डोसा

Submitted by हेरंब ओक on 18 March, 2010 - 23:47

भाग-१
http://harkatnay.blogspot.com/2010/03/blog-post_5826.html

पहिल्याच रिंगला मी मोबाईल उचलला आणि थोडंसं वैतागूनच विचारलं.

"अग आहेस कुठे? कधीची वाट बघतोय आम्ही.. पोरं तर बिचारी कंटाळून गेली."
"अरे काय सांगू. क्लायंट मीटिंग एवढी लांबली ना की बस. आणि त्यांना मिटींगमध्ये सांगितलेले चेंजेस आजच्या आज करून हवेत."
"काय आत्ता? तुझ्या साहेबाला घड्याळ कळतं ना?"
"प्लीज रागावू नकोस"
"सॉरी. उगाच चिडलो तुझ्यावर. पण मग आता काय करायचं?"
"एक काम करा. तुम्ही पुढे व्हा. मुलं तयार होऊन बसलीयेत. हॉटेलमध्ये जायचं ठरल्यावर ती आता घरी जेवणार नाहीत. तासा-दोन तासात माझं काम संपलं तर मी थेट हॉटेललाच येते."
"बरं. लवकर निघा"
"हो"

**

तिने हो म्हणून फोन ठेवला असला तरी कितीही प्रयत्न केला तरीही तिला हॉटेलला येता येणार नव्हतं हे आम्हाला दोघांनाही चांगलंच माहित होतं.
फोन ठेवल्या ठेवल्या शेंडेफळाने--उर्वी-वय-वर्षं-५-ने-- विचारलं "काय म्हणाली आई?"
"काय म्हणाली काय? ऐकलं नाहीस का? आई येणार नाहीये. त्यामुळे हॉटेल कॅन्सल" उन्मेष रागाने डाफरला.
हा तिच्यापेक्षा तीनच वर्षांनी मोठा असूनही एवढा आगाऊपणे का वागतो कधीकधी असा नेहमीचा प्रश्न मला पुन्हा पडला. मी लगेच सावरून घेत म्हंटलं. "असं काही नाहीये. आपण जातोय हॉटेलमध्ये".
"खर्र्रर्रच?" उर्वी चित्कारली. तिला हॉटेलमध्ये जाणं महत्वाचं होतं. कोण येतंय आणि कोण नाही याच्याशी तिला विशेष कर्तव्य नव्हतं.
"आईशिवाय?" उन्मेषचं मातृप्रेम नको तेव्हा उफाळलं.
"आईशिवाय नाही. आईही येणारे. पण थोडी उशिरा. आईनेच सांगितलंय आपल्याला पुढे व्हायला. ती मागाहून येईल."
उन्मेषला ते विशेष पटल्याचं दिसत नव्हतं पण उर्वीचं तर लक्षच नव्हतं. ती दरवाजाकडे पळालीही होती.
गाडी पार्क करून हॉटेलमध्ये शिरेपर्यंत ९ वाजून गेले होते. शुक्रवार असल्याने गर्दीही चांगलीच होती. पण तरीही २०-२५ मिनिटात म्हणजे गर्दीच्या मानाने लवकरच टेबल मिळालं आम्हाला.
"काय खायचंय?" असं विचारल्यावर उर्वी नुसती हसायला लागली.
"नाही हं छकुली. आज डोसा नाही. दरवेळी पेपर डोसा मागवतेस आणि निम्मा पण नाही संपवत. आम्हालाच संपवायला लागतो.
"आं. मला डोसाच पाहिजे. आज संपवेन मी सगळा. आणि उरला तर आई खाईल."
"आईने खायचा असेल तर घरी न्यायला लागेल." चिरंजीव
"का? ती येणारेना इकडे?" छकुली
"गप रे तू... का उगाच तिला त्रास देतोयस? हो.. आई येणारे इकडे. तोवर जेवढा जाईल तेवढा डोसा खा तू. उरलेला आई खाईल."
चिरंजीवांसाठी चीज पावभाजी आणि चॉकलेट मिल्कशेक, छकुलीसाठी डोसा आणि स्ट्रॉबेरी आईसक्रीम आणि माझ्यासाठी बिर्याणी आणि पेप्सी मागवून झाल्यावर मी सहजच इकडे तिकडे नजर टाकली. मित्रमैत्रिणी, नवीनच लग्न झालेली कपल्स, काही ठिकाणी नुसतीच कॉलेजची गँग आणि काही ठिकाणी आमच्यासारखे सहकुटुंब आलेले लोकं यांनी हॉटेल नुसतं भरून गेलं होतं.
थोड्या वेळाने आमची ऑर्डर आमच्या टेबलवर विराजमान झाली. आम्ही सुरुवात करेपर्यंत चिरंजीवांचा पहिला पाव मटकावून झालाही. मी बिर्याणीचा घास घेईपर्यंत पुन्हा छकुलीच्या हसण्याचा आवाज आला.
"आता काय झालं ग तुला हसायला? पटापटा खायला लागा. मग गार झाला की म्हणशील मला नको म्हणून."
तरी ती हसतच होती.
"उर्वी... !"
आमच्या शेजारच्या टेबलकडे बोट दाखवत ती म्हणाली "बाबा बघ ना ती कशी खात्ये."
मी त्या दिशेने मी बघायला आणि त्या टेबलवरच्या माणसाने आमच्याकडे बघायला एकच गाठ पडली. मी पटकन तिचा हात खाली केला आणि त्याच्याकडे बघून ओशाळसं हसलो. पण सुदैवाने त्याचं आमच्याकडे लक्ष नव्हतं. तो आमच्यातून आरपार बघत असल्यासारखा कुठेतरी पहात होता.
"छकुली, अशी बोटं नाही दाखवायची कोणाकडे... किती वेळा सांगितलंय तुला..... कोणीही कसंही जेवूदे......... आपल्याला काय... तू लक्ष नको देऊ.... चल जेव पटापट......." मी जरा ओरडल्यावर उर्वी शांतपणे मान खाली घालून जेवायला लागली.

**

तिला शांत बसायला लावल्यावर ती कोणाकडे बघून हसत होती हे पहायचा मोह मला आवरेना. दोन्ही मुलं जेवणात गुंग आहेत असं बघून मी हळूच माझी मान शेजारच्या टेबलाकडे वळवली. माझ्याच वयाचा किंवा माझ्यापेक्षा फार तर २-३ वर्षांनी मोठा असलेला तो मगासचा माणूस, त्याच्याशेजारी एक १०-१२ वर्षांचा मुलगा आणि समोर साधारण आमच्याच चिरंजीव आणि कन्यकेच्या वयाचे एक मुलगा आणि मुलगी बसले होते. म्हणजे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करणारी आमची सौ एकमेव नव्हती तर. बाकीही बर्‍याच बॉसेसना त्यांच्या हाताखाली काम करणार्‍यांच्या पर्सनल लाईफविषयी विचार करण्याची गरज वाटत नव्हती. माझ्या डोळ्यासमोरून वपुंच्या पार्टनरमधला आगरकरांबरोबरचा संवाद तरळून गेला. तेवढ्यात माझं लक्ष त्या मुलीकडे गेलं. मी उर्वीला ओरडलो खरा पण ती मुलगी खरंच खूप विचित्र जेवत होती. तिने पण पेपर डोसाच मागवला होता बहुतेक. पण तो दहा ठिकाणी सांडला होता.तिचे हात सांबार, चटणीने नुसते माखले होते. चेहर्‍याला ठिकठिकाणी सांबाराचे डाग पडले होते. हळू हळू माझं लक्ष बाकीच्या दोन मुलांकडे गेलं. त्यांचीही परिस्थिती विशेष वेगळी नव्हती. वेगवेगळे पदार्थ मागवून, ते अर्धवट खाऊन टाकून, ठिकठिकाणी सांडून ठेवून त्यांचं मनसोक्त खाणं चाललं होतं. माझ्या मुलांनी असं काही केलं असतं तर मी कसला वैतागलो असतो. हा माणूस यांना काही बोलत कसा नाही म्हणून मी त्याच्याकडे नजर वळवली. बघतो तर उलट तो त्या तिघांकडेही अगदी प्रेमाने बघत होता. काय हवं नको विचारात होता. मधेच कधीतरी तो शून्यात कुठतरी बघे मगाशी माझ्यातून आरपार बघितलं होतं तसा. पण क्षणभरच. पुन्हा त्याच्या डोळ्यातून कौतुक बरसू लागे. मला जरा आश्चर्यच वाटलं त्याचं. अर्थात स्वतः दाढीचे खुंट वाढवून आलेल्या, अगदी मळके म्हणता येणार नाहीत पण अस्वच्छ् कपडे घातलेल्या, विसकटलेल्या केसांच्या गबाळ्या माणसाकडून त्याच्या गबाळ्या मुलांना काही शिस्त लागेल ही अपेक्षा ठेवणं वेडेपणाचंच होतं........ काय हे !!!. काय करत होतो मी !!! कोण कुठला तो माणूस ज्याच्याबिषयी मला एक अक्षरही माहित नव्हतं त्याला आणि त्याच्या मुलांना मी सरळसरळ गबाळं बनवून टाकलं होतं. क्षणभर ओशाळलो मी. पण खरंच ती मुलं म्हणावीत तर तीही अशीच अस्वच्छ आणि मळक्या कपड्यांमधलीच होती. ज्यांना घालायला धड कपडे नाहीत असे लोकं या असल्या हॉटेलमध्ये येऊन पन्नास रुपयांचा डोसा कसा खाऊ शकतात याबददल मला राहूनराहून कुतूहल वाटत होतं.

भाग-२

http://harkatnay.blogspot.com/2010/03/blog-post_16.html

काय हे !!!. काय करत होतो मी !!! कोण कुठला तो माणूस ज्याच्याबिषयी मला एक अक्षरही माहित नव्हतं त्याला आणि त्याच्या मुलांना मी सरळसरळ गबाळं बनवून टाकलं होतं. क्षणभर ओशाळलो मी. पण खरंच ती मुलं म्हणावीत तर तीही अशीच अस्वच्छ आणि मळक्या कपड्यांमधलीच होती. ज्यांना घालायला धड कपडे नाहीत असे लोकं या असल्या हॉटेलमध्ये येऊन पन्नास रुपयांचा डोसा कसा खाऊ शकतात याबददल मला राहूनराहून कुतूहल वाटत होतं.

---------------------------------

"बाSSबाSS, कर ना" उन्मेष.
"अरे का ओरडतोयस? काय करू?"
"अरे छकुलीने तुला दोनदा सांगितलं आईला फोन कर म्हणून, तिला विचार ती कधी येत्ये म्हणून. तर तुझं लक्षच नाही."
"अरे सॉरी करतो आत्ता लगेच फोन. मी जरा ऑफिसच्या कामाचा विचार करत होतो."
फोनवर बायकोचं अपेक्षित उत्तर मिळाल्याने आम्ही हॉटेलमधून निघालो. तिला घरी पोचायला पहाट होणार होती. नंतर विकेंडची कामं, खरेद्या यात वेळ गेला आणि नंतर सुरु झालेला नेहमीसारखाच धावपळता आठवडा यात मी तो प्रसंग पूर्णपणे विसरून गेलो.

**

गुरुवारी रात्री अभ्यास चालू असताना छकुलीने पुन्हा विषय काढला.
"आई, उद्या जाऊयाना पुन्हा हॉटेलात. तू पण यायचंस यावेळी. सगळेजण जाऊ."
"बघू ते... तू आधी तुझा अभ्यास संपव."
"आंSS .. नाही ना... आधी सांग"
"सांगितलं ना बघू म्हणून.... राजा मला खरंच वेळ नाहीये ग."
"जा.... तू उद्या येणार नसशील तर मी अभ्यासच नाही करणार."
"ए त्याचा आणि अभ्यासाचा काय संबंध?"
"नाही नाही नाही.... नाहीच करणार मी अभ्यास."
मायलेकीचा प्रेमळ संवाद भलत्याच दिशेने चाललेला बघून मी मध्ये पडलो.
"बरं उद्या जाऊया. उद्या आई येईल नक्की."
"अरे पण"
मी नुसती डोळ्याने खुण केली तिला गप्प बसण्याची. चिरंजीव उगाचंच हसल्यासारखे वाटले मला पण मी दुर्लक्ष केलं. दोन्ही पिल्लं पुन्हा अभ्यासात रमल्याचं पाहून सौ. ने खुण करून मला किचन मध्ये बोलावलं.
"अरे मी तुला संध्याकाळीच सांगणार होते की मला उद्याही ऑफिसमध्ये बसायला लागणार आहे. उद्याची क्लायंट मीटिंग तर अजून भयंकर होणार आहे. गेल्यावेळी आयत्यावेळी बसायला लागलं म्हणून सगळ्यांनी बडबड केली म्हणून पीएमने आज सकाळीच इंटर्नल मीटिंगमध्ये सांगून टाकलं की Friday will be an all-nighter. आणि कदाचित रविवारी पण जावं लागेल. मी तुला संध्याकाळी सांगणारच होते पण तू नुकताच ऑफिसमधून आलेलास तेव्हा तुझा मूडऑफ नको म्हणून नंतर सांगू म्हटलं."
"हो ना आणि तेवढ्यात मी नेमका माझ्या पायावर धोंडा पाडून घेतला." मी हसत म्हणालो. तीही हसली आणि सॉरी म्हणाली.
"पण आता छकुलीला कसं सांगायचं? आता उद्या मी आले नाही तर तिला वाटेल तिने अभ्यास करावा म्हणून आपण खोटं खोटं सांगत होतो असं."
मी म्हटलं "मी बघतो काय करायचं ते"
अभ्यास आणि जेवणं झाल्यावर रात्री झोपायच्या वेळी मी छकुलीला समजावून सांगितलं की आईला उद्या पण काम आहे ऑफिसमध्ये त्यामुळे ती आपल्याबरोबर हॉटेलमध्ये येऊ शकणार नाही. पण आपण नक्की जाऊया. ती आधी थोडी हिरमुसली पण नंतर तयार झाली. आईने आपल्याला न येण्याबद्दल गेल्यावेळसारखं आयत्यावेळी न सांगता आधीच सांगितलं या विचाराने तिला थोडं बरं वाटलं.

**

ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी पुन्हा आम्ही तिघेच जण हॉटेलमध्ये पोचलो. पण यावेळी छकुली आणि उन्मेष सुद्धा थोडे खुशीतच होते. एक तर लागोपाठ दुसर्‍या शुक्रवारी हॉटेलमध्ये जेवायला जात होतो आणि दुसरं म्हणजे यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत आईची वाट बघायला लागणार नव्हती. मी ऑफिसमधून येऊन फ्रेश झाल्यावर आम्ही लगेच निघालोही होतो.

"काही झालं तरी तुला यावेळी डोसा मिळणार नाही" असं मी बजावून सांगितल्याने छकुलीने "त्या दादाला सगळं हवं ते देता तुम्ही लोकं आणि मला मात्र नाही" अशी कटकट करत नाइलाजानेच इडली मागवली होती. आमच्या ऑर्डर्स येईपर्यंत मी जरा रेस्टरूमला जाऊन यावं अशा विचाराने उठलो. दोघांनाही जाग्यावरून न उठण्याविषयी सांगून आणि उन्मेषला छकुलीवर लक्ष ठेवायला सांगून मी रेस्टरूमच्या दिशेने निघालो. वाटेत माझी पावलं थबकली. मला पुन्हा तो गेल्या वेळचा गबाळा परिवार दिसला. पण आज जरा बरे वाटत होते सगळे जण. तो माणूस दाढी बिढी करून, स्वच्छ कपडे घालून आला होता. मुलंही जरा बर्‍या कपड्यात दिसत होती यावेळी. पण त्यांची खाण्याची पद्धत जवळपास तशीच होती. त्याच्या डोळ्यातले कौतुकाचे भाव, मधेच शून्यात बघणं हे सारं सारं जसंच्या तसं होतं. पण अचानक मला काहीतरी जाणवलं. ती गेल्या वेळी डोसा खाणारी मुलगी थोडी वेगळी दिसत होती. गेल्यावेळी तिचे केस अगदी लहान होते. पण यावेळी मात्र चांगले मोठे दिसत होते. मी इतर दोन मुलांकडेही बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की खाण्याची पद्धत आणि वयं सारखीच असली तरी ही तिन्ही मुलं गेल्या वेळच्या मुलांपेक्षा वेगळी होती. माणूस तर तोच वाटत होता. नाही नक्की तोच होता. मग ही नवीन तीन मुलं कोण? की याला सहा मुलं आहेत? आणि याची बायको कुठे आहे वगैरे प्रश्नांनी मला त्या दोन मिनिटांत घेरून टाकलं. तेवढ्यात एका वेटरने त्या टेबलवर बटर नान ठेवली आणि जायला लागला. मी त्याला खुण करून बोलावलं आणि विचारलं "कोण आहे रे हा माणूस?"
"आपल्याला काय माहित साहेब. त्याने अजून एक बटर नानची ऑर्डर दिली, आपण दिली बटर नान. आता तो कोणीका असेना"
"अरे तसं नाही. तुझ्या मॅनेजरला बोलाव."
"का साहेब उगाच मॅनेजरला बोलावताय. मी काय केलं. तुम्ही जे विचारलत त्याचं मला जेवढं माहिती आहे तेवढं उत्तर दिलं. माझं काय चुकलं? उगाच मॅनेजरला कशाला बोलावताय?"
"अरे बाबा, तुझ्यासाठी बोलवत नाहीये मॅनेजरला. मला त्या माणसाबद्दल विचारायचं आहे." असं सांगितल्यावर हायसं वाटून त्याने मॅनेजरला बोलावलं.

काही क्षणात स्वच्छ गणवेशातला एक मध्यमवयीन हसतमुख गृहस्थ माझ्यासमोर उभा राहिला.

"गुड इव्हिनिंग सर. काय झालं काही प्रॉब्लेम झालाय का? काही हवंय का आपल्याला?"
मी म्हटलं "हो. मला माहिती हवीये त्या माणसाबद्दल. कोण आहे तो. ती मुलं कोण आहेत?" मी माझं कुतूहल वाढवत नेणार्‍या त्या माणसाकडे हलकंच बोट दाखवलं.
"तो काही बोलला का तुम्हाला?"
"नाही"
"मग त्या मुलांनी काही त्रास दिला का?"
"नाही. अहो तसं नाही. मी गेल्यावेळी आलो होतो तेव्हा पण हा माणूस इथे होता. त्याच्याबरोबर अशीच २-३ मुलं होती. आज पण ३ मुलं आहेत. पण वेगळीच आहेत ती. गेल्यावेळेसची नाही. कोण आहे हा माणूस? कोण आहेत ती मुलं ? काय प्रकार आहे हा सगळा?"
त्याने मला थोडं बाजूला नेलं आणि बोलू लागला "सर त्याचं नाव शांताराम.....

-- क्रमशः

भाग-३

http://harkatnay.blogspot.com/2010/03/blog-post_17.html

"नाही. अहो तसं नाही. मी गेल्यावेळी आलो होतो तेव्हा पण हा माणूस इथे होता. त्याच्याबरोबर अशीच २-३ मुलं होती. आज पण ३ मुलं आहेत. पण वेगळीच आहेत ती. गेल्यावेळेसची नाही. कोण आहे हा माणूस? कोण आहेत ती मुलं ? काय प्रकार आहे हा सगळा?"
त्याने मला थोडं बाजूला नेलं आणि बोलू लागला "सर त्याचं नाव शांताराम.....
-----------------------------------------

"सर त्याचं नाव शांताराम.. इथेच पलिकडच्या बिल्डिंगमध्ये वॉचमनचं काम करतो. विदर्भाकडचा आहे. थोडी शेती होती गावात पण दुष्काळाने काही पिकेना. डोक्यावर कर्ज चढत होतं. दोन मुलं, एक लहान मुलगी आणि बायको घरी. त्यांच्या तोंडात काय घालायचं या विचाराने तो दिवसेंदिवस हतबल होत होता. तशात दोन वर्षांपूर्वी बायको साध्या थंडीतापाने गेली. हा आणखीच विवश झाला. मुलांची उपासमार बघवेना. काही झालं तरी इतरांसारखं जीवाचं काही बरंवाईट करायचं नाही हे नक्की ठरवलं होतं त्याने. म्हणून मग एक दिवस गुपचूप सगळं सोडून मुलांना घेऊन मुंबईला निघून आला. गाडीतून उतरला तेव्हा पोटात अन्नाचा कण नव्हता. रात्रीची वेळ होती. छोटीला भूक सहन होईना. ती काहीतरी खायला द्या म्हणून मागे लागली. रडायला लागली. खिशात फक्त दोन रुपये होते. त्या दोन रुपयात या अशा आडवेळी इथे काय मिळेल हे त्याला कळेना. सगळ्यांची सोय होणार नाही हे तर नक्की होतं. पण निदान छोटीची तरी भूक भागेल असं काहीतरी आणायला म्हणून तो तिथून बाहेर पडला. निघताना मुलांना सांगितलं की इथून हलू नका आणि छोटीवर लक्ष ठेवा. परिसर ओळखीचा नसल्याने त्याला कुठे जावं ते कळेना. तो चालत चालत थोडा लांब गेला. बरंच लांब चालल्यावर त्याला रस्त्यात एक डोश्याची गाडी दिसली. त्याने गाडीवाल्याच्या हातापाया पाडून कसाबसा एक छोटा दोन रुपयाचा डोसा मिळवला. तो सदर्‍याच्या खिशात कोंबून तो परत यायला निघाला तर त्याला लांबून फटाक्यांचे आवाज ऐकायला आले. कसले फटाके आहेत ते कळेना म्हणून तो त्या दिशेने बघायला लागला. पुन्हा आवाज आल्यावर त्याच्या लक्षात आलं की हे सध्यासुध्या फटाक्यांचे आवाज नाहीत. कसल्याशा भीतीने तो जोरात धावायला लागला. पण तेवढ्यात अचानक सगळीकडे आरडाओरडा झाला. दोन दिवसांचा उपाशी, धाव धाव धावलेला, मनातली अनामिक भीती आणि त्यात हा भयंकर आरडाओरडा, किंकाळ्या या सगळ्यामुळे त्याला अचानक गरगरल्यासारखं झालं. डोक्यावर हात घट्ट दाबून ठेवून तो अचानक जमिनीवर कोसळला.

नंतर शुद्ध आली तेव्हा मध्ये किती वेळ गेला ते त्याला कळेना. अंगात असलेलं बळ कसंबसं एकवटत तो स्टेशनच्या दिशेने धावला. आतलं दृश्य भयानक होतं. सगळीकडून धूर, आरडाओरडा, किंचाळ्या, कण्हण्याचे आवाज येत होते. सगळीकडे सामान विखुरलं होतं, रक्त सांडलं होतं. हा कसाबसा आत शिरला. नजर इकडेतिकडे भिरभिरत होती. अचानक तो थबकला. एका कोपर्‍यात त्याच्या बायकोने स्वतःच्या हाताने शिवलेली पिशवी त्याला दिसली. आणि आजूबाजूलाच त्याच्या तीन पोरांची निष्प्राण शरीरं पडली होती."

मी उभ्या जागी हादरत होतो. आतून फुटत होतो. माझं एकंदर रूप बघून त्याने मला चटकन थंड पाणी दिलं प्यायला. आणि पुढे बोलायला लागला.

"त्या दिवसापासून तो वेड्यासारखा भटकत राहिला. भटक भटक भटकला. गावी परत जाण्यात तर काही अर्थ नव्हता. भीक मागणार्‍यातला तो नव्हता. मग तो हळूहळू काम शोधायला लागला. जे मिळेल ते, जिथे मिळेल तिथे. असं करता करता एक दिवस समोरच्या बिल्डिंगमध्ये काम मागायला आला. तिकडे त्याला रखवालदाराची नोकरी मिळाली. दर शुक्रवारी पगार व्हायचा. पगार कमीच होता आणि सुट्ट्याही नव्हत्या. पण त्याला काही फरक पडत नव्हता. त्याची फक्त एकच अट होती की पगार झाल्यावर त्या दिवशी त्याला ४ तासाची सुट्टी हवी होती. बस इतकंच."

"ते कशासाठी?" मी उरलीसुरलेली सगळी ताकद एकवटून अगदी अस्पष्टसं पुटपुटलो.

"तो दर शुक्रवारी पैसे मिळाले की व्हीटीचा प्लॅटफॉर्म गाठतो. तिकडे एक फेरफटका मारतो. तिकडे उभ्या असलेल्या गरीब भिकारी किंवा गोळ्या, पिना, शिट्ट्या, फुगे विकणार्‍या मुलांना भेटतो. त्यातून त्याच्या मुलांच्या साधारण वयाची दोन मुलं आणि त्याच्या मुलीच्या वयाची मुलगी निवडतो. कधी पैसे असतील तर त्यांना नवीन कपडे घेऊन देतो. आणि नंतर त्यांना घेऊन इकडे येतो. पैसे नसतील तर तिथेच त्यांना सार्वजनिक नळावर न्हाऊ माखू घालून त्यांना इकडे घेऊन येतो खायला. बाकी काहीही मागवलं नाही मागवलं तरी त्याची एक डिश ठरलेली असते आणि ती म्हणजे डोसा. डोसा आला की आपल्या हाताने तो मुलीला भरवतो. आणि इतर मुलांनाही जे हवं असेल ते मागवतो. तो स्वतः एका पदार्थालाही स्पर्श करत नाही. मुलं जेवत असतात तेव्हा त्यांच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत रहातो. मधेच त्याच्या मुलांच्या आठवणीने हेलावून जातो आणि आकाशाकडे किंवा इथेतिथे अर्थहीनपणे बघत राहतो."

त्याच्या त्या मध्येच कौतुकाने आणि मधेच शून्यात बघण्याचं कारण माझ्या अंगावर अक्षरशः कोसळलं.

"आणि तुम्हाला हे सगळं कसं माहित?"

"हा माणूस बरेच दिवस वेगवेगळया मुलांना घेऊन येतो आणि सारखे डोसे मागवतो हे माझ्या लक्षात आलं होतं. पण म्हटलं असेल काहीतरी आपल्याला काय. एकदा असाच तो आला होता आणि निघताना बिल भरण्यावरून काहीतरी भांडण झालं. त्याच्याकडे पैसे नव्हते आणि तो अगदी काकुळतीला येऊन सांगत होता की माझ्याकडे पैसे नाहीयेत. मी इथे नेहमी येतो. दर शुक्रवारी येतो. पुढच्या शुक्रवारी येईन तेव्हा नक्की पैसे देईन. पुढच्या आठवड्यात जास्त काम करून किंवा मालकांकडून थोडे पैसे उधार घेऊन मी पैसे नक्की फेडेन असं अगदी कळकळीने सांगत होता. शेवटी वेटरने मला बोलावलं. मीही त्याला दर शुक्रवारी बघत असल्याने चेहरा तसा ओळखीचा होता. म्हटलं काय झालं? का देत नाही आहात तुम्ही पैसे. त्याने आधी वेटरला सांगितलं होतं तेच सगळं मला पुन्हा सांगितलं. मग माझंही कुतूहल तुमच्यासारखंच जागृत होत गेलं. म्हणून मग मीही त्याला ही मुलं कोण, कुठली, तुझी कोण, तू इथे दर शुक्रवारीच का येतोस, आणि नेहमी डोसाच का मागवतोस असे सगळे मला इतके दिवस पडलेले प्रश्न विचारले. त्याचा बांध फुटला. तो हमसून हमसून रडायला लागला आणि एकेक करत त्याने मला सगळं सांगून टाकलं."

"..."

"तेव्हापासून आम्ही त्याच्याकडून पैसे घेत नाही. पण तो ऐकत नाही. जेवढे असतील तेवढे सगळे पैसे तो देतोच. दरवेळी नवीन नवीन मुलांना घेऊन येतो त्यांना न्हाऊ माखू घालतो, कपडे घेतो आणि पोटभर खाऊ घालतो. जवळपास वर्षभर चालू आहे हे असं."

आतापर्यंत कसबसं रोखून धरलेलं पाणी डोळ्यातून वाहायला लागलं. मी धडपडतच माझ्या टेबलजवळ गेलो. उन्मेष आणि छकुलीला पोटाशी घट्ट कवटाळून धरलं. आणि डोळ्यातून वाहणार्‍या पाण्याची फिकीर न करता बराच वेळ तसाच बसून राहिलो. टेबलावरच्या डिशमध्ये मला एक न खाल्लेला डोसा निपचित पडल्यासारखा वाटला !!

-- समाप्त

गुलमोहर: 

Sad

वैशाली हॉटेल, पुणे मधे सारं चालु आहे असं वाचताना मला दिसत होतं.
आणि शेवट असा होईल असं अजिबात वाटलं नाही पण (पहिल्या भागांवरुन)....

----------------------------------------------------------------------------------------------------------

वाईट गोष्टी वाचुनही आपल्याला अगदी नकोसं होतं.. ज्यांच्या बाबतीत घडतं त्यांचं काय बोला?
अवघड आहे बाबा जिंदगी...

सगळ्यांचे आभार,

ऋयाम, मी पण गोष्ट लिहिताना आणि लिहून झाल्यावरही ३-४ दिवस पूर्ण गुंतलो होतो शांताराम मध्ये. एकदा वाटलं उगाच एवढा भयंकर शेवट करतोय Sad

खरंय रे.. ज्यांच्यावर २६/११ सारखे प्रसंग भयानक येत असतील त्यांनी काय करावं?

नावावरून कुतूहल जागं झालं. सुरवात चांगली होती पण नावाबाबत संभ्रम होता. शांतारामाच्या एन्ट्रीनंतर
कथेत गुंतत गेले. थोडा अंदाज येऊ लागला होता. तरीही डोळ्यातून पाणी येऊ लागलंच. शेवट अनपेक्षित आणि धक्कादायक, करुण. कथा खूप आवडली. लिहिते रहा.

गोष्ट आधी वाचली होती, प्रतिक्रिया आज देतोय. इतरांसारखंच डोळ्यांत पाणी आलं.

लेखन अतिशय परिणामकारक, नेहेमीप्रमाणेच उत्तम.
इतरांची अशी कहाणी वाचून आपण रोज ज्या गोष्टींवरून वैतागतो त्या सगळ्या गोष्टी चिल्लर वाटू लागतात काही क्षण तरी.

फार छान लिहीता! तुमची रहाशील? ही कथाही खुप आवडली होती! मात्र ही वाचून डोळे डबडबले!
काही काही वेळा किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण त्रागा करीत रहातो,
त्या वेळेला ही गोष्ट मला नक्की आठवेल.

हि कथा दोन parallel समवयस्क पण प्रचंड फरक असलेल्या व्यक्तिबद्दल वाटलि...
शांताराम हे सगळे का करत आहे??
स्वतःच्या आठवणींवर् मात करायला की समाजसेवा म्हणुन?
खूप सुरेख मांडणी....

!!!

Pages