स्पर्धेचे नियम :
१. दर चार दिवसांनी एक कविता दिली जाईल, तिचे विडंबन करायचे आहे.
२. विडंबन मराठी भाषेतच केले जावे.
३. एका आयडीला एका कवितेचे फक्त एकच विडंबन करणे अपेक्षित आहे.
४. एका आयडीला, एकूण दिल्या जाणार्या चारही कवितांचे विडंबन करण्याचे स्वातंत्र्य आहे.
५. विडंबन करताना शक्यतो वृत्त, गण ह्यांचे नियम पाळून करावे असा आग्रह आहे पण बंधन नाही. मूळ कविता ज्या प्रकारात आहे, त्याच प्रकारात विडंबन पण आले तर उत्तम!!
६. विडंबनाला शीर्षक देणे बंधनकारक आहे.
७. विडंबन अश्लील किंवा बिभत्स नसावे.
८. विडंबनात वैयक्तीक टीका नसावी.
९. एका आयडी तर्फे एकूण फक्त चारच एन्ट्री स्वीकारली जातील.
१०. विडंबन या अगोदर मायबोलीवर प्रकाशित झालेले नसावे.
११. विजेता मतदान पध्दत वापरून निवडला जाईल.
--------------------------------------------------------------------------------------
स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना :
१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.
२. तसेच इमेल पाठवताना Vidamban spardha असे सब्जेक्ट मधे लिहावे. (एक नम्र सूचना : इकडूनच कॉपी-पेस्ट करावे.)
३. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना प्रवेशिकेसोबतच मायबोली आयडी आणि प्रवेशिकेला शीर्षक देणे बंधनकारक आहे.
४. प्रत्येक प्रवेशिकेला स्पर्धेसाठी क्रमांक (ID) देऊन ती प्रवेशिका संयोजकांतर्फे ह्या बातमी फलकावर प्रकाशित केली जाईल, तसेच स्पर्धकाला प्रवेशिका मिळाल्याची पोच इ-मेल द्वारे पाठवली जाईल.
५. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर संयोजकांना २४ तासांची मुदत द्यावी. २४ तासांनंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेल करावी.
--------------------------------------------------------------------------------------
मायबोलीकरांकडून आलेल्या सुचनेनुसार ह्या वर्षी स्पर्धांच्या निकाल जाहिर होईपर्यंत स्पर्धकांचे नाव जाहिर केले जाणार नाहिये. मतदान निनावी (anonymous) पध्दतीने घेतले जाणार आहे. त्यामुळे स्पर्धकांनी त्यांच्या प्रकाशित झालेल्या प्रवेशिकेवर येणर्या प्रतिसादांना, निकाल जाहीर होईपर्यंत कुठल्याही माध्यमात (प्रतिक्रिया, विचारपुस, वाहत्या बातमी फलकांवरच्या गप्पा इत्यादी ) उत्तर देऊ नये. स्पर्धकांकडून (अनवधानानेसुद्धा) त्यांची ओळख उघड झाल्यास ती प्रवेशिका स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
--------------------------------------------------------------------------------------
तिसरी कविता :
वारी चुकलेल्या वारकऱ्याचा अभंग - कवी हरीश दांगट - छंदबद्ध रचना
मज पामरासी | नशीबाचा भोग |
वारीचा योग | नाही देवा ||
संसाराचा मज | झाला बहू व्याप |
आता अनुताप | होई मज ||
झालो एक किडा | भोवताली कोष |
आता माझा दोष | कोण सांगे ||
बैसलो मी घरी | मेळवाया धन |
परी माझे मन | तुझ्या पायी ||
मज डोईवरी | संसाराचा भार |
आठवण फार | येई आता ||
संत जाती पुढे | पाहतो मी पाठ |
तुझी माझी गाठ | होणे नाही ||
रचनेबद्द्ल:
कवी हरीश दांगट हे छंदबद्ध रचना करण्यासाठी मायबोलीवर प्रसिद्ध आहेत.
हा अभंग देवद्वार छंदात आहे पहिल्या तीन चरणात ६ अक्षरे आणि शेवटच्या चरणात ४ अक्षरे आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात यमक साधले आहे...
विडंबन करताना तेही छंदबद्ध असावे असा आग्रह आहे पण बंधन मुळीच नाही. पण मूळ कवितेचे नियम पाळले गेले की विडंबन ही आपोआप लयीत येते हे ओघाने आलेच!
------------------------------------------------------------------------------------
आत्तापर्यंत आलेल्या प्रवेशिका :
१. वारी हुकलेल्या पुढार्याचा अभंग
२. कोटा चुकलेल्या पिंटकाचा आक्रोश
३. महागाईग्रस्त मध्यमवर्गाचा अभंग