कविता करणे - एक मानसोपचार - काव्योपचार पद्धतीची ओळख!

Submitted by सानी on 13 September, 2010 - 11:13

प्रेरणा: दिनेशदा

केवळ आणि केवळ दिनेशदांच्याच प्रेमळ आग्रहाखातर मी ह्या विषयात पडले. अन्यथा मी कविता हा माझा प्रांत नाही असेच मानते. काही वेळा केवळ गंमत म्हणून मी काही रचना केल्या आहेत आणि काही वेळा काही मोजक्याच पण आवडणार्‍या कवितांवर प्रतिसाद लिहिले आहेत, या पलिकडे माझा कवितेशी काही म्हणता काही संबंध नाही.

त्याचे झाले असे, मी नुकतीच एक कविता रचली आणि दिनेशदांच्या विपुत तिची रिक्षा फिरवली. मग काय, मला अपेक्षा सुद्धा नव्हती असे काहीसे घडले. दिनेशदांचे कवितेविषयीचे मत समजले आणि आमची ह्या विषयावर खुप चर्चा झाली. कवींविषयी, कवितांविषयी आणि प्रतिसादकांविषयीही आम्ही भरभरुन बोललो.

माबोवर येणारे कवी- काही फुटपट्टी घेऊन रचना करणारे, काही मुक्तछंदवाले, काही यमकं जुळवणारे, काही अनाकलनीय असे लिहिणारे, काही कवितेतून कथा सादर करणारे तर काही कवितेतून आधार शोधणारे- दु:खी मनाचे कवी ह्या सगळ्यांविषयी आम्ही बोललो.

शिवाय या कवींना प्रतिसाद देणारे- काही नुसतेच प्रशंसा करणारे- छान, सुंदर, मस्त असा प्रतिसाद देणारे, काही केवळ टिका करणारे- फालतू, वाईट इत्यादी शेरे मारणारे, काही कवितेचे विवेचन, रसग्रहण, विस्तार करणारे, काही कवितेकडे निखळ मनोरंजन म्हणून बघणारे तर काही कवितेकडे कुचेष्टेच्या उद्देशाने पाहणारे, काही जण मात्र कवितेकडे, कवीकडे सहानुभूतीच्या दृष्टीकोनातून बघणारे, कवीच्या लेखनातल्या तृटींकडे आपुलकीने पाहून त्यांच्यात सुधारणा व्हावी म्हणून मनापासून झटणारे याही विषयी आम्ही बोललो....

मी मानसशास्त्राची विद्यार्थीनी असल्याने अभ्यासात शिकलेले काही थोडे-फार मुद्दे नकळतपणे माझ्या बोलण्यात उतरले, त्यावरुन दिनेशदांनी मला या विषयावरच लेख लिहायला सांगितला!!! झालं....मी चर्चा वगैरे करायला एका पायावर तयार आहे हो दिनेशदा!!!! पण लेख वगैरे, तो ही कवितेवर आणि कळस म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून लिहायचा, म्हणजे फारच झालं... एकतर माबोवर इतकी ज्ञानी मंडळी आहेत. मी त्यांच्या कवितेवरील समिक्षा, विचार सर्व वाचलंय, तेंव्हा मी लिहिणार तरी काय आणि कसं याचं माझ्या मनावर प्रचंड दडपण आलं...आणि मी हा विषय लिहायचं कायम टाळत आले, ते आजपर्यंत. पण आज...आज नाही टाळू शकले. आज पुन्हा दिनेशदांची आज्ञा आलीच...आणि ती का आली हेही माहितीये...

एका दु:खी मनाच्या एकाकी कवीने एक मोठं पाप केलं...काव्यचौर्याचं!!!!आणि ते उघडकीस आलं. मग पुन्हा सुरु झालं एक चर्चासत्र...त्या चर्चासत्रातच एक मुद्दा पुढे आला- या आणि अशा सर्व निराशाजनक काव्यलेखन करणार्‍यांकडे मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहता येईल का??? आणि मग आलेली दिनेशदांची आज्ञा...तेंव्हा आता 'तशा' दृष्टीकोनातून पाहण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. पहा, आवडतोय का... Happy

*****************************************************************************************************************

"In the desert of the heart Let the healing fountain start."
- W. H. Auden

कवितेच्या माध्यमातून मनात दाटून आलेल्या भावनांचा निचरा होतो, हे मानसशास्त्रीय गृहितक आहे. कवितेतून नुसते एवढेच साधले जात नाही, तर मनातल्या जखमा भरुन काढण्याचे सामर्थ्यही कवितेत असते. त्यामुळे मानसशास्त्रीय उपचारपद्धतीमधे पोएट्री थेरपीला(काव्योपचार-पद्धती) एक वेगळेच स्थान प्राप्त झाले.

थेरपीसाठी येणार्‍या, मनमोकळ्या गप्पा मारु न शकणार्‍या, आपल्या भावना बोलून व्यक्त करु न शकणार्‍या मनोरुग्णांना कविता करायला सांगण्यात येणे किंवा त्यांनी लिहिलेल्या कविता वाचून त्यांच्या मनातले जाणून घेण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या गरजा ओळखून त्यांना योग्य तो सल्ला देणे, त्यांच्या निरोगी, निकोप मानसिक वाढीसाठी योग्य ती दिशा देणे यालाच म्हणतात पोएट्री थेरपी. याविषयी अधिक माहिती गोळा करायला गेले, तेंव्हा फार छान माहिती हाती आली. ती तुम्हा सर्वांसोबत शेअर करायला नक्की आवडेल.

(डिस्क्लेमरः खाली देतेय ती माहिती म्हणजे पोएट्री थेरपी या विषयाशी संबंधित आंतरजालावर सापडलेल्या लेखांचा निव्वळ अनुवाद/ भाषांतर आहे आणि त्या लेखांचे दुवे तळाशी दिले आहेत. )

कविता लेखनाला नेमकी सुरुवात कुठून आणि कशी झाली असावी???
वाचून आश्चर्य वाटेल, पण त्याच्या खुणा अगदी आपल्या आदीमानवाजवळही सापडतील! प्राचीन काळापासूनच अस्तित्वात असलेले होम-हवन हे त्याचेच एक उदाहरण आहे... अति-प्राचीन काळात (म्हणजे इसवीसन पूर्व हजारो वर्षे) इजिप्तमधे कवितेचे शब्द लिहून ते एका पेयात विरघळून रुग्णाला प्यायला दिले तर तो लवकर बरा होतो, अशाप्रकारच्या उपचाराचे दाखले सापडलेले आहेत.

मात्र, पहिल्या काव्योपचारपद्धतीची नोंद मात्र इ.स. पहिल्या शतकात झालेली आहे. रोमन फिजिशियन सोरानसने त्याच्या मेनियाक (सकारात्मक भावनांची अतिशय उच्च पातळी, जसे, अत्यानंद) रुग्णांना शोकांतिका (दु:खी, निराशाजनक) तर डिप्रेसिव्ह रुग्णांना सुखांतिका कविता लिहायला प्रवृत्त केले.

त्यानंतर मात्र अनेक शतके काव्य आणि वैद्यक यांचा मेळ बसवणारे असे काहीच घडले नाही. एकदम १७५१ साली अमेरिकेत बेंजामिन फ्रँकलिन यांनी स्थापन केलेल्या पेन्सिल्व्हेनिया हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी 'साहित्यिक उपचारांची' सुरुवात करण्यात आली. यात रुग्णांना वाचन आणि लेखन करायला सांगून त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यात आले. अमेरिकन सायकियाट्रीचे जनक म्हणून संबोधले जाणारे डॉ. बेंजामिन रश यांनी संगीत-उपचार पद्धतीची जगाला ओळख करुन दिली. मनोरुग्णांना कविता लिहायला सांगून खास त्यांच्यासाठी असलेल्या "द इल्युमिनेटर" या वर्तमानपत्रात त्याला प्रसिद्धी सुद्धा देण्यात येत असे.

त्यानंतर १९६० ते १९७० या या काळात बिब्लिओथेरपी अधिक नावाजली. बिब्लिओथेरपीचा शब्दशः अर्थ म्हणजे वैद्यकीय मदतीसाठी साहित्याचा उपयोग करणे.

नंतर मात्र काव्योपचार पद्धती खर्‍या अर्थाने नावारुपाला आली. "मी नाही, पण कविताच नेणीवेचा शोध घेते" असे मनोविश्लेषक सिग्मण्ड फ्रॉईड म्हणून गेला. त्यानंतर अ‍ॅडलर, युंग, अ‍ॅरिटी, आणि राईकने सुद्धा फ्रॉईडच्या संशोधनावर शिक्कामोर्तब केले. मोरेनोने सायको-पोएट्री, सायको-ड्रामा हे शब्द प्रचलित केले. १९६० साली पोएट्री-थेरपी नावाने एक समविचारी लोकांचा गटही स्थापन झाला. ज्याचा नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात-जसे शिक्षण, पुनर्वसन, ग्रंथशास्त्र, मनोरंजन, आणि सर्जनशील कला यात अधिक चांगला व्यापक असा विस्तार होत गेला.

काव्योपचार संघटनेची स्थापना:
१९२८ सालात अली ग्राईफर या मुळात फार्मासिस्ट आणि व्यवसायाने वकील असणार्‍या कवीने कवितेत मनाच्या जखमा भरुन काढण्याची ताकद असते अशा संदेशाची प्रचारमोहिमच हाती घेतली. ह्या काव्यमोहिमेसाठी त्याने आपले आख्खे आयुष्यच वाहून घेतले. त्याच्याचसारखे नंतर अनेक लोक होऊन गेले. कवितेला दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी, अनेक संस्थांचीही निर्मिती झाली.

नॅशनल असोसिएशन फॉर पोएट्री थेरपीची १९८१ साली स्थापना झाली. ही असोसिएशन चालवत असलेल्या पोएट्री-थेरपीची मुख्य उद्दिष्ट्ये:
१. स्वतःला आणि इतरांना समजून घेण्यातली अचूकता वाढवणे.
२. सर्जनशीलता, व्यक्त होण्यातला सुस्पष्टपणा, आणि आत्म-सन्मान वाढवणे.
३. व्यक्ती-व्यक्तींमधील संवाद आणि सुसंवाद कौशल्ये वाढवणे.
४.नवीन कल्पना, माहिती, प्रचिती यांच्यातून नवीन अर्थ शोधणे आणि
५. बदलांशी जुळवून घेण्यासाठी, ते आत्मसात करण्यासाठी नवीन वातावरण निर्मिती करणे.

या संघटनेची वाटचाल अजूनही चालूच आहे. या संघटनेच्या आणि नॅशनल कोलिशन ऑफ क्रिएटिव्ह आर्टस, थेरपीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च २०१० मध्ये पोर्टलंड येथे "क्रिएटिव्ह आर्ट्स थेरपी विक" साजरा करण्यात आला.

******************************************************************************************************************

पोएट्री थेरपीविषयीची माहिती हा कवितेकडे पाहण्याचा एक निराळा पैलू म्हणून लिहिली आहे. बाकीच्या पैलूंवर आपण सगळे मिळून चर्चा करुया. हा लेख म्हणजे कवितेविषयी चर्चेचे मुक्त व्यासपीठ व्हावे ही मनापासून इच्छा!!!
चला, तर मग माबोकर, आपणही कवितेकडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहूया... माझे या विषयातील मर्यादित ज्ञान आणि चिंतन आणि तुमचा त्यातील अभ्यास याचा मेळ घालून ही चर्चा पुढे नेऊ या Happy

संदर्भः
http://www.poetrytherapy.org/articles/pt.htm
http://www.poetrytherapy.org/government_affairs.htm
http://www.poetryconnection.net/poets/W._H._Auden/18489
http://www.nccata.org/poetry_therapy.htm
http://www.poetrymagic.co.uk/literary-theory/freud.html
http://ecam.oxfordjournals.org/cgi/content/full/2/2/161
http://www.recover-from-grief.com/grief-poem.html
http://www.poetrymagic.co.uk/therapy.html
http://www.spcsb.org/pdfs/resources/a-poetry_as_therapy.pdf

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ओहो....

बिब्लीओथेरपि आमच्या सायकीअ‍ॅट्री त असल्याने ज्ञात होतं.... म्युझिक थेरपी ही माहित आहे.. पण काव्योपचार सानी मुळे माहीत झाला...

Bibliotherapy is an adjunct to psychological treatment that incorporates appropriate books or other written materials, usually intended to be read outside of psychotherapy sessions, into the treatment regimen.

पोएट्रीत हीलींग पॉवर आहे आणि मूड डिसऑर्ड्र्स वर खूप प्रभावीरित्या वापरता येते.. फक्त सायकोथेरपिस्ट तितका तज्ञ लागतो.

आम्ही कविता/गझल्स लिहिणारे .. ह्या गझला लिहून स्वःतावर मानसोपचार करतोय असं चित्र तरळू लागलंय डोळ्यासमोर.

हा लेख सुरु केल्याबद्दल धन्यवाद.

पहिल्याच आणि इतक्या सविस्तर आणि माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल अनेक आभार डॉक Happy

आम्ही कविता/गझल्स लिहिणारे .. ह्या गझला लिहून स्वःतावर मानसोपचार करतोय असं चित्र तरळू लागलंय डोळ्यासमोर.>>>> Lol

कवितेच्या माध्यमातून मनात दाटून आलेल्या भावनांचा निचरा होतो, हे मानसशास्त्रीय गृहितक आहे.

पण हा निचरा दुसर्‍याच्या कविता आपल्या नावावर खपवून कसा व्हावा?

kleptomaniac or an addictive compulsive thief....? काय म्हणावं?.... Uhoh

बरोबर आहे डॉक, पण चौर्यकर्मासाठी कुठली कविता वापरली गेली आणि कोणत्या उद्देशाने- यावरही विश्लेषण करता येईल आपल्याला Wink Happy अर्थातच, चोरीचे कुठलेही समर्थन नाहीच. पण चोराच्या दृष्टीकोनाचा विचार मात्र नक्की करायला हवा, ज्याने त्याने आपआपल्या पद्धतीने Happy आणि चोराला अजून नव्या चोर्‍यांपासून परावृत्त करता आले म्हणजेच त्याच्यात काही अंशी तरी सुधारणा झाली असे म्हणता येईल....

काव्य चोरी,ही.. स्वताला कविता येते असा स्वताचा अहं कुरवाळणे आणि इतरांनी तारीफ करावी या ''सुप्त'' भावनेपोटि केली जाते...... इथे माईंड गेम येतो..... सचेत ट्रान्स, चोरी वाईट हे बजावत असतो.... तर वाईट मन '' जाउ दे.. काय होतंय?'' ही भावना जागवत असतो....

आपल्या सभोवताली चे वातावरण अनुकूल्,प्रतिकूल यावरुन आपण चोरी करु अथवा नाही हे ठरते...... यात बराच भाग संस्कारांचाही येतो.......

आपल्या संस्कारांत ''हे'' वाईटच असे बजावलेले असेल.... तर कितीही मोह होवून सुद्धा माणूस वाईट कृत्य करत नाही.

चांगली माहिती दिलीत सानी.
ते ईजिप्तचे कविता विरघळवून पाण्यातून दिल्या असता रुग्ण बरा होतो मात्र काय पचले नाही.

आपल्या संस्कारांत ''हे'' वाईटच असे बजावलेले असेल.... तर कितीही मोह होवून सुद्धा माणूस वाईट कृत्य करत नाही.>>> अगदी बरोबर!

चोराला तसेच कुठलेही वाईट काम इतरांपासून लपवून करणार्‍याला आपले ते वर्तन उघडकीस येणार नाही ही खात्री असते. म्हणूनच तो निर्धास्तपणे तसले कर्म करतो. हा एक प्रकारचा चोर.
तसेच असे कर्म न करणारा पण मनात तशी इच्छा मात्र बाळगून असणारा- जो केवळ ते वर्तन उघडकीस येईल, ह्या भीतीने गप्प राहणारा- हा दुसर्‍याप्रकारचा चोर- दोघांनाही एकाच तराजूत तोलता येतील... संस्कारांचा आभाव असणार्‍या...

माणसाच्या खर्‍या स्वभावाची ओळख तो कुठल्याही दबावाखाली नसतांना कसा वागतो यातून होते. तेच त्याचे खरे संस्कार असतात.

HH धन्स गं... ते ना इसवीसनाच्याही आधी अनेक वर्षांपूर्वीचं आहे गं Happy तेंव्हा लोकांच्या मनात काय काय समजूती असतील ना! मला सुद्धा तो जरा मजेशीरच प्रकार वाटला Happy

कवितेतून अभिव्यक्ती व्यक्त होत असते, हे जरी खरे असले तरी
अभिव्यक्ती व्यक्त होण्याचे 'कविता' हे एकमेव साधन नाही.

बोलणे,संवाद,चर्चा,वादविवाद,पद्य लेखन आणि गद्यलेखन यातूनही त्या-त्या व्यक्तीची एकंदरित प्रवृत्ती (अभिव्यक्ती) स्पष्ट होतच असते.

शरीरभाषा(Body language), हालचाल,चेहर्‍याचे हावभाव,डोळ्यांची परिभाषा,वेशभुषा,आवडनिवड यातूनही त्या-त्या व्यक्तीची एकंदरित प्रवृत्ती (अभिव्यक्ती) स्पष्ट होतच असते.

रोगावर उपचार करताना वरीलपैकी कोणत्या प्रकाराचा वैद्यकीय मदतीसाठी उपयोग करायचा हे रोग आणि रोग्यापेक्षा तज्ज्ञाच्या प्रकृतीवरच जास्त अवलम्बून असते, असे मला वाटते. यात कवितेला काही वेगळे स्थान आहे, असे मला मुळीच वाटत नाही. Happy

दुसरी बाजू:
काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्या अभिव्यक्तीचा कशातूनच अजिबात थांगपत्ता लागतच नाही. Happy

सानी, लेख आवडला.
या निमित्ताने ज्ञानी व्यक्तींचे विचार वाचायला मिळतील ही आशा/अपेक्षा/इच्छा आहे.

सानी खुप छान विचार अन खुप सोप्या आणि छान पद्धतीने मांडलास.
हे वाचल्यावर मी माझ्या कविता लेखनाच्या प्रक्रियेकडे थोडे वळून पाहिले. [अर्थात मी स्वतःला कवी वगैरे मानते बरं का. इतर मानोत अथवा न मानोत Happy ]
तू म्हणतेस तसं बर्‍याचदा असतं >>>कवितेच्या माध्यमातून मनात दाटून आलेल्या भावनांचा निचरा होतो, हे मानसशास्त्रीय गृहितक आहे. कवितेतून नुसते एवढेच साधले जात नाही, तर मनातल्या जखमा भरुन काढण्याचे सामर्थ्यही कवितेत असते.<<< पण काही कविता मात्र झाल्यानंतरही छळत राहतात. म्हणजे भावनांचा निचरा नेहमीच होतो असं नाही. काही कवितांनी तर लिहिताना छळलं नाही इतकं नंतर छळलं. [त्यावरच्या प्रतिक्रियांमुळे नाही बरं का Happy ]
त्या त्या वेळच्या भावनेचा उद्रेक / प्रतिक्रिया म्हणून त्या उतरल्या. पण त्या लिहिल्या नंतर त्यांची दाहकता अजून जाणवली.
माझी " राणी सोड आता हात " या कवितेने मला असे छ्ळले होते. मात्र एक सांगते. त्या भावनेतून मला मी जबरदस्ती बाहेर काढले तेही दुसर्‍या एका कवितेचा हात धरूनच. म्हणजे एका अर्थाने तू म्हणतेस तसे की काय ? Happy
अन कधी कधी आपल्या भावनांचा निचरा छान होतो, पण नंतर त्यावरच्या इतरांच्या भावनांचा निचरा ( खरा, स्वाभाविक अन उत्सफुर्त ) वाचताना पुन्हा थोडा भावनावेग होतोच Happy
पण मला वाटतं ज्या दु:खातून ,मग ते कोणत्याही प्रकारचे दु:ख असो त्याला ही थिअरी बहुतांशी लागू पडेल. पण आनंदातून निर्माण झालेल्या कवितांना जरा वेगळे ठोकताळे लावावे लागतील ना ?
जरा, नाही जास्तच लांबली का माझी प्रतिक्रिया ?

१९८१ नंतरचे काही कळले नाही. 'इतिहासाची पुनरावृत्ती होते' हे फार लाडके आणि गोड वाक्य वाटते. पण पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होऊन आपण त्यातून काय शिकतो, यावर कुणीतरी संशोधन केलेच पाहिजे. थेरपी कुठचीही असो. तिचे समकालीन उपयोग सापडल्याशिवाय आधुनिक शास्त्रांत मान्यता मिळणे अवघड आहे. नवकवींच्या अफाट वेगाने बदलत्या जाणीवा (आणि नेणीवा पण) बघता, नवकवितासंवर्धनासाठी वरील थेरपीज् आणि संघटना सध्या नक्की काय करत आहेत- हे जाणून घ्यायची तीव्र इच्छा आहे. अभ्यासकांनी लिहावे कृपया. त्यासाठी आगाऊ धन्यवाद. Happy

http://www.poetrytherapy.org/history.html इथल्या दुव्यानुसार
>> Historically, the first Poetry Therapist on record was a Roman physician by the name of Soranus in the first century A.D., who prescribed tragedy for his manic patients and comedy for those who were depressed. >>
तुमच्या वरच्या लेखातले ते वाक्य थोडेसे असे होईलः
मात्र, पहिल्या काव्योपचारपद्धतीची नोंद मात्र इ.स. पहिल्या शतकात झालेली आहे. रोमन फिजिशियन सोरानसने त्याच्या मेनियाक (सकारात्मक भावनांची अतिशय उच्च पातळी, जसे, अत्यानंद) रुग्णांना शोकांतिका (दु:खी, निराशाजनक) तर डिप्रेसिव्ह रुग्णांना सुखांतिकाकविता लिहायला प्रवृत्त केले.

तसेच मी वर दिलेल्या दुव्यावरील माहितीवर हा लेख बेतलेला दिसतो आहे. मराठीत ह्या लेखाचे चांगले रुपांतर आपण केले आहे. फक्त एक सुचना. बहुतेकदा अश्या प्रकारच्या लेखांमध्ये/रुपांतरांमध्ये (बहुतेकदा लेखाच्या शेवटी) स्त्रोतांची नावे दिली जातात. जसे पुस्तके/संकेतस्थळांची नावे इत्यादी. ती दिलीत तर ज्याला अधिक माहिती हवी आहे तो त्या दुव्यांच्या सहाय्याने पुढे जाऊ शकतो.

--फारेंडने सुचवल्याप्रमाणे विनोदीच्या जागी सुखांतिका असा बदल केला आहे.

सानी, माहितीपुर्ण लेख. स्त्रोत कुठलाही असो पण विशय चांगलाच आहे. यावर वाद उफाळुन न येता माहितिपुर्ण लेखन झाले तर जास्त मजा येईल..........
सानी, मुळात काही लोकांना गाणी कविता आवडतच नाहित आणि काही त्यारचतात, म्हणतात. या आवडी निवडी कश्या निर्माण होतात या फरकावर मानसशात्राच्या भाषेत अधिक प्रकाश टाक जरा.

सानी मी फक्त निमित्त झालो. हे लेखन, सर्वस्वी तूझे आहे.
हा कवितेचा बीबी नाही म्हणून मी मोकळेपणी लिहू शकतो. (मी अर्थातच काव्यरसिक नाही, केवळ वाचक आहे. आणि ही सर्व माझी वैयक्तीक मते आहेत. )

काहि सन्माननीय अपवाद वगळले तर मला कविता म्हणजे वैयक्तीक दू:ख कुरवाळणारी रडगाणी वाटतात. त्यातून सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न वाटतात. या वृत्तीचा (म्हणजे दु:ख कुरवाळत बसण्याच्या) मला मनापासून तिटकारा असल्याने, मी या कवितांच्या वाटेला जात नाही. शिवाय जे काही भोगले असेल, वा भोगावे लागत असेल, ती समोरच्याला भिडेल, इतक्या प्रभावीपणे क्वचितच मांडले जाते.

अपवाद आरतीच्या राणी सोड आता हात या कवितेचा. कदाचित ती शास्त्रोक्तपणे म्हणजे वृत्त वगैरे यात बांधून लिहिलेली नसेलही, पण तो अनुभव तितक्याच समर्थपणे त्यात मांडला होता. त्या अनुभवाची तीव्रता इतकी होती, कि ती कविता लिहायला नको होती, असा प्रतिसाद मी दिला होता.

दुसरे म्हणजे अनुभव कथनात, कवितेच्या रुपात मला तूटकपणाच जास्त जाणवतो. म्हणजे जे काही सांगायचे, ते धडपणे मांडताच आलेले नसते. आणि तो तुटकपणा लपवायला, हा फॉर्म निवडला असे वाटते. म्हणजे तोच अनुभव जर गद्यात मांडायला सांगितला, तर तो कदाचित मांडताच येणार नाही.

कविता या प्रकाराला, निदान इथे तरी मिळणारा प्रतिसाद बघून, आपली ओळख वाढवण्यासाठी, कुणी कुठल्या थराला जाईल, याचे एक अत्यंत केविलवाणे उदाहरण, आपण इथे बघितले.

कवितेत यमक जूळवताना, कधी कधी इतके हास्यास्पद शब्द योजलेले असतात, की त्या मागचा अट्टहास जाणवल्याशिवाय जाणवत नाही. असे शब्द लक्षात आले तरी, मी सांगण्याचे टाळतो, कारण ते खिलाडूपणे घेतले जातीलच याची खात्री नसते. अपवाद, अरुंधती चा. कवितेतील न पटलेली ओळ, मी दाखवून दिल्यावर, ती अत्यंत खिलाडूवृत्तीने घेतली गेली होती.

अनेक कविता मला वास्तवापासून दूर जाणार्‍या वाटतात. प्रश्नाची तड लावून मोकळे व्हावे, आतल्या आत कुढत बसू नये असे मला वाटते. आयूष्य पुढेच जात असते. (अर्थात हि माझी वृत्ती.)

दु:ख वा वेदना हा कविताविषय असू नये असे नाही. पण त्यात मी पणा नसावा असे वाटते. अनेक गीते, कि गीतकारांनी, इतरांच्या मनात जाऊन (याला ज्ञानेश्वर माउली सहानुभुति म्हणतात. सह + अनुभुति) लिहिलेली आहेत. सिनेसंगीत, भावगीतच नव्हे, तर कन्या सासुर्‍यासी जाये, वा पडीले दूरदेशी, मज आठवे मनासी, या रचनाही याचीच उदाहरणे नाहीत का ?
आपल्याच दु:खाचा बाऊ करत बसलं, तर इतरांकडे बघणार तरी कधी ? त्यागाचा गर्व होतो, तसा सहनशीलतेचाही होतो का ?
कवितेसाठी काही हमखास यशस्वी विषय इथे दिसतात. त्यापैकी एक म्हणजे, शरिरविक्रय करणारी स्त्री.
कुठलाही थेट अनुभव नसताना (प्लीज हे वाक्य त्या अर्थाने घेऊ नये) केवळ ऐकीव माहितीवर लिहिलेली कविता, मला अत्यंत उथळ वाटली होती. माझी मैत्रिण ऋचा मूळे, हिने काहि वर्षांपूर्वी मायबोली, दिवाळी अंकात, पणती नावाचा लेख लिहिला होता. त्यात अनुभवाचा सच्चेपणा होता. आणि या वास्तवापासून हि कविमंडळी दूर असतात.
कवितेने मानसोपचार होतात, हे काहि अंशी मला मान्य आहे. पण त्या शब्दात तितकीच ताकद असावी लागते. ती कागदाचा कपटा, एखादे पेय या मार्गाने न येता, या ह्रुदयीचे त्या ह्रुदयी नेणारी असेल तरच.

सानीने हा लेख लिहून, आणि आधीच्या चर्चेतही माझ्या अस्वस्थतेचे निराकरण केले होते. आभार मानायला ती काहि (वयाने) मोठी नाही पण आशिर्वाद आणि शुभेच्छा नक्कीच.
या माझ्या विचारांनी कुणाही कविला दुखवायचा माझा हेतू नाही. कदाचित कविता कळण्याइतकी समज, मला नसावी. वेळ मिळेल तशा इथल्या कविता वाचत असतो. प्रतिसाद देत नाही, त्याचे कारण माझी असमझदारी आहे.

मुटेजी, मंदार, आरती, साजिरा, टण्या, भुंगा, दिनेशदा....खुप खुप धन्यवाद इतक्या छान प्रतिसादांबद्दल.
मी कवितेतली ज्ञानी नाही, पोएट्री थेरपीतली तर नाहीच नाही. त्याचा उगम, इतिहास ह्याची अगदी उडती माहिती अभ्यासात आली होती आणि तीही विसरली गेली आहे. त्यामुळेच नेटवरील जे जे स्त्रोत सापडले, ते ते वाचून आणि आपले काही त्यात जोडून हा लेख लिहिला आहे.
म्हणूनच मी याविषयी अधिक माहिती गोळा करायला गेले, तेंव्हा फार छान माहिती हाती आली. ती तुम्हा सर्वांसोबत शेअर करायला नक्की आवडेल. हे वाक्य लिहिले...याचाच अर्थ लेखन सर्वस्वी माझे नाही. हे सर्व लिहिण्याचे कारण टण्या यांचे पोस्ट. त्यांनी दिलेल्या लिंकचा जवळ-जवळ अनुवादच केलाय मी पण तो एकच लेख नाहीये. अजूनही काही लेख होते... हवे असल्यास लिंक देईन. नव्हे देतेच...शोधनिबंध लिहितांना असे सर्व संदर्भ लिंक्स आपण देत असतो. माबोवरच्या लेखात सुद्धा द्यायला हरकत नाही... शेवटी ज्याने मेहनत केली आहे त्याला श्रेय हे मिळायलाच हवे या मताची मी आहे.

http://www.poetrytherapy.org/articles/pt.htm
http://www.poetrytherapy.org/government_affairs.htm
http://www.poetryconnection.net/poets/W._H._Auden/18489
http://www.nccata.org/poetry_therapy.htm
http://www.poetrymagic.co.uk/literary-theory/freud.html
http://ecam.oxfordjournals.org/cgi/content/full/2/2/161
http://www.recover-from-grief.com/grief-poem.html
http://www.poetrymagic.co.uk/therapy.html
http://www.spcsb.org/pdfs/resources/a-poetry_as_therapy.pdf

अजूनही बरेच...लिंक्स सेव्ह नाही केल्या.....

टण्या आणि फारएण्ड, तुमच्या सूचनांप्रमाणे लेखातल्या भागात बदल करत आहे.... (शोकांतिका, सुखांतिका) अतिशय सुंदर शब्द तुम्हाला सुचलेत. खुप खुप आभारी आहे मी तुमची... Happy अनुवादकाचे काम फारच जिकिरीचे आहे हे प्रत्येक शब्द अनुवादतांना सतत जाणवत होते... सर्व भाषांतरकार, अनुवादक यांना माझा सलाम!!!!

गंगाधरकाका ,तुम्ही फारच महत्वाचा मुद्दा मांडलात.... रोगावर उपचार करताना वरीलपैकी कोणत्या प्रकाराचा वैद्यकीय मदतीसाठी उपयोग करायचा हे रोग आणि रोग्यापेक्षा तज्ज्ञाच्या प्रकृतीवरच जास्त अवलम्बून असते, असे मला वाटते. यात कवितेला काही वेगळे स्थान आहे, असे मला मुळीच वाटत नाही. अगदी बरोबर आहे हे. १००% पटले. Happy
शिवाय तुम्ही म्हणता तसे, काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्या अभिव्यक्तीचा कशातूनच अजिबात थांगपत्ता लागतच नाही. Happy म्हणूनच तर सायकोथेरपीस्टचे काम फारच कसोटीचे असते...प्रत्येकच वेळी तो/ती यशस्वी होतेच असे नाही... माणसाचे मन हा फार फार गुढ प्रकार आहे. त्याचा थांग लावणे मोठेच अवघड काम आहे. ज्यांना ते जमते त्यांचे खरोखर कौतुक आहे. तरीही, कुणालाही ते १००% जमत असेल असे वाटत नाही, त्यामुळेच मानसशास्त्राला अ‍ॅलोपॅथीसारखा दर्जा अजून कुठे मिळालाय? आणि लोकांचा तरी त्यावर इतका विश्वास कुठे बसलाय???

मंदार, या निमित्ताने ज्ञानी व्यक्तींचे विचार वाचायला मिळतील ही आशा/अपेक्षा/इच्छा आहे. माझी पण Happy eagerly looking forward to it....

आरती, तुझा तुझ्या कवितेसोबतचा भावनिक प्रवास वाचला... तुझं शेअरींग खुप आवडलं.. आणि तुझी मोठी प्रतिक्रिया माझ्यासाठी सुखद आहे गं... Happy
तू म्हणालीस, पण मला वाटतं ज्या दु:खातून ,मग ते कोणत्याही प्रकारचे दु:ख असो त्याला ही थिअरी बहुतांशी लागू पडेल. पण आनंदातून निर्माण झालेल्या कवितांना जरा वेगळे ठोकताळे लावावे लागतील ना ? ते बरोबरच आहे... आणि त्या थेरपीज मनोरुग्णांचे मन ओळखण्यासाठी वापरल्या जातात गं. मनोरुग्ण खुप वेळा आपलं मन मोकळं नाही करु शकत. त्याची नेमकी समस्या काय आहे, हे तो/ती व्यक्त करु शकत नाही. अशा अव्यक्त भावना समजून घेतांना पोएट्री थेरपीचा उपयोग होतो. मग ते मनोरुग्ण मेनियाक असले, तर ते आनंदी कविता करतील आणि डिप्रेसिव्ह असले तर दु:खी... म्हणूनच एका मानसोपचारतज्ञाने मेनियाक रुग्णांना डिप्रेसिव्ह तर डिप्रेसिव्ह रुग्णांना मेनियाक कविता करायला प्रवृत्त केले...जेणेकरुन त्यांच्या ज्या काही भावनांचा अतिरेक होत असेल त्या न्युट्रलाईज व्हाव्या....
बाकी आपण निरोगी माणसं गं... आपल्याला दु:ख, आनंद, निराशा, उदासी येतेच, पण त्यातून स्वतःला सावरण्याची आपल्यात क्षमता असते. हाच तर आपल्यात आणि मनोरुग्णांमधला फरक असतो. Happy

साजिरा, आपण म्हणालात, १९८१ नंतरचे काही कळले नाही. म्हणजे काय? बाकी, मलाही ह्या थेरपीजचे सध्याच्या उपचारपद्धतीत काय स्थान आहे हे जाणून घ्यायला आवडेल...अभ्यासकांनी लिहावे कृपया. त्यासाठी आगाऊ धन्यवाद. Happy >>> साजिरा, अनुमोदन! Happy

भुंग्या, तू सुचवलेस, सानी, मुळात काही लोकांना गाणी कविता आवडतच नाहित आणि काही त्यारचतात, म्हणतात. या आवडी निवडी कश्या निर्माण होतात या फरकावर मानसशात्राच्या भाषेत अधिक प्रकाश टाक जरा. मी माबोवरील एक्स्पर्ट्स ना यावर प्रकाश टाकण्याचे आवाहन करत आहे. मलाही खरोखर याबाबतीत अजून जाणून घ्यायला आवडेल. यावर चर्चा व्हावी अशी मनापासून इच्छा आहे.

दिनेशदा, सानी मी फक्त निमित्त झालो. हे लेखन, सर्वस्वी तूझे आहे. हे जरी खरं असलं, तरीही, तुमचे निमित्त हा फारच मोठा प्रेरणेचा स्त्रोत होता माझ्यासाठी आणि त्यामुळे माझ्याच ज्ञानात फार भर पडली, इथे एवढी सुंदर चर्चा झाली, तुमच्या प्रेमळ आग्रहामुळे मला प्रगतीची संधी मिळाली, यासाठी मी तुमची प्रचंड आभारी आहे. Happy

अपवाद आरतीच्या राणी सोड आता हात या कवितेचा. कदाचित ती शास्त्रोक्तपणे म्हणजे वृत्त वगैरे यात बांधून लिहिलेली नसेलही, पण तो अनुभव तितक्याच समर्थपणे त्यात मांडला होता. त्या अनुभवाची तीव्रता इतकी होती, कि ती कविता लिहायला नको होती, असा प्रतिसाद मी दिला होता. मला आता ही कविता वाचण्याची खुप उत्सुकता वाटतेय... आरती कडून आणि तुमच्या कडूनही तिचा उल्लेख आला आहे. लवकरच वाचते.

तुम्ही प्रतिसादात मांडलेल्या इतरही मुद्दयांची इथे जाणकारांमार्फत चर्चा व्हावी ही तीव्र इच्छा आहे.

तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा मला आयुष्यात पुढे जायला कायम प्रेरणा देत राहतील...

दिनेशदा आणि सर्वच प्रतिसादकांना पुन्हा एकदा खुप धन्यवाद. माझ्या लेखातल्या तृटी मला दाखवत रहाव्यात आणि सुधारणेला संधी देत रहावी, तसेच माझ्यावरचा लोभ असाच कायम असू द्यावा हिच इच्छा व्यक्त करते.

आपली सानी Happy

"ते ईजिप्तचे कविता विरघळवून पाण्यातून दिल्या असता रुग्ण बरा होतो मात्र काय पचले नाही."

कदाचित् ती कविता चांगली नसेल. यापुढे तुम्ही नेहेमी मायबोलीवर बक्षीस मिळालेल्या कविताच स्वतःच्या हाताने कागदावर उतरून घेत जा, नि त्या विरघळवून प्या पाण्याबरोबर. पाण्यात थोडे आले, लिंबू नि मीठ टाकले तर जास्त सोपे होईल पचायला असे वाटते. करून बघा पुनः!

Light 1

एकुणच असल्या थेरेपी काम करीत असतीलही पण त्या केवळ कवितेच्याच माध्यमातून नाही. इतरही अनेक माध्यमं आहेत गंगाधरजी म्हणतात त्याप्रमाणे. एखादा कवि केवळ दु:खी कविता लिहीतो म्हणजे तो दु:खी असतो असे नाही. एखादा कवि बायकोवर विनोदी कविता लिहीतो म्हणजे त्याची बायको त्याला त्रास देत असते किंवा ती विनोदी असते असे नाही.

एखादा कवी मोठा लेख लिहायला वेळ मिळत नसल्याने कविता ५ मिन्टात लिहून 'मोकळा' होतो असेही होवू शकते. म्हणजे त्याचे 'थेरेपीच्या' दृष्टीकोनातून जो काही ताण होता तो कवितेतून 'मोकळे' केले असे होते काय?

सानी अन दिनेशदा खरोखर आभार तुमचे.. छान माहीती.

पण वैद्यकिय मदतीसाठी कवितेचा उपयोग म्हणजे.. पुर्वी आयुर्वेदिक औषधे बनवत असताना काही मंत्रांचे जप केले जायचे.. त्याच्याशी ह्याचा संदर्भ जुळवता येईल का ?

निवडक दहात गेला हा लेख.
बाकी मुद्द्यांवर माबोवरचे दिग्गज बोलताहेतच, मला काही सुचलं तर मीही बोलेन, विचारेन. हा लेख अजुन ५-६ वेळा तरी वाचुन होइलच. Happy

अतिशय भरीव महिती व चर्चा. धन्यवाद.
विचारमंथनाची भक्कम बैठक नसलेले पण मांडावेसे वाटणारे याविषयीचे माझे विचार -
कवि हा नेहमीच स्वतःचाच आनंद किंवा वैफल्य व्यक्त करत असतो असं नाही. त्याला तीव्रतेने जाणवलेल्या इतरांच्याही आत्यंतिक भावना परिणामकारकपणे सादर करण्यातही त्याला अभिव्यक्तीचा आनंद मिळत असतो. शब्द व प्रतिमा यांचा याकरता करायचा चपखल वापर ही पण बौद्धीक कसरत त्याला आनंद देत असावी. संवेदनक्षमता, कल्पकता, निरीक्षणशक्ती व शब्दसंपदा इ. अनेक महत्वाचे घटकही कवितेच्या बाबतीत [अर्थात, चांगल्या कवितेच्या] कर्यान्वित होत असतात.त्यामुळे, केवळ कुढत राहिलेल्या भावनाना/विचाराना मोकळी वाट करून देणं, यापेक्षाही कवितेचा आवाका खूपच मोठा व मूलगामी आहे.
त्यातल्या अभिव्यक्तीच्या भागाचा वैद्यकीय उपयोग होऊ शकतो व व्हावाही; पण संवेदनक्षमता, कल्पकता, निरीक्षणशक्ती व शब्दसमपदा इ. बाबतीत जर कुणी खूपच अपूरा पडत असेल, तर खूप चांगलं काव्यवाचनसुद्धा त्याची मदत करूं शकणार नाही, असं जाणवतं.

सानी खुप छान माहिती आहे. पण असल काही अंधश्रद्दावाल्यांना रुचत का ?
थोडक्यात जे बुध्दीच्याच फक्त स्तरावर काम करतात त्यांना संख्याशात्रीय अनुमान हवे असते. असा काही विचार कुणी केलाय का ?

.

>>पण वैद्यकिय मदतीसाठी कवितेचा उपयोग म्हणजे.. पुर्वी आयुर्वेदिक औषधे बनवत असताना काही मंत्रांचे जप केले जायचे.. त्याच्याशी ह्याचा संदर्भ जुळवता येईल का ?

सुक्या, अगदी हाच विचार मनात आला होता माझ्या.
यावर निश्चितच भाष्य व्हावे Happy

या माहितीबद्दल आभारी आहे. असे अभ्यासपुर्ण लेख खूप कमी वाचायला मिळतात.
जाणकारांची चर्चाही उद्बोधक आहे.
आवडत्या दहात घेतो आहेच... Happy

छान लेख, अभ्यसपुर्ण लेख. पण तुला काय वाटतं ते तू अजिबात लिहील नाहीस, का?

तसा कविता हा माझा पण फार आवडता विषय नाही, पण कविता का लिहीली जाते याची कारणं व्यक्ती किंवा प्रत्येक कविते गणिक वेगळी असु शकतात. माझ्या मते प्रत्येक कलागुणां मागे सारखच कारण असत, डिस्कवरी वर एक चांगला इपिसोड होता, त्यानुसार प्रत्येक प्राणी हा आपल प्रभुत्व सिद्ध करतो असतो त्या मागच प्रमुख कारण "to attract opposite sex and prove superiority among others" हे आहे. आता ह्या विधाना बद्दल लोंकांची वेगळी मत असु शकतात, मी देखिल पुर्णपणे सहमत नाही पण सुरवात तिथुन झाली असेल, अस मलाही वाटत.

वैद्यकिय मदतीसाठी > हां म्हणजे शॉक ट्रीटमेंट साठी काही कविता नक्कीच वापरता येतील Happy

<<"to attract opposite sex and prove superiority among others" हे आहे. आता ह्या विधाना बद्दल लोंकांची वेगळी मत असु शकतात, मी देखिल पुर्णपणे सहमत नाही पण सुरवात तिथुन झाली असेल, अस मलाही वाटत.>> कवितेच्या बाबतीत तरी आपले संतकवीच तर या सिद्धांताला सुरुंग लावतात असं नाही वाटत ?

Pages