प्रेरणा: दिनेशदा
केवळ आणि केवळ दिनेशदांच्याच प्रेमळ आग्रहाखातर मी ह्या विषयात पडले. अन्यथा मी कविता हा माझा प्रांत नाही असेच मानते. काही वेळा केवळ गंमत म्हणून मी काही रचना केल्या आहेत आणि काही वेळा काही मोजक्याच पण आवडणार्या कवितांवर प्रतिसाद लिहिले आहेत, या पलिकडे माझा कवितेशी काही म्हणता काही संबंध नाही.
त्याचे झाले असे, मी नुकतीच एक कविता रचली आणि दिनेशदांच्या विपुत तिची रिक्षा फिरवली. मग काय, मला अपेक्षा सुद्धा नव्हती असे काहीसे घडले. दिनेशदांचे कवितेविषयीचे मत समजले आणि आमची ह्या विषयावर खुप चर्चा झाली. कवींविषयी, कवितांविषयी आणि प्रतिसादकांविषयीही आम्ही भरभरुन बोललो.
माबोवर येणारे कवी- काही फुटपट्टी घेऊन रचना करणारे, काही मुक्तछंदवाले, काही यमकं जुळवणारे, काही अनाकलनीय असे लिहिणारे, काही कवितेतून कथा सादर करणारे तर काही कवितेतून आधार शोधणारे- दु:खी मनाचे कवी ह्या सगळ्यांविषयी आम्ही बोललो.
शिवाय या कवींना प्रतिसाद देणारे- काही नुसतेच प्रशंसा करणारे- छान, सुंदर, मस्त असा प्रतिसाद देणारे, काही केवळ टिका करणारे- फालतू, वाईट इत्यादी शेरे मारणारे, काही कवितेचे विवेचन, रसग्रहण, विस्तार करणारे, काही कवितेकडे निखळ मनोरंजन म्हणून बघणारे तर काही कवितेकडे कुचेष्टेच्या उद्देशाने पाहणारे, काही जण मात्र कवितेकडे, कवीकडे सहानुभूतीच्या दृष्टीकोनातून बघणारे, कवीच्या लेखनातल्या तृटींकडे आपुलकीने पाहून त्यांच्यात सुधारणा व्हावी म्हणून मनापासून झटणारे याही विषयी आम्ही बोललो....
मी मानसशास्त्राची विद्यार्थीनी असल्याने अभ्यासात शिकलेले काही थोडे-फार मुद्दे नकळतपणे माझ्या बोलण्यात उतरले, त्यावरुन दिनेशदांनी मला या विषयावरच लेख लिहायला सांगितला!!! झालं....मी चर्चा वगैरे करायला एका पायावर तयार आहे हो दिनेशदा!!!! पण लेख वगैरे, तो ही कवितेवर आणि कळस म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून लिहायचा, म्हणजे फारच झालं... एकतर माबोवर इतकी ज्ञानी मंडळी आहेत. मी त्यांच्या कवितेवरील समिक्षा, विचार सर्व वाचलंय, तेंव्हा मी लिहिणार तरी काय आणि कसं याचं माझ्या मनावर प्रचंड दडपण आलं...आणि मी हा विषय लिहायचं कायम टाळत आले, ते आजपर्यंत. पण आज...आज नाही टाळू शकले. आज पुन्हा दिनेशदांची आज्ञा आलीच...आणि ती का आली हेही माहितीये...
एका दु:खी मनाच्या एकाकी कवीने एक मोठं पाप केलं...काव्यचौर्याचं!!!!आणि ते उघडकीस आलं. मग पुन्हा सुरु झालं एक चर्चासत्र...त्या चर्चासत्रातच एक मुद्दा पुढे आला- या आणि अशा सर्व निराशाजनक काव्यलेखन करणार्यांकडे मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहता येईल का??? आणि मग आलेली दिनेशदांची आज्ञा...तेंव्हा आता 'तशा' दृष्टीकोनातून पाहण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. पहा, आवडतोय का...
*****************************************************************************************************************
"In the desert of the heart Let the healing fountain start." - W. H. Auden
कवितेच्या माध्यमातून मनात दाटून आलेल्या भावनांचा निचरा होतो, हे मानसशास्त्रीय गृहितक आहे. कवितेतून नुसते एवढेच साधले जात नाही, तर मनातल्या जखमा भरुन काढण्याचे सामर्थ्यही कवितेत असते. त्यामुळे मानसशास्त्रीय उपचारपद्धतीमधे पोएट्री थेरपीला(काव्योपचार-पद्धती) एक वेगळेच स्थान प्राप्त झाले.
थेरपीसाठी येणार्या, मनमोकळ्या गप्पा मारु न शकणार्या, आपल्या भावना बोलून व्यक्त करु न शकणार्या मनोरुग्णांना कविता करायला सांगण्यात येणे किंवा त्यांनी लिहिलेल्या कविता वाचून त्यांच्या मनातले जाणून घेण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या गरजा ओळखून त्यांना योग्य तो सल्ला देणे, त्यांच्या निरोगी, निकोप मानसिक वाढीसाठी योग्य ती दिशा देणे यालाच म्हणतात पोएट्री थेरपी. याविषयी अधिक माहिती गोळा करायला गेले, तेंव्हा फार छान माहिती हाती आली. ती तुम्हा सर्वांसोबत शेअर करायला नक्की आवडेल.
(डिस्क्लेमरः खाली देतेय ती माहिती म्हणजे पोएट्री थेरपी या विषयाशी संबंधित आंतरजालावर सापडलेल्या लेखांचा निव्वळ अनुवाद/ भाषांतर आहे आणि त्या लेखांचे दुवे तळाशी दिले आहेत. )
कविता लेखनाला नेमकी सुरुवात कुठून आणि कशी झाली असावी???
वाचून आश्चर्य वाटेल, पण त्याच्या खुणा अगदी आपल्या आदीमानवाजवळही सापडतील! प्राचीन काळापासूनच अस्तित्वात असलेले होम-हवन हे त्याचेच एक उदाहरण आहे... अति-प्राचीन काळात (म्हणजे इसवीसन पूर्व हजारो वर्षे) इजिप्तमधे कवितेचे शब्द लिहून ते एका पेयात विरघळून रुग्णाला प्यायला दिले तर तो लवकर बरा होतो, अशाप्रकारच्या उपचाराचे दाखले सापडलेले आहेत.
मात्र, पहिल्या काव्योपचारपद्धतीची नोंद मात्र इ.स. पहिल्या शतकात झालेली आहे. रोमन फिजिशियन सोरानसने त्याच्या मेनियाक (सकारात्मक भावनांची अतिशय उच्च पातळी, जसे, अत्यानंद) रुग्णांना शोकांतिका (दु:खी, निराशाजनक) तर डिप्रेसिव्ह रुग्णांना सुखांतिका कविता लिहायला प्रवृत्त केले.
त्यानंतर मात्र अनेक शतके काव्य आणि वैद्यक यांचा मेळ बसवणारे असे काहीच घडले नाही. एकदम १७५१ साली अमेरिकेत बेंजामिन फ्रँकलिन यांनी स्थापन केलेल्या पेन्सिल्व्हेनिया हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी 'साहित्यिक उपचारांची' सुरुवात करण्यात आली. यात रुग्णांना वाचन आणि लेखन करायला सांगून त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यात आले. अमेरिकन सायकियाट्रीचे जनक म्हणून संबोधले जाणारे डॉ. बेंजामिन रश यांनी संगीत-उपचार पद्धतीची जगाला ओळख करुन दिली. मनोरुग्णांना कविता लिहायला सांगून खास त्यांच्यासाठी असलेल्या "द इल्युमिनेटर" या वर्तमानपत्रात त्याला प्रसिद्धी सुद्धा देण्यात येत असे.
त्यानंतर १९६० ते १९७० या या काळात बिब्लिओथेरपी अधिक नावाजली. बिब्लिओथेरपीचा शब्दशः अर्थ म्हणजे वैद्यकीय मदतीसाठी साहित्याचा उपयोग करणे.
नंतर मात्र काव्योपचार पद्धती खर्या अर्थाने नावारुपाला आली. "मी नाही, पण कविताच नेणीवेचा शोध घेते" असे मनोविश्लेषक सिग्मण्ड फ्रॉईड म्हणून गेला. त्यानंतर अॅडलर, युंग, अॅरिटी, आणि राईकने सुद्धा फ्रॉईडच्या संशोधनावर शिक्कामोर्तब केले. मोरेनोने सायको-पोएट्री, सायको-ड्रामा हे शब्द प्रचलित केले. १९६० साली पोएट्री-थेरपी नावाने एक समविचारी लोकांचा गटही स्थापन झाला. ज्याचा नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात-जसे शिक्षण, पुनर्वसन, ग्रंथशास्त्र, मनोरंजन, आणि सर्जनशील कला यात अधिक चांगला व्यापक असा विस्तार होत गेला.
काव्योपचार संघटनेची स्थापना:
१९२८ सालात अली ग्राईफर या मुळात फार्मासिस्ट आणि व्यवसायाने वकील असणार्या कवीने कवितेत मनाच्या जखमा भरुन काढण्याची ताकद असते अशा संदेशाची प्रचारमोहिमच हाती घेतली. ह्या काव्यमोहिमेसाठी त्याने आपले आख्खे आयुष्यच वाहून घेतले. त्याच्याचसारखे नंतर अनेक लोक होऊन गेले. कवितेला दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी, अनेक संस्थांचीही निर्मिती झाली.
नॅशनल असोसिएशन फॉर पोएट्री थेरपीची १९८१ साली स्थापना झाली. ही असोसिएशन चालवत असलेल्या पोएट्री-थेरपीची मुख्य उद्दिष्ट्ये:
१. स्वतःला आणि इतरांना समजून घेण्यातली अचूकता वाढवणे.
२. सर्जनशीलता, व्यक्त होण्यातला सुस्पष्टपणा, आणि आत्म-सन्मान वाढवणे.
३. व्यक्ती-व्यक्तींमधील संवाद आणि सुसंवाद कौशल्ये वाढवणे.
४.नवीन कल्पना, माहिती, प्रचिती यांच्यातून नवीन अर्थ शोधणे आणि
५. बदलांशी जुळवून घेण्यासाठी, ते आत्मसात करण्यासाठी नवीन वातावरण निर्मिती करणे.
या संघटनेची वाटचाल अजूनही चालूच आहे. या संघटनेच्या आणि नॅशनल कोलिशन ऑफ क्रिएटिव्ह आर्टस, थेरपीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च २०१० मध्ये पोर्टलंड येथे "क्रिएटिव्ह आर्ट्स थेरपी विक" साजरा करण्यात आला.
******************************************************************************************************************
पोएट्री थेरपीविषयीची माहिती हा कवितेकडे पाहण्याचा एक निराळा पैलू म्हणून लिहिली आहे. बाकीच्या पैलूंवर आपण सगळे मिळून चर्चा करुया. हा लेख म्हणजे कवितेविषयी चर्चेचे मुक्त व्यासपीठ व्हावे ही मनापासून इच्छा!!!
चला, तर मग माबोकर, आपणही कवितेकडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहूया... माझे या विषयातील मर्यादित ज्ञान आणि चिंतन आणि तुमचा त्यातील अभ्यास याचा मेळ घालून ही चर्चा पुढे नेऊ या
संदर्भः
http://www.poetrytherapy.org/articles/pt.htm
http://www.poetrytherapy.org/government_affairs.htm
http://www.poetryconnection.net/poets/W._H._Auden/18489
http://www.nccata.org/poetry_therapy.htm
http://www.poetrymagic.co.uk/literary-theory/freud.html
http://ecam.oxfordjournals.org/cgi/content/full/2/2/161
http://www.recover-from-grief.com/grief-poem.html
http://www.poetrymagic.co.uk/therapy.html
http://www.spcsb.org/pdfs/resources/a-poetry_as_therapy.pdf
कवी कवयित्रींना भारतीय
कवी कवयित्रींना भारतीय सैन्यातील दोन वर्षाचे प्रशिक्षण व कार्यानुभव सक्तीचे करावे. म्हणजे सर्व हळवे, गुलगुलीत आपोआप ठीक होईल. गेटॉनविथिट.
सानी, खरचं अतिशय माहीतीपुर्ण
सानी,
खरचं अतिशय माहीतीपुर्ण लेख. या लेखानिमित्त्ताने तुझ्या लिखाणातला सशक्तपणा ठळकपणा प्रकर्षाने जाणवला.
असेच माहीतीपुर्ण लेख इतर दिग्गज माबोकरांकडून वाचायला मिळोत.
पु.ले.शु.
सस्नेह !!
देवनिनाद
>>म्हणजे सर्व हळवे, गुलगुलीत
>>म्हणजे सर्व हळवे, गुलगुलीत आपोआप ठीक होईल. गेटॉनविथिट.
मामी,
सैन्यातील लोकं हळवे नसतात किंव्वा कविता करत नाहीत वगैरे असे म्हणाय्चे आहे का? तर्क पटत नाही.
असो.
कविता काय वा कुठलाही ईतर कलाविष्कार काय मला वाटतं, या सर्व गोष्टी मूलतः जाणिवा, संवेदना, विचार ई. "व्यक्त करण्याची" गरज यातून ऊदयास येतात, जोपासल्या जातात. त्याचे पुढे जावून व्यावसायिक रुपांतर होते किंव्वा ईतर काही (कविता स्फुरण्या पासून पाडण्यापर्यंत) तो निव्वळ व्यवहारीक भाग झाला.
सानी,
छान माहितीपूर्ण लेख.
माहितीपुर्ण लेख धन्यवाद
माहितीपुर्ण लेख
धन्यवाद सर्वांचे.
मामींच्या मुद्द्याला अनुसरून
मामींच्या मुद्द्याला अनुसरून पुढे- (म्हणजे लेखांतल्या मुद्द्यांचे एतद्देशीय महत्व- यावरून पुढे)
वरच्या लेखात (परदेशातल्या) शास्त्रज्ञ-कम-कवींनी स्थापन केलेल्या संस्था व चालवलेल्या चळवळींबद्दल लिहिले आहे. (परदेशातल्या) इतिहासात आणि पुराणात काय झाले- याचा सध्या काय आणि कसा उपयोग होईल; या मुद्द्याच्या व्यतिरिक्त भारतातल्या कवींच्या जाणीवांच्या संदर्भात, तसेच काव्योपचाराच्या संदर्भात, तसेस कवितांबद्दल भारतीय समाजात जागृती करण्याच्या संदर्भात वरील (परदेशातील) संस्था आणि चळवळींचा काय उपयोग झाला- हे जाणून घ्यायला आवडेल. शिवाय अशा चळवळी आपल्या देशात का होत नाहीत? झाल्या असतील तर कृपया माहिती द्यावी, ही विनंती.
या लेखाचे प्रयोजन न समजल्यामुळे त्याला चांगले म्हणावे की वाईट, हे कळत नाही. (इजिप्तमधे कवितेचे शब्द लिहून ते एका पेयात विरघळून रुग्णाला प्यायला दिले तर तो लवकर बरा होतो- याचा इथे संबंध नाही. ही माहिती आवडली, तसेच आश्चर्य पण वाटले. आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीतही अशी उदाहरणे सापडतीलच की). अधिक माहिती देऊन लेख परिपूर्ण करावा, ही विनंती.
छान लेख !!! मी ही कधी कधी
छान लेख !!!
मी ही कधी कधी कविता लिहितो ...( प्राची ला गच्ची लावुन )
पण कुणी तरी कवी म्हणावं म्हणुन नाही तर ...कवितेवर येणारे प्रतिसाद इतके मस्त असतात .....खरे विनोदी साहित्य !!!
" असा मी एकटाच आहे " या कवितेवरचे प्रतिसाद वाचताना मी बर्याचदा ऑफीसात खुर्ची वरुन, हसुन हसुन पडता पडता वाचलोय !!!
आर्मी वाले भरपूर हळवे असतात.
आर्मी वाले भरपूर हळवे असतात.
दोन उदाहरणे:
१) प्रत्यक्ष युद्धाला जाण्याआधी ट्रेंच मध्ये/ तंबू मध्ये हलक्या आवाजात अंबेची आरती होते. ती भावना शब्दात पकड्णेच अशक्य.
२) माझे मेव्हणे सीओ असताना एका गत जवानाच्या घरी सपत्निक गेले होते. आधार द्यायला. तर त्याची आई फोटोला बघून म्हणाली देख तेरा साब आया है, सलाम कर सलाम कर. ह्या भावनेवर तुम्ही काय कविता करणार ? एका आईची व्यथा? इथे कसला कॅथार्सिस होणार आहे.
सगळेच हळवे असतात एखाद्या इश्यू बद्दल पण जे नेट वर स्वतःच्या भावनांचे किंवा शारीरिक अनुभवांचे
एक्स्प्लिसिट वर्णन करून वाहवा मिळवायचा एक कॉम्प्लेक्स आहे तो फार बिनबुडाचा वाट्तो. दारू सिगारेट ची वर्णने किंवा यमक जुळवले म्हणजे उत्तम कविता झाली का? त्यात प्रॉडक्शन रेट पण फार जास्त असतो. प्रत्येक अनुभवावर कविता पाडून प्रदर्शित करण्याचे कंपल्शन का वाटावे? लो सेल्फ एस्टीम मुळे का? मला कविता आवड्तात. पण १००० वाचल्या तर ५ उत्तम असतात. टोपभर कविता वाचल्याने वाचकांवर होणार्या इमोशनल अत्याचाराचे काय
इजिप्तमधे कवितेचे शब्द लिहून ते एका पेयात विरघळून रुग्णाला प्यायला दिले तर तो लवकर बरा होतो-
हे एक दूजे के लिये मध्ये वासू चा फोटो जाळल्यावर सपना त्याची( फोटोची) राख चहात घालून पिते त्यासारखे वाट्ले.
छान आणि नवी माहिती मिळाली,
छान आणि नवी माहिती मिळाली, त्याबद्द्ल सर्वप्रथम धन्यवाद!
मुटे म्हणतात तसे कविता हा एक्सप्रेस होण्याचा केवळ एक मार्ग आहे. पण त्याला नेहमीच जास्त संवेदनशील असणार्यांचा प्रांत मानण्यात आले आहे हे ही खरेच.
मी अद्याप फारशा कविता वाचलेल्या नाहीत, आणि माबोवर कधितरी वाचतो पण त्यावर प्रतिक्रिया देणे कटाक्षाने टाळतोच. प्रतिकूल प्रतिसादावर होणारी अतिइमोशनल बडबड किंवा कवितेच्या तांत्रिक बाबींवर चाललेली चिरफाड, दोन्हीही मला झेपत नाही!
सानी, या उत्तम आणि एका
सानी,
या उत्तम आणि एका वेगळ्या विषयाच्या लेखाणाबद्दल धन्यवाद !
इतकं सगळं वाचायला मी काही तास नक्की काढेन कारण यात शिकण्यासारख, आयुष्यात उपयोगी पडणारं खुप दिसतयं .....
सानी, छान आहे लेख. मला
सानी, छान आहे लेख. मला शीर्षकचं कितीतरी अर्थपुर्ण वाटले.
खुप छान लेख सानी...असाही
खुप छान लेख सानी...असाही कुठला प्रांत आहे हे अजीबात माझ्या गावी नव्हतं. खुप नवीन आणि उपयुक्त माहिती दिलीस. त्याबद्दल खरंच धन्यवाद!
माहितीपूर्ण लेखाबद्द्ल
माहितीपूर्ण लेखाबद्द्ल अभिनंदन सानी
दिनेशदांची प्रतिक्रियाही शब्द्शः पटली. मलाही कित्येक वर्षात वाचलेल्या कवितांमध्ये आरती खोपकर यांची "राणी सोड आता हात" ही कविता अत्यंत प्रभावी आणि म्हणूनच जीवघेणी वाटली होती. बाकी कविता हा साहित्यप्रकार मलाही फार विस्कळीत वाटतो. असे इतरांना नाही का वाटत? का माझे मन तितके संवेदनशील नसावे??
सानी, १. अत्यंत चांगली
सानी,
१. अत्यंत चांगली माहिती! कवितेचे प्रयोजन नाही म्हणता येणार, कारण ती सुचताना 'कुणासाठीतरी उपचार ठरेल' या प्रेरणेतून सूचत नाही, पण आपल्या य लेखामुळे कवितेचा एक खूप मोठा फायदा जवळपास पुन्हा प्रस्थापित होत आहे.
२. मुंगळा मुंगळा हे अमजदखान व हेलनवर चित्रीत झालेलं इन्कार या चित्रपटातील, म्हणजे बहुतेक दोन दशकांपुर्वीचं असेल, अजूनही गणेशोत्सवात १९९५ नंतर जन्माला आलेल्या किशोरांनाही नाचायला भाग पाडते. यात संगीताचा वाटा सिंहाचा हे मान्य केलं तरीही शब्दांची निवड व मूळ कवितेत असलेली लय यांचाही वाटा महत्वाचा! व्यक्तीशः विचाराल तर 'कवी आहे सुरांचा बाप, गायक पोरगा आहे' असा माझा एक मिसरा आठवला, ज्यात मला असे म्हणायचे होते की संगीतकाराने संगीत देताना मूळ कवितेतच कवीने लय, पट्टी, छंद वगैरे निर्माण करून ठेवलेले असतात. म्हणजे, 'आजा सनम मधुर चांदनी मे हम' हे अधिक लयीचे प्रेमगीत 'ये मेरा दीवानापन है' या यहुदीमधल्या दु:खी विरहगीताच्या लयीत बांधावेसे संगीतकारालाच वाटणार नाही. याचे कारण मूळ गीतात असलेला मूड, लय व शब्दांची निवड! मला असे म्हणायचे आहे की एखाद्या कवितेचा उपयोग जर 'थेरपी' म्हणून होणार असेल तर ती निश्चीतच मनस्थिती सुधारू शकणारी, लयदार, गोंडस शब्दांची किंवा सुलभ शब्दांची असायला हवी. मला स्वतःला या मुद्यातून कोणताही वैयक्तीक स्कोअर करायचा नाही हे आधीच स्पष्ट करतो. मात्र म्हणूनच मला वाटते की मेलोडियस रचना, ज्यांना लय आहे, छंद आहे, त्यांना कविता म्हंटले जावे (आशयाच्या अंगाने नव्हे तर स्वरुपाच्या अंगाने - आशय नंतर) व अशाच कवितांचा थेरपीसाठी उपयोग अधिक प्रभावीपणे होणार असे खात्रीपुर्वक वाटते. गुणगुणणे, गुणगुणण्यामुळे मुड बदलणे, हातांना ठेका धरावासा वाटणे, पायांना ठेका धरावासा वाटणे या जरी मुद्दाम केलेल्या थेरपी नसल्या तरीही 'कविता प्रभाव पाडतच असते' हे सिद्ध करणार्या बाबी आहेत व त्यामुळेच मुक्तछंदाला मी प्रामुख्याने कविता मानत नाही. असो! या लेखाबाबत लिहीताना तो मुद्दा नको. (लिहून झाल्यावर काय 'असो' म्हणायचे खरे तर - हा हा)
३. इतर देशांपेक्षा आपल्या देशात अधिक मेलोडियस गीते होतात असे मला उगाचच वाटते. हे खरे की खोटे माहीत नाही. पण खरे असल्यास या थेरपीचा सर्वात अधिक उपयोग आपल्या देशामुळे व आपल्या देशातील लोकांना होऊ शकेल.
४. आपण दिलेली डिटेल्स पाहून खूप आनंद झाला.
धन्यवाद!
-'बेफिकीर'
अगं आई गं ! म्हणून मी ललित
अगं आई गं !
म्हणून मी ललित वगैरे वाचायच्या भानगडीत पडत नाही.
पण खरंच चांगलं विवेचन आहे !
मला ड्रामाथेरपीबद्दल माहित
मला ड्रामाथेरपीबद्दल माहित होते, पोएट्री थेरपी बद्दल नव्यानेच कळले.
तसे बघू जाता, अनेक पर्सनॅलिटी डेव्हलपमेन्ट कॅम्पस् मध्येही भाग घेणार्या लोकांना कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना/ विचारांना अभिव्यक्ती देण्यास सांगितले जाते. कल्पनाशक्तीलाही त्यामुळे जरा व्यायाम घडतो! म्हणजे एका अर्थी तिथे काव्य ही एक प्रकारची थेरपी म्हणूनच वापरले जाते की!
श्रीकृष्णाने अर्जुनाला नैराश्यातून, हतोत्साह स्थितीतून बाहेर काढण्यासाठी भगवद् गीता ऐकवली. अर्जुनाचे मानसोपचार कृष्णाने काव्यविचारांच्या माध्यमातूनच केले की!
राजा जनमेजयाला सत्य काय आणि भास काय, स्वप्न काय आणि वास्तव काय ह्याविषयी प्रश्न पडलेला असताना अष्टावक्राने अष्टावक्र गीतेद्वारा त्याला उपदेश करून त्याची गोंधळलेली स्थिती दूर केली.
काव्याचे हे सर्व प्रकार तत्त्वज्ञान सांगणारे, मनाचा गोंधळ - नैराश्य- औदासिन्य - मरगळ दूर करणारेच होते ना? म्हणजे त्यांनाही ''उपचार'' म्हणून बघता येईल का?
आता सध्याच्या नवकविता
कविता ही जर भावभावनांची अभिव्यक्ती असेल तर तिच्याकडे तर्काच्या नजरेतून बघणे कितपत श्रेयस्कर हे मला आजवर कळालेले नाही. काव्य रचणारा त्याच्या मनातील विचार, भावनांचा निचरा करून मोकळा होतो. कधी त्या शब्दांमध्ये, रचनेत एवढी जबरदस्त ताकद असते की वाचकालाही तो त्या भावनेत -विचारांमध्ये- दृश्यात ओढून घेतो. पण अनेकदा शब्दरचना लुळी-दुबळी असते, भावनेची ताकदच कमजोर असते, किंवा नको तेवढा शब्दांचा/ भावनेचा उद्रेक झालेला असतो ..... कधी कवीला आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे हेच स्पष्ट झालेले नसते. तर कधी वैचारिक गोंधळ उडालेला असतो.
अशा कवींना व त्यांच्या कवितांना त्वरित प्रसिध्दी मिळवून देण्याचा व त्यावर वाचकांचे प्रतिसाद मिळवण्याचा आंतरजालाइतका विनासायास, तत्काळ मार्ग नाही. नवकवींना हा मोह न झाला तरच नवल! आपल्या रचनेविषयी लोकांचे कौतुक, वाहवा इन्स्टंट स्वरूपात मिळवण्यासाठी मग भाराभर स्वरूपात कवितांचे पीक निघतच राहते!! त्यातील काही कविता खरेच सुंदर असतात, परंतु बर्याच कविता पूर्ण वाचवतही नाहीत. ''लोकांनी आपले सतत कौतुकच करावे, उत्तेजनच द्यावे, किंवा सकारात्मकच प्रतिसाद द्यावा'' हेही वाटणे नैसर्गिक आहे. परंतु वास्तवात तसे नसते. सर्वांनाच ते काव्य आवडेल, भावेल असे नाही. मग कोणी नकारात्मक किंवा उपरोधात्मक प्रतिसाद दिला, टीका केली किंवा बदल सुचविले तर ते ऐकून घ्यायची, त्यांवर विचार करायची तयारीही हवी असे मला वाटते.
मध्यंतरी माझ्या ब्लॉगवर व इथे माबोवर मी पंधरा-सोळा वर्षांची असताना केलेली एक जुनी कविता टाकली होती. अशीच गंमत म्हणून! साहजिकच कवितेतील भावना व शब्द नवथर होते. त्यावेळी सुचलेले. तेव्हा सच्चे वाटलेले. आज ती कविता वाचताना मला त्या शब्दांमधला वरवरपणा जाणवतो. तरीही काहीजणांनी त्या कवितेचे कौतुकही केले. आणि ब्लॉगवर एकांनी सणसणून टीका केली. मला त्या टीकेचे वाईट वाटले नाही, कारण माझ्या अन्य लिखाणामुळे त्यांच्या माझ्याकडूनच्या कवितेविषयीच्या अपेक्षा उंचावल्या होत्या, ज्याला ती कविता कोठेच पुरेशी पडू शकत नव्हती. तरीही मी कवितेच्या खाली टीप दिली होती की ही कविता खूप जुनी आहे म्हणून! त्या वयाच्या संदर्भात राहून ती वाचली तरच ती भावेल! तिथे मला आपला अननुभव मान्य करण्याचा मोकळेपणा कामी आला.
मला वाटते, प्रत्येक कवीने आपल्या कविता लगेच प्रकाशित करण्याअगोदर एके ठिकाणी वहीत त्या लिहून ठेवाव्यात. काही दिवसांनी, काही आठवड्यांनी त्या पुन्हा वाचाव्यात. त्या कविता पुन्हा वाचताना त्यांना नक्कीच आपण कशा प्रकारचे काव्य केले आहे हे कळून येईल. आणि मग आपणच त्यांचे गुणांकन करावे. ज्या कविता त्यात सर्वाधिक गुण मिळवतील त्यांना प्रसिध्द करावे. प्रत्येक कविता ''जमेल'' असेच नाही! आजही माझ्या काही वह्यांमध्ये अशा ''न जमलेल्या'' कविता आहेत. त्या क्षणी, त्या वेळी उद्रेकाच्या स्वरूपात बाहेर आलेल्या. पण तरीही त्यांचे अधुरेपण जाणवणार्या. नीट मांडता न आलेल्या.
आणि काही वेळा एखादी कविता ''ऐकू येते''. म्हणजे शब्दांसकट, नादासकट ते काव्य स्फुरते. अशा धबधब्याला ऐकून घेण्याशिवाय पर्याय नसतो. ते काव्य ऐकायचे आणि आपण फक्त ते कॉपी पेस्ट करायचे!! त्या काव्याचे जनक/ जननी कोण हे माहित नाही. मला फक्त ते ऐकू आले. मी लिहिले. बस्स!! अशा कवितेचे कोणी कौतुक करो अगर न करो, फिकिर नसते! कारण तिथे तुम्ही जणू एखाद्या माध्यमाचे काम करता.
मी शेवटचा प्रतिसाद वाचला
मी शेवटचा प्रतिसाद वाचला होता, तो मंत्रोच्चाराने उपचार असा.
या बाबतीत थोडी गल्लत होतेय. या क्रियेत उच्चारणाला फ़ार महत्व आहे.
एका विशिष्ठ सूरात, एका विशिष्ठ लयीतच ते उच्चारण व्हावे लागते. त्यातले
नेमके किती शास्त्र आपल्याकडे आता उरलेय ?
अंगाई गीत गाताना, एक खास लय पकडतात. आणि तिथे शब्द तेवढे महत्वाचे नसतात.
याचे सगळ्यात चपखल उदाहरण, म्हणजे शास्त्रीय संगीतातील राग. काही विशिष्ठ सूर वा
स्वरसमुह लावून, रस निर्माण केला जातो. इतकेच नव्हे तर दिवसाचा प्रहर आणि
महिन्याचा ऋतू पण भासमान करता येतो. मला मराठीतली जास्त उदाहरणे देता येणार नाहीत.
पण तरी प्रयत्न करतो.
सुधीर फडके यांनी गायलेले, संथ वाहते कृष्णामाई, हे गाणे ऐकल्यावर, दुपारची शांत वेळ
भासमान होते कि नाही ? हा आहे सारंग रागाचा प्रभाव. असाच शांत भाव, आशाचे आणि
तलतचे, लागे तोसे नैन लागे, लागे हे गाणे ऐकताना भासतो. पण असेच शब्द असलेले
तोसे लागे नैना, सैंया हो, मात्र भावनाची तीव्रता दाखवते. कारण ते आहे भैरवीत.
मन्ना डेचे घनघन माला नभी दाटल्या ऐकल्यावर पाऊस पडल्यासारखा वाटतो. तर आशाचे
शक मधले, मेघा बरसने लगा है, आज कि रात, ऐकल्यावर मळभ दाटून आल्यासारखे वाटते.
पावसाची अनेक रुपे आहेत, आणि ती सगळी दाखवायला, मल्हाराचे अनेक प्रकार समर्थ आहे.
तोडी ऐकला, तर सकाळची गंभीर प्रार्थना ऐकल्यासारखी वाटते ( भयभंजना वंदना सून हमारी)
तर मारवा ऐकल्यास संध्याकाळची हुरहुर मनात दाटते (कान्हा रे कान्हा, तूने लाखो रास रचाए)
बागेश्री ऐकला, तर खट्याळ, शृंगारीक भाव मनात दाटतात ( बेदर्दी दगाबाज जा )
तर माझा मुद्दा असा आहे. की स्वर बाजूला केल्याशिवाय, शब्दांची ताकद, स्वतंत्रपणे जाणवणार
नाही. आणि आपण इथे केवळ शद्बांची ताकदच बघू या. (स्वर आणि संगीत हे नक्कीच, शब्दांपेक्षा
जास्त प्रभावी आहे. वाद्यसंगीतात, तराणा, त्रिवट सारख्या गायनप्रकारात तर शब्दांचे कामच नसते.)
या लेखाच्या चर्चेतून, गेयता वा गायन, हा मुद्दा वगळला जावा, व केवळ लिखित शब्दांवर, आणि
कविता लिहिण्यामागच्या प्रेरणेवर चर्चा व्हावी असे वाटते. म्हणून हे पोस्ट.. मग परत लिहिनच.
एवढे छान प्रतिसाद आणि चर्चा
एवढे छान प्रतिसाद आणि चर्चा पाहून मला खुप खुप आनंद झालाय.... सर्वांची मी मनापासून आणि खुप आभारी आहे.
झक्की काका(तुम्हाला सगळे काकाच म्हणतात आणि तुमचं नाव खुप आदराने घेतलं जातं हे मी तुमच्या गटग वृत्तांतात वाचलं होतं, म्हणून डायरेक्ट काका म्हणतेय...), तुमचा प्रतिसाद वाचून खुप हसू आलं... ते आले, लिंबू नि मीठ म्हणजे भारीचै आयडिया....
पाषाणभेद, तुमचा मुद्दा बरोबर आहे. ज्याचा जो पिंड आहे, तो त्याप्रकारे कविता करतो, पण त्यावरुन त्याच्या मनात कुठल्या भावनेला जास्त स्थान आहे हे समजतंच ना? कुठल्या भावना व्यक्त करण्यात त्या व्यक्तीला जास्त रस आहे, यावरुन त्याच्या स्वभावाचा अंदाज येऊ शकतोच आणि लेखात आणि प्रतिसादात आधी म्हटल्याप्रमाणे मानसिक रुग्ण, ज्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, ज्याच्या मनात खोलवर रुतलेल्या कुठल्या भावना त्याला छळतायत, त्या समजण्यासाठी कवितेचा उपयोग होऊ शकतो. अर्थातच, कविता हे एकच माध्यम नक्कीच नाहीये... चित्रकला, शिल्पकला, हस्तकला, कथालेखन, गाणी म्हणणे अशा कुठल्याही प्रकाराचा उपयोग माणसाचे मन जाणण्यासाठी होऊ शकतो. रुग्ण कोणत्या उपचारांनी खुलतोय हे तज्ञ ओळखून ते ते उपाय योजतात आणि यथायोग्य अशा अॅक्टिवीटीज त्यांना देतात.
सूर्यकिरण, शब्दांना, त्यांच्या उच्चारांना भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहेच ना? आणि मंत्र हा तर फारच प्रभावशाली असा शब्दांचा समूह आहे ज्याला विश्वासाची जोड आहे...त्याच्याशी संदर्भ तर नक्कीच जुळवता येईल... लेखातही याचा उल्लेख सुरुवातीलाच आलेला आहे. मंदार म्हणतो तसे यावर जाणकारांकडून भाष्य व्हायला हवे....
विशाल, माझे लेखन निवडक दहात नेणारा तू पहिला आहेस... तुला कल्पनाच नाही येणार मला किती आनंद झालाय याची... धन्स रे!!! खुप आभारी आहे. तुझेही मत मांडायला ये लवकर. वाट पाहतेय.
भाऊ,
तुमचे विचार पटले... पण संवेदनक्षमता, कल्पकता, निरीक्षणशक्ती व शब्दसमपदा इ. बाबतीत जर कुणी खूपच अपूरा पडत असेल, तर खूप चांगलं काव्यवाचनसुद्धा त्याची मदत करूं शकणार नाही, असं जाणवतं. आणि याविषयी मी पाषाणभेद यांना दिलेल्या प्रतिसादात लिहिलेच आहे.
नितीन, संख्याशास्त्रीय अनुमान आता मानसशास्त्रातसुद्धा आलंय... अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिएशन(APA) त्यासाठी झटतेय... DSM (Diagnostic Statistical Manual ) त्यांनी याच दृष्टीने बनवले आहे. त्याच्याविषयी अधिक माहिती विकीपीडियावर मिळेल.
सत्यजित, मूळ लेखात मुद्दामच माझे असे काही मत लिहिले नाही. कारण मग चर्चेची दिशा एकतर्फी झाली असती...पण प्रतिसादात येणार्या चर्चेत माझेही मत मांडतेच आहे, हे तुमच्या लक्षात आलेच असेल एव्हाना...
डिस्कव्हरी वरच्या त्या एपिसोडवरचा हा सिद्धांत "to attract opposite sex and prove superiority among others" फ्रॉईडच्या विचारांशी मिळताजुळता आहे. तो अगदीच चुक आहे असं नाही म्हणता येणार आणि शंबर टक्के बरोबरसुद्धा नाही म्हणता येणार, शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती, नाही का? आणि हे मानसशास्त्रज्ञालाही लागू होतेच...:)
बाकी 'शॉक ट्रीटमेंट' वाली कोटी भारीच
कवितेच्या बाबतीत तरी आपले संतकवीच तर या सिद्धांताला सुरुंग लावतात असं नाही वाटत ? भाऊ, बरोबर आहे!!! हा विचार मी केलाच नव्हता...
अश्विनीमामी, तुमचा प्रतिसाद
अश्विनीमामी, तुमचा प्रतिसाद पाहून विशेष आनंद झाला. कवीचा मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार व्हावा ही इच्छा तुम्हीच बोलून दाखवली होती ना? वर लेखात उल्लेख केलेल्या 'त्या' धाग्यावर? दिनेशदांनंतर ह्या लेखाला मूर्तस्वरुप देण्यासाठी मला चालना मिळण्यात तुमचाही इन्डायरेक्टली वाटा आहेच...धन्स त्याबद्दल.
निनाद, योग, राजेश्वर- पुन्हा एकदा धन्स तुम्हाला.
साजिरा, तुम्ही म्हणताय- या लेखाचे प्रयोजन न समजल्यामुळे त्याला चांगले म्हणावे की वाईट, हे कळत नाही. कविता हा माबोकरांसाठी संवेदनशील विषय आहे. इथले कवी आणि प्रतिसादक यांच्यातली चर्चा आपण वाचत असतोच. त्यामुळे कवितेचा त्यापेक्षाही व्यापक अर्थ, तिचा व्यवहारातला उपयोग याची सर्वांना माहिती व्हावी आणि त्या अनुषंगाने चांगली चर्चा व्हावी हाच उद्देश आहे...अर्थात, ह्या लेखातला काव्योपचाराचा भाग म्हणजे नेटवर सापडलेल्या उपयुक्त माहितीचा निव्वळ अनुवाद आहे. त्यामुळे आधीच अस्तित्वात असलेली माहिती एकत्रित करुन मराठी भाषेत सादर करुन चर्चा व्हावी, त्यातल्या वेगवेगळ्या मुद्दयांचा विचार व्हावा आणि ज्ञानी माणसांनी आपल्या ज्ञानाची त्यात भर टाकावी, हेच या लेखाचे प्रयोजन आहे. आता तरी सांगाल का, लेख चांगला की वाईट?
प्रसाद, सहमत आहे... त्या कवितेवरचे सगळे प्रतिसाद मी एका दमात वाचले होते. माझी काय अवस्था झाली असेल, याचा नुसता विचार करा
आगाऊ, अनिल, बी, सुमेधा,एक फुल, पुन्हा एकदा धन्स
बी त्या शीर्षकाचे श्रेय सुद्धा दिनेशदांनाच हं
बेफिकीरजी, तुम्हाला माहिती
बेफिकीरजी, तुम्हाला माहिती आवडली, याचा खरंच खुप आनंद झाला फक्त, एकच, येथे काव्योपचार पद्धतीचा वापर कविता रुग्णाला ऐकवून बरे करण्यासाठी नसून रुग्णाला कविता रचायला सांगून त्याचे मन जाणून घेण्यासाठी करण्यात आला हा विचार आहे. बाकी आपण निरोगी माणसं वेगवेगळ्या कारणांसाठी कविता रचतो. त्यात कधी आपल्या मनातल्या भावनांचा निचरा, कधी आधार शोधणे, कधी नुसतेच अभिव्यक्त होणे इ. अनेक उद्देश असू शकतात.
कवितेच्या गेयतेविषयी म्हणाल, तर मला सुद्धा गेय कविता वाचायला जास्त आवडतात. पण कधी कधी एखादी मुक्तछंदातली कविताही आनंद देऊन जाते... आणि गाणी तर गेय आणि छान ठेक्याचीच हवीत. याबाबतीत दुमत नाही. तुमचा मिसरा 'कवी आहे सुरांचा बाप, गायक पोरगा आहे' खुप आवडला. एखाद्या कवितेचा उपयोग जर 'थेरपी' म्हणून होणार असेल तर ती निश्चीतच मनस्थिती सुधारू शकणारी, लयदार, गोंडस शब्दांची किंवा सुलभ शब्दांची असायला हवी. हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आवडला आणि पटला. :) इतर देशांपेक्षा आपल्या देशात अधिक मेलोडियस गीते होतात असे मला उगाचच वाटते. हे खरे की खोटे माहीत नाही. पण खरे असल्यास या थेरपीचा सर्वात अधिक उपयोग आपल्या देशामुळे व आपल्या देशातील लोकांना होऊ शकेल. हेही काही अंशी पटलं... पण फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश, इ. काही भाषाच फार सुमधूर आहेत.. म्हणजे त्यांना एक सुंदर लय आहे. त्या भाषांनधली गाणी ऐकत रहावीशी वाटतात... भाषा समजली नाही तरी ती फार गोड वाटतात. मला इंग्लिश गाणी सुद्धा फार आवडतात. विशेषतः शकीराची... तिच्या आवाजात पण थेरप्युटिक व्ह्याल्यू असावी का? मुग्ध होते मी तिचा आवाज ऐकून
बाकी 'आजा सनम' गाण्यासोबत माझ्या अगदी सुंदर आठवणी जोडलेल्या आहेत. माझ्या आईचा आवाज फार सुंदर आहे. ती हे गाणं खुप खुप मस्त म्हणते. त्यामुळे हे माझं फार आवडतं गाणं आहे. शिवाय, माझी आई मला लहानपणी झोपवतांना जी जी गाणी म्हणायची, ती ती माझी खुप आवडती. 'स्वप्नात पाहिली राणीची बाग' हे त्यातलेच एक (विषयांतर मोड ऑफ)
टवाळ - Original तुमचे नाव वाचले की च हसू फुटते, त्यात ते Original म्हणजे आणि तुमचा प्रतिसाद वाचून "टवाळा आवडे विनोद" हे शब्दशः खरे होते... बाकी मी तशी टवाळीच हं (टवळी नाही).. मला बी विनोद लई आवडतो.
अरुंधती, खुप सुंदर आणि सविस्तर प्रतिसादाबद्दल अनेक आभार
कवितेला दिलेला पौराणिक संबंध आवडला. बाकी कविता आणि कवी यावर जास्त काही लिहित नाही. वर चर्चा झाली आहेच आणि होत राहील...
तुमचे सजेशन प्रत्येक कवीने आपल्या कविता लगेच प्रकाशित करण्याअगोदर एके ठिकाणी वहीत त्या लिहून ठेवाव्यात. काही दिवसांनी, काही आठवड्यांनी त्या पुन्हा वाचाव्यात. अतिशय आवडले.
आणि शेवटच्या पॅरामधे तर तुम्ही कविता कशी सुचते, याची थोडक्यात पण अतिशय सुंदर प्रक्रिया लिहिली आहे.. जाम आवडली. भुंग्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर यात दडले आहे.
दिनेशदा, मी अगदी आत्ताच वर
दिनेशदा, मी अगदी आत्ताच वर प्रतिसादात लिहिले आहे, शब्दांना, त्यांच्या उच्चारांना भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहेच ना? आणि नेमका तुमचा तीच गोष्ट विस्तृतपणे सांगणारा हा प्रतिसाद आला!!!
पुन्हा एकदा तुमच्या प्रचंड ज्ञानाची अनुभूती आली. तुमचे पोस्ट अतिशय आवडले. धन्यवाद!
सानी, तुझा लेख चांगलाच आहे.
सानी, तुझा लेख चांगलाच आहे. मला अश्या थेरपीची माहिती आहे. व थोड्याबहुत प्रकारे अनुभव ही आहे. माझ्याकडे ही कवितांची वही आहेच. पण त्या फार वैयक्तिक स्वरूपाच्या असल्याने इथे लिहीत नाही. येथील आवड्लेल्या कविता कवीस सांगून लिहून घेते.
तू लिही. इन फॅक्ट सायकॉलॉजीवर अजून लिही.
पहिले इथे महिन्यातील सर्वोत्क्रुष्ट कविता निवड्त असत पण आजकाल ते दिसत नाही.
अश्विनीमामी जसे जसे प्रतिसाद
अश्विनीमामी
जसे जसे प्रतिसाद येत जातील, तसे तसे मी लिहित जाईन आणि सायकॉलॉजीवर अजूनही काही नवीन विषय सुचले तर त्यावरही लिहीन... नक्कीच!!!
<<तर माझा मुद्दा असा आहे. की
<<तर माझा मुद्दा असा आहे. की स्वर बाजूला केल्याशिवाय, शब्दांची ताकद, स्वतंत्रपणे जाणवणार
नाही. आणि आपण इथे केवळ शद्बांची ताकदच बघू या.>>दिनेशदा, अगदी खरंय. पण मला असंही प्रामाणिकपणे वाटतं कीं कवितेतील शब्दांची ताकद ही त्यांची उपजत नसते; त्या शब्दाभोवती गुंफले गेलेले तरल अन्वय, संदर्भ इ.चा कवीने किती चपखल उपयोग केला आहे यातूनच ती ताकद येत असते. सुरेश भटांच्या कविता वाचताना अगदी साधे, बाळबोध शब्दही जेव्हां दंड थोपटून तुमच्यापुढे उभे रहातात, त्यावेळी याची अनुभूति येते. आणि म्हणूनच कवितेच्या विषयापेक्षाही शब्द व प्रतिमा यांचा कवीने उभा केलेला डोलाराच रसिकाना भावतो. प्रेयसी सोडून गेली, या एकाच विषयावर अर्धीअधिक उर्दू शायरी असावी व तरीही तिच्यात रसिकाना मोहिनी घालायची जादू शब्द व प्रतिमा यांच्या संमिश्रणामुळेच येते, असं मला वाटतं. दिनेशदा, या पार्श्वभूमिवर <<ततं काहि सन्माननीय अपवाद वगळले तर मला कविता म्हणजे वैयक्तीक दू:ख कुरवाळणारी रडगाणी वाटतात. त्यातून सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न वाटतात>>
हे आपलं विधान [ अगदी वैयक्तीक असलं तरी] कवी व कविता यांवर कांहीसं अन्यायकारक असल्यासारखं नाही वाटत ? आपल्याबद्दल आत्यंतिक आदरामुळेच प्रांजळपणे हे मांडतोय.
दिनेशदा, तुमच्यासोबत माझी
दिनेशदा, तुमच्यासोबत माझी भाऊंनी मांडलेल्या मुद्दयावर चर्चा झाली होतीच... आता मी ही तुमच्या उत्तराची वाट पाहतेय...
ह बा प्रतिसादांवर उत्तर लिहितांना तुमचे नाव नेमके कसे सुटले क्षमस्व त्याबद्दल तुम्ही तर लेख निवडक दहात पण नोंदवलात... खुप खुप धन्स.... तुम्हीही कवितेतले ज्ञानी आहात आणि तुमच्या प्रतिसादाची पण मी वाट पाहत होते. तुम्ही केलेल्या काही कवितांचे रसग्रहण मी अतिशय एन्जॉय केले आहे.
सानी मी वाचला. पण प्रांजळपणे
सानी मी वाचला. पण प्रांजळपणे सांगायचे झाले तर परत एकदा वाचतो आणि मग प्रतिसाद देतो. सगळ्या प्रतिसादांमुळे गोंधळलो आहे थोडासा.
भाऊ, इथे अनेक वर्षे कविता
भाऊ, इथे अनेक वर्षे कविता वाचतोय, त्यातून निघालेला सारांश आहे तो.
पुर्वी इथे ऋतू येती ऋतू जाती, अशा विषयावर कविता मागवल्या होत्या.
त्या विषयावरही ऋतूंशी संबंधित दोन ओळी, आणि परत तेच ते आणि तेच ते. (एखाद दुसरा अपवाद)
त्यावेळी मी लता मन्नाडे चे, एक पुर्ण गाणे माझ्या रंगीबेरंगी पानावर लिहिले होते.
(हमदर्द सिनेमातले, रितु आये रितु जाये सखी री) आशाचे, जिवलगा कधी रे येशील तू, हे पण त्याचे उत्तम उदाहरण होते.
आता भटांचेच नाव घेतले आहेत तर
भोगले जे दु:ख त्याला...
काहि बोलू शकतो का त्यापुढे आपण ? खरे तर तिथे नेमके काय भोगले याचे वर्णन नाहीच. पण तरिही तो सल नेमका पोचतो कि नाही ? (यात श्रीधर फडके आणि आशा यांचा सिंहाचा वाटा आहे, तरिही मूळ शब्द समर्थ आहेतच.)
आता आणखी दोन मुद्दे,
सत्यजित म्हणतोय, समुहात उठून दिसावे म्हणून... शक्यता आहे. तिथूनच सुरवात झाली असेल. पण तसे असेल तर इतरांपेक्षा वेगळे काहितरी करुन दाखवायला नको का ?
आणि ह बा नी संतांचा दाखला दिलाय. माझा काही संतसाहित्याचा अभ्यास नाही. पण अभंग आवडीने ऐकतो. गेली ३५ वर्षे आई, नेमाने घरात अभंग गातेय.
या अभंगात देवाकडे काही मागणे क्वचितच दिसते. देवाला चक्क शिव्या घालणार्याहि रचना आहेत (विठ्ठल म्हणजे जबरी भूत गं बाई, विठ्या तूझे मढे गेले ) देवाची स्तुति पण फारशी नाही. बहुतांशी आहे ते प्रबोधन. सामान्यानी ज्ञानी व्हावे, यासाठिची अंतरीक तळमळ, "ऐश्या कळवळ्याची जाति" वेगळीच हो.
जिथे गीतेतला कृष्ण सुद्धा, दुष्टांचे निर्दालन करण्याचे वचन देतो, तिथे ज्ञानेश्वर माऊली म्हणते,
जे खळांची व्यकंटी सांडो, तया सत्कर्मी रति वाढो..
म्हणजे त्यांना फक्त खलपुरुषांचे, खलत्व नाहीसे व्हावे असे वाटते, एक व्यक्ती म्हणून त्यांचा द्वेष नाही, तसा माऊलीला कुणाचाच द्वेष नाही. या पदाला ते सर्व पोहोचले होते, म्हणून त्यांना संत म्हणायचे.
त्यांच्या काव्यात कुठला आलाय स्वार्थीपणा ? हा सामान्यांच्या प्रति अत्यंत जिव्हाळा, हिच त्यांच्या काव्यामागची प्रेरणा नव्हती का ? मग त्यातून सहज सोपे, ज्यांच्यासाठी ते लिहिले, त्यांना समजतील, त्यांच्या नित्यजीवनांतील दाखले देत, अभंग निर्माण झाले.
शिवाय त्या रचना, त्यांनी गाऊनच दाखवल्या असतील. विवेचनही केले असेल. त्याकाळी लिहिण्याची प्रथा थोडी आणि वाचण्याची तर त्याहून थोडी होती. मग ते लोकांच्या सतत कानावर पडावेत म्हणून गायनाची योजना केली गेली. तर माझा मुद्दा असा, कि त्यांच्या रचना, या केवळ एक प्रबोधनाचे माध्यम होत्या. आणि त्यांची मानसिक गरज त्यांच्यापेक्षा, त्या काळच्या समाजाला जास्त होती.
आता परत कवितांकडे वळू या. या रचना करुन नेमका कुठला आनंद कविं लोकांना मिळतो ?
माझा पुतण्या मराठी माध्यमात शिकला. अक्षरओळख झाल्यावर, सराव म्हणून त्याच्या शिक्षिका त्याला, काना मात्रा नसलेले, उकार नसलेले तीन अक्षरी शब्द लिहायला सांगायच्या. ते त्याने फारच मनावर घेतले होते. कुठल्यातरी तीन अक्षरांची आगगाडी लावून, दिनू असा शब्द आहे का, असे मला विचारत रहायचा. त्यात कधीकधी त्याच्या वयाला न शोभणारे पण तरीही अर्थपूर्ण शब्द तयार व्हायचे.
उदा चळत, सरण. असा शब्द आहे, असे सांगितले तर तो त्याचा अर्थ विचारायचा. आणि मग त्याला होणारा आनंद, अवर्णनीय असायचा. जणू त्यानेच तो शब्द शोधला आहे, असा त्याचा आव असायचा. कविता लिहून झाल्यावर, असा आनंद होतो का ?
सत्यजितचाच मुद्दा पुढे नेत... कविता लिहून झाल्यावर, काहि समूहाची आपल्याला मान्यता मिळते. काहिजण प्रतिसाद देतात. कदाचित आपल्यातला मानतात. अशा समजातून येणारी, सुरक्षितता हे कारण असावे का ?
इथल्याच ताज्या उदाहरणातून सूचलेला विचार. वरकरणी सामान्य वाटणारा विचार, निव्वळ या फॉर्ममधे बसवण्यात कुणाला यश आले, तर ती कृति म्हणजे काही अचिव्हमेंट आहे असे मानले जाते का ? हा विचार माझ्या मनात यायचे कारण, म्हणजे दुसर्या कुणाची तरी, ती रचना आहे, हे लक्षात आल्यावर, इथल्या प्रतिक्रिया अगदी तीव्र होत्या. अपशब्दांपर्यंत मजल गेली होती.
सो सानी, ओव्हर टू यू . या माझ्या शंकांचे निराकरण करावे !!
भाऊ, प्रांजळपणा आवडला. माझा
भाऊ, प्रांजळपणा आवडला.
माझा आणखी एक मुद्दा, कि कविता लिहिण्यामागे हेतू काहीही असला, तरी त्यात पुर्वासुरींची रि ओढण्यात काय अर्थ आहे. ? आणि ज्यावेळी वेगळ्या वाटा शोधल्या जातात, त्या त्या वेळी लक्षणीय रचना तयार होते (भले त्याला इथे कै च्या कै म्हणत असतील )
मी प्रोजेक्ट नाही केला, किंवा ट्वींकल ट्विंकल या रचना मला खुप आवडल्या. त्यात ओढून ताणून काही केल्यासारखे वाटलेच नाही,
प्रतिमांचा डोलारा, संदर्भ सगळे मान्य. पण ते नाहि दिसत हो इथे !
दिनेशदा, तुम्ही
दिनेशदा, तुम्ही लिहिलेतः
पुर्वी इथे ऋतू येती ऋतू जाती, अशा विषयावर कविता मागवल्या होत्या.
त्या विषयावरही ऋतूंशी संबंधित दोन ओळी, आणि परत तेच ते आणि तेच ते. (एखाद दुसरा अपवाद) यावरुन तुमच्या भावना वैतागाच्या वाटतायत.... हा काय खेळ होता का मायबोलीवर? तुमचा मुद्दा स्पष्ट झाला नाहीये मला असो,पण जर तो एक खेळ असेल, तर त्याकडे खेळकरपणे पाहायला काय हरकत आहे?असे आपले मला वाटते. नेहमीच काहीतरी गंभीरच किंवा कन्स्ट्रक्टिव्हच करावे अशी अपेक्षा कशाला?
भटांच्या भोगले जे दु:ख त्याला... ह्यात जरी नेमके काय भोगले याचे वर्णन नसले तरीही सोप्या भाषेत भोगांविषयी लिहिले आहे. एवढे मी भोगले की मज हसावे लागले... ह्याचे कोणीही जनरलायझेशन करु शकते. म्हणूनच मी आपल्या चर्चेत लिहिले होते, की मला सहज समजणार्या रचना आवडतात. पण पुन्हा सांगेन, की असे थोडेच का होईना, असे लोक असतील, ज्यांना आपल्यासाठी अनाकलनीय असणार्या रचना समजत असतील आणि समजत नसल्या तरी त्या समजून घेण्यात, त्यांचा अर्थ लावण्यात किंवा त्यांना अर्थ देण्यात त्यांना आनंद मिळत असेल. त्यात आपल्याला काय हरकत असावी ?? शेवटी माणूस जीवनात आनंद शोधत असतो, तो दुसर्याचे काहीच वाईट न करता त्याला मिळाला की आपल्याला बास ना! पण तो ज्या आनंदाच्या शोधात आहे त्यात जर त्याचेच नुकसान होत असेल, तर मात्र मित्र म्हणून त्याला आपण त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा...
तुम्ही लिहिलेत,
सत्यजित म्हणतोय, समुहात उठून दिसावे म्हणून... शक्यता आहे. तिथूनच सुरवात झाली असेल. पण तसे असेल तर इतरांपेक्षा वेगळे काहितरी करुन दाखवायला नको का ? आहो, 'कविता करणे' ही अतिशय कॉमन गोष्ट आहे असे तुम्हाला वाटते काय? आणि कविता काय सगळेच करतात का? ते न करणार्या इतरांपेक्षा कवी हा वेगळाच नाही का? हा तर सापेक्षतेचा मुद्दा झाला! आणि समजा, एक अख्खा समूह कविता करण्यात बुडालाय असे धरुन चालले तरीही ज्याच्या कवितेला सर्वाधिक दाद मिळते, तो इतरांमधे उठूनच दिसेल ना? म्हणजे सत्यजितने सांगितलेले गृहितक खरेच ठरले, नाही का?
आता संतांच्या रचनेमागच्या उद्देशाविषयी... तुम्ही म्हणताय तशी संतांची मानसिक गरज त्यांच्यापेक्षा, त्या काळच्या समाजाला जास्त होती. हे खरेच... आणि मी म्हणेन- संताची मानसिक गरज होती समाजाला सुधारणे. हे मी लिहिलेय, ते निव्वळ शब्दांचा खेळ करायचा म्हणून नाही तर मानसिक गरज ही व्यापकही असू शकते, याचा विचार व्हावा म्हणून. आपल्या समाजातील वाईट रुढी बंद व्हाव्या, आळशी लोकांना कार्यक्षम बनवता यावे, लोकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी, म्हणजेच थोडक्यात समाज सुधारावा ही होती संतांची मानसिक गरज... इंग्रजी मध्ये ज्याला selflessness म्हणतात, तो संतांच्या ठायी होता आणि तसा लोकांमधे निर्माण व्हावा, ही होती संतांची मानसिक गरज. स्वार्थी समाजाला संतांची गरज नव्हतीच मुळी!!! तो समाज आपल्या आत्मकेंद्रीत आयुष्यात सुखीच होता ना!!!! असो, हे तर विषयांतर झालं... पण संतांनी आपले विचार सुलभपणे लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी अभंगकाव्याचा उपयोग केला, हे नक्की आणि त्यावरुन सिद्ध होते, की काव्य हे विचार पोहोचवण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.
तुम्ही कवी लोकांच्या आनंदाविषयी विचारतांना तुमच्या पुतण्याचे उदाहरण दिलेत...त्याला ते शब्द तयार झाल्यावर होणारा आनंद हा स्वनिर्मितीचा होता दिनेशदा, हे मी अगदी शपथेवर सांगते! माझा अगदी डिट्टो अनुभव आहे, पण इंग्रजी भाषेविषयीचा. माझ्या बाबांच्या मित्राचा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता. मी नुकतीच इंग्रजी शिकायला लागले होते, पाचवीत असतांनाची गोष्ट.... इंग्रजी बाराखडीची नुकतीच ओळख झालेली होती आणि मी त्या दादाला काहीही अल्फाबेट्स एकत्र लिहून दाखवत होते आणि त्यांचा अर्थ विचारत होते. त्या अल्फाबेट्स मधून अर्थपूर्ण शब्द तयार झालाय, असे त्या दादाने मला सांगितले, की मला कोण आनंद व्हायचा!!! हा शब्दांचा खेळ मी त्याच्याशी कितीतरी वेळा खेळले होते. आता यात कसला आलाय आव??? तुमच्या भाच्याचा तरी आव होता असं कसं म्हणता येईल? तसेच कवींना सुद्धा रचना करुन असाच काहीतरी आनंद मिळत असावा असा तुमच्या मुद्दयाचा रोख दिसला... तर माझ्यापुरते याचे उत्तर हो आहे... त्यांना मिळत असणारा आनंद हा स्व-निर्मितीचा आनंद आहे आणि त्यात मला तरी कुठलाच आव वगैरे दिसत नाही...आता असेल काही कवींना असे वाटत की आपण फार मोठे कवी आहोत आणि तसा ते आव आणतही असतील, पण सरसकट सर्वांनाच हे लागू नाही होत, नाही का?
असो, इथले ताजे उदाहरण म्हणजे काव्यचौर्याचे... ह्याचा कुणाच्या काव्यात्मक अॅचिव्हमेंटशी संबंध का जोडायचा? ती कविता एक काव्य म्हणून थोर होती आणि तिची चोरी झाली म्हणून इथल्या प्रतिक्रिया तीव्र झाल्या असं वाटतंय का तुम्हाला? माझ्या मते, दुसर्या कोणीतरी केलेली ती रचना आपल्या नावावर खपवली, ह्या मनोवृत्तीला आळा बसावा हाच त्या तीव्र निगेटिव्ह प्रतिसादांचा उद्देश होता. मला वाटतं, जर ती चोरी एखाद्याच्या लेखाची, कलाकृतीची असती- तरीही इतकाच गदारोळ झाला असता माबोवर...
मी तुमच्या शंकांचे निराकरण केले असावे असे वाटते... हो ना दिनेशदा?
हा काय खेळ होता का मायबोलीवर?
हा काय खेळ होता का मायबोलीवर? >>> हा खेळ नव्ह्ता. इथे काही नावाजलेल्या कवींनी/गझलकारांनी गझल कार्यशाळा घेतली होती. त्याबद्दल माहिती इथे मिळेल.
धन्स सिंडरेला...
धन्स सिंडरेला...
Pages