विहंग प्रकाशन - प्रशस्तीपत्र

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी मायबोली.कॉमशी व्यावसायिक संबंध जुळले आणि त्यानुसार आमच्या विहंग प्रकाशन संस्थेची पुस्तकं या वेबसाईटवरून उपलब्ध झाली. मराठी पुस्तकांची सर्वप्रथम ऑनलाईन विक्री करण्याचं श्रेय बहुधा याच वेबसाईटकडे जातं.

तथापि अशातर्‍हेच्या आधुनिक माध्यमातून कितपत व्यवसाय होईल याविषयी आम्ही थोडे साशंक होतो. कारण मराठी वाचकाला अजूनही पारंपरिक पद्धतीनं पुस्तकं खरेदी करणं आवडतं. परदेशातला भारतीय माणूस या वेबसाईटवरून पुस्तकं खरेदी करेल ही गोष्ट तर अशक्यप्राय वाटत होती. आम्ही प्रकाशीत केलेल्या 'गितांबरी' या भगवत गीतेवरील राजेन्द्र खेर लिखीत कादंबरीचा इंग्रजी अनुवाद the song of salvation यापूर्वीच अमॅझॉनसह अनेक वेबसाईटसवरून उपलब्ध होता - आजही आहे. परंतु, ऑनलाईन विक्री म्हणावी तशी होत नाही असा कटू अनुभव! त्यात आमच्या प्रकाशनाची पुस्तकं ही अभिजात साहित्य प्रकारातली! टाईमपाससाठी किंवा दोन क्षण विरंगुळा देण्यासाठी आम्ही पुस्तकं प्रकाशीत करत नाही. प्रवासवर्णन, कवितासंग्रह हे साहित्यप्रकारही आम्ही प्रकाशीत करत नाही. त्यामुळे हलकं फुलकं वाचणारा बहुतांश वाचक आमच्या पुस्तकांकडे ऑनलाईन खरेदीसाठी वळेल ही अशक्यप्राय गोष्ट होती.
large_Seemaantini.jpg
परंतु, मायबोली.कॉम या वेबसाईटवर आमची पुस्तकं उपलब्ध झाल्यानंतर काही महिन्यांमधेच आम्हाला थोडा थोडा प्रतिसाद मिळू लागला. आम्हाला आश्चर्य वाटलं. आणि गेल्या वर्षापासून तर अमच्या पुस्तकांना उत्तम प्रतिसाद मिळू लागला. 'काया बनी चंदन' ('देह झाला चंदनाचा' या पुस्तकाचा गुजराती अनुवाद) आणि The Silent Reformer ('देह झाला चंदनाचा' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद) या पुस्तकांना तर अमराठी वाचकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. आमची ही पुस्तकं बेस्ट सेलर ठरली! वेबसाईटवर नोंदल्या गेलेल्या प्रती मायबोली.कॉमच्या पुणे ऑफिसकडून रितसर रोखीनं खरेदी केल्या जातात आणि त्वरीत पाठवल्या जातात. बहुधा अमेरिका आणि इंग्लंडमधून या पुस्तकांना चांगली मागणी असते. तिथल्या ग्राहकांना प्रती वेळेवर मिळतात की नाही याचाही पाठपुरावा मायबोलीकडून केला जातो. कित्येक वेळा संतुष्ट ग्राहकांचे इमेल्स आम्हालाही येतात. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये मायबोली.कॉमचा पसारा आणखी जोमाने वाढत जाईल आणि भारताबरोबरच परदेशातील ग्राहकही मायबोली.कॉमशी अधिकाधिक जोडले जातील याविषयी मुळीच शंका वाटत नाही.

सौ. सीमंतिनी खेर
संचालक
विहंग प्रकाशन
www.vihangpublications.com

प्रकार: 

Pages