सैनिकाच्या गोष्टी - मी अनुभवलेलं सिक्किम (१)

Submitted by शरद on 23 June, 2010 - 06:16

तर त्या काळात मी सिक्किम इथे होतो. धरतीवरचा स्वर्ग कुठे असे कुणी विचारले तर मी "सिक्किम' असेच उत्तर दिले असते; अजूनही देतो. म्हणजे आमीर खुसरो जर काश्मीरच्या ऐवजी सिक्किमला आला असता तरी हेच म्हटला असता, "अगर फिरदौस बा रुह जमिनस्त, हमीनस्तो, हमीनस्तो, हमिनस्त!!" (हे तो काश्मीरच्या बाबतीत म्हटला होता म्हणे! - "पृथ्वीवर स्वर्ग जर कुठे असेल, (तो) इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे!!" काश्मीर, स्वित्झरलँड यांचे सौंदर्य त्यांच्या त्यांच्या जागी. पण सिक्किम म्हणजे सिक्किम. म्हणजे मी १९८३-८४ सालची गोष्ट करतोय. आताही त्यात फारसा बदल झालाय असे वाटत नाही.

लोक अगदी मस्त. आपल्याच मस्तीत. संध्याकाळी दारू पिऊन गिटार वाजवत रस्त्यांवर मस्त फिरणारी पोरे आणि पोरी सिक्किममध्ये सर्रास सापडतात. म्हणजे अश्लिल चाळे वगैरे नाही; फक्त एक बेधुंद, प्रत्येक क्षण पूर्ण जगण्याची वृत्ती!

भयानक पाऊस पडतो. सगळीकडे स्वच्छ पाण्याचे छोटे छोटे ओहळ वाहत असतात. सगळीकडे डोंगरच डोंगर आहेत. हिरवेगार डोंगर, झाडेझुडुपे, वृक्ष, वेली, फुले, ऑर्किड आणि रिमझिम पाऊस या सार्‍यांची रेलचेल. पाऊस पडून गेल्यावर हवेत मस्त रोमॅंटिक गारवा! सकाळी संध्याकाळी धुक्याची चादर! त्यातून कधीतरी येणारे सूर्य-चंद्राचे कवडसे! सगळं नुसतं स्वप्नात असल्यासारखं.... माझ्या एका ग़ज़लेतील ओळी आठवतात...

'पहाटस्वप्न येतसे, जिवास लागले पिसे..
धुक्यामधे फिरायचे नि चिंब त्यात न्हायचे!'

माझी बटालियन गान्तोकला (Gangtok) होती. पण मी क्वचितच बटालियनमध्ये असायचो. 'पेट्रोलिंग ऑफिसर' म्हणून जणू माझी नियुक्तीच झाली होती. आमच्या कमांडो प्लाटूनचा मी कमांडर होतो. त्यामुळे मला खूप भटकायला लागायचे. आमच्या बटालियनची लढाईच्या वेळी डिफेन्स घेण्याची जागा पार लाचुंग च्या पुढे होती. आता हे सगळं समजायला सिक्किमचा भूगोल माहित असणं गरजेचं आहे. बंगालच्या सर्वात उत्तरेचे दोन जिल्हे म्हणजे दार्जिलिंग आणि कॅलिंगपाँग. दार्जिलिंगविषयी तुम्ही ऐकलेच असेल. कॅलिंगपाँग हा तितकाच किंबहुना थोडा जास्तच सुंदर प्रदेश आहे. त्यांच्या उत्तरेला सिक्किम. सिक्किममध्ये चार जिल्हे आहेत - नॉर्थ सिक्किम, ईस्ट सिक्किम, वेस्ट सिक्किम आणि साऊथ सिक्किम. अगदी सोप्पं! सगळ्या सिक्किमच्या लोकसंख्येच्या जवळ जवळ ५० टक्के लोकसंख्या एकट्या गांतोक शहरात एकवटली आहे. सीमेवरचे राज्य, भारतात नुकतेच विलीन झालेले राज्य (मला वाटते १९७६ साली सिक्किम भारतात आले; त्यापूर्वी स्वतंत्र राष्ट्र होते.) त्यामुळे सरकारी सवलती मुबलक प्रमाणात. (आपण म्हणतो त्यांना लाडावून ठेवलंय वगैरे. पण ती राष्ट्रीय गरज असते. कारण आपण नाही तर मग पाकिस्तान किंवा चीन त्यांना मदत करतील आणि त्यांना आपल्यापासून हिरावून नेतील.) सगळं काही सबसिडाईज्ड किंमतीत. मला आठवतंय, त्यावेळेला मारुती जिप्सीची किंमत बाहेर सव्वा लाख वगैरे होती तर सिक्किममध्ये रुपये ७५,००० /- फक्त. पण आमच्याकडे तितके पैसेच नव्हते. Sad असो.

न्यू जलपाईगुडी (सिलिगुडी) वरून हाय वे आहे गांतोकपर्यंत. त्या हाय वे च्या दोन्ही बाजूला वेस्ट सिक्किम आणि साऊथ सिक्किम. गांतोक पासून पूर्वेकडे नथुला पासपर्यंत ईस्ट सिक्किम आणि गांतोकच्या उत्तरेला North Sikkim. नॉर्थ सिक्किमला जायला चुंगथांग पर्यंत एक रस्ता आहे मग त्याला दोन फाटे फुटतात एक जातो लाचुंग या गावाकडे तर दुसरा जातो लाचेन या गावाकडे. ला म्हणजे पास किंवा खिंड. चुंग म्हणजे लहान आणि चेन म्हणजे मोठा. लाचुंग पासून पूर्वेला हिमालय चढत जायचे. जिथे अत्युच्च भाग येतो तिथे चीन ची बॉर्डर आहे. बॉर्डर म्हणजे कुंपण वगैरे काही नाही; फक्त इकडे आपले सैनिक आणि तिकडे चीनचे. तसा शांत प्रदेश आहे. चीनी आणि आपण काहीही कुरापती काढत नसतो; पण तरी कारगिलसारखा प्रसंग होऊ नये म्हणून पेट्रोलिंगद्वारा बॉर्डरचे रक्षण केले जाते. आमच्या वेळी संपूर्ण बटालियन गान्तोकमध्येच असायची. फक्त एक प्लाटून (३५-४० जवान) आणि एक तरुण ऑफिसर बॉर्डरवर असायचा. आणि आमच्या बटालियनमध्ये बहुतेक वेळा तो ऑफिसर मी असायचो. बाकीची बटालियन फक्त वर्षातून दोन वेळा १५-१५ दिवस युद्धाचा सराव करण्यासाठी आणि बंकर वगैरेंची डागडुजी करायला यायची. एक बटालियन म्हणजे साधारणत: ७५० जवान आणि १०-१२ ऑफिसर्स.

मला आमच्या ठाण्यापासून (त्या गावाचं नाव झेकुफियाक. गाव कसलं? चार झोपड्या होत्या) सतत पेट्रोलिंगवर जायला लागायचे. आणि पेट्रोलिंग म्हणजे ट्रेकिंग नव्हे. कारण तो प्रदेश पूर्णत: जंगलाने भरलेला होता. वर्षातून चार - पाच महिने (डिसेंबर ते एप्रिल) बर्फाखाली असायचा. इतर वेळी सतत पाऊस. आणि जंगले इतकी घनदाट की काही विचारू नका. जंगले म्हणजे बांबू आणि केळींची जंगले. पण मी कधी हिंस्त्र जंगली श्वापदे फारशी पाहिली नाहीत. फक्त काही याक, रानटी हरणे, बोकड वगैरे. कदाचित तिथले वातावरण वाघ-सिंह वगैरे प्राण्यांना फारसे आवडत नसावे.

तर असाच एकदा पेट्रोलिंगवर गेलो होतो. बरोबर बारा जवान होते. उद्देश होता एका विशिष्ट जंगलमय डोंगरातून बटालियन चालत जाऊ शकते का ते पाहणे. तो प्रदेश म्हणजे बांबूच्या जंगलाचा प्रदेश होता. बांबूची बेटे कुणी पाहिली असली तरच त्यांच्या निबिडतेची कल्पना येऊ शकते. आम्ही कसे गेलो ते सांगतो म्हणजे आपल्याला थोडीफार कल्पना येईल. सकाळी पाच वाजता आम्ही चालायला सुरवात केली. (तिकडे खूप लवकर उजाडते) वाटेत अजिबात विश्रांती न घेता चालत होतो. तेरा जण. सर्वांच्याकडे तीक्ष्ण धार लावलेल्या १२ इंची खुकर्‍या होत्या. (खुकरी म्हणजे नेपाळी गुरखे वापरतात ते शस्त्र. रामपुरी चाकूपेक्षा मोठा साईझ, पण कोयत्यापेक्षा लहान.) पहिल्या जवानाने बांबू कापत पुढे मार्ग काढायचा; बाकीच्यांनी पाठीमागून चालत यायचे. तो थकला म्हणजे त्याची जागा दुसर्‍याने घ्यायची. असे करत करत संध्याकाळ झाली. आमच्या सुदैवाने एक थोडी मोकळी जागा मिळाली. तिथे रात्रीचा मुक्काम केला. त्या अवधीत आमच्या सर्वांच्या खुकर्‍या बोथट झाल्या; सर्वांचे बूट फाटले (कारण बांबू कापल्यानंतर खाली राहिलेला भाग एखाद्या भाल्याप्रमाणे होतो, आणि काही केल्या चुकवता येत नाही); सर्वजण पूर्णत: थकून गेलो आणि १३-१४ तासांत आम्ही तब्बल दोन किलोमीटर अंतर कापले. म्हणजे अ‍ॅव्हरेज स्पीड साधारणत: ताशी दोनशे मीटर! Happy पण दुसर्‍या दिवसापासून जसजसे आम्ही हिमालय वर वर चढत गेलो तस तशी झाडी विरळ होत गेली; आणि शेवटी चार दिवसांनी आम्ही आमचा उद्देश पूर्ण केला. रिपोर्ट अर्थातच निगेटिव्ह. जिथे आम्हा दहा बारा माणसांना जायला इतका त्रास झाला; तिथे सात - आठशे लोकांची पूर्ण बटालियन सर्व अवजड हत्यारांसह कशी काय जाऊ शकेल? ('अवजड' हत्यारावरून आठवण झाली - पायदळामध्ये कितीही जड हत्यार असले तरी त्याला हलके म्हणायचे पद्धत आहे. मग ट्रेनिंगच्या वेळेस उस्ताद म्हणतो, "यह एक दो सौ किलोका हल्का हथियार है!" :खोखो:)

३ ऑक्टोबरला मी अशाच एका पेट्रोलवर गेलो होतो. एक नाला पार करून जायचा होता. तो डोंगर तसा निबिड अरण्याने व्याप्त नव्हता. जंगल होते; पण ते तसे खुले खुले होते. बरीच चराऊ राने होती. काही याकपाळांच्या (मेंढपाळ या शब्दावरून मी याकपाळ हा शब्द तयार केलाय :दिवा:) झोपड्या होत्या. जंगली पायवाटा होत्या. आणि तो प्रदेश तसा बॉर्डरपासून दूर होता (म्हणजे वीस एक किलोमीटर आत) त्यामुळे शत्रू पाहील याची भीती नव्हती. भीती होती ती एकच; जळवांची.

सिक्किममध्ये प्रचंड प्रमाणात जळवा आहेत. टायगर लीचेस! एक एक जळू बोटाएवढी. जळूचे एक असते, शरीराला चिकटली तर चिकटल्याची जाणीवसुद्धा होत नाही. एकदा तिचा रक्त शोषणाचा कार्यभाग उरकला की मग त्या जागी थोडी खाज येते आणि ती गळून पडते. पण पाहिल्यावर अत्यंत किळसवाणे वाटते. शिवाय एखादीच जळू लागली तर आपण गंमत म्हणून सोडू शकतो; पण जंगलात 'एखादीच' जळू लागत नाही. मात्र जळवांसाठी एक रामबाण उपाय आहे; मीठ आणि तंबाखू मिश्रीत पाणी! त्याचा एक थेंब जरी जळूला लागला की ती हमखास गळून पडते. दोन्हीतलं एक असलं तरी चालते. म्हणजे मिठाचं पाणी किंवा तंबाखू. (सगळे लोक तंबाखू सेवनाला नावे ठेवत असतात. 'कर्करोगाला निमंत्रण' वगैरे. पण वाईटात एखादी तरी चांगली गोष्ट सापडतेच कीनई?) तिथले लोक घराबाहेर पडताना कमरेला एक असे द्रावण असलेली चपटी बाटली अडकवूनच बाहेर पडतात. तसेच 'स्मोकर्स' ना तिकडे खूप डिमांड असतो. Lol

सकाळी निघून संध्याकाळपर्यंत परत येऊ अशी अपेक्षा होती, आणि ते गरजेचे होते; कारण दुसर्‍या दिवशी आमची बटालियन एक्सरसाईजला जाणार होती. एक्सरसाईज म्हणजे लढाईची प्रॅक्टिस. म्हणजे फक्त गोळ्या झाडल्या जात नाहीत; इतर सर्व कामे लढाईवर असल्याप्रमाणेच करावी लागतात. नॉर्थ सिक्किम आणि इस्ट सिक्किम यांच्यामध्ये एक पहाड आहे. तो पहाड पार करून (अर्थातच चालत) इस्ट सिक्किम मधून नॉर्थ सिक्किममध्ये यायचे आणि तिथे छांगू तलावाच्या पूर्वेला असलेल्या एका ठाण्यावर हल्ला करायचा असे एक्सरसाईजचे स्वरूप होते. पण मी काही एक्सरसाईजला पोहोचू शकलो नाही.

माझ्या पेट्रोलिंग पार्टीमध्ये एक हवालदार होता. हवालदार मुरुगन. त्याचे बूट फाटले. दगड गोटे असतात. कडे-कपारी ओलांडून जावे लागते. आणि आम्हाला नाला पार करण्यासाठी जागा शोधायची होती, त्यामुळे खूपच कठिण रस्ता होता. तर मुरुगनचे बूट फाटले. त्याने स्पेअर बूटलेसने ते बांधले; पण जळवांना आत यायची संधी मिळाली आणि जवळ जवळ पन्नास साठ जळवा त्याच्या पायाला चिकटल्या. जेव्हा आम्ही विश्रांतीसाठी थांबलो तेव्हा कळाले. त्याच्या शरिरातले अर्धे रक्त जळवांनी शोषून घेतले होते आणि त्याला चालता येणे अशक्य होऊन बसले. संध्याकाळ झाली होती. त्याला परत घेऊन जाणे शक्य नव्हते. मग रात्री तिथेच कुठेतरी मुक्काम केला. इमर्जन्सी रेशन अर्थातच बरोबर ठेवले होते, त्यामुळे खाण्या पिण्याचा प्रश्न नव्हता. दुसर्‍या दिवशी त्याला सर्वांनी उचलून खाली आणले, सुरक्षित स्थळी नेले, अ‍ॅम्ब्युलन्स मागवली आणि परत आमचे काम सुरू केले. पूर्ण चोवीस तास या गडबडीत गेले; त्यामुळे आमच्या पेट्रोलचे उद्दिष्ट पूर्ण व्हायला एक दिवस जास्त वेळ लागला. त्यामुळे आम्हाला बटालियनबरोबर एक्सरसाईजला जाता आले नाही. आम्ही संध्याकाळी गान्तोकला पोचलो आणि बटालियनने सकाळीच कूच केलेले होते. दोन दिवस आणि दोन रात्री चालत जाऊन तिसर्‍या दिवशी सकाळी 'शत्रूच्या ठाण्यावर' हल्ला करायचा अशी योजना होती.

सिक्किममध्ये सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये अत्यंत सुंदर वातावरण असते. पावसाळा संपलेला असतो आणि हिवाळा सुरू व्हायला वेळ असतो. याच काळात सगळे सण वगैरेसुद्धा असतात. त्यामुळे वातावरणात एक वेगळाच उल्हास भरलेला असतो. साधारणत: नोव्हेंबरच्या शेवटी बर्फ पडायला सुरवात होते. त्यावेळी आणि पुढचे चार-पाच महिने मात्र प्रचंड थंडी! पण त्यातसुद्धा एक वेगळीच मजा यायची. थंडीत रजईमध्ये घुसून हातात गरम गरम चहाचा स्टीलचा प्याला घेऊन बुखारीसमोर बसून कुठलेली काम करताना एक वेगळाच हुरूप येतो. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर सर्वात बेष्ट! असो.

आम्ही गान्तोकला पोचलो आणि पाऊस सुरू झाला. तसा अधून मधून पाऊस असतोच; त्यामुळे आम्हाला काही विशेष वाटले नाही. रात्रभर आणि दुसर्‍या दिवशी पाऊस सुरूच होता. तिसर्‍या दिवशी सकाळी 'शत्रूच्या ठाण्यावर' हल्ला करून आमचा एक्सरसाईज संपणार होता.

माझ्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल भौमिक बदलून जाऊन नवीन कमांडिंग ऑफिसर येऊ घातले होते - कर्नल पृथ्वीराज सिंग नावाचे. ते गान्तोकलाच होते.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी बटालियनशी वायरलेस संपर्क तुटला. त्याचेही आम्हाला काही विशेष वाटले नाही. हिमालयात अगदी साध्या कारणांनी संपर्क तुटू शकतो. त्या काळात आजच्या सारखे प्रगत तंत्रज्ञान नव्हते. मोबाईल, सॅटेलाईट टेलिफोन वगैरे गोष्टी फक्त संकल्पना म्हणून माहीत होत्या. संपर्क तुटण्याआधी बातम्या मिळत होत्या की पाऊस खूप आहे पण आगेकूच चालू आहे.

तिसर्‍या दिवशी कर्नल पृथ्वीराज, त्यांचा सहायक, वायरलेस ऑपरेटर आणि मी असे आम्ही चौघे जीप घेऊन निघालो. पोहोचायला आम्हाला उशीर झाला कारण भयानक पाऊस पडत होता आणि त्यामुळे रस्ता खराब झाला होता. शिवाय धुके पसरले होते. जेमतेम चार फूटाचा रस्ता दिसत होता. हवेत तरंगत असल्याप्रमाणे ड्रायव्हर जीप चालवत होता. शेवटी आम्ही कसेबसे बटालियनचे स्वागत करण्यासाठी 'शत्रूच्या ठाण्यावर' पोचलो. तिथे बटालियन आली असेल / येत असेल असे वाटत होते. पण नाही. कुणीच आले नव्हते. लढाईत असे होतेच. वाटेत अनंत अडचणी येतात. त्यावर मात करून यायचे म्हणजे पूर्वीचा प्लॅन वारंवार बदलावा लागतो; नवीन डेडलाईन्स आखाव्या लागतात; सैन्याची पुनर्रचना करावी लागते. हे चालतच असते. त्यामुळे वेळ होणार हे आम्ही मनातल्या मनात गृहित धरले होतेच; पण तरी आम्ही वाट पहात होतो.

जिथे आम्ही उभे होतो ती जागा समुद्रसपाटीपासून १३००० फुटांवर होती. म्हणजे हाय अल्टिट्यूड. हाय अल्टिट्यूडचे अनेक प्रश्न असतात. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे हॅपो - हाय अल्टिट्यूड पल्मोनरी ओडेमा. या मध्ये जर कमी दाबाच्या वातावरणाची शरीराला सवय झाली नसेल तर श्वास बंद पडायला लागतो आणि फुफ्फुसात पाणी होते. त्यासाठी एकमेव रामबाण उपाय म्हणजे त्या व्यक्तीला ताबडतोब प्राणवायू द्यावा आणि कमी उंचीच्या प्रदेशात न्यावे (म्हणजेच हिमालयाचा ज्या कुठला डोंगराच्या माथ्यावर असाल तिथून खाली उतरायला सुरवात करावी.) नंतर मग फुफ्फुसातील पाणी काढणे वगैरे. दुसरा प्रश्न म्हणजे फ्रॉस्टबाईट. यामध्ये बर्फात शरीर उघडे पडल्यास त्या भागातील मज्जातंतू सडायला लागतात. प्रथम कातडी लाल होते (चिलब्लेन), मग काळी होते (चिलब्लेन - दुसरी स्टेज), मग कातडी कुजायला लागते (फ्रॉस्टबाईट), मग स्नायू आणि हाडावर परिणाम होतो (गँगरिन) आणि तो भाग कापूनच काढावा लागतो; नाहीतर सगळ्या शरीरात विष पसरून माणूस मरून जातो. तिसरा प्रश्न म्हणजे अल्ट्रा वॉयोलेट किरण. अतिउंच प्रदेशात वातावरण विरळ असल्याने आणि हवेत धूळ अजिबात नसल्याने सूर्यकिरण थेट अंगावर पडतात, त्यामुळे त्यांची प्रखरता वाढते आणि कातडी अक्षरश: जळते. शिवार बर्फावरून परावर्तित झालेल्या किरणांमध्ये अल्ट्रा वॉयोलेट किरण असतात. जर डायरेक्ट सूर्याकडे पाहिले किंवा असे परावर्तित किरण डोळ्यात गेले तर ब्बुब्बुळांना इजा पोचते; माणूस कायमचा आंधळासुद्धा होऊ शकतो. त्यादिवशी अगोदर पाऊस आणि नंतर बर्फ पडत होता; त्यामुळे सूर्यदेवतेचे दर्शन दुरापास्त होते म्हणून तिसरा प्रश्न शक्य नव्हता. सर्व जवान गान्तोकला रहात होते, फिजिकली फिट होते म्हणून पहिला प्रश्नसुद्धा तसा आटोक्यात होता. पण दुसरा प्रश्न उद्भवणार याची मला शंभर टक्के खात्री होती.

साधारण १-१.३० च्या सुमारास पहिली कंपनी आली. एका कंपनीत साधारणत: से-सव्वाशे जवान, ३-४ जुनियर कमिशन्ड अधिकारी आणि दोन अधिकारी असतात. पहिल्या अल्फा कंपनीत एकच अधिकारी होता - मेजर पुरोहित नावाचा. नैनितालचा राहणारा. अत्यंत फिट अधिकारी. आम्ही त्याला 'mountain goat' म्हणायचो. दुसरा अधिकारी म्हणजे मी. पण मी एक्सरसाईजला गेलोच नव्हतो. बर्फ पडतच होते. मी त्यांचे स्वागत करायला उभा होतो. माझी कंपनी आली. सर्वात पुढे मेजर पुरोहित होते. त्यांना पाहून मला अक्षरश: दया आली. अत्यंत थकलेला चेहरा. शरीर पूर्णपणे ढेपाळलेलं. ते आल्या आल्या मला सांगू लागले, "शरद, सारे जवान बहुत थक चुके है| They need help. Please help them."

मी लगेच कर्नल पृथ्वीराज यांना वायरलेस वरून सांगितले. ते पाठीमागे थांबलेले होते. त्यांचा वायरलेस सेट घेऊन मी पुढे आलो होतो. त्यांनी हल्ला थांबवण्याचा निर्णय घेतला. अल्फा कंपनीचे फक्त पन्नास एक जवान आले होते. बाकीचे पाठीमागेच राहिले होते. थांबत थांबत, मोठमोठा श्वास घेत, धापा टाकत येत होते. अल्फाच्या पाठोपाठ ब्रावो, चार्ली आणि डेल्टा ह्या कंपन्यासुद्धा आल्या. पण काही तरी चुकतेय याची मला जाणीव झाली. बटालियनचे एकूण साधारण पाचशे जवान यायला पाहिजे होते. पण माझ्या अंदाजानुसार फक्त अडिचशे जवान आले होते. बाकी गेले कुठे?

मी लगेच 'शत्रु' झालेले १२ जवान माझ्याबरोबर घेतले, वायरलेस सेट ऑपरेटर बरोबर घेतला आणि निघालो. बर्फ पडत होता. त्यातून आम्ही चाललो होतो. वाटेत एक जवान थकून एकटा बसलेला आढळला. त्या जवानाबरोबर दोन 'शत्रु' मदतीला देऊन पाठवले. थोड्या अंतरावर आणखी एक जवान बसलेला होता. त्याला धीर दिला. त्याच्याबरोबर दोन 'शत्रु' मदतीला देऊन पाठवले. एक वेळ अशी आली की माझ्याजवळचे सगळे 'शत्रु' संपले. मग माघारी फिरलो. कर्नल पृथ्वीराज यांना परिस्थितीची कल्पना दिली आणि पुन्हा निघालो. तीच पुनरावृत्ती. फक्त आता जवान थोडे दूर दूर अंतरावर होते.

आम्ही एक केले होते. येताना थर्मासमधून चहा घेऊन आलो होतो. आणि भरपूर सॉक्स घेऊन आलो होतो. जवान दिसला की त्याचे बूट काढायचे. सॉक्स काढायचे. चोळून पाय गरम करायचे. कोरडे सॉक्स घालायचे त्याला बूट घालायचे आणि एक कप चहा देऊन बरोबर दोन 'शत्रु' देऊन परत पाठवायचे. एक वेळ अशी आली की परत सगळे 'शत्रु' संपले.

मी आणि वायरलेस सेट ऑपरेटर. आम्ही दोघेच उरलो.

एके ठिकाणी वाटेवरच एक जवान झोपलेला आढळला. शिपाई उदयन. काही दिवसांपूर्वीच व्यवस्थित पी.टी. करत नाही म्हणून त्याला मी झापले होते. माझ्या तो चांगला लक्षात होता. उठवायला गेलो. उठला नाही. नाकाजवळ हात नेला. श्वास बंद. शोक करायला वेळ नव्हता. कुणी त्याचे मृत शरीर पाहिले असते तर त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम झाला असता. म्हणून त्याला वाटेतून थोडे बाजूला करून ठेवले. अंगावर बर्फ पसरला, खुणेसाठी एक झुडुप तोडून जवळ ठेवले आणि पुढे निघालो.

तोपर्यंत आम्ही साधारणत: दीड-दोन किलोमीटर चालून आलो होतो. पण जवान यायचे पूर्णत: बंद झाले होते. म्हणजेच ते वाटेत कुठेतरी थांबले असणार. बर्फ कोसळत होता. वातावरण विरळ होतं. उंची साधारणत: पंधरा हजार फूट, खडतर वाट, तीन दिवस चालून चालून थकलेले जवान; जर ते चालायचे थांबले असतील तर झोपतील आणि दुसर्‍या दिवशी एकही जिवंत सापडणार नाही. काहीही करून त्यांना शोधून काढून चालते करणे जरुरीचे होते.

डोंगर जिथे संपतो आणि जिथून पलिकडे खाली उतरायचे होते त्या ठिकाणी मी वायरलेस सेट ऑपरेटरला उभे केले. त्याला सांगितले की मी एका बाजूने खाली उतरतो, दुसरीकडून कुणी आले तर त्यांना मार्ग दाखव.

मी एकट्यानेच उतरायला सुरवात केली. दोनच मिनिटातच पूर्ण आंधळा झालो. व्हाईट-आऊट म्हणजे काय ते मी एकटा आणि असुरक्षित ठिकाणी असताना प्रथमच अनुभवले. पूर्वी कारगीलला असताना तुफान बर्फाची वादळे पाहिली होती. पण ते बंकरमध्ये बसून चहाचे घुटके घेत घेत. इथे मी बर्फाने घेरला गेलो होतो. दाही दिशांना फक्त पांढरे बर्फ दिसते. स्वत:चा हातसुद्धा दिसत नाही. चार पावलावर काय असेल ते ठाऊक नाही. पूर्ण अंध झालो होतो. आणि मी चालत होतो. एक दिशा पकडली होती. मनात भीतीचा लवलेश नव्हता. होती ती फक्त काळजी! माझे जवान कुठे असतील याची काळजी! माझी स्वत:ची काळजी नव्हतीच मला. परत जाताना वाट चुकली तर काय करायचे याचा विचार सुद्धा माझ्या मनात आला नव्हता. बर्फात पाय बुडवत मोठ्या प्रयासाने दुसरा पाय उचलून टाकत चाललो होतो. मोठमोठ्याने ओरडत चाललो होत. "तंबी इंगे वा.. तंबी ई साईडलं वा" (इकडे या, या बाजूला या) असं माझ्यापरीने तामीळमध्ये ओरडत होतो (माझे जवान दक्षिण भारतातले होते). बर्फाच्या वर्षावात आणि वार्‍याच्या घोंघावात माझा आवाज कुठंपर्यंत पोहोचू शकत होता मला ठाऊक नाही; पण काहीतरी केल्याचं मला समाधान मिळत होतं - नाही तरी मी त्या घटकेला आणखी काय करू शकत होतो?

तसाच किलोमीटरभर पुढे गेलो आणि मला काही आवाज आल्याचा भास झाला. नेटानं तसाच पुढं पुढं जात राहिलो. परत आवाज आल्याचा भास झाला. नक्कीच कुणाचा तरी ओरडण्याचा आवाज होता. मला हुरुप चढला. पुढे पुढे चाललो तसा आवाज वाढू लागला. नक्कीच माझे जवान होते ते! मी जोर जोरात ओरडू लागलो. शंभर दोनशे मीटर पुढे आलो तर घोळका करून बसलेले शंभर सव्वाशे जवान दिसले. त्यातच कॅप्टन मनोहर आणि मेजर सावंत सुद्धा होते. सगळेजण वाट चुकले होते. बर्फाचं वादळ. कुठल्या दिशेला जायचं ते ठाऊक नाही. शरीर दोन-तीन दिवस चालून चालून थकलेलं. मरणाची थंडी. जवळ नकाशे होते ते जाळून थोडी आग करावी म्हटलं तर माचिस भिजून सर्द झालेल्या. ते हताश होऊन देवावर सगळं सोपवून बसले होते. तशात मी तिथं पोचलो. पलिकडच्या बाजूनं कोणी आलंय म्हटल्यावर त्यांना भलता हुरूप चढला. ते माझ्या मागोमाग निघाले.

चालता चालता मेजर सावंत सांगू लागला की आणखीही काही जवान पाठिमागे कुठेतरी थांबले आहेत. मी ठरवले की त्यांनासुद्धा शोधून काढायंचच. पण या ग्रूपला रस्ता दाखवणे तितकेच महत्वाचे होते. त्यांना घेऊन पाठिमागे चाललो. रेडियो ऑपरेटर भेटला. त्याच्या ताब्यात त्या सर्व जवानांना दिले आणि मी परत माघारी फिरलो.

एव्हांना बर्फ पडायचे थांबले होते.

<<क्रमश:>>

दुसर्‍या भागाचा दुवा इथे मिळेल. http://www.maayboli.com/node/20859

गुलमोहर: 

शरद, मी खुप मिस करत होतो तूम्हाला. वेळात वेळ काढून इथे लिहित रहा.
असे अनुभव वाचून, खुप स्फुरण चढते.

बापरे काय भयंकर आहे हे. नुसते वाचले जाते की आपले जवान सिमेवर डोळ्यात तेल घालून पहारा करत असतात. पण हे म्हणजे अग्निदिव्यच आहे हो. आणि ते पण रोजच्या रोज. आपल्या जवानांचे शौर्य केवळ युद्धकाळात हायलाईट केले जाते. पण शांततेच्या काळात दाखविण्यात येणाऱया या शौर्याला उपमा नाही.
तुम्हा सर्वांच्या बहादुरीला सलाम....

वाहवा शरद्,एक वेगळा अनुभव..... आता भूषणरावांप्रमाणे तुझ्याही पुढच्या लेखाची उत्सुकता लागली मित्रा. Happy

शरद्...शब्दच नाहीत.. किती खडतर आयुष्य.. तुमची शैली मसत आहे., प्रसंग डोळ्यासमोर उभ राहतो..पुढच्या भागाची वाट बघतोय ..

प्रतिकुल परिस्थितीला केवळ तोंड देणे वेगळे आणि त्या परिस्थितीतही देशाचे रक्षण करणे वेगळे. बापरे, किती शारीरिक आणि मानसिक धैर्य लागत असेल. भारतीय जवानांना सलाम!

शरद, फारच उत्कंठतेने वाट पाहत आहे आपल्या पुढल्या लेखांची ......

बर्‍याच दिसांनी इकडे भटकलात शरदराव.

हे असे एक्सरसाइझसुद्धा इतके अवघड आणि जीवावर बेतणारे असतात म्हणुनच बहुदा तुम्ही लोकं प्रत्यक्ष लढायात मानवी सीमांना ओलांडून कौशल्य दाखवता. ते एक प्रसिद्ध अवतरण आहे ना: The more we sweat in peace, the less we bleed in war.

बर्‍याच दिवसांनी तुमचं लिखाण वाचलं आणि वाचताना अंगावर काटा आला. पुढच्या भागाची वाट पाहते आहे. तुमचे सर्व जवान सुरक्षित योग्य जागी पोचले असतील अशी इच्छा आहे Happy

शरद साहेब लवकर लिहा.......भारतिय सेना म्हणजे माझ्यासाठी देवतुल्य आहे...

जबरदस्त! शरदराव, आपला हेवा वाटतो, आपल्याबद्दल आदर वाटतो आणि आपल्या बाबतीतल्या माझ्या आधीच्या सर्व कल्पनांना सुखद सुरुंग लागला हेही मेन्शन करत आहे.

(गैरसमज नको म्हणून आधीच्या कल्पनाही सांगत आहे. आपण बॉर्डरवर नसाल असे वाटायचे. आपण इतके फिरला नसाल असे वाटायचे. आपली वागणूक फारच प्लेझंट व मनमिळाऊ आहे. मला नेहमी वाटायचे की सेनाधिकारी वागायला जरा कडक वगैरे असतात. म्हणजे ते असणारच, पण दैनंदिन जीवनातही, असे वाटायचे.)

-'बेफिकीर'!

बापरे..

गेल्या वर्षी याच दिवसांत माझा एक कलिग सिक्कीमला गिर्यारोहणासाठी गेला होता. दुर्दैवाने खराब हवामानामुळे बेसला परतताना त्याच्यासकट तीन लोक बेपत्ता झाले.. फक्त एकाचा मॄतदेह मिळाला. Sad
तुमच्या या वर्णनाने निसर्गाच्या या रौद्ररुपाची थोडी कल्पना तरी आली.

शरद तुम्हास आनि सर्व जवानास शतशः प्रणाम
खरच किति खडतर जिवन असते आनि महत्वाचे ते तुमहि स्वेच्छेने स्विकारलेले असते

आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि आदरामुळे मी अक्षरश: भारावून गेलो आहे. पण थोडी भीडसुद्धा वाटते. मी आपल्या सर्वांसारखाच सामान्य माणूस आहे. फक्त माझे प्राक्तन की मी सैन्यात गेलो. हां. जवळ जवळ सर्व सैनिक आपली ड्युटी मन लावून पार पाडत असतात. त्यांना आपली 'इज्जत' प्यारी असते. ट्रेनिंगमुळे काही अ‍ॅक्शन स्वाभाविकपणे होऊन जातात; ज्या बाहेरच्या जगाला अतर्क्य वाटतात. इतकेच!

पुन्हा एकदा भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. उत्तरार्ध लवकरच पोस्ट करतो.

स्वाती, इतकं नको हो करू. दंडवत देवाला - देवमाणसांना घालतात. सामान्यांना नव्हे. इतक्या प्रेमानं, आदरानं गुदमरायला होतं!

शरद

शरद,

Rentry केलीत ती पण जबरदस्त! हे विलक्षण अनुभव वाचले की अंगावर काटा येतो. खूप छान लिखाण आहे. पुढच्या भागाची वाट पहात आहे.

अरे वा सुरेख लिहिल आहे तुम्ही. वाचताना अगदी अंगावर काटा येतोय. आपले जवान कसल्या कसल्या परिस्थितीत असतात ते वाचुन वाईट वाटल आणि तुमच्या सारख्यांचा अभिमान ही वाटला.
तुम्हा सर्वांच्या बहादुरीला सलाम !

तुम्ही क्वचित लिहिता पण तुमचा लेख आला रे आला कि प्रथम तोच वाचला जातो. तुम्ही नेहमी एका वेगळ्या दुनियेची माहिती देत असता. नुस्तं वाचून आमच्या अंगावर काटे येतात.. तुमच्यावर काय काय प्रसंग ओढवत असतील, कल्पना ही करवत नाही..
माझा भाचा ही कारगिल च्या कथा सांगतो तेंव्हा जवानांबद्दल वाटणार्‍या काळजीने ऊर भरून येतो.. Sad

Pages