कशाला उद्याची बात

Submitted by UlhasBhide on 3 September, 2010 - 01:37

Star Pravah TV channel वरील ‘कशाला उद्याची बात’
या मालिकेसंदर्भाने काही स्फुरल होत.
Orkut, FB वर मी आधीच प्रकाशित केलेली कविता इथे पोस्ट करतो आहे.

मालिकेतल्या विषयापेक्षा हा विचार वेगळा आहे.
.......................................................................................................

कशाला उद्याची बात ║ध्रु║

उद्या जीवनी काय घडावे, काय असावे काय नसावे
अपुल्या हाती नसता काही, फुका कशा ही भ्रांत
…… कशाला उद्याची बात
पाठ फिरवुनी अतीत गेला, भविष्य बुरख्यातच दडलेला
वर्तमान जो सम्मुख अपुल्या, जगुया तोच सुखात
…… कशाला उद्याची बात
स्व्प्न उद्याची जरुर पहावी, त्यांसाठी तजवीज करावी
पण चिंता-जंतू संसर्गे, करुन घेइ ना घात
…… कशाला उद्याची बात
असु द्या त्यांची महान शास्त्रे, मेहनत बुद्धी अपुली शस्त्रे
नियतीच्या भात्यातिल अस्त्रे, काय हंशिल गणण्यात
…… कशाला उद्याची बात
ग्रह तारे ही ईश निर्मिती, नित नेमाने क्रम आचरती
कुणा प्रतिष्ठा कुणा दूषणे, काय विचित्र प्रघात
…… कशाला उद्याची बात
रेषांमध्ये ना गुंतावे, हातांचे कर्तृत्व जपावे
कर्तृत्वाने करता येते, विपदांवरती मात
…… कशाला उद्याची बात
हातावरच्या रेषा आणिक, ग्रह तार्‍य़ांची नसती भीती
राहु केतु जे अवती भवती, तेच करिती की घात
…… कशाला उद्याची बात
घडायचे ते कधी न चुकते, अपुल्या हाती एकच असते
समर्थ होणे सक्षम होणे, सोसण्यास आघात
…… कशाला उद्याची बात

...... उल्हास भिडे (१७-५-२०१०)

गुलमोहर: 

खुप छान Happy

<<घडायचे ते कधी न चुकते, अपुल्या हाती एकच असते
समर्थ होणे सक्षम होणे, सोसण्यास आघात >> मस्तच
पु.ले. शु.

एकदम स्पुर्तीदायक काव्य!
"हातावरच्या रेषा आणिक, ग्रह तार्‍य़ांची नसती भीती
राहु केतु जे अवती भवती, तेच करिती की घात"

एकदम सत्य. (पण आजकाल भविष्यावर जो तो अवलंबून दिसतो त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणारे आपणच चुकतो की काय असे वाटते.)

घडायचे ते कधी न चुकते, अपुल्या हाती एकच असते
समर्थ होणे सक्षम होणे, सोसण्यास आघात
…… कशाला उद्याची बात

मूळ शिर्षक गीत उत्तमच आहे.. "कशाला उद्याची बात " चे ... अन तुम्ही लिहिलेली कविता सुंदरच.

उल्हास काका,
एकदम छान कविता.
<< रेषांमध्ये ना गुंतावे, हातांचे कर्तृत्व जपावे
कर्तृत्वाने करता येते, विपदांवरती मात
…… कशाला उद्याची बात >> क्या बात है!!!
पुर्ण कविता एकदम सकारत्मक विचारांना चालना देते.
खूप आवडली.
निवडक दहात नोंद...:)

आवडली Happy