एक लाकडी पेटी आणि काही तारा असं रूप असलेलं संतूर हे सुंदर वाद्य म्हणजे वैदिक काळापासून प्रचलित असलेल्या शततंत्री वीणेचं एक सुधारित रूप. हे वाद्य पर्शियातून आपल्याकडे आलं, असंही काहींचं मत आहे. तसं असलं तरी काश्मीरच्या खोर्यांत प्रचलित असलेल्या या संतूरचे सूर गेली अनेक शतकं लोकांना भुरळ घालत आले आहेत.
सुफियाना मौसिकीत अढळ स्थान प्राप्त केलेलं हे वाद्य श्री. उमादत्त शर्मा यांनी एके दिवशी आपल्या चौदा वर्षांच्या शिवकुमार नावाच्या मुलाच्या हाती दिलं. हा मुलगा उत्तम तबलावादक. अगदी लहानपणापासून सिद्धेश्वरीदेवी, बेगम अख्तर, पं. रवीशंकर यांना तबल्याची साथ करणारा. वडिलांनी सांगितलं, 'आजपासून तू फक्त संतूर वाजवायचंस. तबला बंद. तू या वाद्यावर प्रभुत्व मिळवशील याची मला खात्री आहे. एक दिवस संतूरचा उद्गाता म्हणून तू ओळखला जाशील, हे माझे शब्द लक्षात ठेव.'
शिवकुमार शर्मांनी वडिलांच्या आज्ञेनुसार संतूर शिकायला सुरुवात केली, आणि काही काळातच उत्तम संतूरवादक म्हणून नाव कमावलं. मात्र पुढचा प्रवास काही सोपा नव्हता. काश्मीरमधले सुफी संत आपल्या गीतांच्या साथीला संतूर वाजवायचे. हे वाद्य स्वतंत्रपणे वाजवण्याची प्रथा नव्हती. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत त्यावर प्रभावीपणे वाजवता येणं शक्य नव्हतं. या वाद्याची नादमयता कमी होती, मींड घेता येत नसे, आलाप घेताना स्वर लांबवावे लागत, अशा अनेक अडचणी होत्या. त्यामुळे अनेक संगीतज्ञांनी शिवकुमारजींवर टीका करायला सुरुवात केली होती. अर्थात, संतूरचं हे न्यून हे शिवकुमारजींनाही मान्य होतंच. प्रयोग, संशोधन आणि चिंतन यांच्या मदतीनं शिवकुमारजींनी या वाद्यात काही मूलभूत बदल घडवून आणले. अथक परिश्रमांनंतर त्यांनी संतूरच्या या मर्यादांवर मात केली. आज जे संतूर सर्वत्र वाजवलं जातं, त्याचे आद्यप्रणेते आहेत पं. शिवकुमार शर्मा.
संतूरला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात मानाचं स्थान मिळवण्याच्या या प्रवासात अजूनही काही अडचणी आल्या. समीक्षक संतूरला स्वतंत्र वाद्याचं स्थान द्यायला तयार नव्हते. शिवकुमारजींनी हा आक्षेपही दूर केला, आणि जगभरात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा आपल्या संतूरद्वारे प्रसार केला.
या अद्भुत प्रवासाचा लेखाजोखा म्हणजे 'जर्नी विथ अ हंड्रेड स्ट्रिंग्ज' हे पं. शिवकुमार शर्मा यांचं आत्मकथन. इना पुरी यांनी शब्दांकन केलेल्या मूळ इंग्रजीतील या आत्मकथनाचा सरोज आठलेकर यांनी मराठी अनुवाद केला आहे. अतिशय ओघवत्या शैलीतल्या या आत्मकथनात आपल्याला दिसतं ते संतूर आणि शिवकुमारजींमधलं अद्वैत. एका कलाकाराची प्रचंड तपश्चर्या, आणि संगीताबद्दलची अविचल निष्ठा.
पुस्तकाच्या नावाप्रमाणे हे पुस्तक म्हणजे खरोखर पंडीतजींचा संतूरबरोबरचा प्रवास आहे. यात संतूर, संगीत, संगीतविषयक विचार आणि संगीतकार यांशिवाय कशालाच स्थान नाही. शिवकुमारजींचं समृद्ध बालपण, इतर थोर शास्त्रीय संगीतकारांबरोबरचं मैत्र, ज्येष्ठ कलाकारांबद्दल वाटणारा आदर, चित्रपटसृष्टीत मिळवलेला मान, तिथे जोडलेले मित्र (आणि सलील चौधरी, मदन मोहन, पंचमदा या मित्रांसाठी वाजवलेलं संतूर, किंवा पंचमच्या आग्रहाखातर 'मोसे छल किये जाय' या गाण्यात वाजवलेला तबला), संतूरला यथायोग्य मान मिळावा म्हणून केलेली पराकोटीची धडपड, जागतिक स्तरावर मिळालेला मानमरातब या सार्यांमुळे हे आत्मकथन अतिशय प्रभावी असं झालं आहे.
या आत्मकथनाची अजून एक खास बाब म्हणजे ज्येष्ठ चित्रकार श्री. मनजीत बावा यांची सुरेख रेखाचित्रं. मनजीत बावांचं आत्मचरित्रही नुकतंच मेनका प्रकाशनाने प्रसिद्ध केलं आहे, आणि शिवकुमारजींच्या आत्मचरित्रातली ही रेखाचित्रं मनजीत बावांच्या आयुष्यातलेही काही महत्त्वाचे टप्पे दाखवतात. दोन विलक्षण प्रतिभावान आणि सर्जनशील कलावंतांवर पडलेला हा सांगीतिक प्रभाव खरोखर थक्क करणारा असा आहे.
पं. शिवकुमार शर्मा यांच्या 'जर्नी विथ अ हंड्रेड स्ट्रिंग्ज' या आत्मकथनातली ही काही पानं...
हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध आहे - https://kharedi.maayboli.com/shop/Journey-with-a-hundred-strings.html
साधारण बारा वर्षांचा असताना जम्मू-काश्मीरमधील सुफियाना संगीत मी ऐकलं, निव्वळ अपघातानेच! त्याला साथ होती संतूर नामक वाद्याची. मला त्यावेळी त्या वाद्याचं काही फारसं आकर्षण वाटलं नाही. ते ऐकलं आणि माझ्या डोक्यातून निघूनही गेलं. हे वाद्य माझ्या आयुष्यात किती महत्त्वाची भूमिका निभावणार आहे ह्याची मी त्यावेळी कल्पनाही केली नव्हती. मी माझं गायन आणि तबलावादन चालूच ठेवलं.
माझ्या वडिलांचं जेव्हा जम्मू आकाशवाणीवर वर्चस्व होतं तेव्हा बक्षी गुलाम महंमद या मुख्यमंत्र्यांनी अल्पकाळासाठी म्हणून त्यांची बदली श्रीनगर आकाशवाणीला केली. मुख्यमंत्र्यांना संगीताची आवड होती आणि जाणही चांगली होती. माझ्या वडिलांचे ते चाहते होते. श्रीनगरच्या कलावंतांना माझ्या वडिलांच्या संगीताच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग व्हावा असं त्यांना वाटत होतं. माझ्या वडिलांनी काश्मीरमध्ये प्रथम संतूर ऐकलं आणि त्याच्या सुरातल्या गोडव्याने त्यांना अक्षरशः भारुन टाकलं. मला थोडीही कल्पना न देता त्यांनी ते वाद्य घरी आणलं आणि शास्त्रीय संगीत त्यावर वाजवता येईल का हे पाहण्यासाठी प्रयोग करायला सुरुवात केली. अचानक एक दिवस ते घरी आले. मी तेव्हा चौदा वर्षांचा होतो. मलमलच्या कपड्यात बांधलेली एक विचित्र आकाराची पेटी त्यांनी माझ्या हातात ठेवली. उत्साहाने आणि काळजीपूर्वक मी ती उघडली, तर त्यात संतूर होतं. मी आश्चर्यचकित झालो. "आजपासून हे वाद्य तुझं झालं", असं जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा मला आश्चर्याचा आणखी एक धक्का बसला.
अगदी प्रामाणिकपणे मला हे मान्य करावंच लागेल की, माझी सारी मेहनत त्या अनोळखी वाद्यासाठी वाया घालवावी असं मला वाटलं नाही, पण मी ते वाद्य शिकावंच असा माझ्या वडिलांचा कटाक्ष होता. त्यांना संतूरमध्ये खूप शक्यता दिसल्या आणि त्यांनी जाहीर करुन टाकलं, "माझे शब्द लिहून ठेव मुला! येत्या काही वर्षांत शिवकुमार शर्मा म्हणजेच संतूर असं समीकरण होऊन जाईल. जे मिळालंय ते शिकायचं फक्त धाडस दाखव. उद्या तूच त्याचा उद्गाता म्हणून ओळखला जाशील".
त्यांनी माझी अशी खात्री पटवली की मी तयार झालो. मला वाद्यवादनाचा अनुभव होता, त्यामुळे मला वादनाचं तंत्र अवघड गेलं नाही, पण मला त्या वाद्याचा नाद काही फारसा आवडला नव्हता, ज्याचा उपयोग फक्त सुफियाना संगीतासाठी साथ म्हणूनच केला जाई. मी अगदी मनापासून रियाज करायला सुरुवात केली. नवीन वाद्याने माझ्यापुढे एक आव्हान उभं ठाकलं होतं. माझ्या वडिलांच्या इच्छेनुसार मी ते त्या उंचीपर्यंत नेऊ शकणार होतो का? एका बाजूला संतूरमध्ये नैपुण्य मिळवण्यासाठी माझी जोरात धडपड चालू होती. तर दुसर्या बाजूला जम्मू काश्मीरमध्ये मी तबलावादक म्हणून नावारुपाला येत होतो. पंडित रविशंकर, राधिकामोहन मोईत्रा, सिद्धेश्वरीदेवी आणि बेगम अख्तर यांना मीच तबलासाथीला हवा असायचो. त्यांना मी साथ करत होतो आणि मला प्रसिद्धीही मिळत होती. त्यामुळे या सगळ्यांत संतूरसारख्या नव्या वाद्याला वेळ देणं हे मोठं जिकिरीचं काम होतं. तबलावादनाचे निर्धारित कार्यक्रम त्यामुळे मला सोडावे लागले. मी दुसरं काय करू शकत होतो? वडिलांच्या निर्णयापुढे मला कधी प्रश्न करावासा वाटलाच नाही. ते काही बाबतीत अत्यंत कडक शिस्तीचे होते. त्यांना विरोध करणं मला शक्य नव्हतं. ते माझे गुरुही होते आणि बालपणापासून गुरुला दैवत मानणं, शरण जाणं हा संस्कार माझ्यावर झाला होता.
माझ्या आईला माझी ही अवस्था कळली होती. तिला माझी दया येई, पण तिला आणि मला वडिलांविषयी भीतीयुक्त आदर होता. त्यांच्या शीघ्रकोपी स्वभावाची आम्हाला अत्यंत भीती वाटे. ते जे सांगतात ते भल्याचंच असणार, अशी आम्ही एकमेकांची समजूत घालत असू. जर संतूरवादन हीच संगीतकार म्हणून माझ्या यशाची गुरुकिल्ली असेल तर ते सांगतायत ते बरोबरच असणार!
हळूहळू संतूरवर माझा हात बसायला लागला. माझ्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे संतूरवादनासाठी मी जास्त वेळ देऊ लागलो. वयाच्या सतराव्या वर्षी मी जम्मू आकाशवाणीवर तबला आणि संतूर दोन्ही वाजवू लागलो. संतूरवादनाचं तंत्र एकदा लक्षात आल्यावर मला कळलं की, ताल आणि ध्वनिमाधुर्य या दोन्हीचं अगदी योग्य ते संतुलन त्यात आहे. संतूर हे तारांवरील आघातातून निर्माण होणार्या अत्यंत मधुर ध्वनींचं एक तंतुवाद्य आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या ज्या गरजा आहेत त्यांना पूरक होईल अशा रीतीने मी अनेक वर्षं संतूरमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने काही प्रयोग केले, विशेषतः त्याच्या ध्वनींचा गुणात्मक दर्जा समृद्ध करण्याच्या दृष्टीने!
संतूरचा जन्म काश्मीरमधला असला तरी मी जम्मूचा डोग्रा ब्राह्मण! दोन्ही ठिकाणच्या संगीतातील वैशिष्ट्यं माझ्या शैलीत सामावलेली आहेत. माझ्या पहाडीवर काश्मीर खोर्याचा नव्हे तर जी डोग्रा लोकधून आहे तिचा प्रभाव आहे. खेड्यातल्या लोकांचे, लोकगीतं गाणार्या व्यावसायिक संगीतकारांचे आणि माझ्या आईचं गाणं यांचे संस्कार माझ्या वादनावर निश्चितच झाले आहेत.
मी काश्मिरी भाषा सफाईने बोलतो आणि संतूर हे पारंपारिक काश्मिरी वाद्यही वाजवतो, त्यामुळे मी काश्मिरी आहे असंच लोकांना वाटतं. माझ्या सर्व उन्हाळी सुट्ट्या मी काश्मीरमध्येच घालवल्याने मला काश्मीरचा कानाकोपरा माहीत आहे. आता पूर्वीसारखं वरचेवर प्रवास करणं मात्र शक्य होत नाही, काश्मीरला जाणं होत नाही त्याचं मला दु:ख होतं. माझ्या काश्मिरी मित्रांकडून काश्मीरची संस्कृती, संगीत, साहित्य, तिथले खाद्यपदार्थ विशेषतः वाझवानमधले मांसाहारी पदार्थ यांची मला भरपूर माहिती आहे. माझे आईवडील अगदी कट्टर डोग्रा ब्राह्मण असल्यामुळे ते पक्के शाकाहारी होते, पण मला त्यांनी मांसाहार खायला बंदी केली नाही. त्यामुळे मलाही लपवाछपवी करावी लागली नाही. माझं वाचनही वैविध्यपूर्ण होतं मी भारतीय तत्त्वज्ञानाचा व वेदान्ताचा अभ्यास केला आहे आणि उर्दूही मी उत्तम वाचू शकतो.
कॉलेजमध्ये माझं लक्ष जेमतेमच होतं, कारण संगीत हेच माझं वेड होतं. गणित सक्तीचं नाही म्हटल्यावर मला अत्यानंद झाला होता. मी इतिहास, अर्थशास्त्र, इंग्लिश आणि संस्कृत हे विषय घेतले. संस्कृत शिकणं मला अत्यावश्यक वाटलं कारण संस्कृतमध्ये असलेले जुने संगीतविषयक ग्रंथ नजरेखालून घालण्यास मला त्याची मदत होईल हे मी ओळखलं होतं. मला माहीत होतं की, माझं पास होणं, पदवी मिळवणं ह्या गोष्टीत माझ्या वडिलांचं समाधान साठवलेलं होतं. साहजिकच माझी बर्यापैकी ऊर्जा छोट्या छोट्या मेळाव्यांत कार्यक्रम बसवणं, संगीत देणं या कामी मी खर्च करत असे.
युथ फेस्टिव्हलमध्ये मी बरीच पदकं जिंकली असल्यामुळे जम्मूच्या गांधी मेमोरियलमधल्या कॉलेजमधली प्रोफेसर मंडळी याकरता माझ्यावर फारसा आक्षेप घेत नसत. माझ्या महाविद्यालयीन आयुष्याचा एक मजेशीर भाग म्हणजे गाणंबजावणं आवडणार्यांचा एक मोठा समूह आपोआपच माझ्याभोवती गोळा झाला. त्यातले बरेचसे माझ्या घरी माझं संगीत ऐकायला येत आणि मला प्रोत्साहन देत, 'वा! किती सुंदर वाजवता! बहोत अच्छे!' अशा शब्दांत माझी तारीफ करत. मला त्या स्तुतीने स्वर्ग दोन बोटं उरे. असा आदर, सन्मान मिळणं ह्याचा अभिमान वाटे. शेवटी मी एक कलावंत होतो. दुबळ्या, गरीब मुलांवर भाव खाणारी, इतरांसाठी त्रासदायक मुलं मला गुरु मानत. माझ्यापुढे ती सिगरेट्स ओढत नसत. तो काळच प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांचा होता. मुलींशी बोलणं, त्यांच्यामध्ये मिसळणं हे घडत नव्हतं पण पहिल्यांदाच माझ्या कॉलेजने मला ती संधीही दिली. इ.स. १९५६ मध्ये मला आंतरविद्यापीठ फेस्टिव्हलमध्ये सुवर्णपदक मिळालं आणि सगळ्या मुलामुलींचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यांनी मोठा समारंभ करुन माझं कौतुक केलं. माझ्या आधी त्या कॉलेजमध्ये कोणीही शास्त्रीय संगीत जाणणारा नव्हता. शिवाय तबल्यावरच्या माझ्या विलक्षण नैपुण्यामुळे माझ्या बरोबरीच्या विद्यार्थ्यांना इतर कॉलेजांपेक्षा आपली बाजू अधिक वरचढ वाटे.
आंतरविद्यापीठ युथ फेस्टिवलनंतर जम्मू काश्मीरचे शिक्षणमंत्री, गुलाम मोहम्मद सादिक यांनी माझं कौतुक करण्यासाठी म्हणून मला राज्याचा संगीत प्रतिनिधी म्हणून निवडलं. एका बाजूला घेऊन मला कसल्या मदतीची आवश्यकता आहे का याचीही विचारणा केली. त्या संधीचा फायदा घेऊन लगेच म्युझिकल क्लबसाठी दहा हजार रुपये हवे असल्याचं मी त्यांना सांगितलं. आनंदाची गोष्ट आम्ही संगीतासाठी एक खोली मिळवली, तिथे सतार, तबला, हार्मोनियम वगैरे वाद्यं ठेवली आणि त्यानंतर उनाडक्या करणारा विद्यार्थी म्हणून न जगता मला माझं समाधान होईपर्यंत तिथे प्रॅक्टिस करता येऊ लागली.
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आणखी रियाज! तेव्हा मी माझ्या बहिणीकडे श्रीनगरला जात असे. तिथे हिरव्यागार बागेत बसून प्रॅक्टिस करत असे, गाणी बसवत असे. नंतर श्रीनगरला मी काही कार्यक्रमही केले. हळूहळू माझा असा एक श्रोतृवर्ग तयार झाला.
मागे वळून पाहता असं वाटतं की ती सगळी वर्षं साधी पण छान होती. गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगरमधल्या निरुद्यागी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये, कॉलेज अभ्यासापासून दूर शांतपणे माझा रियाज आणि अभ्यास चाले. तिथलं जंगल, झाडं, स्वच्छ आकाश, सभोवार फुललेली फुलं, पक्ष्यांचा किलबिलाट असं सगळं वातावरण इतकं भारून, इतकं मोहून टाकणारं होतं की परत पुस्तकांकडे, अभ्यासाकडे वळावंसं वाटत नव्हतं. माझं सगळं अस्तित्व निसर्गात भरून राहिलेल्या त्या सुसंगतीत एकरूप होत होतं, जणू कलेच्या माध्यमातून माझी परब्रह्माशी ओळख होत होती
*
पंचावन्नच्या फेब्रुवारी महिन्यात मला डॉ. करणसिंग यांच्या ऑफिसमधून मुंबईला हरिदास संगीत संमेलनासाठी आमंत्रण आलं. (डॉ. करणसिंग माझ्या वडिलांकडे शास्त्रीय संगीत शिकत होते.) करणसिंगचे वडील राजा हरिसिंग हे त्या कार्यक्रमाचे महत्त्वाचे पुरस्कर्ते होते, त्यामुळेच कदाचित कार्यक्रमाचे आयोजक ब्रिजनारायण यांनी करणसिंगांची सूचना तत्परतेने मान्य केली. कसंही असो, मी मुंबईच्या माझ्या पहिल्या प्रवासाच्या वाटेवर होतो.
त्या संमेलनात बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अमीर खाँ, पं. ओंकारनाथ ठाकूर, पं. विनायकराव पटवर्धन, केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डीकर, पं. पन्नालाल घोष, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, उस्ताद अकबर अली खाँ, पं. रविशंकर, उस्ताद अल्लाउद्दीन खाँ (तबल्यावर झाकीर हुसेन), उस्ताद हबीबुद्दीन खाँ, उस्ताद करीमतुल्लाह खाँ, पं. किशन महाराज, पं. अनोखेलाल आणि पं. सामताप्रसाद अशा प्रख्यात व्यक्ती सहभागी होणार होत्या आणि या संमेलनाचा मी हिस्सा असणार होतो. या अतिरथी महारथींच्या सान्निध्यात असणं हे खूपच रोमांचकारी होतं, पण मी एक अट घातली. ती म्हणजे मला तबला आणि संतूर ही दोन्ही वाद्ये वाजवायची होती. मी सगळ्यांत लहान होतो. त्यामुळे माझ्यासाठी अशी अट घालणं हे फारच धाडसाचं होतं. खरं तर हे चंद्र मागण्यासारखंच होतं.
संयोजकांनी ते मान्य केलं नाही. वादावादीनंतर त्यांनी मला एक इशारा दिला, "भारतीय शास्त्रीय संगीतासाठी हे एक सर्वोत्तम व्यासपीठ आहे. तू इथे केवळ सर्वांत लहान आहेस, एवढंच नाही तर तुझं वाद्य श्रोत्यांसाठी अगदी नवीन आहे. तेव्हा तुझं कौशल्य सिद्ध कर. ही संधी हातची घालवू नकोस." पण माझा स्वतःवरचा विश्वास आणि दृढनिश्चय यामुळे त्यांनी पवित्रा बदलला. शेवटी ते म्हणाले, "तुला वीस मिनिटे दिली आहेत. तू तुला हवं ते कर. तुझी इच्छा असेल, तर तू दोन्ही वाजव."
मला संधी मिळाली, पण अडचणी काही संपल्या नव्हत्या. मी तबला वाजवत असताना मला लेहर्यासाठी एका सारंगीवादकाची गरज होती आणि संतूरवादनासाठी एक तबलजी हवा होता. आयत्या वेळेला माझं हे मागणं फारच होतं, कारण असे साथीदार आधीच निश्चित करायचे असतात. पण माझा तो दिवस फार भाग्याचा होता. काहीसं नाईलाजाने का होईना पण तिथे बसलेले एक वयस्क सारंगीवादक माझ्याबरोबर वाजवायला तयार झाले. आता तबलावादक शोधायचा होता, पण मी कोण होतो? माझी विनंती कुणीही ऐकली नाही. तय सगळ्या गोंधळात एक सज्जन गृहस्थ समोर आले आणि मला म्हणाले, "मी, राधू बाबू (राधिका मोहन बोईत्रा) यांना साथ करायला आलोय. त्यानंतर तुम्हालाही साथ करीन." ते गृहस्थ दुसरे तिसरे कुणी नसून नावाजलेले तबलावादक शंकर घोष होते. माझं संतूरवादन त्यांनी दिल्ली कॉलेजच्या महोत्सवात ऐकलं होतं.
आता व्यासपीठावरची मांडामांड पूर्ण झाली. मऊ वेलवेटचा पडदा वर गेला. मला व्यासपीठावर पाहून बर्याच जणांच्या भुवया उंचावल्या गेल्या, पण त्या संध्याकाळी मला जो प्रतिसाद मिळाला तो आठवून आजही माझ्या ओठांवर हसू उमलतं. तरुण वयातल्या जबरदस्त आत्मविश्वासाच्या साहाय्याने देशातल्या सर्वांत रसिक जाणकार श्रोत्यांसमोर मला माझी कला सिद्ध करायची आहे, असं मी ठरवलं होतं. मी माझ्या संतूर व तबल्यासह व्यासपीठावर गेलो. संतूर बाजूला ठेवलं आणि तबलावादनाला सुरुवात केली. मला दिलेल्या पूर्ण अर्धा तासभर मी तबला वाजवला. श्रोत्यांच्या उत्तम प्रतिसादाने मला माझ्यातलं उत्तम ते त्यांच्यासमोर पेश करायला उद्युक्त केलं. त्यानंतर मी माझं संतूर हातात घेतलं, ते सुरात लावलं आणि यमन छेडायला सुरुवात केली. मुंबईच्या त्या खचाखच भरलेल्या कावसजी जहांगीर हॉलमधल्या श्रोत्यांना मी एक तास यमन ऐकवला. जम्मूहून आलेल्या त्या तरुणाला घाबरणं म्हणजे काय, ते ठाऊक नव्हतं. त्याच्याकडे होता तो हृदयापासून, मनापासून आपली कला सादर करायचीच हा खंबीर निश्चय! बाकी सगळं त्याने देवावर सोडून दिलं होतं.
वादन संपवून अखेर मी वर पाहिलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. सारे लोक उभे राहून मला पुन्हा एकदा वाजवायचा आग्रह करत होते. पडलेल्या चेहर्याने संयोजकांनी मला, "वाजव, नाहीतर लोक आणखी गोंधळ घालतील." असं सांगायला सुरुवात केली, पण मी माझं वादन थांबवलं. गोंधळ करणार्या गर्दीला आवरण्यासाठी संयोजकांनी माझा कार्यक्रम दुसर्या दिवशी पुन्हा ठेवण्याचं आश्वासन दिल. संयोजकांचा आणि लोकांचा इतका आग्रह असूनही मी माझं वादन का थांबवलं? तर केवळ तत्त्व म्हणून! मला दिलेल्या वेळेपेक्षा मुळातच मी जास्त वेळ वापरला होता. माझ्या या कृतीतून मी केवळ श्रोत्यांनाच माझी वादनातली क्षमता दाखवून दिली नाही, तर संयोजकांनाही माझा दृष्टीकोन जणू सांगितला. एका महोत्सवासाठी एवढं खूपच होतं!
आणि तरीही ती रात्र संस्मरणीय व्हावी, असं आणखी काही घडायचं होतं. मी ग्रीनरूममध्ये जात असताना वाटेत दहा-पंधरा लोक मला शाबासकी द्यायला, माझं कौतुक करायला समोर आले. त्यांच्या मध्ये ओळखीचे वाटणारे गृहस्थ होते. ते माझ्याशी साध्या डोग्री भाषेत, जी जम्मूची स्थानिक भाषा होती त्या भाषेत बोलले. जम्मूचा एक तरुण संगीतकार आज रात्रीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे हे कळल्यावर त्याला, म्हणजे मला, भेटण्यासाठी, खास माझं वादन ऐकण्यासाठी, म्हणून ते कार्यक्रमाला आले होते. ते होते अतिकुशल, जादूगार तबलानवाज उस्ताद अल्लारक्खा खांसाहेब! माझ्या तोंडून शब्दच फुटेना. त्यांच्या ध्वनिमुद्रिका, त्यांचे कार्यक्रम यांचा मी जबरदस्त चाहता होतो आणि अशी महान व्यक्ती मला शाबासकी देण्यासाठी माझ्यासमोर उभी होती. यावर प्रतिक्रिया म्हणून मी इतकंच विचारलं,"तुम्ही डोग्री इतकी चांगली कशी बोलू शकता?" (त्यांच्या पायाला हात लावून त्यांना वंदन करण्याची साधी रीतही मी विसरलो होतो.) हसत हसत त्यांनी सांगितलं की ते मूळचे जम्मूचे आणि डोग्री हीच त्यांची भाषा! हे ऐकल्यावर तिथेच आयुष्यभराचे मैत्र आमच्यात निर्माण झालं. २००० साली त्यांचं निधन झालं, अगदी तोपर्यंत ते माझे सर्वांत जवळचे मित्र राहिले.
*
१९५६ साली दिल्लीमध्ये आंतरविद्यापीठ युथ फेस्टिव्हलमध्ये हरिप्रसाद चौरसियांशी माझी पहिल्यांदा भेट झाली. विद्यापीठ आणि राज्य पातळीवर प्रतिनिधित्व करायला आम्ही प्रथमच गेलो होतो. त्यावेळची मनाची झालेली उत्तेजित अवस्था आजही आठवतेय. आमच्या ग्रूपने ठरवलं की मी तबल्यापेक्षा संतूर वाजवावं, पण स्पर्धेच्या ठिकाणी गेल्यावर कळलं की, त्या महोत्सवात संतूर वाजवणारा मी एकटाच स्पर्धक होतो. म्हणजे मला पदक मिळालं तरी लोक ते नाकारणार कारण एकट्याची कसली स्पर्धा ! हे अर्थातच मला मान्य होण्यासारखं नव्हतं. माझ्या ज्या शिक्षकांना वाटत होतं की मी फक्त संतूरवादनातच काहीतरी करून दाखवेन त्या शिक्षकांचा राग ओढवून घेऊन मी बत्तीस तबलावादकांच्या स्पर्धेत भाग घेतला. माझ्या टीमला खाली पाहण्याची वेळ आली नाही, कारण तबलावादनासाठी ठेवलेलं सुवर्णपदक मला मिळालं आणि त्याचबरोबर संतूरवादनासाठी खास निमंत्रणही मिळालं. कारण परीक्षक मंडळी पहिल्यांदाच संतूरवादन ऐकणार होती. माझी आणि हरिजींची तिथे अगदी थोडा वेळ भेट झाली, पण आजही मला आठवतंय की मोठ्या आनंदात आमच्यात कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रियांची देवाणघेवाण झाली.
१९६१ मध्ये परत मुंबईत नशीबानेच आमची भेट घडवून आणेपर्यंत अचानक झालेली पहिली गाठभेट विस्मरणातही गेली होती. या वेळेला आमची भेट एका फिल्म स्टुडिओत झाली. तिथे आम्ही आमचं नशीब आजमावायला, काहीतरी काम मिळतंय का ते पाहायला आलो होतो. त्या भेटीत आम्ही जिवाभावाचे मित्र बनलो. हरीजी मुंबईला आले त्यामागचं कारण मजेशीर होतं. ते कटक आकाशवाणीत नोकरीला होते, पण ते बासरीवादनाच्या रियाजामुळे ऑफिसला क्वचितच जायचे. त्यामुळे त्यांच्या साहेबांनी हरिजींना चांगली शिक्षा द्यायचं ठरवलं आणि हरिजींची बदली स्टाफ आर्टिस्ट म्हणून मुंबई आकाशवाणीला झाली. हरिजींना याहून अधिक चांगली शिक्षा अपेक्षित नव्हती. आता ते आपला सगळा वेळ बासरीवादनाला देऊ शकत होते आणि समृद्ध अशा त्या सांस्कृतिक राजधानीत नावारूपाला येण्याची धडपड करत होते. त्यानंतर त्यांनी इतिहास घडवला हे सर्वांनाच माहीत आहे.
यथावकाश हरिजींचं आणि माझं जन्मजन्मांतरीची नातं असावं इतकी त्यांची आणि माझी मैत्री घट्ट झाली. आम्ही दोघंही तुटपुंज्या वेतनासाठी धडपडत होतो आणि त्याचबरोबर करीअर घडवण्यासाठीही! हरिजी आणि त्यांची पत्नी अनुराधा खार स्टेशनजवळील ग्रीन हॉटेलमध्ये एका साध्यासुध्या खोलीत राहायचे. मला ते वारंवार जेवायला बोलवायचे. कितीतरी संध्याकाळी आणि रविवार मी त्यांच्यासोबत आनंदात घालवल्या आहेत. शिवाय त्यांचं आदरातिथ्य आणि अनुराधाजींच्या हातचा स्वयंपाक! त्यांनी केलेली मसालेदार भाजी म्हणजे मेजवानीच असायची. हरिजी माझ्याबरोबर जास्तीत जास्त वेळ असावेत ही अनुराधाजींची मनापासूनची इच्छा होती. माझ्या शांत, सौम्य स्वभावाचा प्रभाव आपल्या नवर्यावर पडावा असं त्यांना वाटे.
आम्ही दोघंही वांद्र्याला राहायचो. त्यामुळे आमची भेट वरचेवर व्हायची. रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आमचं जाणंयेणं बरोबर व्हायचं. आमच्या दोघांच्या स्वभावात जमीनअस्मानाचा फरक असला तरी आमच्या आवडी समान होत्या. माझ्या संतूरवादनाप्रमाणे त्यांच्या बासरीवादनालाही सरोद, सतारवादनाला मिळते तशी लोकप्रियता मिळत नव्हती, पण आमच्यासमोर आमची ध्येयं होती, जगण्याबद्दल उत्कट उत्साह होता. आमचा एकत्र वेळ खूपच मजेत जायचा. हरिजींच्या अफाट विनोदबुद्धीचा मी चाहता होतो. त्यांच्या विनोदांनी मला पोट दुखवेपर्यंत हसवलेलं होतं.
१९६७ मध्ये हरिजींनी आणि मी एका आल्बमसाठी एकत्र काम केलं आणि शिवहरीचा जन्म झाला. एच. एम. व्ही. चे मुख्य अधिकारी विजयकिशोर दुबे यांनी एक नवीन संगीतसंकल्पना समोर मांडली. एच.एम.व्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने त्यांना काहीतरी आगळंवेगळं करायचं होतं. नवीन प्रयोग म्हणून मी एक कथा त्यार करायचा विचार केला. मला आठवतं की पाश्चात्य संगीत योजनेशी संबंधित अशा अनेक कथा ऐकिवात आहेत. आपणही तसा प्रयोग घेऊन नक्की समोर येऊ शकतो असं मला वाटलं. नंतर माझ्या मनात आलं की हिदुस्थानी शास्त्रीय संगीतातील राग हे दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरानुसार किंवा काही राग वर्षाच्या वेगवेगळ्या दिवसांत (उदा. ऋतूप्रमाणे) स्वत:ला व्यक्त करत असतात. मी त्यावर विचार करू लागलो. मला माझं पहाटेचं काश्मीर आठवलं. फक्त पहाटेचं नव्हे तर दुपारी किंवा संध्याकाळीही काश्मीर कसं वेगवेगळ्या रूपात समोर येतं ते आठवलं. जसजसा मी त्या आठवणीत खोल जाऊ लागलो तसतसा मलाच मी पटनीटॉपच्या हिरव्यागार कुरणांमध्ये, सभोवतालच्या रमणीय निसर्गामध्ये भान हरपून गेलेल्या अवस्थेमध्ये पाहिलं. गवतावरून येणार्या वार्याच्या झुळका, गवतात चरणारे मेंढ्यांचे कळप, सूर्यकिरणांमुळे चमकणारं झर्यांचं, ओढ्यांचं उसळणारं पाणी... सगळं माझ्या नजरेसमोर आलं आणि अखेरीस मी पाहिलं की हा सगळा अनुभव मला संतूरवर पकडता आला, तो सगळा भोवताल मला संगीतात बद्ध करता आला.
अशा प्रकारे हळूहळू धनगराच्या आयुष्यातील एक दिवस अशी कथा ’कॉल ऑफ द व्हॅली’मधून साकार झाली. ह्या कथेतल्या पात्रांची मन:स्थिती आणि इतर प्रतिमा साकारण्यासाठी हरिजींच्या बासरीचा प्रभावी उपयोग केला. तसंच ब्रिजभूषण काब्रांचं गिटारही वापरलं. अशा रीतीने आम्ही तिघांनी मिळून ’कॉल ऑफ द व्हॅली’ तयार केलं. त्यासाठी अहिरभैरव, नटभैरव, पिलू, भूपाली (पखवाजाचा वापर करून), देस आणि पहाडी धून यांचा उपयोग केला. या कथेचा शेवटचा प्रसंग होता तो शिकार्यातील धनगर आणि त्याच्या प्रेयसीच्या भेटीचा! हे दृश्य संगीतात साकारताना मी अक्षरश: जीव ओतून काम केलं. रेकॉर्डच्या आवरणावर प्रत्येक भागाचं वर्णन करणारी जणू एक पटकथाच लिहिण्याचं काम करण्याचं जे. एन. जोशींनी मान्य केलं. अशा रीतीने संगीतातल्या ह्या प्रकल्पाने आम्हा तिघा मित्रांना एकत्र आणलं आणि श्रोत्यांच्या एका मोठ्या वर्तुळात आमचं नाव झालं. मी स्वत:ही या आल्बमच्या प्रचंड यशाने चकित झालो. एवढं यश मिळेल अशी कल्पनाही आम्ही केली नव्हती. ’कॉल ऑफ द व्हॅली’ ही एच.एम.व्ही.ची भारतात मोठ्या प्रमाणावर खप असलेली एक रेकॉर्ड असं म्हणावं लागेल. विशेष म्हणजे आजही तिचं ते स्थान टिकून आहे.
हरिजी आणि मी आता अधिकच जवळ आलो. चर्चेसाठी आम्हाला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. परस्परांना विश्वासात घेऊन दोघांपैकी कोणाशीही संबंधित असलेल्या लहानसहान विषयांवरही आम्ही मतांची देवाणघेवाण करू लागलो. एकदा मी हरिजींची अक्षरश: विनवणी केली की, ऑल इंडिया रेडिओ सोडून तुम्ही शास्त्रीय संगीतावर लक्ष केंद्रित करा, तुमच्या हातून काहीतरी फार मोठं काम व्हायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही फक्त मन एकाग्र करायला पाहिजे. रियाजासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा म्हणून आम्ही एकमेकांना सतत प्रोत्साहन देत राहिलो. काहीही असो, वेगवेगळे अनुभव घेण्याच्या या वयात घरापासून, कुटुंबापासून दूर राहण्याच्या या वयात हरिजींचे आणि माझे मैत्रीचे बंध दिवसेंदिवस अधिकच दृढ होत गेले. आमच्या या नितळ, निकोप मैत्रीच्या नात्यात दुस्वासाला किंवा स्पर्धेला जागाच नव्हती.
लवकरच हरिजींच्या माझ्यापेक्षा जास्त मैफली व्हायला लागल्या. एक चांगलं होतं की, पन्नालाल घोषजींमुळे बासरीला शास्त्रीय संगीतात स्थान मिळालं होतं. पण हरिजींनी बासरी या वाद्याला एका अभूतपूर्व उंचीवर नेऊन ठेवलं. हरिजींचं काम मी खूप रस घेऊन पाहत होतो. हरिजींनी बासरीच्या तंत्रात गेल्या काही वर्षात अनेक बदल केले. एक नवीन शैली, एक नवा स्वर आणि एक नवंच व्यक्तिमत्त्व त्यांच्या बासरीवादनाला प्राप्त झालं होतं यात शंका नाही. त्या सगळ्याचा मी एक साक्षीदार होतो. बासरी आणि संतूर यांचं एकत्र वादन किती प्रचंड लोकप्रियता मिळवू शकतं हे मी आणि हरिजी ओळखून होतो, पण कार्यक्रम सादर करायचा म्हणजे रियाजालाही भरपूर वेळ मिळायला हवा हेही आम्ही ओळखून होतो. त्यामुळेच कार्यक्रमाच्या संयोजकांकडे आम्ही कधीच तयारी नसताना वादन करण्यासाठी बांधून घेतलं नाही. आमच्या मैत्रीत आम्ही अनेक चढउतार पाहिले. क्वचितप्रसंगी आमच्यामध्ये खर्या वा काल्पनिक कारणांमुळे बेबनावही निर्माण झाला. आपल्याला आवडो वा न आवडो आपल्या आवडीनिवडी, दुराग्रह, स्वभावातले दोष यांमुळे माणसं आणि वस्तू याच्या बाबतीत आपली मनं संशयाने गढूळलेली असतात. सर्जनशील लोकांचा अहंगंड तर कितीतरी मोठा असतो, त्यामुळे ते आपल्याभोवती कुंपण घालून घेतात. परंतु मला वाटतं, परस्परांना दुखवायचं नाही या बाबतीत आम्ही सावध राहिलो. आमच्या तरूण वयात जेव्हा आम्ही मोठी स्वप्नं पाहिली तेव्हा हरिजी माझ्याशी अत्यंत आदराने वागले. कोणताही नवा प्रकल्प हाती घेताना, निर्णय घेताना त्यांनी माझा सल्ला घेतला. आता ते आचारविचारांनी खूपच परिपक्व झाले आहेत हे मी पाहतो आहे. पण आजही मला त्या जिव्हाळ्याची, सुहृदभावाची उणीव जाणवते, बरोबर घालवलेल्या दिवसांची आठवण येते.
***
जर्नी विथ अ हंड्रेड स्ट्रिंग्ज
पं. शिवकुमार शर्मा व इना पुरी
अनुवाद : सरोज आठलेकर
मेनका प्रकाशन
पृष्ठसंख्या - २०४
किंमत - रुपये २२०
***
टंकलेखनसाहाय्य - अश्विनी के, नंद्या, साजिरा
****
सही... विकत घेऊन पूर्ण
सही... विकत घेऊन पूर्ण वाचायलाच लागेल.
पुस्तकाचं नावही अगदी समर्पक
पुस्तकाचं नावही अगदी समर्पक
संग्राह्य पुस्तक.
हिम्या,धन्यवाद
दुसर्याच ओळीत लिव्हलय की
दुसर्याच ओळीत लिव्हलय की ह्ये..
इन्टरेस्टींग आहे. आता विकत
इन्टरेस्टींग आहे. आता विकत घेऊन वाचायला हवं.
वा! मस्त लेख!
वा! मस्त लेख!
एकदम झकास, एका संपूर्ण
एकदम झकास, एका संपूर्ण सम्रुद्ध व्यक्तिमत्वाचे लिखआण वाचतोय असा फिल येत राहतो वाचताना. मस्तच.
वॉव मस्तच !! मला संतूर हे
वॉव मस्तच !! मला संतूर हे वाद्य आवडू लागले राहुल शर्मामुळे.. भन्नाट वाद्य आहे अगदी!
हे पुस्तक नक्की आवडेल असं वाटतंय!
सुरेख
सुरेख
ओह... क्या बात है, चिनुक्स!
ओह... क्या बात है, चिनुक्स! तुला किती धन्यवाद द्यायचे?
जरूर घेणार हे पुस्तक.
खूप कठीण वाद्यं आहे. म्हणजे तसा त्यावरून उंदीर चालत गेला तर सुरात लावलेल्या संतूरमधून सुंदर धून निघेल...
पण... हीच तर गोम आहे.
माझ्याकडे संतूर आहे आणि तबलावादक म्हणून जरा बडवता येतं. रागाची बढत करता "च" येत नाही.
तार स्ट्राईक केली की तीच तार तुमच्या हाताला एक "रिस्पॉन्स स्ट्राईक" देते. त्या आनंदात पुन्हा आघात आणि त्याचा प्रत्याघात.... हेच इतकं सुखाचं असतं...
ह्या सिलसिल्यात, रागाचा "ठहराव" जातो तो जातोच. खूप ऐकणारी वगैरे म्हणून माझा खाल्लेला सगळा भाव संतूरने उतरवला... मला संतूरवर रागाची बढत करता "च" येत नाही.... कितीही प्रयत्नं केला तरी, काही क्षणांतच... सरळ झाल्यात जायला होतं.
असो.... किती लिहिलं मी... इथे कुणी संतूर वादक असतील तर ह्यावर काही चर्चा होईल (बहुतेक).
ओह... क्या बात है, चिनुक्स!
ओह... क्या बात है, चिनुक्स! तुला किती धन्यवाद द्यायचे?
अगदी!!अगदी!!.. हे पुस्तक संग्रही असलच पाहिजे..
धन्यवाद चिनुक्स, उत्तम लेख
धन्यवाद चिनुक्स, उत्तम लेख नेहमीप्रमाणेच.
रविशंकरजी, हरिप्रसादजी व शिवकुमारजी मला अतिआदरणीय आहेत. त्यांची कला म्हणजे आपल्यासाठी आनंदाचे भांडार. शिवकुमारांचा हंसध्वनी व शंकरा केवळ अप्रतिम आहेत. कॉल ऑफ द व्हॅली पण सुंदर आहे. मी एका आर्मी युनीट साठी डोगरा गाण्यावर( आया हो ललारिया) आधारित युनिट्चे गाणे बसवून रेकॉर्ड करून देण्याचा प्रॉजेक्ट केला होता( भला सिपाहिया डोगरिया - हे ते गाणे कारण बहुतांशी जवान डोगरी होते.) त्याची आठ्वण आली. डोग्रा गाणी खरेच खूप सुंदर व ठेकेदार असतात. शिवकुमारांच्या वादनात खरेच काश्मिरचा अनुपम निसर्ग दिसतो.
हरिप्रसाद चौरासिया व शिवकुमार
हरिप्रसाद चौरासिया व शिवकुमार शर्मांना ऑफिसमधे इंडियन ऑइल संगीत सभेमधे काही ३०-४० फुटांवरुन ऐकलं होतं. काहीही कळत नाही त्यातलं तरी ऐकलं होतं, म्हटलं नशिबात आहे ऐकणं तर निदान ऐकून तरी घेऊयात.
आज शिवकुमार शर्मांबद्दल थोडंफार वाचायला मिळालं
आज घरी येऊन ऐकला सोहनी,
आज घरी येऊन ऐकला सोहनी, भूपाली व पहाडी धुन. जन्माष्टमी स्पेशल चंद्रकौंस हरि-झाकीर नैवेद्याची साखर खात खात. मन त्रुप्त त्रुप्त झालेय.
छान लेख ! आत्मकथा वाचायला हवी
छान लेख ! आत्मकथा वाचायला हवी
मस्तच लेख !!
मस्तच लेख !!
मला हरीप्रसाद आणि शिवकुमार
मला हरीप्रसाद आणि शिवकुमार शर्मा ही नाव एकत्र ऐकली की एका गोष्टीची आठवण येते. सिलसिला ह्या सिनेमातली गीत याजोडीने संगीतबध्द केलेली आहेत. "नीला आसमा खो गया " हे गाजलेल गाण लोकांच्या मनात अद्याप घर करुन राहिल आहे.
वेळ काढुनच हे पुस्तक वाचायला हव.
(No subject)
खूप सुंदर लेख! आवडला! प्रयोग
खूप सुंदर लेख! आवडला!
प्रयोग आणि दाद यांच्या प्रतिसादामुळे खूप काही नविन कळले..
अजूनही अशी छान चर्चा आवडेल वाचायला..!
सुंदर लेख. धन्यवाद पूर्ण
सुंदर लेख. धन्यवाद पूर्ण टीमला.
विकत घ्यायच्या पुस्तकांच्या
विकत घ्यायच्या पुस्तकांच्या यादीत नाव लिहिले ह्या पुस्तकाचे !
शिवजी आणि झाकीर ही जोडगोळी असो किंवा मग शिवजी आणि हरिजी (मग तबल्याला कुणीही असलं तरी) ही जोडगोळी असो... आनंदाची परमावधी निश्चित !