मांडे हा शब्द मी पहिल्यांदा साधारण दुसरी-तिसरीत असताना मराठीच्या पुस्तकात वाचला. मनातल्या मनात मांडे खाल्ले, मनातले मांडे मनातच जिरले.. वगैरे वाचुन मांडे म्हणजे काहीतरी खायचा पदार्थ आहे हे लक्षात आले. पण हा पदार्थ दिसतो कसा, खातात कशाबरोबर इत्यादी प्रश्न मनात उपस्थित झाले. म्हणजे तसे मला तेव्हा जिलेबी, पुरणपोळी इत्यादी पदार्थही कसे दिसतात ते माहित नव्हते. पण ते शब्द कानावरुनही गेले नव्हते, त्यामुळे अर्थात दिसतात कसे हा प्रश्न उपस्थित झाला नव्हता.
मग काही दिवस मी आईच्या मागे भुंगा लावुन दिला, 'मांडे म्हणजे काय ते मला सांग.' आता आंबोलीसारख्या खेड्यात राहणा-या माझ्या आईनेही मांडे कधी ऐकले नव्हते. ती मला काय सांगणार कप्पाळ??!! तिला फक्त तांदळापासुन बनवण्यात येणारे पोळ्या, खापरोळ्या, शिरवाळ्या इत्यादी पदार्थ माहित होते. शेवटी तिने मांडे हे आंबोळीसारखेच असतात असे मला सांगुन स्वतःची सुटका करुन घेतली. सगळे जग तांदुळमयच आहे यावर माझा तेव्हा खुपच विश्वास होता, त्यामुळे मीही मांडे हा आंबोळीसारखा दिसणारा, तांदळापासुन बनवलेला काहीतरी गोड गोड पदार्थ आहे असा माझा समज करुन घेतला. कालांतराने मी हे सगळे विसरुनही गेले.
काही वर्षांपुर्वी लोकप्रभाचा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील पदार्थांवर एक विशेषांक निघाला होता. त्यात मांड्यांचा उल्लेख वाचला. परत सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. पण एक पदार्थ म्हणुन मांड्यांबद्दल काहीच माहिती त्या अंकात दिली नव्हती. लेखकाने 'मांडे खुप मोठे होते, एकाचे चार तुकडे करुन आम्ही खाल्ले' म्हणुन लिहिले होते. परत माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू..... इतका मोठा पदार्थ की चारजणांना खावा लागला? नक्कीच लेखकाची खाण्याची क्षमता कमी असणार.......
तेव्हा इंटरनेट वगैरे फारसे नसल्याने गुगलुन वगैरे पाहताही आले नाही.. (आता सगळे कसे सोप्पे झालेय ना?? डोक्यात प्रश्न आला की चला लगेच गुगलवर...... )
मांड्यांना मी परत एकदा विसरले. तीनचार वर्षांपुर्वी ऑफिसात सटाणा-नाशिकच्या एका मित्राने पुरणपोळीसदृष्य एक पदार्थ आणला. एकदम पातळ कवर आणि त्यात अतिशय कोरडे असे गोड सारण. आकार कसा असणार याचा पत्ता लागेना कारण त्याने तुकडे करुन आणलेले. हे काय आहे असे विचारल्यावर तो म्हणाला, आमच्याकडे ह्याला मांडे म्हणतात. तुम्ही पुरणपोळी म्हणा आणि खा. मी एकदम उडीच मारली. म्हटले, गेले कित्येक वर्षे मी जे मांडे मांडे म्हणुन ऐकतेय ते आज असे अचानक पुढ्यात आले....
मग त्या मित्राला विचारले कसे करतात वगैरे वगैरे. तो म्हणाला, खुप कठीण आहेत करायला. माझी आई हातांवर अश्शी अश्शी फिरवुन करते आणि मग खापरावर भाजते. मी परत बुचकळ्यात. आमच्याकडे मातीचे मडके फुटले की त्याच्या तुकड्याला खापर म्हणतात. आता ह्या लोकांनी खापराच्या तुकड्यांवर कसे काय भाजले असणार हे मांडे. छ्या.. खुप गर्दी झाली डोक्यात विचारांची. त्या मित्राला माझी दया आली. तो म्हणाला, कधीतरी माझ्या गावी ये आणि बघ कसे करतात ते मांडे.
तर मित्रांनो, माझ्या त्या दिव्य मित्राच्या घरी जाऊन मांडे बघण्याचे भाग्य मला ह्या दस-याला लाभले. त्याच्या घरी चक्रपुजा होती. त्या निमित्ताने त्याने बोलावले. म्हणाला, मांडे हा चक्रपुजेतला एक महत्वाचा घटक आहे, तर तुला त्या निमित्ताने पहायला मिळेल मांडे कसे करतात ते. मी मग अगदी सुरवातीपासुन पाहिले मांडे कसे करतात ते आणि तुमच्यापैकी कोणी माझ्यासारखेच अज्ञ असतील मांड्यांच्या बाबतीत तर त्यांचेही अज्ञान दुर व्हावे म्हणुन इथे लिहिण्याचा उद्योग करतेय...
बाकी हे मला पाककृतीतही टाकता आले असते, पण जी पाकृ मला ह्या जन्मात करायला जमणार नाहीय ती उगाच इथे टाकायला जीव धजावला नाही. इथे टाकण्यासाठीची पाकृ आधी आपल्याला तरी करता यायला पाहिजे ना.....
तर मंडळी, आता मांड्यांच्या पाकृ बद्दल.
मांड्यांचे सारण आपण पुरणपोळीचे करतो तसेच करतात. चणाडाळ धुवुन चुलीवर शिजत ठेवतात, शिजली की मोठ्या चाळणीवर ओतुन पाणी पुर्णपणे काढतात आणि मग परत चुलीवर चढवुन तिच्यात गुळ घालुन गुळ शिजेपर्यंत आणि सारण थोडे सुकेपर्यंत ढवळत राहतात. गरम असतानाच पाट्यावर वाटायचे. मिक्सरवर वाटले तरी चालते. एकदम बारीक वाटले गेले म्हणजे झाले.
सारणाचा वेगळा फोटो नाहीय, पण खालच्या फोटोत सारण दिसतेय, त्यावरुन अंदाज येईल सारण कसे दिसत असेल त्याचा.
मांड्यांचे कवर पाहुन ते मैद्याचे केलेय असे वाटते पण ते तसे नाहीय. अगदी उत्तम प्रतिचा लोकवण वगैरे गहु घ्यायचा, तो स्वच्छ धुऊन उन्हात वाळवायचा आणि जात्यावर अगदी बारीक पिठ दळायचे. जर गिरणीवर दळुन आणले तरी चालते. नंतर चाळणीने चाळण्याऐवजी वस्त्रगाळ करुन घ्यायचे. पिठ वस्त्रगाळ करुन घेतले नाही तर मांडा बनवताना कडेला जाड राहतो, भाजताना कडा निट भाजल्या जात नाहीत आणि मग तेवढी गोल कड काढुन टाकावी लागते.
मग हवे तितके पिठ घेऊन थोडे तेल घालून, मीठ घालुन पाण्याने भिजवायचे. मीठ अगदी नेमके, योग्य प्रमाणात घालायला हवे, कारण कमी पडले तर मांडा करताना मोडतो. साधारण पोळ्यांसाठी भिजवतो तसे भिजवायचे नी मग त्याला तासभर तरी तेल लावुन उलटेसुलटे फिरवत तिंबत बसायचे. तासाभराने अगदी मैद्याच्या पिठासारखा पोत आणि लवचिकपणा येतो या पिठाच्या गोळ्याला. सारणापेक्षा पिठ निट जमायला हवे, नाहीतर सगळेच ओम्फस व्हायचे. मांडा करताना मोडत असल्यास मीठ बरोबर पडले का ते चेक करतात आणि कमी असल्यास घालुन परत मळतात. मग मांडा न मोडता व्यवस्थित होतो.
पिठ भिजवणा-या आजीबाईंनी दोन चमचे पुरण टाकले पिठात आणि परत एकदा तिंबुन मग झाकुन ठेवले गोळ्याला. असे केल्याने छान लाटले जाते म्हणे.
आता पिठ आणि सारण दोन्ही तयार आहेत. तिन विटा मांडुन वेगळी चुल लावली जाते. अर्थात आज भरपुर मांडे करायचे असल्याने ही सोय केलीय. अन्यथा रोजच्याच चुलीवर खापर ठेऊन मांडे भाजायचे. हे खापर म्हणजे खास मांडे भाजण्यासाठी बनवलेलेल मातीचे भांडे! साधारण १५०-२०० रु. पर्यंत किंमत असलेले हे मडके दिसायला दोन बशा एकमेकींवर उपड्या ठेवल्या तर जशा दिसतील तसे दिसते. त्याला खालच्या बाजुने तोंड असते. तिच्यातुन धग वरपर्यंत पोचुन मांडे भाजले जातात. शहरवासिय मांडेप्रेमींसाठी गॅसवर वापरता येतील अशी लहान आकाराची खापरेही आता बाजारात मिळु लागलीत अशी माहिती आजीबाईंनी दिली.
तर आता मांडा बनवतात कसा ते पाहु. प्रथम आपली मोठी पोळी असते त्या आकाराच्या दोन पोळ्या करुन घेतात. मग साधारण नारळाच्या आकाराचा सारणाचा गोळा घेऊन त्याला ह्या दोन पोळ्यांच्या मधे ठेवतात. बाजु हळु बंद करुन घेतात आणि मग बाजुबाजुने हळुवारपणे लाटायचं. लाटताना पोळपाट न वापरता मोठे ताट उपडे घालुन त्यावर लाटतात म्हणजे मोठा पृष्ठभाग मिळतो लाटायला. लाटत लाटत ताट भरले की पोळी हळुच उचलुन हाताने फिरवायची. फिरवत फिरवत अलगद दोन्ही हात आडवे घेऊन कोपरांचा आधार द्यायचा आणि कोपराकोपरांनी मांड्याला फिरवायचे. हे काम जलद करावे लागते त्याचबरोबर जपुनही करावे लागते. जलद अशासाठी की सारण सरकून एकाच बाजुला यायला नको आणि हे करताना मांडा मोडु नये म्हणुन जपायचे.
असा तयार झालेला मांडा आता खापरावर टाकायचा. एवढा मोठा मांडा गोल आकाराच्या खापरावर अजिबात चुणी वगैरे न पाडता टाकणे ही सुद्धा एक मोठी कला आहे असे वाटले पाहुन.
मांडा खापरावरुन घसरुन पडु नये म्हणुन कधीकधी काहीतरी जड ठेवतात वर.
मग एका बाजुने भाजला की अलगदपणे आणि अतिशय वेगात तो उलटवायचा.
दोन्ही बाजु भाजल्या की खाली काढायचा आणि जरा थंड झाला की घडी घालायची. ही घडी आयताकृती घालतात. जर कोणी नुसती घडी बघितली की त्याला पत्ताच लागणार नाही हा पदार्थ गोल आहे ह्याचा.
आपण पुरणपोळीला वरुन तुप लावतो तसे मांड्यांना तुप वगैरे काही लावत नाहीत. चणाडाळ शिजवल्यावर जे पाणी काढतात त्याचीच आपण कटाची आमटी करतो तशी आमटी करतात. त्यात मांडा बुडवुन खातात. तसेच दुध थोडे आटवुन त्यात साखर घालुन बासुंदीसारखे करतात. चक्रपुजेला हे दोन प्रकार करतात आणि मांडा त्यात बुडवुन खातात.
आंब्याच्या मोसमात आमरस करायचा आणि सोबत मांडे! एरवी एक माणुस फक्त अर्धाच मांडा खाऊ शकतो एकावेळी. पण आमरस केल्यास मात्र १ ते दिड मांडा एक माणुस सहजपणे खाउन जातो अशी आमरसाची किमया आजोबांनी ऐकवली!!!!
चक्रपुजा ही घरात धनधान्य भरपुर यावे, समृद्धी यावी यासाठी केली जाते असे मला पुजेचे स्वरुप पाहुन वाटले. सांज्याच्या करंज्या करतात, त्यांना सांजोरी म्हणतात. गुळाचे पाणी घालुन गव्हाच्या गोड पु-या करतात, त्यांना सोळी म्हणतात.
पुजा मांड्ताना एका बाजुला वीटा रचुन होमाची तयारी करतात. होमापुढे तांदुळ पसरतात आणि मुठीत तांदुळ घेऊन एकात एक अशी पाच्-सात वर्तुळे काढतात. त्या वर्तुळावर घरच्या बागेतल्या आंबा, सिताफळ, लिंबु वगैरे झाडांच्या छोट्या फांद्या अंथरतात. त्यावर गोलाकारात मांडे रचतात. मधे एक आणि बाजुला गोल दहा मांडे असे अकरा मांडे रचतात. मांड्यांवर सोळी, सांजोरी लावतात. तळलेल्या कुरडया रचतात. त्यावर दहा दिवे आणि मध्ये एक मोठा दिवा (ह्याला मेंढ्या म्हणतात) असे पिठाचे दिवे ठेवतात. हे दिवेही आधी बनवुन उकडुन तयार ठेवतात.
होम पेटवल्यावर होमाच्या ज्योतीने मधला दिवा आणि बाजुचे दहा दिवे पेटवतात. मग सगळ्यांनी नमस्कार करायचा. सगळे झाले की पंगत बसते आणि मग मांड्याचा यथायोग्य समाचार घेतला जातो.
तर असे हे मांडेपुराण.... आवडले तर पुढच्या वर्षी माझ्याबरोबर चला चक्रपुजेला....
विडिओज पण घेतलेले आहेत. खाली लिंक्स दिल्यात त्या कृपया पाहा. आवाज मात्र शुन्यावर ठेवा, अर्थात ज्यांना अहिराणी बडबड ऐकायची असेल त्यांनी ऐकावी....
विडिओ मी आता नीट लावले आहेत. पहिला आहे दोन छोट्या पोळ्या करण्याचा.
http://www.youtube.com/watch?v=BuTJlQbDfjo
दोन पोळ्या झाल्या की नारळाएवढे सारण घ्यायचे आणि भरायचे दोन पोळ्यांमध्ये आणि मग मांडा लाटायला घ्यायचा.
http://www.youtube.com/watch?v=2LFboZydbvo
जरासा मोठा झाला की अलगद हातावर उचलुन घ्यायचा आणि मनगट व कोपराचा आधार देत देत मोठा करायचा. अगदी पातळ झाला की मग खापरावर टाकायचा. कधीकधी मांडा सुळ्ळकन घसरुनही पडतो खापरावरुन. तसे होऊ नये म्हणुन काहीतरी जड ठेवतात वर. फोटोत मक्याचे दाणे काढल्यावर उरलेले कांड ठेवले आहे. एरवी त्याचा उपयोग सैपाकघरात जळण म्हणुन होतो.
एक बाजु पुरती भाजली गेली की मांडा उलटवायचा. मांड्याला खालच्या बाजुला कधीकधी आंच मिळत नाही त्यामुळे जळते लाकुड घेऊन त्याचा शेक देतात. दोन्ही बाजु शेकल्या की उतरवायचा आणि घडी घालायची.
http://www.youtube.com/watch?v=staE9-Vzts4
मला मांडे करुन पाहण्याचा खुप आग्रह झाला. पण इतक्या बायकांच्या फौजेसमोर आपले पितळ उघडे पडु नये म्हणुन मी नम्रपणे नकार दिला
गेल्या वर्षी दौलताबादजअवळ एका
गेल्या वर्षी दौलताबादजअवळ एका फार्महाउसवर हुरडा खायला गेलो होतो. तिथे जेवणामध्ये होते मांडे. त्यावेळी मी पहिल्यांदाच बघितला हा प्रकार. करताना पण बघायला मिळाले. पण आधीच पोटभर हुरडा हादडल्यामुळे मांडे नुसते चवीपुरते खाल्ले.
साधना मस्त लिहिलेस. फोटो अन व्हिडिओ पण छान.
आय हाय! कशाला आठवण काढून दिली
आय हाय! कशाला आठवण काढून दिली साधनाताई. आता मनातच मांडे खावे लागणार
मस्त माहिती न फोटो.
साधना मस्त लिहिलेस. माझ्या
साधना मस्त लिहिलेस.
माझ्या बहीणीची जाऊ हे मांडे ऑर्डर प्रमाणे करून देते, ती चिंचवडात (पुणे) असते.. दसरा, होळी दरम्यान तर हमखास मिळतातचं.. इतर वेळी जर मोठी ऑर्डर असेल तर करून देते. याला खुप कष्ट पडत असल्याने इतर वेळी ती फक्त मोठी ऑर्डर असेल तरच घेते..
कुणाला अगदीच इच्छा झाली तर मला विपूमधे लिहा. मी पत्ता देईल..
साधना, खुपच छान माहिती आणि
साधना,
खुपच छान माहिती आणि मांडणी!
माहिती ही सविस्तर आहे. खुप आवडली.
मी ही खांदेशीच आहे आमचे घरी बनवतात हा प्रकार. आमची भाषाही अहिराणी आहे. त्याचा बाफ ही चालु आहे.
पण, एक सुधारणा सुचवाविशी वाटते ती अशी-
ह्या प्रकारास खापराची पुरणपोळी म्हणतात. मांडे हे पुरण्/सारण रहित असतात. ते मटना सोबत खातात (गोष्-मांडे).
या पुरणाच्या काढलेल्या पाण्यापासुन जी आमटी / रस्सा बनविला जातो तो खुप चविष्ठ असतो बर का?
आणि पुरणपोळी या आमटी सोबत खात नाही. त्याबरोबर दुध-तांदळाची खिर, आंब्याचा रस आणि बासुंदी प्रामुख्याने खातात.आमटी सोबत भात. त्याच बरोबरचा मेनू असा- भजे, कुरडई, तळलेले नागलीचे पापड. नागली चा (नाचणीचा) पापड हाही आमचे कडील फेमस आयटम, जो खांदेशच्या बाहेर मिळत नाही. या एकदा चवी घ्यायला.
खापराच्या पुरणपोळी तयार करणे ही एक कला आहे. विशेष प्रशिक्षणा शिवाय ती करता येत नाही. पुर्वी ज्या महिलेला ही पुरणपोळी येत नसे. ती पुर्ण गृहिणी नाही असे माणत. परंतु आता नविन पिढीतील बोटावर मोजण्या एव्हढ्या गृहीणींना हा प्रकार करता येतो. हळु हळु खापराची पुरणापोळी ही नामशेष होईल कि काय अशी भिती निर्माण झाली आहे.
तुमच्या या प्रयत्नामुळे पुरणपोळी नवी पिढी पुढे नक्कीच शिकेल अशी आशा वाटते.:)
माझ्या आईच्या माहेरी चांदवड
माझ्या आईच्या माहेरी चांदवड तालुक्यात हा प्रकार होतो. आई ला नाहि येत, कारण आजीला आवडत नसे कोणी मध्ये मध्ये केलेलं. आजी कडे तर पुरण दळण्यासाठी एक खास जातं होतं. हे मांडे बर्यापैकी टिकतात हि. नासिकला आम्हांला आजी १-२ दिवसांनी पाठवायची तरी मस्त असायचे तसेच मऊसुत. आता आजी बनवत नाहि. मामी बनवते, पण आम्हा सगळ्या मावस, मामे भावंडांच्या मते तिला आजीसारखे नाहि बनवता येत.
आता कधी खायला मिळेल माहित नाहि.
पत्र्याचा खापर मिळतो, पण त्याच्यावर मातीसारखी खमंग चव येत नाहि. आई गं साधना आता साधं भाजी पोळीचं जेवण काहि जाणार नाहि.
माझ्या एका साबांनी बंगलोरहून
माझ्या एका साबांनी बंगलोरहून मांडे करून आणले होते. पण त्यात पिठीसाखर तुपाचे सारण होते. व ते अगदी असे कुर्कुरीत व खुसखुशीत सुद्धा होते. आपल्या पुण्यातल्या चितळ्यांकडेही मिळायचे पण ते ही मी वर उल्लेखल्याप्रमाणे होते.
असो..........मस्त लिहिलय व फोटोही.
छान च जुन्या आठवणी ताज्या
छान च जुन्या आठवणी ताज्या झाल्यात
मस्त्! मी हे करताना बघितले
मस्त्! मी हे करताना बघितले आहे, खुप कौशल्याच आणी निगुतिच काम आहे.
विशेष करुन 'मांडा' हातावर वाढवायच काम फारच जपुन कराव लागत.
मस्तच. फोटो आणि कृती
मस्तच.
फोटो आणि कृती दोन्हीही.
ते फोटो तर इतके मस्त दिसतायत की पटकन उचलुन खावेसेच वाटायला लागलय मला
फारच अवघड काम दिसतय पण एकुणच.
मी पण खुप वर्ष माम्डे मांडे ऐकत होते पण कधी पाहिलेच नव्हते. उत्सुकता मात्र खुप होती. शेवटी गेल्या वर्षी मिळाले. पुण्यात कमला नेहरु उद्याना समोरच्या जोशांकडे मिळतात. त्यांनी तसा बोर्डही लावलाय..
बापरे, किती कौशल्याचं काम हे!
बापरे, किती कौशल्याचं काम हे!
साधना, इथे ही माहिती, कृती आणि फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद.
व्हिडिओ पण बघितले. दुसर्या व्हिडिओत काय मस्त मांडा केला त्या बाईंनी हातावर! भारीतला भारी पिझ्झा शेफसुध्दा जवळपास पोचू शकणार नाही! (बॅकग्राउंडमधली बडबड सुध्दा गोड वाटली कानांना! चहाच्या गप्पांसगट!
)
भारी चविष्ट प्रकरण दिसतेय
भारी चविष्ट प्रकरण दिसतेय हे...पण भलतेच अवघड ! आपण आपले पुपोवरच समाधान मानावे.
मस्त माहिती दिलिस साधना ! फोटुपण मस्त ! व्हिडिओ बघते आता.
भयंकर अवघड आणि कौशल्याच काम
भयंकर अवघड आणि कौशल्याच काम आहे. फोटो मस्तच आहेत. आणि माहितीही फार आवडली.
छान माहिती दिलीए. कधी खायला
छान माहिती दिलीए. कधी खायला मिळतिल?
साधने, यू-ट्यूबरील तिन्ही
साधने,
यू-ट्यूबरील तिन्ही क्लिपा पाहिल्यात. कसला अवघड प्रकार आहे हा!!!! ती जी दुसरी स्त्री होती तिने केलेले मांडे फार मोठे होते आणि मधेच तिनी त्या मांड्यावर काय ठेवले. काहीतरी रिळ सारखे दिसत होते ते. मागे चहा टाकते म्हणणारी तू होतीस का? चहा फिका होतो वगैरे वगैरे म्हणत होतीस. कारण त्या सर्वांमधे तोच एक आवाज अहिराणी नव्हता.
पुरुष नुसतेच येऊन पुजेला बसलेत. या बाप्यांनाही जरा द्यायचे मांडे करायला
खुप खुप धन्यवाद साधना. मलाहि
खुप खुप धन्यवाद साधना. मलाहि मांदे फक्त त्या वाक्प्रचारापुरते माहित होते. फारच कौशल्याचे काम आहे, मलाहि असच वाटल कि त्या पिझ्झा शेफ्स च एवढ कौतुक होत पण त्यापेक्षाहि कठिण अश्या या आपल्याच प्रकाराचि आपल्यापैकि बर्याच झणांना (माझ्यासकट) साधि माहिति सुध्धा नव्हति :(. तू हे आमच्यापर्यंत पोहचवलस म्हणुन तुझे विशेष आभार आणि करुन बघण्याचे धाडस आणि त्यासाठि खास खापराचि सोय केलि म्हणुन मनु तुला हॅट्स ऑफ!
अशा कलाकराना नावासकट
अशा कलाकराना नावासकट प्रसिद्धी द्यायला हवी. हातात बांगड्या असताना, हा प्रकार हातावर विस्तारणे किती कठीण आहे, त्याची कल्पना येणे कठीण आहे.
रमा, अग अजून खापरावर करून
रमा, अग अजून खापरावर करून पहायचे आहेत. एक मडकं आणलय. येत्या शनिवारी करेन.
उद्या दत्त जयंती पण आहे पण ऑफीस नसते तर केले असते उद्यालाच. इतले वाचूनच करायचा मोह होतोय.
मी मांडे हा प्रकार आमच्या कामवाली बाईकडून एकला होता लहानपणी. तिला आईने पूपो दिली की तिची नेहमीची कमेंट की तुमचे मांडे खूप लहान आहेत.(अर्थात मांडे खूपच मोठे व पातळ असतात).
आईने एकदा विचारलेच की काय ग असतात ते?
पण घरी कधी केले नाहीत. बर्याच वर्षाने त्याची आठवण मला आली. मग इथे तिथे लिंका शोधून, साधनाने,दिनेश ह्यांना विचारून केले कसे तरी.(तेव्हा पासून साधनाने लिहिणार सांगितले होते. :))
साधना, त्या फोटोतल्या काकींनी चुना लावला होता का खापरावर?
साधना लेख, फोटो सर्वच छान!
साधना लेख, फोटो सर्वच छान! रात्री व्हिडिओ बघिन. मामींनी वर म्हटल्याप्रमाणे खरच हा सांस्कृतीक ठेवाच. खूप खूप धन्यवाद.
वॉव! काय मस्त प्रकार आहे ..
वॉव! काय मस्त प्रकार आहे .. छान माहिती दिली आहे .. एकदा खायला मिळाले तर काय मजा येईल ..
माझ्या एका साबांनी बंगलोरहून मांडे करून आणले होते >> तुम्हाला किती साबा आहेत हो? :p
मस्त आहेत व्हिडिओ.
मस्त आहेत व्हिडिओ.
मांडेपुराणही छानच.
हातावरची भाकरी, पिझ्झा, रुमाली रोटी आणि हे मांडे.. तंत्र थोडंफार सारखंच आहे. इथे आहे रुमाली रोटी, कोणाला पहायची असल्यास. त्या शेफने तसे व्यवस्थित सांगितले आहे - http://www.youtube.com/watch?v=2P7eLAt-iOM
साधना ! मला आताच वाढ मांडा
साधना ! मला आताच वाढ मांडा
खुपच छान! आम्ही सुट्टीत
खुपच छान! आम्ही सुट्टीत भारतात गेल्यावर खास मांडे खाण्यासाठी मामाच्या गावाला जातो (वाजगाव, देवळा). मागच्या सुट्टीत जायला जमले नाही तर मांडे कटाच्या आमटीसह आमच्या पर्यंत पोहोचले. ईथे मुले आवर्जुन मांड्यांची आठवण काढतात आणी मी ते का बनवत नाही हेही विचारतात. असो.
साधना, काय भारी पदार्थ
साधना,
काय भारी पदार्थ दाखवलास!!!. त्या बायकांना मांडे करताना पाहुन खुप कॉम्पेक्स आलाय. खरच कोणी फाइव्हस्टार हॉटेल चा शेफ जवळपास पण जाउ शकणार नाही. साध्या पोळ्या करताना पण माझी किती नाटक असतात, जर पीठ चांगल नसेल, तवा नेहेमीचा नसेल तर आणि गॅस तर मस्ट, स्टोव्हवर पण स्वैपाक जमत नाही आणि या बायका चुलीवर इतक सहज पणे करतात. मांडे करताना प्रत्येक स्टेजला कौशल्य हव, ह्या बायकांना साष्टांग नमस्कार , आणि तुमच्यापैकी बर्याच जणी/आणि दिनेशदादांनी पण करुन पाहिलेत ना मांडे, तर तुम्हाला पण दंडवत!!!! मी फक्त खाउ शकीन, ( मनातच खावे लागतील तेही , कारण कुठे मिळतील?)
अशा कलाकराना नावासकट प्रसिद्धी द्यायला हवी. हातात बांगड्या असताना, हा प्रकार हातावर विस्तारणे किती कठीण आहे, त्याची कल्पना येणे कठीण आहे. >>>> खरयं दिनेशदा
साधना, फोटो आणि माहिती सुध्दा छान दिलियेस- हे सांगायचच राहिलं
कर्नाटकात लग्नात जेवायला
कर्नाटकात लग्नात जेवायला मांडे करतात.... मी मात्र असे मांडेवाले एकही लग्न अटेंड केले नाही अजुन

मस्त ! ७-८ वर्षाचा असताना
मस्त !
७-८ वर्षाचा असताना कुणाच्या तरी घरी पाहीलं होतं मी हे अवघड प्रकरण....कुतुहलापोटी ही खापरावरची पुरणपोळी त्यावेळी खाल्ली होती. नाहीतर मी.... आणि पुरणपोळी .....Noway!!
साधना, खूप मस्त माहीती आणि फ़ोटो ! Good Job!
मस्त! व्हिडीयो जबरी आहेत..
मस्त! व्हिडीयो जबरी आहेत.. त्या सर्व मावश्यांना दंडवत! काय कौशल्य आहे!
साधना, हे आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार!
मस्तच माहिती. अगदि मुक्ताबाई
मस्तच माहिती. अगदि मुक्ताबाई आनि ज्ञानेश्वर महाराज यांची आठवण झाली. मला वटत की ही खानदेशी पुरणाची पोळी असवी. खानदेशात पुरणाची पोळी आणि अंब्याचा रस बरोबर खतात एक पक्वान्न म्हणून.
मस्त माहिती. धन्यवाद, साधना.
मस्त माहिती. धन्यवाद, साधना.
साधना, खूप छान माहीती आणी
साधना, खूप छान माहीती आणी लिखाण!! फोटो व व्हिडिओ दोन्ही मस्त!!
साधना, मस्त लेख... फोटो आणि
साधना, मस्त लेख... फोटो आणि व्हिडिओदेखील जबरी आहेत.
Pages