बंध माळेचे
डायरीचे पान मिटवून भैय्याजींनी एक दीर्घ निश्वास सोडला. आजचा नामजप पूर्ण झाला होता. तस म्हटलं तर अजूनही जास्त करता आला असता. पण आज नको. आज रविवार असल्यामुळे सुशांत घरीच होता. एरवी तो कामावर गेला, आणि छोट्याला शाळेत पोहचवले की घरात फ़क्त भैय्याजी, बायको-प्रमिला आणि सून. कसा शांत आणि भरपूर वेळ मिळायचा. भैय्याजी नाम-सागरात, किंवा एखाद्या पुस्तकात स्वत:ला बुडवून घेत. सासु सुनेची स्वयंपाक घरातील आवरासावर संपली, की पूर्ण घर निस्तब्धतेच्या डोहात बुडून जायचे. अशा वेळी नामस्मरण करण्यात कशी वेगळीच अनुभुती यायची. रविवारी घरातील सगळे उगाचच प्रचंड उत्साहाने कोलाहल करीत असायचे. सुशांतची छोट्या अनुप बरोबर मस्ती सुरू असायची. सुवर्णा- भैय्याजींची सून ह्या दोघांनी केलेला पसारा पुन्हा पुन्हा आवरून ठेवायची. रविवार म्हटले की, कुठून येवढा उत्साह येतो लोकांना कोण जाणे! काय असे मोठे सोने लागून गेले असते रविवारला! खरं तर इतर दिवसांसारखाच आणखी एक दिवस! पण रविवार म्हटला की सगळ्यांची जास्तच घाई गर्दी असायची. त्या गोंगाटात भैय्याजींचा नामजपाचा कोटा काही पूर्ण होऊ शकायचा नाही.
म्हणून सकाळी लवकर उठूनच आजचे टार्गेट पूर्ण करून टाकले होते. ते डायरीत लिहून भैय्याजीं डायरी व्यवस्थित कपाटात ठेवतच होते, तोच नातु अनुप आजोबांच्या खोलीत मुसंडी मारून आला. त्यांच्या हातातील डायरी खाली पडली. “अरे काय गोंधळ लावला आहे.” ते लटकेच ओरडले. अनुप कुठला उत्तर देतोय! त्याने खाली पडलेली डायरी उचलली आणि सुसाट समोरच्या खोलीत पळाला. “आजोबांची डायरी.. आजोबांची डायरी” भैय्याजी त्याच्या मागे धावत गेले. प्रमिलाबाई ओरड्ल्या “अहो हळु! हळु! हे काय वय आहे का तुमचे नातवा बरोबर दंगामस्ती करायचे!” अनुपने डायरी सरळ बाबांच्या हातात दिली. आणि सुरक्षीतपणे आईच्या बाजुला उभा राहिला.
भैय्याजी फ़ुरगंटून कोचावर बसले. सकाळचे अकरा वाजून गेलेले. अजून सगळे पारोशेच बसलेले दिसत होते. टीव्ही वर स्पायडर मॅन उलट्यासुलट्या उड्या घेत होता. तेही कोणी पहात नव्हते. कडांना ओघळ सुकलेले चहाचे कप टेबलावर तसेच पडून होते. बिस्कीटांचा चुरा ठिकठिकाणी सांडला होता. वर्तमानपत्राची पाने जमिनीवर फ़डफ़डत होती. “मला पूर्ण पेपर व्यवस्थित घडी करून दे बरं” भैय्याजींनी नातवाला बजावले. अनुपने लगेच त्याच्या मताने व्यवस्थित घडी करून आजोबांच्या हातात दिली.
“आजोबांचा जप झाला वाटतं” प्रमिलाबाई चहाचे कप उचलता उचलता म्हणाल्या. भैय्याजींना पसारा बिलकूल पसंत नाही हे त्यांना माहित होते. एरवी स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोर असलेली सून, रविवारी मात्र आज माझी सुट्टी, म्हणून एकाही कामाला हात लावित नसे. स्पष्ट शब्दात “तुम्ही आज कामे करा” असे सासुला न सांगता, सांगण्याची तिची ही पद्धत होती. प्रमिलाबाईं रविवार काय किंवा इतर दिवशी काय, सुवर्णाला घरकामात शक्य तितकी मदत करण्यात कसलीच कसर करीत नसत.
“आज रविवार म्हणजे भैय्याजींचा जप झालेलाच असणार.” सुशांतने भैय्याजींच्या डायरीत ओझरते पहात म्हटले. भैय्याजींनी लगेच त्याच्या हातातली डायरी काढून घेतली. ती आयुष्याची पुंजी हातात घट्ट धरून ते बसून राहिले. “मी म्हणते जप जरूर करावा. पण त्याची बॅन्क बुके अगदी व्यवस्थित लिहून कशाला ठेवली पाहिजे? देवाला काय माहित नाही? तो बरोब्बर हिशेब ठेवतो.” प्रमिलाबाई स्वयंपाक घरात कप ठेवून येता येता पुटपुटल्या. “अग आई, देवाला कळावे म्हणून थोडीच हिशेब लिहीले आहे डायरीत! जसे सगळे जण आपापले बॅन्क बॅलन्स गोंजारत बसतात ना, तसेच आहे ते. त्यात त्यांना आनंद मिळतोय तर मिळू दे ना!”
“आता पर्यंत ३.८ कोटी जप झालेत.” माळेचे मणी कुरवाळतांना भैय्याजी आठवू लागले. अध्यात्माची आवड तर आधीपासूनच होती. काहीही झाले तरी रोजची देवपुजा, आरत्या, स्त्रोत्र पठण कधी चुकवले नाही. कामासाठी फ़िरतीवर असायचो त्यावेळी देखील मनातल्या मनात रोज सगळे म्हणून व्हायचे. रिटायर झाल्यानंतर एका सत्संगात कोणीसे सुचवले, “भैय्याजी, तुम्ही दहा कोटी नामस्मरणाचा संकल्प का सोडीत नाही? सहज होउ शकेल तुमच्याने.” ते सुरू केले तेव्हा पासून भैय्याजींना तो एक छंदच लागला. पुर्वी कामाची टार्गेट्स असायची. आता हे एक धैय्य डोळ्यासमोर ठेवल्यामुळे उरलेला मार्ग चालायला कारण मिळाले. गुरूमंत्र आधीच घेतला होता. त्याचाच जप रोज करायचे ठरवले. रोज कमीत कमी किती तास, किती माळा, सगळा हिशेब डायरीत लिहून ठेवायचा एक चाळाच लागला. प्रत्येक दिवस उत्साहात उगवू लागला आणि समाधानात मावळू लागला.
“हो ना आई! रोजचा हलकाफ़ुलका व्यायाम, व्यवस्थित आहार, आणि नामस्मरण. किती सुंदर लाईफ़स्टाईल आहे भैय्याजींची. त्यामुळेच प्रकृती देखील अगदी छान राहिली आहे.” सुवर्णाने कोचाच्या हातावर टिचकी मारली. भैय्याजी मनोमन सुखावले. परवा भाटकरांना हार्ट अटॅक येऊन गेला. हा दुसरा होता. आपल्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहेत. आणि नाडकर्णी? फ़िरायला येतात तेव्हा सतत आजारपणाच्या कुरबूरी ऐकवत बसतात. श्रीगुरूंना माझ्याकडून दहा कोटी जप पूर्ण करवून घ्यायचाच आहे. तो होई पर्यंत ते मला काहीही होउ देणार नाहीत. माळ खिशात ठेवीत भैय्याजी उठले. आपल्या खोलीत जावून माळ आणि डायरी उशी खाली ठेवून अर्धवट सोडलेले पुस्तक उघडले.
“अग माझी माळ दिसत नाहीयं” प्रमिलाबाईंना बोलावित भैय्याजी ओरडले. सगळी कडे शोधून झाले. माळ काही दिसली नाही. ह्या अनुपचेच हे उपद्व्याप असणार. खेळायला घेउन कुठेतरी टाकून दिली असेल. अनुप बिचारा आजोबा मी खरच नाही घेतली म्हणत राहिला. अगदी व्हॅक्युमची बॅग उघडून पाहून पण झाले. माळ सापडेना. “अहो तुम्हाला सवयच आहे. जिथे जाता तिथे माळ घेऊन जाता. पण परततांना तिथेच सोडता.” “मी कधीच इकडे तिकडे सोडीत नाही हं. उगाच काहितरी बोलू नको.” “भैय्याजी, मी तुम्हाला नवीन माळ आणून देतो.” सुशांत म्हणाला. “नाहितरी जुनीच झाली होती ती. दोराही कुजका झाला असेल.” “जुनी असली, तरी त्या माळेवर माझा आत्तापर्यंतचा जप वाहिलेला आहे. जुनी म्हणशील, तर मीही जुना झालोय. माझाही धागा कमजोर झालायं. मग आता तो देखील नवीन आणून देणार?”
तीन दिवस भैय्याजींचा जप झालाच नाही. व्यायाम पण करावासा वाटला नाही. सुवर्णाने शेवटी मनावरच घेतले. ती माळ पलंगाच्या पायामागे आहे असे वाटले. जराशी ओढली तर थोडीच पुढे आली.
“पलंग उचलावा लागेल. मी सुशांतला बोलावते.” ती बाहेर गेली, तशी भैय्याजींनी वाकून माळ थोडी आणखी ओढली, तर दोनच मणी हातात आले. कच्चा धागा तुटला होता.
पलंग उचलून सगळे मणी बाहेर काढले. स्वच्छ करून नवीन दोऱ्यात ओवून झाले. पण डायरीतला जपाचा आकडा स्थिरच राहिला. माळेचे ३.८ कोटी श्वास एका झटक्यात ओघळून हवेत मिसळले. दहा कोटीचे धैय्य ठेवले होते. ते पूर्ण होण्याआधीच माळ तुटली. श्रीगुरूंनी हा कसला संकेत दिला असेल? नेहमी फ़िरायला जाणे न चुकवणारे भैय्याजी निजून निजूनच होते.
नेहमी भेटणारे भैय्याजी फ़िरायला का आले नाही हे बघायला शेजारचे नाना घरी आले. “काही उत्साहच वाटत नाही बघ ही माळ तुटल्यापासून. कदाचित ह्या माळेवर तेवढाच हक्क लिहीला होता. श्रीगुरूंची इच्छा! त्यांना माझ्याकडून दहा कोटी जप जर हवा असेल, तर आता तेच मला नवीन माळेत ओवून पाठवतील.” भैय्याजी म्हणाले. “दहा कोटीच काय भैय्याजी, तुम्ही पंधरा कोटी देखील कराल!” भैय्याजी नुसतेच उदास हसले. आठवडा गेला. सुशांतने हट्टाने आणून दिलेली नवीन माळ पेटीत खुपसून ठेवली होती. पलंगावर पहुडलेल्या भैय्याजींकडे पाहून प्रमिलाबाईंच्या पोटात खोल खड्डा पडला. नवीन ओवलेल्या जुन्या माळेचे मणी आणि भैयाजींच्या डोळ्यातले मणी दोन्ही एकमेकांपेक्षा अधिक कळाहीन दिसत होते. “अहो, जप बंद केलात तर केलात. निदान जरा घराबाहेर जात जा. सतत घरात बसून घुसमटता कशाला. काय येवढे त्या माळेचे लावून घेतले आहे?” प्रमिलाबाईंनी एक दिवस भैय्याजींना
बाहेर काढलेच. श्रीकृष्णराव देशमुख म्हणजे डॉक्टरकाकांचे, दासबोधावरचे प्रवचन ऐकायला मिळेल हे प्रलोभन भैय्याजी काही टाळू शकले नाहीत.
“आता हे सफ़रचंदच बघा. कसे छान ताजे, टवटवित आहे. भूकही लागलेली आहे. समजा हे मी आत्ता खाल्ले. तर मला आनंद होईल. सुख मिळेल.” आपल्या साध्या घरगुती शैलीत डॉक्टरकाका सांगत होते. “आत्ता सुख मिळाले म्हणून मी पुन्हा एक खाल्ले. थोडा आणखी आनंद मिळेल. समजा पुन्हा एक खाल्ले. आता मघा येवढेच सुख पुन्हा मिळेल का? शक्यच नाहीच. मग मला सांगा, सुख हे सफ़रचंदात आहे का? की आणखी कशात आहे? तुम्ही सायन्सला मानता. मग साधे लॉजीक बघा. सुख सफ़रचंदात असते, तर जेव्हा जेव्हा मी सफ़रचंद खाईन, तेव्हा सुख मिळाले पाहिजे? आपल्याला कित्येक प्रश्न भेडसावत असतात. पण योग्य तर्क आपण वापरीत नाही म्हणून चुकीचे निष्कर्श काढून सुखा ऐवजी आपण दु:ख मिळवतो. सफ़रचंद हे साध्य नव्हे. ते साधन आहे. साधन सुख देत नसते. जगातली सगळी साधने नाशवंत असतात. ते जो पर्यंत तुमच्या दिमतीला आहे, तो पर्यंत रामकृष्णहरी! त्याचा नाश झाला तरी रामकृष्णहरी!! साधन नव्हे, पण साध्य सुख देऊ शकते, किंवा सुख देते असे वाटते म्हणा हवे तर. साध्य असे निवडावे की जे नाशवंत नसेल. असेच साध्य शाश्वत सुख देऊ शकते.” डॉक्टरकाका अगदी साधेसुधे आणि मनाला पटणारे बोलत होते. हे इतके सोपे लॉजीक आपल्याला कसे सुचले नाही? माळ केवळ नाशवंत साधन होते. ते तुटणारच. माझे धैय्य त्यामुळे मी का विसरलो?
घरी गेल्यावर भैय्याजींनी अनुपला बोलावून “तुला नेहमी माझी माळ खेळायला हवी असते ना? ही घे” म्हणून जुनी माळ त्याच्या हवाली केली. आपली प्रिय डायरी अगदी छान बांधून कपाटात ठेवून दिली. सरळ एक नवीकोरी डायरी उघडून त्यावर श्री गणेश लिहीले. सुशांतने आणून दिलेली नवीन माळ खुंटीवरून काढली, आणि आठ दिवसांनंतर प्रथमच नेहमीचा जपाचा आकडा पूर्ण केला. मनात आकडेमोड केली. आधीचे ३,८२,१६००० अधीक आज केलेले, म्हणजे एकूण.... ३कोटी,८२लाख किती बरे.......छेछे! जुने ते सगळे गेले. रामकृष्णहरी! नवीन माळ, नवीन मोजणी. म्हणजे माझा आकडा पूर्ण करायला इथला मुक्काम आणखी वाढणार! स्मितमुखाने त्यांनी आजच्या तारखेत नोंद केली- “आत्तापर्यंतचा जप- फ़क्त ३०००. धैय्य आकडा- दहा कोटी. पूर्ण करण्याची अंदाजे तारी...ख......
रविवारी सकाळी ब्रेकफ़ास्ट नंतर हॉलमधे नेहमीप्रमाणे गप्पांचा अड्डा रंगला होता. आजचे जपाचे टार्गेट दुपटीने पूर्ण झाल्याच्या खुषीत भैय्याजी देखील गप्पांमधे रमले. स्पायडर मॅन वीस मजली ईमारतीवर सरसर चढला, तेव्हा त्यांनी अनुपबरोबर जोरजोराने टाळ्या वाजवल्या. कडांवर ओघळ सुकलेले चहाचे कप आत घेऊन जायला निघालेल्या प्रमिलाबाईंना त्यांनी हात धरून खाली बसवले. अग ते काम-बिम राहू दे आज. आज रविवार आहे ना! ............. हातातील नवीन कोऱ्या माळेतील मणी भैय्याजींच्या डोळ्यात चकाकून गेले असे प्रमिलाबाईंना वाटले.
*********
छान................. मस्त
छान.................
मस्त वाटली................
आवडली कथा...
आवडली कथा...
सुंदर!!!!
सुंदर!!!!
सु...रे....ख
सु...रे....ख
सही! खूप सुंदर!
सही! खूप सुंदर!
आशय व मतितार्थ दोन्हीही
आशय व मतितार्थ दोन्हीही भावले.
छान
छान
मस्त
मस्त
सुरेख सहज सुंदर
सुरेख
सहज सुंदर