लंपन
सध्या अनिल अवचटांची पुस्तकं वाचण्याचा जोर आहे. त्यांचं प्रामाणिक आणि खर्या अनुभवांवरचं लिखाण
भिडतं आणि त्यांचं माणूस आणि त्याचं जगणं यावर कुठलेही स्वतःच्या पूर्वग्रहांचे मतांचे लेप न चढवता
(त्यांचा तेवढा त्या त्या क्षेत्रातला अधिकार असूनही) लिहीत नव्हे तर सांगत जाणं आवडतंच एकदम.
आणि अधूनमधून स्वतः अवचट, सुनंदा, मुली त्यांच्या घरा, सवयी आवडींसकट समोर येत रहातात ते पण.
यावेळी नवर्याला पुस्तकं बदलून घ्यायला सांगितली होती. अवचटांचं लिखाण आवडतं हे माहीत असल्यानं
एक त्यांचं घेतलंच होतं त्यानं. दुसरं मात्र असंच अंदाजानं घेतलं होतं झुंबर नावाचं. आपल्या लंपनचं.
प्रकाश नारायण संत गेले हे ऐकून काही दिवसांपूर्वीच हळहळलेलं आठवलं.
कितीतरी वेळा असं होतं की एकदा पुस्तक वाचून झालं तरी त्यातल्या गोष्टींची सोडा पुस्तकाचं पण नाव परत
आठवायची ग्यारंटी नाही.
त्यामुळं हे वाचलेलं निघतंय की काय असं वाटत होतं. पण वाचायला सुरुवात केल्यावर कळलं की नाही
वाचलेलं हे अजून. शेवटच्या पानावर लिहीलेल्या पुस्तक ओळखीतून हेही कळलं की लंपनचे चारच कथासंग्रह आहेत.
आणि त्यातले उरलेले तीन आपण आधी वाचलेत हेही आठवलं लगेच.
कधीतरी त्यांच्या लिखाणावर चर्चा झाली होती वनवास वाचत होते तेंव्हा मग लगेच पंखा पण वाचलं पाठोपाठ.
मग कधीतरी शारदा संगीत पण.
पहिल्यांदा जेंव्हा कुठल्यातरी जुन्या दिवाळीअंकात शारदा संगीत नावाची गोष्ट वाचली होती तेंव्हा मी अगदी
हरखून गेले होते काहीतरी नवीन सापडल्याच्या आनंदात. हे असं काही मी वाचलं नव्हतं आधी. इतकं साधं,
आपल्यातच विसरून राहिलेल्या लहानपणाशी नुसतं रिलेट करणारंच नाही तर त्याला ओढून एकदम
काडीनं टायर पळवायला, ते ज्यामीन कोण सारखे मॅड खेळ खेळायला, झाडावर चढायला, सायकली रॅव रॅव करत
बोळातून पळवायला एकदम घरातून बाहेर मैदानातच आणणारं. इतकं गोड वर्णन आणि भाषा. लहानपणच्या फॅंटसीज.
वाट्टेल त्या निरर्थक गोष्टीत हव्वा तेवढा वेळ घालवणं. लंपन आपल्याच आजूबाजूला कुठंतरी मोठा होतोय असं
वाटायला लावणारं. त्या आडवयातल्या मुलांच्या नजरेतून ते गाव, ते मित्र, ती खमंग आज्जी, ते कधीतरीच केसांतून हात
फिरवणारे (पण तरी तो हात केसातच अडकून र्हायलाय असं वाटायला लावणारे) आजोबा, तो टिपिकल नोकर बाबूराव
सगळं पहाता पहाता आपण त्याच वयाचे होऊन जातो. वाक्यावाक्याला नाहीतर काय? अगदी अगदी ची दाद जायला लागते.
आणि त्या वयातून बाहेर पडतोय असं झालं तरी मग त्या 'आत्ता हेच उजेड पडू लागलेल्या डोक्याच्या' लंपनबद्दल
अतीव वात्सल्य वाटण्यापुरतंच.
पुन्हा ती मॅड पोरं, त्यांची शहात्तर तरी गोष्टी ठेवलेली दप्तरं. लाल माती, गोष्टींची पुस्तकं, त्यातले राक्षस,
खजिने यात आपण हरवून जातोच.
मराठी कानडी सीमेवरची ती भाषा. 'चल बे', 'हितं का हुबारलायस?', 'काय की','करायलो', 'तो काय ऐकायला नाही',
' माझं जे झालं ते झालं' असं सगळं असलेली. (सोलापूरही त्याच भाषांशावर(अक्षांश रेखांश सारखंच)
असल्यामुळं मला ते अजूनच गोड वाटत असणार वाचायला.)
त्या वयातल्या पोरांची भाषा, खेळ, कसल्याकसल्या यडचाप पण ठाम समजुती, मोठ्या माणसांकडं बघण्याचे
वेगवेगळे चष्मे, त्या गावातले रस्ते, दुकानं, शाळा, मैदानं, घरं. आणि हे सगळं सणसणीत लंपूच्याच भषेत.
तंतोतंत.
त्याचे दुसर्या गावात रहाणारे आईवडील आणि बिट्टी मनी. त्याची सखी सुमी आणि इतर मुली. त्यांचाशी बोलतानाचे आणि
त्यांच्याबद्दल सांगतानाचे लंपूचे भाव.
पात्रं तर हुबेहूबच. पण त्या प्रत्येकाबद्दल लंपूला वाटणारं वेगळं काहीतरी अगदी सुस्पष्ट मांडतात संत.
बरं आणि हे सगळं वाचताना कळत नाही बर्का. आपण आपले लंपूबरोबर कधी हात डोक्यामागं घेऊन मोडक्या
गाडी ची दुरुस्ती बघत हिंडलगेकर आण्णांच्या आंगणात तर कधी सुमीबरोबर पाण्याच्या कडेनं चालत.
कधी शारदा संगीत विद्यालयात तर कधी रामगुंडाशी बोलत रेलवे गेटाजवळ. कधी सांबप्रसादच्या घरी तर
कधी बाबूरावचं पत्र त्याला वाचून दाखवत सैपाकघरात. कधी दुंडाप्पा हत्तरगीच्या टांग्यात तर कधी
वंटमुरीकर देसाई त्यांच्या मागच्या बोळात.
मग सगळं वाचून संपल्यावर पुस्तक लायब्ररीतल्या शेल्फवर जाऊन बसल्यावर मग हे साहित्यिक पैलू लक्षात
यायला लागतात. तोपर्यंत आपण आपले लंपनबरोबर त्याच्याच विश्वात. त्रेचाळीस तास तरी.
सन्मे मस्तच गं
मी खरं म्हणजे वाचली नाहीत ही पुस्तकं माहीत असुनही. पण प्रत्येक वेळी या पुस्तकांबद्दल दुसरं कुणी काही म्हणतं ना ते वाचायला / ऐकायला मला फार आवडतं. तसं तू लिहीलेलही वाचायला छानच वाटलं
लंपन!!!
खूप छान वाटतं सन्मी लंपनच नाव जरी कोणी उच्चारलं तरी. संतांची ही चारही पुस्तके म्हणजे निखळ आनंदाचा ठेवा आहेत. पण झुंबरमधली शेवटची 'स्पर्श' कथा वाचताना पाणी आवरत नाही डोळयातलं. इतकी वाईट हुरहुर लागते ती कथा वाचल्यावर की मी झुंबर पुस्तक एकदा वाचल्यावर परत उघडून पहायचही बरेच दिवस टाळलं होतं. न जाणो ती कथाच दृष्टीस पडायची. त्या कथेत लंपनच्या वडीलांचा मृत्यू होतो आणि त्याचं सारं भावविश्वच कोलमडतं. त्याचं आणि त्याच्याबरोबर आपलंही. आणि याहून उदास करणारी गोष्ट म्हणजे झुंबर लिहिल्यानंतर स्वत: प्रकाश नारायण संत ही निघून गेले. "जोपर्यंत लंप्याच्या आयुष्यात इतरांना आनंद देता येण्यासारखं काही सांगता येईल तोपर्यंत लिहित राहीन" असं संत ही शेवटची कथा लिहून झाल्यावर म्हणाले होते. ते अकाली गेले आणि लंपनही त्यांच्याबरोबरच गेला असंच काहीसं वाटतं ती कथा वाचून. ते खरंही आहे म्हणा. एकापरीने लंपन कायमच त्या निरागस वयात राहीलाय ही उदासीतही विचित्र दिलासा देणारी गोष्ट वाटते.
तुझं हे वाचून आत्ता खूप खूप दिवसांनी परत झुंबर वाचून पहावंस वाटतय. किती निरागस, शुद्ध आनंद देतात ही चारही पुस्तके नां?
आहे मनोहर तरी..
मी पण अजून लंपन वाचला नाही. कुठे कुठे येणारे त्याचे रेफरन्सेस मात्र बर्याच वेळा पाहिले आहेत. प्रत्येक वेळी हे वाचायला हवं एकदा असं वाटतं.
आज हे ललित वाचून मात्र कधी एकदा ती पुस्तकं माझ्या हातात पडताहेत असं वाटलं.
पण ट्यु, तुझा प्रतिसाद पाहून असं वाटतय तेव्हढं धैर्य आपल्यात आहे का? तो शेवट आपल्याला पेलू शकेल का? फार उदास वाटलं, एकही कथा न वाचताच.
लंपन
मला तर पहिल्या पुस्तकात ते लंपन ला आईबाबा, भाऊ बहीण यांना सोडून आजीकडे रहावे लागते अन बाकी आजीकडे लाड, मजा करत असला तरी त्याचा लहान जीव किती आईची आठवण काढतो ते वाचून पण फार पोटात तुटायचं .. गोड आहे लंपन.
नक्की वाचा!
मैत्रेयी खरंय अगदी पोटात तुटतं इतका लहान मुलगा आईवडिलांना सोडून रहतो ते वाचून. ती इन्सिक्युरिटी आपण अनुभवलेली असते ना लहान पणी. मला तर अजून अशा आईवडिलांना सोडून राहू शकणार्या लहान मुलांबद्दल आदर वाटतो.
ट्यु तू म्हणतेस ते खरंय पण संतांचा तो लंपनचे वडील जातात ही कथा लिहीण्याचा प्लॅन होता पण ती पूर्ण व्हायच्या आधीच ते गेले हे मी प्रस्तावनेतच वाचलं होतं.
त्यामुळं ती कथा कागदावर उतरणं 'त्या' लाही नकोसं झालं असेल असं काहीसं वाटलं. आणि स्पर्श कथा त्याबद्दल खरं म्हणजे बोलत असून पण मी नको त्या गोष्टीला सोयिस्कर वळसा घालावा तसं ते नाकारूनच ती गोष्ट वाचली.
तर मीनू, अश्विनी नक्की वाचा. आणि लग्गेच. (आपल्याला आवडलेल्या एखाद्या गोष्टीचा आपल्या मैत्रांनीही लगेच आस्वाद घ्यावा या ऊर्मीमुळं सांगतेय. )
फारतर झुंबर मधली स्पर्श कथा सोडून बाकी सगळं. (पण ती कथा पण फार छान आहे शेवट सोडून)
तंतोतंत
लंपनची पुस्तकं कितीही वेळा वाचली तरी पुन्हा वाचावीशी वाटतात. तसंच थोडं या लेखाचंही झालंय.
वाचायला पाहिजे
ते लेखकाचे नाव, लंपन वगैरे नावे कोठेतरी ऐकलेली आहेत पण फारशी माहिती नाही. वाचायला पाहिजेत ही पुस्तके आता.
छान !!!
सन्मी,

मला पण अनिल अवचटांची पुस्तकं फार आवडतात. आत्ताच त्यांच 'दिसलं ते' संपवले. मला त्यांची लिखाणाची शैली आवडते.
सगळ्यांकडुन या संतांच्या पुस्तकांबद्दल खुप ऐकल होत आधीपण , आता परत एकदा तुझ्याकडुन, अश्या व्यक्तीकडुन
जिच लिखाण मला आवडत. अजुन वाचल नाहीये मी पण नक्की वाचेन लवकरच. मला माझ्या लग्नात बरीच पुस्तकं भेट मिळाली त्यात ह्या चारी पुस्तकांचा समावेश आहे.
हळु हळु एक एक पुस्तक वाचतेय आता आधी हे वाचेन.
(सन्मी मला पण सवय आहे तुझ्यासारखीच एखादे पुस्तक आवडले की लगेच सगळ्या मैत्रांना त्याबद्दल सांगायच
आणि वाचायला लावायच ~D)
नावं
वनवास, पंखा, शारदा संगीत आणि झुंबर- हीच नावं आहेत ना? झुंबर वाचलं आहे, आता बाकीची नक्की वाचेन.. धन्स सन्मी
अगदी अगदी
सन्मी, मस्त लिहिलेस ग. लंपन माझ्या अतिशय आवडीचा. भाषा बेळ्गावची असल्याने अजुन जवळचा. ज्यांनी पुस्तके वाचली नसतील त्यांनी जरूर वाचावीत.
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
वप खरच मला
वप
खरच मला देखिल आवदले हे तुझे ... पन मि देखिल हि पुस्त्के वच्लि आहेत ... मस्त्च एकदम वाटत तेव्हा त्यातिल ति मिस्स हलदिपुर आनि आपला लम्प्या ... म्हनजे जोडिच छान ...
ते जाउ दे पन आपन मला एक माहिति क्रुपा करुन द्या......
लम्पन आनि आपलि सुमि ह्यान्च शेवटी लग्न होत का ते मला माहित नसल्याने आजुन एक टोचन मझ्या मनाला लागते .... तरि मला याबाद्द्ल सन्गा.... आपला विजय पाटील
मस्त! मी वनवास वाचलंय. बाकीची
मस्त!
मी वनवास वाचलंय. बाकीची वाचायला हवीत आता.
छान लिहिलसं. 'चल बे', 'हितं
छान लिहिलसं.
'चल बे', 'हितं का हुबारलायस?', 'काय की','करायलो', 'तो काय ऐकायला नाही',
' माझं जे झालं ते झालं' असं सगळं असलेली. (सोलापूरही त्याच भाषांशावर(अक्षांश रेखांश सारखंच) >>> एक वेगळी मजा आहे त्या भाषेत.
व्वा! लंपन म्हणजे ते काय
व्वा! लंपन म्हणजे ते काय म्हणतात ना त्यातली गत!! मी पण 'झुंबर' आधी वाचलं आणि मग मॅडसारखं एकामागून एक तीनही पुस्तकं. संतांची गंमत अशी की चारही पुस्तकात लंपन तेवढाच. अडनीड वयाचा. कथेला शीर्षक कसं द्यावं हे संतांकडून शिकावं. 'स्पर्श' डोळ्यातून पाणी काढतो खरंच, पण परचक्र, आदम चटका लावतात. सहल, शर्यत,पूल, खेळ,पंखा, घसरगुंडी तर उडत्या रंगीत पक्ष्यांना बघत रहावं तशा. रमणीय. इतकं साधं, सरळ, सोपं बालपण याआधी वाचलंच नव्हतं. आगगाडी 'वाचताना' स्टेशनवर उभं राहून इंजिनापासून शेवटचा डबा दिसेनासा होत जाईपर्यत एकटक बघत राहण्याचा अनुभव आला म्हटलं तर लोक हसतील! चारही पुस्तकं वाचताना कानात गाणं वाजत राहतं, "रानी का बाग देखो, दिल्ली का ताज देखो...!" लहान मुलाचं हे पुस्तक फक्त मोठं झाल्यावर वाचावं असं. बेष्टं.
सुंदर लिहीलंयत संघमित्रा, ट्युलिप तुम्ही.
संग्रही ठेवण्याजोगी चारही
संग्रही ठेवण्याजोगी चारही पुस्तकं.
काय योगायोग म्हणाव की काय...
काय योगायोग म्हणाव की काय... कालच सगळा संच पुर्ण वाचून झाला आणि आज इथे चक्क आपल्या लंप्यावर प्रतिसाद देतोय...
वरिल लेख वाचताना डावा पाय उजव्या पाया मागे आणि दोन्ही हात कधी डोक्या मागे गेले ते कळलेच नाही...
काल 'स्पर्श' वाचून डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या... पण किटा मामाचा स्पर्श फार फार सुंदर... खरच वाचा सगळ्यांनी
या पुस्तकांबद्दल सगळ्यात आवडलेली बाब कोणती तर... प्रत्येक कथेतील व्यक्तींचे तंतोतंत उतरलेले स्वभाव चित्रण... नकादुची कथा असुदे किंवा वट्टलांचा खेळ असुदे... सगळंच भावस्पर्शी
वनवास, शारदा संगीत, पंखा आणि झुंबर असा क्रम आहे चारही पुस्तकांचा.
छानच लिहिलं आहे!! या
छानच लिहिलं आहे!!

या पुस्तकांबद्दल सगळ्यात आवडलेली बाब कोणती तर... प्रत्येक कथेतील व्यक्तींचे तंतोतंत उतरलेले स्वभाव चित्रण... नकादुची कथा असुदे किंवा वट्टलांचा खेळ असुदे... सगळंच भावस्पर्शी >> अगदी अगदी!!
वेड लागते ही पुस्तके वाचून...
वेड लागते ही पुस्तके वाचून... आपण ही लम्पनच्या मित्रांपैकी एक आहोत असे वाटत राहते. इतकी सारी क्यारेक्टर म्याडसारखी नीटच डोक्यात फ़िरत राहतात.
म्याड लिहिलयस... लंप्या ,
म्याड लिहिलयस...
लंप्या , आज्जी आजोबा, बाबुराव सगळेच एकदम फेवरेट आहेत..