मांडे हा शब्द मी पहिल्यांदा साधारण दुसरी-तिसरीत असताना मराठीच्या पुस्तकात वाचला. मनातल्या मनात मांडे खाल्ले, मनातले मांडे मनातच जिरले.. वगैरे वाचुन मांडे म्हणजे काहीतरी खायचा पदार्थ आहे हे लक्षात आले. पण हा पदार्थ दिसतो कसा, खातात कशाबरोबर इत्यादी प्रश्न मनात उपस्थित झाले. म्हणजे तसे मला तेव्हा जिलेबी, पुरणपोळी इत्यादी पदार्थही कसे दिसतात ते माहित नव्हते. पण ते शब्द कानावरुनही गेले नव्हते, त्यामुळे अर्थात दिसतात कसे हा प्रश्न उपस्थित झाला नव्हता.
मग काही दिवस मी आईच्या मागे भुंगा लावुन दिला, 'मांडे म्हणजे काय ते मला सांग.' आता आंबोलीसारख्या खेड्यात राहणा-या माझ्या आईनेही मांडे कधी ऐकले नव्हते. ती मला काय सांगणार कप्पाळ??!! तिला फक्त तांदळापासुन बनवण्यात येणारे पोळ्या, खापरोळ्या, शिरवाळ्या इत्यादी पदार्थ माहित होते. शेवटी तिने मांडे हे आंबोळीसारखेच असतात असे मला सांगुन स्वतःची सुटका करुन घेतली. सगळे जग तांदुळमयच आहे यावर माझा तेव्हा खुपच विश्वास होता, त्यामुळे मीही मांडे हा आंबोळीसारखा दिसणारा, तांदळापासुन बनवलेला काहीतरी गोड गोड पदार्थ आहे असा माझा समज करुन घेतला. कालांतराने मी हे सगळे विसरुनही गेले.
काही वर्षांपुर्वी लोकप्रभाचा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील पदार्थांवर एक विशेषांक निघाला होता. त्यात मांड्यांचा उल्लेख वाचला. परत सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. पण एक पदार्थ म्हणुन मांड्यांबद्दल काहीच माहिती त्या अंकात दिली नव्हती. लेखकाने 'मांडे खुप मोठे होते, एकाचे चार तुकडे करुन आम्ही खाल्ले' म्हणुन लिहिले होते. परत माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू..... इतका मोठा पदार्थ की चारजणांना खावा लागला? नक्कीच लेखकाची खाण्याची क्षमता कमी असणार.......
तेव्हा इंटरनेट वगैरे फारसे नसल्याने गुगलुन वगैरे पाहताही आले नाही.. (आता सगळे कसे सोप्पे झालेय ना?? डोक्यात प्रश्न आला की चला लगेच गुगलवर...... )
मांड्यांना मी परत एकदा विसरले. तीनचार वर्षांपुर्वी ऑफिसात सटाणा-नाशिकच्या एका मित्राने पुरणपोळीसदृष्य एक पदार्थ आणला. एकदम पातळ कवर आणि त्यात अतिशय कोरडे असे गोड सारण. आकार कसा असणार याचा पत्ता लागेना कारण त्याने तुकडे करुन आणलेले. हे काय आहे असे विचारल्यावर तो म्हणाला, आमच्याकडे ह्याला मांडे म्हणतात. तुम्ही पुरणपोळी म्हणा आणि खा. मी एकदम उडीच मारली. म्हटले, गेले कित्येक वर्षे मी जे मांडे मांडे म्हणुन ऐकतेय ते आज असे अचानक पुढ्यात आले....
मग त्या मित्राला विचारले कसे करतात वगैरे वगैरे. तो म्हणाला, खुप कठीण आहेत करायला. माझी आई हातांवर अश्शी अश्शी फिरवुन करते आणि मग खापरावर भाजते. मी परत बुचकळ्यात. आमच्याकडे मातीचे मडके फुटले की त्याच्या तुकड्याला खापर म्हणतात. आता ह्या लोकांनी खापराच्या तुकड्यांवर कसे काय भाजले असणार हे मांडे. छ्या.. खुप गर्दी झाली डोक्यात विचारांची. त्या मित्राला माझी दया आली. तो म्हणाला, कधीतरी माझ्या गावी ये आणि बघ कसे करतात ते मांडे.
तर मित्रांनो, माझ्या त्या दिव्य मित्राच्या घरी जाऊन मांडे बघण्याचे भाग्य मला ह्या दस-याला लाभले. त्याच्या घरी चक्रपुजा होती. त्या निमित्ताने त्याने बोलावले. म्हणाला, मांडे हा चक्रपुजेतला एक महत्वाचा घटक आहे, तर तुला त्या निमित्ताने पहायला मिळेल मांडे कसे करतात ते. मी मग अगदी सुरवातीपासुन पाहिले मांडे कसे करतात ते आणि तुमच्यापैकी कोणी माझ्यासारखेच अज्ञ असतील मांड्यांच्या बाबतीत तर त्यांचेही अज्ञान दुर व्हावे म्हणुन इथे लिहिण्याचा उद्योग करतेय...
बाकी हे मला पाककृतीतही टाकता आले असते, पण जी पाकृ मला ह्या जन्मात करायला जमणार नाहीय ती उगाच इथे टाकायला जीव धजावला नाही. इथे टाकण्यासाठीची पाकृ आधी आपल्याला तरी करता यायला पाहिजे ना.....
तर मंडळी, आता मांड्यांच्या पाकृ बद्दल.
मांड्यांचे सारण आपण पुरणपोळीचे करतो तसेच करतात. चणाडाळ धुवुन चुलीवर शिजत ठेवतात, शिजली की मोठ्या चाळणीवर ओतुन पाणी पुर्णपणे काढतात आणि मग परत चुलीवर चढवुन तिच्यात गुळ घालुन गुळ शिजेपर्यंत आणि सारण थोडे सुकेपर्यंत ढवळत राहतात. गरम असतानाच पाट्यावर वाटायचे. मिक्सरवर वाटले तरी चालते. एकदम बारीक वाटले गेले म्हणजे झाले.
सारणाचा वेगळा फोटो नाहीय, पण खालच्या फोटोत सारण दिसतेय, त्यावरुन अंदाज येईल सारण कसे दिसत असेल त्याचा.
मांड्यांचे कवर पाहुन ते मैद्याचे केलेय असे वाटते पण ते तसे नाहीय. अगदी उत्तम प्रतिचा लोकवण वगैरे गहु घ्यायचा, तो स्वच्छ धुऊन उन्हात वाळवायचा आणि जात्यावर अगदी बारीक पिठ दळायचे. जर गिरणीवर दळुन आणले तरी चालते. नंतर चाळणीने चाळण्याऐवजी वस्त्रगाळ करुन घ्यायचे. पिठ वस्त्रगाळ करुन घेतले नाही तर मांडा बनवताना कडेला जाड राहतो, भाजताना कडा निट भाजल्या जात नाहीत आणि मग तेवढी गोल कड काढुन टाकावी लागते.
मग हवे तितके पिठ घेऊन थोडे तेल घालून, मीठ घालुन पाण्याने भिजवायचे. मीठ अगदी नेमके, योग्य प्रमाणात घालायला हवे, कारण कमी पडले तर मांडा करताना मोडतो. साधारण पोळ्यांसाठी भिजवतो तसे भिजवायचे नी मग त्याला तासभर तरी तेल लावुन उलटेसुलटे फिरवत तिंबत बसायचे. तासाभराने अगदी मैद्याच्या पिठासारखा पोत आणि लवचिकपणा येतो या पिठाच्या गोळ्याला. सारणापेक्षा पिठ निट जमायला हवे, नाहीतर सगळेच ओम्फस व्हायचे. मांडा करताना मोडत असल्यास मीठ बरोबर पडले का ते चेक करतात आणि कमी असल्यास घालुन परत मळतात. मग मांडा न मोडता व्यवस्थित होतो.
पिठ भिजवणा-या आजीबाईंनी दोन चमचे पुरण टाकले पिठात आणि परत एकदा तिंबुन मग झाकुन ठेवले गोळ्याला. असे केल्याने छान लाटले जाते म्हणे.
आता पिठ आणि सारण दोन्ही तयार आहेत. तिन विटा मांडुन वेगळी चुल लावली जाते. अर्थात आज भरपुर मांडे करायचे असल्याने ही सोय केलीय. अन्यथा रोजच्याच चुलीवर खापर ठेऊन मांडे भाजायचे. हे खापर म्हणजे खास मांडे भाजण्यासाठी बनवलेलेल मातीचे भांडे! साधारण १५०-२०० रु. पर्यंत किंमत असलेले हे मडके दिसायला दोन बशा एकमेकींवर उपड्या ठेवल्या तर जशा दिसतील तसे दिसते. त्याला खालच्या बाजुने तोंड असते. तिच्यातुन धग वरपर्यंत पोचुन मांडे भाजले जातात. शहरवासिय मांडेप्रेमींसाठी गॅसवर वापरता येतील अशी लहान आकाराची खापरेही आता बाजारात मिळु लागलीत अशी माहिती आजीबाईंनी दिली.
तर आता मांडा बनवतात कसा ते पाहु. प्रथम आपली मोठी पोळी असते त्या आकाराच्या दोन पोळ्या करुन घेतात. मग साधारण नारळाच्या आकाराचा सारणाचा गोळा घेऊन त्याला ह्या दोन पोळ्यांच्या मधे ठेवतात. बाजु हळु बंद करुन घेतात आणि मग बाजुबाजुने हळुवारपणे लाटायचं. लाटताना पोळपाट न वापरता मोठे ताट उपडे घालुन त्यावर लाटतात म्हणजे मोठा पृष्ठभाग मिळतो लाटायला. लाटत लाटत ताट भरले की पोळी हळुच उचलुन हाताने फिरवायची. फिरवत फिरवत अलगद दोन्ही हात आडवे घेऊन कोपरांचा आधार द्यायचा आणि कोपराकोपरांनी मांड्याला फिरवायचे. हे काम जलद करावे लागते त्याचबरोबर जपुनही करावे लागते. जलद अशासाठी की सारण सरकून एकाच बाजुला यायला नको आणि हे करताना मांडा मोडु नये म्हणुन जपायचे.
असा तयार झालेला मांडा आता खापरावर टाकायचा. एवढा मोठा मांडा गोल आकाराच्या खापरावर अजिबात चुणी वगैरे न पाडता टाकणे ही सुद्धा एक मोठी कला आहे असे वाटले पाहुन.
मांडा खापरावरुन घसरुन पडु नये म्हणुन कधीकधी काहीतरी जड ठेवतात वर.
मग एका बाजुने भाजला की अलगदपणे आणि अतिशय वेगात तो उलटवायचा.
दोन्ही बाजु भाजल्या की खाली काढायचा आणि जरा थंड झाला की घडी घालायची. ही घडी आयताकृती घालतात. जर कोणी नुसती घडी बघितली की त्याला पत्ताच लागणार नाही हा पदार्थ गोल आहे ह्याचा.
आपण पुरणपोळीला वरुन तुप लावतो तसे मांड्यांना तुप वगैरे काही लावत नाहीत. चणाडाळ शिजवल्यावर जे पाणी काढतात त्याचीच आपण कटाची आमटी करतो तशी आमटी करतात. त्यात मांडा बुडवुन खातात. तसेच दुध थोडे आटवुन त्यात साखर घालुन बासुंदीसारखे करतात. चक्रपुजेला हे दोन प्रकार करतात आणि मांडा त्यात बुडवुन खातात.
आंब्याच्या मोसमात आमरस करायचा आणि सोबत मांडे! एरवी एक माणुस फक्त अर्धाच मांडा खाऊ शकतो एकावेळी. पण आमरस केल्यास मात्र १ ते दिड मांडा एक माणुस सहजपणे खाउन जातो अशी आमरसाची किमया आजोबांनी ऐकवली!!!!
चक्रपुजा ही घरात धनधान्य भरपुर यावे, समृद्धी यावी यासाठी केली जाते असे मला पुजेचे स्वरुप पाहुन वाटले. सांज्याच्या करंज्या करतात, त्यांना सांजोरी म्हणतात. गुळाचे पाणी घालुन गव्हाच्या गोड पु-या करतात, त्यांना सोळी म्हणतात.
पुजा मांड्ताना एका बाजुला वीटा रचुन होमाची तयारी करतात. होमापुढे तांदुळ पसरतात आणि मुठीत तांदुळ घेऊन एकात एक अशी पाच्-सात वर्तुळे काढतात. त्या वर्तुळावर घरच्या बागेतल्या आंबा, सिताफळ, लिंबु वगैरे झाडांच्या छोट्या फांद्या अंथरतात. त्यावर गोलाकारात मांडे रचतात. मधे एक आणि बाजुला गोल दहा मांडे असे अकरा मांडे रचतात. मांड्यांवर सोळी, सांजोरी लावतात. तळलेल्या कुरडया रचतात. त्यावर दहा दिवे आणि मध्ये एक मोठा दिवा (ह्याला मेंढ्या म्हणतात) असे पिठाचे दिवे ठेवतात. हे दिवेही आधी बनवुन उकडुन तयार ठेवतात.
होम पेटवल्यावर होमाच्या ज्योतीने मधला दिवा आणि बाजुचे दहा दिवे पेटवतात. मग सगळ्यांनी नमस्कार करायचा. सगळे झाले की पंगत बसते आणि मग मांड्याचा यथायोग्य समाचार घेतला जातो.
तर असे हे मांडेपुराण.... आवडले तर पुढच्या वर्षी माझ्याबरोबर चला चक्रपुजेला....
विडिओज पण घेतलेले आहेत. खाली लिंक्स दिल्यात त्या कृपया पाहा. आवाज मात्र शुन्यावर ठेवा, अर्थात ज्यांना अहिराणी बडबड ऐकायची असेल त्यांनी ऐकावी....
विडिओ मी आता नीट लावले आहेत. पहिला आहे दोन छोट्या पोळ्या करण्याचा.
http://www.youtube.com/watch?v=BuTJlQbDfjo
दोन पोळ्या झाल्या की नारळाएवढे सारण घ्यायचे आणि भरायचे दोन पोळ्यांमध्ये आणि मग मांडा लाटायला घ्यायचा.
http://www.youtube.com/watch?v=2LFboZydbvo
जरासा मोठा झाला की अलगद हातावर उचलुन घ्यायचा आणि मनगट व कोपराचा आधार देत देत मोठा करायचा. अगदी पातळ झाला की मग खापरावर टाकायचा. कधीकधी मांडा सुळ्ळकन घसरुनही पडतो खापरावरुन. तसे होऊ नये म्हणुन काहीतरी जड ठेवतात वर. फोटोत मक्याचे दाणे काढल्यावर उरलेले कांड ठेवले आहे. एरवी त्याचा उपयोग सैपाकघरात जळण म्हणुन होतो.
एक बाजु पुरती भाजली गेली की मांडा उलटवायचा. मांड्याला खालच्या बाजुला कधीकधी आंच मिळत नाही त्यामुळे जळते लाकुड घेऊन त्याचा शेक देतात. दोन्ही बाजु शेकल्या की उतरवायचा आणि घडी घालायची.
http://www.youtube.com/watch?v=staE9-Vzts4
मला मांडे करुन पाहण्याचा खुप आग्रह झाला. पण इतक्या बायकांच्या फौजेसमोर आपले पितळ उघडे पडु नये म्हणुन मी नम्रपणे नकार दिला
साधना, मांडे प्रकरण आज समजले
साधना, मांडे प्रकरण आज समजले कसे व किती अवघड असते ते. कधी खायला मिळणार काय माहितं?
पुण्याला आत्ता जी 'भीमथडी
पुण्याला आत्ता जी 'भीमथडी जत्रा' झाली त्यामधे मांडे खाण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या असं पेपर मधे वाचलं.
(No subject)
हि माझी मांडे कहाणी. बरीच
हि माझी मांडे कहाणी. बरीच खटपट करून एक मातीचे मोठे गोलाकर बेस असलेले मडके आणले.

त्याला थोडा चुना लावला(काही गरज न्हवती असे वाटले नंतर)
१)तर हे एतिहासिक मडके,
२)घरात ब्रेड्साठी असलेले अमेरीकन स्टोर मधून आणलेले ब्रेड फ्लोर वापरले(तोच मुर्खपणा झाला, म्हणजे चव चांगली होती पण रंग म्हणजे ब्रॉउन पुर्ण, देवास ठावूक only wheat म्हणत काय टाकतात हि लोकं. मस्त तिंबले. मग पुरण करून असाअ मांडा बनवला.


३)पहिला मांडा काढला नाही तर फोटोग्राफर मांडे घेवून पळाला.


माझ्या चिकट हातानी मग मी काही फोटो काढू शकले नाही. तर हे अमेरीकन मांडे. :)
साधना,तुला व तुझ्या मित्राला थांकू.
चवीला काय अप्रतिम लागतात मातीच्या मडक्यावरचा मांडा हे कळले. मग त्याच्यावर चपाती पण केली लगे हात. दुसर्या दिवशी त्याच मूड मध्ये रुमाली रोटी केली. व अशी नवीन वर्षाची सर्व सुट्टी कारणी लावली.
मग सुट्टी कशी संपली ह्याचा विचार करत दुसर्या दिवशी कामाला. दुपारी ऑफीसात धन्य झाले एकेक मांडा खात पण. 
(कष्ट नक्कीच आहेत हो ...)
मनःस्विनी- तुझे पाय कुठे
मनःस्विनी- तुझे पाय कुठे आहेत?
हॅट्स ऑफ. धन्य धन्य तो उत्साह.
हा.. हाहा. धन्यवाद रैना.
हा.. हाहा. धन्यवाद रैना. ह्याच व इतर बर्याच कारणासाठी माझी आईच मला आजीबाई म्हणते.
आईला सांगितल्यावर आई लगेच,कशाला ती खटपट.. आराम करायचास ना?.
मनु.. तुझे पाय कुठे आहेत
मनु.. तुझे पाय कुठे आहेत गं... तु उगाच अमेरिकेत गेलीस.. इथे राहिली असतीस तर एका मोठ्ठ्या धावणा-या हॉटेलाची मालकीण झाली असतीस, आणि तुझ्याकडे मिळणारे खास पदार्थ त्यांच्या खास चवीसकट जगाच्या पाठीवर इतर कुठेच मिळाले नसते....
एनी वे, आता तिकडे गेलीसच आहेस तर तिकडे तरी सुरू कर हा उद्योग..... अन्नपुर्णेचे हात आहेत तुझे...
थांकू थांकू साधना. एवढी तारीफ
थांकू थांकू साधना. एवढी तारीफ नको गं. कसे तरीच वाटते.
खरच मनःस्विनी तुझे पाय कुठे
खरच मनःस्विनी
तुझे पाय कुठे आहेत? साधना म्हणते त्याबद्दल भविष्यात खरच नक्की विचार कर, एक झक्कपैकी रेस्तरॉ काढे इथे.
वॉव! खरेच तुझे कोतुक करावं
वॉव! खरेच तुझे कोतुक करावं तवढे कमी आहे.
सगळ्यांना धन्यवाद सजेशन्स
सगळ्यांना धन्यवाद सजेशन्स बद्दल. हॉटेल काढण्याइतका माझ्याकडे तरी इतका पैसा(स्वःताचा) नाहीये. भविष्यात विचार बहुधा केला जावू शकतो पण ज्या विषयात एवढे शिक्षण(संशोधन) घेतले ते फुकट. तेव्हा तुर्तास तरी आपल्या घरच्या लोकांना घालून आनंद मानते.
मनु, तुझी कमाल आहे बाई. काय
मनु, तुझी कमाल आहे बाई. काय सुरेख मांडे झाले आहेत. नवर्याला भरपूर कौतुक असणार तुझं. नशिबवान आहेस म्हणाव त्याला अशी बायको मिळाली म्हणजे.
चक्कर टाकली पाहिजे एकदा तुझ्याकडे.
थँक्स आर्च. यु आर मोस्ट
थँक्स आर्च. यु आर मोस्ट वेलकम.
धन्य आहेस बाई रोजचा स्वयपाक
धन्य आहेस बाई रोजचा स्वयपाक करुन कंटाळा येतो येवढा उतसाह कुठुन आना
मनःस्विनी, तुमचे मनापासुन
मनःस्विनी, तुमचे मनापासुन कौतुक.
मनू , आता मात्र
मनू , आता मात्र तुझ्याबद्दलचा आदर अजून वाढला .
महान आहेस .
आता एक सांग , तुझ्याकडे गॅस आहे की एलेक्ट्रीक प्लेट्स ? मडकं लगेच तापत असेल ना , म्हणून विचारलं .
आमच्याकडचा गहू ( wheat ) असाच लालसर दिसतो , म्हणून मी स्पेल्ट वापरते .
मने, तूच इकडे ये पाहू, रोज
मने, तूच इकडे ये पाहू, रोज तुझ्या हातचं खायला मिळेल
तुझा उत्साह वाखाणण्याजोगाच.
>>तुझ्याकडे गॅस आहे की
>>तुझ्याकडे गॅस आहे की एलेक्ट्रीक प्लेट्स ? मडकं लगेच तापत असेल ना , म्हणून विचारल>><<
माझ्याकडे ईलेक्ट्रीक कॉइल आहे. मडकं खूप तापत तेव्हा सांभाळून. आणि एक लक्षात ठेवायचे आतली हिट बिल्ड झाली की मडक्याला चिरा जावू शकतात तेव्हा शेगडी पुर्ण कवर न करता थोडी फट ठेवायची हवा जावू द्यायला. मी एक स्टीलचा चमचा पलिकडच्या बाजूला घातला होता.(चुल पण ह्याच तत्वावर चालते). मातीच्या भांडे सिझन करावे लागते. आदल्या दिवशी मी पुर्ण मडके पाण्यात डूबवून ठेवले होते. मग कोरडे केले व चुना लावून सुकवला. आधी गॅस वर तापवून जी स्टीम आली ती जावू दिली. कारण मडके पाणी खूप अॅबसॉर्ब करते. तेव्हा आधीची स्टीम जावू द्यायची मग पोळी टाकायची नाहीतर ओली होइल पोळी.
बरे ते मडके कुठूनही घ्याला त्यात लेड फ्री मातीच वापरली आहे ना हे बघा व त्याला ग्लेझ नसले पाहिजे. ग्लेझ असलेल्या भांड्यात जेवण शिजवू नये.
मातीच्या भांड्यातील जेवण का सुंदर लागते ह्याचे कारण हेच की पदार्थ त्याच्या स्वःताच्या ज्युस मध्येच शिजतो. तो कोरडा होत नाही. तापमान मेंन्टेन रहाते. व मडक्याने पाणी शोषले असल्याने त्याची स्टिम होते म्हणून पाणी विषेश न घालता मस्त होतो पदार्थ्.(हे मडक्यात आत पदार्थ कसा शिजला जातो ह्याविषयी अॅडशनल माहिती.).
मी ह्याच मडक्यात चमचमीत मटण केले, झक्कास लागले.
माझ्या नॉनवेज मैत्रीणीने बटाटा मटणाच्या रेसीपीत मूरवून माझ्या कडचे हे मडके घेवून मस्त चम्चमीत बटाटा रस्सा केला.
इति मडके पुराण सपंन्न.
सगळ्यांना थांकू.
सगळ्यांना थांकू.
मातीची भांडी तयार
मातीची भांडी तयार करण्यासाठी,
हे भांडे धुवून घ्यायचे.
मग त्यात पाणी भरुन २४ तास तसेच ठेवायचे,
मग ते पाणी ओतून दुसरे पाणी घ्यायचे.
मग ते आचेवर ठेवायचे, पाणी ५ ते १० मिनिटे उकळू द्यायचे. (कच्चे असेल तर यावेळी त्याला तडा जातो. नाहितर ते पक्के होते )
मग आच बंद करुन ते पाण्यासकट थंड करायचे.
मग उलटे करुन पुर्ण कोरडे करायचे.
मग वापरायला घ्यायचे. गोव्यात अजूनही मातीची भांडी जेवण शिजवण्यासाठी वापरतात.
कधी काळी (म्हणजे माझ्या हयातीत ) मायबोलीकरांचे अखिल जागतिक अधिवेशन (पुण्यात नव्हे ) झाले
तर मन:स्विनी आणि मी मिळुन एक बारिकसा स्टॉल टाकू.
अगदी अगदी. आणि हो!
अगदी अगदी. आणि हो! मायबोलिकरांसाठी असेल तर बारिकसा नको. आम्ही चांगले खादाड आहोत. आम्ही मेनुवरचे आयटम्स सांगूच.
>>हे भांडे धुवून घ्यायचे. मग
>>हे भांडे धुवून घ्यायचे.
मग त्यात पाणी भरुन २४ तास तसेच ठेवायचे,
मग ते पाणी ओतून दुसरे पाणी घ्यायचे.
मग ते आचेवर ठेवायचे, पाणी ५ ते १० मिनिटे उकळू द्यायचे. (कच्चे असेल तर यावेळी त्याला तडा जातो. नाहितर ते पक्के होते )
मग आच बंद करुन ते पाण्यासकट थंड करायचे.
मग उलटे करुन पुर्ण कोरडे करायचे.
मग वापरायला घ्यायच>><<
दिनेश, अगदी अगदी. मी हिच तुमची मेथड वापरली. पण इथे कंटाळून थोडक्यात लिहिली.:)
हि असे मातीचे भांडे सिझन आईनेच करायला सांगितले.
मी हे आत्ता पाहीलं... "मनू ,
मी हे आत्ता पाहीलं... "मनू , आता मात्र तुझ्याबद्दलचा आदर अजून वाढला " संपदाला १०० % अनुमोदन ! धन्य आहेस तु !
साधना , लेख आधीच वाचला होता ,
साधना , लेख आधीच वाचला होता , व्हिडिओ आज पाहिला , ठांकु ! व्हिडीओ उपलोड केल्याबद्दल .

मला वाटतं मांडे बनवणे ही जगातली सर्वात अवघड पाककला असेल , किती सुंदर रितीने त्या आज्जीनीं मांडे बनवलेत .
बोले तो एकदम झकास !
असं वाटतं की व्हिडीओत घुसुन , मांडे खापरावरुन काढुन खाऊन टाकावे
मनःस्विनी अभिनंदन येवढा अवघड प्रकार तो ही इथे , Hats Off to You !
कधी काळी (म्हणजे माझ्या
कधी काळी (म्हणजे माझ्या हयातीत ) मायबोलीकरांचे अखिल जागतिक अधिवेशन (पुण्यात नव्हे ) झाले तर मन:स्विनी आणि मी मिळुन एक बारिकसा स्टॉल टाकू.
कृपा करा आमच्यावर आणि तो 'कधी काळी' हा शब्दप्रयोग बदला आणि 'लवकरात लवकर' हे सुंदर शब्द तिथे घाला..... माझी तर पुण्याचीही तयारी आहे......
मातीच्या भांड्यात दालखिचडी,
मातीच्या भांड्यात दालखिचडी, बिर्यानी वगैरे लै भारी होतात.
मंडळी, मनातले मांडे आता ईथे
मंडळी, मनातले मांडे आता ईथे मिळतील,
http://72.78.249.124/esakal/20100117/5747134687429107641.htm
पुण्यातील लोकं लकी आहेत. आयता
पुण्यातील लोकं लकी आहेत. आयता मिळेल. पण खरेच हा पदार्थ मस्त लागतो, मातीच्या मडक्याचा सुगंध सुटतो...
मला पण आताच पाहिजे आत्ताच
मला पण आताच पाहिजे आत्ताच आईला फोन केला
साधना, तूला हा ओमानी प्रकार
साधना, तूला हा ओमानी प्रकार कधीचा दाखवायचा होता.
http://www.youtube.com/watch?v=J8HfG61o4iw
Pages