माझीच एक जुनी कथा परत इथे टाकतेय.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
खरंतर ती एक खूप सुंदर सकाळ होती. थंडीचा कडाका पडायच्या आधीची मोहक थंडी आणि कोवळ्या उन्हाचे मऊसूत कवडसे. तिच्या घरासमोरून जाणारी वाटही सुंदर सकाळीएवढीच सुंदर होती. या सगळ्या सौंदर्याच्या कल्लोळावर ओरखडा असवा तशी ती तिच्या घराच्या गॅलरीत उभी होती. परत एकदा मिनिटामिनिटाला आत आत उतरत जाणारं नैराश्य अनुभवत. इतक्या सुंदर सकाळी ती निराश का होत होती हे मात्र कोणालाच उमजण्यासारखं नव्हतं.
तसं तिच्याभोवती नैराश्याचे ढग जमणं तिला नवीन उरलं नव्हतं. कधी बरं.. हा! रमाकांत.. तिचा नवरा.. तो गेल्यापासून हे असं काहिसं जाणवायला लागलं होतं. म्हणजे तिचं तिच्या नवर्यावर खूप प्रेम होतं आणि ती एकटी पडली होती असे काही नाही खरंतर.
रमाकांत जाणारच होता. त्याला ते माहित होतं. ती अशीच कधीमधी काहीबाही विकायला संध्याकाळची यायची. तिच्या चेहर्याकडे बघून रमाकांत गरज नसली तरी विकत घ्यायचा. तेव्हा ती होती 20 - 22 वर्षांची मुलगी. अधू आईचा संसार सांभाळणारी. एकट्या आईशिवाय तिला नातेवाईक माहित नव्हते.
तर अशी ती काहितरी विकायला एक दिवस आली आणि रमाकांत नेमकं नको असं म्हणाला. ती उदास होऊन गेली आणि चार दिवसांनी सकाळीच उगवली. डोळे सुजलेले, मनातून घाबरलेली. ‘‘आई गेली पर्वा! दवाखान्यात नेलं असतं पण तुम्ही काहीच विकत नाही घेतलंत. पैसे नव्हते. रहायची खोली रिकामी करावी लागली.’’
रमाकांत मुळातून हादरला. बिचारा साधा माणूस. वयाने पन्नाशीला आलेला. अमाप पैसा आणि मागे पुढे कोणी नाही. एवढ्या मोठ्या सुंदर बंगल्यात एकटा रहायचा भुतासारखा. बंगला मात्र तो सुंदर ठेवायचा. ती त्याची गरज होती.
तर रमाकांतला अचानक तिच्या आईच्या मृत्यूला आपण जबाबदार असल्यासारखे वाटायला लागले आणि त्याने तुला तू इथेच रहा म्हणून सांगितले. उपकार म्हणून नाही तर बंगल्याची देखरेख करायला म्हणून. बंगल्यामधे काही असुंदर असता कामा नये अशी त्याची अट होती. तर अशी ती रमाकांतच्या घरात दाखल झाली. टापटिपीचे वळण होते पण ते गरिबीतले. एवढ्या मोठ्या बंगल्याची व्यवस्था राखताना तिच्या नाकी नऊ यायचे. ‘आधीची हाऊसकीपर कसे काम करायची हे सगळे!’ असा तिला प्रश्न पडायचा. ती सोडून गेली तेव्हाच नेमक्या आपण आलो हा योगायोग म्हणजे आपले भाग्य की दुर्भाग्य असाही प्रश्न तिला पडायचा. एवढ्या सगळ्या व्यवस्थेखाली तिचा जीव गुदमरून गेला नसता तरच नवल. चांगलंचुंगलं खायला मिळत असूनही ती ओढलेली दिसायला लागली
‘‘घरात कुणी आलंगेलं तर तू अशी समोर येत जाऊ नकोस. माझ्या सुंदर घरातली देखरेख करणारी बाईही सुंदरच हवी. इथे काय कमी आहे तुला? पाहिजे ते आहे. पैसाही कमी वाटत असेल तर सांग. मागशील तेवढा पगार देईन पण हे घर आणि घरातली प्रत्येक गोष्ट सुंदरच दिसली पाहिजे. सगळं कसं आनंदी दिसलं पाहिजे.’’
रमाकांतचे हे शब्द ऐकून तिला भिती वाटायची आणि मग ती घाबरून आनंदी रहायचा प्रयत्न करायची. हळूहळू तिला हे हुकमी आनंदी रहाणं जमायला लागलं. मग रमाकांतच्या सुंदर बंगल्यासारखी, बागेसारखी ती ही हसरी दिसायला लागली. ती पूर्वी रहायची त्याठिकाणी तिची काही जणांशी ओळख होती ते बंध तिने अजून पूर्णपणे तोडले नव्हते. अधूनमधून एका काकूंकडे जाऊन यायची ती. असेच एक दिवस बोलता बोलता तिच्या तोंडून ती कुठे रहाते आणि काय काम करते हे त्यांना कळले. आवडले नाही फारसे त्यांना, पण ‘इथेच रहा! ’ म्हणणं त्यांना परवडण्यासारखं नव्हतं म्हणून गप्प बसल्या. अर्थातच बातमी पसरली. तिने वस्ती सोडल्यापासून नाक्यावरच्या झुरणार्या मुलांना आयतं कोलितच मिळालं. आपल्याला कधी घासही न घालणारी मुलगी केवळ पैसा आहे म्हणून एका म्हातार्याबरोबर नुसती रहाते म्हणजे काय.. अचानक सगळ्यांच्या अंगात संस्कृती संवर्धन संचारलं.
झालं! ती मुलं टोळक्यानी रमाकांतच्या बंगल्यावर आली. मुलं कसली माकडंच ती. त्यांना माहित असलेल्या फक्त एकाच पद्धतीने त्यांनी आपला निषेध नोंदवायला सुरूवात केली. रमाकांत आणि तिच्यामधे होऊ शकतील अश्या सर्व मानवी व्यवहारांची यथेच्छ उजळणी करून ‘तिला कैदेतून सोडून दे नाहीतर...!’ अशी धमकी देऊन ती मुलं निघून गेली.
बाहेरचं दार, बागेतली झाडं, लॉन, बंगल्याच्या भिंती यांच्या झालेल्या दुर्दशेनी आधी चकीत आणि मग दुःखी झालेल्या रमाकांतला हे का? नि कशासाठी? हे कळायला बराच वेळ लागला. तोवर घरात ती घाबरलेली आणि रडवेली झालेली होती. स्वतः दुःखी होऊन घरात येणार्या रमाकांतला गोंधळलेली, घाबरलेली ती दिसली. त्याला पहाताच तिला रडू फुटले अपराधी भावनेचे आणि आपण रडतोय याचेही. ‘‘का रडतेस? काळजी करू नकोस मी तुला जायला सांगणार नाहीये यामुळे. अर्थात तुला ही कैद वाटत असेल तर तू जाऊ शकतेस. विचार कर. जाणारच असशील तर मात्र जाण्यापूर्वी हे सगळं होतं तसं करून घे आणि मग जा. चल रडत वेळ घालवू नकोस.’’ वरकरणी कठोर वाटले तरी ह्या शब्दांनी तिला ताळ्यावर आणले आणि ती कामाला लागली.
पण तिचे काम पूर्ण व्हायच्या आधीच परत एकदा सगळी टोळी येऊन गेली आणि बागेची नासधूस करून गेली. यावेळेला त्यांना तोंड द्यायला तीच होती. ‘‘अजिबात घाबरू नकोस. वस्तीत परत ये रहायला. तुला काऽऽही त्रास होणार नाही.’’ एक जण तिला आंगोपांगी निरखत म्हणाला. ती शहारली आणि सुन्न मनानी कामाला लागली.
लवकरच सगळा बंगला पूर्ववत झाला आणि तिने ठरवले आज रमाकांतशी बोलायचेच. ‘‘हे माझ्याच्यानं होणार नाही. जोवर मी इथे रहातेय तोवर ती मुलं अशी उतमात करत रहाणार. कितीवेळा निस्तरायचं हे सगळं. त्यापेक्षा मी इथून गेलेलं बरं. मला दुसरी नोकरी मिळवून द्यायला तुम्ही मदत करा.’’
‘‘लग्न करशील माझ्याशी?’’
‘‘काय?’’
म्हणजे रमाकांतला पण हेच साध्य करायचं होतं? ती मनात कळवळली.. ‘‘तू घर छान ठेवतेस. मला सवय झालीये तुझी. जायचंय तर जा तू पण आधी विचार कर. बदल काहीही होणार नाही परिस्थितीत लग्न केल्याने. फक्त गळ्यात घालशील ते मंगळसूत्र या पोरासोरांना अडवेल. तेवढ्याचसाठी. नवरेपणाचा अधिकार गाजवायची माझी इच्छा केव्हाच संपलीये.’’
‘पण मग माझं काय? माझ्या इच्छा?’
तिच्या डोळ्यात प्रश्न उतरलाच. ‘‘ज्या क्षणी तो जो कोण सापडेल त्या क्षणी हे नातं संपेल. कदाचित त्याआधी मीच संपेन. पण तोवर.. इथलं सगळं सुंदरच राह्यलं पाहिजे. तुझ्या चेहर्यापासून बागेपर्यंत सगळं. तेवढं वचन हवं मला.’’
एक दिवस ते जाऊन सह्या करून आले. रमाकांतने आपलं वचन पाळलं. तिला रमाकांत आवडूही लागला. सुंदर आणि हसरं दिसण्याचं त्याचं दडपण ही आवडून घेतलं तिने. तशी तशी ती अजून सुंदर दिसू लागली. मग रमाकांत अजून खुश राहू लागला. असेच आवडण्याच्या पर्वात एकदा नवराबायको असण्याचे सोपस्कार पार पडले.
हा वेग सहन न होऊन म्हणा किंवा वेळ झाली होती म्हणा. रमाकांतच्या शेवटाची सुरूवात झाली. रमाकांतने तिचं सौंदर्य डोळ्यात टिपून घेतलं आणि शेवटाकडे हसून पाहू लागला. ते पाहून मात्र तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी पहिला खराखुरा अश्रू आला. शेवटच्या श्वासाला रमाकांतला आसवाचंही सुंदर असणं उमगलं. पण तरी ‘सुंदर हसत रहा’ असं सांगून रमाकांतने निरोप घेतला.
तिला रडायचं होतं. ती दडपणाने हसतच रहात होती. सुंदर रहायचं, हसत रहायचं याची इतकी सक्ती आणि मग सवय लागली होती तिला की पेलेचना.. तिचा संताप संताप होऊ लागला.. पण तरी ती हसत रहात होती. त्या बंगल्याने पहिल्यांदाच इतकं भेसूर हसू पाह्यलं असावं.
सगळ्या गोष्टी पार पडल्यावर एवढ्या मोठ्या घरात ती एकटीच उरली आणि अचानक तिला मोकळं मोकळं वाटलं. ती मनापासून रडू लागली. आनंदाने की दुःखाने तिलाही सांगता येणार नाही पण आतून आतून दाटत येणार्या आसवांच्या तळ्याला ती जुन्या जिवलगाला भेटावं तसं भेटली. आणि मग आता ती त्या सगळ्या सौंदर्याच्या कल्लोळावर ओरखाडा असावा तशी निराश राहू लागली.
- नी
नी कथा आवडली. मस्त.
नी कथा आवडली. मस्त.
विजया वाड यांचं मी काही
विजया वाड यांचं मी काही वाचलेलं नाहीये. एखादं पुस्तक सजेस्ट कराल का?
वाचु नका हेच सजेस्ट करीन
वाचु नका हेच सजेस्ट करीन
असा एक चित्रपट होता, अगदी
असा एक चित्रपट होता, अगदी सेम, पल्लवी जोशी (?) आणि ओम पुरी. शेवटि असं दाखवलय कि ओम पुरी मरतो आणि ती टवाळ मुलं परत येतात.
आवङली
आवङली
कथा आवडली. वर
कथा आवडली. वर प्रतिक्रियांमध्ये आलयं तसं, उदासीची छटा पूर्ण कथेत जाणवते.
छान आहे, पण नीरजाची कथा नाही
छान आहे, पण नीरजाची कथा नाही वाटली. तू म्हणतेस तशी ४-५ वर्षापुर्वीची असल्याने असेल कदाचित. पण नीरजा म्हणल्यावर जे वाचायची सवय झालीय त्या ग्रेडची नाही वाटली. अर्थात शेवट मात्र मला प्रचंड आवडला. दॅट्स युवर स्पेशॅलिटी
विशालला प्रचंड अनुमोदन, बात
विशालला प्रचंड अनुमोदन, बात कुछ जमी नही, पण तरीही शेवट आवडला.
नी, तुम्ही नविन गोष्ट भाग १ व
नी,
तुम्ही नविन गोष्ट भाग १ व २ लिहिला होता (८ जून २०१०) नलू, ताई, सुचरिता अशी काहीतरी characters होती. ती गोष्ट अर्धवट का सोडली? सुरवात छान झाली होती त्याची. तुमच्या घराचे shifting असल्याने तुम्ही लेखन पुर्ण करू शकला नाहीत बहुधा.
विशालला अनुमोदन , नेहमीचा
विशालला अनुमोदन , नेहमीचा 'नी' टच नाही जाणवत.
पण तरीही एक वेगळ्या बाजाची, धाटणीची म्हणून आवडली.
जास्त डिटेलिंग न देता केलेली रेखाटने आवडली
सोहा, तुमच्या एवढं लक्षात
सोहा, तुमच्या एवढं लक्षात आहे? थँक्स!
घरांच्या गोंधळात ते राहून गेलं आणि आता बर्याचदा प्रयत्न करूनही मनासारखं जमत नाहीये पुढचं प्रकरण. आळशीपणा नाही खरंच प्रयत्न चालू आहेत. किमान ३-४ वेळा टायपलंय आणि उडवलंय.
प्राची ४-५ वर्षांपूर्वीची गं... अगदी सुरूवात होती माझी कथालेखनाची. अजूनही आहेच पण ही अगदी सुरूवातीच्या सुरूवातीची.
ही इथे परत टाकण्याचे प्रयोजन हे की बर्याच वर्षांनी मी जेव्हा वाचली ही कथा तेव्हा मलातरी काहीतरी कमी आहे हे जाणवलं पण काय ते कळलं नाही. म्हणून म्हणलं टाकून बघूया तेवढीच प्रतिक्रियांच्यातून झाली तर मदत.
म्हणजे याच कथेवर संस्करण करण्यासाठी नव्हे तर एकुणात लिखाणासाठीही. तसंही अर्धवट राह्यलेली कथा अडलीच आहे अजून...
नीधप खुप छान लीहिली आहेस,
नीधप खुप छान लीहिली आहेस, शेवट्चा para खुप काही बोलुन जातो
Pages