२० मार्च २००८ ला मी लिहिलेल्या गाण्यांचा अल्बम "सारे तुझ्यात आहे" हा प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की ह्यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशित झाला. ह्याचे संगीतकार आहेत आभिजीत राणे आणि गायक आहेत सुप्रसिद्ध देवकी पंडित, वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोडकर.
माझ्या या स्वप्नवत वाटणा-या प्रवासात मला माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींची प्रचंड मदत झाली. त्यांच्याच आग्रहास्तव माझा हा प्रवास मी पुन्हा एकदा जगणार आहे…. तुमच्यासोबत !
अभिजीत राणे कडे माझी कवितांची फ़ाईल अगदी सहज घेऊन गेले. राजेश (माझ्या बहिणीचा नवरा) होता सोबत. माझ्या मीटरमधे लिहिलेल्या कविता त्याच्या आईकडे दिल्यात. अभिजीतशी तर भेट सुद्धा झाली नाही. दुपारी साधारण ४ वाजले असतील आणि मग त्याबद्दल विसरुन मी भारत भेटीत जे सगळ्यात महत्वाचं कार्य असतं…….शॉपिंगचं त्यात बुडून गेले. दुस-या दिवशी काकू म्हणजे अभिजीतच्या आईचा फ़ोन आला…….तेव्हाही मी साड्यांच्या दुकानातच होते. काकू म्हणाल्या……
"अगं, तू आज जाते आहेस ना नागपूरला….. जायच्या आधी येऊन जाशील का थोडा वेळ? अभिजीतने चाली दिल्या आहेत तुझ्या चार कवितांना…… " आई गं……..मी तर चाटच पडले. फ़क्त चोवीस तासात या अभिजीतनं चक्क माझ्या चार कवितांचं गाण्यात रुपांतर केलं होतं. मी तर हरखलेच. लग्गेच राजेश ला फोन केला आणि त्याच्याकडे जायची वेळ ठरवली.
मनातलं कुतूहल आतच ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत होते. शेवटी अभिजीतकडे पोचलो. उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती. अभिजीतने त्याच्या गोड आवाजात एका पाठोपाठ एक अशी गाणी म्हणून दाखवलीत. ह्यावेळी राजेशने त्याची गाणी रेकॉर्ड केली होती. प्रत्येक गाण्यानंतर त्याला काय प्रतिक्रिया द्यावी कळेचना. इतक्या सुरेख चाली होत्या…..!! आता हे सगळं ऐकायला माझे पती अविनाश नव्हते त्यामुळे पुढे काय हे पण काही ठरवता येत नव्हतं. शिवाय अदितीच्या ऍडमिशनची पण धावपळ होती. अभिजीतला शेवटी सांगितलं…… की आपण काहीतरी नक्की करुयात पण काय आणि केव्हा हे मात्र ठरवायला तू आम्हाला वेळ दे. त्यालाही काहीच घाई नव्हती. रात्रीच्याच विमानाने नागपूरला जायचं होतं. मनात एक गोड हुरहुर सुरु झाली होती.
नागपूरला पोचल्यावर मात्र आम्हाला दुसरा काही विचार करायला वेळच नव्हता. ऍडमिशन चं महत्वाचं मिशन डोळ्यापुढे होतं. असाच एक आठवडा गेला. पुन्हा एकदा फ़ोन वाजला……….. अभिजीतचा काहीशा कुतूहलानेच उचलला. "जयश्री….. अगं, अजून ४ गाणी झालीयेत" मी तर वेडीच व्हायची बाकी होते. त्याने फ़ोनवरच चाली ऐकवल्या. अगदी मनापासून आवडल्या होत्या. पुन्हा मुंबईत येईन तेव्हा तुला भेटते असं बोलून फ़ोन ठेवला. कशीबशी दाबून ठेवलेली हुरहुर पुन्हा जागी झाली. अवी सोबत नसल्यामुळे काहीच ठरवता येत नव्हतं. तगमग सुरु होती नुसती.
आम्ही एका आठवड्यासाठी पुन्हा एकदा कुवेतला जाणार होतो आणि परत येताना अवी सोबत असणार होते. जायच्या आधी आभिजीतला भेटायला गेले तर त्याची अजून ४ गाणी तयार होती. स्वारी एकदम फ़ार्मात होती त्याला अक्षरश: साष्टांग दंडवत घालावासा वाटला. कुवेतला गेल्यावर ह्यांच्याकडे विषय काढला. सध्या अदितीची धावपळ असल्याने हे बघूया असं बोललेत. मुंबईत गेल्यावर नागपूरला जायच्या आधी पुन्हा एकदा अभिजीतच्या घरी ह्यांना घेऊन गेले. आता सगळी मिळून चक्क १४ गाणी झाली होती. आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो होतो. नागपूरचं काम आटोपून मग काय ते ठरवू असं बोलून आम्ही नागपूरला गेलो. अदितीची मनासारखी व्यवस्था करुन पुन्हा मुंबईत आलो.
आता निवांतपणा होता. शेवटी अल्बम काढूयात असं ठरलं. पण केव्हा……. हा एक मोठा प्रश्न होता. त्याला म्हटलं साधारण दिवाळी नाहीतर डिसेंबरमधे मी येण्याचा प्रयत्न करते. प्रशांत लळीत हा आभिजीतचा नेहेमीचा संगीत संयोजक. त्याला फ़ोन करुन विचारलं की तुला चाली करायला किती वेळ लागेल…. तो बोलला साधारण एका महिन्यात सगळं तयार होईल.
आता एक दिशा मिळाली होती एका मोठ्या प्रोजेक्टला आणि माझ्या स्वप्नाळू मनाला
.....१० प्रका
.....१०
प्रकाश आणि अर्चना आले होते विमानतळावर घ्यायला. ह्या दोघांमुळेच मी इतका मोठा उपद्व्याप करु शकले. त्यांच्या मदतीबद्दल जितकं लिहावं तितकं कमी आहे. पोचल्यावर थोडा आराम झाल्यावर डोळ्यासमोर सगळी कामं दिसायला लागलीत. अभिजीत शी बोलून कशी सुरवात करायची ते ठरवलं. देवकी ताई, स्वप्निल आणि अशोक पत्कींना घरी जाऊन आमंत्रण द्यायचं होतं. २-३ दिवसात कांतिभाई त्यांच्या मुंबईच्या ऑफ़िसमधे सीडीज, पोस्टर्स आणि आमंत्रण पत्रिका पाठवणार होते. त्या मिळाल्याशिवाय गायक मंडळींकडे जाता येणार नव्हते. तोपर्यंत बाकीची तयारी सुरु होती. सगळ्या गायक, तंत्रज्ञ आणि मदतनीसांचा सत्कार करणार होतो त्यामुळे त्याची तयारी. भरपूर याद्या तयार होत होत्या ....सामान आणलं जात होतं. पिशव्यांवर नावं घालून तयार पिशव्या घरात एका कोप-यात साठत होत्या.
कांतिभाईंनी कबूल केल्याप्रमाणे सगळं सामान पाठवलं. मी आणि अभिजीत सगळं सामान तिकडे जाऊन घेऊन आलो. आमच्या इतक्या दिवसांच्या धावपळीचं सार्थक झालं होतं. अतिशय सुरेख पॅकिंग मधे आमचं स्वप्नं समोर दिसत होतं. आम्ही दोघांनीही देवाचे आभार मानले. ज्यांची ज्यांची मदत झाली त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद दिले मनात. ते गोड ओझं घरी घेऊन आलो. आज खूप थकलो होतो तरी थकवा अजिबात जाणवत नव्हता.
दुस-या दिवशी सकाळीच आम्ही निघालो. सगळ्यात पहिले स्वप्निल बांदोडकरांकडे. त्यांना आमंत्रण पत्रिका आणि ट्रॅक्स असलेली त्यांची गाणी त्यांना देऊन मग आलो अशोक पत्कींकडे. अशोकजींनी फ़ारच छान केलं स्वागत. आम्ही त्यांनाही आमंत्रण पत्रिका आणि सीडी देऊन आलो देवकी ताईंकडे. आतापर्यंत आम्ही खूप मोकळे झालो होतो त्यांच्याशी. दोनदा घरीही जाऊन आलो होतो. खूपच छान बोलतात त्या. त्यांचं बोलणं अगदी ऐकत रहावसं वाटतं. प्रत्येक वेळी त्यांना भेटून काहीतरी अजून करायला हवं अशी भावना तीव्रतेने जाणवली. खूप कळकळीने बोलतात त्या संगीताविषयी. त्यांच्याकडून आम्हाला खूपच उत्तेजन मिळालं.
वैशाली मात्र मुंबईत नव्हती. तिची भेट थेट १७ लाच होणार होती. आमची बाकीची तयारी सुरुच होती. आमचं बॅनर बनवलं अभिजीतच्याच अजून एका टॅलेन्टेड मित्रानं. प्रणव धारगळकर नं. आतापर्यंत अभिजीतने ज्या ज्या कुणाला मला भेटवलं तो तो प्रत्येक मित्र जबरदस्त कलाकार होता आणि तरीही अतिशय साधा. काय लाघवी गोतावळा होता अभिजीतचा. मला पण त्यांनी त्यांच्यात लगेच सामावून घेतलं. तर हा प्रणव सुद्धा एक उच्च कलाकार. त्यानेसुद्धा अगदी धडपड करुन आम्हाला सुरेख, स्टेजला भारदस्तपणा आणणारं, अगदी आमच्या मनासारखं बॅनर बनवून दिलं. ऑफ़िसमधून आल्या आल्या चक्क रात्री साडे-नऊ पर्यंत तो आमचं काम करत होता.
जीवाला जीव देणारी माणसं जोडली आहेत ह्या अभिजीतनं. ह्याला कारण त्याचे संस्कार. त्याचे आई-बाबा सुद्धा इतके प्रेमळ आहेत ना.... मला तर त्यांनी अगदी स्वत:च्या मुलीसारखं प्रेम दिलं आणि मी ही मस्तपैकी हक्काने सगळे लाड करवून घेतले. चिकन काय, फ़िश फ़्राय काय..... काकूंनी अतिशय प्रेमाने खाऊ घातलं. काकांबद्दल काय बोलावं. प्रचंड वाचन आहे त्यांचं. शब्दप्रभू आहेत ते. कायम त्यांचं काहीतरी लिखाण सुरु असतं. अगदी मनापासून कौतुक करणारे, खूप खूप हळवे. प्रत्येक आनंदाच्या क्षणी, टेन्शन्च्या वेळी काकू-काकूंचा आम्हाला खूपच आधार होता. मी, अभिजीत, प्रकाश अर्चना, काका, काकू...... आम्ही सगळेच ह्या प्रोजेक्ट मधे आकंठ बुडालो होतो.
किशोर
किशोर
लालू अगं सोनाली जोशी शी बोलणं सुरु आहे त्याबद्दल. होईल काही दिवसात ते ही
धन्स गं....!!
.....११ रोजचा
.....११
रोजचा दिवस काहीतरी नवीन काम घेऊन उजाडत होता. आता पुन्हा एकदा हॉलची चक्कर करायची होती. काय काय कुठे कुठे आहे........कुठे कुठे ठेवायचं....काय काय सोयी आहेत....काय करवून घ्याव्या लागणार आहेत हे सगळं ठरवायचं होतं. तिथल्या डेकोरेटरशी बोलून सगळं फ़ायनल करायचं होतं. मी आणि अभिजीत दुपारी पोचलो. सगळं नीट बघून पक्कं केलं. तिथल्या लोकांनी सुद्धा फ़ारच उपयुक्त सल्ले दिले. तिकडून आम्ही फुलमंडईत गेलो. मनासारखं ते ही काम झालं. तो हॉलवरच गुच्छ पोचवणार होता.
बाकी बरीचशी बारीक सारीक खरेदी करुन आम्ही हेमंत बर्वेला भेटायल गेलो. कार्यक्रमाबद्दल त्याच्याशी सविस्तर चर्चा केली. कार्यक्रमाचं स्वरुप काय असावं...... कसं असावं.....त्याला त्यासाठी जी काय माहिती हवी होती ती पुरवली. आता मन थोडं शांत झालं होतं. बरीचशी कामं आटोपली होती. शिवाजी पार्कच्या उद्यान गणेशाचं दर्शन घेतलं.... तिथे आमचं मोठं पोस्टर आणि आमंत्रण पत्रिका लावली नंतर आमच्या टिव्ही वाल्या दोस्तांची भेट झाली. ह्यात प्रणेश जाधव होता. ही मुलं शिकता शिकता बरंच काही करतात. त्यांनीच ईटिव्ही वाल्यांशी बोलून आमचं आमंत्रण त्यांच्यापर्यंत पोचवलं. कितीतरी लोकांची आम्हाला मदत झाली. सहारा चॅनेल साठी प्रकाशचा मित्र पांडा आणि त्याची बायको मदतीला आले. झी २४ तास चं काम तुषार शेटे ने केलं. वर्तमान पत्राचं काम श्रीकांतजी आंब्रेंनी अतिशय आपलेपणाने केलं. त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन पण केलं. सगळ्यांचाच आपलेपणाचा, मोलाचा आणि प्रेमाचा वाटा होता आमच्या ह्या पूर्ण संकल्पात.
१७ तारीख उजाडली. मी आणि अभिजीतनं चार्ट पेपर्स वर आमच्या अल्बमचा जिवंत प्रवास रेखाटला. सोबत माझ्या काव्यरचना. सगळं सुबक रचून सजवलं. संपूर्ण दुपार त्यातच गेली. ते सगळे फ़ोटो बघताना आम्ही केलेल्या प्रवासातल्या गमती जमती आठवल्या..... मन पुन्हा एकदा ताजंतवानं झालं. आज आम्हाला अजून एक महत्वाचं काम करायचं होतं. आज वैशाली सामंत भेटणार होत्या. पण त्यांची भेट होऊ शकली नाही. पण त्यांचं आमंत्रण आणि सीडी मात्र आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे बझ-इन मधे पोचवली. तिथे सत्यजीत भेटले. पुन्हा एकदा रेकॉर्डिंगच्या सुखद आठवणींना उजाळा मिळाला. आम्ही खरंच खूप मज्जा केली होती. सत्यजीत आणि सौरभ सुद्धा अगदी मनापासून सगळ्यात सामील होते. त्यांनाही हे काम करण्यात खूप मज्जा आली असं ते बोलले....... खूप छान वाटलं.
तिकडून आम्ही माहिमला गेलो अभिजीत नार्वेकर आणि त्यांच्या पूर्ण गॅंगला आमंत्रण द्यायला. त्यांच्याशी पण घट्ट दोस्ती जमली होती. त्यांच्या नव्या कंपोझिशन्स आणि गप्पा करता करता मस्त वेळ गेला. घड्याळाकडे बघितल्यावर मात्र वेळेची जाणीव झाली.
.....१२ १८
.....१२
१८ तारीख.....अवी आणि अद्वैत सकाळी ४ वाजता मुंबईत पोचले. त्या लोकांना काय काय सांगू आणि काय नको असं झालं होतं. मी आणि अर्चना प्रचंड एक्साईटेड आणि प्रकाश तितकेच शांतपणे सगळे प्लॅन्स समजावून सांगत होते. दुस-या दिवशी सगळी नागपूरची मंडळी पोचणार होती. माझी लेक अदिती, माझ्या दोघी नणंदा, त्यांचे नवरे, मुलं....... २० ला भाऊ आणि वहिनी. अगदी लग्नघर वाटत होतं अर्चना-प्रकाशचं घर. आम्ही बाकीही सगळी व्यवस्था अगदी चोख ठेवली होती. सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत, मधलं खाणं......... सगळं आंग्रे बाईंना करायला सांगितलं होतं. त्यामुळे किचन मधे जायची कुणालाच गरज नव्हती. सगळे मिळून फ़क्त मज्जा करायची होती.
१९ ला सगळी मंडळी पोचली....... हास्यकल्लोळात फ़क्त छप्पर उडायचं राहिलं. जेवणं झाल्यावर आम्ही हॉलवर जायला निघालो.... थोडीशी कामं पण बाकी होती. हॉलच्या तयारीवर शेवटला हात फ़िरवला. आमचं बॅनर अगदी दिमाखात झळकत होतं दादर-माटुंगा कल्चरल सेंटरवर. आता खरंच खूप समाधान वाटत होतं.
घरी आल्यावर पुन्हा एकदा चेक लिस्टवर नजर फ़िरवली. सगळ्यांना कामं वाटून दिली. प्रत्येकाला सगळं सामान दाखवून दिलं. रात्री मात्र अजिबात डोळ्याला डोळा लागला नाही.
२० तारीख. The De Day पटापटा सगळं आटोपलं. नाश्ता, आंघोळी, जेवणं.... दुपारी साडे-तीनला घरातून सगळे निघालो. हॉलवर बरीचशी तयारी झालेली दिसत होती. होता होता स्टेज सजलं. आमचीही सजावट सुरु होती. एकीकडे गणपतीचा फ़ोटो, समई, तेल , वाती, मेणबत्ती........ दुसरीकडे पुष्पगुच्छ, गिफ़्ट्स, ट्रे, पाणी ही तयारी. सभागृहात आमचे फ़ोटो, पोस्टर, सीडी विक्रीचा स्टॉल, चहा, पाणी. मग आमची तयारी.
हळुहळु लोक यायला सुरवात झाली. सगळ्यात पहिले प्रसन्न शेंबेकर येऊन भेटून गेला. नागपूरला जायच्या आधी तो अगदी आवर्जून भेटून गेला. सुरवात तर छान झाली होती. माझा सगळा मित्रपरिवार, अभिजीत, त्याचे आई-बाबा.... सगळ्यांचा उत्साह अगदी ऊतू जात होता. साऊंड वाले, फ़ोटो, व्हिडिओ शूटिंगवाले आपापली जागा घेऊन सज्ज होते. वैशाली सामंत सगळ्यात पहिले आल्या. मग पाठोपाठ देवकी ताई पंडित, अशोक पत्की आणि स्वप्निल बांदोडकर आणि त्यांच्या पत्नी. फ़ाऊंटन म्युझिक कंपनीचे कांतिभाई ओस्वाल अविनाश खर्शीकरांसोबत आले. प्रशांत लळीत आमच्या विनंतीवरुन अशोक पत्कींना आणायला प्रकाश सोबत गेला होता. संदेश, अभिजीत, प्रशांत आपापल्या पत्नीसोबत आले होते. मनिष कुळकर्णी आमच्या अल्बमचा मुख्य वादक, सत्यजीत, सौरभ... ह्यांची उपस्थिती मनाला खूप आनंद देत होती. सगळा गोतावळा बघून अगदी भरुन येत होतं.
हेमंतने सगळ्या उपस्थितांचं स्वागत केलं. अभिजीतने आपल्या गोड आवाजात गणेश वंदना म्हणून कार्यक्रमाला पवित्र सुरवात केली. त्यानंतर कार्यक्रम सुरु झाला. माझ्या एका प्रचंड मोठ्या, महत्वाकांक्षी स्वप्नाचं हे मूर्त स्वरुप होतं. गप्पागोष्टींच्या स्वरुपात कार्यक्रम पुढे सरकत होता. स्वप्निल चं "आभास चांदण्याचा" हे गाणं एक वेगळीच वातावरण निर्मिती करुन गेलं. त्यापाठोपाठ वैशाली सामंत आणि देवकीताईंचे सूरही आपापलं साम्राज्य गाजवून गेलेत. सीडी प्रकाशनाची वेळ झाली. अशोकजींनी आपल्या शुभहस्ते सीडीचं प्रकाशन केलं. त्यावेळी आईची खूप आठवण आली. ती तिच्या तब्येतीमुळे येऊ शकली नव्हती. आज तिला, बाबांना किती आनंद झाला असता....!!
सीडीचं प्रकाशन झाल्यावर सगळ्या वादक, तंत्रज्ञ आणि मदतनीसांचा अशोक पत्कींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अशोकजींनी सीडीबद्दल गौरवोद्गार काढले. माझ्या, अभिजीत च्या कामाची प्रशंसा केली आणि शुभेच्छा दिल्यात. वैशाली, देवकी ताई, स्वप्निल ...सगळ्यांनीच संपूर्णं प्रोजेक्टची तारीफ़ केली..... अगदी धन्य धन्य वाटलं. कांतिभाईंचे विशेष आभार मानण्यात आले. त्यांनीही सगळीच गाणी आवडल्यामुळे ही सीडी आपल्या बॅनरखाली प्रकाशित करायचा विचार केल्याचं सांगितलं.
शेवटी माईक माझ्या हातात आला. आभारप्रदर्शनाचं काम करायला मी उभी राहिले. माईक हातात घेतल्यावर फ़क्त त्या दोन मिनिटात मी सगळा प्रवास मनात पुन्हा एकवार करुन आले. मनात खूप आठवणी दाटल्या होत्या. ह्या प्रकल्पात मला ज्या ज्या लोकांची मदत झाली...... त्या त्या लोकांचे मनापासून आभार मानले आणि कार्यक्रम संपला. एका स्वप्नाच्या परिपूर्णतेपर्यंतच्या प्रवासाची आज सांगता झाली होती.
सगळे लोक भेटायला आले. शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव आम्ही सगळे झेलत होतो......तॄप्त होत होतो. हा प्रवासाचा अंत नक्कीच नव्हता...... आता कुठे प्रवासाला सुरवात झाली होती
जया, फार च
जया, फार च सुरेख! मस्त वाटलं वाचून. तुझे आणि तुझ्या घरच्यांचेही कौतुक करावे तेवढे थोडेच.पुन्हा एकदा अभिनन्दन! आणि ही सिडी अजून ऐकायची संधी मिळली नाहिये तरी पण मायबोली ष्टाईल ने प्रतिसाद देऊन ठेवते " अजून येउ देत"
त्या
त्या कार्यक्रमात वैशाली आणि देवकी जे बोलल्या, तेहि खुप महत्वाचे होते. वैशालीने आपण अर्थपूर्ण गाणी पण तितक्याच समरसतेने गाऊ शकतो, कुठली गाणी लोकप्रिय करायची ते तूम्ही ठरवायचे असे सांगितले तर देवकीने, या गाण्याची एकच ओळ मी दहा मिनिटे गाऊ शकेन असे सांगितले आणि त्याची झलकहि दाखवली. मूळ शब्द आणि सूरच त्या ताकदीचे आहेत, असे त्यानी सांगितले.
जयवी,
जयवी, मस्तच वाटले वाचून. सुरेख होती ही वाटचाल. तुला शुभेच्छा! खूप कौतूक वाटले तुझे. मुद्दाम आवडीने तुला गाणी एकल्यानंतर ही प्रतीक्रिया देतेय.
मी ही गाणी एकली नुकतीच.
ओला वारा मला खूप म्हणजे खूपच आवडले. माझे फेव एकदम झालेय. तेच एकले सारखे सारखे.
सांग ना वेड्या मना हे सुद्धा छान वाटले. अजून बाकीची गाणी नीट ध्यान देवून एकली नाहीयेत. कारण ही दोन गाण्यानी खूप पटकन पकड घेतली मनाची.
(ह्याचा अर्थ बाकीची चांगली नाही असे बिलकूल नाही).
हुंदका साधा तुझा खुपच हळवे आहे.
एकुण सर्व गाणी ही खरोखर एकदम वेगळ्या सुंदर स्वप्नाळू भावविश्वात घेवून जातात्(अतीशय मनाने सांगतेय). डोळे मिटून एकावी अशी.
पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
पुनश्च
पुनश्च अभिनंदन ! मायबोलीकर असण्याचा आनंद आणि अभिमान अशा मायबोलीकरांमुळे गुणित होतो.
परागकण
मनापासुन
मनापासुन अभिनंदन गं.
तुझं हे प्रवास वर्णन इतकं अप्रतिम आहे की असं वाटलं की मी तुझ्यासोबतच प्रवास करत आहे. क्लास!
छोट्या मुकेशची आणि आंग्रे बाईंची तु आठवण ठेवलीस ह्या वरुन तुझी माणुसकी दिसुन येते, धन्यवाद मायबोलीचे की ज्या मुळे तुझ्यासारखी मैत्रिण भेटली. मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असणार मी.........म्हणूनच हे सगळं आमच्याही बाबतीत घडतंय! आता एकच ध्यास्....तुझी सि डि घेणे आणि कानाला वॉकमन लावून ऐकणे !
आगे बढते रहो यार. श्री गजानन प्रसन्न राहोत ही सदीच्छा आणि तुझ्या नवर्याचे व पिलांचे आभार् व अभिनंदन.
आई वडीलांना धन्य केलेस. तुझ्या सर्व गोड मित्रांशी ह्या निमित्तने आम्हीही जोडले गेलो गं.
पुन्हा एकदा - आगे बढो जयावी.........:-)
जयु, काल
जयु, काल तुझी सीडी ऐकुन कान धन्य झाले ग! आभार तुझे अन खरेदी.मायबोली.कॉम चे जेणे करुन लवकर गाणी ऐकायला मिळाली . वर सगळ्याच्या प्रतिक्रीये ला मोदक!!!
आता थांबु नकोस, यशाने हुरळुन जाउ नकोस, मागे पाहु नकोस, ही तुझ्या साठी फक्त एक सुरुवात - पहीली पायरी ठरो!!!!
अरे हा........
अरे हा........ सगळ्यात महत्वाची गोष्ट !
"सारे तुझ्यात आहे" हे नाव मला सुचवलं आपल्या श्यामलीने अल्बमचं नाव काय असावं ह्याबद्दल मी अनेक लोकांना छळलं. श्यामलीनं जेव्हा हे नाव सुचवलं तेव्हा ते मला इतकं आवडलं ना......!!
मैत्रेयी...... अगं घरच्या लोकांच्या मुळेच मी हे सगळं करु शकले. त्यांच्यापर्यंत कौतुक नक्की पोचवेन
दिनेश.... तू कार्यक्रमात हजर होतास.......सगळ्या मायबोलीकरांच्या वतीनं..... मला खूप आनंद झाला रे.
मनू...... धन्स अगं गाणी आवडलीत्......सगळं भरुन पावलं गं
पराग..... शुक्रिया असंच मायबोलीकरांकडून प्रेम मिळू देत.
पल्ली..... डोळ्यात पाणी आणलंस.... अगं आपली मायबोली आहेच अशी.... खूप प्रेम करतात गं ही मंडळी.
मंजू...... तहे दिलसे शुक्रिया..... ह्या यशाने हुरळून नाही जाणार..... पुढे जायचा नक्की प्रयत्न करेन
आपल्या ऎडमीनचे मात्र आभार मानावे तितके थोडे आहेत. इतक्या पटकन मायबोलीच्या खरेदी विभागात त्यांनी माझी सीडी ठेवली...... खूप खूप धन्यवाद
माझ्या
माझ्या ब्लॉगवर फ़ोटोसुद्धा टाकले आहेत
ह्या लिंकवर क्लीक करा
https://jayavi.wordpress.com/
ईटिव्हीवर आणि झी २४ तासवर प्रकाशन सोहळ्याचं केलेलं प्रक्षेपण इथे बघा.
ETV मराठी वरच्या "आपली मुंबई" ह्या कार्यक्रमातील "सारे तुझ्यात आहे" ह्या माझ्या अल्बमचा प्रकाशन सोहळा
(YouTube) http://www.youtube.com/watch?v=ATzPSzbOjXw
Zee २४ तासच्या "चस्का मस्का" ह्या कार्यक्रमातील "सारे तुझ्यात आहे" ह्या माझ्या अल्बमचा प्रकाशन सोहळा
(YouTube) http://www.youtube.com/watch?v=ww9-TFPZv-E
स्वप्निल बांदोडकर "आभास चांदण्याचा" गाताना (YouTube)
http://www.youtube.com/watch?v=57iHf7Rd_mk
वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोडकर "ओला वारा" गाताना (YouTube)
http://www.youtube.com/watch?v=KXamtxVjOzs
देवकी पंडित "हुंदका साधा तुझा" ही गझल गाताना (YouTube)
http://www.youtube.com/watch?v=vVyaAfIaGs4
जयावी -
जयावी - मनापासून शुभेच्छा , पुढील वाटचालीसाठी.
जयु, आज
जयु, आज तुझ्या स्वप्नाचा प्रवास एका बैठकीत वाचुन काढला. तुझा खुप अभिमान वाटला. तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. हे सगळं वाचतांना मनातल्या मनात मी तुला ओळखते याचही कौतुक वाटले (कोणाचे काय तर कोणाचे काय :D) अशी गुणी मैत्रिण दिल्याबद्दल मायबोलीचेही आभार.
श्यामलीने सुचवलेले नावही खुप आवडले.
तुला असेच भरभरुन यश मिळावे हीच देवाला प्रार्थना. तुझ्या कलागुणांना वाव देणारे गुणी लोक तुला नेहमी भेटोत.
आणि हो, तू आहेस तशीच राहा
-प्रिन्सेस...
जयूताई,
जयूताई, अगदी सुरेख प्रवास रेखाटलायस !!! वाचताना अगदी रोमांच उभं राहत होतं. सीडी घ्यायची आहे अजून पण ती सुद्धा आपल्याच माणसांकडून..... पूनम कधी भेटेल तेव्हा.... ऐकल्यावर सांगेनच परत एकदा. पण हे सगळं इतकं सुरेख वाचल्यावर ती अप्रतीम असणारच ह्यात शंका नाही.
btw, ही कोण दुसरी मंजू? तो प्रतिसाद तुला mukman2004 कडून मिळालाय.... तुझा प्रवास पूर्ण लिहिल्याशिवाय मी प्रतिक्रिया लिहायची नाही असं ठरवलं होतं.
नकुल
नकुल धन्यवाद रे
प्रिन्सेस..... अगं ही सगळी मायबोलीचीच कृपा आहे. इथेच तर सुरवात झालीये लिखाणाची तहे दिलसे शुक्रिया जानेमन !!
मंजू...... धन्स आता सीडी घेतल्यावर नक्की तुझा अभिप्राय कळव. अगं मूकमन म्हणजेच मंजू आहे......दुसरी मंजू
जयुताई,
जयुताई, लगे रहो
काय सुरेख आहेत गाणी! 'ओला वारा' खूप रोमांचक. 'सारे तुझ्यात' मध्ये तू सारखी जाणवतेसच.
अजून येउ द्या!
जयु, 'सारे
जयु, 'सारे तुझ्यात आहे' चा प्रवास तुझ्याबरोबर करून आले. खूप खूप आवडला! आता गाणी ऐकायची आहेत. माझी सी. डी. लवकर येवो. (तोवर यु ट्युबवर जे काय ऐकायला मिळालं तेच अनेकदा ऐकून घेतलं!)
तुझे शब्दच इतके नीतळ अलवार आहेत की चालीत न गुंफता देखिल भुरळ पाडतात. मग तालात, सुरात आणि अश्या दिग्गजांच्या स्वरात गुंफले तर त्याचा मजा काही औरच असणार!जमलं तर काही कवीतांचे शब्द मायबोलीवर देणार का?
केव्हडा व्याप आहे गं एका सी. डी. मागे! खूप मेहेनत घेतलीत तुम्ही सगळ्यांनी!
बारसं थाटात झालं नं! नाव सुरेखच! श्यामली आहेच मुळी हुशार!
-मृण्मयी
जयु, फारच
जयु, फारच सुंदर लिहिल आहेस. तुझ्या सोबत आम्हीपण CD release ceremony ला तेथे होतो अस वाटल. तुझ्या कविता नेहेमीच तरल शब्दांनी सजलेल्या असतात. मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकात तुझा गोड आवाज ऐकला होताच. आता सी डीवर ऐकायला मिळेल. खर तर सी डी आल्यावर लिहिणार होते पण ती मिळायला २-३ आठवडे लागणार मग इतका वेळ रहावल नाही जाणार म्हणून लगेच लिहिते आहे.
इतक्या मान्यवर व्यक्तिंनी तुझी गाणी म्हटली आहेत त्यातच तुझ्या लिखाणाची पावती मिळाली आहे. मी बापडी आणखी काय लिहिणार? ए पण यु ट्युबवर नुसत मधाच बोट लावल्यासारख वाटल हं. असो. आणखी पुढे सी डी आल्यावर.
अशीच यशस्वी होत रहा. खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना.
जयवी, तू तर
जयवी, तू तर सेलेब्रीटी झालीस आहेस. आमची ओळख राहील ना
खरचं अप्रतीम लिहिलं आहेस, सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.
- बी
चिन्नु.....
चिन्नु..... अरे वा.... तू ऐकलीस.... शुक्रिया
मृण्मयी..... हो अगं......मेहेनत भरपूर होती... पण इतक्या छान प्रतिक्रिया मिळाल्यावर सगळं वसूल झाल्यासारखं वाटतं गं. व्हय....आपली श्यामली लय हुश्शार आणि ग्वाड हाय
आर्च....इतक्या मनापासून कौतुक केलंस.... आता सीडी ऐकल्यावर अभिप्राय नक्की कळव
बी.... अरे कसली सेलिब्रेटी रे...... मी आपली जुनी मायबोलीकरच आहे ....!!
जयवी, मी तर
जयवी, मी तर ह्या ओला वारा गाण्याच्या प्रेमात आहे. तेच एकून संपत नाहीये. माझ्या गाडीत तेच एक गाणे सुरु असते. मस्तच आहे. एकच गाणे एकून सीडी खराब करणार. सारे तुझ्यात आहेचे शब्द पण मस्त आहेत. चाली इतक्या सुंदर आहेत ना कानाला गोड वाटतात.
कसे काय एवढे रोमटीक सुचते ग?
अतिशय
अतिशय सुन्दर वर्णन्.. खुप खुप अभिनन्दन. अजुन सिदि एइकलि नाही. पण यावेळी भारतात गेल्यावर पहीलि खरेदि हीच्......मी मायबबोलीवर नवीन आहे, त्यामुळे लिहिताना चुकतेय अजुन.
फुलरानी
मनु..... अगं
मनु..... अगं खूप छान वाटलं गं तु़झी प्रतिक्रिया वाचून
फुलराणी... मनापासून धन्यवाद तू ही सीडी ऑनलआईन पण विकत घेऊ शकतेस. ही लिंक बघ.
http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=16969&cat=0&page=1
जयावी,
जयावी, खरंच खुप खुप अभिनंदन. खरंच मायबोलीचे धन्स गं... म्हणून तुझा हा अनुभव आमच्या पर्यंत पोचु शकला. अल्बम केवळ अप्रतिम... आणि वर्णनही... अजुन बरंच काम तुझ्याहातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....
मी ह्या
मी ह्या क्शेत्राशी जवळून संबंधित असलो तरी हा प्रवास मला एक आत्मिक सुख देऊन गेला. सी डी इतकंच हे लेखनही महत्वाचं आहे. प्रत्येक निर्मिती अशी प्रक्रिया लिहून जतन करणे गरजेचे आहे असे वाटते. अभिनंदन !!
अदिती,
अदिती, अज्ञात...... मनापासून धन्यवाद
अज्ञात.... तू काय करतोस? ह्या क्षेत्राशी जवळून संबंधित म्हणजे तू वादक आहेस की गायक की गीतकार?
मी सगळंच
मी सगळंच थोडं थोडं आहे. मुळात मी मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअर.
हौशी नाटकात काम करतो, बसवतो. शास्त्रोक्त गाणं शिकतो. सुगम, नाट्य, भावगीत गातो. जदूचे प्रयोग करत असे कॉलेजमधे. स्केचिंग, पेंटिंग, फोटोग्राफी करतो. सुचेल तेंव्हा/तसं गद्य-पद्य लिहितो. (प्रसिध्द मात्र कांही नाही. सध्या मायबोलीवरच जे काय लिहिलेलं आहे तेवढंच मोकळं झालंय.)
मुख्यतः माझ्या व्यवसयात हे सारं उपयोगी पडतं.
मी 'सी आय ई एल बिझिनेस सर्कल, सी आय ई एल आर्ट कल्चर' या नावाने टेलर मेड 'ट्रॉफीज, मेमेंटोज, अवॉर्डस, मेड्ल्स, मॉडेल गिफ्टस' बनवतो आणि सृजन अनुभवतो.
त्यात आलेले 'थ्रिलींग/ एनकरेजिंग् / हळवे / रोमहर्शक प्रसंग' लिहिण्याबद्दल माझ्या अनेक मित्रांनी अनेकदा लिहायला सांगितलंय पण मुहूर्त लगला नव्हता तो आता लागेल. १९९२ पासूनचे (सुरुवातीपासूनचे) फोटोंसहित सर्व रेकॉर्ड जतन केलेले आहे.
तुझ्या लेखातून मला निश्चित प्रेरणा आणि दिशा मिळाली आहे.
मी अजून तुझी सी डी घेतलेली नाही. घेईन आणि ऐकल्यावर अभिप्राय देईन !!
................................................................................अज्ञात
सुरेख
सुरेख अज्ञात तुमचेही अनुभव लिहा लवकरात लवकर. सारे तुझ्यात आहे सुद्धा लवकर ऐका.
हेलो
हेलो जयावी, तुम्ही मला ओळखत नाही. तुमचा हा प्रवास खरेच लाजवाब आहे. अशीच उत्तरोत्तर तुमची प्रगती होवो. तुमची सीडी नक्की ऐकेन आणि मग सांगेन कशी वाटली ते. परत एकदा अभिनंदन.
Pages