महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

महाराष्ट्रराज्यस्थापनेचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. संयुक्त महाराष्ट्राचे एक शिल्पकार असलेल्या आचार्य अत्र्यांनी 'माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकीच्या राज्यांना फक्त भूगोल आहे', असे उद्गार काढले होते. आज एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थित्यंतरं वेगाने घडत असताना महाराष्ट्र व मराठी या दोहोंच्या भविष्याची आखणी करणं गरजेचं झालं आहे. मात्र भविष्याचा वेध घेताना भूतकाळ तपासून बघणं आवश्यक ठरतं. आचार्य अत्र्यांनी उल्लेखलेल्या इतिहासाचा वेध हा महाराष्ट्राच्या व मराठीच्या भूतकाळाचा प्रवासच आहे.

maharashtra_monu.jpg

महाराष्ट्र हे नाव तसं फार जुनं नाही. वराहमिहिराच्या ग्रंथात (इ.स. ५०५) आणि सत्याश्रय पुलकेशी याच्या इ.स. ६११ सालातील बदामीच्या शिलालेखात महाराष्ट्राचा प्रथम उल्लेख सापडतो. आपण हल्ली ज्या प्रदेशाला महाराष्ट्र म्हणतो, तो पूर्वी दक्षिणापथ या नावानं ओळखला जात असे. दक्षिणापथ म्हणजे दक्षिणेकडील मार्ग व दक्षिणेच्या मार्गावरील प्रदेश. दक्षिणेकडील प्रदेशाची नीटशी कल्पना उत्तरेकडील आर्यावर्तांत राहणार्‍या आर्यांना नसल्यामुळे त्यांनी या अज्ञात प्रदेशाला दिशादर्शक असं मोघम नाव दिलं.

दक्षिणापथ हे नाव तसं पुरातन आहे आणि ते विंध्यपर्वताच्या दक्षिण परिसराच्या खालच्या प्रदेशास लावण्याचा प्रघात होता. ख्रिस्तपूर्व काळातील पेरिप्लुस (सागरी मार्गाचे नकाशे) या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. त्यांत दक्षिणापथ या देशास Dakhinabhades असं नाव देऊन त्यांत भडोचपासून (Bargaza) द्रविड देशातील (Damiriea) व्यापारी पेठेच्या शहरांपर्यंतचा अंतर्भाव केलेला आहे. हे जे दामिरिच म्हणून शहर पेरिप्लुसांत लिहिले आहे, ते मार्कंडेय पुराणात सांगितलेलं दामरह नावाचं शहर असावं. इ. स. ३३०च्या सुमारास राज्य करणारा समुद्रगुप्त राजा आपल्या शिलालेखांत दक्षिणापथ म्हणजे नर्मदा नदीपासून थेट कन्याकुमारीचा प्रदेश असं म्हणतो. याच्या पुढचा ६०० वर्षांनंतरचा राजशेखर (इ.स. ९००-९४०) नावाचा ग्रंथकार हा आर्यावर्त आणि दक्षिणापथ या दोन प्रदेशांच्यामधील मर्यादा रेवा नदी असल्याचं सांगतो. याच काळातला चालुक्य कुळातील पहिला राजरज (इ. स. ९८५) हा दक्षिणापथाची मर्यादा नर्मदेपासून रामाच्या सेतूपर्यंत नेऊन या दोन्हींमधील प्रदेश पहिल्या विष्णुवर्धनाने (इ.स.६००) जिंकल्याचं सांगतो.

निरनिराळ्या काळातल्या ग्रंथकारांनी दक्षिणापथाची मर्यादा ही अशी सांगितली आहे. उत्तरमर्यादा नर्मदा आणि दक्षिणमर्यादा मात्र अनिश्चित अशी दक्षिणापथाची स्थिती होती. कधी कधी महाराष्ट्रदक्षिणापथ ही दोन्ही नावं एकाच प्रदेशास अनुलक्षून स्थूल अर्थानं वापरलेली दिसतात. या दक्षिणेकडील प्रदेशाची आर्यांना फारशी माहिती नव्हती. त्यांच्या परिचयाचे प्रदेश म्हणजे आर्यावर्त आणि मध्यप्रदेश. तिथेच त्यांचं मांत्रिक पठण, यज्ञकर्मं वगैरे चालत असे. या देशाच्या पलीकडे कोणी आर्य गेलेच तर व्रात्य म्हणून पतित होत आणि पुन्हा आर्यांच्या समाजात सामावून घेण्यासाठी त्यांना व्रात्यस्तोमासारखे विधीही करावे लागत. आर्यावर्ताच्या बाहेर जाण्यासंबंधी असे सक्त निर्बंध असल्यामुळे सामान्य जनतेचा चौफेर संचार नव्हता. दक्षिणेकडे जायचं म्हणजे वनवासात जायचं असा प्राचीन काळी समज होता. या धार्मिक निर्बंधांबरोबरच निसर्गही फारसा अनुकूल नसल्यानं दक्षिणप्रांत आर्यांच्या ताब्यात येण्यासाठी उत्तरेकडील प्रदेशापेक्षा जास्त वेळ लागला. विंध्य, पुढे सातपुडा, दोन्ही बाजूंस सह्याद्रीच्या डोंगराळ खबदाडी. असा खडतर प्रवास उत्तरेकडील संपन्न व समृद्ध प्रांतांत सुखावलेले आर्य का ओढवून घेतील? म्हणूनच पुष्कळ काळ दक्षिणेकडील प्रांत आर्यांच्या दृष्टीने दंडकारण्यच राहिला.

महाराष्ट्राच्या वसाहतीसंबंधी एक पौराणिक आणि दुसरं ऐतिहासिक, अशी दोन मतं मांडता येण्यासारखी आहेत. या दोन्ही मतांत काळाच्या दृष्टीने फार अंतर आहे. यांपैकी पौराणिक मत आपण प्रथम पाहू. पौराणिक दृष्टीने महाराष्ट्रातील वसाहत ऋग्वेदसूक्तांच्या संहितीकरणापूर्वी, किंबहुना ऋग्वेदात उल्लेखलेल्या दाशराज्ञ युद्धापूर्वी झाली, असं म्हणता येतं. पौराणिक मत डॉ. केतकर यांनी आपल्या प्राचीन महाराष्ट्र या ग्रंथात मांडलं आहे. महाराष्ट्राचे स्थूलमानाने अपरान्त, विदर्भ आणि दंडकारण्य असे तीन भाग पडतात. त्यांपैकी पश्चिमेकडील अपरान्त (कोकणपट्टी) भृगु आणि त्याच्या वंशजांनी फार प्राचीन काळी, म्हणजे भार्गवरामाच्या - परशुरामाच्या- अवताराच्याही पूर्वी वसवल्याचं पुराणांवरून ठरतं. कोकण म्हणजे परशुरामाची कर्मभूमी आणि परशुरामाच्या कथेशी कोकणातील कोकणस्थ, देवरुखे, हैंग, नंबुद्री इत्यादी अनेक जातींचा संबंध येतो. भडोचचे जुने नाव भृगुकच्छ असं आहे. परशुरामाचं पूजन कोकणात अनेक ठिकाणी होतं. सोपार्‍यात आजही परशुरामाच्या अनेक मूर्ती आहेत. पश्चिम भाग जसा भृगुंनी तसा पूर्व भाग अगस्त्यांनी वसवला. या दोन पट्ट्यांच्या मधला भाग मात्र शापदग्ध असल्याने तितकासा वसाहतयोग्य नव्हता. इक्ष्वाकुवंशातील दण्डक नावाच्या राजाने भृगुवंशातील च्यवन नावाच्या ऋषीचा अपमान केल्यामुळे ऋषीने दण्डक राजाला शाप दिला. त्या शापाच्या प्रभावाने विंध्यापासून सेतुबंधापर्यंतचा प्रांत अरण्यमय झाला. दण्डकारण्य या नावाची ही उत्पत्ती.

कोकणासंबंधी निरनिराळ्या कथा पुराणांत आहेत. सह्याद्रीच्या उपप्रांतांत आपल्या पर्वतप्राय लाटा आदळून त्याच्या उच्चत्वाच्या स्पर्धेनं सूड घेणार्‍या समुद्रास परशुरामाने मागे हटवून आपल्यासाठी व आपल्या यज्ञकर्मासाठी भूमी तयार केली आणि चैत्यपुलिन (चिपळूण) इथे स्थंडिल तयार करून त्यासाठी कोळ्यांच्या जाळ्यांची जानवी करून त्यांना ब्राह्मणांची दीक्षा देऊन किंवा चितेवरील प्रेतांत प्राणज्योती पेटवून त्यांना ब्राह्मण्य दिले वगैरे कथा प्रसिद्ध आहेत. या प्रांतास पूर्वी अपरान्त म्हणत असत व त्याची मर्यादाही मोठी, म्हणजे उत्तरेला आनर्तापासून ते थेट कन्याकुमारीपर्यंत, अशी होती. या प्रांतास कोकण कधी म्हणू लागले, यासंबंधी ठाम प्रमाण मिळत नाही. नागांची जी कुळं महाभारतात सांगितली आहेत, त्यांत कुकुण असं एक कूळ आहे, आणि ते या प्रांतात खाली गोकर्णापर्यंत राहत होते, असा एक दाखला आहे. तेव्हा या कुकुण नागकुलाचा आणि कोकण या नावाचा काही संबंध असू शकतो.

कोकण या नावाची उपपत्ती आजपर्यंत पुष्कळांनी निरनिराळ्या प्रकारांनी दिली आहे. जुन्या संस्कृत आणि फारसी ग्रंथांत कोकण हा शब्द निरनिराळ्या प्रकाराने लिहिलेला आढळतो. संस्कृतात कुकुण, कुङ्कुण, कोङ्कण, कोंकण ही रूपं दिसतात, तर फारसीमध्ये केङ्केम, कंकण, कोंकम् ही रूपं दिसतात. या कोकण शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल अनेक मतप्रवाह दिसतात.

१. कोकण हा शब्द द्राविडी भाषेतून घेतला असावा.
२. कानडीत कोङ्कु असा एक शब्द आहे. त्याचा अर्थ उंचसखल जमीन असा आहे. कोङ्कु + वन = कोङ्कुवन = कोकण अशा मार्गाने हा शब्द आला असावा.
३. फारसीमध्ये कोह (=पर्वत), कुण्ड (=खाच, खड्डा) असे दोन शब्द अहेत. कोहकुण्ड = कोकुण्ड = कोकण अशा मार्गाने हा शब्द येतो. त्याचाही अर्थ पर्वतांच्या खाचांचा प्रदेश असा होतो.
४. किम् + किण्वम् (कसली ही वनस्पती?) अशा तर्‍हेचा प्रश्न पहिल्या वसाहतकारांनी उन्मादक ताडीसंबंधी विचारला असावा व त्यावरून कोकण हा शब्द आला असावा.
५. कोंग नावाचे रानटी लोक प्रथम या प्रांतात वसले असावेत आणि त्यावरून या देशास कोंगवन (=कोकण) हे नाव मिळालं असावं.

कोकणाचा व इतर बाह्य प्रांतांचा व्यापाराच्या दृष्टीनं संबंध फार पुरातन काळचा आहे. इतर देशाचे व्यापारी हिंदुस्थानाशी जो व्यापार करत तो कोकणातूनच होत असे. पुष्कळ अरबी शब्द जे दक्षिणेकडील भाषांत सापडतात, ते याच काळात आले असावेत. इसवी सनापूर्वी चार शतकांपूर्वीपासून हा व्यापार चालत असावा. सह्याद्रीच्या पलीकडे असलेलं दंडकारण्य मात्र या देवघेवीपासून अलिप्त होतं. कोकणातील पुष्कळ बंदरांचा उल्लेख जुन्या लेखांमध्ये सापडतो. टोलेमी (इ. स. १५०) याच्या Geographia या भूगोलविषयक ग्रंथात सिमुल्ल (Simulla) किंवा तिमुल्ल (Timula) असा जो उल्लेख येतो, किंवा त्याही पूर्वी प्लिनीने (इ.स. २००) पेरिमल (Perimula) असा जो उल्लेख केला आहे, किंवा कान्हेरीच्या शिलालेखांत (इ. स. २००) चेमुल्ल म्हणून जे बंदर उल्लेखलेलं आहे, ते कोकणातलं चेऊल किंवा चोल होय. याशिवाय पाल, कोल, कुड, राजपुरी, घोडेगाव या गावांचाही उल्लेख आहे. उत्तरेकडचं शूर्पारक (सोपारा) हे तर मौर्यांच्या राजवटीत एक स्तूप तिथे उभारण्याइतकं महत्त्वाचं होतं. या बंदरांतून माल आत थेट नाशिक - पैठणपर्यंत पोहोचवला जात असे. काही यवन लोक बौद्धधर्म स्वीकारून कोंकणात वस्ती करून होते, असं दिसतं. कारण कान्हेरी, नाशिक, कार्ले, जुन्नर इथल्या विहारांना त्यांनी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या होत्या.

टोलेमी हा कोकणाचे पुढीलप्रमाणे चार विभाग करतो -

१. सौराष्ट्र - उत्तर गुजरात
२. लारीके - लाट, दक्षिण गुजरात
३. आरिआके = मराठा देश
४. दामरिके = दामिल, म्हणजे तामिळ लोकांचा प्रदेश .

यांपैकी तिसरा जो आरिआके, किंवा आर्यक म्हणजे आर्यांचा प्रदेश, त्याचे पुन्हा तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात मुंबई व दक्षिणेचा काही भाग येतो. दुसरा भाग उत्तर कोकण, दमणपासून खाली राजापूरपर्यंत, आणि तिसरा भाग दक्षिण कोकण. या भागांना अनुक्रमे १. Arisake Proper २. Sadan's Ariake ३. Pirate Ariake असं तो म्हणतो.

विदर्भ - अगस्त्य ऋषींचा प्रवास, त्यांचं विदर्भ राजाच्या मुलीशी, लोपामुद्रेशी झालेले लग्न, कौंडिण्य नावाचा ऋषी, भीष्मकाची राजधानी, नलदमयंतीचा विवाह वगैरे सर्व गोष्टी पौराणिक माहितीत मोडतात. दक्षिणेकडील प्रदेशांचं आर्यीकरण सुरू झालं ते प्रथम विदर्भातच, म्हणून विदर्भाचा संबंध आर्यांच्या ग्रंथांत यावा हे साहजिकच आहे. विदर्भ हे जे नाव या प्रांताला मिळालं ते एका राजाच्या नावावरून मिळालं आहे. यदुवंशापैकीच भोज या नावाची जी एक शाखा होती, त्या शाखेचं राज्य या प्रांतावर होतं. त्या शाखेत विदर्भ भोज नावाचा एक राजा होऊन गेला व त्याच्यावरूनच या प्रदेशाला विदर्भ हे नाव मिळालं. ऋषभदेव नावाचा जो राजा होता त्याला नऊ मुलगे होते व त्यानं आपल्या नऊ पुत्रांना स्वत:चं भरतखंडाचं राज्य वाटून दिलं. जो देश ज्या पुत्रास मिळाला त्या देशास त्या मुलाच्या नावावरून नाव मिळालं. कुशावर्त, इलावर्त इत्यादी मुलांमध्ये विदर्भ नावाचाही एक मुलगा होता व त्याच्या वाट्यास हा देश आला, म्हणून त्याला त्याचं नाव मिळालं, अशीही एक कथा प्रचलित आहे. त्याच विदर्भानंतर काही पिढ्यांनी भीम आला. अजपत्नी इंदुमतीचा भाऊ भोज याच विदर्भ राजाच्या वंशातला. त्याच वंशात क्रथकैशिक, भीष्मक, रुक्मी व चंपू रामायणाचा कर्ता भोज हे सर्व होऊन गेले. या प्रांतातील स्त्रिया त्यांच्या सौंदर्याबद्दल वगैरे प्रसिद्ध असत. म्हणून इथल्या राजकुलातील कन्येशी विवाह करायला अनेक राजे उत्सुक असत. या सर्व पौराणिक संदर्भावरून इतकं स्पष्ट होतं की, विंध्यदक्षिण प्रांतात आर्यसंस्कृती सर्वप्रथम विदर्भातच रुजली. प्रथम या प्रांताचं आर्यीकरण पूर्ण झालं आणि सरस्वतीदृषद्वतीच्या काठावर जे ब्रह्मकर्म चाले, तेच ब्रह्मकर्म वर्धानदीच्या काठी सुरू झालं.

विदर्भास वर्‍हाड असंही म्हणतात. वर्‍हाड हा शब्द विदर्भावरून आला असावा, असं वाटणं साहजिक आहे, परंतु वर्‍हाड आणि विदर्भ हे दोन्ही शब्द वर्णपरिणतीच्या दृष्टीनं एकच समजणं अवघड आहे. अबूल फजल हा आपल्या ऐनेअकबरी या ग्रंथात वर्धातट हे या प्रांताचं नाव देतो. वाचस्पत या ग्रंथात विगता: दर्भा: - कुशा: यत: असा विदर्भ या शब्दाचा विग्रह केला आहे. राजवाडे हे त्या शब्दाचे वर्धा + आहार असे दोन भाग पाडून वर्‍हाड या शब्दाची व्युत्पत्ती सांगतात.

या प्रांतांचे उल्लेख फार प्राचीन काळापासून आढळून येतात. छान्दोग्योपनिषदात कौण्डिण्य नावाच्या ऋषीचा उल्लेख आहे. त्याच्या नावावरून कौण्डिण्यपूर हे गाव वसलं. हेच पुढे नलदमयंतीच्या वेळी भीष्मकाची राजधानी म्हणून प्रसिद्धीस आलं. कलिंग (पूर्वेकडील कोकणपट्टी) व अपरान्त यांचेही असेच उल्लेख सापडतात. महाराष्ट्रे तीन होती व ती अश्मक, कलिंग व अपरान्त असा उल्लेख महाभारतात आहे.

विदर्भाची विदर्भ, कैशिक, भोज, भोजकट, वर्धातट व महाराष्ट्र अशी सहा नावं आहेत, व विदर्भ आणि महाराष्ट्र ही नावं समान अर्थानं वापरली आहेत. त्याला आधारही जुन्या ग्रंथांत मिळतो. राजशेखर कवीच्या बालरामायण नावाच्या नाटकात एक प्रसंग आहे. पुष्पक विमानात बसून श्रीराम, सीता व सुग्रीव हे तिघं लंकेहून परत जात असता सुग्रीव प्रत्येक देशाचं वर्णन करतो -

सुग्रीव - भरताग्रजायमग्रे महाराष्ट्रविषय: ।
राम - सोऽयम् सुभ्रु परो विदर्भविषय: सरस्वतीजन्मभू: ।
सीता - यत्रोत्पना मे पितामहश्वशुरस्य गृहिणीन्दुमती ।

त्याचप्रमाणे मुरारी हा कवीही आपल्या अनर्घ्यराघव या नाटकात इदमग्रे महाराष्ट्रमण्डलैकमण्डनं कुण्डिननाम नगरम् । असा, कुंडिननगर ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून उल्लेख करतो.

विदर्भ म्हणजे महाराष्ट्र असे जसे उल्लेख सापडतात तसेच अपरान्त म्हणजे महाराष्ट्र असे उल्लेखही सापडतात. यावरून महाराष्ट्र या देशाची व्याप्ती नीट ठरली नव्हती, असं दिसतं. महाभारतात गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या उपभागांचा उल्लेख आहे. गोपराष्ट्र म्हणजे गोपांचा देश. मथुरेजवळच्या गोपांचे हे भाऊबंद असावेत. नाशिकजवळचा हा प्रदेश होता. दुसरं मल्लराष्ट्र. हे मल्ल रानटी लोक होते. त्यांचं निर्दालन खंडोबानं केलं म्हणून त्याला मल्लारी हे नाव मिळालं. मल्ल हा शब्द अनेक नावांच्या शेवटीही येतो. मल्ल याचा अर्थ पर्वत असाही होतो, तेव्हा मल्लराष्ट्र म्हणजे डोंगराळ प्रदेश, असा अर्थही संभव आहे. गोपराष्ट्राच्या खाली हे मल्लराष्ट्र होतं. पांडुराष्ट्र म्हणून जो उल्लेख येतो, तो पाण्ड्यांच्या प्रदेशाबद्दल आहे. सध्याच्या तामिळनाडूतील हा भाग. याचाही अंतर्भाव तेव्हा महाराष्ट्रात होत असावा. याशिवाय, समुद्रगुप्ताच्या एका शिलालेखात देवराष्ट्राचा उल्लेख आहे. हे देवराष्ट्र सातारा जिल्ह्यात दक्षिणेला आहे. ही सर्व राष्ट्रं व अस्मक, अपरान्त, विदर्भ मिळून महाराष्ट्र बनला होता.

आर्यांची जी वस्ती दक्षिणेस झाली ती काही एकदम व सर्व ठिकाणी सारखी अशी झाली नाही. क्रमाक्रमानं सावकाश व दीर्घ कालावधीनं जसजसं तिथलं जंगल कमी होऊन भूभाग वसाहतयोग्य होऊ लागला तसतसे आर्य आपला शिरकाव दक्षिणेत पुढे पुढे करू लागले. स्थूलमानानं व निसर्गाचे निर्बंध लक्षात घेता महाराष्ट्राचे भाग उत्तरेकडून दक्षिणेकडे नागपूर-विदर्भ, गोदाकाठ, भीमाकाठ, कृष्णाकाठ, उत्तर कोकण, दक्षिण कोकण इतके पडतात, व याच क्रमाने आर्यांनी तिथे वसाहती केल्या. याला अपवाद फक्त कोकण. देशापेक्षा फार अगोदर कोकणपट्टीवरील प्रांत वसवला गेला होता. एवढंच नव्हे तर व्यापारउदीम वगैरे व्यवहाराच्या दृष्टीनं इतर तत्कालीन देशांतील लोकांनाही तो परिचित झाला होता. शिवाय, उत्तरेचं दळणवळण कोकणाशी होण्यास तिथला मार्गही विशेष बिकट नव्हता. उत्तरेकडील आर्य किंवा पुढे जे जे लोक वसाहतीसाठी दक्षिणेत येऊ शकले ते या कोकणपट्टीच्या मार्गानेच येत. तेव्हा हा प्रांत फार अगोदर वसवला गेला, यात शंका नाही.

आर्यांच्या पूर्वी विंध्याच्या दक्षिणेस कोण लोक राहात होते व ते तेथे कुठून आले यासंबंधी संशोधकांमध्ये एकवाक्यता नाही. युरोपीय संशोधकांचा असा समज आहे की, आर्य ज्या वेळी आपल्या मूळ वसतिस्थानाहून निघाले व इतर वसाहतयोग्य प्रांतांत ठिकठिकाणी राहू लागले, त्या वेळी जशी एक लोकक्रांती झाली, तशीच जबरी लोकक्रांती मध्य आशियातून द्राविडी किंवा सुमेरी अथवा तुराणी संस्कृतीचे लोक आर्यांच्या पुष्कळ पूर्वी इतस्तत: फ़िरू लागले त्या वेळी झाली. तेच लोक आर्यांप्रमाणे हिंदुस्थानाकडे वळले आणि उत्तरेकडील पर्वतांच्या दर्‍याखोर्‍यांमधून आत शिरून राहिले. मागाहून जसजसा आर्यांचा रेटा येऊ लागला तसतसे ते उत्तरेकडील डोंगरांच्या खबदाडीत व दक्षिणेकडे विंध्यपार होऊ लागले. अशा रीतीनं दक्षिणेकडे दोन लोकांच्या निरनिराळ्या भिन्न काळी वसाहती झाल्या. एक आर्येतर द्राविडी वगैरे लोकांची आणि दुसरी आर्यांची. या दोन्ही वसाहतींचे नक्की काळ सांगणं कठीण आहे.

दक्षिणेकडील वसाहतींमध्ये काळाच्या दृष्टीनं दोन स्थूल भाग पडतात. पहिला पाणिनिपूर्व वसाहती व दुसरा पाणिन्युत्तर वसाहती. पहिल्या अनार्यांच्या व दुसर्‍या आर्यांच्या. सर्व अनार्य लोकांत नाग लोकांची संस्कृती उच्च समजली जात असे, व म्हणून त्यांना अनार्य म्हणणं काही संशोधकांना मान्य नाही. उत्तरेकडेसुद्धा त्यांचा आणि आर्यांचा संबंध फार आला. कुश, अर्जुन, भीम या आर्यांचे आणि नागांचे शरीरसंबंध झाले. नागांचा एक कर्कोटक नावाचा वंशज काश्मीरात राज्य करत होता. काश्मीरचा पहिला राजा असलेला नील जातीनं नाग होता असा राजतरंगिणीत उल्लेख आहे. महाभारत व इतर काही पुराणांत नागांचा उल्लेख अनेकवेळा आला आहे. बुद्धाच्या काळात नाग लोक बरेच पुढारलेले होते, कारण गौतमबुद्धानं आपल्या मताचा प्रसार या नाग लोकांमध्येच केला असल्याचं काही भित्तिचित्रांवरून स्पष्ट होतं. गौतमबुद्ध मध्ये बसलेला आणि त्याच्या भोवती कमरेवर नागाचं वेटोळं आणि डोक्यावर नागाची फणी घेतलेले असे नाग लोक बसलेले, असा देखावा या चित्रांमध्ये आहे. हे नाग लोक फार पूर्वी उत्तरेतून दक्षिणेत स्थायिक झाले होते. पाताळ हे त्यांचं वसतिस्थान असा उल्लेख म्हणूनच अनेक ग्रंथांत सापडतो. पाणिनीपूर्व काळात आर्यांच्या आधी नाग लोकांचा प्रवेश दक्षिणेत झाला. नागांचा आणि दक्षिणेकडील प्रांतांचा व विशेषत: पश्चिमेकडील कोकणाचा जास्त संबंध आला. याशिवाय गोंड, भिल्ल, वारली, कोळी, वध्र, मल्ल, काथोडी, कातकरी या एतद्देशीय लोकांच्या वसाहतीही महाराष्ट्रात होत्या.

पाणिनीपूर्व काळात आर्यांची वसाहत विंध्याच्या खाली नव्हती. कारण पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये दक्षिणेकडील कोणत्याही देशाचा उल्लेख नाही. मात्र कात्यायनाच्या वार्तिकांमध्ये व पातंजलीच्या महाभाष्यामध्ये दक्षिणेकडील राज्यांचे स्पष्ट उल्लेख आहेत. कात्यायन व पाणिनी या दोघांमध्ये तीनशे वर्षांचा काळ होता. पाणिमीचा काळ ख्रिस्तपूर्व ७०० आहे. म्हणजे आर्यांचा दक्षिणेशी संबंध त्यानंतरचा आहे.

पाणिनीनंतरच्या काळात आर्य व त्यांच्यावर उपजीविका करणारे काही अनार्य महाराष्ट्रात आले. उत्तर भारतातील राजांच्या जुलमांना कंटाळून, धार्मिक कर्मकांडांवर आलेल्या बंधनांमुळे आणि जैन व बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक ब्राह्मणांनी देशांतर केलं. सारस्वत ब्राह्मण पश्चिमेकडील अपरान्ताच्या मार्गानं खाली उतरले तर नंबुद्री ब्राह्मण पूर्वेकडील कलिंगाच्या मार्गानं खाली उतरले. त्याच वेळी काही ब्राह्मण विदर्भात स्थायिक ज़ाले. त्यांच्यापैकी काही खाली खानदेश, नगर व नाशिक प्रांतात उतरले. खानदेश, विदर्भ या प्रांतातेल यजुर्वेदीयांची वसती जुनी असावी. नाशिक, जुन्नर, कान्हेरी येथील शिलालेखांत हे उल्लेख सापडतात.

ब्राह्मणांप्रमाणेच आर्यांपैकी क्षत्रिय, वैश्य, शूद्र व इतर घटकही दक्षिणेकडे महाराष्ट्रात आले असावे. उत्तरेकडील महापद्मादि दुष्ट शूद्र राजांच्या, जैन-बौद्धादि पाखंडांच्या व व्रात्यशूद्रादि उत्पथांच्या जुलुमाला कंटाळून स्वधर्म, स्वराज्य व स्वातंत्र्य यांचा अनुभव घेण्यास दक्षिणारण्यात बौद्धकालाच्या प्रथम ज्वानीत म्हणजे शकपूर्व सहाशेच्या सुमारास वसाहती करण्यास आर्य शिरले, असं इतिहासाचार्य राजवाडे यांनी लिहून ठेवलं आहे. मगधातून जे लोक आले ते महाराष्ट्रीय होत. या महाराष्ट्रीय शब्दाचाच अपभ्रंश महरट्ट असा होतो. महाराष्ट्रिक आणि महाराजिक हे एकच. यांचा उल्लेख महाराजाष्टन् या पाणिनीच्या सूत्रांत आला आहे. हे क्षत्रिय होते. यांची व पुढे उल्लेखलेल्या राष्ट्रिकवैराष्ट्रिकांची गणराज्ये होती. त्यांत गणनायक असत. अशा तर्‍हेचा एक गणनायक नाणेघाटातल्या कोरीव लेण्यांत खोदला असून त्याखाली महारठीगनकयिरो (महाराष्ट्रीगणकवीर:) असा निर्देश आहे. यांची भाषा मागधी व महाराष्ट्री होती.

क्षत्रियांपैकी दक्षिणेत राष्ट्रिकही आले. अशोकाच्या शिलालेखात (इ. पू. ३२७) जे रास्टिक म्हणून उल्लेखलेले आहेत ते हे राष्ट्रिक. यांचा मूळ देश कुरुपांचल. राष्ट्रिकांनाच राजा म्हणून अभिषेक करून घेण्याची पात्रता असे आणि त्यांनाच अभिषिक्त राजे असे संबोधीत. शौरसेनी ही या राष्ट्रिकांची बोली होती. या लोकांनी आपली वसाहत दक्षिणेत बेळगावाकडे, सोलापुराकडे, स्थूलमानाने बीडपासून सौंदत्तीपर्यंतच्या टापूत केली.

वैराष्ट्रिकांचा मूळ प्रदेश उत्तर कुरू आणि उत्तर मद्र यांच्यामध्ये असणारा विराट् या नावाचा देश. पुण्याच्या दक्षिणेकडे हे वैराष्ट्रिक स्थायिक झाले. वैराष्ट्रिकांची मूळ भाषा अपभ्रंश व या भाषेसह ते खाली उतरले.

महाभारतात देशांच्या नावांची जी एक यादी दिली आहे, त्या यादीत विदर्भानंतर रूपजीविकअश्मक ही दोन राष्ट्रं दिली आहेत. महाराष्ट्राच्या आसपासचे रूपजीविक हे लोक कोण असावेत, याबाबत नक्की सांगता येत नाही. अश्मक हे आधुनिक मराठ्यांचे पूर्वसंबंधी आहेत. त्यासंबंधीचा पुरावा आपल्याला बौद्धग्रंथांत मिळतो. बुद्धाच्या वेळी प्रसिद्ध असलेल्या ज्या सोळा जमातींची यादी बौद्धग्रंथांत दिली आहे, त्यात अश्मक हे नावही आहे. त्या वेळी अश्मक गोदावरीच्या वरच्या भागाच्या काठी राहत असत, असा उल्लेख आहे. अश्मकांची राजधानी पैठण होती.

याशिवाय भोज, महाभोज, सत्तीयपुत्त, पेत्तोनिक, केरळपुत्त, पाण्डय, चोल इत्यादी दक्षिणेकडील लोकांचा उल्लेख अशोकाच्या शिलालेखात आला आहे. भोज हे मुळचे मथुरेचे. भोसले हे आडनाव भोज या शब्दावरूनच आलं आहे. मथुरेजवळच सात्वत नावाचे लोक राहत. सत्तीयपुत्त म्हणजे सात्वतपुत्र. सात्यकी हा सात्वत कुळातच जन्मला. यादवांचा आणि सात्वतांचा संबंध होता. पेत्तेनिक म्हणजे प्रतिष्ठानचे, अर्थात पैठणकडील लोक. पाण्ड्य हे दक्षिणेकडील. त्यांचा उल्लेख कात्यायन आपल्या वार्तिकांत करतो.

वैश्यांपैकी दक्षिणेत वसाहत करण्यास जे आले त्यांच्यामध्ये मुख्य आभीर होते. आभीर मूळचे उत्तरेकडचे. ते सिंधुनदीच्या काठी राहत असत, असा महाभारतात उल्लेख आहे. त्यांचा आणि तत्कालीन आर्यांचा फारसा सलोखा नसावा. त्यांच्याकडे ते शत्रुत्वाचा नजरेनं पाहत असत. सरस्वती नदी जी एकदम अदृश्य झाली ती या आभीर लोकांच्या दुष्टपणामुळेच, परंतु त्यांचा मूळचा युद्धप्रिय असा स्वभाव असल्यानं त्यांची गणना चांगल्या योद्ध्यांमध्ये होत असे, व ते दस्यू जातीतले असूनसुद्धा त्यांचा उपयोग व्हावा म्हणून आर्य त्यांना आपल्या सैन्यात सामील करून घेण्यास उत्सुक असत, असं महाभारतात सांगितलं आहे. द्रोणाचार्यांनी जो सुवर्णव्यूह रचला त्यात या आभीर जातीच्या दस्यूंना त्यांनी प्रमुख स्थान दिलं होतं. दुसर्‍या एका आभीरांच्या टोळीनं अर्जुन द्वारकेहून श्रीकृष्णाच्या विधवापत्नींबरोबर परत येत असताना त्यांच्यावर हल्ला केल्याचं महाभारतात लिहिलं आहे. अभीरांना लुटारू, गवळी, गुराखी, म्लेंच्छ इत्यादी नावांनी महाभारतात संबोधलं आहे. बाप ब्राह्मण आणि आई अम्बष्ठ यांपासून झालेल्या संततीस मनुस्मृतीत आभीर असं संबोधलं आहे.

यावरून असं लक्षात येतं की, आभीर कोणीतरी कडवे, लढवय्ये, सतत फिरणारे असे लोक असावेत. आणि इतर शक, ग्रीक, यूएची, कांबोज इत्यादी जातींचे लोक जसे हिंदुस्थानात उतरले, तसे त्यांच्याबरोबर हेही उतरले असावेत, व त्यानंतर पंजाबात त्यांनी सिंधू नदीच्या काठी वस्ती केली असावी. हे साधारण इसवी सनाच्या सुरुवातीला घडलं असावं. दुसर्‍या व तिसर्‍या शतकांतील शिलालेखांत आभीरांसंबंधी उल्लेख सापडतात. इ. स. १८१मधील क्षत्रप राजा रुद्रसिंह याच्या लेखात रुद्रभूति नावाच्या त्याच्या आभीर सेनापतीचा उल्लेख आहे. शिवदत्ताचा मुलगा ईश्वरसेन हा आभीर होता अशी माहिती इ. स. ३००च्या नाशिकच्या लेण्यांतल्या शिलालेखात मिळते. इ. स. ३६०मध्ये समुद्रगुप्ताने अलाहाबाद इथे एका स्तंभावर एक लेख कोरवला होता. गुप्त साम्राज्याच्या मर्यादेपलीकडे दक्षिणेस आणि नैऋर्त्येस राजस्थान आणि माळवा प्रांतांत मालव आणि आभीर या दोन जाती नांदतात असं या लेखात म्हटलं होतं. पंजाबात सिंधू नदीच्या काठी इसवी सनाच्या सुरुवातीला आभीर लोक राहत होते, असं मानलं तर त्यांना माळव्यात पोहोचायला तीनशे वर्षं लागली. यांपैकी काही लोकांनी तिथेच स्थायिक होण्याचं ठरवलं असावं, हे नाशिकच्या शिलालेखावरून स्पष्ट होतं. झांशीच्या दक्षिणेस अहिरवाड आणि अहारवाड अशी जी दोन गावं आहेत, ती संस्कृतातील आभीरवाटिका या शब्दावरून आली आहेत. काही टोळ्यांनी इथे राज्यं स्थापन केली असावीत, आणि काही टोळ्या पुन्हा दक्षिणेस आणि पश्चिमेस गेल्या असाव्यात. कारण आठव्या शतकात ज्या वेळेस सौराष्ट्रावर हल्ला झाला त्या वेळी तो प्रांत आभीरांच्या ताब्यात होता, असं एन्थोव्हेन आपल्या Castes and Tribes in Bombay Presidency या पुस्तकात म्हणतो. हेच आभीर लोक दक्षिणेकडे आल्याचा पुरावाही तो देतो. खानदेशातील असीरगड हा अस-अहीर या आभीर जातीतल्या पुरुषानं बांधल्याचं फेरिस्ता आपल्या इतिहासात लिहितो. दक्षिणेत सहाव्या सातव्या शतकापर्यंत आंध्रभृत्य राजे राज्य करत होते. त्यांच्या राजवटीनंतर आभीरांची राजवट महाराष्ट्रात सुरू झाली, असा उल्लेख काही पुराणांत सापडतो.

पुराणांमध्ये आभीर राजे म्हणून ज्यांचा उल्लेख येतो, त्यांच्यापैकीच एक शाखा त्रैकुटकांची असावी. इ. स २५०च्या सुमारास क्षत्रप कुलानंतर त्यांचा उदय झाला. अणि हैहय या नामाभिधानानं त्यांनी आपलं राज्य स्थापन करून त्रिकुट या शहरास आपली राजधानी केली. हे घडलं इ. स. ४५५-४५६मध्ये. उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातेत त्यांनी आपला अंमल पुढे सुमारे शंभर वर्षं, चालुक्यांकडून त्यांना बाधा येईपर्यंत निर्वेध चालवला. त्रिकुट म्हणजे पुण्याजवळचं जुन्नर. अशा प्रकारे महाराष्ट्रातलं वसाहतकर्म इ. स. ६००मध्ये पूर्ण झालं.

वसाहत कायम, स्थिर झाली म्हणजे साहजिकच राजदंडाची आवश्यकता निर्माण होते. महाराष्ट्रावर पहिली सत्ता मौर्यांची होती. याबद्दल ठोस असा पुरावा शिलालेखांतून मिळतो. सम्राट अशोकाने आपल्या स्वभावात नैतिक परिवर्तन झाल्याचे लेख आपल्या साम्राज्याच्या चारही टोकांवर प्रजेचे मन हिंसेपासून वळवण्यासाठी त्या त्या प्रांताच्या बोलींत खोदवले होते. या लेखांपैकी एक ठाणे जिल्ह्यात सोपारा इथे, दुसरा महाराष्ट्राच्या पूर्व सरहद्दीवर जबलपुराकडे रुपनाथ इथे, तिसरा आग्नेयीच्या कोपर्‍यात मस्की इथे आणि चौथा महाराष्ट्राच्या दक्षिण टोकास सिद्धापूर इथे, असे महाराष्ट्राच्या चार सीमांतांवर खोदवले आहेत. यावरून हा प्रांत अशोकाच्या साम्राज्यात येत असावा. अशोकानंतरच्या बिंदुसार राजाने जरी आक्रमण केलं नाही तरी पुढच्या चंद्रगुप्त मौर्याची सत्ता महाराष्ट्रावर होती. मौर्यसत्तेचा व मौर्य घराण्याचा स्मृत्यवशेष मोरे या आडनावात राहिला आहे. मौर्यांची सत्ता ख्रिस्तपूर्व ३२१पासून १८४पर्यंत होती.

satavahana.jpg

सातवाहनांच्या आधिपत्याखाली असलेला प्रदेश

मौर्यांच्यानंतर ख्रिस्तपूर्व एक दोन शतकांपासून ख्रिस्तोत्तर दोन शतकांपर्यंत सातवाहन अथवा आंध्रभृत्य या राजांचा अंमल महाराष्ट्रावर होता. हे घराणे सनातनी होते की अन्यधर्मीय परके होते यासंबंधी मतभेद आहेत. इतिहासाचार्य राजवाडे त्यांना हिंदुधर्माचे कट्टर पुरस्कर्ते मानतात. ते अळूची भाजी व भात खाणारे, त्यांच्या रथाच्या बैलांचे कान फाडलेले आणि आंध्र राजांचे सेवक म्हणवणारे असे होते, अशा अर्थाची काही अनुमाने राजवाडे यांनी सातवाहनांसंबंधी राधामाधवविलासचंपूच्या प्रस्तावनेत काढली आहेत. महाराष्ट्रावर राज्य करणारे महाराष्ट्रीय घराणे हे पहिलेच, हे नक्की. राजसत्तेसाठी या घराण्यात व खड्गाराट घराण्यात बर्‍याच चकमकी झाल्या. नहपाण खड्गाराटाने सातवाहनांचा पराभव केल्याचा उल्लेख नाशिक व कार्ले इथल्या शिलालेखांत आहे. परंतु पुढे लगेच सातवाहन गौतमीपुत्र आणि पुलयामी या दोघांनी खड्गाराटाचा पराभव करून आपला प्रदेश पुन्हा काबीज केला. काही काळाने गौतमीपुत्राचा पराभव माळव्याच्या रुद्रदामन् या क्षत्रप राजाने केला व अशा रीतीने सातवाहनांची राजवट संपली.

सातवाहनांनंतर महाराष्ट्राच्या पश्चिम भागावर त्रैकूटक नावाचे राजे ख्रिस्तोत्तर तिसर्‍या शतकाच्या मध्यापासूनच राज्य करत असल्याचा दाखला कान्हेरी येथील शिलालेखांवरून मिळतो. या राजांची सत्ता आपल्या नावाचा राजशक सुरू करण्याइतकी मजबूत झाली होती. त्रैकुटकांचा शक इ. स. २४९पासून सुरू होतो.

त्रैकुटकांनंतर महाराष्ट्रावर सार्वभौमत्व वाकाटक राजांनी गाजवले. यांच्या साम्राज्यात सर्व महाराष्ट्र व शिवाय उत्तरेकडील काही प्रांत येत असे. यांच्याच राजवटीत उत्तरेकडील सम्राट समुद्रगुप्ताने दक्षिणेत स्वारी केली. कालिदासाने आपल्या रघुवंशात रघूने केलेल्या स्वारीचे वर्णन या समुद्रगुप्ताच्या स्वारीचेच आहे की काय, अशी विद्वानांना शंका आहे. समुद्रगुप्ताच्या या स्वारीचं वर्णन एका शिलालेखात आहे. त्यात एरंडपल्लीचा दमन आणि देवराष्ट्राचा कुबेर या दोन राजांचा त्याने पराभव केल्याचा उल्लेख आहे. एरंडपल्ली म्हणजे खानदेशातील एरंडोल व देवराष्ट्र म्हणजे सातारा जिल्ह्यातील (तासगाव तालुका) देवराष्ट्र ही गावे होत. देवराष्ट्राजवळच जे शंकराचं स्थान आहे, त्याला सागरेश्वर अथवा समुद्रेश्वर असं म्हणतात. यावरून समुद्रगुप्ताच्या नावाचा याच्याशी संबंध असावा. काही विद्वानांच्या मते एरंडपल्ली व देवराष्ट्र ही दोन्ही स्थळं महाराष्ट्रात नसून तामिळनाडूत आहेत.

chalukya_0.jpg

चालुक्यांच्या आधिपत्याखाली असलेला प्रदेश

वाकाटकांनंतर कलचूरी घराण्याचा महाराष्ट्राशी संबंध आला. या घराण्याने त्रैकूटकांचा राजशक सुरू केला होता. त्यावरून कदाचित हे घराणे त्यांच्यापैकीच असावं, असं वाटतं. कलचूरींचा पराभव मंगलीश नावाच्या चालुक्याने करून चालुक्यांची सत्ता जी महाराष्ट्रात स्थापन केली ती निर्वेधपणे इ. स. ७५३पर्यंत मोठ्या भरभराटीने चालली. चालुक्यांचा अंमल ९९,००० गावांवर व महाराष्ट्राच्या तीन विभागांवर होता, अशा मजकुराचा एक शिलालेख आहे.

rashtrakuta.jpg

राष्ट्रकुटांच्या आधिपत्याखाली असलेला प्रदेश

मध्ये काही काळ चालुक्यांवर गंडांतर येऊन त्यांना राष्ट्रकूटांकडून पराजय पत्करावा लागला होता. राष्ट्रकूट घराण्यांपैकी एकोणीस राजांनी इ. स. ७५३पासून ९७४पर्यंत मराठवाड्यात असलेल्या मान्यखेट (मालखेड) इथे अविच्छिन्न सत्ता गाजवली. या वंशातील दुसरा कर्क या राजाचा चालुक्यवंशीय तैलप नावाच्या राजानं पराभव करून आपली गमावलेली सत्ता पुन्हा दीडशे - सव्वादोनशे वर्षांनंतर मिळवली. चालुक्यांच्या मोठ्या साम्राज्यात काही मांडलिक राजे होते. या मांडलिकांपैकी सेउणदेशीय मांडलिक आणि माळव्याचा भोज यांच्यात चकमकी झाल्या. शेवटी सेउणचंद्राने चालुक्यसत्ता कायम केली. चालुक्यांचा अंमल इ. स. ११८९पर्यंत निर्वेध चालला. पुढे शेवटचा सोमेश्वर मरण पावल्यावर त्याचे मांडलिक आपआपसांत भांडून आपल्या जागीच प्रबळ झाले व मध्यवर्ती चालुक्यसत्तेचा नाश झाला.

चालुक्यांनंतर यादवांची राजवट सुरू झाली. यांचा मुख्य प्रस्थापक भिल्लम नावाचा राजा होता. यादव घराण्याच्या शाखा दोन. एक दक्षिणेकडील द्वारसमुद्राची शाखा आणि दुसरी उत्तरेकडील देवगड-देवगिरीची शाखा. या दोन्ही शाखा आपआपसांत भांडत असत. शेवटी भांडणात देवगिरीचा सिंधण राजा विजयी झाला व त्याच्याच वंशाने पुढे चौदाव्या शतकाच्या आरंभापर्यंत राज्य केलं. इ. स. ११८९पासून ते १३१२पर्यंतच्या काळात यादवांच्या कुळात एकंदर सात राजे झाले. मराठा धर्म, मराठी भाषा, मराठी वाङ्मय यांच्या दृष्टीनं यादवांची राजवट ही उल्लेखनीय आहे. यादवांच्या राजवटीत मराठी भाषा व वाङ्मय यांचा आरंभ व परिपोष झपाट्याने झाला. यादवांचं राज्य सुरळीत चालयामुळे संत, संन्यासी, कवी अव्वल दर्जाचं काव्य निर्माण करू शकले. कृष्ण, महादेव व रामदेव या राजांच्या काळात प्रजेला भरपूर संपन्नता लाभली. पण दुर्दैवानं महमदीयांची नजर दक्षिणेकडे वळली व अल्लाउद्दिनाच्या नेतृत्वाखाली त्यांच्या झुंडी येऊन यादवांची राजवट लयाला गेली. शेवटी मलीक काफ़ूराने शंकरदेव यादव याला ठार मारून यादव सत्तेचा अंत केला.

महाराष्ट्रातील वसाहतीचा व राजसत्तेचा हा इतिहास. उत्तरेकडून दक्षिणेत जे लोक आले ते वेगवेगळ्या प्रांतांतून आले आणि येताना आपल्या भाषा घेऊन आले. अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री, मागधी वगैरे भाषा अशा प्रकारे महाराष्ट्रात आल्या. या सर्व भाषांच्या खुणा आज मराठीत सापडतात. पण मराठीची उत्पत्ती झाली कशी?

kalpesh1.JPG

अगदी जुन्या भाषा कशा उत्पन्न झाल्या, हा तसा वादग्रस्त व अनेक दृष्टींनी अनिश्चित असा विषय आहे. संस्कृत, फारसी, लॅटीन या भाषा कशा निर्माण झाल्या, किंवा द्राविड भाषा किंवा चिनी भाषा कशा उत्पन्न झाल्या, हा विषय आपण सोडून देऊ. पण अलीकडच्या काळात एक भाषा नष्ट होऊन नवी भाषा कशी व का उत्पन्न होते, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्ञानेश्वरीपासून आतापर्यंत मराठी भाषेच्या स्वरूपात काळानुसार थोडा फरक होत गेला आहे. परंतु भाषा एक असून तिला आपण मराठी असंच म्हणतो. ही मराठी भाषा ज्ञानेश्वरांपूर्वी उत्पन्न झाली आणि पूर्वी इथे प्रचलित असलेली महाराष्ट्री भाषा मृत झाली. मराठी भाषा कशी उत्पन्न झाली याचा विचार करत असताना ती तशी का उत्पन्न झाली, हा विचारही करावा लागतो. मूळात नवीन भाषा तयार का होतात?

कोणत्याही भाषेला तिचे बोलीचे स्वरूप जाऊन साहित्यिक स्वरूप प्राप्त झालं म्हणजे ती स्वत: नाहिशी होऊन इतर भाषांचा जन्म होतो, असा सिद्धांत काही भाषातज्ज्ञ मांडतात व त्याला आधार आर्यभाषांचा देतात. वैदिक संस्कृतापासून ज्या वेळी साहित्यिक भाषा तयार झाली त्या वेळी प्राकृत भाषा निर्माण झाल्या व बोली म्हणून त्यांनी आपलं वर्चस्व गाजवण्यास सुरूवात केली. या प्राकृत भाषा ज्या वेळी साहित्यिक भाषा म्हणून साच्यांत जाऊन बसल्या त्या वेळी बोली म्हणून त्यांनी गाजवलेले वर्चस्व अपभ्रंश भाषेने आपल्याकडे घेतलं. पुढे काळाच्या ओघात या अपभ्रंश भाषेनं साहित्यिक भा्षेचं स्थान मिळवलं आणि सिंधी, हिंदी, गुजराती, मराठी या बोली म्हणून उदयास आल्या, असा एक सिद्धांत आहे. परंतु हा सिद्धांत फारसा पटत नाही. एखाद्या भाषेच्या उद्भवास तिच्या पूर्वभाषेचं साहित्यिक स्वरूप जर कारणीभूत असेल, तर हिंदी, गुजराती, बंगाली, मराठी या आधुनिक भाषांना सध्या साहित्यिक स्वरूप प्राप्त झाल्यानं त्या मरून त्यांच्यापासून नवीन भाषांनी जन्म घ्यायला हवा होता. परंतु तसं झालेलं दिसत नाही. मराठी भाषा तर गेली अनेक शतकं साहित्यिक भाषा म्हणून टिकून आहे आणि असं असूनही तिचा विकासच होतो आहे. कोणतीही भाषा साहित्यिक होणं हे तिच्या उत्कर्षाचं गमक आहे, तिच्या अवनतीचं नव्हे आणि तिच्या नाशाच तर नव्हेच नव्हे. उलट साहित्यिक भाषेचं कायमचं न बदलणारं स्वरूपच तिच्यापासून दुसरी भाषा उत्पन्न होण्यास विरोध करतं. बोली जशी परिवर्तनशील असते तशी साहित्यिक भाषा असत नाही. परिवर्तनशील बोलीपासूनच दुसरी भाषा निर्माण होणं अधिक शक्य आहे. तेव्हा नवीन भाषा तयार होण्याचं कारण भाषेचं साहित्यिक स्वरूप नसून दुसरं काही असलं पाहिजे. समाजाला धक्का बसल्याखेरीज कोणतीही भाषा बदलत नाही. लोकक्रांती, राज्यक्रांती, धर्मक्रांती वगैरेंसारखा जबर धक्का समाजाला बसल्याखेरीज भाषा बदलत नाही. आर्यभाषेच्या स्वरूपांत निरनिराळी अवस्थांतरं ज्या ज्या काळांत झाली त्या त्या काळांत अशा तर्‍हेची क्रांती झाल्याचं इतिहासावरून दिसतं. मराठीच्या उत्पत्तीच्या बाबतीत अशा प्रकारची झालेली क्रांती सांगण्यापूर्वी तिची उत्पत्ती कशी झाली, हे बघणं आवश्यक आहे.

कोणत्याही भाषेचं स्वरूप अभ्यासताना तिच्या अंतरंगाचा विचार करावा लागतो. बाह्य स्वरूपात फक्त शब्दांचाच संबंध येत असल्यामुळे त्यांचा विचार बाजूला ठेवून वर्णप्रक्रिया, प्रत्ययप्रक्रिया, प्रयोगप्रक्रिया इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक तपासाव्या लागतात. पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इत्यादी भाषांच्या स्वरूपावरून जर सहज नजर फ़िरवली तर त्या प्रत्येकीच्या स्वरूपातले काही घटक मराठीत आल्याचं कळून येतं व अशाप्रकारे पूर्वीच्या निरनिराळ्या भाषांची बरीच साम्यं मराठीत आढळून येतात, आणि म्हणूनच मराठीच्या उद्गमाविषयी विद्वानांमध्ये मतभेद झालेला दिसतो. पूर्ववैदिक, पाली, अर्धमागधी, संस्कृत, अपभ्रंश, माहाराष्ट्री या सार्‍या भाषांना मराठीचं जनकत्व बहाल केलं जातं. मराठीच्या उद्गमाविषयी अशा प्रकारचं मतवैचित्र्य आहे. या प्राचीन भाषांचे अवशेष मराठीत सापडतात, हे यामागचं कारण.

एक मत असं आहे की, वेदसमकालीन ज्या बोली होत्या त्यांपासून मराठी निर्माण झाली, व याला आधार म्हणजे वेदांमध्ये संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत व प्राकृत भाषांच्या स्वभावाशी जुळणारे जे विशेष सापडतात ते होत. वैदिक संस्कृतातले काही शब्द मराठीत, विशेषत: ग्रामीण मराठीत आजही वापरले जातात. उदाहरणार्थ, त्यो हे सर्वनाम. संस्कृतात या शब्दनामाचा छडा लागत नाही. पण मराठीत मात्र हा शब्द अजूनही ऐकू येतो. परंतु या तुटपुंज्या पुराव्यावर मराठी भाषा त्या भाषांपासून निर्माण झाली असं म्हणता येणार नाही. शिवाय भाषेला शिष्ट व अशिष्ट, किंवा नागर व ग्रामीण किंवा ग्रांथिक व बोली अशी रूपं असतात. त्यांपैकी वेदकालीन भाषेतही अशी रूपं असतीलच. त्यामुळे तत्कालीन बोलीतील काही अवशेष आज मराठीत सापडतही असतील. परंतु त्यावरून मराठीचं जनकत्व वेदकालीन बोलींना आपण बहाल करू शकत नाही.

दुसरा एक पक्ष मराठीची जननी संस्कृत भाषा ही आहे, असं मानतो. फक्त वरवर जरी पाहिलं तरी संस्कृत ही मराठीची जननी ठरत नाही. वर्णाचे बदल, प्रयोगाची भिन्नता, उच्चारांत फरक स्पष्ट आहेत. मराठी आणि संस्कृत या दोन्हींत नातं आहेच. या दोन्ही भाषांत पुष्कळ अंतर्वर्ती अशा अवस्था या प्राकृत भाषा आहेत. भाषेच्या एकंदर वाढीच्या दृष्टीनं अशा अवस्था उत्पन्न होणं अपरिहार्य आहे. तेव्हा संस्कृत भाषेला मराठीची जननी म्हणणं अशास्त्रीय ठरतं. हाच युक्तिवाद प्राकृत भाषांबद्दलही करता येईल.

पाली, मागधी, अर्धमागधी, माहाराष्ट्री, अपभ्रंश इत्यादी प्राकृत भाषांपासून मराठीचा उद्भव झाला, असं जेव्हा तज्ज्ञ म्हणतात तेव्हा पुरावे म्हणून या भाषांचे आज मराठीत अस्तित्वात असलेले अवशेष पुढे केले जातात. मात्र कोणत्याही एका प्राकृत भाषेतून मराठीचा जन्म झाला, असं ठामपणे म्हणता येणार नाही. प्राकृतोद्भव व प्राकृतिकोद्भव म्हणून ज्या काही आधुनिक, वर्तमानकालीन बोली आहेत, त्यांपैकी सिंधी, गुजराती, हिंदी किंवा बंगाली यांसारख्या बोली व मराठी यांत फरक आहे. शौरसेनीपासून हिंदी, अपभ्रंशापासून सिंधी व गुजराती, मागधीपासून बंगाली अशा या भाषांचा उद्भव मध्ययुगीन प्राकृत भाषांपासून झाला, असं म्हणता येतं. अमक्या एका भाषेपासून दुसरी भाषा तयार झाली असं म्हणताना जी भाषा उत्पन्न झाली तिने मूळ भाषेच्या व्याकरणाचा सर्वच्या सर्व सांगाडा उचलला, हे सिद्ध करावं लागतं. बंगालीने मागधीचं सर्व व्याकरणतंत्र जसंच्या तसं उचललं आहे. त्याचप्रमाणे शौरसेनीचं व्याकरणतंत्र हिंदीनं उचललं आहे. तोच प्रकार सिंधी, गुजराती आणि अपभ्रंश-आभीरांच्या भाषांचा आहे. परंतु मराठी भाषेनं संपूर्ण सांगाडा माहाराष्ट्रीपासून किंवा अपभ्रंशापासून तंतोतंत घेतला, असं दाखवता येत नाही. मराठी भाषेत बराचसा भाग हा अपभ्रंश व माहाराष्ट्रीपासून आलेला आहे. मराठीतील नामविभक्तींचा भाग हा अपभ्रंश भाषेपासून आलेला आहे, तर आख्यातविभक्तींचा भाग, म्हणजे क्रियापदांचे प्रत्यय वगैरे, माहाराष्ट्रीपासून घेतलेला दिसतो. मात्र याचबरोबर आधी म्हटल्याप्रमाणे इतर काही प्राकृत भाषांच्या लकबी मराठीत सामावलेल्या दिसून येतात.

प्राकृत भाषांपैकी आद्य असलेल्या पाली भाषेचे काही अवशेष मराठीत सापडतात. काही शब्दांची वर्णप्रक्रियेमुळे झालेली रूपांतरं पालीमध्ये जी आढळतात, तीच मराठीत आलेली आहेत. तिण (तृण), पाऊस (प्रावृष्), पिळणे (पीडनं), छकडा (शकट), गूळ (गुड), अस्वल (ऋच्छमल्ल) इत्यादी पाली भाषेचा स्पष्ट शिक्का असलेले शब्द मराठीत रूढ आहेत. दुसरी गोष्ट पाली भातील 'ळ'कारासंबंधी. पाली भाषेत 'ळ'कार ही एक विशेष बाब आहे. 'ळ' हा वर्ण पाली-पैशाचीखेरीज इतर प्राकृत भाषांमध्ये नाही. 'ळ'कार संस्कृत भाषेत नाही, पण वैदिक भाषेत आहे. तिथूनच तो पाली भाषेत आला असावा. 'ळ'कार हा मूर्धन्य वर्ण असल्यानं इतर मूर्धन्य वर्ण जसे द्राविडी भाषेच्या संपर्कानं आर्यभाषेत शिरले, तसा 'ळ' हा वर्णही त्यांच्या बरोबर द्राविडी भाषेतून शिरला असावा. शिष्ट मराठी भाषेत या 'ळ'काराच्या उच्चाराचं तसं बरंच स्तोम आहे. नळ, डाळिंब, ओंजळ, सावळा, सळई, आळे, फळे, काजळ, मिळणे इत्यादी अनेक संस्कृतोद्भव शब्दांत 'ळ'चा वापर केला जातो. जळ, कमळ, सकळ इत्यादी शब्दांत तो वैकल्पिक आहे. या शब्दांत 'ल'चा वापरही केला जातो. कित्येक शब्दांत 'ल'काराऐवजी 'ळ'कार घातल्यास अर्थ सर्वस्वी बदलतो. म्हणजे ते स्वतंत्र अर्थाचे निराळेच शब्द होतात. उदा. चूल, चूळ; बोल, बोळ; गाल, गाळ; नील, नीळ; वेल, वेळ इत्यादी. जुन्या पेशवाईकाळच्या मराठी लिखाणांत 'ल' हाच जास्त प्रचारात होता. त्या काळी 'ळ' दाखवण्यासाठी 'ल'च्या मागे एक 'त्'कार जोडत असत. 'त्ल' हे चिन्ह 'ळ'बद्दल वापरत असत.

पैशाची भाषेतील जी लकब मराठी भाषेत राहिली ती 'ण' व 'न' यासंबंधी होय. पैशाचीशिवाय इतर प्राकृत भाषांत 'ण'कार आहे, परंतु 'न'कार नाही. उलट पैशाचीत 'न'कार आहे, पण 'ण'कार मुळीच नाही. पैशाची भाषेची ही लकब मराठीतही बर्‍याच वेळी दिसून येते. उदा. ऊन (उष्ण), तहान (तृष्णा), कान (कर्ण), रान (अरण्य), जानवे (यज्ञोपवीत), विनंती (विण्णतिआ), सुने (सुण्ण) इत्यादी पुष्कळ शब्दांत संस्कृतातील अथवा प्राकृतांतील 'ण'काराऐवजी 'न'कारच मराठीत वापरला गेला आहे.

मागधी या प्राकृत भाषेनंही मराठीत आपल्या खुणा ठेवल्या आहेत. मागधी भाषेचा एक विशेष असा की, 'र'कार व 'स'कार या दोहोंबद्दल 'ल'कार व 'श'कार हे अनुक्रमे येतात. तसंच संस्कृत 'स्थ' अगर 'र्थ' या जोडवर्णाबद्दल मागधीत 'त्थ' येतो. तसंच 'ष्ट'चा 'स्ट' होतो. यांपैकी बरेच प्रकार ग्रामीण मराठीत रूढ आहेतच, परंतु शहरी मराठीतही हे प्रयोग आढळतात. उदा. ओशाळणे (अपसर), मिसळ (मिश्र), घोळतो (घूर्णते), जोशी (जोइसी), केशर (केसर), पेलणे (प्रेरनम्).

अर्धमागधीचे बरेच विशेष मराठीत आढळून येतात. अर्धमागधी आणि माहाराष्ट्री या दोन्ही भाषा पुष्कळ अंशी सारख्या स्वरूपाच्या असल्यानं अर्धमागधीचे जे विशेष मराठीत आढळतात ते माहाराष्ट्रीच्या विशेषांशीही जुळतात. जो प्रांत मराठीनं सध्या व्यापला आहे, त्यात जैनधर्मीयांनी आपल्या धर्माच्या प्रसारासाठी बराच प्रयत्न केला. जैनधर्मीयांची धर्मभाषा अर्धमागधी असल्यानं मराठीच्या स्वरूपावर अर्धमागधीचाही प्रभाव जाणवतो. दीर्घ स्वर र्‍हस्व करणे, मृदु व्यंजने कठोर करणे इत्यादी लकबी अर्धमागधीतून मराठीत आल्या आहेत.

माहाराष्ट्री भाषेचं बरंच ऋण मराठीनं घेतलं आहे. अनेक शतकं ही बोली ग्रांथिक भाषा म्हणून प्रचलित होती, तेव्हा अशा शिष्टसंमत भाषेचा ठसा मराठीवर उमटणं साहजिकच आहे. अकारान्त नपुंसकलिंगी नामं जशी माहाराष्ट्रीत लिंग बदलत नाहीत तशी मराठीतही बदलत नाहीत. मराठीतला द्वितीयेचा 'स' हा प्रत्यय माहाराष्ट्रीतल्या षष्टीचतुर्थीच्या 'स्स' या प्रत्ययावरून आला आहे. उदा. हत्तीस < हत्तिस्स, आगीस < अग्गिस्स. माहाराष्ट्रीतल्या आख्यातविभक्तीतले बरेच प्रकार मराठीत जसेच्या तसे उतरले आहेत. काळ व अर्थ यांचे प्रत्यय मराठीनं माहाराष्ट्रीपासून घेतले आहेत. मराठीतल्या कर् या धातूची भविष्यकाळाची रूपं माहाराष्ट्रीतल्या रूपांवरून कशी आली आहेत, हे खालील उदाहरणांवरून कळेल.
१. करिस्सामि > करिहिमी > करिइइं > करी + ल = करीन
२. करिस्सामो > करिहिमो >करिहिमु>करिइउं > करउं > करूं + ल > करून >करू

इच्छार्थक धातुही मराठीत माहाराष्ट्रीतून आले आहेत.

'मी' या सर्वनामाच्या बाबतीत मराठीतली सर्व रूपं माहाराष्ट्रीतल्या रूपांशी जुळतात. एकवचनाची रूपं - उदा. अहम्मि, अम्मि, म्मि > मी, महाहिंतो . मजहुनि, मज्झ>मज, मेज्च्चअ > माझं.
अनेकवचनाची रूपं - उदा. अम्हे>आम्ही, अह्मसुंतो > आह्माहुनी, अह्म > आह्मां, अम्हेसुं > आम्हांत

तारतम्याचा गुण मराठीनं माहाराष्ट्रीपासून घेतला आहे. नामे व्यंजनान्त न ठेवता स्वरान्त ठेवण्याची प्रवृत्ती माहाराष्ट्री व अपभ्रंश या दोन्हींमध्ये आहे. तीच मराठीनं उचलली. विशेष्याची जी विभक्ती तीच विशेषणाची ठेवण्याची जी प्रवृत्ती संस्कृत, माहाराष्ट्री, अपभ्रंश यांमध्ये दिसते, तीच बरेचदा मराठीतही दिसते. मराठीतल्या काही शब्दांची लिंगे माहाराष्ट्री व अपभ्रंश भाषेतील लिंगांप्रमाणे आहेत. उदा. पाऊस, जन्म, सरा, नयन हे पुल्लिंगी, आणि अंजली, गाठ हे स्त्रीलिंगी.

अपभ्रंशातूनही अनेक विशेष मराठीत आले. अपभ्रंश ही आभीरांची भाषा होती. आभीर सिंध प्रांतातून कोकणात व विदर्भात येऊन स्थायिक झाले होते, व त्यामुळे अपभ्रंशाचे बरेच अवशेष मराठीत सहज सापडतात. (डॉ. गुणे व डॉ. वि. भि. कोलते यांच्या मते तर अपभ्रंशापासूनच मराठीची उत्पत्ती झाली. ) नामाला लागणारे विभक्तींचे प्रत्यय मराठीनं अपभ्रंशापासून घेतले आहेत. सर्व विभक्तीप्रत्यय अपभ्रंशोत्पन्न आहेत. भाववाचक नामं तयार करण्यासाठी अपभ्रंश भाषेत प्पण हा प्रत्यय वापरला जातो. तोच मराठीनं उचलला आहे. अपभ्रंशाप्रमाणे मराठीतही आधी नामाचं सामान्यरूप होऊन नंतर विभक्तीचे प्रत्यय लागतात. मराठी व वर्तमानातील इतर बोलींतील काव्यात अन्त्ययमकाचं प्राबल्य दिसून येतं. हे अन्त्ययमक अपभ्रंश भाषेतून आलं आहे. अपभ्रंश भाषेतलं सर्व पद्यवाङ्मय अन्त्ययमकयुक्त आहे. संस्कृत, पाली व इतर प्राकृत भाषांत हा प्रकार नाही. त्याचप्रमाणे अपभ्रंश भाषेतील छंदांचे काही प्रकारही मराठीनं घेतले आहेत.

प्राकृत भाषांप्रमाणेच संस्कृत भाषेचाही जबरदस्त प्रभाव मराठीवर पडला आहे. ऋ, ॠ, ऐ, औ हे वर्ण संस्कृतात व मराठीत आहेत, प्राकृतात नाहीत. ङ्, ञ् ही दोन अनुनासिके संस्कृतात आहेत, प्राकृतांत नाहीत. मराठीत ती संस्कृतातूनच आली आहेत. संस्कृत शब्द तर मराठीत अमाप आहेत. तद्भव शब्दांचा भरणा आहेच. परंतु तत्सम शब्दंही कमी नाहीत. प्राकृत भाषांत तत्सम शब्द नाहीत.

पूर्ववैदिक, संस्कृत, प्राकृत आणि मराठी ही अवस्थांतरं कशी झाली, हे या उदाहरणावरून स्पष्ट व्हावं.

marathi.jpg

संस्कृत बोलणार्‍या आर्यांनी जेते म्हणून वसाहत केली, त्यावेळी इथल्या मूळ रहिवाशांनी आपली भाषा सोडून जेत्यांची संस्कृत भाषा उचलण्याचा प्रयत्न केला, आणि अशा प्रकारे चार प्राकृत भाषा तयार झाल्या. या उत्पत्तीचा काळ इ. पू. ६००-७०० असा धरता येईल. पाणिनीच्या वेळी संस्कृत भाषा बोलली जात होती. बुद्धाच्या वेळी प्राकृत भाषा निर्माण झाल्या होत्या. महाराष्ट्रात माहाराष्ट्री, पूर्वेकडे मागधी, मध्यप्रदेशात शौरसेनी आणि उत्तरेत पैशाची अशा या भाषा निर्माण झाल्या. या भाषा केवळ संस्कृतातून तयार झाल्या. त्यांचा वर्णोच्चार नरम होता आणि व्याकरणही अधिक सोपं होतं. मराठी भाषेच्या पूर्वी लोकांच्या वापरात असणार्‍या प्राकृत व अपभ्रंश या भाषांचा अस्त केव्हा झाला व मराठीचा उगम कधी झाला, हे निश्चित ठरवणं तसं कठीण आहे. नवी भाषा हळूहळू लोकमान्य होत असताना जुनी भाषा काही काळापर्यंत प्रतिष्ठित ग्रंथकार व लोक लिहीत व बोलत असतात. पाली, शौरसेनी, माहाराष्ट्री वगैरे प्राकृत भाषा लोकमान्य होत असताना पाणिनीय संस्कृत भाषा प्रतिष्टित लोकांत प्रचलित होती. अपभ्रंश भाषा प्रचलित होत असताना ग्रंथकार मात्र प्राकृत भाषेत लिहीत असत, आणि आधुनिक बोलीचा जन्म झाल्यावरदेखील पुष्कळ वर्षं अपभ्रंश व प्राकृत भाषांत ग्रंथ लिहिले जात असत. अपभ्रंश भाषेत तर इ. स. १२००पर्यंत उत्तम प्रकारची व पुढे १५०० सालापर्यंत थोडी ग्रंथरचना झाली आहे. तेव्हा पूर्वी प्रचारात असलेल्या भाषांचा अंत व नवीन भाषांचा जन्म या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस होणे शक्य नाही. महाराष्ट्रात मराठी जन्मास येण्यापूर्वी अमुक एक विशिष्ट प्राकृत भाषा लोकांच्या बोलण्यात होती, असं आपल्याला सांगता येत नाही. महाराष्ट्रीय समाज कोणतीही एक विशिष्ट प्राकृत भाषा बोलत नसून निरनिराळ्या प्राकृत भाषा बोलणारे निरनिराळे समाज होते व ते एकवटून त्यांच्या मिश्रणाने महाराष्ट्रीय समाज तयार झाला, व त्यांच्या भाषांच्या मिश्रणाने बनलेल्या मिश्र प्राकृतापासून मराठी भाषा बनली. शौरसेनी बोलणारे राष्ट्रिक लोक, मागधी व माहाराष्ट्री बोलणारे महाराजिक व महाराष्ट्रिक लोक, अपभ्रंश भाषा बोलणारे वैराष्ट्रिक व आभीर लोक महाराष्ट्रात येऊन मिसळले. त्यांच्या मिश्रणापासून मराठा समाज बनला व त्यांच्या भाषांपासून मराठी भाषा तयार झाली. मराठी भाषा प्रत्यक्ष जन्मण्यापूर्वीच्या संधिकालात एक दोन शतकं एखादी मिश्र प्राकृत किंवा मिश्र अपभ्रंश प्रचारात असावी.

महाराष्ट्रात प्राकृत भाषा मृत का झाल्या आणि मराठी का उत्पन्न झाली, हा विचार त्यातून पुढे येतो. महाराष्ट्रात या काळात काही मोठी राज्यक्रांती वगैरे झाली नाही. शक लोक बाहेरून काही काळ इथे आले, परंतु ते फार काळ टिकले नाहीत, आणि त्यांच्या भाषेचाही माहाराष्ट्रीवर परिणाम झाला नाही. मराठी भाषा निर्माण होण्यास काही विलक्षण विचारक्रांती झाली असावी. ही विचारक्रांती एकट्या महाराष्ट्रातच झाली नसावी. कारण केवळ माहाराष्ट्रीच नष्ट झाली असं नाही, तर मागधीच्या जागी बंगाली, शौरसेनीच्या ऐवजी हिंदी आणि पैशाचीच्या ऐवजी लेहेडा अशा नवीन भाषा उत्पन्न झाल्या.

या काळातली मोठी क्रांती म्हणजे बौद्धधर्माचा पाडाव आणि हिंदुधर्माची पुनर्रचना. श्रीहर्ष (इ. स. ६४५) वारल्यानंतर बौद्धधर्मास उतरती कळा लागली, आणि कुमारिलभट्टाच्या लेखांनी प्राचीन वैदिक धर्म पुन्हा बहरला. याच विचारक्रांतीमुळे सबंध हिंदुस्थानात प्राचीन प्राकृत भाषांचा लोप झाला आणि नवीन भाषा उदयास आल्या. प्राचीन प्राकृत भाषा एके काळी सामान्य जनतेत रूढ होत्या. विद्वानांच्या तोंडी किंवा पद्यांत माहाराष्ट्रीचा उपयोग करावा, नोकरांच्या तोंडी मागधी घालावी, साधारण पात्र व स्त्रिया यांच्या तोंडी शौरसेनीचा उपयोग करावा, आणि चोर, शिपाई इत्यादींच्या तोंडी पैशाची ठेवावी, हा संकेत नाटककार पाळत असत. बौद्धांनी आपल्या ग्रंथांत मागधीचा वापर केला होता आणि काही जैन ग्रंथ माहाराष्ट्रीत होते. हिंदुधर्माचा परत उदय झाल्यावर संस्कृत भाषेला महत्त्व प्राप्त झालं, आणि नवीन मीमांसकांचे, विशेषत: शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाचे विचार सामान्य लोकांना इतके पटले की, ते विचार लोकभाषेत सांगण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी होऊ लागला आणि संस्कृत भाषेचा पगडा लोकभाषांवर पडला. माहाराष्ट्रीय, मागधी, अर्धमागधी या बौद्ध व जैनांनी स्वीकृत केलेल्या भाषा मागे पडल्या आणि मराठीचा उदय होऊ लागला. हे सारं. इ.स. ७००-८०० या दरम्यान घडलं असावं.

मराठीच्या शब्दसमुहाकडे बघितलं तर संस्कृत भाषेच्या प्रभावातून झालेला हा उदय सहज लक्षात येतो. माहाराष्ट्रीत संस्कृत शब्द, उच्चार नरम करून मग घेतले जातात. पण जेव्हा लोकांमध्ये संस्कृताचं प्रेम वाढलं आणि निरनिराळे संस्कृत शब्द रोजच्या व्यवहारात आणणं समाजाला आवश्यक वाटलं, तेव्हा संस्कृत शब्द जसेच्या तसे मराठीत आणले गेले. त्यामुळे मजा अशी की, मराठीत एकच संस्कृत शब्द दोन प्रकारे येतो. एक माहाराष्ट्रीत या जुन्या नरम केलेल्या उच्चाराचा, तर दुसरा मूळ संस्कृतातला. उदाहरणार्थ, माणूस हा शब्द माहाराष्ट्रीतला आहे, आणि मनुष्य हा शब्द संस्कृतातून जसाच्या तसा आला आहे. कित्येक वेळी अशा दोन शब्दांचा थोडासा अर्थभेदही भाषेनं उत्पन्न केला आहे. उदाहरणार्थ, मार्ग शब्द आपण वापरतो आणि प्राकृत माग हा शब्दही आहे. पण मराठीत येताना या शब्दाचा अर्थ थोडा बदलला आहे. अशी शेकडो उदाहरणे देता येतील.

मराठी भाषेच्या उत्पत्तीचा काळ नक्की करण्यास खात्रीलायक असा आधार प्राकृत व अपभ्रंश या भाषांवरून मिळण्यासारखा नसल्याने आपल्याला मराठी भाषेतलाच आधार घ्यावा लागतो. मराठी भाषा बोली म्हणून लोकांच्या वापरात असल्याबद्दलचा सर्वांत जुना पुरावा कोणत्या काळातला आहे, हे पाहिल्यानेच मराठीचा उत्पत्तिकाळ निश्चित होऊ शकेल. मराठीत उत्कृष्ट अशी ग्रंथरचना शालिवाहन शके १२१२ (इ. स. १२९०) मध्ये झाली होती हे ज्ञानेश्वरीवरून उघड आहे. मुकुंदराजाचा विवेकसिंधु (श. १११०) व चक्रधरादिकांचे मानभावी वाङ्मय (श. ११८५) हे मराठी वाङ्मय ज्ञानेश्वरीच्या पूर्वीचं समजलं जातं. ज्ञानेश्वरी - विवेकसिंधुसारखे ग्रंथ निर्माण करण्याची शक्ती कोणत्याही भाषेत तिच्या जन्माबरोबर येणं शक्य नाही. भाषा जन्मल्याक्षणी अशी उत्तम ग्रंथनिर्मिती होत नसते. ग्रंथकर्तृत्व हे पायरीपायरीनंच वाढतं. तेव्हा हे ग्रंथ मराठीतील आद्य निश्चित नाहीत. सकस ग्रंथनिर्मितीची ताकद मराठी भाषेत त्यापूर्वीच निर्माण झाली असली पाहिजे.

ज्ञानेश्वरीत पदोपदी आढळून येणारं उपमांचं प्राचुर्य, भाषेचं सौंदर्य, कल्पनांचं प्रागल्भ्य, वाटेल तसा आकार घेण्याची भाषेची क्षमता, मनातील भावार्थ हरतर्‍हेनं विशद करण्याची हातोटी वगैरे भाषेतील वरवर दिसणारे, बुद्धीला पटणारे व मनाला भिडणारे असे दोन्ही प्रकारचे गुण भाषेत काही जन्मत:च येत नाहीत. हीच गोष्ट विवेकसिंधु व मानभावी वाङ्मयाची. मराठी भाषेच्या बालपणीची कल्पना देणारं वाङ्मय दुर्दैवानं आज उपलब्ध नाही. काही शिलालेख, ताम्रपत्रे इत्यादी तुटपुंजी साधनं आपापल्या परीनं प्रकाश पाडण्याचं काम करतात. शिलालेखांवरून तत्कालीन भाषेचं अस्तित्व तर सिद्ध होतंच, पण ते दगडावरील रेघा या प्रकारचं असल्यानं त्यांच्यांत संस्करण अथवा अर्वाचीकरण अजिबात शक्य नसतं. म्हणून तत्कालीन भाषेचं स्वरूप अभ्यासण्यास ती खात्रीलायक साधनं आहेत.

ज्ञानेश्वरीच्या एकच वर्ष पूर्वीचा म्हणजे शक १२११ (इ. स. १२८९)मधील निझामशाहीतील उनकेश्वराचा शिलालेख आहे. या लेखात रामचंद्र यादव, त्याचा एक नातलग वंकदेव, त्याचा करणाधिप हेमाडीपंडित, त्याचा साहाय्यक सोमदेवपंडित व माहूरचा रहिवासी सरणनायक, इतक्यांची नावं असून सरणनायकानं उनकेश्वराच्या देवालयाचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. लेखात अठरा ओळी आहेत, त्यांपैकी पहिल्या आठ ओळी पुढे दिल्या आहेत.

आऊं नमो गणाधिपतये नम: स्वस्ती सके १२११॥ वीक्रम संवत्सरे आ. स्व.
प्रताप चक्रवर्ति: स्री रामचंद्र देव: विजयोप्रत पाद पदुमोपजिवि: हाचि साहा स्सी वकदे.
व: प्रधान हेमाडिपंडित...तं निरोपीत नाएकु टकत्तु सोमदेयो पंडित: तस्मिकाले वर्तमाने
त्रेता युगी रामु: वनवासप्रसंगी: स्रभंगाचआ आस्रम आले : स्रभंग प्रीत्यर्थ : हे उद
दक उप्ल केले : तदा काल्ये स्सि देवरचित तीर्थ हे : हरीहरा प्रसादे मातापुरनिवासी क-सी-
ष्य: कौडण्यगोत्र: सराणुना एक : रुतेमेर्वृतेवें: सकल प्रासादरतु केले तो राम प्रासादं संपुर्ण
जाला : तेयाचा नमस्कारु हरीहरा देवता सकलासि
नमस्कार त्रिकाल: वाचिता विजैया... लटिग्रामु

यापुढे देवालयाला दान दिल्याचा उल्लेख आहे. या लेखातली भाषा संस्कृतमिश्रित मराठी आहे. काही रूपं अस्सल मराठी शिक्क्याची आहेत.

याच रामदेव जाधवांच्या राजवटीतला शके १२०७ म्हणजे ज्ञानेश्वरीच्या पाच वर्षं पूर्वीचा सासवडजवळ पूर गावात एक शिलालेख आहे. यात अकरा ओळी आहेत, पण त्या पूर्णपणे वाचता येत नाहीत.

स्वस्ति स्री सक.ह १२०७
वर्षे प (पा) र्थिव सवछरे
आस्विन (ना) दौ अद्यैह स्री
म प्रौ (त्प्रौ)ढप्रताप चक्रव
तीं स्रीरामच (चं)द्रदेवविजय
राज्योदै तदपादपदुअमोपजिविस
कळकर्णा (रणा) धिप. हेमाडि पंडि
तो। त बोंइ..दंडनायक स्रीपत प (प्र) मु (भु?)
णें नायक । रामेचंद्रदेवों नाडिती जीवि..
ळक कुळ..
...सोडि

ज्ञानेश्वरीच्या पूर्वी सतरा वर्षं, म्हणजे शके ११९५मध्ये (सन १२७३) कोरलेला पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाच्या मंदिरातील शिलालेख आहे. यालाच लोक चौर्‍यांयशीची शिळा म्हणतात. या शिळेस पाठ लावली म्हणजे मनुष्य चौर्‍यांयशी योनींतून मुक्त होतो, अशी समजूत आहे. श्रीविठ्ठलाचं मंदिर बांधण्यासाठी वर्गणी गोळा करण्यात आली होती. त्या वेळेस ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची नावं या शिळेवर आठ रकाने काढून त्यांत कोरली आहेत. या यादीत त्या वेळच्या अनेक व्यक्तींची नावं व काही नाण्यांचा उल्लेख सापडतो. यांपैकी काही नावं व शब्दं मराठी व्याकरणाच्या नियमांनी जखडलेले सापडतात. चालावेया, पैकाचा, रामचंद्र देवराये, देवरायासी, करनु, सेंठी, तेयाची, विठ्ठलाची आण इत्यादी शब्दं मराठी वळणाचे आहेत.

या शिलालेखाच्या पूर्वीचा शके ११६१मधला (सन १२३९) नेवाशाचा शिलालेख होय. हा ज्ञानेश्वरीपेक्षा ५१ वर्षं जुना आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या खांबाला टेकून बसून ज्ञानेश्वरी सांगितली, त्या खांबाजवळ कणैरेश्वराचं जुनाट हेमाडपंती देऊळ होतं. त्या देवळाच्या एका दगडावरील हा लेख आहे. त्याची भाषा संस्कृत व मराठी अशी मिश्र असून त्यात सीळू पंडित वृत्तिकाराला अठरा निवर्तने जमीन दिल्याचा उल्लेख आहे. लेख पुढीलप्रमाणे आहे..

स्वस्ति श्री शकु ११६१ विकारी सं
वत्सरे ॥ श्री कणैरेस्वरदेवालये ॥ पुराण
वृत्तिकार: । शौनकगोत्रीय: । माध्यंदिन: ॥
श्री सीलूपंडित: ॥ तथा पांपूवीहरि सीमागारे ॥
पुराणवृत्ती भूमी निवर्तनें सर्वनमसे अठरा ईए भूमी
कणैरेश्वदेऔम्मूली ॥ हे भूमि देवे पुरुषेण । जीवणा दिधली ॥

या लेखाच्या पूर्वीचा उपलब्ध असलेला शिलालेख शक ११५०मधला (सन १२२८) आहे. हा लेख आंबेजोगाई येथे मिळाला असून याला खोलेश्वराचा शिलालेख असं म्हणतात. यात कोरलेल्या एकंदर ४७ ओळींपैकी पहिल्या पस्तीस ओळी आणि शेवटच्या पाच ओळी संस्कृतात आहेत. मधल्या चारपाच ओळी मराठी आहेत असं वाटतं कारण त्यातलं मराठी स्पष्ट नाही. संस्कृत मजकूर लिहून झाल्यावर तोच मजकूर मराठीत लिहिला आहे. तदेव महाराष्ट्रभाषायात्र लिख्यते, असं लेखातच म्हटलं आहे.

याच सुमारास लिहिला गेलेला एक शिलालेख खानदेशात चाळीसगावापासून दहा मैलांवर असलेल्या पाटण या गावातील श्री भवानीच्या मंदिरात आहे. हा लेख ज्ञानेश्वरीच्या पूर्वी ८४ वर्षं, म्हणजे शक ११२८मध्ये (सन १२०६) लिहिला गेला. हा लेख भाषेच्या दृष्टीनं अधिक स्पष्ट आहे. लीलावतीचे कर्ते प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य यांच्या चांगदेव नावाच्या नातवानं हा लेख खोदवला आहे. देवगिरीच्या सींधण यादवाचे मांडलिक म्हणून असलेल्या निकुंभ नावाच्या राजकुलाच्या आश्रयानं ज्योतिषशास्त्राचं अध्ययन, अध्यापन करण्यासाठी मठाच्या स्थापनेसंबंधी यात उल्लेख आहे. मठाच्या व्यवहारांसाठी कोणकोणत्या गोष्टी द्यायच्या, याचा त्यात उल्लेख आहे. लेखाच्या शेवटच्या चार ओळी मराठीचं पूर्वस्वरूप प्रगट करतात. या लेखात इया, पाटणी, केणें, तेहाचा, ब्रह्मणा, दिन्हला, तेलिया, मबिजे, मबावे इत्यादी मराठी व्याकरणानं मान्य केलेली रूपं आहेत.

या शिलालेखाच्या अगोदरचा परळ इथे एक सरकारी बंगला बांधत असताना सापडलेला शिलालेख आहे. हा शिलालेख शके ११०९मध्ये (सन ११८७) कोरलेला असल्यानं ज्ञानेश्वरीच्या पूर्वी १२३ वर्षांचा ठरतो. यात कोकणाच्या अपरादित्य नावाच्या राजानं श्री वैद्यनाथ देवाच्या पूजेसाठी षट्षष्टी म्हणजे साष्टी प्रांतातील माहुलीजवळ २४ द्राम उत्पन्नाच्या जमिनीची देणगी दिल्याचं नमुद केलं आहे. यातील सुरूवातीचा मजकूर संस्कृतात असून शेवटच्या दोन ओळींतील शपथ मात्र मराठीत आहे. यावरून एक गोष्ट उघड आहे की, या सुमारास शिष्टांची दरबारी भाषा जरी संस्कृत असली तरी सामान्य लोकांची भाषा मराठी होती. सर्वांना ती शपथ किंवा तो शाप समजावा म्हणून जी भाषा वापरली ती पुढीलप्रमाणे आहे -

॥अथ तु जो कोणु हुवि ए शासन लो
पी तेवा श्री वैद्यनाथ देवाची भाल सकुटुंबीआ पडे ॥ तेहाची
माय गाढवे *विजे॥

याच्या आधीचा पुरावा एका ग्रंथातला आहे. यशश्चंद्र नावाच्या एका लेखकाच्या राजमतीप्रबोध या ग्रंथात राजसभेत बसलेला एक महाराष्ट्रिक एका स्त्रीच्या रूपसंपदेचं वर्णम करतो आहे. या ग्रंथाचा काळ गुजराती संशोधक लालचंद गांधी अकराव्या शतकाचा उत्तरार्ध मानतात. वर्णनाची भाषा पुढीलप्रमाणे -

देव चतुरांगुलाची जीहा, मी कांई सांघओ? गोमटी मुइ, फाफट निलाट चापटु, आंखड्याली ताहीची, वीणी काली, न छोटी न मोटी वानिचां पाहुली नाही । कांइ तहि तूलि। नाहि उंडी जाणु मुखकरी कुंडी, बोलती महुरवाणि चालती सुजाणि राउल खरी रूढी अमृत करी इसी कूयडी॥

मराठीच्या अस्तित्वाचा याच्या आधीचा दाखला उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सांवरगाव येथील महामंडालेस्वर कडंबकुलातिलक मारडदेवाने दिलेल्या दानासंबंधी असलेल्या शिलालेखात सापडतो. याचा काळ १०८६ शके आश्चिन शु. १ गुरौ असा आहे. म्हणजे इंग्रजी तारीख १९ सप्टेंबर ११६४. ११५७ साली लिहिला गेलेला एक शिलालेखही पळसदेव इथे सापडला आहे. सरडेश्वराच्या देवळावर हा शिलालेख आहे. जाधवांच्या पूर्वी राष्ट्रकूटांच्या राजवटीत मराठी भाषा चांगली प्रचलित होती, असं यावरून लक्षात येतं.

या शिलालेखांच्या पूर्वीचा एक भरभक्कम पुरावा मानसोल्लास अथवा अभीलषितार्थचिन्तामणि या ग्रंथात सापडतो. हा ग्रंथ इ.स. ११२९मध्ये, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या १६१ वर्षांपूर्वी चालुक्य वंशातल्या सोमेश्वर या राजानं लिहिला. या ग्रंथात मराठी रूपं व मराठी शब्द कित्येक ठिकाणी आले आहेतच, पण विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथात रागतालाची माहिती देताना ग्रंथकारानं काही मराठी पदंही दिली आहेत. ही पदं किंवा ओव्या महाराष्ट्रातील स्त्रिया दळताना, कांडताना म्हणतात, असंही सोमेश्वर लिहितो. मराठीत लोकगीतांची परंपरा किती जुनी आहे, हे यावरून लक्षात येतं.

मानसोल्लासातील ही पदं पुढीलप्रमाणे -

१. जेणे रसातल उणु मत्स्यरूपे वेद आणियले मनु शिवक वाणियले तौ संसारसायरतारण मोहतो रावो नारायणु जो गीची
२. जो गीची जाणे गाइचे बहुपरिरूपे निर्होगो मय सैक: शेशनले सुलघु शशजन मान वंकसे

या लेखाच्या पूर्वीचा एक मराठी ताम्रपट आहे. तो कोकणातल्या दिवे या गावी सापडला. इ. स. १०६०मध्ये हा ताम्रपट लिहिला गेला. या ताम्रपटात वासुदेव भट्टाने त्याच्याजवळ असलेले स्थितिपुरी गावासंबंधीचे दोन ताम्रपट सभेचा समक्ष मावलभट्टाला दिल्याचा उल्लेख आहे. तसंच या गावाच्या कल्याणासाठी १२७ सोन्याची गद्याणक नाणी दिल्याचाही त्यात उल्लेख आहे. ही नाणी एका कंठ्यात ओवलेली आहेत. ऋषियप्प घैसास, सिद् पद्मदेव, तिकै, मधुवै षंगविद् जीवणै, नागरुद्रभट्ट, मधुवय, देवल वगैरे व्यक्तींची नावं त्यात आहेत. ठवियली, ठवियले, जाणति, लिहले ही क्रियापदे, स्थितिपुरीची, स्थानहचा दिवेचे ही षष्ठीची रूपे, योगक्षेमु, सासने ही प्रथमेची रूपे, पासे, पासी ही शब्दयोगी अव्यये आणि जे, ते ही सर्वनामे या ताम्रपटात सापडतात.

या उल्लेखाच्या आधीची मराठीची निशाणी म्हैसूरजवळ श्रवणबेळगोळ येथील शिलालेखात सापडते. मराठीतील शिलालेखांपैकी हा आद्य असल्यानं विशेष महत्त्वाचा आहे. हा शिलालेख इ.स. ९८३मध्ये लिहिला गेला. गंग घराण्यातल्या राचमल्ल राजाच्या कारकीर्दीत त्याच्या चावुण्डराय नावाच्या प्रधानानं बाहुबलजी ऊर्फ गोमतेश्वराचा एक अतिशय प्रचंड असा दगडी पुतळा उभारला, आणि सर्व लोकांच्या माहितीसाठी पुतळ्याच्या खाली निरनिराळ्या देशभाषांत ती गोष्ट कोरवली. मराठीतला मजकूर पुढीलप्रमाणे -

श्री चावुण्डराजे करवियले
गंगराजे सुत्ताले करवियले

या दोन ओळी एकाच काळात खोदलेल्या नाहीत. दुसरी ओळ काही वर्षं मागाहून इ. स. १११७मध्ये कोरली असावी. या शिलालेखातली अक्षरं मोठी आहेत. पहिल्या श्रीची उंची सुमारे दीड फ़ूट आहे. यात उल्लेखलेलं गंग घराणं दोन ठिकाणी नांदलं. एका शाखेनं कलिंगात मुखसिंग शहरी राज्य केलं. दुसरीनं म्हैसूर येथे राहून पश्चिमेकडच्या प्रदेशावर राज्य केलं. या गंग घराण्यातील मारसिंह, राचमल्ल आणि रक्कस या तिघा राजांच्या अमदानीत चावुण्डराय हा प्रख्यात जैन योद्धा, पंडित आणि भक्त त्यांचा प्रधान होता. अजितसेन हा राचमल्ल आणि चावुण्डराय या दोघांचाही गुरू होता. राचमल्लाची कारकीर्द इ. स. ९७४ - ९८४ अशी होती, व त्याच काळात चावुण्डरायानं या अजस्र स्तूपाची उभारणी केली. या त्याच्या धार्मिक आणि पुण्यशील कृत्यामुळे तो जरी प्रधान होता तरी त्याला राचमल्लानं राय ही बहुमानाची पदवी दिली. त्याने उभारलेल्या घुमटामुळे त्याला गोम्मतराय असंही म्हणत असत. त्याने लिहिलेले दोन ग्रंथ चामुण्डरायपुराण आणि चरित्रसार या नावाने प्रसिद्ध आहेत.

या शिलालेखाच्या अगोदरच्या काळातल्या काही ताम्रपटांत व शिलालेखांतही मराठी शब्द सापडतात. आपण वर जे शिलालेख बघितले, त्यांच्या पूर्वीच्या काळातील, म्हणजे इ. स. ११२७पासून ते थेट इ. स. ६८०पर्यंतच्या सोळा ताम्रपटांत व शिलालेखांत अमात्यु, देणे, प्रधानु, सांब्राज्य, वइरी, जो, इथ, खळखळ, करवून, करित, हित, पन्नास असे मराठी शब्द सापडतात. त्यावरून मराठी भाषेच्या अस्तित्वाचा दाखला इ. स. ६८०पर्यंत न्यायला हरकत नाही.

मराठीच्या अस्तित्वाबद्दलचा आणखी एक उल्लेख धर्मोपदेशमाला या ग्रंथात सापडतो. इ. स. ८५९मध्ये हा ग्रंथ लिहिला गेला. या ग्रंथात मराठी भाषेचं पुढीलप्रमाणे वर्णन केलं आहे -

सललिय-पय-संचारा पयडियमयणा सुवण्णरयणेल्ला।
मरहट्टय भासा कामिणी य अडवीय रेहंती॥

याचंच संस्कृत भाषांतरही आहे -

सललितपदसंचारा प्रकटितमदना सुवर्णरचनावती ।
मरहट्ट भाषा कामिनी य अट्वी च राजन्ते ॥

या श्लोकात मराठी भाषेस सुंदर कामिनीची उपना देऊन ती अटवीप्रमाणे सुंदर गतीची, मदनाने उद्दाम, चांगल्या वर्णाची आहे, असं वर्णन केलं आहे.

मराठीच्या अस्तित्वाचा आणखी एक फार जुना व महत्त्वाचा पुरावा कुवलयमाला नावाच्या ग्रंथात मिळतो. हा ग्रंथ उद्योतनसूरी याने इ. स. ७७८मध्ये लिहिला. या ग्रंथात गोल्ल, मध्य, मागध, अंतर्वेध, कीर, टक्क, सैंधव, मारव, गुर्जर, लाड, कण्णाड, तायिक, कोसस, मतहट्ठ, आंध्र, खस, पारस, बर्बर इत्यादी अठरा देशी भाषांचा उल्लेख आहे. पुढे प्रत्येक देशातील मनुष्याचं वर्णन करून त्याच्या भाषेतील अतिशय ठळक अशी लकब सांगितली आहे. उदा. तेरे मेरे आउति जंपिरे मज्झदेसे म्हणजे तेरे मेरे आओ असं म्हणणार्‍या मध्यदेशीयास पाहिले. असंच पुढे गुर्जर, माळवी या लोकांचं व त्यांच्या भाषांचं वर्णन आहे. दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य । दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे ॥, म्हणजे बळकट, ठेंगण्या, सावळ्या अंगाच्या, काटक, अभिमानी, भांडखोर, दिण्णले (दिले), गहिल्ले (घेतले) असं बोलणार्‍या एका मराठ्यास पाहिले, असं एका मराठी वाण्याचं व त्याच्या भाषेचं वर्णन केलं आहे. इ. स. ७७८च्या सुमारास मराठी समाज व मराठी भाषा या दोन्हींना एक प्रकारचं विशिष्ट स्थान प्राप्त झालं होतं, हे यावरून सिद्ध होतं.

आज तसं पाहिलं तर सातपुड्याच्या खाली कावेरीपर्यंतचा पश्चिमेकडील प्रांत मराठीनं व्यापला आहे. उत्तरेस दमणपासून दक्षिणेस गोव्यापर्यंतचा अरबी समुद्राचा पश्चिम किनारा ही मराठीची पश्चिमेकडील मर्यादा आहे. उत्तरेस ती दमणपासून दमणगंगेच्या काठाकाठानं तिच्या उगमापर्यंत जाऊन नंतर घाटावर चढून घाटावरील पाणलोटाच्या अनुरोधानं नर्मदा नदीस गाठते. इथेच तिची गुजराती आणि नेमाडी या भाषांशी भेट होते. यापुढे मराठीचा प्रवास सातपुडा पर्वताच्या रांगेनं होतो. सातपुड्याच्या एका रांगेतून गाविलगडाच्या आसपासच्या प्रांतांतून तिचा रोख पूर्वेकडे वळून बैतुल आणि शिवनी वगैरे प्रदेशास अर्धवर्तुळाकार वळसा घालून नागपूर मध्यावर ठेवून थोडीशी दक्षिणेस तर थोडीशी पूर्वेस व पश्चिमेस वळून लांजी व वैरागडजवळ गोण्डी व तेलुगु या भाषांना ती भेटते. पुढे चांद्यापर्यंत जाऊन पश्चिमेकडे पैनगंगेच्या काठाकाठानं माहूरपर्यंत आल्यावर तिचा आणि तेलुगुचा संबंध तुटतो. माहूरवरून दक्षिणेकडे गोदावरीकडे जाऊन नैऋत्येकडे वळणावळणाने देगलूर, नळदुर्ग, सोलापूर, विजापूर या गावांवरून ती कृष्णानदीजवळ येते. इथे कानडीचा आणि तिचा संबंध येतो तो कोल्हापूरपर्यंत टिकतो. नंतर कोल्हापूरवरून पुन्हा नैऋत्येकडे ती जाते व संपूर्ण करवीर प्रांत व्यापून गोव्याच्या घाटालगतच्या प्रदेशावरून तेरेखोल इथे पुन्हा अरबी समुद्रास मिळते. याशिवाय निरनिराळ्या विभक्त अशा पुष्कळ लहान प्रदेशांत मराठी बोलली जाते. सतराव्या आणि अठराव्या शतकांत साम्राज्याच्या विस्तारासाठी मराठ्यांनी जी मुलुखगिरी वेगवेगळ्या प्रांतांत केली, त्या प्रांतांत त्यांचे पाय रुजल्यावर साहजिकच त्यांची मातृभाषाही तिथे रुजली. मुलूखगिरीचं पहिलं वारं ओसरल्यावर जेते जसे स्थायी झाले, तशी त्यांची भाषाही तिथे स्थायी झाली. तंजावर, बडोदा, इंदूर, ग्वाल्हेर, काशी अशा दूरदूरच्या प्रांतांत मराठी भाषा राजदरबारी स्थानापन्न झाली.

भाषांचा हा इतिहास बघितला तर या सार्‍या भाषा एखाद्या विशाल वटवृक्षाच्या अगणित खोडांप्रमाणे भासतात. वडाच्या पारंब्या फांद्यांमधून निघून जमिनीत जाऊन मूळ धरतात आणि नव्या वृक्षांची उभारणी करतात. कालांतरानं यातला मूळ वृक्ष कोणता, शाखा कोणत्या, मुळे कोणती हे कळतच नाही; सगळेच वृक्ष मात्र एकमेकांना जीवनरस देत असतात. अशा वृक्षाला गीतेतल्या ऊर्ध्वमूल अश्वत्थाचंच वर्णन लागू पडेल. ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे,

आणि अधिं फांकली डाळें । तिथें चि होति मूळें ।
तेयातळिं पघळे । वेलि पालौ ॥ १५. १४४॥
परि येरां रुंखासारिखा । तळिं मूळें वरि शाखा ।
तैसा न्हवे म्हणौनु लेखा । नैए कव्हणा ॥ १५.१४७॥

मराठीचं मूळ शोधण्याच्या या प्रयत्नाचा समारोप ज्ञानेश्वरांच्या मर्‍हाटिया बोलांनीच करणं उचित ठरेल.

kalpesh2.JPG

_________________________________________________

आभार - डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. सत्त्वशीला सामंत, डॉ. विवेक वाटवे

सुलेखनचित्रे - श्री. कल्पेश गोसावी

_________________________________________________

प्रमुख संदर्भ -

१. मराठीचा उद्गम व विकास - डॉ. कृ. पां. देशपांडे
२. भारत इतिहास संशोधन मंडळाच्या त्रैमासिकांतील श्री. चि. वि. वैद्य, श्री. कृ. पां. देशपांडे, श्री. म. ना. खरे यांचे लेख
३. देशी भाषांचे प्राचीनत्व - श्री. चिं. वि. जोशी
४. सह्याद्रीम. सा. पत्रिका यांतील म. म. द. वा. पोतदार यांचे लेख
५. महाराष्ट्राचा वसाहतकाल - इतिहासाचार्य राजवाडे
६. Buddhist India - Rhyst Davids
७. मराठीचे वैभव - श्री. ना. गो. नांदापूरकर
८. मराठीचा विकास - श्री. गुणे व श्री. वैद्य

_________________________________________________

Protected by Copyscape Online Infringement Checker

प्रकार: 

अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे.
कौतुकास्पद काम आणि वाचन आहे श्री Chinox यांचे .
मला खूप वेळ लागला वाचायला खरा. कारण इतक्या काही गोष्टी होत्या कि त्या मला
गूगल करायला लागल्या, संदर्भ बघायला.
अशेच दर्जेदार लिखाण देत राहा तुम्ही हीच माफक अपेक्षा.

हार्दिक शुभेच्छा.
उमेश

छान माहिती. लेख एकदम आवडला. उदाहरणासकट लिहिले असल्यामुळे काही क्लिष्ट वाटले नाही.
धन्यवाद चिनूक्स.

मी चार भागात वाचला लेख. दोन भाग महाराष्ट्राचे आणि दोन मराठीचे. त्यामुळे मलाही असेच वाटले की एका लेखापेक्षा लेखमाला होईल ह्याची.

छान लेख चिनूक्ष.
काही गोष्टी : १. "महाराष्ट्राच्या इतिहासात" स्वराज्याचा उल्ले़ख नाही. शीर्षकावरुन तशी अपेक्षा होते.
२. फारसी भाषेच्या सद्य मराठीवरील प्रभावाची चर्चा व्हावयास हवी होती असे वाटते.

दुर्वास,

धन्यवाद. Happy

लेखाचा मूळ उद्देश मराठी भाषेची उत्पत्ती शोधणं हा होता, आणि त्या अनुषंगानेच केवळ महाराष्ट्राचा इतिहास आला आहे. महाराष्ट्राची वसाहत व मराठी भाषा यांचा संबंध केवळ अधोरेखीत करायचा होता. शिवाय मराठी भाषेच्या उत्पत्तीशी फारसीचा संबंध नाही. मराठीत फारसी, तुराणी, तामीळ, इंग्रजी शब्द फार नंतर आले. म्हणून ती चर्चा केलेली नाही.

चिनुक्स..... माहीतीपुर्ण लेखाबद्दल धन्यवाद! लै भारी, एक नंबर Happy
निवडणुकीच्या धामधुमीत लेख पुर्ण वाचायला उशीर झाला..... सम्जायला एक पुर्ण पंचवार्षिक योजना लागेल......:)

जिओग्राफिकल थॉट (लेखकः माजिद हुसेन) नावाचे एक भुगोलाचे पुस्तक आहे. ते वाचताना जितका आनंद (अन मेंदुला त्रास) होतो त्याचाच पुन्हा अनुभव आला. ते ही पुस्तक नक्की वाच. जगाचा इतिहास अतिशय सुंदर रितीने दिलेला आहे.

झक्की साहेब, श्रोडिंगर इक्वेशन्स वाल्या श्रोडिंगर ने त्याच्या आख्ह्या आयुष्यात त्या एका इक्वेशन्स शिवाय दुसरे काही दिवे लावल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे तुम्ही नाराज होउ नका. Happy

चिनुक्स, जीमेल वरुन एक एमएस एक्सेल फाईल पाठवत आहे. त्यात जगाच्या समकालीन संस्क्रुतींचा श्री.अगरवाल यांनी घेतलेला अत्यंत संक्षिप्त आढावा आहे. (हे संक्षिप्त म्हंजे तुझ्या वरील लेखापेक्षा फक्त थोडे मोठे आहे Happy )
संग्रही असावी अशी माहिती आहे. श्री अग्रवालांच्या मेहनतीचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. मला ती फाईल येथील एका प्रोफेसर ने दिली होती.

चिनुक्स, इकडे लक्ष दे, वरील लेखाच्या अनुषन्गाने.......
चारपाच दिवसान्पुर्वी कुणाकडे तरि पाहूणा गेलो असताना (बहुधा रविवारी २७ सप्टेम्बर रोजी) सकाळ (पुरवण्यान्सहीत) वाचत होतो, त्यात पुण्यात की कुठे कुणाकडे तरी (बहुधा घैसास) एक देवीची मूर्ति पुजेत आहे जी ज्ञानेश्वरान्च्याही आधी वीस वर्षे जुनी आहे. तिचे पुढून व मागुन फोटो आले होते. त्यामूर्तिमागे कोरलेली भाषा व मजकुराचा विशेष उल्लेख त्या बातमीत होता! वरील लेखाच्या अनुषन्गाने ते फोटो व त्या बातमीची लिन्क इथे देता आली तर बघ ना! किमान तुझ्या माहितीसाठी बघ!
(मी इ.सकाळच्या नावाने शिमगा करतो त्याचे कारण हेच की हार्डकॉपीमधे वाचलेली बातमी इ.सकाळमधे शोधणे महादिव्य अस्ते! गवताच्या गन्जीत पडलेली सुई एकवेळ शोधता येईल पण सकाळमधे ठराविक बातमी शोधणे अशक्य, गेले दोन तास मी शोधतोय, सर्च इन्जिन पण वापरले, काही उपयोग नाही! आता कुणाला आठवत असेल हार्डकॉपी वाचलेली तरच काही होइल! Sad बाकी कोणती गोष्ट युजर फ्रेण्डली ठेवली असेल ही अपेक्षाच फोल ठरते, झक्की म्हणतात ते कित्येकदा १०१% पटत!
जिथे तिथे आपल "सकलपुजा परिपुर्णार्थे अक्षतां समर्पयामी" म्हणून बोळवण केलेली Proud )

चिन्मय, शोधनिबंध चांगला जमला आहे पण या आधीच्या शोधनिबंधांशी तुलना करता या शोधनिंबंधात संदर्भ कमी पडलेत. याच विषयावर अनेक पुस्तकातून वेगवेगळी माहिती मिळते. पुर्वी तू citations देत असायचा या निंबधात नाही दिले. अमरावती आगार कधी पाहिले तर तिथे आत मधे अमरावतीचा इतिहास सांगणारी खूपच सुंदर माहिती दिली आहे. अमरावती इतके प्राचीन शहर असून इतके नवीन का वाटते याचे कुतुहुल वाटते.

नवल वाटले हा लेख वाचून देखील काही जणांना ईंग्रजी मधे प्रतिक्रिया नोंदवावीशी वाटली Happy

Pages