किशोर कुमार: मराठी गाणी आणि एक अनोळखी पैलू

Submitted by मंदार-जोशी on 2 September, 2010 - 13:55

मला आवडणार्‍या कलाकार आणि खेळाडू यांच्या स्वभावाची नेहेमीच्या छबीपेक्षा वेगळी आणि चांगली बाजू शोधण्याचा प्रयत्न करणं हा माझा जुना छंद. किशोर कुमार या माझ्या आवडत्या गायकाच्या स्वभावाबद्दल आणि एकूणच आयुष्याबद्दल आतापर्यंत अनेक गोष्टी ऐकीवात आणि वाचनात आल्या. तेव्हा त्याच्याबद्दल काही वेगळी गोष्ट सापडते का हा विचार मनात अनेक दिवस घोळत होता. शिवाय त्याचं प्रमुख कार्यक्षेत्र हिंदी चित्रपटात पार्श्वगायन आणि अभिनय असल्यानं त्याने गायलेल्या मराठी गाण्यांबाबत उत्सुकता होतीच. लहानपणी सचिनचा 'गंमत जंमत' हा चित्रपट पाहिला होता. त्यात अनुराधा पौडवाल यांच्या साथीनं एक द्वंद्वगीत गायल्याच आठवत होतं. तसंच त्यानं गायलेली इतर मराठी गाणी शोधायची होती. पण...आळस, आळस, आणि आळस!! या आळसाला लवकरच शॉक ट्रीटमेंट मिळाली....

*********************************************************************************************************

"अश्विनीssss येsss नाssss" आमच्या ऑफिसच्या बस मधला डेक दणाणला आणि माझे हातपाय बसल्याजागी थिरकू लागले. अनेक दिवस कॅबचालक आणि कंपनी व्यवस्थापनाच्या मागे लागल्यावर अखेर आमच्या बसमधे एकदाचं डेक विराजमान झालं आणि ऑफिस आणि घर यांमधला प्रवास काहीसा सुखकर वाटू लागला.

"अरे, हा किशोर कुमार गातोय की काय!?", मला जुनी हिंदी गाणी ह्या विषयातला जाणकार समजणार्‍या एका सहकर्मचार्‍याने हा प्रश्न विचारला. अशी वासरं असली की आपल्याला सहज लंगडी गाय होता येतं. फक्त खर्‍या जाणकारांसमोर तोंड बंद ठेवायचं म्हणजे आपण सुरक्षित राहतो हे मी अनुभवावरून शिकलोय. आजूबाजूला तसले कुणी घातकी मनुष्यप्राणी नसल्याची खात्री केली आणि एक प्रकारचा गूढ, ज्ञानी वगैरे छाप भाव चेहर्‍यावर आणत मी एका दमात उत्तरलो, "हं, बरोबर. ती गायिका आहे ना ती अनुराधा पौडवाल; संगीत दिग्दर्शक अरुण पौडवाल होते; १९८७ सालचा गंमत जंमत हा चित्रपट". अनेक वर्षांपूर्वी हा सिनेमा मी चित्रपटगृहात जाऊन पाहिलेला असल्याने एवढं ज्ञान मी सहज फेकू शकत होतो.

"कित्ती मज्जा नै, किशोर कुमारने मराठीत पण गाणी म्हटली आहेत? हे एकच का रे?" गाडीच्या मागल्या शिटांच्या दिशेने एच.आर. मधली एका सुबकठेंगणी विचारती झाली. "बहुतेक" अस मोघम उत्तर देऊन गप गुमान बसावं की नाही! पण अप्रेझल जवळ येऊ घातलं होतं, आणि एरवी केलेल्या 'गुड मॉर्निंग'ला साधं उत्तर देण्याची तसदी न घेणारी ती ह्युमन रिसोर्स मधली वुमन मला एकाच वेळी किशोर कुमार आणि मराठी गाणी ह्या विषयातला महत्त्वाचा सोर्स समजू लागली होती. त्यामुळे अप्रेझल्स पर्यंत तरी त्या सुसरबाईची पाठ मऊच राहू द्यावी असा विचार करून अंगात पुरेसा उत्साह आणला आणि "म्हणजे काय, एकच नाही काही, चांगली तीन मराठी गाणी म्हटली आहेत" असं बोलून गेलो. "अय्या चक्क तीन? शप्पथ! कुठली रे?", ताडकन पुढचा प्रश्न आला. हे मात्र अनपेक्षित होतं. बोंबला! करायला गेलो गणपती आणि झाला मारुती!! कधी कधी आपण इंप्रेशन मारायला त्या भावनेच्या भरात बोलून जातो आणि मग ते निस्तरत बसावं लागतं. मस्तपैकी तोंडघशी पडण्याचा प्रसंग उदभवला आहे हे झटकन माझ्या लक्षात आलं. पण माझे ग्रह त्या दिवशी उच्चीचे असावेत. हा प्रश्न माझ्यावर आदळायला आणि महामार्गावर आमच्या गाडीसमोर एक दुचाकीस्वार तेलाच्या तवंगावरून घसरून अक्षरश: तोंडघशी पडायला एकच गाठ पडली आणि मला सगळ्यांच लक्ष तिकडे गेल्याचा फायदा मिळाला.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

पण अशी सुटका काही वारंवार होणार नव्हती. ती बया मला 'अ‍ॅट दी नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी' गाठणार हे निश्चित होतं. तेव्हा तत्पूर्वी जरा आपल्या माहितीचं रूपांतर ज्ञानात केलेलं नक्कीच चांगलं असं वाटून जुन्या वर्तमानपत्रांची कात्रणं, पुस्तक वाचन, आणि अर्थातच माहितीसाठी आंतरजालावर फेरफटका अशा तर्‍हेने अस्मादिकांच संशोधन सुरु झालं. आंतरजालावर संगीताला वाहून घेतलेल्या अनेक फोरम्सना भेट देताना खूप मजा वाटली. त्यात एक अत्यंत आनंदाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे कुमार सानू आणि हिमेशच्या अनुक्रमे सानूनासिक आणि भयाण स्वरांवर पोसलेल्या आजच्या तरुण पिढीलाही चांगलीच भुरळ घातली आहे. एवढंच नव्हे तर किशोर कुमारच्या एकट्याच्या नावाने निघालेल्या अनेक फोरम्सचे आणि कम्युनिटीजचे बहुतांश सदस्य तरुण तुर्क आहेत.

म्हणजेच किशोर कुमार या वल्लीच्या विक्षिप्तपणाच्या अनेक जितक्या सुरस कथा आणि त्याहून अधिक दंतकथा प्रसिद्ध आहेत, तितक्याच त्याच्या कंजूषपणाच्या आख्यायिका सर्वश्रुत आहेत. त्याच्या गाण्याच्या बरोबरीने त्याचा चिकटपणाच्या कथा रंगवून सांगण्यात येतात. पण चित्रपटसृष्टीतलं ज्ञान ज्यांना आहे, आणि या माणसाच्या अंतरंगात डोकावण्याची संधी ज्यांना मिळाली आहे ते मात्र या सदगृहस्थाच्या स्वभावाचे काही वेगळेच पैलू आपल्याला सांगतात.

किशोर कुमारने हिंदीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. पण त्याची मराठी गाणी किती? हा प्रश्न विचारला तर अनेकांच उत्तर "एकच" असं येऊन "अश्विनीssss येsss नाssss" या गाण्याचा विषय निघेल. आता तुम्ही म्हणाल की किशोरचा विक्षिप्त स्वभाव आणि कंजूषपणाबद्दल बोलता बोलता गाडी त्याच्या मराठी गाण्यांवर कुठे बरं आली? ह्या दोन गोष्टींचा काय संबंध? थांबा. सांगतो.

किशोरने गायलेल्या एकूण तीन मराठी गाण्यांपैकी हे गाणं सर्वाधिक वेळा वाजवलं आणि दाखवलं गेलं आहे, आणि जेव्हा जेव्हा ते टि.व्ही. वर दिसलं आहे तेव्हा तेव्हा पडद्यावरच्या अशोक सराफ आणि चारूशीला बरोबरच पडद्यामागे म्हणजेच रेकॉर्डिंग स्टुडीओमध्ये किशोरदा आणि अनुराधा पौडवाल हेही बागडताना दिसले आहेत. ह्यामुळे किशोरने मराठीत फक्त एकच गाणं गायलंय हे अज्ञान पसरायला फारसा वेळ लागला नाही. अर्थातच बाकीची गाणी आहेत तरी कोणती हे मात्र फारसं कुणी सांगू शकणार नाही हे ओघानं आलंच.

गीतकार शांताराम नांदगावकर यांच्या "अश्विनीssss येsss नाssss" या गाण्याच्या आणि अर्थातच 'गंमत जंमत' या चित्रपटाच्या यशानंतर किशोरकडून आणखी मराठी गाणी गाऊन घ्यावीत असं अनेक संगीतकारांना वाटू लागलं. 'घोळात घोळ' या चित्रपटासाठी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुधीर नांदोडे गीतकार असलेलं "हा गोरा गोरा मुखडा" ह्या गाण्याचं ध्वनीमुद्रण संपल्यावर संबंधितांना असं वाटलं की किशोर कुमारला त्याच्या लौकिकाला साजेसं भरभक्कम मानधन दिलं गेलं पाहीजे. त्यामुळे ध्वनीमुद्रण संपताच किशोरच्या हातात एक जाडजूड पाकीट ठेवलं गेलं. किशोरने पाकीट उघडलं आणि त्यातल्या काही नोटा काढून परत केल्या. आश्चर्यानं "किशोरदा ये क्या?" असं विचारल्यावर "अरे देखो, मैने कुछ दिनो पहले आपके दोस्त के यहां एक मराठी गाना गाया था, तो उनसे जितने पैसे लिये थे उतनेही आपसे लूंगा." अनेकदा रेकॉर्डिंगच्या आधीच मानधनाची मागणी करणार्‍या किशोरनं चक्क जास्त मानधन नको म्हणून काही पैसे परत केले हे बघून तिथे उपस्थित असणार्‍यांची बोटं तोंडात गेली.

हिंदी चित्रपटसृष्टीसारख्या निष्ठूर आणि ठायी ठायी फसवाफसवी असणार्‍या क्षेत्रात कठोर व्यवहारवादी असणं किती आवश्यक आहे हे किशोरने फार लवकर जाणलं होतं. आपले जेष्ठ बंधू अशोक कुमार उर्फ दादामुनी यांना आलेले अनुभवही त्याने बघितले होते. त्यामुळे आपले कष्टाचे, हक्काचे पैसे वसूल करताना त्याने कसलीच भीडभाड न बाळगता अनेक विचित्र क्लुप्त्या वापरल्या. अर्थातच त्यामुळे आणि ह्या क्षेत्रातल्या क्रूर राजकारणामुळे तो कसा विक्षिप्त आणि तर्‍हेवाईक आहे, तो कसा सारखा पैसे पैसे करत असतो, त्याचं मानधन मिळेपर्यंत त्याला धीर कसा धरवत नाही वगैरे अनेक अफवा झपाट्याने पसरल्या. त्याकाळी आजच्या सारखा पिसाटलेला मिडीया नसला तरी असल्या दंतकथा भरपूर मसाला लावून सत्यकथा असल्याच्या थाटात छापणारी चित्रपटसृष्टीशी संबंधीत अनेक नियतकालिकं उर्फ गॉसिप मॅगझिन्स तर होतीच, शिवाय आज आहे तसा तेव्हाही लोकांचा छापील शब्दावर अंमळ जास्तच विश्वास होता. साहजिकच या गैरसमजांना बर्‍यापैकी खतपाणी मिळालं. म्हणूनच किशोर कुमारने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्दर्शक सत्यजित रे यांना त्यांच्या 'पाथेर पांचाली' या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी अर्थसहाय्य केलं ही माहिती असो किंवा मग सत्यजित रे यांच्याच 'चारुलता' या चित्रपटासाठी केलेल्या पार्श्वगायनासाठी किशोरने एक पैसाही घेतला नव्हता ही गोष्ट असो, फारशी कुणाला ठाऊक असण्याचा संभव नाही.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

"ए, शुक्रवारी त्या अ‍ॅक्सिडेंटच्या भानगडीत मी तुला परत विचारायचं विसरलेच", सोमवारी सकाळी कँटीनमध्ये चहा पीत असताना मला त्या बयेनं गाठलंच. "कोणती रे ती किशोरची बाकीची दोन गाणी?"

पण आता अस्मादिक पूर्ण तयारीत होते. पुन्हा त्याच दिवशीच्या उत्साहात मी जवाब देता झालो, "अगं सोप्पय, 'घोळात घोळ' ह्या सिनेमातलं 'हा गोरा गोरा मुखडा' आणि 'माझा पती करोडपती' मधलं 'तुझी माझी जोडी जमली गं' ही ती दोन गाणी". "अरे ही मी ऐकली आहेत, माझी आई लावते बर्‍याच वेळा घरी. पण ती किशोरकुमारनं म्हटली आहेत हे मला माहीतच नव्हतं. थँक्यू हं." असं म्हणून तरंगत निघून गेली.

"अरेच्या, गाणं मराठीत असलं तरी हिला किशोरचा आवाज कसा ओळखू आला नाही?" असा प्रश्न मला अजिबात पडला नाही. कारण मागे एकदा तिनं एक आंतरराष्ट्रीय कसोटी सामना चालू असताना "प्लीज वेलकम सुनील गावसकर इन्टू द कॉमेंट्री बॉक्स" हे वाक्य अर्धवट ऐकल्यावर "अय्या, गावसकर आला का बॅटींगला? अजून खेळतोय म्हणजे कम्मालच नै. काय स्टॅमिना असेल बै या वयात" अशी मुक्ताफळं भर कँटीनमध्ये उधळून अनेकांचा रक्तदाब एकदम लो केला होता. त्यामुळे हिला थोडं डोकं है थोडे की जरूरत है आणि ते परमेश्वराने लवकरात लवकर तिला द्यावं अशी मनोमन प्रार्थना करत मी सोमवारच्या कामाला भिडलो.

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

किशोरने गायलेली तीन मराठी गाणी:

(१) अश्विनी ये ना | सहगायिका अनुराधा पौडवाल | चित्रपट गंमत जंमत | संगीत दिग्दर्शक अरुण पौडवाल | गीतकार शांताराम नांदगावकर

KK_GJ01.jpg

(२) हा गोरा गोरा मुखडा** | चित्रपट घोळात घोळ | संगीत दिग्दर्शक अनिल मोहिले | गीतकार सुधीर नांदोडे

KK_GG01.jpg

(३) तुझी माझी जोडी जमली गं | सहगायिका अनुराधा पौडवाल | चित्रपट माझा पती करोडपती | संगीत दिग्दर्शक अरुण पौडवाल | गीतकार शांताराम नांदगावकर

KK_MPKP_1.jpg

**दुर्दैवाने हे गाणं युट्यूब वर उपलब्ध नाही.

गुलमोहर: 

अतिशय उत्तम लेख.. फक्त "अश्विनी ये ना" हेच गाणं माहित होतं. उरलेली दोन गाणीही किशोरचीच आहेत हे नव्याने कळलं. आभार मंदार.

Happy किशोर आवडता असल्याने तिन्ही माहीत होती. ते गोरा गोरा मुखडा एकमेव सोलो असावे.

त्याखेरीज हिन्दी गाण्यांतील मराठी वाक्येही त्याची जबरी असायची Happy जसे "अरे पांडोबा पोरगी फसली रे फसली" ("अरे राफ्ता राफ्ता देखो ऑख मेरी लडी है")

अय्या, गावसकर आला का बॅटींगला? >>> Lol

हि दोन गाणी माहीतीच नव्हती.

अरे भाई निकलके आ घरसे,
दुनिया कि रौनक देख फिरसे

या गाण्यात पण.
तूला भिती कशाची वाटते रे, असे मराठी वाक्य आहे.

मस्त लेख... माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण!!! प्रेसेंटेशनपण छान....मलाही बाकीची दोन गाणी माहितीच नव्हती...

किशोरदांविषयी असलेल्या गैरसमजांचा त्यांना किती मनस्ताप होत असेल ना? आणि त्याकाळात आजच्यासारखे ब्लॉग्स, ट्विटर प्रकार पण नव्हते स्वतःची मतं पटवून द्यायला...बिचारे Sad

मला पण एकच गाण माहित होते अश्विनी ये ना हे, तुझी माझी जोडी जमली तर खूप वेळा ऐकले होते मी पण लक्षात नव्हते आले किशोरकुमारचे आहे म्हणून.

मंदार छान माहितीपूर्ण लेख.

मला पहिले आणि तिसरेच गाणे माहित होते. धन्यवाद "हा गोरा गोरा मुखड" या गाण्याची ओळख करून दिल्याबद्दल.

''अश्विनी ये ना'' हे गाणं गाताना किशोरदांची एक अट होती की गाण्यात ''च'' हा शब्द नको..... त्याचा करेक्ट उच्चार कधीच जमत नाही.....

त्यामुळे या गाण्यात ''च'' हे अक्षर मुळीच येत नाही.... आणी किशोरदांनी ते असं गायलंय की ''अमराठी'' गायकाने हे गायलंय असं वाटंतच नाही.

छान लेख मंदार.

खरेच खुसखुशीत लेख. वासरात लंगडी गाय, सुसरबाई....वा वा!
( मला किशोरकुमारची ही तीनही मराठी गाणी अजिबात आवडत नाहीत) तरी पण नवी माहिती कळली अश्विनी ये ना चे संगीत एकट्या अरुण पौडवाल यांचे होते, मला वाटायचे अनिल अरुण जोडीचे असेल. हिंदीत जितेंद्रच्या मद्रासी चित्रपटात भप्पी लहरीच्या संगीतात धुमाकुळ घालणारा किशोरकुमार मराठीत अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना घेऊन काढलेल्या अनेक मराठीच चित्रपटांइतकाच आवडायचा.

माझ्या मनातली झुमरू मधले 'कोई हमदम न रहा कोई सहारा न रहा' गीत-संगीत-गायन-अभिनय-(निर्मिती दिग्दर्शन सुद्धा?) किशोरकुमार आणि हवाओ पे लिख दो हवाओ के नाम ही त्याची छबी मला अजिबात मलीन करायची नाही.

डॉ. कैलास.. मी सुद्धा हे ऐकून होतो पण मला तो अक्षर माहीत नव्हतं हो. तो किस्सा मी रेडीओ मिरचीवर ऐकला होता.

अश्विनी ये ना.. आणि अगं हेमा.. माहिती होती {एमपीथ्री पण आहेत... पण घोळात घोळ नव्हतं माहिती...

नवीन माहितीबद्दल धन्स...

छान लिहिलय. मला मुळातच किशोरकुमार आवडतो त्यात त्याने गायलेली मराठी गाणी म्हणजे दुग्धशर्करा योग.
अस ऐकिवात आहे की किशोर कुमारने 'अश्विनी येना' या गाण्याच्यावेळी गाण्यात 'ळ', 'ड' अशी अक्षर असलेले शब्द असू नयेत अशी अट घातली होती. बंगाली लोकांना प्रचंड त्रास होतो ही अक्षर उच्चारताना. अन्यथा बरीच गाणी आपल्या ऐकायला मिळाली असती किशोरदांच्या आवाजात.

मस्त लेख आहे मंदार. Happy
विशेषत: त्यांच्या कंजुषपणाच्या आख्यायिकेला छेद देणारे ते प्रसंग सांगितलेस...
मी पण किशोर कुमारांचा "फॅन" आहे. त्यांची २ गाणी मराठी गाणी मला माहीत होती. ते घोळात घोळ मधलं "हा गोरा गोरा मुखडा" नव्हतं माहीत. (बहुतेक तो चित्रपट न पाहील्यामुळे असेल.)

लेख आवडला. सहज आणि ओघवत लेखन.

किशोर आणि त्याची गाणी याबद्दल बोलाव तितक थोडच आहे.
तुमच्या या लेखामुळे किशोरने मराठीत गायलेल्या गाण्यांची माहिती समजली.
याबद्दल तुमचे (आणि त्या ’सुबकठेंगणी’ चे ही) आभार !

मस्तच लिहिलयस मंदार Happy
हा गोरा गोरा मुखडा हे गाणं कधी ऐकलंच नव्हतं आधी. बाकीची दोन गाणी माहीत होती किशोरकुमारने गायल्याचं.

छान लिहिलय मंदार. मला सुद्धा नव्यानेच कळल की अश्विनी येना सोडुन बाकीची दोन गाणी त्याने गायलित म्हणुन

Good information Mandar. (My Marathi option is not working.)
In our days we were fan of Kishorkumar..... still we are.
We like him not only as a singer but also as a CUTE hero.

मंदार,
मस्त. मला पण "अश्विनी...." हे एकच गाणं माहीत होतं. Happy

तो "ळ" आणि "ड" चा किस्सा मी पण वाचला किंवा ऐकला होता कुठेतरी. Happy

हम्म्म्म्म.... एक गाणं तर नक्कीच माहिती होतं... बाकीची दोन ऐकली होती पण किशोर कुमारनी गायली असतील अशी शंका आली नाही कधीच...

आणि तो ळ आणि ड चा किस्सा सचिन पिळगावकर कित्येक वेळा ऐकवतो..

मी किशोरकुमारची पंखी आहे पण मला पहिलं (हे किशोरचं आहे एव्हढं माहित होतं) आणि तिसरं ही दोन्ही गाणी अजिबात आवडत नाहीत. दुसरं गाणं कधी ऐकलं नाहिये. लेख फार छान आहे मंदार. नवी माहिती मिळाली. Happy

Pages