तवा राईस

Submitted by आऊटडोअर्स on 17 February, 2010 - 23:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्यः भात शिजवून (साधारण १ वाटी), १ मध्यम कांदा, १ टॉमेटो बारीक चिरून, १/२ गाजर (चौकोनी तुकडे करून), १ भोपळी मिरची (चौकोनी तुकडे करून), १ कप मटार, २-३ टी.स्पून पावभाजी मसाला, १ टी.स्पून लाल तिखट, तेल, जीरं, मीठ व वरून घालायला कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

कृती: भात कूकरमध्ये शिजवून घेऊन मोकळा करून घ्यावा. कढईत तेल गरम करून त्यावर जिरं घालावं. जिरं तडतडलं की बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा थोडा लालसर रंगावर परतला की त्यावर भोपळी मिरची, गाजर, मटार घालून परतावं व ५ मिनीटे झाकण घालून एक वाफ काढावी. टॉमेटो शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे तो सगळ्यात नंतर घालावा. व्यवस्थित ढवळून त्यात पावभाजी मसाला व लाल तिखट घालावं. नंतर मोकळा केलेला भात घालावा, मीठ घालून ढवळून ५-७ मिनीटे झाकण टाकून एक वाफ काढावी. वाढताना वरून कोथिंबीर घालून गरम गरम वाढावा.

**पावभाजी मसाला व तिखटाच्या प्रमाणात आपल्या चवीप्रमाणे फेरफार केला तरी चालेल.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

कोणी जेवायला वगैरे येणार असेल त्यावेळेस हा भात केला तरी आवडेल. करायला कमी कटकटीचा व चवीलाही छान लागतो. बरोबर रायता केल्यास सोने पे सुहागा.
भाताचे प्रकार बरेच जण करत असल्याने, हा भात बर्‍याच जणींना माहित असण्याची शक्यता आहे.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळी ही रेसिपी अनायसे वर आलीच होती, म्हणुन करुनच टाकला आज संध्याकाळच्या जेवणाला Happy एकदम मस्त झाला होता Happy

मी केला होता काल. लसूण घातली होती. भारीच लागतो - प्रश्नच नाही! Happy
थँक्स, आडो.

पावभाजी मसाला घालून नेहमीच्या काचर्‍या वगैरेंनाही थोडा नया ट्विस्ट देता येतो.

>>>अंजली, तुझ्या एडिट करण्यापेक्षा माझा वाचायचा स्पीड जास्त आ>>>
सायो, तुला आता "खिलाडी दोनशेसत्तेचाळीस" असं म्हणावं का? Proud

मस्त!!

अजुन एक वेगळेपणा करायचा असेल तर - रस्सम पावडर टाकावी पा.भा.मसाल्या ऐवजी व अगदी शेवटी वा आधीच फोडणीत थोडी पुदिन्याची पाने.... झक्कास लागते.

मी पण आता पाभाम घालुन करुन पहाते.

मीही खूपदा ही रेसिपी वापरून हा पुलाव केला. एकदम मस्त टेस्टी होतो. मी यात पनीरही घालते. त्यामुळे हा पुलाव अजून स्वादिष्ट आणि पोटभरीचा होतो.
पा.कृ. बद्दल खूप खूप धन्यवाद आऊटडोअर्स.

Pages