आमचा शोध !

Submitted by कवठीचाफा on 19 November, 2008 - 08:17

काल स्टार माझा वर पाहीलेल्या एका बातमीला मध्यवर्ती ठेउन लिहीलेली काल्पनीक कथा आहे. यात खिल्ली उडवणे हा विचार नाही.
********************************

एका न्युज चॅनेलला दाखवली गेलेली बातमी :

`मुंबईमधे काही ठिकाणांवर भुतांचा वावर असल्याचे अनेकांनी सांगीतले आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी अकरा विद्यार्थ्यांचे टोळके पुढे सरसावले आहे.'

बातमी आम्हीही ऐकली, पाहीली. पण आम्हाला त्याची काळजी नाहीये. कारण आम्ही एरव्हीही सर्वांना दिसतोच फ़क्त चेहर्‍यांच्या या गर्दीत तुम्ही आमचे वेगळेपण शोधु शकत नाही. आणि ते तुम्हाला शोधता येणारही नाही. पण कधी कधी आमच्याही चुका होतातच. कधी भावनांचा उद्रेक होतो, आणि आमच्यातले काहीजण कुणाच्या मागे चालत निघतात. याचा अर्थ आमच्या मनात तुमच्या बद्दल काही आकस आहे असं नाही. पण तुमच्यातल्या एखाद्याच्या मागे जाउन त्याच्या घरातले काही सोनेरी क्षण टिपता आले तर, अनुभवता आले तर त्यांचा आनंद घ्यावा इतकीच त्यांची इच्छा असते पण इतक्या साध्या गोष्टीत त्यांनी कधी नाहीच बाळगली तर मग एखाद्यावेळी त्यांच्या अस्तीत्वाची जाणिव त्या तुमच्यातल्या कुणाला तरी होते. आणि आपल्या मागे कुणीतरी चालत होते असे तो इतरांना सांगतो. आणि मग आमच्या बद्दल तर्क, कसले कुतर्कच चालु होतात. आणि मग भलत्याच समजात तुम्ही त्या जागांचा वापर, तिथला वावर टाळता. आम्हालाही हेच हवे असते. आमच्या आसर्‍यावर आम्हाला कुणाचे अतीक्रमण नको असते.
आता तुमच्या या नव्या शोधमोहीमेची थोडीफ़ार कल्पना तर आम्हाला आलीच आहे. यावर तुमच्यातल्या काही तथाकथित मान्यवर जी टिप्पणी करत आहेत ती ही आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. जोपर्यंत ते आमच्या अस्तीत्वाला तुमच्यातल्या मानसीक आजारांचे दाखले देत आहेत तोपर्यंत आम्हाला काहीच त्रास नाही. अर्थात त्यांनाही नक्की माहीत नाही की ज्या मानसीक आजारांना ते औषधांनी बरं करतात असे ते समजतात त्या रुग्णांना नक्की काय झालेले असते. त्यांच्या समोर नक्की कोण कोण कसली कसली रुपे घेउन वावरत असतं. आणि या असल्या तज्ञांच्या विधानांवर विश्वास ठेउन आमच्या शोधात निघालेले ते अकराजण........
मुळात या तज्ञांनी किती अश्या ठिकाणांना भेटी दिल्यात जिथे आम्ही वसाहत केलीये? हा प्रश्न मात्र कुणालाच पडत नाही. पण आता मात्र प्रश्न आमच्या अस्तीत्वाचा आहे. आणि आम्ही आमच्या अस्तित्वासाठी कीतीही आटापीटा करु शकतो, कोणत्याही थराला जाउ शकतो याची कल्पना तुम्हाला नाहीये.

अखेरीस आम्ही जी गोष्ट नको म्हणत होतो तीच घडली. आमच्या अस्तीत्वाचा पुरावा शोधत ते अकराजण आमच्या आजुबाजुच्या लोकांना भेटी देत आहेत. अर्थात आम्हाला पाहीले आहे असे सांगणारं असं कुणीच नाही भेटलं त्यांना आणि ते तसं भेटणार नाहीच याची खात्री आहे आम्हाला. सध्यातरी त्यांना फ़क्त आमचा वावर जाणवला तोही दुसर्‍याला, असे सांगणारेच भेटत आहेत. आणि काहीजणतर आमचे अस्तित्वच नाकारत आहेत, ते तसे नाकारणार हे ही आम्हाला माहीत आहे, आगदी त्यामागचे कारणही आम्हाला माहीत आहे. जो पर्यंत त्यांची आमची प्रत्य़क्ष भेट होत नाही तोपर्यंत तरी आम्ही निश्चींत आहोत. कारण आजही आम्हाला कुणाला त्रास द्यायचा विचार नाही.

शेवटी त्या अकराजणांनी आमची प्रत्य़क्ष शोधमोहीम उघडलीच, पण आता आम्ही सावध आहोत आमच्या अस्तित्वाची पुसटशी शंकाही त्यांना येणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. तरी त्यातुनही आमच्यावरही काही बंधने आहेतच तीच जर गळुन पडण्याची वेळ आली तर मात्र पुढे काही विचार करावा लागेल. आमच्या वसाहतींना भेटी देताना त्यांच्या मनात असलेल्या `अंधश्रध्देला' तडा जाउ नये म्हणुन आम्ही प्रयत्न करु हे नक्की.

शेवटी जे व्हायला नको असे वाटत होते ते झालेच. त्या अकरा जणांनी आमच्या वसाहतीतच आमचा शोध घ्यायला सुरुवात केली. आम्ही त्यांच्या जवळपास नव्हतो तरी त्यांच्यावर ल़क्ष ठेउन नक्कीच होतो. त्यांची चर्चा ऐकत होतो.
" काय रे ! इतक्या फ़स्टक्लास जागेत भूतं रहात असतील?"
" मला नाही वाटत, लोकांचे भ्रम असतात रे सगळे" त्याला उत्तर देणारा हसला.
" पण मुंबईसारख्या ठिकाणी जिथे लोक रेल्वे लाईनच्या बाजुला रहायला कमी करत नाहीत तिथे अशी मस्त जागा रिकामी कशी सोडतील रे लोकं".
" हा मुद्दा बरोबर वाटतोय रे ! पण अंधश्रध्दा रे, दुसरे काय ! "
" तरी पण, तुला मनापासुन पटतय का हे?"
"....."
" चल बाकीचे पुढे गेले त्यांच्या बरोबर जायला पाहीजे नाहीतर आपल्याबद्दल त्यांचा गैरसमज होईल"

थोडक्यात त्यांच्या टोळक्यात भितीचा शिरकाव झालाच तर. त्यांना सगळे घर शोधताना आम्ही पहात होतो पण कुणीही त्यांच्या वाटेत आडवे आले नाही. पण शेवटी माणसाच्या नशीबात व्हायचे असते ते होतेच. मघाशी घाबरलेल्या त्या मुलाच्या नजरेला आमच्यातला एक जण पडलाच. अश्यावेळी काय करायचे ते आमच्यातल्या कुणालाच सांगायची गरज नाही. जे करायला हवे ते तुमच्या भाषेत सांगायचे तर ‘पापणी लवण्याच्या आत’ केल्या गेले. कुणालाच काही संशय येण्याची शक्यता नव्हतीच.

आजचा शोध संपल्यात जमा होता सगळे अकराच्या अकराजण बाहेर जायला निघाले. ठिकठिकाणचे फ़ोटो घेतल्या गेले होते, जमेल त्यांनी व्हीडियोही शुट केले होते. आता ते निघणार इतक्यात मघाशी घाबरलेल्या त्या मुलाने एक नविनच कल्पना मांडली.
" मित्रांनो आपण काय घ्यायचा तो शोध आत्ता घेतलाच आहे पण मला आणखी काही करावे असे वाटतेय"
" म्हणजे? तुला नक्की काय म्हणायचेय?"
" म्हणजे एखादी रात्र जर आपण घालवली तर?"
" हां यार ! बरोबर बोलतोय हा, त्यामुळे लोकांच्या मनातली अंधश्रध्दा दुर व्हायला आणखी मदत होईल"
" मला पण पटतेय ही कल्पना"
" मग कधी येउया इथे वस्तीला?"
" माझ्यामते पुढच्या आठवड्यात बरे पडेल"
" पुढच्या आठवड्यात मला नाही जमणार लग्नाला जायचय एका दहा एक दिवस तरी नाही मी इथे"
" आणि मी पण नाहीये"
" मला सुध्दा जमणार नाही"
" मी नक्की काय ते आत्ताच सांगु शकत नाही"
" अरे इतके जण नाही म्हणतायत? मग कॅन्सल करायचे का?"
" अरे! कॅन्सल कशाला करताय, आगदी आम्ही चौघेही नाही आलो तरी तुम्ही सातजण तरी आहात ना!"
" बरोबर आहे तुम्ही येउन जा की, मग आम्ही आलो की पुन्हा एकदा येउ इकडे"
" बघा हं ! सध्या मिडीयाचे ल़क्ष आपल्यावर आहे. आम्ही इथे रात्र घालवुन गेल्यावर जर काही प्रसिध्दी मिळाली तर नंतर च्याव च्याव कराल! "
" नाही रे बाबा ! नाही बोंबलणार"
" आणि झालेच तसे, तर पुन्हा एकदा अमावस्येच्या रात्रीची शोधमोहीम काढू की झाले"
" हं हे बेस्ट आहे"
" मग ठरलं तर पुढच्या आठवड्यात आम्ही येतो इथे रात्री"
" ओके... डन!"

त्यांची पांगापाग झाल्यावरच आम्ही पुन्हा एकत्र आलो. आता या सगळ्यांची नावे माहीत नसल्याने आणि आवाजातले फ़रक आम्हाला जाणवत नसल्याने त्यातले कोण नक्की काय बोलले हे आम्हाला कळणे शक्य नव्हते. पण त्यातला एक आवाज मात्र आम्ही ओळखु शकत होतोच. आता पुढच्या आठवड्यात काय घडायचे कुणास ठाउक.

काळ ही बाबच आमच्यासाठी जाणिवेपलिकडची आहे त्यामुळे जेंव्हा ते सात जण पुन्हा या आमच्या वसाहतीकडे संध्याकाळचे येताना दिसले त्यावरुन आठवडा झाला असावा असा अंदाज आम्ही काढला.
पुन्हा मागच्याप्रमाणेच आम्ही आपापल्या जागा घेतल्या. कुणालाही आपले अस्तित्व जाणवु नये याचा कसोशीने प्रयत्न तरी करायलाच हवा होता.

एकंदरीतच त्या सातही जणांची तयारी चांगलीच होती. झोपण्यासाठी सतरंजी, मेणबत्त्या, टॉर्च, खाण्याचे साहीत्य आणि हो पत्ते सुध्दा. अर्थात या सार्‍या भौतीक प्रसंगासाठी कामात येणार्‍या वस्तु आहेत. पण यामधे त्यांचा विचार मात्र स्पष्ट होत होता. त्यांचे येणे योग्य जागा पाहून आपली बैठक मांडणे वगैरे सोपस्कार पार पडल्यावर त्यांच्या नेहमी प्रमाणेच गप्पा चालु झाल्या. न आलेल्या चौघांबद्दल,
" काय रे ? ते चौघे का आले नसतील?"
" त्यांनी सांगीतले ना ! कामं आहेत रे त्यांना."
" मला नाही वाटत हेच कारण असेल"
" मग दुसरे काय असणार?"
" आयला, टरकले असतील रे इथे रात्र घालवायच्या कल्पनेने"
" शक्य नाही रे ! तसे असते तर आधीच आले नसते ते आपल्या बरोबर"
" ते ही खरेच म्हणा! "
" आणि पुढच्यावेळी येणार आहेतच ना !"
" नाही रे! मला आपले वाटले"
" अरे घाबरण्या सारखे आहेच काय इथे?"
" अरे उगीच बाउ करतात रे लोक इथला"
" जाउ दे पत्ते काढ जरा टाईमपास करु"
सातही जण पत्ते खेळण्यात मग्न झाले, असा किती काळ गेला कुणास ठाउक. एकजण जरा अस्वस्थ झालेला दिसला. काहीकाळ वाटले की आमच्या वावराची त्याला जाणिव झाली की काय? पण त्याच्या पुढच्या वाक्याने तो समज दुर झाला.
" च्यायला रे ! जाम जोरात नंबर वन लागलीये रे."
" मग जा की कुठेतरी कोपर्‍यात"
" नको रे ! इथे नको बाजुला जायला पाहीजे"
" मग जा की ! विचारतोयस काय?"
" कुणी येतोय का बरोबर?"
" का रे ? घाबरलास की काय?"
" घाबरलोय खरा पण तुम्ही समजताय त्या कारणाने नाही"
" मग?"
" अरे माणसांचा वावर नसलेली जागा कुठे कानाकोपर्‍यात एखादे जनावर असले तर?"
" हां यार ! हे पण बरोबर आहे, चल मी येतो "
दोघेही आतल्या बाजुला आले. आम्ही शक्य तितके शांत राहून त्यांच्या जाण्याची वाट पहात राहीलो. पण त्यातल्या एकाने आमच्यातल्या एकाला पाहीलेच. बरं नुसतेच पाहीले नाही तर जोडीदाराचे ल़क्षही तिकडे वेधले. आता पुन्हा आमचा नाईलाज झाला. पुन्हा मागचाच प्रयोग करावा लागला.

दोघे परत आल्यावर पुन्हा पत्त्यांचा खेळ रंगात आला. पण लवकरच सगळे कंटाळले. डाव मोडून झोपण्याच्या तयारीला लागले.

सतरंज्या पसरल्या गेल्या. सॅक उशाला घेतल्या गेल्या आणि एक एक जण झोपेच्या आधीन होत राहीला. हळू हळू सगळेच झोपी गेले. आणि आम्ही हलचाली करायला मोकळे झालो. पण इथेही थोडे चुकलेच त्यातल्या एकाला जाग आली आणि त्याने आम्हाला पाहीलेच पुन्हा एकदा पुर्वीचेच सोपस्कार करुन आम्ही मोकळे झालो. एव्हाना आम्हालाही या गोष्टीत मजा यायला लागली होती. मग एकेकाला कुठल्या ना कुठल्या पध्दतीने जागे करुन आम्ही हळू हळू सगळ्यांवर आमचे जाळे पसरवले.

त्या सात जणांच्या आमच्या वसाहतीत वास्तव्य करण्याच्या बातमीने त्यांना प्रसिध्दी मिळवुन दिली. आता मात्र ते सातही जण छाती ठोकपणे सांगत होते की या ठिकाणी कसलाच धोका नाही.

त्यांच्या प्रसिध्दीचा परीणाम म्हणुन असेल किंवा आधी केलेल्या वायद्यामुळे असेल बाकी चौघेही आमच्या वसाहतीत एक रात्र काढून गेले आणि आमच्या जाळ्यात आले आता ते ही आता या ठिकाणच्या निर्धोकपणाबद्दल खात्री देत आहेत. त्यांना ज्या संस्थेने प्रेरणा दिली होती ती संस्था आता जोरदार जाहीरात करत आहे. त्यांना सल्ला देणारे ते तथाकथीत विद्वान लोक आता आपल्या आधी दिलेल्या मता बद्दल जास्त उत्साहाने बोलत आहेत.

एकुणच मिडीया हे तुमचे साधन आता आमच्या वसाहतीच्या निर्धोकपणाबद्दल लोकांची खात्री पटवण्यात यश मिळवत आहेत. आता आमची खात्री आहे की इथे लोक रहायला येणार. आगदी नक्की येणार. तुमच्या मिडीयावर लोकांचा विश्वास चटकन बसतो ना !

इथे लोक रहायला येण्याची आम्हीही वाट पहात आहोत. जेणेकरुन आम्हाला हे निद्रव्य रुप टाकुन इथे रहाणार्‍या लोकांच्या भौतीक शरीरात प्रवेश करता येईल, आणि मग त्यातली तुमची ती जिवनशक्ती....? ती आम्ही सहज तुमच्या शरीरातुन बाहेर काढू शकतो. आणि इथे रहाणा-या माणसांनी आमच्या अस्तित्वा बद्दल कुणाशी चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही.
या आधीही आम्ही ताबा घेतलेल्या माणसांनी आमचे अस्तित्व नाकारले आहेच तशीच नव्याने इथे रहायला येणारी माणसे आमचे अस्तित्व नाकारतील हे नक्की. कारण.............................

आमच्यातलेच सभासद आमच्या बद्दल बाहेर चर्चा करु शकतील का..... !

गुलमोहर: 

पुन्हा एकदा चाफ्या Happy

आपली तर तयारी आहे बाबा, आता पर्यंत फक्त आईला आणि बायकोला माहित होतं, आता सगळ्यांना कळेल, हरकत नाही.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

आयला चाफ्या...
तु भुत या विषयावर पी.एच्.डी. केली का?
केली असेल तर तुझा गाईड कोणी खविस किंवा आग्या वेताळ होता कारे बाबा?
... जरा जपुन, आमचे नरेंद्र दाभोळकरांनी हे वाचले तर?