणि तत्संबंधी अनेक विषयांची माहिती, शालेय मुलांना नीट समजून घेता येईल अशा प्रात्यक्षिकांद्वारे व्यवस्थित उलगडून दाखवलेली आहे. मनोरंजक प्रयोगांद्वारे, खेळण्यांद्वारे विविध प्रकारच्या ऊर्जांतरणांची माहिती उद्बोधक रीतीने उघडपणे मांडून दाखवलेली आहे.
उदाहरणार्थ वरील चित्रातील घसरगुंडी पाहा. तिच्या घसरत्या भागावर एक फिरता पट्टा बसवलेला असून, तो पुढल्या भागाच्या तळाकडून पाठीमागे शिडीच्या सर्वोच्च भागाखालून पुन्हा वर पोहोचतो. आपण घसरू लागलो की पट्टा फिरू लागतो. पट्टा बारकेसे ऊर्जानिर्मिती संयंत्र चालवतो. त्यात निर्माण होणारी विद्युत-ऊर्जा एक ध्वनीफीत चालवते, ज्यामुळे आपल्याला संगीत ऐकू येऊ लागते. दुसर्या चित्राततील आडव्या डब्यात पिवळ्या खांबांकडे तोंड करून त्या दोन खांबांच्यामधे डब्यात उभे राहायचे. मग पुढे चालत जाण्याचा प्रयत्न केला की सगळा डबाच घड्याळाच्या दिशेने गतीमान होतो. त्या चक्राकार गतीचाच उपयोग विद्युत-ऊर्जा निर्मितीकरता करून घेतलेला आहे. त्या ऊर्जेवर मग संगीत ऐकू येऊ लागते. माणसाच्या ऊरातून निर्माण होणारे चैतन्य (ऊर+जा=ऊर्जा) प्रथम यांत्रिकी हालचालीत, मग विद्युत-ऊर्जेत आणि तत्पश्चात ध्वनीरूपात आपल्याला संगीत ऐकवू लागते तेव्हा आपल्या (पक्षी, मुलांच्या) ऊर्जाविषयक जाणीवा किती झपाट्याने समृद्ध होत जातात ते तिथे प्रत्यक्षच अनुभवायला मिळाले म्हणून एरव्ही अविश्वसनीयच वाटले असते. इनक्रेडिबल इंडिया!
नंतर आम्ही गान्तोक रज्जूमार्गावरून शहराचे विहंगम दृश्य पाहण्याचा अनुभव घेतला. सोबतचे चित्र शहरातील रस्त्यांची रचना स्पष्टपणे दाखवत आहे.
एव्हाना दुपारच्या जेवणाची वेळ झालेली होती. जेवण झाल्यावर नामग्याल इंस्टिट्यूट ऑफ तिबेटोलॉजी आणि तिथला बुद्धमठ पाहण्यासाठी गेलो. चीनने तिबेटवर कब्जा केल्यानंतर ल्हासामधून अगणित निर्वासित सिक्कीममधे आले. त्यांचे पुनर्वसन आणि तिबेटमधील कला व परंपरांच्या जोपासनेकरता या संस्थेची स्थापना झालेली आहे. इथे एक तिबेटी हस्तलिखितांचे भव्य ग्रंथालयही बघता आले.
तिथून मग आम्ही सिक्कीमच्या हस्तकला संग्रहालयात गेलो. इथे चित्रणास मनाई असल्याने चित्रे नाहीत. मात्र तिथला बाहेरचा परिसरही खूपच रम्य असल्याने त्या परिसराचे अनेक फोटो काढलेले आहेत. हातमागावर लोकरी वस्त्रे विणण्याचे तसेच लाकडावर कोरीव काम करण्याचे प्रशिक्षणही तिथे दिले जात होते. तेही पाहता आले. त्यानंतर आम्ही गणेशटोक या टेकडीवरील गणपतीस गेलो. तिथे गणपतीची आरती भरपूर उत्साहाने म्हटली. सर्वात शेवटी गान्तोक पुष्पप्रदर्शनास गेलो. ऑर्किडच्या फुलांचे एवढे रम्य प्रदर्शन मी आजवर पाहिलेले नव्हते. मन प्रसन्न झाले.
पुष्पप्रदर्शनादरम्यान आणखी एक आठवण जागी झाली ती म्हणजे हिरव्या निवडुंगी पर्णकमळांची. दार्जिलिंग ते कॉलिम्पाँग प्रवास झाल्यावर आम्ही एका निवडुंगाच्या बागेत गेलो. उत्तम-उत्तम निवडुंगांनी आणि त्यांच्या इवल्या-इवल्या नयनमनोहर फुलांनी मन प्रसन्न झाले. ही निवडुंगी पर्णकमले ऊन-सावलीच्या खेळात किती रम्य दिसत होती ते सांगून समजणे अवघडच आहे. समजले तर कदाचित शेजारच्या चित्रावरून समजून घेता येईल.
.
या मालिकेतील इतर लेख खालील दुव्यांवर सापडतील.
सिक्कीम सहल-१: पूर्वतयारी http://www.maayboli.com/node/15650
सिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन http://www.maayboli.com/node/15651
सिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन http://www.maayboli.com/node/15652
सिक्कीम सहल-४: चहाचे मळे http://www.maayboli.com/node/15653
सिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था http://www.maayboli.com/node/15654
सिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन http://www.maayboli.com/node/15670
सिक्कीम सहल-७: बनझांकरी धबधबा http://www.maayboli.com/node/15678
सिक्कीम सहल-८: ऐकत्या कानांची खिंड http://www.maayboli.com/node/15686
सिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जल पैगुडी प्रवास http://www.maayboli.com/node/15687
सिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान http://www.maayboli.com/node/15688
http://nvgole.blogspot.com/
या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
.
छान माहीती
छान माहीती
छान फोटो आणि माहिती
छान फोटो आणि माहिती
धन्यवाद परदेसाई आणि
धन्यवाद परदेसाई आणि साधना!
बराच काळ काही प्रतिसाद नाही म्हटल्यावर,
मला वाटायला लागले होते की, एकतर हे लोकांना दिसत नसावं किंवा आवडत नसावं!
तुमच्या प्रतिसादांनी ह्या दोन्हीही शक्यता खोट्या ठरवल्या, हे तुमच्या प्रतिसादांचे मोल अमोल आहे.
अप्रतिम. माहिती व चित्र
अप्रतिम. माहिती व चित्र दोन्ही मस्तच.
धन्यवाद सुस्मिता!
धन्यवाद सुस्मिता!
nice informanation and photos
nice informanation and photos