नाळीच्या वाटेतुन हरिश्चंद्रगड सर केला तेव्हा वाटले काय खत्री ट्रेक झाला ! पण मला वेध लागले होते "अलंग-मदन" वर जाण्याचे ! सह्याद्री रांगेतला अत्यंत कठीण ट्रेक पैंकी असा हा ट्रेक ! पुन्हा 'ट्रेक मेटस' (केवळ तीन ट्रेकच्या अनुभवाने हा ग्रुप अगदीच आपलासा झालाय !!) ह्या ऑर्कुट ग्रुप बरोबर जाण्याची संधी ! म्हणुन आधीच सुट्टी राखुन ठेवली ! (अशा 'खास' ट्रेकसाठी ऑफिसमधुन 'खास' सुट्टी घेउन ट्रेक करनेका मजा कुछ 'खास' होता है ! अर्थातच कारण ठोकावे लागते ! ) सुन्या(मायबोलीकर्)ला देखील त्वरीत कळवुन वेळ राखुन ठेवण्यास सांगितले.. तोदेखील त्याच्या अजुन एका सहकार्याला घेउन लगेच तयार झाला !
काय करणार.. ट्रेकच तसा भन्नाट ! गडावर जाण्यास असणार्या अवघड वाटा नि असणारे भन्नाट रॉक पॅचेस यांमुळे नाशिक जिल्ह्यामधील कळसुबाई डोंगररांगेतील "अलंग-मदन-कुलंग" असे हे दुर्गत्रिकुट फार प्रसिद्ध आहे.. इतिहासात फारसा उल्लेख नाही.. पण फार प्राचिन आहेत हे किल्ले ! त्यातल्या त्यात "अलंग-मदन" तर खुपच अवघड ! त्यामुळे इथे फार कमी ट्रेकर्सलोकांची वर्दळ असते ! 'अलंग-मदन'वर चढाई करणे म्हणजे फुल पॅकेज.. ट्रेकींग, रॉक क्लायम्बिंग नि रॅपलिंग !! थंडीतच हा ट्रेक करण्यास उत्तम सो म्हटले चान्स छोडनेका नही ! चाहे कुछभी हो !
ठरल्याप्रमाणे शुक्रवारी रात्री दादरहुन शेवटच्या असणार्या सव्वाबाराच्या 'कसारा' गाडीचा सेकंडलास्ट डबा पकडला.. तिथेच नविन मित्रांशी ओळख झाली नि कल्याण येईस्तोवर सगळे डब्यात जमले ! कसारा स्टेशन येईपर्यंत ट्रेक मेटस सोडुन बाकी डब्यात कोणीच राहिले नाही नि मग काय..
धमालमस्ती करत थंडीची मजा घेत कसारा गाठले ! तिथेच आम्हाला नेण्यासाठी दोन 'जीप्स' उभ्या होत्या ! रात्री अडीचच्या सुमारास आम्ही प्रयाण केले ते आंबेवाडीला ! हे पायथ्याचे गाव ! साडेतीनच्या सुमारास आम्ही मिट्ट काळोखात त्या गावात उतरलो ! थंडी नसेल तर नवलच ! तिथेच सगळ्यांनी आपापली "थंडीबचावत्मक " वस्त्रे काढली नि तिथेच काळोखात टॉर्चच्या प्रकाशाच्या मदतीने ओळखपरेड झाली !!
इथेच आम्ही "इडलीचटणी नि पुरणपोळी" असा भक्कम नाश्ताही उभ्यानेच करुन घेतला ! नि पहाटेच्या अंधारात पाचच्या सुमारास आम्ही गडाकडे निघालो ! सोबतीला दोन गावकरी गाईड म्हणुन होते..
काळोख्या निरभ्र आकाशात चांदणे बघत, थंडीमुळे "हाहा हीही हूहू" करत चालताना मस्त वाटत होते ! समोर अवाढव्य असणारे हे त्रिकुटदुर्ग तर काळोखातदेखील सारखे लक्ष वेधुन घेत होते.. पण अंधारात फोटु काढणे शक्य नव्हते ! अर्ध्यातासातच चढणीची वाट लागली.. थंडीत हा व्यायाम मस्तच होता ! अंग गरम झाल्याने अर्थातच सगळ्यांचे स्वेटर्स पुन्हा बॅगेत गेले !! काहीवेळेतच बर्यापैंकी उजाडले नि आम्हाला आजुबाजूचा डोंगराळ परिसर पहायला मिळाला.. काही तासातच ''अलंग-मदन"नजरेस पडले ! अलंगची उंची ४५०० फूट तर मदनची उंची तब्बल ४९०० फूट.. म्हटले यांच्याशी कुस्ती खेळायला मजा येणार !
जंगलातील वाटेतुन जाताना गाईडने एक जागा दाखवली जिथे पिण्यायोग्य पाणी उपलब्घ आहे.. हे पाणी म्हणजे काही पाण्याची टाकी वगैरे काहि नाही तर दगडातुन याठिकाणी पाझर फुटतो.. इथे जाण्यासाठी मुळ वाट सोडुन थोडेसे खाली उतरावे लागते.. बघितले तर दिसायला 'डबक्या'एवढे पाणी.. पण चव नि गारवा म्हणाल तर आहाहा !! तिथेच पाण्याच्या बाटल्या भरुन आम्ही पुढे निघालो.. वाटेतच एका शिळेवर कसलीतरी कोरलेली मुर्ती लागते..
इथुनच पुढे अर्ध्यातासातच जंगलातुन वाट बाहेर येउन पहिला वहिला सोप्पासा रॉक पॅच लागतो ! याच पॅचपासुन अधुनमधून कोरलेल्या पायर्यांचे दर्शन घडण्यास सुरवात होते.. गडावरती चुल पेटवण्यासाठी मोठी लाकडं घेतल्याने हा सोप्पा रॉक पॅच चढताना मात्र थोडीशी कसरत होत होती !
हा रॉक पॅच केल्यानंतर काहि वेळ चढाई केल्यानंतर आम्ही एका गुहेपाशी येउन पोहोचलो !
इथेच मग पेटपुजा पार पाडली ! मी तर जेवणाचाच डबा उघडला ! एव्हाना सकाळचे नऊ वाजत होते पण भुकही मोठी होती !! पेटपुजा उरकल्यानंतर लिडर्संनी सुचना दिल्या.. पातळी "कठीण" असल्याने योग्य ती काळजी घेण्याचे सांगितले.. "फाजिल आत्मविश्वासात" गाफिल न राहण्याची महत्त्वाची सुचनाही दिली आमच्या बॅगा त्याच गुहेत सोडुन आम्ही पुढे जाणार होतो.. गुहेतुन बाहेर बघितले तर डावीकडे मदन नि उजवीकडे अलंगला जाण्याची वाट होती ! पहिला मदन करायचा.. नि मग सांजवेळेपर्यंत अलंगला निघायचे असा प्लॅन होता.. इथेच प्रस्तारोहणाची आवश्यक साधने घेउन सगळे लगबगीन निघाले.. वेळ वाया जाउ नये म्हणुन तिघाचौघांना इथेच "हार्नेस" (Harness - याला आम्ही 'चड्डी' नाव दिले :P) घालायला दिले..
काहि वेळेतच आम्ही अलंग नि मदन या दोन गडांमधील घळीत येउन पोहोचलो.. इथे येतानाची वाट ही अलंगच्या पायथ्याशी असणार्या कपारीतुन जाते..
(अलंगच्या कपारीतुन मदनकडे जाताना..)
इथुनच "मदन"वरील कोरलेल्या पायर्या दिसल्या नि मला कलावंतीण सुळक्याची आठवण झाली ! पण मदनच्या उंचीला तोड नव्हता !! घळीतुनच आम्ही पुढे सरकलो नि क्षणातच आम्ही त्या पायर्या चढु लागलो.. एव्हाना हवेचा जोर वाढला होता ! पायर्या संपताच वळण लागले नि फारच अरुंद वाट लागली !! थोडीसुद्धा निष्काळजी दाखवली तर मरण समोर होते ! खालील फोटोवरुन कळेलच !
हे वळण पार करताच ४०फुटाचा रॉक पॅच लागतो !
मदन वरती जायचे तर हा रॉक पॅच करावाच लागतो.. पुढे मार्ग नव्हताच ! दोन गाईडपैंकी एक जण पटापट रोप घेउन सहजरित्या चढुन गेला.. मागोमाग आमचा लिडर गेला नि रोप खाली फेकला गेला.. !
एकेकजण चढणार असल्याने सगळेजण रांगेत त्या अरुंद वाटेत खेटुन बसले होते.. समोरच कुलंगची एक संपुर्ण बाजु नजरेस पडत होती..
हा रॉक पॅच करताना बर्याच जणांची कसोटी लागली कारण स्वतःच्या शक्तीने वर चढायचे होते ! हातपाय फाकवुन पकड घेत चढायला काहिजणांना जिकरीचे झाले तर आमच्यासारख्यांनी पुरेपुर मजा घेतली.. अडचण होती ती थंडीची.. हा भाग सावलीत असल्याने नि बोचरी हवा सुरु झाल्याने सगळेच थंड पडले होते त्यात हा रॉक पॅच करायचा म्हणजे बराच अवधी(जवळपास दोन तास !) जाणार होता.. अशा थंडीत सरपटत वरती चढणे जरा अवघडच ! त्यातील काही क्षण..
--
--
हा रॉक पॅच चढुन जाताच आम्ही काहिजण बाकीचे चढेपर्यंत पुढे निघालो.. आता पुढील वाट अरुंद, वळणाची नि अधुनमधुन कोरलेल्या पायर्यांची होती.. इकडुन जपुन जाताना सोसाट्याचा वारा मात्र अडथळा आणत होता.. काहि अवधीतच आम्ही मदनच्या पठारावरती पोहोचलो नि संपुर्ण अलंग दृष्टीपथात आला.. त्याचा आकार फारच मोठा आहे.. त्यात तर त्याची एक बाजु वरतून ही अक्षरक्षः "C" च्या आकाराप्रमाणे भासत होती.. मला तर या अलंगने भुरळच पाडली होती ! इथुनच एका बाजूस भंडारदर्याचे दर्शन होते.. तर एका बाजुस कळसुबाईचे शिखर आपली सर्वोच्च मान दाखवत होते ! नि एका बाजुला कुलंग अगदी हाकेच्या अंतरावर भासत होता !
( "C" च्या आकारतला अलंग)
-------
(मदनवरुन अलंग वर.. )
--------
( 3 Idiots कुलंग बघताना..)
या मदनवर दोन पाण्याच्या टाक्या आहेत.. पाणी पिण्यास योग्य वाटत नव्हते पण तहान असल्यामुळे चव घेतलीच ! याच पठारावरुन अजुन वरती मदनच्या सर्वात उंच भागावर जाण्याची वाट आहे.. या वाटेतच भलीमोठी गुहा लागते.. तिला डावलुन आम्ही मदनच्या शेंड्यावर पोहोचलो नि तिथेच एका मित्राने आणलेला "भगवा" फडकवला.. नि साहाजिकच घोषणाबाजी झाली..
पण जोर धरुन असलेल्या झोंबणार्या वार्यामुळे सगळ्यांचे डोळे पेंगले नि भर उन्हात तिथेच भगव्याखाली काही काळ वामकुक्षी घेण्यात आली..
चांगली झोप लागली तोच आम्हाला खाली बोलावणे आले.. नि अगदी नाईलाजास्तव खाली उतरावे लागले.. जिथुन आम्ही वरती आलो होतो त्याच रॉक पॅचपाशी येउन बसलो ! आता वेळ "रॅपलिंग" (कड्यावरुन दोरीच्या आधारे खाली उतरणे) होती.. रॅपलिंग करणे हे माझ्यासाठी नविन असल्याने फारच उत्सुकता होती.. त्यामुळे सर्वात शेवटी करण्याचे ठरवले.. त्यात माझे फोटो काढुन घेता यावेत म्हणुन सुन्याला पण थांबवुन घेतले त्याला "तैलाबैला"चा अनुभव असल्याने तो निर्धास्त होता.. संध्याकाळचे पाच वाजले होते नि सगळ्यांचे रॅपलिंग होईस्तोवर तास मोडणार होता.. हवेतील गारवा अधिक जाणवु लागल्याने आम्ही लगेच सुक्या गवताची शेकोटी करुन बसलो ! रॅपलिंग करणे तसे सोप्पे असते पण सुरवातीला अगदी कड्यावर उलटे उभे राहुन वाकतो तेव्हा थोडे दडपण असते.. मग मात्र Enjoy !!
-----------
------
आमचे रॅपलिंग आटपेपर्यंत बाकी सगळे जिथे बॅगा ठेवल्या होत्या त्या गुहेपाशी पुढे गेले होते. आम्ही पोहोचेपर्यंत पुढच्या चढाईची इथे तयारी चालु झाली होती.. नि ही चढाई होती "अलंग"वरची ! एव्हाना अंधार पडत चालला होता.. नि इथे तब्बल ९० फुट असणार्या कड्याच्या पायथ्याशी अरुंद जागेत आम्ही जमलो होतो.. गाईडने पुढे जाउन रोप टाकला होता.. नि त्या रोपबरोबरच आम्हाला, आमच्या बॅग्जना नि चुलीसाठी आणलेल्या लाकडांना वरती जायचे होते !!
तो कडा बघुन तरी "अबबब" वाटत होते.. काळोख पडत चालल्याने आमचा "अलंग"शी होणारा कुस्तीचा सामना टॉर्चच्या प्रकाशात रंगणार होता हे मात्र निश्चीत होते !!
क्रमशः
योग्या... नाद खुळा... पोटात
योग्या...
नाद खुळा...
पोटात गोळा...
ईतर ट्रेकला तुम्ही लोक चड्डी ( Harness ) नाही वापरत का ? >>>
भारीच रे ! अलंग आणि मदन बद्दल
भारीच रे ! अलंग आणि मदन बद्दल ऐकले होते.. जायची पण ईच्छा होती, पण फारच अवघड आहे ! ४० फुटाचा rockpatch, जबरदस्त ! आणि लागोपाठ दोन इथेच दम लागला मला ! हे असे दोन एकदम करावेच लागतात का?
बापरे!!!कसला सॉलिड ट्रेक आहे
बापरे!!!कसला सॉलिड ट्रेक आहे हा.. फोटो बघुनच धडकी भरली.
धन्यवाद मित्रमंडळी श्री..
धन्यवाद मित्रमंडळी
श्री.. कठीण रॉक पॅच असतील तरच त्याची गरज असते ! अन्यथा आवश्यकता नाही !
हे असे दोन एकदम करावेच लागतात का?
>> तसे काही नाही.. एका वेळी एक करु शकतो ! पण पाण्याची सोय फक्त अलंगच्या पठारावरती असल्याने अलंग गाठणे योग्य !
पुढील दुसरा भाग इथे टाकला आहे.. जरुर आनंद घ्यावा..
http://www.maayboli.com/node/13454
धन्यवाद
C shape मधला पहिला फोटॉ केवळ
C shape मधला पहिला फोटॉ केवळ झक्कास...
मस्त ट्रेक... अभिनंदन..
वर्णन अगदी रॉकिंग आहे. आणि
वर्णन अगदी रॉकिंग आहे. आणि फोटोज तर एकदम सही रे. मला सगळ्यात आवडला तो, अलंगवरची कपार पार करतानाच्या नंतरचा, आणि एक पाय अलंग वर व दुसरा मदनवरचा. एका उडीत अलंग गाठला असतात..हाकानाका. रॅपलिंगचा एकदम भारीच असतो रे. सुरुवातीला उतरताना तर धडकी भरलेली असते.
यकदम शोल्लीड !
यकदम शोल्लीड !
ट्रेकचा सगळा थरार वर्णनात व
ट्रेकचा सगळा थरार वर्णनात व फोटोत पहायला मिळतोय, अनुभवताही येतोय..
फारच धाडसी मावळे आहात तुम्ही - सलाम.........
शहारा उभा राहीला राव
शहारा उभा राहीला राव अंगावर.
तुम्ही लोक खरेच ग्रेट आहात...
योग्या लै भारी रे....
आधी फोटो बघितले आणि श्वास
आधी फोटो बघितले आणि श्वास रोखून वर्णन वाचले .........खूपच थरारक..
मस्तच वर्णन आणि
मस्तच वर्णन आणि फोटोसुद्धा!!!!
यो, फोटो जब्रि !! हेवा वाटला
यो, फोटो जब्रि !! हेवा वाटला रे !!
असे फोटो बघुन ट्रेकचा कीडा परत ऊसळी मारतो !:P
Pages