गोष्ट : कापसाची म्हातारी

Submitted by सावली on 16 September, 2010 - 03:45

त्यादिवशी एक कापसाची म्हातारी मला आणि लेकीला दिसली. ती पकडे पर्यंत उडत उडत दुर गेली. आणि ती गेली म्हणुन लेकीने भोकाड पसरलं. ते आवरायला हि गोष्ट इंस्टंट्ली सुचली आणि तीला सांगितली. त्यानंतर परत संध्याकाळी एक म्हातारी दिसली तर तीने तीला उडून दुर जाउ दिलं !
-----

खूप खूप उन पडलं होतं. अंगणातली जमीन नुसती भाजून निघत होती. झाडांचा पक्षांचा जीव उन्हाने तल्लख होत होता. तेवेढ्यात कुठूनतरी वाऱ्याची एक गरम झुळूक आली आणि तिच्याबरोबर उडत आली एक कापसाची म्हातारी. म्हातारी कुठून उडत आली होती कोणास ठाऊक ? पण एवढ्या उन्हात सुद्धा ती अगदी मजेत उडत होती. उडता उडता तिला भेटली एक चिमणी. चिमणीला म्हातारी बघून गंमतच वाटली. तिने विचारलं "अरे हां कुठला नवीनच बिनपंखाचा पक्षी?"

म्हातारी म्हणाली "अगं चिमणे, मी तर कापसाची म्हातारी."
"वाऱ्यावर उडते, बी घेऊन फिरते.
बी जाईल दूरदूर, झाडं येतील भरपूर"

मग म्हातारी निघाली पुढे उडत उडत. उडता उडता म्हातारी एका बागेत पोचली. तिथल्या फुलांना वाटलं फुलपाखरूंच आलं.
फुलं म्हणाली "कित्ती छान फुलपाखरू आहेस रे तू! येरे ये फुलपाखरा मध पी , आराम कर आणि मग पुढे जा."

म्हातारी म्हणाली.
"सुंदरशा फुलांनो धन्यवाद. पण मी काही फुलपाखरू नाही.मी आहे कापसाची म्हातारी. "
"वाऱ्यावर उडते, बी घेऊन फिरते.
बी जाईल दूरदूर, झाडं येतील भरपूर"

फुलं म्हणाली "अरे वा छान छान. दूरच्या फुलांना पण आमचा थोडा वास दे."

म्हातारी परत आपली उडायला लागली. आता वाटेत दिसलं एक फुलपाखरू. ते त्याच फुलांवर बसायला चाललं होतं. म्हातारीला पाहून त्याला सुध्दा आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं "अरे तू चतुर आहेस कि काय?"

म्हातारी म्हाणाली "नाही रे बाबा. .मी तर कापसाची म्हातारी."
"वाऱ्यावर उडते, बी घेऊन फिरते.
बी जाईल दूरदूर, झाडं येतील भरपूर"

एवढ बोलून म्हातारी उडतेय तोच बागेत मुलं आली संध्याकाळची खेळायला. उडणारी म्हातारी मुलांना दिसली आणि मुलं तिच्या मागून तिला पकडायला धावायला लागली. जोरजोरात पळताना एका चिमुकल्या मुलीने पकडलंच शेवटी म्हातारीला.

म्हातारी कळवळून तिला म्हणाली " अगं अगं मुली. सोडना मला. मी आहे कापसाची म्हातारी"
"वाऱ्यावर उडते, बी घेऊन फिरते.
बी जाईल दूरदूर, झाडं येतील भरपूर"

चिमुकल्या मुलीला म्हातारीची दया आली आणि तिने म्हातारीला सोडून दिलं. म्हातारी मग आनंदाने उडत उडत दूर गेली. रात्र झाल्यावर वारा बंद झाला तशी म्हातारी जमिनीवर बसली. तिथे तिने बी जमिनीवर टाकून दिलं.

खूप दिवसांनी जेव्हा पावसाळा आला तेव्हा ते बी रुजलं आणि तिथे एक छान सावरीच रोप उगवलं.

----------------------------
हि गोष्ट सांगताना मुलांना, ते बी हवेत कसं उडतं आणि नविन रोपांची रुजवण कशी होते त्याबद्दल सांगता येईल.

गुलमोहर: 

छान आहे गोष्ट Happy लेकीचं रडु आवरण्यासाठी तुला इतकी झटपट गोष्ट सुचली, ह्याचं विषेश कौतुक वाटलं Happy

लेकिला म्हणावं, काकाला पण समजत नव्हतं. पकडून ठेवायचा म्हातार्‍यांना. पण हि गोष्ट ऐकली, आणि दिली सोडून म्हातारी !! हि अश्शी ....

mhatari.jpg

सावली, ही पण आवडली खूप. आज रात्री सांगणार!
कसं काय सुचतं तुला? माझ्य मते बालसाहित्य लिहिणे खूप अवघड प्रकार आहे. त्यांना नाही आवडलं तर लगेच स्पष्टपणे दाखवतात तसं. पण तुझ्या गोष्टी आमच्याकडे हिट आहेत एकदम Happy

मस्त गोष्ट ! Happy पण आधी मुलाला उडणारी कापसाची म्हातारी दाखवायला हवी मग ही गोष्ट जास्त छान समजेल त्याला.
तुझ्या गोष्टी खरंच गोड असतात अगदी. पुस्तक छापलंस तर मी घेणार नक्की Happy

सायली,वत्सला,मितान ,राखी. नक्की सांगा. आवडली तर मला सांगा हं येऊन.

मंजिरी, सायो Happy अगं नेहेमी नाही सुचत. क्वचितच. पण खरच तेव्हा तीने अचानक मोठ्ठा आवाज करुन जे भोकाड पसरलं ना ते बघुन मला जाम हसायला आलेलं. आणी समजुत तरी काय काढणार!

अल्पना Happy अरे वा सांगितलीस पण.

वर्षा_म,अरुंधती कुलकर्णी,कविता नवरे ,प्रिया धुपकर.,नंद्या ,mayuresh chavan Happy आभारी आहे.

दिनेशदा फोटो छान आहे. नक्की सांगेन लेकीला Happy

अगो धन्यवाद Happy दाखव त्याला. नाहीतर इथला फोटोतरी दाखव.

मितान , वत्सला खुप छान वाटलं तुम्ही येऊन सांगितल्याबद्दल.
ऋयाम Happy

मितानच्या सुचवण्याप्रमाणे खुपखूप च्या जागी भरपूर असा शब्द बदल केलाय. त्याने यमक जरा चांगलं जुळ्त आणि म्हणायला छान वाटतय. धन्स मितान Happy

सावली
छान आहे गोष्ट.
आमच्याकडेही हीट आहेत तुझ्या गोष्टी.

Back to top