Submitted by प्राजु on 18 December, 2007 - 14:19
घर ते माझे बालपणीचे
रंगबिरंगी आठवणीचे..
आईबाबांच्या पंखाखाली
मांडलेल्या भातुकलीचे..
प्राजक्त, तुळस, कदंब अंगणी
वेल जुईची बहरली होती..
सैरवैर त्या अंगणी माझी
इवली पाऊले नाचली होती..
झोपाळ्याची जुनीच करकर
सवे चिऊकाऊच्या गोष्टी..
त्यामागूनी सूरांत होतसे
तिन्हीसांजेची शुभंकरोती..
एकेक पायरी यशाची ती
चढले ज्याच्या बळावरी..
घर ते माझे उभे पाठीशी
उनपाऊस घेत शिरी..
कधी न वाटे मला एकटे
घर ते माझे सखा सोबती..
कितिक गुपिते दोघांमधली
जपून त्याने ठेवली होती...
जग ते होते छोटेसे पण
आनंदाचे जीणे होते..
प्रत्येकाचा सूर वेगळा पण
घर ते आमचे गाणे होते..
त्या मायेच्या आठवणीने
उर दाटून येई कोण..
घरट्यावरूनी त्या माझ्या
उतरून टाकेन लिंबलोण...
- प्राजु.
गुलमोहर:
शेअर करा
लयबद्ध.. सुरेख
छान आहे, लय सुंदर बांधली आहे.
धन्यवाद.
धन्यवाद सत्यजीत. मायबोलीवरच्या माझ्या पहिल्या वहिल्या साहीत्यकृतीला आपला प्रतिसाद वाचून आनंद झाला.
प्राजु
जुने काही चाळताना सहज ही
जुने काही चाळताना सहज ही कविता सापडली.
मला फारच आवडली.
फारच छान आहे,
असे असुन सुद्धा अभिप्राय फार कमी आले आहेत.
पु.ले.शु. !