कविता करणे - एक मानसोपचार - काव्योपचार पद्धतीची ओळख!

Submitted by सानी on 13 September, 2010 - 11:13

प्रेरणा: दिनेशदा

केवळ आणि केवळ दिनेशदांच्याच प्रेमळ आग्रहाखातर मी ह्या विषयात पडले. अन्यथा मी कविता हा माझा प्रांत नाही असेच मानते. काही वेळा केवळ गंमत म्हणून मी काही रचना केल्या आहेत आणि काही वेळा काही मोजक्याच पण आवडणार्‍या कवितांवर प्रतिसाद लिहिले आहेत, या पलिकडे माझा कवितेशी काही म्हणता काही संबंध नाही.

त्याचे झाले असे, मी नुकतीच एक कविता रचली आणि दिनेशदांच्या विपुत तिची रिक्षा फिरवली. मग काय, मला अपेक्षा सुद्धा नव्हती असे काहीसे घडले. दिनेशदांचे कवितेविषयीचे मत समजले आणि आमची ह्या विषयावर खुप चर्चा झाली. कवींविषयी, कवितांविषयी आणि प्रतिसादकांविषयीही आम्ही भरभरुन बोललो.

माबोवर येणारे कवी- काही फुटपट्टी घेऊन रचना करणारे, काही मुक्तछंदवाले, काही यमकं जुळवणारे, काही अनाकलनीय असे लिहिणारे, काही कवितेतून कथा सादर करणारे तर काही कवितेतून आधार शोधणारे- दु:खी मनाचे कवी ह्या सगळ्यांविषयी आम्ही बोललो.

शिवाय या कवींना प्रतिसाद देणारे- काही नुसतेच प्रशंसा करणारे- छान, सुंदर, मस्त असा प्रतिसाद देणारे, काही केवळ टिका करणारे- फालतू, वाईट इत्यादी शेरे मारणारे, काही कवितेचे विवेचन, रसग्रहण, विस्तार करणारे, काही कवितेकडे निखळ मनोरंजन म्हणून बघणारे तर काही कवितेकडे कुचेष्टेच्या उद्देशाने पाहणारे, काही जण मात्र कवितेकडे, कवीकडे सहानुभूतीच्या दृष्टीकोनातून बघणारे, कवीच्या लेखनातल्या तृटींकडे आपुलकीने पाहून त्यांच्यात सुधारणा व्हावी म्हणून मनापासून झटणारे याही विषयी आम्ही बोललो....

मी मानसशास्त्राची विद्यार्थीनी असल्याने अभ्यासात शिकलेले काही थोडे-फार मुद्दे नकळतपणे माझ्या बोलण्यात उतरले, त्यावरुन दिनेशदांनी मला या विषयावरच लेख लिहायला सांगितला!!! झालं....मी चर्चा वगैरे करायला एका पायावर तयार आहे हो दिनेशदा!!!! पण लेख वगैरे, तो ही कवितेवर आणि कळस म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून लिहायचा, म्हणजे फारच झालं... एकतर माबोवर इतकी ज्ञानी मंडळी आहेत. मी त्यांच्या कवितेवरील समिक्षा, विचार सर्व वाचलंय, तेंव्हा मी लिहिणार तरी काय आणि कसं याचं माझ्या मनावर प्रचंड दडपण आलं...आणि मी हा विषय लिहायचं कायम टाळत आले, ते आजपर्यंत. पण आज...आज नाही टाळू शकले. आज पुन्हा दिनेशदांची आज्ञा आलीच...आणि ती का आली हेही माहितीये...

एका दु:खी मनाच्या एकाकी कवीने एक मोठं पाप केलं...काव्यचौर्याचं!!!!आणि ते उघडकीस आलं. मग पुन्हा सुरु झालं एक चर्चासत्र...त्या चर्चासत्रातच एक मुद्दा पुढे आला- या आणि अशा सर्व निराशाजनक काव्यलेखन करणार्‍यांकडे मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहता येईल का??? आणि मग आलेली दिनेशदांची आज्ञा...तेंव्हा आता 'तशा' दृष्टीकोनातून पाहण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. पहा, आवडतोय का... Happy

*****************************************************************************************************************

"In the desert of the heart Let the healing fountain start."
- W. H. Auden

कवितेच्या माध्यमातून मनात दाटून आलेल्या भावनांचा निचरा होतो, हे मानसशास्त्रीय गृहितक आहे. कवितेतून नुसते एवढेच साधले जात नाही, तर मनातल्या जखमा भरुन काढण्याचे सामर्थ्यही कवितेत असते. त्यामुळे मानसशास्त्रीय उपचारपद्धतीमधे पोएट्री थेरपीला(काव्योपचार-पद्धती) एक वेगळेच स्थान प्राप्त झाले.

थेरपीसाठी येणार्‍या, मनमोकळ्या गप्पा मारु न शकणार्‍या, आपल्या भावना बोलून व्यक्त करु न शकणार्‍या मनोरुग्णांना कविता करायला सांगण्यात येणे किंवा त्यांनी लिहिलेल्या कविता वाचून त्यांच्या मनातले जाणून घेण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या गरजा ओळखून त्यांना योग्य तो सल्ला देणे, त्यांच्या निरोगी, निकोप मानसिक वाढीसाठी योग्य ती दिशा देणे यालाच म्हणतात पोएट्री थेरपी. याविषयी अधिक माहिती गोळा करायला गेले, तेंव्हा फार छान माहिती हाती आली. ती तुम्हा सर्वांसोबत शेअर करायला नक्की आवडेल.

(डिस्क्लेमरः खाली देतेय ती माहिती म्हणजे पोएट्री थेरपी या विषयाशी संबंधित आंतरजालावर सापडलेल्या लेखांचा निव्वळ अनुवाद/ भाषांतर आहे आणि त्या लेखांचे दुवे तळाशी दिले आहेत. )

कविता लेखनाला नेमकी सुरुवात कुठून आणि कशी झाली असावी???
वाचून आश्चर्य वाटेल, पण त्याच्या खुणा अगदी आपल्या आदीमानवाजवळही सापडतील! प्राचीन काळापासूनच अस्तित्वात असलेले होम-हवन हे त्याचेच एक उदाहरण आहे... अति-प्राचीन काळात (म्हणजे इसवीसन पूर्व हजारो वर्षे) इजिप्तमधे कवितेचे शब्द लिहून ते एका पेयात विरघळून रुग्णाला प्यायला दिले तर तो लवकर बरा होतो, अशाप्रकारच्या उपचाराचे दाखले सापडलेले आहेत.

मात्र, पहिल्या काव्योपचारपद्धतीची नोंद मात्र इ.स. पहिल्या शतकात झालेली आहे. रोमन फिजिशियन सोरानसने त्याच्या मेनियाक (सकारात्मक भावनांची अतिशय उच्च पातळी, जसे, अत्यानंद) रुग्णांना शोकांतिका (दु:खी, निराशाजनक) तर डिप्रेसिव्ह रुग्णांना सुखांतिका कविता लिहायला प्रवृत्त केले.

त्यानंतर मात्र अनेक शतके काव्य आणि वैद्यक यांचा मेळ बसवणारे असे काहीच घडले नाही. एकदम १७५१ साली अमेरिकेत बेंजामिन फ्रँकलिन यांनी स्थापन केलेल्या पेन्सिल्व्हेनिया हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी 'साहित्यिक उपचारांची' सुरुवात करण्यात आली. यात रुग्णांना वाचन आणि लेखन करायला सांगून त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यात आले. अमेरिकन सायकियाट्रीचे जनक म्हणून संबोधले जाणारे डॉ. बेंजामिन रश यांनी संगीत-उपचार पद्धतीची जगाला ओळख करुन दिली. मनोरुग्णांना कविता लिहायला सांगून खास त्यांच्यासाठी असलेल्या "द इल्युमिनेटर" या वर्तमानपत्रात त्याला प्रसिद्धी सुद्धा देण्यात येत असे.

त्यानंतर १९६० ते १९७० या या काळात बिब्लिओथेरपी अधिक नावाजली. बिब्लिओथेरपीचा शब्दशः अर्थ म्हणजे वैद्यकीय मदतीसाठी साहित्याचा उपयोग करणे.

नंतर मात्र काव्योपचार पद्धती खर्‍या अर्थाने नावारुपाला आली. "मी नाही, पण कविताच नेणीवेचा शोध घेते" असे मनोविश्लेषक सिग्मण्ड फ्रॉईड म्हणून गेला. त्यानंतर अ‍ॅडलर, युंग, अ‍ॅरिटी, आणि राईकने सुद्धा फ्रॉईडच्या संशोधनावर शिक्कामोर्तब केले. मोरेनोने सायको-पोएट्री, सायको-ड्रामा हे शब्द प्रचलित केले. १९६० साली पोएट्री-थेरपी नावाने एक समविचारी लोकांचा गटही स्थापन झाला. ज्याचा नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात-जसे शिक्षण, पुनर्वसन, ग्रंथशास्त्र, मनोरंजन, आणि सर्जनशील कला यात अधिक चांगला व्यापक असा विस्तार होत गेला.

काव्योपचार संघटनेची स्थापना:
१९२८ सालात अली ग्राईफर या मुळात फार्मासिस्ट आणि व्यवसायाने वकील असणार्‍या कवीने कवितेत मनाच्या जखमा भरुन काढण्याची ताकद असते अशा संदेशाची प्रचारमोहिमच हाती घेतली. ह्या काव्यमोहिमेसाठी त्याने आपले आख्खे आयुष्यच वाहून घेतले. त्याच्याचसारखे नंतर अनेक लोक होऊन गेले. कवितेला दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी, अनेक संस्थांचीही निर्मिती झाली.

नॅशनल असोसिएशन फॉर पोएट्री थेरपीची १९८१ साली स्थापना झाली. ही असोसिएशन चालवत असलेल्या पोएट्री-थेरपीची मुख्य उद्दिष्ट्ये:
१. स्वतःला आणि इतरांना समजून घेण्यातली अचूकता वाढवणे.
२. सर्जनशीलता, व्यक्त होण्यातला सुस्पष्टपणा, आणि आत्म-सन्मान वाढवणे.
३. व्यक्ती-व्यक्तींमधील संवाद आणि सुसंवाद कौशल्ये वाढवणे.
४.नवीन कल्पना, माहिती, प्रचिती यांच्यातून नवीन अर्थ शोधणे आणि
५. बदलांशी जुळवून घेण्यासाठी, ते आत्मसात करण्यासाठी नवीन वातावरण निर्मिती करणे.

या संघटनेची वाटचाल अजूनही चालूच आहे. या संघटनेच्या आणि नॅशनल कोलिशन ऑफ क्रिएटिव्ह आर्टस, थेरपीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च २०१० मध्ये पोर्टलंड येथे "क्रिएटिव्ह आर्ट्स थेरपी विक" साजरा करण्यात आला.

******************************************************************************************************************

पोएट्री थेरपीविषयीची माहिती हा कवितेकडे पाहण्याचा एक निराळा पैलू म्हणून लिहिली आहे. बाकीच्या पैलूंवर आपण सगळे मिळून चर्चा करुया. हा लेख म्हणजे कवितेविषयी चर्चेचे मुक्त व्यासपीठ व्हावे ही मनापासून इच्छा!!!
चला, तर मग माबोकर, आपणही कवितेकडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहूया... माझे या विषयातील मर्यादित ज्ञान आणि चिंतन आणि तुमचा त्यातील अभ्यास याचा मेळ घालून ही चर्चा पुढे नेऊ या Happy

संदर्भः
http://www.poetrytherapy.org/articles/pt.htm
http://www.poetrytherapy.org/government_affairs.htm
http://www.poetryconnection.net/poets/W._H._Auden/18489
http://www.nccata.org/poetry_therapy.htm
http://www.poetrymagic.co.uk/literary-theory/freud.html
http://ecam.oxfordjournals.org/cgi/content/full/2/2/161
http://www.recover-from-grief.com/grief-poem.html
http://www.poetrymagic.co.uk/therapy.html
http://www.spcsb.org/pdfs/resources/a-poetry_as_therapy.pdf

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भाऊ,
स्वातंत्र्यानंतर एक काळ असा होता, कि देवदास हा जणु आदर्श बनला होता, या एकाच कथानकावर हिंदीत तीनतीनदा चित्रपट येऊन गेले. त्यात त्याच्या चांगुलपणाचा अंश असणे, हि अगदी छोटिशीच बाब झाली. (त्याच्या दोन्ही नायिका, त्याच्यापेक्षा मोठ्या मनाच्या होत्या कि.) मग तसा सुधाकरही (एकच प्याला मधला ) चांगला माणूस होता म्हणायचा. पण तिथे त्याला महत्व नसून, दारुचे दुष्परिणाम हाच मुख्य विषय आहे. तसा देवदासचा नाही. पण आपण कवितेबाबतच बोलू या. (तो विषय दारुबाबत असलेल्या शेरोशायरी वरुन निघाला होता.)

मायबोलीवर अचानक कवितांचा सुकाळ सुरु झालाय, म्हणून इथे विषय काढला. बाकि ठिकाणी प्रसिद्ध होणार्‍या सर्वच कविता, कुठे वाचायला मिळतात ? आणि सुंदर चालीचा मुद्दा नव्हताच. उलट स्वरांना बाजूला करावे,असेच मी लिहिले होते. (आणि हे कुणालाही उद्देशून लिहिलेले नाही.)

साजिरा,
कविता करणे हि मानसिक गरज आहे का किंवा कसे हा विषय असला तरी अप्रकाशित कविता कुणाच्या वाचनातच येत नसल्याने, त्यावर चर्चा कशी करणार ? म्हणून इथे प्रसिद्ध झालेल्या कवितांबद्द्ल लिहिले जातेय.
चर्चेच्या ओघात अनेक मुद्दे पुढे येतच आहेत, काय वाईट आहे त्यात ?
मला या मागची प्रेरणा कळत नाही, म्हणून तर कविंना आव्हान केलेय. तेच यावर प्रकाश टाकू शकतील. (आजदेखील कित्येक बिनबुडाच्या कविता इथे झळकल्यात.)
नीरजाने ८० % कवितांबद्द्ल मत मांडलेय, पण तो तिचा विनय आहे. नुसती ओळख असावी असा मुद्दा नसावा, असं मला वाटते. इतर कविंना काय वाटते, ते समजून घ्यायला आवडेल.
कविताच का, इतर साहित्य प्रकार का नाहीत, असे नाही. पण इतर साहित्यप्रकारांच्या तूलनेत, कविता मोप आहेत, एवढेच. पण इतक्या प्रमाणात ती का आहे, हे मला न सुटलेले कोडे आहे.

माझ्यामते शीर्षक किंचित बदलले तर कदाचित 'रिलेव्हंट' चर्चा व्हावी!

'कविता करणे - एक मानसोपचार - काव्योपचार पद्धतीची ओळख'!

किंवा ' कविता रचायला प्रवृत्त करणे'!

उल्हास भिडे यांची पोस्ट पटली. (ते ही कविता लिहितात म्हणून असेल कदाचित)

इथे चर्चेत असणारे एक दोन अपवाद सोडले तर.... जे कविता वाचत सुद्धा नाहीत (कळणं आणि लिहिणं म्हणत नाहिये) त्यांची कविता करण्याच्या /लिहिण्याच्या मागे काय विचार असेल; यावर चालू असलेल्या सगळ्याच चर्चेची गम्मत वाटली Happy

(:दिवा:)
मायबोलीवर आलेल्या कवितांच्या सुकाळाच्या बाबतीच बोलायच झालं तर, अचानक एवढा चांगला प्लॅटफॉर्म मिळाल्यावर कोणाही लिहिणा-याला आपलं साहित्य इथे लिहावस वाटणारचं...चांगल नसेल आवडणारं नसेल आणि रिस्पॉन्स मिळत नाहिये म्हटल की बसतात गप. एवढं मानसोपचारापर्यंत माबो.ला नाही जावं लागणार हो. (:दिवा:)
आणि माबोकरांना असल्या भरतीची चांगलीच सवय झाली आहे. Proud

सानी, पहिल्याच पॅरामधला तुमचा प्रांजळपणा आवडला.
बाकी चर्चा चालू द्या Happy

बेफिकीरजी Happy शीर्षकात बदल केलेला आहे...
शाल्मली, धन्यवाद Happy
मी दोन दिवस येथे येऊ आणि प्रतिसाद देऊ शकत नाही...हे पोस्ट सुद्धा घाईघाईत लिहित आहे. सर्व प्रतिसाद वाचलेही नाहीत...
परत आल्यावर वाचून जमेल तशी उत्तरे देते... Happy

दिनेशदा,
एका उमद्या व मनस्वी तरुणाचं आयुष्य केवळ एका चूकीमुळे कसं उध्वस्त होऊं शकतं, याच्या प्रभावी चित्रीकरणामुळेच देवदास लोकप्रिय झाला, ही माझी धारणा खूप विचार करूनही मी नाही बदलूं शकत.
याला प्रामणिक मतभेद म्हणायचं कीं उगीचचचा अट्टाहास, ते मलाच कळत नाही !
"कविता करणं : मानसिक गरज " या बाबतीत मला काय वाटतं ते मी स्पष्टपणे लिहायचा प्रयत्न केला. चर्चेतून इतर दॄष्टीकोन व विषयाचे कांगोरे समजले. विचाराला चालन मिळाली. मायबोलीवरच्याच कवितांबाबत म्हणायचं तर त्यापैकी जमेल तसं मी अगत्याने वाचतो. बर्‍याच "ठीक" या सदरात मोडणार्‍या असतात [यांतच माझ्याही अधुन-मधून दिलेल्या कविता असतात, अशी आपली माझी भोळी समजूत !]. पण कांही तर मला खूपच भावतात. तसं मी प्रतिसादात उत्स्फुर्तपणे कळवतोही. व्यासपीठ मिळालं म्हणून सुचेल ते घाईघाईने त्यावर टाकत जावं, हे बरोबर नाही; पण ती वृत्ती हा मायबोलीकरांचा स्थायीभाव नसावा, असं वाटतं.
खुल्या चर्चेसाठी लागणारा मनाचा खुलेपणा म्हणजे काय, हेही सानिजींमुळे पक्कं कळलं, हाही इथला मोठा फायदा.
बदललेल्या विषयात तर मला कांहीच गम्य नसल्याने, आतां नस्ती लुडबूड करायलाही वाव नाही !

कविता करणे एक मानसोपचार आणि कविता करणे एक मानसिक गरज या दोन वेगळ्या गोष्टी वाटतात. चित्र काढून घेण्याचा सुद्धा उपयोग मानसोपचारासाठी तसेच मुलांच्या मनात काय चाललेय याचा थांग घ्यायला केल्याचेही वाचले आहे.
कवितेचे (कवीचे नव्हे) मानसशास्त्रीय दृष्टिकोणातून विष्लेषण हा आणखी एक पैलू जो पहिल्या प्रकारात जसा लागू होतो, तसाच मानसोपचाराचा भाग नाही अशा कवितांना पण ह्वावा.
अलीकडे डॉ. राजेंद्र बर्वे यांचा संवाद ऐकला...त्यात त्यांनी बालकवींच्या 'गर्द सभोती रान साजणी, आनंदी आनंद गडे' या कवितांचे मानसशास्त्राच्या पैलूने विश्लेषण केले होते.

भारतात पहिले काव्य दु:ख्खातून निर्माण झाल्याचे उदाहरण म्हणजे क्रौंचवधानंतर वाल्मिकी ऋषिनी रचलेले
मा निषाद प्रतिष्ठाम त्वमधमः शाश्वती समगमः
यत्क्रौंचमिथुनादेकमवती: काममोहितम.
यामुळेच वाल्मिकी ऋषिना आद्यकवि असे संबोधले जाते.
तसेच काव्याचा व दु:ख्खाचा संबंध कविवर्य मंगेश पाडगावकर यांनीही
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती असे म्हणून दाखवला आहे.

:

बराच गोंधळ दिसतोय. (कि माझ्या डोक्यात झालाय)
पण विषयाचा आवाका इतका वाढलाय कि काहीच निटसं स्प्ष्ट होत नाहीये.
सानी, तुझं कौतूक छान भुमिका निभावतेयस. Happy

<<पोएट्री थेरपीविषयीची माहिती हा कवितेकडे पाहण्याचा एक निराळा पैलू म्हणून लिहिली आहे. बाकीच्या पैलूंवर आपण सगळे मिळून चर्चा करुया. हा लेख म्हणजे कवितेविषयी चर्चेचे मुक्त व्यासपीठ व्हावे ही मनापासून इच्छा>>

याला अनुसरून सुप्त मनातून आलेली कविता आणि जागृत मनाने लिहिलेली कविता याबद्दल वाचायला आवडेल. (काही) कवी कविता लिहीत नाहीत, त्यांना कविता स्फुरते, त्यांच्याकडून लिहून घेते. स्वप्नवत अशी ती अवस्था, जेव्हा कवीचे सुप्त मन काही क्षण अधिराज्य करीत असते. त्या अवस्थेतून बाहेर आल्यावर जागृत मन त्या रचनेकडे पाहते आणि तिचे अर्थ लावायचा प्रयत्न करते.....असे होत असावे(का?)
गदिमांनी गीत रामायण हे मुद्दाम/ठरवून लिहिले, त्यातला विषय/आशय त्यांच्या निवडीचा, त्यांच्या स्फुर्तीतून आलेला नव्हता....तरी पण ते गीत रामायणाबद्दल म्हणाले की कोण्या अज्ञात शक्तीने हे माझ्याकडून लिहून घेतले. तो आशय मनात झिरपून गेल्यावर त्यांच्या सुप्त मनाने त्याला साज चढवला.
बा.भ. बोरकरही एका संस्कृत काव्याचा अनुवाद करत असताना, एका श्लोकाशी अडले. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत त्या श्लोकाचा अनुवाद त्यांना स्वप्नात लिहिलेला दिसला.
कविता वाचून यात सुप्त आणि जागृत मनाचा वाटा किती ते ओळखता येते का? या दोन्हीतल्या फरकालाच कला आणि कारागिरी म्हणता येईल का?

<<मला या मागची प्रेरणा कळत नाही, म्हणून तर कविंना आव्हान केलेय. तेच यावर प्रकाश टाकू शकतील. (आजदेखील कित्येक बिनबुडाच्या कविता इथे झळकल्यात.)
नीरजाने ८० % कवितांबद्द्ल मत मांडलेय, पण तो तिचा विनय आहे. नुसती ओळख असावी असा मुद्दा नसावा, असं मला वाटते. इतर कविंना काय वाटते, ते समजून घ्यायला आवडेल.
>>
..
मी कविता का लिहितो? उत्तर अवघड आहे. पण थोडक्यात असे म्हणता येईल की,

प्रत्येकाची विचारशैली वेगळी असते,तशीच माझीही आहे. मला जे वाटायचं त्याचं प्रतिबिंब मला उपलब्ध साहित्यातून फारसं आढळलं नाही. जे उपलब्ध असायचं त्यात फारसं मनं रमायचं नाही. मला वाटते तशी, मी अनुभवलेली अनुभूती व्यक्त व्हायलाच हवी, कदाचित या अभिलाषेपोटीच मी लेखनाकडे वळलो असावा.

थोड्या शब्दात अपार आशय व्यक्त करण्याची अचाट ताकद केवळ कवितेत असते म्हणुन कदाचित मी "कविता" हेच माध्यम निवडले असावे.

कविता ही "अंतरात्म्याची साद असते" यापेक्षा "आपण कणाकणाने जे काही ज्ञान मिळवून अंतकरणात साठवत असतो, त्याचेच सादरीकरण म्हणजे कविता असते", यावर माझा अधिक विश्वास आहे.

कुठलीच कविता अनाकलनिय असू शकत नाही. वाचकांना,रसिकांना,समिक्षकांना एकवेळ अर्थ नाही लागले तरी चालतील,पण स्वतः कविला मात्र आकलन/उलगडा व्हायलाच हवा. समजा मला एक कविता स्फुरली..

शंभर उंदराची पिले फस्त करून
आकाशात विहंगणार्‍या शेळीच्या कस्तुरीला
नसते कशाचेच सोयरसुतक
कारण शेवटी असामान्यही असतात
संमोहन उत्पिडणाचे हस्तक.

या माझ्या कवितेचा अर्थ मलाच लागत नाही.
ज्याचा अर्थ कवीसहीत कुणालाच लागणार नसेल तर ती कविता असूच शकत नाही.

कविता गुढ असू शकेल पण किमान कवीला तरी उकल व्हायलाच हवी.
उदा. ती स्वप्नसुंदरी या गझलेचा मतला

सात खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी
शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी

यात "सात खिडक्या" हे थोडे गुढ आहे. त्यावर श्री चित्तरंजन भट यांनी
त्यांच्या प्रतिसादात "सात खिडक्या कुठल्या?" असा प्रश्न केला.
आणि त्यावर मी "नऊ पैकी सात." (मानवी देहाच्या)
(किमान दोन खिडक्या उघड्या ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर माणुस गुदमरून मरून जायचा)
असा खुलासा केला.

"कवितेने प्रश्न विचारावेत; पण तिने तिने फार कोडी घालू नये वा फार द्राविडी प्राणायम घालायलाही लावू नये.
रचनेत स्वच्छपणा, सफाईदारपणा असणे चांगलेच." हे त्यावर श्री चित्तरंजन भट यांचे मत.

अधिक माहीती येथे वाचावी. माझी भुमिका

फार काही झेपलं नाही कारण कविता हा माझा प्रांत नाही.
पण व्यक्तिगत पातळीवर येउन न भरकटलेली चर्चा बर्‍याच दिवसांनी दिसतेय.. बरं वाटतयं.:)

चालु द्या.

या माझ्या कवितेचा अर्थ मलाच लागत नाही.
ज्याचा अर्थ कवीसहीत कुणालाच लागणार नसेल तर ती कविता असूच शकत नाही. <<
एका कवितेला एकच अर्थ असतो हेच मुळात पटण्यासारखे नाही. वाचणार्‍याच्या स्वभावापासून, तत्कालिन मनस्थिती पर्यंत सर्व गोष्टी अर्थांच्या शक्यता बदलत नेतात. कविता आस्वादताना एकास एक अर्थ/ आडाख्यापेक्षा अनुभवाला/ अनुभूतीला शरण जाणे महत्वाचे. एकास एक अर्थ लावायला जाणं हे अनुभवाला खीळ घालतं.
दुर्दैवाने आपल्या शालेय शिक्षणातच कवितेचा ठोकळेबाज अर्थ लिहून काढायची सवय लावून आपल्याला कधी कुठल्या कवितेचा अनुभव घ्यायला शिकवलंच नाहीये.
कवीसहित कुणालाच अर्थ न लागणारी कविता म्हणजे काय? कविने एक अनुभव, एक मानसिक स्थिती त्याच्यापद्धतीने मांडलेली असते ती अर्थ नावाच्या चौकटीत मांडता येण्यासारखी असती तर त्याने निबंध लिहिला असता. कविता कशाला लिहीली असती? कवीला अर्थ लागत नाही त्याने लिहिलेल्या कवितेचा हे गृहितक कशातून मांडले जाते? म्हणजे तुम्ही स्वतःच चार ओळी लिहून त्या उदाहरण म्हणून ठेवल्यात तुमच्या मताच्या पुष्ट्यर्थ हे कळले. पण त्यापलिकडे जाऊन अशी एखादी रचना तुम्ही खात्रीलायकरित्या सांगू शकता का कि कवीला आपण काय लिहिलेय याचा अर्थ लागत नाहीये?

आणि अमुक म्हणजे कविता आणि अमुक म्हणजे नाहीच हे आपण कशावरून ठरवू शकतो?

बाकी चित्तरंजन भट यांचे मत पटले नाही.

<< एका कवितेला एकच अर्थ असतो हेच मुळात पटण्यासारखे नाही. वाचणार्‍याच्या स्वभावापासून, तत्कालिन मनस्थिती पर्यंत सर्व गोष्टी अर्थांच्या शक्यता बदलत नेतात. कविता आस्वादताना एकास एक अर्थ/ आडाख्यापेक्षा अनुभवाला/ अनुभूतीला शरण जाणे महत्वाचे. एकास एक अर्थ लावायला जाणं हे अनुभवाला खीळ घालतं.
दुर्दैवाने आपल्या शालेय शिक्षणातच कवितेचा ठोकळेबाज अर्थ लिहून काढायची सवय लावून आपल्याला कधी कुठल्या कवितेचा अनुभव घ्यायला शिकवलंच नाहीये.>>

सहमत.

<<कवीसहित कुणालाच अर्थ न लागणारी कविता म्हणजे काय?>>

ज्या कवितेचा कवीसहीत कुणालाच, कुठलाच, काहीही,कसलाच, कोणत्याही दृष्टिकोनातून अजिबात अर्थच लागत नाही, असे मला म्हणायचे.

(माझ्या वरील कवितेचा अर्थ कुणितरी लावू शकेल? Happy माझ्या मते नाहीच कारण त्यात काहीही अर्थ नाहीच. )

ज्या कवितेचा कवीसहीत कुणालाच, कुठलाच, काहीही,कसलाच, कोणत्याही दृष्टिकोनातून अजिबात अर्थच लागत नाही,>>>>
अशी कविता आजवर माझ्या वाचनात आलेली नाहीये, उदाहरण असल्यास द्यावे, तेव्हढेच ज्ञानात भर माझ्या.

माझ्या वरील कवितेचा अर्थ कुणितरी लावू शकेल? माझ्या मते नाहीच कारण त्यात काहीही अर्थ नाहीच.>>
एकिकडे म्हणताय काहीही अर्थ नाही, तर दुसरिकडे माझी कविता? हा काय प्रकार? त्याला काहीच अर्थ नसेल तर त्यास कविता वा इतर काही म्हणणे चुकिचे आहे असे नाही वाटत?
मलातर बेसिकच चुकतंय असं वाटतंय.
(पुन्हा कविता म्हणजे काय? या मुद्द्यावर गाडी येतेय? सानी, काही चुकत असल्यास सांग, पोस्ट संपादित करेन)

सुत्रधार "टाईम प्लीज" घेऊन दोन दिवसांच्या सुट्टीवर आहे.... Lol उद्या रुजू झाल्यावर आपली भुमिका चोख बजावेलच..... पण तरीही चर्चा वैयक्तिक पातळीवर न उतरता खरेच रंजक चाललीये...

मला वाटते, या काव्यमंथनातून जे काही निष्कर्ष येतील ते इथल्या सर्वांनाच हवेसे आहेत. कुठेतरी स्वतःची भुमिका तपासता येईल...... आणि पडणारे प्रश्न थोड्याफार प्रमाणात सुटतील..... म्हणून इथे एकुणच सामंजस्य दिसून येतेय....... (आता थांबतो, नाहीतर आपलीच नजर लागायची.... :स्मित:)

नीधप ला अनुमोदक.

इतर साहित्य प्रकारातून व्यक्त व्हायला जस्त कष्ट पडतात. त्या तुलनेत कवितेतून व्यक्त होणे सोपे असा गैरसमज आहे. त्यामुळे बर्याच वेळा कवितेची पायरी पहिल्यांदा चढली जाते. त्यामुळे इतर साहित्याच्या तुलनेत कविता भारंभार दिसतात असे वाटते. ह्या यमकी, सोप्या कवितेतुन सुरु होणारा प्रवास कुठे घेउन जाइल हे जो हा सहित्यप्रकार हाताळतो त्याच्या वकुबावर अवलंबून असते.

प्रेमावर, प्रेयसीवर तुझ्या तिच्या बद्दलच्या कविता जास्त वाचायला मिळतात कारण ज्या वयात (टीन एजेस) साधारणता व्यक्त होणे ही गरज असते. स्वतःची ओळख व्यायला लागलेली असते त्या वयात हे विषय जासत जवळचे असतात. अशा वयातील कविता ह्याच विषयाभोवती घुटमळतात. ह्याच विषयावरील कविता वयाची पाने उलटल्यावर जास्त प्रगल्भ झालेल्या दिसतात हा एक भाग. दुसरे हे विषय हातळण्यास एका पातळीवर सोपे असते त्यामुळे जेंव्हा कविता "करण्याची' सुरवात होते तेंव्हा असे सोपे विषय आणि कवितेचा सोपा लयबंध (यमक, बोलगाणी, चारोळ्या) वापरले जाणे सहाजीक आहे असे वाटते.

माझ्या मते कविता ही प्रामुख्याने खालील दोन घटकांची बनलेलि असते

१) भावबंध म्हणाजे व्यक्त होणार्या भावना पुर्ण कवितेत कशा चितारल्या/आकारल्या/साकारल्या/बांधल्या गेल्या आहेत हे. ह्यात योजलेल्या व वगळलेल्या उपमा, प्रतिमा, प्रतिके, निदर्शने ह्यांचा समावेश होतो.

२) लयबंध म्हणजे कोणत्या छंदाचा/ वृत्ताचा इ. वापर केला आहे.

हे दोन्ही मिळून कवितेचा आकृतीबंध तयार होतो. हा आकृतीबंध किती सशक्त झाला आहे हे निरपेक्षपणे ठरवणे सोपे नाही खरेतर शक्यच नाही (पण म्हणुन प्रयत्न करू नये असेही नाही). अगदिच बेक्कार उदाहरण द्यायचे झाले तर असे म्हणता येइल कोणाला एक बिअरही चढते तर कोणाला एक ब्लॅक लेबलही कमी पडते :-). अकृतीबंधाचा कविता रसिकावर होणारा परिणाम हा त्या वाचकाच्या कुवतीवर अवलंबुन असतो. त्यामुळे "जरा जादा तिखा" अशी ऑर्डर सरसकट देण्यापेक्षा आपल्या चविचा कवी शोधावा Happy

सगळ्याप्रकारच्या लोकांना आवडेल ती कविता उत्तम असा सुर क्वचीत ऐकायला मिळतो. पण मला मात्र तसे वाटत नाही. फारतर सामायिक जाणिवांच्या संदर्भातील ते (काव्य) प्रभावी व उत्तम असु शकते पण सर्व जाणिव विश्वातील उत्त्म असु शकत नाही (तसे ठरवता येतही नाही). त्यामुळे अमुक इतक्या लोकाना कविता आवडली म्हणुन ही कविता चांगली आनी कोणाला आवडली नाही म्हणुन कवीता वाइट इतके सोपे कवितेचे मुल्यमापन ठरत नाही असे वाटते.

कविता कुठल्या करणासाठी लिहीली गेली आहे. ह्याला महत्व आहेच. स्वांत्सुखाय लिहिलेल काव्य वेगळ, भावनाशी प्रामाणिक पणे लिहिलेल काव्य वेगळ, मैफीलीच काव्य वेगळ. कवितेच्या उद्देशावर तीच यश अपयश ठरवण्याचे मापक बदलतात. तीचे रसिका पर्यंत पोचणे महत्वाचे अथवा नाही हे ठरते. सरसकट सगळ्या काव्याला एकाच तराजूत तोलणे म्हणुनच शक्य नाहि व योग्य नाही असे वाटते.

वरच्या चर्चेत स्वांत्सुखाय कवी मग कविता प्रकाशीत तरी का करतो? असा प्रष्ण उपस्थीत केला गेला. मला वाटते ह्याला उत्तर देणे अवगढ आहे. मी स्वतः ह्या वर्गवारीत स्वतःची मोजणी करत असल्याने ह्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. कविता हा अकृतीबंध मनाच्या एका उन्मानी अवस्थेत निर्माण होतो. आणि अशा आकृतीबंधात कोणत्याही मनास एका जाणिवेपासुन दुसर्या जाणिवेपर्यंत घेऊन जाण्याची ताकत असते. कविता प्रकाशीत करण्यामागे हा एकमेव उद्देश असतो. तयार झालेला आकृतीबंध वापरून कविता वाचणार्याला त्याच्या एका जाणिवे पासुन एखाद्या वेगळ्या जाणिवेपर्यंत जाता आले अथवा त्याच जाणिवेच्या वेगळ्या पैलुचे दर्शन झाले अथवा तीच जाणिव नव्याने अनुभवास आली तर ते मी त्या आकृतीबंधाचे यश समजतो. अर्थात ज्या मनोवस्थेतून तो अकृतीबंध तयार झाला त्याच मनोवस्थेत वाचक पोचला पाहिजे हा अट्टाहास वा अपेक्षा चुकीची आहे. पण त्या कविच्या मनोवस्थेची उर्जा त्या आकृतीबंधतात उतरली असेल तर असा जाणिवांचा प्रवास वाचकाला जरूर अनुभवायला मिळतोच असा माझा अनुभव आहे. एक वाचक म्हणुन अशा जाणिवांचा प्रवास घडवणार्या आकृतीबंधाचा शोध ही अपोआप एक गरज होउन जाते असे वाटते. ह्या संदर्भाने रुढार्थाने काव्य कळणे वा नकळणे ह्याला काहीच अर्थ उरत नाही असे वाटते.

छंदोबद्ध (मुक्तछंद सोडुन) काव्य हेच काव्य असे वरच्या चर्चेत वाचनात आले. हा विचार संकुचीत वाटतो. प्रत्येक काव्यप्रकाराची शक्तीस्थाने आणी दुबळे-दुवे आहेत. एकंदरीतच योग्य काव्य-प्रकाराचा उपयोग सशक्त आकृतीबंध निर्माण होण्यात मह्त्वाचा असतो. जाता जाता, खरा कवी असे वर्णवर्चस्वी विचार जोपासत नाही Happy (दिवे)

याला अनुसरून सुप्त मनातून आलेली कविता आणि जागृत मनाने लिहिलेली कविता याबद्दल वाचायला आवडेल>>
ह्या विषयावर भरत मयेकरांशी मी सहमत आहे. कविता हा कवीचा त्यावेळच्या मानसिक अवस्थेतीतल परफोर्मन्स असतो. जागृत पणे (इंटेंशनली) व सुप्तपणे (अन-इंटेंशली) आयुश्याच्या, एखाद्या विषयाच्या चींतनाचा, सभोवार घडणार्या घटनांचा, पाहिलेल्या प्रतिमांचा वापर होत हा परफोर्मन्स घडतो. ह्यावेळेस निर्माण होणार्या अनुबंधावर कधी कवी जागृत्पणे नियंत्रण ठेउ शकतो कधी नाही. जागृत व सुप्त अशा दोन्ही अवस्थांच्या संयोगाच्या ह्या वेळेस त्याचा (कविचा) जागृत पणे केलेला रियाज /अभ्यास जितका महत्वाचा तितकाच त्यालाही अवगत नसलेला व नियंत्रण नसलेल्या सुप्त मनाचा लवचिक पणा मह्त्वाचा असतॉ. सुप्त मनाच्या ह्या लवचिकतेला प्रतिभा असेही म्हणता येईल. त्यामुळे कवीता लिहुन झाल्यावर जेंव्हा कवी पुन्हा केवळ जागृत ह्या अवस्थेतुन कवितेकडे बघतो तेंव्हा त्या कवितेतील प्रत्येक संदर्भ तो कुठुन आला व का आला हे सांगू शकेल ह्याची खात्री नसते. ह्या बाबतीत बरेचवेळा 'अरे हे मी काय लिहून गेलो' अशी अवस्था (चांगल्या व वाइट दोन्ही दृष्टीने ) होउ शकते.

ह्या सुप्त व जागृत अवस्थेतीत संयोगाचे काहि क्षण हेच खरे कवीचे सर्वात मोठे परितोषिक असते असे माझे मत आहे. त्या अवस्थेत पुन्हा पुन्हा जाता येणे ही कविता करण्यामागची एकमेव ओढ असते / असावी.

ता.क.
१) शु.ले.च्या.चु.ब.दि.
२) कवि हा पुल्लीगी शब्द वापरला आहे पण ह्या खरडीत तो लिंगनिरपेक्ष अपेक्षीत आहे.

नी उत्तम पोस्ट.

पेशवा हे वरील पोस्ट संग्रही पाहिजे. दंड्वत. तीन चारदा वाचावे तेव्हा पूर्णपणे कळेल.

जागृत व सुप्त अशा दोन्ही अवस्थांच्या संयोगाच्या ह्या वेळेस त्याचा (कविचा) जागृत पणे केलेला रियाज /अभ्यास जितका महत्वाचा तितकाच त्यालाही अवगत नसलेला व नियंत्रण नसलेल्या सुप्त मनाचा लवचिक पणा मह्त्वाचा असतॉ. सुप्त मनाच्या ह्या लवचिकतेला प्रतिभा असेही म्हणता येईल

पेशवा, किती नेमक्या शब्दात सांगितलंत!

एक वाचक म्हणुन अशा जाणिवांचा प्रवास घडवणार्या आकृतीबंधाचा शोध ही अपोआप एक गरज होउन जाते असे वाटते. ह्या संदर्भाने रुढार्थाने काव्य कळणे वा नकळणे ह्याला काहीच अर्थ उरत नाही असे वाटते.

एवढे वाक्य सोडून बाकी पोस्टला अनुमोदन.
कारण काव्य कळल्याशिवाय जाणिवांचा प्रवास वाचकाला आनंद देऊच शकणार नाही. जर काव्य आनंदाची अनुभूती देत असेल तर ते काव्य त्याला कळले असेच म्हणावे लागेल. (जरी त्याला ते स्पष्टीकरण करून सांगता येत नसेल तरीही)

पेशव्या,
मस्त!

>>कारण काव्य कळल्याशिवाय जाणिवांचा प्रवास वाचकाला आनंद देऊच शकणार नाही. जर काव्य आनंदाची अनुभूती देत असेल तर ते काव्य त्याला कळले असेच म्हणावे लागेल.
अनुमोदन..

अजूनही खोलात शीरायचे तर वाचकाच्या भूमिकेतून काव्य वाचल्यावर पहिले शब्दार्थ, कवितेचा अर्थ ऊगम का अनुभूती हा ज्याच्या त्याच्या जडण घडणीचा भाग आहे. वाचकाला ही पूर्वपिठीका असतेच हे विसरून चालणार नाही.
तरीही काही काविता अशा असतात ज्या जाणिवेच्या मार्गाने थेट भिडतात अन मग एकदा त्या मुक्कामी पोचल्यावर तिथपर्यंत पोचायला शब्दाचा कसा ऊपयोग झाला- थोडक्यात कवितेचा अर्थ लावणे- असा ऊलटा प्रवासही होवू शकतो. (कविवर्य ग्रेस यांच्या बहुतांशी कविता वाचताना असे होते. कविता भिडली पण अर्थ अजूनही ऊमगत नाही अशी काहिशी अवस्था!) तर त्याच कवितेतील अर्थाला अनुसरून एखादा वाचक वेगळ्या मुक्कामी जावून पोचू शकतो- तीच जाणीव कवीच्या मनातील आहे/होती का वगैरे ला त्या ठिकाणी विशेष अर्थ ऊरत नाही. जर वाचक आणि कवी यांच्या जाणीवेचे मुक्कामस्थळ एकच असेल (जो दुर्मिळ योगायोग आहे) तर ते काव्य दोघांनाही सारखाच आनंद देवू शकते. पण एकंदर ही संपूर्ण प्रक्रीया वाचकसापेक्ष आहे.
पेशवा म्हणतो तसे, रीयाज अन अभ्यास वाचकानेही केला तर तेच काव्य वाचकाला वेगळी अनुभूती देवू शकते किंव्वा निव्वळ शब्दार्थापलिकडे जावून त्यातील गाभा ऊकलण्याचे काम वाचक करू शकतो.
"शब्दावाचून कळले सारे शदांच्या पलिकडले" ?

एक कवी म्हणून कविता लिहीताना किंवा कुठलेही गीत लिहीताना, नेमका ऊद्देश काय हे आधी जागरूकपणे ठरवले जाते, त्या मागची प्रेरणा, कारण हे मात्र त्याआधी अनेक काळ मनात सूप्त अवस्थेत असू शकते. तर कधी कधी सहज स्फुरलेले काव्य spontaneous expression हे असा कुठलाही विशेष ऊद्देश डोळ्यापुढे न ठेवता फक्त आलेला अनुभव वा जाणिवा व्यक्त करण्यावर अधिक भर देते. पाऊस पडत असताना पावसावर केलेले काव्य, अन पाऊस पडून गेल्यावर मुद्दामून ठरवून पावसावर केलेले काव्य यात नेमका हाच फरक असावा. पहिल्या काव्यात अनुभव प्रकटीकरण असेल तर दुसर्‍या काव्यात अनुभव प्रस्तारण असेल. या ऊलट प्रेमभंग किंव्वा एखादा टोकाचा वैयक्तीक कटू अनुभव हा ठरवून कवितेतून व्यक्त करणे शक्य नसते. बहुतांशी त्या अनुभवातून मनाची घुसमट होत असताना त्याला एक मोकळी वाट करू देण्याच्या वैफल्यग्रस्त स्थितीपर्यंत कवी पोचतो तेव्हा आपसूक शब्द कागदावर ऊतरतात- याला मानस्शास्त्रीय गरज असेही म्हणता येईल. पण कवीच्या दृष्टीकोनातून त्या वेळी ईतर कुठलाही ऊद्देश वा निर्मिती चा भाव डोळ्यासमोर नसतो, असते ती निव्वळ मानवी गरज- आपल्या भावना व्यक्त करण्याची. अर्थात अशा कविताही प्रकाशीत होतातच असेही नाही. कारण गरज ही निव्वळ व्यक्त करण्याच्या मुक्कामी येवून संपते. माझ्या दुख्खात चार जणांनी सहभागी व्हावे हा विचार नंतर येत असावा अन मग त्या अनुशंगाने अशा कविता प्रकाशीत होतात.

जशी व्यक्त करण्याची गरज अन तीव्रता असेल तसाच रचनाबंध निवडला जाईल. अन त्यापूढे जावून कशा प्रकारच्या व्यासपीठावर ते काव्य व्यक्त करायचे आहे (खाजगी मैफल, सार्वजनिक वाचन, व्यावसायीक गीत, काव्य संमेलन, ई.) त्या नुसार त्या रचनाबंधाला चांगले घडवून, पोषवून, सादर करावे लागेल, किंवा तसे केले जावे. अशी काव्यजोपासना केले कवी अन काव्यच जनमानसात दीर्घकाळ टिकून राहते.

मला वाटतं कुठलिही कलानिर्मिती ही एखादी घटना/कारण्/प्रेरणा यातून जन्माला आल्यावर पुढे त्यावरील विचारमंथन-व्यक्त करण्याची गरज-कृती-समारोप या प्रक्रीयेतून जाते. ईथे कवीतेच्या बाबतीत बोलायचं तर सूप्त/जागरूक ऊद्देश- लिखाण- प्रकाशन्-प्रतीक्रीया या चक्रातून कविता जाते.
कधी स्वताच, स्वताच्या कवितेचे प्रेक्षक, वाचक, श्रोते होवून पहा- या चक्राच्या प्रत्त्येक थांब्यावर दर वेळी काहीतरी नविन गवसल्याचा आनंद मिळू शकतो.

बाकी जितके कवितेत शद जास्त तितके वेगवेगळे अर्थ निघायला वाव आहे. पण आशय मात्र त्याच्या जागी भक्कम हवा कारण कवितेचा तो पाया आहे. तोच ठीसूळ असेल तर कितीही अलंकारीक शब्दरचना केली तरी रंगीत बुडबुड्यापेक्षा त्या कवितेचे अस्तित्व अन महत्व काही वेगळे नसते. अन बुडबुडे मोहक रंगीत भासले म्हणून वाह वाह, छान छान अशा प्रतिक्रीया आल्या तरी शेवटी हवेत तरंगायचे की खोलात शिरायचे हे ज्याचे त्याने (कवी अन वाचक) ठरवायचे.

कवी म्हणून हे लक्षात ठेवायला हवे की खोलात शिरायच्या प्रवासात सहप्रवासी कमी असतील.हे जेव्हा कवी म्हणून आपण स्विकारतो तेव्हा कवी अन कविता प्रगल्भ होत असतात अन मग स्वतासाठी वा दुसर्‍यासाठी काव्य प्रकाशीत करायची व्यावहारीक गरज आपसूक कमी होते. ऊरते ती फक्त त्या प्रवासाची ओढ.

मी स्वता:ला मोठा कवी वगैरे अजीबात समजत नाही शिवाय बर्‍याच गोष्टी गृहीत धरून हे लिहीले आहे- तेव्हा चू.भू.दे.घे.

कवीला अर्थ लागत नाही त्याने लिहिलेल्या कवितेचा हे गृहितक कशातून मांडले जाते?
---------------------------------------------------------------------
अगदी अगदी!

अनिताताई यानी टाकलेल्या पोस्ट मधे लिहिलेल्या कवयित्रीला तिने स्वतः लिहिलेल्या कवितेचा अर्थ माहित नसेल हे मुळीच पटत नाही. त्यावर "भुंगा" यानी लिहिलेली शक्यता जास्त वाटते. तिला कदाचित त्यांच्याशी त्याबाबत चर्चा करायची नसेल.

नीधप, पेशवा आणि योग यांच्या पोस्ट्स/विचार अतिशय छान. कृपया अशीच चर्चा सुरु राहु दे.

वरती मी किंवा जयाने कळणं हा मुद्दा घेतलाय ते कळणं हे अतिशय ठोकळेबाज आणि एकास एक या पद्धतीने अर्थ लावण्यासंदर्भात आहे. अनुभूतीतून उमजलेला/ पोचलेला अर्थ हा अतिशय वैयक्तिक स्वरूपाचा असू शकतो आणि त्यामुळेच एकमेव (युनिक या अर्थी). आणि दुसर्‍या कोणाला पोचलेला अर्थ हा अजून वेगळा असतो. या उमजण्याला कळणं चर्चेच्या सोयीसाठी तरी किमान म्हणूया नको. नाहीतर अजून गोंधळ होतील.

अरे वा, अजूनही चर्चा चालू आहे का इथली, छान वाटले.
प्रत्यक्ष कविता करणारी माणसेच इथे चर्चा करताहेत, ते वाचून तर आणखीनच छान वाटले.
थोडासा वेगळा प्रश्न, थेट नीधपला (कारण प्रांजळ उत्तर मिळेल अशी खात्री आहे)
नीरजाला एक कलाकार म्हणून बरीच वर्षे ओळखतो. त्या त्या कलाप्रांतातील तिचे कार्य कधी प्रत्यक्ष पाहिलेय, तर कधी त्याबद्दल वाचलेय. असे असतानाही, तिला कविता करणारी म्हणून ओळख असावी असे का वाटते ?
तिच्या इतर प्रांतातील कलानिर्मितीची (ती कदाचित जास्त मानसिक कष्टाची असेल) आणि एक कविता लेखन, यांची तूलना ती करु शकेल का ? कवितालेखनातून जास्त आनंद मिळतो ? का ति स्वांतसुखाय केलेली असते, म्हणून तिचे एक वेगळेच मानसिक समाधान आहे ?

कविता वाचुन वाटायचे की या कवींना कोणत्या तरी थेरपी ची गरज आहे
आता कळले की ते स्वतः च्याच थेरपी मधे उपचार घेत असतात.

आजकाल माबो वर फार कवीता यायला लागल्यात हे काही सुचवत तर नाही ना ?

@avdhut तुमचा sense of humour खुपच वाखाणण्याजोगा आहे. तुमचे हे पोस्ट वाचुन माझी हि अशी अवस्था झाली Rofl

ह्या बाफवर खुपच रोचक आणि अतिशय balanced, विषयाला धरुन चर्चा चाललेली आहे. मी नक्कीच ह्यांवर माझी पोस्ट टाकेन, पण तुर्तास तेव्हडा शांत आणि निवांत वेळ नाही. Happy

इतर कला आणि कविता लेखन याचा संबंध या संदर्भात नाही नक्कीच.
लोकांच्या प्रतिक्रियांमुळे हुरळून जाणं आणि लिहीत रहाणं इतकंच आहे हे.

Pages