सूर्याची पिल्ले

Submitted by अरूण on 8 August, 2010 - 10:37

सूर्याची पिल्ले --- नाटक तसं जुनच. वसंत कानेटकरांनी लिहिलेलं.

१. ५ एप्रिल १९७८ साली "धी गोवा हिंदु असोसिएशन" प्रथम रंगमंचावर आणलेलं. दिग्गज कलाकारांनी रंगवलेलं. नुसती नावं जरी घेतली तरी कल्पना येते. माधव वाटवे, बाळ कर्वे, दिलिप प्रभावळकर, मोहन गोखले, सदाशिव अमरापुरकर, शांता जोग इत्यादी इत्यादी.
२. व्हीसीडी च्या जमान्यात याच पुर्वीच्या संचात थोडेफार फरक करून सर्वांपर्यंत पोहोचलेलं हे नाटक. कानेटकरी विनोदाची एक वेगळीच मांडणी आणि जातकुळी सांगणारं हे नाटक. काळ बदलला तरी संदर्भ फारसे न बदलल्यामुळे ताजं वाटणारं.
३. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील पहिल्या अशा "आठवणीत रुतून बसलेल्या श्रेष्ठ नाट्यकृतींच पुनर्मंचन" म्हणजेच सुबक निर्मित सुर्याची पिल्ले.

स्वातंत्र्यसूर्य पंजाबराव तथा आबाकाका कोटीभास्कर यांच्या पुण्यतिथीनिमित्त असलेला कार्यक्रम ही या नाटकाची सुरुवात. या आबाकाकांचे ४ चिरंजीव - पांडूअण्णा, बजरंगा, रघुराया आणि श्रीरंगा. स्वातंत्र्यसूर्यांचे वारसदार असल्यामुळे आपणही काही थोर आहोत आणि आपल्याकडून सुद्धा काही दिव्य घडतं आहे ही या पुत्रांची विचारसरणी. अर्थात याला अपवाद म्हणजे श्रीरंगा. आबाकाकांनी सुरु केलेल्या विविध संस्थांचे एकमेव ट्रस्टी जांबुवंतराव ठाणेकर यांच्या मदतीने श्रीरंगा आपल्या इतर भावांना कसं सुधरवतो याची ही कहाणी. याला उपकथानक म्हणून ठाणेदारांची कन्या आणि रघुराया यांचं प्रेमप्रकरण सुद्धा आहे.

आबाकाकांच्या स्मरणार्थ होणार्‍या पुण्यतिथीच्या कार्यक्रमापासून सुरू होणारं नाटक श्रीरंगाच्या वाक्याने शेवटाकडे जातं "आपण जितक्या लवकर आबाकाकांना विसरू तितक्या लवकर आपले पाय जमिनीवर येतील." म्हणजे केवळ आपल्या पुर्वजांच्या पुर्वपुण्याईवर आपण जगू शकत नाही किंवा जगू नये असा काहीसा संदेश या नाटकात आहे.

आज या पुनर्निमित नाटकाचा अकरावा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला. त्यानिमित्ताने नाटका बद्दल आणि नाट्यप्रयोगाबद्दल थोडं काही ........

व्हीसीडी मुळे परत परत बघितलं गेलेलं हे नाटक. ते देखिल दिलिप प्रभावळकर, मोहन गोखले, सदाशिव अमरापुरकर यांसारख्या कसलेल्या कलाकारांकडून सादर केलं गेलेलं. त्यामुळे ही नव्या दमाची फौज काय करते ही उत्सुकता होतीच मनामध्ये. कारण शेवटी नविन कलाकारांकडून पाहात असलेल्या नाटकाची कुठेतरी आधीच्या संचाबरोबर तुलना होणं स्वाभाविक होतं. परंतू नाटक सुरू झाल्यापासून संपेपर्यंत ही अशी तुलना झालीच नाही, इतकं या नविन मंडळींनी आम्हाला नाटकात गुंतवून ठेवलं.

अर्थात हा नविन संच काही लेच्यापेच्या कलाकारांचा नाहिये. वैभव मांगले, आनंद इंगळे, पुश्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, उज्ज्वला जोग, आतिशा नाईक, उदय सबनिस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्षिती जोगच्या आजारपणामुळे आयत्या वेळेस उभी राहिलेली शर्वरी पाटणकर ही या नाटकाची सध्याची टीम. सगळ्यांचीच कामं एकापेक्षा एक सरस.

या पुनर्जिवित नाटकात फक्त कलाकारचं नविन होते असं नाही, तर काही नविन पद्धती सुद्धा अवलंबिल्या गेल्या. निदान माझ्यापुरतं बोलायचं झालं तर या पद्धती मी फारशा काही मराठी नाटकांमध्ये बघितल्या नाहीत. या पद्धती मला तरी भावल्या.

१. साधारणपणे आपण नाट्यग्रूहात गेल्यावर, तिकिट दाखवलं की डायरेक्ट आपल्या सीट्वर जाउन बसतो. पण इथे, नाट्यग्रूहात शिरल्यावर चक्क बायकांचं स्वागत गजरे देऊन आणि पुरुषांचं स्वागत गुलाबाची फुलं देऊन झालं.
२. फुलांचा सुगंध घेत असतानाच तिथे असलेल्या स्वयंसेवकांनी एक पत्रक हातात दिलं. त्या पत्रकात नाटकाबद्दलची माहिती, कलाकारांची नावं त्यांच्या फोटो आणि सही सकट आहेत. मुख्य म्हणजे क्षिती जोग या प्रयोगात काम करणार नाहिये, याची माहिती सुद्धा पत्रकात उपलब्ध आहे.
३. नाटक संपल्यानंतर पडदा पडायच्या आधी, एक एक करून सगळे कलाकार पुन्हा एकदा रंगमंचावर आले, प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी. या इथे सगळ्या टीमबरोबर टीमचा कप्तान उर्फ निर्माता सुनिल बर्वे पण आला.

तिसरा अंक सुरु होण्याआधी सुनिल ने प्रेक्षकांशी संवाद साधत, या उपक्रमाबद्दल अधिक माहिती पुरविली. या एका वर्षात यासारखी अजून ४ नाटकं सुबक तर्फे रंगमंचावर येणार आहेत. प्रत्येक नाटक वेगवेगळे दिग्दर्शक दिग्दर्शित करणार आहेत. प्रत्येक नाटकाचे फक्त २५ प्रयोगच होणार आहेत. अर्थात याबद्दल त्यांची काही गणितं असतील, पण माझ्या सारख्या प्रेक्षकाची एकच अपेक्षा आहे, की या २५ प्रयोगांनंतर या अशा प्रकारच्या नविन संचातील नाटकांचं योग्य ते जतन व्हायला हवं. म्हणजेच याच्या व्हीसीडीज किंवा डिव्हीडीज यायला पाहिजेत.

एकंदरीत २५ प्रयोगांपैकी ११ प्रयोग तरी झालेत. उरलेल्या प्रयोगांमध्ये तुम्हाला चान्स मिळाला तर तो अजिबात चुकवू नका.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी फोन बूकिंग साठी चौकशी केली होती पण सर्व तिकीटे संपली होती. असो पुढच्या रविवारी नाटक परत पुण्याला असेल तर लगेचच बुकिंग करायला हवे.

एक शंका : नाट्यगृहात डिजिटल कॅमेरा घेऊन जायला परवानगी आहे काय?

कालच "सूर्याची पिल्ले" पाहिलं, बालगंधर्वला. उत्तम नाटक आहे, सगळ्यांचीच कामे मस्त झालीत.
या प्रयोगाला "दिलीप प्रभावळकर" आले होते :-), त्यांचा सत्कार झाला. त्यांनी सध्याच्या संचातील कलाकारांना शुभेच्छा दिल्या. अवश्य पाहण्यासारखं नाटक आहे.

अरुणरावांनी लिहिलयं तसं, >>
१. साधारणपणे आपण नाट्यग्रूहात गेल्यावर, तिकिट दाखवलं की डायरेक्ट आपल्या सीट्वर जाउन बसतो. पण इथे, नाट्यग्रूहात शिरल्यावर चक्क बायकांचं स्वागत गजरे देऊन आणि पुरुषांचं स्वागत गुलाबाची फुलं देऊन झालं.
२. फुलांचा सुगंध घेत असतानाच तिथे असलेल्या स्वयंसेवकांनी एक पत्रक हातात दिलं. त्या पत्रकात नाटकाबद्दलची माहिती, कलाकारांची नावं त्यांच्या फोटो आणि सही सकट आहेत. मुख्य म्हणजे क्षिती जोग या प्रयोगात काम करणार नाहिये, याची माहिती सुद्धा पत्रकात उपलब्ध आहे.
३. नाटक संपल्यानंतर पडदा पडायच्या आधी, एक एक करून सगळे कलाकार पुन्हा एकदा रंगमंचावर आले, प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी. या इथे सगळ्या टीमबरोबर टीमचा कप्तान उर्फ निर्माता सुनिल बर्वे पण आला.
<<<
यात माझ्या मित्राला एका स्वागत-समितितील तरुणीने गुलाब दिल्यामुळे त्यांने ते फूल जपून ठेवलयं :-).

>>चक्क बायकांचं स्वागत गजरे देऊन आणि पुरुषांचं स्वागत गुलाबाची फुलं देऊन झालं

शिवाजी मंदिरातल्या प्रयोगाच्या वेळी बायकांना पण गुलाबाची फुलंच मिळाली. ती सुकलेली होती. Sad अर्थात प्रयोग मस्त झाल्यामुळे ह्याबद्दल तक्रार करायचं काहीच कारण नाही. पुढचं नाटक कुठलं येणार आहे ह्याबद्दल मात्र उत्सुकता आहे. कोणाला काही आयडिया?

मस्त लिहीले आहे वर्णन. पुण्यात असताना वाचले होते याबद्दल.

मी पूर्वी दूरदर्शन वर पाहिल्याचे आठवते. तेव्हा खूप आवडले होते. त्या टीम मधे मात्र वेगळेच कोणी होते.

वेळापत्रक असं माहित नाही. पण येते २ प्रयोग दीनानाथ आणि सावित्रीबाई फुले ह्या दोन ठिकाणी आहेत हे जाहिरातीत आलंय. पैकी मला वाटतं सावित्रीबाई फुले इथे आजपासून तिकिटविक्री सुरू आहे. दीनानाथला आधीच सुरू झाली आहे. म्हणजे आता मुंबईत एकच प्रयोग शिल्लक आहे. बाकीच्या ठिकाणचं काही माहित नाही. सुनिल बर्वेच्या साईटवर लक्ष ठेवा - http://www.sunilbarve.com/upcoming-projects.html.

पुण्यात या वीकांताला (शनिवार / रविवार) कधीतरी चिंचवडच्या मोरे सभागृहात आहे प्रयोग. मला वाटतं पुण्यातला हा शेवटचा प्रयोग असेल.

'काटकोन त्रिकोण’ ह्या नाटकाची जाहिरात पाहिली होती. आत्ता हे नाटक पाहायला हरकत नाही.
परिक्षण उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

सूर्याची पिल्लेचा मुंबईतला शेवटचा प्रयोग षण्मुखानंदमध्ये ३ किंवा १० ऑक्टोबरला (नक्की आठवत नाही) सकाळी १० ला आहे.

सूर्याची पिल्लेचा मुंबईतला शेवटचा प्रयोग षण्मुखानंदमध्ये ३ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता आहे. तिकिटविक्री २६ पासून तिथे तसंच दीनानाथ, शिवाजी मंदिर, गडकरी रंगायतन आणि प्रबोधनकार ठाकरे इथं सुरू होणार आहे.

Pages