नॉर्वेच्या दरीखोर्यातून.... भाग १
नॉर्वेच्या दरीखोर्यातून.... भाग २
आजची सकाळ निवांत होती. हॉटेलच्या अगदी शेजारी असलेल्या धक्क्यावरून आमची बोट साडेनऊला निघणार होती. निवांत आवरले. काल सकाळी नॉर्वेजियन नाश्ता काय असतो ते बघितले नव्हते. आज तासभर हातात होता. नाश्ताखोली गजबजून गेली होती. टेबल खचाखच भरलेला होता. ५-६ प्रकारचे सीरियल्स, ताजी कापलेली ७ - ८ प्रकारची फळे, संत्री रस, दूध, फ्लेवर्ड दह्याचे प्रकार, ब्रेड चे ४ प्रकार. चीज आणि लोणी यांचेही प्रकार, बेक केलेले मश्रूम, बटाटे, टोमॅटो, उकडलेल्या राजम्यासारखी कसलीतरी उसळ, चहा कॉफीचे प्रकार..... हे वेजिटेरियन !!! नॉनवेज खाणार्यांसाठी यात अजून २५ प्रकारांची भर होती. सगळे प्रकार खाऊन बघितले. काय जास्त चांगलं आहे कळेपर्यंत पोट भरले होते "आता उद्या" असे ठरवून बोटीच्या धक्क्यावर पोहोचलो.
सव्वा नऊ झाले तरी तिथे अजून शुकशुकाट होता. पुन्हा एकदा आपण बरोबर जागेवर आलोय नं असा प्रश्न पडला. तेवढ्यात एक अमेरिकन आणि दोन चिनी पोरी टपकल्या . ह्म्म्म्म्म ! जागा बरोब्बर असल्याची खात्री पटली. कारण सर्वांचे फोटोसेशन सुरू झाले होते. पाचेक मिनिटात बोटीचा भोंगा ऐकू आला. समोरच्या डोंगराला वळसा घालून आमची बोट येत होती. त्या बोटीवर माणसांच्या आकृत्या फारच चिमुकल्या दिसत होत्या. बोट जवळ आली. अबबबबबबब..... प्रचंड मोठे गावच जणू ! एकूण सात मजले. आणि एका गावात जे काही असू शकते ते सगळे बोटीवर होते. आत गेल्यागेल्या एका बोटसुंदरीने आम्हाला हात धुवायला सांगितले. आधी कळालंच नाही हा स्वागताचा कुठला प्रकार ते ! सगळे लोक दारात आले की, " हॅलो सर, बोटीवर स्वागत. हात धुवून घ्या ! " थोडा वेळ गेल्यावर कळले. या भागात कोणती तरी साथ चालू होती. त्याचा संसर्ग टळावा म्हणून ही खबरदारी. बोटीवर प्रत्येक कोपर्यात पाण्याशिवाय हात स्वच्छ करण्याचा साबण ठेवलेला होता.
आम्ही ही जागा बरी, ती यापेक्षा बरी, नाहीतर इथे अजून छान असे करत करत मांजरासारखे सामान आणि सगुणाची बाबागाडी फिरवत शेवटी एका ठिकाणी स्थिरावलो. आता संध्याकाळी सात वाजेपर्यंत या बोटीवर रहाणार होतो. सामानाजवळ कोणीतरी थांबून आळीपाळीने सगळी बोट पालथी घातली. डेकवर थंडी वाजत होती. पण उन्हात बरेही वाटत होते. सगळे फिरंगी सूर्यफुलासारखे सूर्याकडे तोंड करून कसल्याश्या चिंतनात मग्न दिसत होते. बोट सुरू झाली. "बोट लागते " वगैरे काय काय ऐकलं होतं. पण आता बोट पाण्यातून डुलत जात असतानाही पोटातलं पाणीही हलात नव्हतं. इथून गायरांगर फियॉर्ड सुरू होते. गायरांगर गाव हे त्याचे टोक. आम्ही तिथवर जाऊन परत याच गावात परत येणार होतो.
गायरांगर फियॉर्डचा हा भाग दोन भागात विभागला आहे. नोर्दाल आणि स्त्रांदा. नोर्दाल मध्ये ५ खेडी आहेत. लोकसंख्या १७६० ! आणि स्त्रांदा च्या खेड्यांची लोकसंख्या ४५०० ! अर्थात हे तिथले कायमस्वरूपी रहिवासी. उन्हाळ्यात या भागात खूप गर्दी होत असते. त्यामुळे या चार महिन्यात पर्यटनाशी संबंधित व्यवसाय तेजीत असतात.
गायरांगर फियॉर्डच्या या भागात झालेल्या उत्खननात १२००० वर्षांपासून मानवी वस्तीच्या खुणा सापडल्या आहेत. निसर्गाच्या महान आश्चर्यांपैकी हे एक आश्चर्य आहे. समुद्राने पर्वत रांगांवर आक्रमण करून १५ किमी लांब आणि ६०० मीटर खोल अशी भेग निर्माण केली आहे. त्या भागात मानवी वस्ती ! दोन्ही बाजूंनी उंचच उंच डोंगर. पाण्यात मध्येच डोके वर काढणारे अजस्त्र सुळके. डोंगरमाथ्यावर अजून न वितळलेले बर्फ, आणि वितळलेल्या बर्फाचे पाणी होऊन धबाबा कोसळणारे जलप्रपात ! क्षणभरासाठीही पापणी मिटतानाही पुन्हा डोळे उघडण्याची डोळ्याना घाई व्हायची.
या धबधब्यांचं आयुष्य काय ? आधी खडकावरून लहान लहान प्रवाहांनी हसत खेळत एकत्र यायचं, मग तारुण्याच्या मस्तीत कडेलोट व्हायचं, प्रौढ समंजसपणे नदीच्या रुपात शिरायचं, शांत प्रवाहाने समुद्राला अर्पित व्हायचं हा खरा तर निसर्गक्रम. पण हे धबधबे क्रांतिकारकांसारखे वाटले. ऐन बहरात असताना थेट समुद्रात उडी ! असे बेफिकिर, खळाळते आणि स्वच्छ स्फटिकासारखे हे पाणी म्हणजे साक्षात जीवनच.....! आजूबाजूच्या निसर्गाचा माणसाच्या मनोवृत्तीवर फार खोल ठसा उमटत असतो यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणूनच की काय, अधुन मधून लहानश्या बेटावर व्यावहारिक दृष्टीने अत्यंत कष्टाचे जीवन जगणारी माणसं मला निर्मळ,निरामय आणि आनंदी दिसत होती. या दरीखोर्यातल्या एकांतवासात एखाद्या बेटावर उभे असलेले एकुलते सुंदर घर बघितले की मन म्हणायचे, इथे येऊन राहण्यामागची प्रेरणा कोणती असेल ? आणि त्याच घरापुढे फुललेल्या वेली, सजवलेले गोठे नि गायवासरं, हरणं बदकं बघताना आपोआप उत्तर मिळायचं. आदीम प्रेरणा आहे ही. शांतता नि सृजनाची. आव्हानांच आव्हान देत जगण्यावर राज्य करण्याची. इथे कृत्रिमतेला जागाच नाही. निसर्गाच्या या अलौकिक आणि त्याचवेळी भीषण, रौद्र अशा प्रपातांपुढे केवळ अस्सल असेल तेच टिकेल. बाकी सगळे वाहून जाईल.
हो. अवतीभवती पाचसातशे लोकांचा गोंगाट असतानाही मन या अशा विचारत गढून गेलं होतं यातच तिथला निसर्ग कसा असेल ते समजा.
एकेका डोंगराला मोहक वळसा घालून बोट पुढे चालली होती. मधून मधून समोर दिसणार्या काही विशेष स्थळांची माहिती स्पीकर वरून प्रसारित होत होती. एक ठिकाण सांगताना गाईडने सांगितले की "या निर्मनुष्य बेटावर एक तरूण ७ वर्षे एकटा राहिला होता. त्याच्यावर नंतर डॉक्युमेंटरीही तयार झाली. " दुसरे एक ठिकाण दाखवून म्हणाला, " इथे एका तरूण कुमारी मातेला दगडांनी ठेचून मारण्यात आलं आणि या कड्यावरून तिच्या प्रियकराला जलसमाधी देण्यात आली". या अशा कथा समोरचे उदात्त दृश्य गढूळ करत होत्या. प्रत्येक ठिकाणी असा मसाला काम करत नाही हेच खरे. मग ऐकणे सोडून दिले.
दुपार कधीच उलटून गेली होती. सकाळची न्याहारी पण जिरली. पोट भूक भूक म्हणू लागले. मग निघालो अन्नाच्या शोधात. बोटीवरच्या रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी मेनू म्हणून फक्त अॅस्पेरेगसचे सूप आणि ब्रेड होता. शेफला भाज्या घालून स्पॅघेटी बनवण्याची विनंती केली. चवदार सूप नि वातड स्पॅघेटी गिळून पुन्हा डेकवर बैठक जमवली. इतक्यात बोट गायरांगर फियॉर्डच्या शेवटच्या भागात आल्याची सूचना प्रसारित झाली.
आमचा प्रवास आता अजून निमुळत्या भागातून होता. इथे धबधबे अजूनच जवळ दिसत होते. एका धबधब्याचे नाव होते सेवन सिस्टर्स ! या सप्तभगिनींपैकी ३ जणी 'सरस्वती' असलेल्या दिसत होत्या. पण त्यामुळे सौंदर्य कणभरही कमी दिसत नव्हते. हळुहळू गायरांगर गाव दिसू लागले. तीन बाजूंनी डोंगर कडे आणि मध्ये बेचक्यात अळंबीसारखे फुललेले हे खेडे ! गावाच्या थेट डोक्यावर अजून एक मोठा धबधबा. यांची संख्या मोजणे कधीच सोडून दिले होते. असंख्य जलमाळा दिमाखाने मिरवत हे छोटेसे खेडे आपल्या डोंगरांच्या बाहूने सर्वांचे स्वागत करत होते.
दरवर्षी सुमारे सात लाख पर्यटक या भागाला भेट देतात. हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहे . प्राचीन काळापासून हे पर्वत आणि हा समुद्र हातात हात घालून माणसाला अभय देत इथे जीवन फुलवत आहेत.
आमची बोट गावाजवळ जाणार नव्हतीच. एखाद्या देवळासमोर क्षणभर उभे राहून आतल्या मूर्तीची प्रार्थना करावी आणि पुन्हा मार्गस्थ व्हावे तसे बोटही थोडावेळ त्या गावासमोर रेंगाळली आणि तिने आपला मोहरा बदलला. परत एकदा समुद्रातून त्याच डोंगर कड्यांना प्रदक्षिणा घालत; त्या रौद्रसुंदर निसर्गाच्या कुशीत स्वस्थपणे राहाणार्या लोकांचा हेवा करत परतीच्या वाटेवर निघालो.
नॉर्वेच्या दरीखोर्यातून.... भाग ३
Submitted by मितान on 8 September, 2010 - 15:54
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वर्णन आणि फोटो परत एकदा फार
वर्णन आणि फोटो परत एकदा फार मस्त!
धबधब्यांचं वर्णन वाचून अजून फोटो बघायला मिळतील असं वाटलं .. esp., थेट समुद्रात कोसळणार्या धबधब्यांचे फोटो असले तर बघायला खुप आवडतील ..
हो मस्तं माया !
हो मस्तं माया !
कसले ढिन्च्यॅक फोटोज आहेत !!
कसले ढिन्च्यॅक फोटोज आहेत !! वाह...
वर्णन तर क्या कहेने.. कस्लं सुंदर लिहीतेस तू..!
सुंदर्..सुंदर्...खुपच
सुंदर्..सुंदर्...खुपच सुंदर्...फोटो मस्तच.. लिहायची शैली पण आवडली.ंअवीन देशाची ओळ्ख झाली.
मितान, अप्रतिम वर्णन व
मितान, अप्रतिम वर्णन व वर्णनाला साजेसेच फोटो.
मस्त फोटोज आणि वर्णन !
मस्त फोटोज आणि वर्णन !
मितान, अक्षरशः स्वप्ननगरीत
मितान, अक्षरशः स्वप्ननगरीत फिरल्यासारखं वाटतंय. खूप सुंदर. आणि लिहिलंही छान आहे
असे अजून खूप लेख आणि फोटो येऊदेत ...
रहा भाग व फोटो मस्त आले आहेत.
रहा भाग व फोटो मस्त आले आहेत. काय सुन्दर निसर्ग आहे खरेच. क्लाइव कसलर च्या एका पुस्तकात हे बौदिका नाव वाचलेले आहे. त्या पुस्तकाला ही नॉर्वेची पार्श्वभूमी आहे. डर्क पिटची सीरीज. अग तू वर लिहीला आहेस तो ब्रेकफास्ट बरेच वेळा इथे समोर येतो व आम्ही ते सर्व बाजूला ठेऊन इड्ली चटणी सांबार व ताजे तयार केलेले डोसे उपमा वडे अशाने प्लेटा भरभरून घेतो त्याची आठ्वण झाली.सकाळी सात वाजता वाचल्याचा परिणाम. नुसताच कंप्लीट वेस्टर्न ब्रेफा समोर आला तर मला अगदी मम्मी म्हणून ओरडावे वाट्ते. १९० रु. ला एक साधा डोसा दिल्या बद्दल माझे ट्रायडंट वाल्याशी भांडण झाले होते त्याची आठवण आली. तुझी खाण्याच्या बाबतीत गैर सोय झाली का थोडीशी. कोई बात नहीं तो निसर्ग अगदी वर्थ इट असणार. पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.
मी हा भाग वाचला नाहीये पण
मी हा भाग वाचला नाहीये पण फोटो अप्रतिमच आहे. त्या हिरव्यागार डोंगरांवर राहणार्या लोकांचा हेवा वाटतोय अगदी.
वर >>>उकडलेल्या राजम्यासारखी कसलीतरी उसळ>>> म्हणालीस ना ते 'बेक्ड बीन्स' असतील. थोडं पेपर घालून टोस्टबरोबर मस्त लागतात.
सुंदर आहेत फोटो आणि वर्णन!
सुंदर आहेत फोटो आणि वर्णन!
मस्त फोटो आणि
मस्त फोटो आणि वर्णन.
शाकाहाराचा प्रॉब्लेम सुटत असेल, तर मीही त्या तरुणासारखा, तिथे अनेक वर्षे काढू शकेन.
दिनेश तुला बनविता येईल की
दिनेश तुला बनविता येईल की काहीतरी. इत्के लिहीतोस तर. आँ
सायो : बेक्ड बीन्स ऑन टोस्ट विथ चीज खरेच मस्त लागते अनुमोदन. आज कॅन घेतेच.
ये हसीन वादीया.. ये खुला आसमा
ये हसीन वादीया.. ये खुला आसमा ..
आ गये हम कहा, ए मेरे साजना..
इन बहारों मे दिल कि कली खिल गई,
मुझ को तुम जो मिले तो हर खुशी मिल गई...
माया, हे सारे वाचून अन एक एक फोटो पाहताना.. आपोआप ओठांवर रोजा मधले हे गाणे आले... काय मस्त दिलकश नजारा आहे..
सशल, नंद्या, बस्के, एक
सशल, नंद्या, बस्के, एक मुलगी,आडो, श्री, अगो, अश्विनीमामी,सायो, अनकॅनी, दिनेशदा,सूर्यकिरण तुम्हा सर्वांचे एवढ्या छान प्रतिसादांबद्दल मनापासून आभार..
सशल, त्या सप्तभगिनी धबधब्याचे सगळे फोटो हलले आहेत म्हणून टाकले नाहीत
बाकी इतर धबधबे तेवढ्या जवळून बघता आले नाहीत. आणि जे बघितले ते बघताना हा प्रपात फोटोत बांधणे शक्य नाही असे वाटल्याने फोटो काढायचे विसरून गेले !
अश्विनीमामी, अगं युरोपात फिरताना असा ब्रेकफास्ट नेहमीचाच ! माझी आजी विचारत होती काय काय खातात म्हणून तिला समजेल असं लिहिलंय
बाकी मला बेक्ड बीन्स नाही आवडत. मी आपली फळं नि चीज ब्रेड वर खुश असते..
आणि खाण्याची गैरसोय अशी वाटत नाही कधी. सोबत अडीच वर्षाची सगुणा असल्याने तिचे थोडे हाल झाले. पण ती सुद्धा पक्की भटकी असल्याने त्रास नाही दिला !
सूर्यकिरण, अगदी हेच गाणे ओठावर येत होते !!
दिनेशदा, एकटे कशाला जाता, मी पण येते की ! मी तुम्हाला हवा तो भाजीपाला उगवून देईन आणि तुमच्या हातचं खाऊन ( अजून ) लठ्ठ्मुठ्ठ होईन
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
वा! वा! मस्त. सुंदर फोटो आणि
वा! वा! मस्त. सुंदर फोटो आणि वर्णन.
वॉव ! भन्नाट मस्त ! धन्स शेअर
वॉव ! भन्नाट मस्त ! धन्स शेअर केल्याबद्दल
डोळे निवाले अगदी !
मितान, कसले मस्त फोटो आहेत.
मितान, कसले मस्त फोटो आहेत. प्रवासवर्णन तर अप्रतिमच!
या धबधब्यांचं आयुष्य काय ?
या धबधब्यांचं आयुष्य काय ? आधी खडकावरून लहान लहान प्रवाहांनी हसत खेळत एकत्र यायचं, मग तारुण्याच्या मस्तीत कडेलोट व्हायचं, प्रौढ समंजसपणे नदीच्या रुपात शिरायचं, शांत प्रवाहाने समुद्राला अर्पित व्हायचं हा खरा तर निसर्गक्रम. पण हे धबधबे क्रांतिकारकांसारखे वाटले. ऐन बहरात असताना थेट समुद्रात उडी ! असे बेफिकिर, खळाळते आणि स्वच्छ स्फटिकासारखे हे पाणी म्हणजे साक्षात जीवनच.....! आजूबाजूच्या निसर्गाचा माणसाच्या मनोवृत्तीवर फार खोल ठसा उमटत असतो यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणूनच की काय, अधुन मधून लहानश्या बेटावर व्यावहारिक दृष्टीने अत्यंत कष्टाचे जीवन जगणारी माणसं मला निर्मळ,निरामय आणि आनंदी दिसत होती. या दरीखोर्यातल्या एकांतवासात एखाद्या बेटावर उभे असलेले एकुलते सुंदर घर बघितले की मन म्हणायचे, इथे येऊन राहण्यामागची प्रेरणा कोणती असेल ? आणि त्याच घरापुढे फुललेल्या वेली, सजवलेले गोठे नि गायवासरं, हरणं बदकं बघताना आपोआप उत्तर मिळायचं. आदीम प्रेरणा आहे ही. शांतता नि सृजनाची. आव्हानांच आव्हान देत जगण्यावर राज्य करण्याची. इथे कृत्रिमतेला जागाच नाही. निसर्गाच्या या अलौकिक आणि त्याचवेळी भीषण, रौद्र अशा प्रपातांपुढे केवळ अस्सल असेल तेच टिकेल. बाकी सगळे वाहून जाईल.
कसले सुंदर लिहीलय.. खूपच आवडले.. नि तुमचे वर्णन वाचून तर तिथे राहणार्या रहिवाश्यांचा हेवा वाटला!!

फोटोंमुळे नॉर्वेचा अनुभव घेतला.. खूप खूप धन्यवाद !
अ प्र ति म निसर्ग! नि:शब्द!
अ प्र ति म निसर्ग!
नि:शब्द!
मस्त वर्णन, मस्त फोटो अन् हे
मस्त वर्णन, मस्त फोटो अन् हे सगळं आमच्या पर्यंत पोचवलंस त्या बद्द्ल तुला खूप खूप धन्यवाद.
अजून काही असतील तर येऊदेत. तुझ्या अशाच छान छान ट्रिपा होवोत (अन् आम्हाला वर्णनं न् फोटो बघायला मिळोत) ही तुला शुभेच्छा!
तू खरंच खूप छान फोटो काढतेस
वा! मस्त
वा! मस्त
तुफ्फ्फ्फान फोटो! मला आता
तुफ्फ्फ्फान फोटो! मला आता जावस वाटायला लागलंय तिकडे!
मितान, वेडं केलं ह्या फोटोजनी
मितान, वेडं केलं ह्या फोटोजनी मला.... किती सुंदर असावं ह्या निसर्गानं! सुरेख वर्णन आणि डोळ्यांना एकाच वेळी तृप्तीचा आणि हुरहुरीचा अनुभव देणारे फोटोज!
सुरेख! निवांत फिरण्याजोगा देश
सुरेख! निवांत फिरण्याजोगा देश दिसतोय.
सुंदर!!
सुंदर!!