एक प्रेमकथा... (भाग १ला)

Submitted by पल्ली on 6 November, 2008 - 08:22

ऑफीसमध्ये नित्याची कामं चालु होती. कुणी कुणी उगीचच गूड मॉर्निंग वगैरे बोलुन खोटं खोटं हसत होते, मी ही अगदी ठरलेल्या प्रॉग्रॅम सारखं मॉर्निंग म्हणुन प्रतिसाद देत होते. त्याचाही मध्ये कंटाळा आला होता. काय च्यायला खोटं वागतो आपण? ह्या @#$!% वेंकटेशनं मागच्या प्रोजेक्ट्मध्ये कशी काशी केली आणि सरळ माझ्या नावावर टाकली. नॉन कन्फर्मन्स च्या कालच्या मिटींगला आपण काही बोलु शकलो नाही, खरंतर मी जाम घाबरले होते. टाळू खाली जीभ असते आणि ती बोलण्यासाठी असते हेच मी जणु विसरले होते. सुपर ग्लू कुणी लावला आपल्या जिभेला? एकतर माझा नवीन जॉब होता. त्यात ही कंपनी ६०० जणांच्या स्ट्रेंथची. म्हणजे आधीच्या कंपनीच्या कैक पटींनी मोठी. इतके वेगळे लोक, वेगळ्या भाषा, मेल डॉमिनन्स आणि एकटेपणा. हो, भारताबाहेरचा पहिला जॉब होता माझा. आधी परकीय भाषा शिकण्यात बराच काळ लागला आणि त्यांचे विचार - संस्कृतीनं अजुनच वेळ घेतला. त्यात हे हलकट राजकारण. प्रत्येकजण आपापली पाठ वाचवायला बघतो. मला हे नवीन होतं. भारतातल्या जॉबमध्ये नेहमीच मस्त लोक भेटले होते, असले सरड्याच्या जातीचे प्रथमच अनुभवत होते. एच्.आर्.एम. विचारीत होता, 'हाऊ कम धीस डॅम मिस्टेक हॅप्पन फल्लावी.' माझ्या नावाचा असाच किंवा अजुन काही नाविन्यपुर्ण उच्चार ऐकायची मला सवय झाली होती एव्हाना. मी गणिताच्या परिक्षेत नापास झाल्यासारखं तोंड केलं आणि जमेल तितक्या पडेल आवाजात म्हंटलं, 'सर, प्लीज डोंट शाऊट, यु कट इट फ्रॉम माय सॅलरी बट डोंट शाऊट.....' नंतर फार काही घडलं नाही. वेंक्या हसला. आणि माझा फक्त (?) निम्मा पगार कट झाला.
तर तो हा वेंक्या पुन्हा दुसर्‍या दिवशी मला त्याच्या काळवंडलेल्या, आय मीन मुळातच काळा असलेल्या... मी वर्णवादी किंवा वर्णद्वेषी नाही हं... पण इथे तो शब्द रागाने बोलले इतकंच! तर मला त्याच्या काळवंडलेल्या चेहर्‍यानं इथुन तिथुन मद्रासी दात दाखवुन 'गुड्ड मॉर्णिंग मॅडम' म्हंटला. च्या मारी! (माफ करा...जरा अतीच झालं ना?) तर, कुठे होतो आपण? नाही ते नाही, वेंक्यापाशी. तर हा डामरट वेंक्या असा हसला मी आपलं सासुकडे जितक्या निरर्थकपणे ह्सुन बघु तसं हसुन उत्तर दिलं. माझ्याच खोटेपणाचं मलाच फार आश्चर्य वाटलं...
चंद्रुनं तेवढ्या धामधुमीत येऊन एक वंटास बातमी दिली. वंटास म्हणजे प्रथम क्रमांकाची 'मोडणारी' बातमी, म्हणजेच नं १ ची ब्रेकिंग न्युज. तर वंटास बातमी अशी होती की नवीन बकरा जॉईन झाला होता. आम्ही,जसं टारगट पोरांनी गल्लीत नव्यानं राह्यला आलेल्या सुंदर पोरीकडे...म्हणजे मुलीकडे जिभा खाली पडणार नाहीत असं बघावं अशा स्टाईलनं त्या बकर्‍याकडे पाह्यलं. अर्थातच दुरुन!
बकरा मस्त होता. मस्त इन अ सेन्स साधा भोळा दिसत होता. बकरा अशा साठी म्हणायचं कारण आमचं ऑफिस हे हीटलरच्या तत्वांनी प्रेरीत झालेल्या पदाधिकार्‍यांचं होतं. आणि काही किंवा बरेचसे सहकर्मचारी हे सर्व सद्दामला मदत करणार्‍या पत्त्याच्या कॅटसारखे बहुरुपी प्यादे म्हणुन सक्षम कार्य करित होते. ह्यात अपवाद म्हणुन मी, चंद्रन्, रती, विवेक असे चार जण तंग वातावरणात एकमेकांना साथ देऊन एकमेकांसाठी प्राणवायुचं काम करत असु. अडीअडचणीला एकमेकांना सहाय्य् करण्याची आम्ही अलिखित, अनौपचारिक प्रतिज्ञा घेतलेली होती. चंद्रुला आम्ही कधी कधी प्रेमानं चंद्रमुखी, चांद, चंदा असं काहीही म्हणायचो. चंद्रनच्या डोक्यावर खर्‍या चंद्राला लाजवेल अशी चमचम चमकणारी कोर होती. चंद्रु सगळ्यात सिनिअर होता दोन वेणीवाल्या दोन मुलींचा एक प्रेमळ वडील होता. पाठोपाठ मी, विवेक मग रती. मला पिल्लु व्हायचे होते. एकमेव मराठी आणि प्रॉडक्शन फ्लोअर वरची एकमेव बाई असा माझा क्रीएटीव रुबाब होता. रतीला एक ३-४ वर्षाची मुलगी होती. ती डीजीटल डीपार्टमेंट मध्ये ऑपरेटर होती. आमच्या ह्या चांडाळ चौकडीकडे आमच्या सुपरवायझरचं बारिक लक्ष असे आणि रागही. आम्ही हसलो तरी त्याला वाटे त्याच्याच बद्दल आम्ही बोलतोय. खरं वास्तवीक ते खरंही होतं म्हणा!
विवेक येता जाता गात असे, जमल्यास अधुन मधुन इतरांशी भांडत असे. वेळ मिळालाच तर कामही करत असे. पण जे काही करी ते सॉलीड असायचं. ऍक्च्युअली आम्ही चौघे असे खासच होतो. म्हणुन तर येडा सुपरवायझर (सुपरवायझर नेहमी येडाच असतो, असं त्याच्या हाताखालच्या सगळ्याच लोकाना नेहमीच वाटतं) आमच्या बर्‍याच चळवळींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करी. त्याला आम्ही वासाड्या सुद्धा म्हणायचो. का ते आमच्या नाकाला विचारा!
अरेच्या, ह्या सगळ्यात बकरा राहीलाच की! तर बकरा छान होता. ह्या छळवणूक प्रधान ऑफीसमध्ये पिचला किंवा कापला जाणारा आणखी एक. आमच्यासारखाच. म्हणुनच अजुन एक बकरा. पण आम्ही क्रांतीकारी ह्या अन्यायाला घाबरणारे नव्हतो. नव्या बकर्‍याला आपल्या गटांत सामील करुन घेण्याचा आमचा फुल प्रूफ प्लॅन होता. पण कसा अंमलात आणायचा? आम्हा चौघांचं घनिष्ट विचारमंथन सुरु झालं. नजरेला नजरा भिडल्या आणि आम्ही चहा प्यायला एकेक करुन निसटलो.
आम्हाला चहा प्यायला सुद्धा परमिशन नव्हती पण आमच्या सारख्या उच्च दर्जाच्या ऑफिशिअल्सना त्याची काय तमा? शेवटी कुणीतरी सांगितलंय ना, जीवनके दु:खोसे यु डरते नही है, ऐसे बचके सचसे गुजरते नही है..... तर अशा संतवचनांना स्मरुन आम्ही कुणाला न समजेल अशा बेतानं नियम धुडकावुन लावत असु. डार्क रूममध्ये चहाचं सामान आणि किटली लपवलेली होती. डिस्पोजेबल ग्लासेसही होते, चहा पिउन झाल्यावर चंद्रु ते खिशात अलगद ठेउन माझ्या टेबलपर्यंत आणी. मग मी ते कागदात गुंडाळुन पर्समध्ये लपवी. सिक्युरीटी गार्ड बायकांच्या बॅगा तपासीत नसत. एकदा त्यानं माझी पर्स तपासायचं धाडस केलं तर दर महिन्याला स्त्रियांना लागणारं महत्त्वाचं 'सामान' पाहुन तोच बिचारा लाजला. तेव्हापासुन तो कुणाही बाईची पर्स तपासीत नसे. गुणी बाळ ते!
तर अशाप्रकारे आमचं गुप्त चहापान चालत असे. डार्करूमला आम्ही खलबतखाना म्हणायचो. जिथे आमच्या युद्धाच्या मोहिमा उघडल्या आणि समयोचित बंद केल्या जात. नव्या बकर्‍याला कुणी घोळात घ्यायचं? आपल्या गटाची शक्ती वाढवायची असेल तर असे नवनवे सभासद किती जरुरी आहे, नव्हे आपल्या गटात येणं नव्या बकर्‍याच्या दृष्टीनं किती जरुरी - फायदेशीर आहे ह्यावर बर्‍यापैकी चर्चा झाली. तेव्ह्ढ्यात वासाड्याची चंद्रुला हाक ऐकु आल्यानं आम्ही आपापल्या बुरुजावर पुन्हा अवतीर्ण झालो, उपस्थीत म्हणतात का त्याला? तेच ते.
बकरा आमच्याकडे पाहुन गोड हसला, नव्या नवरीसारखा. पण आमच्यातला नवरा कोण ह्याचा सखोल विचार करत आम्ही कामाला लागलो. एकदाचे. आज तसाही त्याचा पहिला दिवस आहे, बघु या पुन्हा कधीतरी. लहानपणी आम्ही किती खोडसाळ असु ह्या विचारानं मला हिंदी सिरिअल्समधल्या नायिकांप्रमाणे छद्मी हसु आलं. खोडसाळपेक्षा नाठाळ हा शब्द जास्त चपखल बसतोय का? असो, फारसा फरक पडत नाही.
येता जाता बकर्‍याची कामाची पद्धत आम्ही निरखीत होतो. तो किती कामसु आहे, टापटीपीचा आहे, इस्त्रीचे कडक कपडे कसे घालतो? आज कोणता शर्ट घातला आहे, तो त्याला चांगला दिसतो किंवा कसे? वासाड्यानं आज त्याच्यावर पहिलं (उगाचच) रेशन घेतलं. (अरेरे, बिचारा...) उभा कसा रहातो? कुठे रहातो? वगैरे अभ्यासपुर्ण तपशिलांवरच्या चर्चांनी खलबतखाना गाजत होता.
ऑफीसच्या दैनंदीन बोअरींग रुटीन (ही सगळी विषेशणं आहेत की समानार्थी शब्द?) तर अशा कंटाळ्वाण्या रुटीनमध्ये एक नवीन मसालेदार विषय सापडला होता. त्यामुळे दिवस कसे मजेत जात होते. पगाराचा दिवस कधीचा उलटुन गेला तरी आमच्या चेहर्‍यावरचे हास्य लोपले नव्हते. नव्या बकर्‍याला घोळात घेण्याची उत्कंठा शिगेला पोचली होती. हा बाण -तीर नक्कि कोण मारतो अशा पैजाही आम्ही लावायला सुरुवात केली. बेटींग असे जोरात असतानाच एप्रिल महिना जवळ येत होता. जो कुणी बकर्‍याला बनवील त्याला एप्रिलची चिट (भिशी) बक्षीस म्हणुन ऍडव्हान्समध्ये देण्यात येइल असे एकमताने ठरले.

गुलमोहर: 

Happy सहजसुंदर ओघवतं लिखाण !! Happy

टाळू खाली जीभ असते आणि ती बोलण्यासाठी असते हेच मी जणु विसरले होते. सुपर ग्लू कुणी लावला आपल्या जिभेला?

माझ्या नावाचा असाच किंवा अजुन काही नाविन्यपुर्ण उच्चार ऐकायची मला सवय झाली होती एव्हाना.

आम्ही हसलो तरी त्याला वाटे त्याच्याच बद्दल आम्ही बोलतोय. खरं वास्तवीक ते खरंही होतं म्हणा!

एकदा त्यानं माझी पर्स तपासायचं धाडस केलं तर दर महिन्याला स्त्रियांना लागणारं महत्त्वाचं 'सामान' पाहुन तोच बिचारा लाजला.

आम्ही आपापल्या बुरुजावर पुन्हा अवतीर्ण झालो, उपस्थीत म्हणतात का त्याला? तेच ते.

बकरा आमच्याकडे पाहुन गोड हसला, नव्या नवरीसारखा. पण आमच्यातला नवरा कोण ह्याचा सखोल विचार करत आम्ही कामाला लागलो.

ऑफीसच्या दैनंदीन बोअरींग रुटीन (ही सगळी विषेशणं आहेत की समानार्थी शब्द?)

असे अधून मधून बटरस्कॉच खातांना दाताखाली येणारे कॅरामल मस्त !!

लिही पुढे. मस्त चाललंय . Happy

हे काय!
लवकर लव्कर पुर्ण कराल का प्लीज?
...मजा येतेय वाचायला..
Happy
..प्रज्ञा

येणार येणार लवकरच येणार पुढच्या भागासहीत.... Happy

"लव"कर लवकर लिही.............. तुझी लव स्टोरी (प्रेमकथा)

छान आहे!!!!
आवडली.......

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हजारों ख्वाइशें ऐसी
के हर ख्वाइश पे दम निकले...............

अमर कुलकर्णी,
'लव्'करुन झालं पण कथा लिहिताना लवकर कशी लिहु? जरा निवांतपणा हवा ना? निदान ह्या बाबतीत तरी Lol
साक्शी, थँक्स

पल्ली, बराच पल्ला गाठलास यात. भन्नाट लिहीलयसं. वाचताना मजा आला. पुढच्या भागाची वाट पहातोय.

पल्लवी.. मी रोज येते आणि बघुन जाते पुढचा भाग टाकला का? टाक ना गं लवकर.... ऑफिस स्टफ सॉलिड आहे... मजा येतीये वाचुन आणि उत्सुकता आहे की नवा बकरा कोणाच्या गळाला लागणार आहे.

पहिल्यांदाच तुला लिहित आहे पण वरिल विनंतीचा राग मानु नकोस..

वील्लप
**********************
नजरेला काय हवी... स्वप्न थोडी जास्त !

पल्लीजी,
मस्त!!!
पुढच्या भागाची वाट पहातोय
जे.डी भुसारे

मी नाय टाकणार प्रतिसाद कथा पुर्ण झाल्याशिवाय Lol
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **

मी पूर्ण झाल्यावरच वाचेन. पण दोन परिच्छेदामधे जागा ठेव की थोडी.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

ठरवले होते की पुर्ण कथा वाचल्याशिवाय प्रतिसाद द्यायचा नाही. पण आता थकलो वाट बघुन....
एवढं छान लिहायचं (ते मध्ये मध्ये येणारे punches कि काय म्हणतात त्याला खासच) आणि मग राहिलेलं 'वळका बगु ?" म्हणत इतक्या जणांना टांगणीला लावायचे..
हे असे आम्हाला 'टांगणे' बरे नाही.......

पुढचं कधी लिहीतेयस ? वाट पाहतोय.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

तुझ लिखाण छान उत्कन्ठपूर्ण आहे... Happy

**************
सब्ब पापस अकरन्म...
कुसलस्स उपसम्पदा..
सचित परियोद पन..
बुद्धान सासन्म...
*************

पल्ले,

वाचतीये... चांगलीच खोडसाळ हे आपलं नाठाळ दिसतीयेस...
मस्तच आहे,, वेगळी शैली..

पटकन टाक पुढचं..
---------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......