नॉर्वेच्या दरीखोर्यातून.... भाग १
नॉर्वेच्या दरीखोर्यातून.... भाग २
नॉर्वेच्या दरीखोर्यातून.... भाग ३
गायरांगरला भेट देऊन परत आलेसुंड गावात उतरलो तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. जड सामान काल थांबलेल्या हॉटेलमध्ये ठेवले होते. पण चेक आउट सकाळी केले होते. आज रात्री १२ च्या बोटीने निघून उद्या दुपारी ३ वाजता बर्गन ला पोहोचायचे. आज रात्री बोटीवर झोपण्यासाठी केबिन्स मिळाल्या होत्या. बोटीवर रहायचा नवाच अनुभव आज मिळणार होता त्यामुळे सगळे उत्साहात होतो.
पण एक छोटी अडचण होती. आता ७ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत वेळ कसा घालवायचा? सुदैवाने कालसारखा आज पाऊस नव्हता. पण लवकरच अंधार पडल्यावर गावातले प्रेक्षणीय स्थळ दिसणार नव्हते. मग ठरवले की जेवण करून रात्री दीपगृहाजवळ जाऊन रात्रीच्या बर्गन चे फोटो काढायचे. ( ट्रायपॉड चे ओझे त्याचसाठी वागवित होतो ! )
भरपूर वेळ आहे म्हटल्यावर एखादे भारतीय रेस्टॉरंट शोधूया असे ठरवले. गाव एवढे लहान की अर्ध्या तासात देशी रेस्टॉरंट सापडले सुद्धा !!! तिथे निवांत वेळ घालवत काहीबाही जेवलो. साडेदहाला दीपगृह शोधायला बाहेर पडलो. थंडी होती. सगुणाला पांघरुणात लपेटून बाबागाडीत झोपवून दिलं आणि जॅकेट घालून आलेसुंडच्या निर्मनुष्य रस्त्यांवर चालू लागलो. नुकतीच पौर्णिमा होऊन गेली होती. स्वच्छ आभाळात चंद्र आम्हाला सोबत करत होता. दीपगृहाजवळ पोहोचलो. सगळे शहर तिथून नजरेच्या टप्प्यात येत होते. भरतीचा समुद्र, लख्ख चंद्रप्रकाश आणि समोर निवांत झोपलेले शहर. काल पाहिलेली टेकडी दिव्यांनी लखलखत होती. अगदी टेकडीच्या माथ्यावर चंद्र दिसत होता. शांत स्निग्ध. किती दिवस झाले अशी शांतता अनुभवून ? वाहनांचे आवाज नाहीत, टी व्ही ची बडबड नाही. माणसांच्या चाहुली नाहीत. फक्त समुद्राची गाज आणि वार्याची शीळ.. ! मोठा श्वास घेतल्याचाही आवाज कानांना स्पष्ट जाणवावा अशी शांतता. पुन्हा मन देशात उडालं. कुठल्याश्या गडावर भर दुपारी मंदिराच्या गाभार्यात ऐकलेली शांतता मनात दाटून आली. खरं तर समोरची अर्धचंद्राकृती दिव्यांची माळ बघून मुंबई आठवायला हवी होती. मातीच्या मनात मातीच्याच आठवणी रुजल्यात त्याला काय करणार !
ह्म्म. ट्रायपॉडवर फोटो टिपण्याच्या कसरती सुरू झाल्या. कॅमेर्यांचा क्लिकक्लिकाट सुरू झाला. मग कॅमेर्याचं पोट रिकामं आणि मनाचं पोट फोटो काढून भरल्यावर सामान घ्यायला कालच्या हॉटेलकडे गेलो. सामान घेईपर्यंत आम्हाला नेणार्या बोटीचा भोंगा ऐकू आला.
आजची बोट कालच्या वरताण होती. अजून मोठी. उत्साहात चेक इन करायला गेलो. तर कळलं की आमच्या केबिन्स खिडकीच्या नाहीत ! आणि सकाळी ९ वाजता त्या सोडायच्या पण आहेत. भलंबुरं वाटून घेण्याच्या मूडमध्ये कोणी नव्हतंच. गुमान आमच्या केबिनमध्ये गेलो. तिथे दोन बेड, दोन कपाटं, लिहिण्याचा टेबल, आणि बाथरूम अशा सर्व सुविधा होत्या. फ्रेश होऊन झोपलो. रात्री कुणीतरी हलवल्यामुळे जाग आली. जरा दचकूनच जागी झाले. अशी झोपल्याझोपल्या रूमसह हलण्याचा अनुभव आधी कुठे बरं आला होता? ह्म्म्म.. लातूरला भूकंपाच्या वेळी ! एक क्षण लागला हे आठवायला आणि हा भूकंप नसून आपण नॉर्वेतल्या एका बोटीवर आहोत याचे भान यायला. होय. आमची बोट कसल्याश्या आनंदात अक्षरश: डुलत चालली होती ! एखाद्या प्रचंड मोठ्या झोक्यावर असल्यासारखं वाटत होतं. पोटातलं अन्न पण आनंदात नाचायला लागलं होतं. कधी बाहेर पडेल सांगता येत नव्हतं. आख्खी बोट डावीकडे उजवीकडे कलंडत होती. मध्येच खर्रर्र असा खडकांना घासल्याचा आवाज यायचा. मनात जहाजाच्या कप्तानाला शिव्या घातल्या. जोरदार दणका बसल्यावर बस ड्रायवरला नाही का देत आपण शिव्या ? तशा. एकदा तर वाटलं हा झोपला तर नसेल ? आणि म्हणून बोट भलतीकडेच जऊन खडकांवर आदळतेय वगैरे ! भरीत भर टायटॅनिक आणि इतर काही चित्रपट पण याच वेळेला का आठवावेत !!! तब्बल दोन तास बोटीचे हे निशानर्तन चालले होते. आणि मनाचे , कल्पनाशक्तीचे व्यायाम ! कधीतरी आपोआप झोप लागली.
सकाळ प्रसन्न होती. लख्ख ऊन पडलं होतं. आवरून नाश्ता करून डेकवर गेलो. तिथे हेलिपॅड होतं ! जॅकूझी आणि सोनाबाथ वगैरे चैनीच्या गोष्टी पण होत्या. आजही डेकवर गेलं की सूर्यफुलाच्या शेतात गेल्यासारखं वाटलं. सगळे लोक सूर्याकडे तोंड करून निवांत पडले होते. आम्ही पण जागा घेतल्या.
समोर समुद्र खेळत होता. अधुनमधुन समुद्रातूनच डोंगर कडे मान उंच करून आमच्याकडे बघत होते. समुद्र पण कसा बहुरूपी असतो नाही. काल रात्री चंद्रप्रकाशात तो ज्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन विश्वासाने स्वप्नात रममाण व्हावं अशा मित्रासारखा दिसत होता. रात्री बोट हलत असताना कुटिल जादूगारासारखा वाटत होता. कोणत्याही क्षणी गायब करू शकेल असा. आणि आज सकाळी रांगत रांगत खोड्या करत घरभर खेळणार्या बाळासारखा निरागस हसत होता. असं वाटलं या समुद्राला उचलून घेऊन त्याच्या जावळांवर हात फिरवावा ! आजही अधुन मधुन बेटांवर लहान मोठी खेडी वसलेली दिसत होती. कालच्यापेक्षा आजचा समुद्रमार्ग बराच मोठा होता. रुंद होता. तरीही एखाद्या डोंगराला बोट जेव्हा वळसा घालून जाई तेव्हा खडकाला घासल्याचा आवाज येत होता.
आजचा वेळ फार लवकर गेला. बर्गन शहर दिसू लागले. बर्गन हे नॉर्वेतले आकाराने २ क्रमांकाचे मोठे शहर. ४०० वर्षांपासून अत्यंत महत्त्वाचे व्यापारी बंदर. अनेकदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून पुन्हा पुन्हा जोमाने उभे राहिलेले हे शहर एके काळी युरोपची व्यापारी राजधानी म्हणून ओळखले जायचे. जहाजातून उतरून बाहेर रस्त्यापर्यंत येताना अगदी मोठ्या विमानतळावर उतरल्यासारखे वाटत होते.
नकाशानुसार चालत जाऊन हॉटेल गाठले. थोडे खाऊन बाहेर पडलो. हॉटेल अगदी गजबजलेल्या परिसरात होते. जुन्या काळातल्या फिशमार्केटचा हा भाग आजही तितकाच प्रेक्षणीय आहे. जागोजागी थुईथुई नाचणारी कारंजी, त्याभोवती आकर्षक आकारात वाढवलेली हिरवळ आणि फुलांच्या वेली संध्याकाळच्या उन्हात वातावरण प्रसन्न करीत होत्या. गावातील प्रसिद्ध दर्यावर्दींचे आणि शिलेदारांचे, कलाकारांचे पुतळे या भागाला वेगळाच दिमाख प्राप्त करून देत होते.
आम्हाला जायचे होते फ्लोइएन डोंगरावर. तिथून संपूर्ण बर्गन शहराचा नजारा अप्रतिम दिसतो. वर जाण्यासाठी तिथली प्रसिद्ध केबलकार, फ्लोइबानन फ्युनिक्युलर घ्यायची होती. अतीशय तीव्र चढावरून समुद्रसपाटीपासून ३२० मीटर वर घेऊन जाणारी ही सुविधा जुन्या तंत्रज्ञानाची कमाल मानली जाते. अवघ्या ५ मिनिटात आम्ही फ्लोइएन डोंगरमाथ्यावर गेलो.
वाटेत अजून एक अप्रूप पाहिले. एवढ्या तीव्र उतारावर घरांची गर्दी ! तिथपर्यंत जायला अगदी अरुंद रस्ते. खरोखरीच नॉर्वे मध्ये ओस्लो नंतर इथेच एवढी दाट लोकवस्ती बघायला मिळाली.
वरून दिसणारे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. त्याची चित्रेच बोलकी आहेत.
पावसाला सुरुवात झाल्याने लवकर खाली उतरावे लागले. जेवून हॉटेलवर परत आलो. उद्याचा दिवस जास्त धावपळीचा आहे. लवकर झोपले पाहिजे. त्या आधी बाजारातून आणलेले साहित्य वापरून चौघांनी पटापट सँडविचेस बनवून घेतली. जवळची शिदोरी संपली होती नि उद्याच्या धावपळीत जेवण शोधायला वेळ मिळणार नव्हता.
आता उद्या फ्लाम.
मस्त! सही लिहित आहेस. फोटो
मस्त! सही लिहित आहेस. फोटो पण उच्च आहेत.
फोटो एक्दमच मस्त आहेत..
फोटो एक्दमच मस्त आहेत..
फोटो आणि वर्णन - सु रे ख !
फोटो आणि वर्णन - सु रे ख !
मस्त फोटो आणि वर्णन.
मस्त फोटो आणि वर्णन.
फारच सुंदर फोटो आणि वर्णनही..
फारच सुंदर फोटो आणि वर्णनही..
जबरी.. फोटो तर फारच क्लास
जबरी.. फोटो तर फारच क्लास आहेत.. रात्रीचे दोन्ही..
हा भागही मस्त आहे. रात्रीचे
हा भागही मस्त आहे. रात्रीचे आणि शहराचे फोटो आवडले.
सुपर्ब!! तुझ्या लेखनशैलीची व
सुपर्ब!!
तुझ्या लेखनशैलीची व फोटोंची मी फॅन!! सूर्यफुलाची शेती, भारीच...
सुं द र! समुद्राचे वर्णन
सुं द र! समुद्राचे वर्णन आवडले! सूर्यफुलं
मस्त!
मस्त!
मस्तच आधीच्या भागांप्रमाणेच
मस्तच आधीच्या भागांप्रमाणेच
मितान, फोटो बघून बोलती बंद
मितान, फोटो बघून बोलती बंद झालीये आधीच, पण वर्णनही जबरी लिहितेयस. वाट बघतोय पुढच्या भागाची.
मस्त!
मस्त!
माया, क्या बात है... त्या
माया, क्या बात है...
त्या रात्रीच्या फोटोसाठी...
ये रात हसीन है,
ओर तुम जवां..
पल पल कि दास्तां,
ना होगी फिर कहा...
काय वर्णन लिहिते आहेस. समस्त चिंचवडकरांकडून तुझ्या प्रत्येक लेखनास शुभेच्छा.
हा ही भाग सुन्दर आला आहे.
हा ही भाग सुन्दर आला आहे. फोटो पण. तो एक निर्मनुष्य रस्त्याचा फोटो आहे त्यावरून आरामात सायकल नाहीतर एन्फील्डने उतरत यावे असे वाट्ते आहे.
वा !
वा !
मस्त वर्णन ,सुरेख फोटो
मस्त वर्णन ,सुरेख फोटो
अहाहा. मितान मी चारही भाग सलग
अहाहा. मितान मी चारही भाग सलग वाचुन काढले आज. काय सुंदर देश आहे हा. तिथली शांतता अशी फोटो फोटोतुन जाणवते.
लिहिलयस ही सुरेख अगदी.