सुपाएवढ्या काळजाची... साधी-भोळी माणसं :१: वासू बामण...

Submitted by ह.बा. on 28 July, 2010 - 09:10

त्यांच्या बंगल्यांपुढे गाड्या नाहीत... गाड्यांपुढे बंगले नाहीत... थोडक्यात बंगलेही नाहीत आणि गाड्याही. पण, त्यांच्या काळजाचे महाल एवढे नितळ आहेत की माझ्यासारख्याचे विद्रूप जगणे त्यांच्या आसपासही फिरकू नये. पण कधी निमीत्तानं तर कधी योगायोगानं त्यांची माझी भेट झाली... मी आदरानं पाया पडलो त्यानी आपुलकीन जवळ घेतलं... ते माझे झाले मी त्यांचा झालो. माझ्या मनाच्या माळावर हक्काची झाप बांधून राहिलेल्या या माणसांच मोठेपण माझ्या मनातून पुस्तकांच्या पानात जाईल तो दिवस माझ्यासाठी कर्तव्यपुर्तीचा असेल.

मनात साठलेला हा पुण्यवंतांचा खजाना शब्दांच्या पालखीत अलवार वाहण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही आणि शब्दात आकळावं एवढं त्यांचं मोठेपण खुजं नाही. तरिही त्यांच्या आठवणींसमोर ही बाराखडीची रांगोळी काढण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या रांगोळीच्या मधोमध तुम्हाला एक चमचमणारा, शुभ्र, भरीव ठिपका दिसेल... काळाच्या वार्‍यात रांगोळी उडून जाईल... चालेल... पण तो ठिपका विस्कटू नये याची काळजी घ्या... तो या माणसांच्या माणुसकीनं भरलेल्या काळजाचा एकमेव पुरावा आहे.

:१: वासू बामण

आज्या-पंज्याचा पराक्रम सांगून आपली पाठ थोपटून घ्यायची सवय नसलेला माणूस सापड्णे अशक्य आहे. आमच्या गावात तर आभाळ ठेपलणार्‍यांच्या टोळ्याच आहेत. एखाद्यानं माझ्या आजोबाला भारदार दाढी होती म्हटल की दुसर्‍याचा जळफळाट होतो आणि 'माझ्या चूलत पंज्याला आयाळ होती' अशी अशक्य गोष्ट तो तावातावाने बोलून जातो.
इतिहास समाजासमोर सांगायचा असला की खर्‍या खोट्याची काळजी घ्यावी लागते पण खाजगीत चर्चा निघाली की प्रत्येकजण आपापल्या सोयीप्रमाण आपापल्या पुर्वजांचा इतिहास रचून घेतो. गावात आलेल्या अस्वलाची कानफाड खाऊन आठ दिवस पोट बिघडलेल्या म्हादू खराताचा नातू आज आपल्या आज्ज्यानं अस्वलाशी खेळलेल्या कुस्तीचं वर्णन करताना तोंडाला फेस येईपर्यंत बोलतो. गावाचा महिमा सांगताना तर एकेकाची छाती फुटेल की काय असे वाटावे इतका अभिमान भरून येतो.
गाव... कराड कोल्हापूर हायवेवर, एन एच फोरच्या पुर्वेला अर्धा किमी आत असलेलं, कृष्णेच्या हिरव्याकंच काठावर वसलेलं, खच्चून बाराशे लोकसंख्या आणि दोन्-अडीचशे उंबर्‍याच कराड तालुक्याच्या बाँड्रीवरच माझं मालखेड गाव.
गावाचा इतिहास एकायची तलफ आली की एखादा खोडसाळ ग्रूप केरबल आबाला बोलवायचा. १०६ वर्षांचा हा आबा म्हणजे मालखेडच्या इतिहासाची चलती बोलती बखर होती. पण त्याचा इतिहास मला कधीच पटला नाही. मला तो नव्व्यान्नव पॉईंट नव्व्यान्नव टक्के थापाडा आणि एक टक्का रंजक वाटायचा. तो बोलायला लागला की ऐकणाराला जगावेगळ्या विश्वात न्यायचा. " आ हा हा... काय ती माणसं आमच्या यळ्ची... धिप्पाड्च्या धिप्पाड आरदाड गडी योक योक... त्या लोकर्‍याच्या दादूची एकेक मांडी ह्या निलगीरीगत..." बोलता बोलता ज्या निलगीरीकडं त्यान बोट केलेलं असायचं ती हत्तीच्या पायाच्या दुप्पट जाड असायची. एवढ्या मांडीचा माणूस एकतर आदिमानव असावा किंवा माणसाळलेला दानव असावा असा संशय यायचा.

आबाच्या बखरीत एक भयकथाही आहे. सगळे म्हणतात ती खरी आहे. मला मात्र ती बनी बनाईच वाटते...
" तुला सांगतो बाळा... ह्यो गाव खरा बामणांच्या मालकीचा. बावन्न गावच्या बामणांनी मिळून ही मार्तंड रुषीची पांढरी वशीवली... किस्नाबायच्या काठावर दगडी घाट बांधलं, गावाला चोबाजू भित घातली... देवा धर्माचा गाव... पुण्याईची पांढरी व्हती बाबा... पण कुळवाड्यांची नीत फिरली, सगळी एक झाली, बामणासणी जाळून मारलं... उरली सुरली बामण हाता पाया पडून जीव वाचवून गावाभायर गेली आणि गावावर बारा बलुतदारांचा कब्जा झाला..."
गावाच्या चहूबाजू असणार्‍या भिंतीचे अवशेष आजही आहेत. बांधिव, कोरीव घाटही आहेत. गावाची रचना, मंदीरं, वातावरण बघितलं की कधी कधी हे सगळं खरं असाव असही वाटतं... पण लगेच मनात एक शंकाही येते बामणांचे खून झाले उरलेले निघून गेले तर मग राधा काकू, गणपत जोशी आणि वासू बामणाला का ठेवलं? त्याना कुणी मारलं नाही? कुणी जाळलं नाही? आबाच्या बखरीत या प्रश्नांच उत्तर नाही.
राधा काकू... अस्सल बामणी थाटाचं मुरलेलं लोणचं... गोर्‍यापान सुरकुत्यांच्या जंजाळात दोन घारे डोळे, पांढरे शुभ्र केस, कमरेला बाक, अंगावर पांढर्‍या रंगाचं त्यावर निळसर किंवा हिरवट बारीक नक्षी असलेलं लुगडं... मरेपर्यंत नदीला जाऊन अंघोळ करण्याच व्रत सोडलं नाही. नदीच्या वाटेवरच आमचा क्रीकेटचा डाव रंगलेला असायचा, जाता येता तीला चुकून जरी कुणाचा स्पर्श झाला तरी ती शिव्यांची लाखोली वहायची. त्यात धर्म बुडव्यानो, नतद्रष्टानो असले त्यावेळी आम्हाला उच्च पदवी वाटणारे शब्दही असायचे. तीला कुणाचा स्पर्श चालायचा नाही. गावाबद्दल, गावातल्या लोकांबद्दल तीला प्रचंड राग होता. संधी मिळाली की ती सगळा राग स्पर्श करणार्‍या मुलावर काढायची. तिचा तो त्रागा आठवला की आबाची बखर आठवते... मी त्या भयकथेशी राधाकाकूचा त्रागा जोडून पाहतो... पण सगळे अंदाज... सत्य काय ते माहित नाही.
गणपत जोशी हा गावातला दुसरा ब्राह्मण. तो गेला तेव्हा मी बारावीला होतो. तो घराबाहेर नसायचाच. नेहमी आजारी असायचा. आणि कधी बाहेर आलाच तर तोही अखंड रागात असायचा. मी तसा त्याला बर्‍याच वेळा बघितला पण हसताना कधीच नाही...

वासूदेव अनंत भेडसगावकर हा गावातला तिसरा ब्राह्मण. गाव त्याला वासूकाका म्हणायचा. मला फार काही कळत नाही पण ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण असं काही म्हणतात ते खरं असेल तर वासू बामण हा मला भेटलेल्या, सत्यनरायण वाचणार्‍या अनेक ब्राह्मणांमधला एकमेव ब्रह्मज्ञानी आहे. का ते ओघाने येईलच...

सहा फूट उंच, निमगोरा, डोक्यावर तुरळक पंढरे केस, बाकदार नाक, पापण्यांच्या तुरूंगातून बाहेर यायची धडपड करत असल्यासारखे बटाटे डोळे, त्यावर जाड भिंगाचा, तांबड्या फ्रेमचा चष्मा, ढेरी थोडीशीच पण अस्तीत्व सिध्द करणारी. अंगावर तेलाचे डाग पडलेली बंडी, पट्ट्या पट्ट्याचा हिरवट लेंगा. अशा अवतारात हा वासूकाका गावभर फिरायचा आणि आजही फिरतो.
नवखा माणूस वासूकाका बामणाचा म्हणून अंतर ठेऊनच उभा राहतो. त्याचं अवघडलेपण वासूकाकाच्या लक्षात येतं आणि तो स्वतः पुढं जाऊन त्या माणसाच्या खांद्यावर घट्ट हात ठेवतो. जातीभेदाची सगळी जळमटं क्षणात जळून जातात... त्या स्पर्शातल पावित्र्य समोरच्याच्या पापणीत गंगेसारखं दाटून येतं.
मान-सन्मानाची चिंता करणारा आणि स्वतःला ब्राह्मण देवता म्हणवून घेऊन भर पुजेत लोकांवर राक्षासासारखं वासकन खेकसणार्‍या भटजींसारखा तो नाही. गडबडीत कापूर आणायचा राहिला तर तो कपाळाला आठ्या पडून लोकांकडे आता नारायण कोपणार आणि तुमची नाव पाण्यात बुडणार अशा आविर्भावात बघत नाही. उलट,
"काय झालं... कापूर नाही का? राहुदे... अगरबत्तीत नारायण प्रसन्न करून देतो" म्हणत पुजा असलेल्या घरातलं वातावरण नारायण घरात आल्यासारखं पवित्र करतो.

दैव... विश्वास ठेवा अथवा न ठेवा पण दैवावर माझा आजिबात विश्वास नाही हे मी तरी म्हणणार नाही... आईतखाऊंना बाजल्यावर काजू बदाम मिळतात आणि देहाचं यंत्र करून दोन वेळच्या भाकरीसाठी जन्म वेचणार्‍याच्या ताटातल्या चटणीवर गोड्या तेलाचा थेंब पडतानाही डबा पालथा होतो... तेव्हा दैव स्विकारावच लागतं... ते चांगल्या माणसांनाच चांगुलपणा सिध्द करण्याचं आव्हान देत राहतं. लढण्याची शक्ती असलेल्या माणसंसमोर संकटांची रासक्रीडा अखंड चालू ठेवतं... चोरांना सरकार बनवतं आणि समाजोध्दाराची स्वप्न बघणार्‍यांच्या खिशात दाढी करायलाही पैसे ठेवत नाही.... असो...

वासूकाकाचं दैवही पैलारू म्हशीसारखं त्याला सदैव लाथा मारत राहतं. आयुष्याचं अर्धशतक साजरं होईपर्यंत मूल होण्याची वाट पाहिली... निपुत्रीक हा शिक्का कपाळी आला... चेहर्‍यावर ती खंत कधी दिसली नाही. पण, शाळेत जाणारी पोरं दिसली की त्याचा हात बंडीच्या खिशाकड जायचा, त्यातून पारले चॉकलेट, पेन्शील किंवा पैसे निघायचे "ए पोर्‍या... इकडं ये... इकडं ये हे बघ काय आहे" म्हणत खिशातून आठाणे काढून त्या पोराच्या हातावर ठेवत दुसर्‍या हाताने त्या पोराच्या डोक्यावरून जेव्हा तो हात फिरवायचा... तेव्हा त्याच्या मोठाल्या डोळ्यात देहाच्या फुलावर बागडणारं कोवळं फुलपाखरू स्पष्ट दिसायचं. "नव्हतं देवाच्या मनात... ठेविले अनंते... बाकी काय म्हणायचं" एवढ्याश्या वाक्याला तो डोंगरावढ्या दु:खाचं पांघरून बनवायचा.

वासूकाकाच्या आयुष्यात अडचणींचे अनेक प्रकार आजमावूनही हा देवाच्या गुणाचा माणूस वैतागत, नाही आयुष्याला कंटाळत नाही याचा देवाला राग आला की काय माहित नाही पण त्याने काकाच्या देहावरच हल्ला केला. त्याला कसलासा आजार झाला आणी त्याची मान मानववळ्या रेडकासारखी उजवीकडून डावीकडे आणि विरूध्द दिशेन नॉनस्टॉप हालू लागली. सुरवातीला हा प्रकार पाहून लोकांना वाईट वाटलं पण नंतर चेष्टा सुरू झाली. पुर्वी लग्नाच्या मंडपात तार सुरात घुमणार्‍या त्याच्या मंगलाष्टका आता अप-डाऊन अप-डाऊन आवाजात ऐकू येऊ लागल्या. माइक स्थीर असला तरी मान काही थांबायला तयार नसायची त्यामुळे 'शूभ.... सा... न...' असे तुरळक शब्द स्पष्ट ऐकू यायचे बाकीचे शब्द गाळलेल्या जागा भरा सदराखाली ऐकणारांवर सोपविलेले असायचे.
डोळ्यांच्या समोर जाड भिंग असल्याशीवाय स्पष्ट दिसत नव्हतच त्यात मानेने असहकार पुकारल्याने त्याला कोणतीही वस्तू निट आणि स्पष्ट दिसत नव्हती. सदा पवाराच्या घरच्या पुजेवेळी तर काका पेटत्या अगरबत्त्यांवर बसले. धोतराला भोक पडलं म्हणून किती कळवळले होते ते त्या वेळी. तेलाच किंवा तुपाचं भांड, पंचामृत, प्रसादाचा शिरा अशा गोष्टी त्यांच्या हातात देताना जपून द्याव्या लागतात.

वासूकाकाला न ओळखणारी, गावातली उनाड पोरं, लग्नाला आलेली पाहुणे मंडळी त्याला पहिल्यांदा बघितल्यावर खुदखुदतात हे त्यालाही माहिती आहे. पण, चिंध्या पांघरणारा डेबूजी मनाच्या निर्मळतेने गंगेच्या पावित्र्याहून श्रेष्ठ ठरतो याची जाणीव त्याला होती. देहाला आलेला बाक मानाच्या पोलादी सभ्यतेला, प्रेमळपणाला पोक येऊ देणार नाही याची काळजी घेत त्याने चेहर्‍यावरचा प्रसन्न नारायण कधी रुसू दिला नाही. त्याच्या मनाचा मोठेपणा आणि जगण्याचं तत्वज्ञान गावाच्या लक्षात आलं नाही पण म्हणून त्यानं स्वतःला गावाच्या साचात बसवलं नाही. तो लग्न, सत्यनारायण वाचणारा ब्राह्मण आहे तरी त्याच्या घरी बौध्दवाड्यातली संगी टीव्ही बघायला कशी काय जाते? हा गावाला पडलेला गहन प्रश्न होता. त्याचे सगळे जोडीदार बारा बलुत्यांतलेच होते.
कधी कधी काकाची बायको, मंदाकाकी चिडचिड करायची
"घ्या सगळा गाव घरात घ्या. काल त्या संगीनं पिंपात पेला बुडवून स्वतःच्या हाताने पाणी घेतलं. पुन्हा पाणी भरावं लागलं मला सगळं... कोण कोण येऊन बसत काही बघायचं नाही..." तीचा स्वभाव चिडका नव्हता पण गाठ अशा ब्रह्मज्ञान्याशी पडलेली की ज्याने पुस्तकांच्या पानावर रंगवलेल्या कर्मठ ब्राह्मणाला कालबाह्य ठरवून, आपल्या माणसांनी भरलेल्या समृध्द आयुष्यातून बेदखल केलं होतं.

रडणार्‍याला हसवावं आणि हसणार्‍यांच्या सोबत रहावं... दु:खांचे बुडबुडे जीवनाच्या कृष्णप्रवाहाला कोड्यात टाकू शकत नाहीत... आसवांच्या मैफिलीला हास्याच्या हरीभजनाइतका रंग चढूच शकत नाही... कर्मठपणाचं महाकाव्य मानवतेच्या चारोळीपेक्षा हीन आहे.... अशाच तत्वज्ञानावर त्याचं जीवन स्थीर झालं होतं. म्हणुनच तर भेदाच्या भिंती पाडताना त्याच्या चेहर्‍यावर रोषाची काळजी नव्हती... उलट विजयाच्या आणि साफल्याच्या आनंदाने तो ब्रह्म्यापेक्षा तेजस्वी दिसत होता...

गंग्या सुतार नावाचा एक माणुस आपल्या बायका-मुलांसह गावात येऊन राहिलेला. काकाच्या घराशेजारी काकाच्या जागेतच त्याने झोपडी बांधलेली. चाळिशीच्या आसपासची बायको सरू मुलगी राधा आणि मुलगा महेश. आडनाव सुतार सांगत असला तरी तो बौध्द आहे अशी अफवा होती. त्याला गावात राहू द्यायचा का? अशी चर्चा गाव करत होतं. पण काकासाठी मात्र त्याची पोरं गोकूळीचे दूत होऊन गेलेली... त्यामुळं जातीविषयी स्पष्टपणे बोलण्याचं कुणाचं धाडस होत नव्हतं. गंग्या बेदम प्यायचा आणि मुलांना, बायकोला मारहाण करायचा. वासूकाका मधे पडला की त्यालाही शिव्या द्यायचा. कधी कधी जास्त झाली की रस्त्यालाच पडलेला असायचा. असाच एकदा भर पावसात रस्त्यात पडला, नाकातोंडात पाणी गेलं... गावाच्या मागचा ताप गेला.
मोकळ्या कपाळाची चाळीशीच्या आसपासची बाई... तरबेज गावगुंडाना आयती शिकार सापडली... पण, दारुड्या नवर्‍यासाठी वडाला फेर्‍या मारणार्‍या त्या सावित्रीच्या मनात पदराला येणार्‍या दारूच्या वासाइतक्याच तीव्रतेन गंग्या घमघमत राहिला... अखेरपर्यंत... देहाचे लचके तोडणार्‍या नजरा... जमीनदारांचे वासनांध स्पर्श तिच्या पावित्र्याला पराभूत करू शकले नाहीत पण त्यांच्याशी लढण्याची शक्तीही तिच्यात नव्हती...
"सरू तुला सांगतो लेचीपेची राहू नको... कुणी काही बोललं तर थोबाड फोड सरळ..." काका समजवायचा. पण नियतीचे आघात झेलून जर्जर झालेल्या तिच्या मनावर काकाच्या शब्दांची संजीवनी फोल ठरली... तापाचं निमीत्त झालं... सरूला संधी मिळाली... तिनं अन्न पाणी सोडलं... दोन्ही पोरांना सोबत घेऊन काका तिच्या जवळ बसायचा... त्याला बिलगलेली पोरं बघून तिची काळजी मिटली... निश्चिंत मनानं ती कारभार्‍याच्या मागं निघून गेली... त्यादिवशी घरचं माणूस गेल्यासारखा काका पोरांना छातीशी कवटाळून रडत होता.... सार्‍या गावानं त्याला रडताना पाहिला... एका सुताराच्या बाईसाठी... रक्ताचं... जातीचं... कसलच नातं नसलेल्या बाईसाठी...

काकाच्या घरात मिटींग भरली. गावातले सगळे जमीनदार, पुढारी आले होते...
"पोरांचं काय करायचं?" एकान मुद्द्याला हात घातला.
"काका सांभाळतीली की" दुसर्‍यानं पर्याय मांडला.
"हो... काकाच्याच मढ्यावर घाला नको ती घाण.. तेवढच राह्यलय... आहो, मी आधीच सांगते पोरं घरात आली तर मी थांबायची नाही... आपलं आपल्याला होत नाही... त्याना कसं सांभाळणार?" मंदाकाकू रागारागात बोलून घराबाहेर गेली. काकाला बायकोचं असं वागणं अपेक्षीत नव्हतं. त्यानं मान खाली घातली. त्याच्या डोळ्यातली आसवं बघून पोरं मुसमुसायला लागली.
"जावदे काका आमी करतो सोय"
"व्हय माप अनाथ आश्रम हायती कोलापुरला... फुडच्या आटवड्यात जावन बघून यतो चला उटुया आता"
सगळे निघून गेले. मुसमुसणारी पोरं काकाच्या जवळ आली.
"काका, आमी दोघ र्‍हातो गावात... तुमी हायसा की शेजारी... कोलापुरला नगं जायाला..." आसवांच्या भिंतीआडून अस्पष्ट दिसणार्‍या दोघांकडं बघत काकान दोन्ही हात पुढं केले... डोक्यावर फिरणार्‍या काकाच्या हाताला थरथरणारी दोन पाडसं बिलगून गेली.
दुसर्‍या दिवशी काकाच्या बायकोनं पोरांना झोपडी सोडायला सांगीतली. "आता घरात राहिलं निदान झोपडीत तरी राहुदे त्याना" म्हणत काकानं वेळ मारून नेली. पण जेवणाचा प्रश्न होताच. दोन दिवस उपासमार झाली... तिसर्‍या दिवशी राधी हातात थाटली घेऊन गावभर फिरली... पोटापुरती भाकरी मिळाली पण दोन दिवसाच्या उपवासानंतर महेश आजारी पडला... त्याला डॉक्टरकडं न्यायला पैसे द्या म्हणून राधी गावभर फिरली... पैसे मिळाले... पोर चौदा पंधरा वर्षाची होती... गाव ओरबाडण्यात दंग होता... काकाच्या नजरेला नजर भिडवण्याचं धाडस तिच्यात राहिलं नव्हतं.
राधीच्या बेवारस जगण्यावर गावाच्या पापाचा डाग वाढू लागला... गावात चर्चा सुरू झाली... "अगं कळतय का तुला केवढं पाप करतीयेस तू?" म्हणत बायकोसमोर आसवं ढाळत होता. वेड्यासारखा गावातल्या माणसांना "कुणाचं पाप वाढतय तिच्या पोटात" म्हणून शिव्या घालत होता.
राधिच्या पोटाकडं बघून मंदाकाकीचा निग्रह सैलावत होता. 'हिने जीव दिला तर?' पापाची धनी व्हायला ती तयार नव्हती. काकाच्या निर्मळ जगण्याचा गंध थोडा का असेना पण तिच्या मनाला लागला होता....

काकाच्या घरात मिटींग भरली. गावातले सगळे जमीनदार, पुढारी आले होते...
"काका, पोरीचं कसं करायचं"
"अशी कीड गावात ठेवली तर चांगली पोरं बिघडायची"
"गावात आसं कधीच घडलं नाय"
मांडिवर बसलेल्या महेशच्या डोक्यावरून हात फिरवत काका स्वतःला निर्मळ म्हणवणार्‍या गावाला हसत राहिला... मान खाली घालून बसलेल्या राधीला छातीशी धरताना मंदाकाकुच्या डोळ्यातून सरूचे आश्रू वाहू लागले... मान खाली घालून गाव निघून गेला... गावात खूप मोठे बागायतदार होते... पण, माणुसकीच्या मातीवर उगवलेलं पैशाचं गवत एवढ घनदाट होतं की गरीब बामणाच्या समोर सारा गाव भिकारी ठरला.
राधीचा गर्भपात करावा लागला. थोड्याच दिवसात काकाच्या मायाळू शब्दांनी तिच्या निराश मनाला नवी उमेद दिली. तीचं लग्न झालं... काकाच्याच दारात. महेश दहावीत नापास झाला. आता पुण्याला कष्टाची नोकरी करतो.
काका खूप म्हातारा झालाय... पहिल्यासारखं रस्त्यात पोराना गाठून चॉकलेट द्यायला त्याला जमत नाही... पण ज्याने ज्याने काकाने दिलेल्या आठाण्याचं चॉकलेट खाल्ल असेल, त्याला आजही काकासमोर गेल्यावर माझ्यासारखाच हात पसरावा वाटत असेल.... आता काका बंडीच्या खिशातुन काहीतरी काढणार आणि आपली चंगळ होणार अशी आशा लागून राहत असेल.....
मला फार काही कळत नाही पण ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण असं काही म्हणतात ते खरं असेल तर वासू बामण हा मला भेटलेला एकमेव ब्रह्मज्ञानी आहे....

गुलमोहर: 

My friend was trying to read one paragraph
he takes 15 minutes to raed without understanding &
he is well qulified person.>>>>>>>> हे खरं आजिबात विषयाला धरुन नाहीये पण राहवलं नाही गेलं. तुम्हाला नेमकं काय म्हणायचय? बरं जे काही म्हणायचय ते विंग्रजीत म्हणायला तुम्ही "क्वुल्लीफाईड" आहात असं तुम्हाला वाटतं का? Proud

हबा, केवळ अप्रतिम लिहिलय. तुमच्या गुणे हा वासू बामण, एकदम गावचा, ओळखीचा होऊन गेला.
तुमची शब्दकळा किती सुंदर आहे... विचार नेमकेपणाने तरी आगळ्या शब्दांत मांडणं... ही कला आहे राव! तुम्हाला साधलीये. जियो...
<<मनात साठलेला हा पुण्यवंतांचा खजाना शब्दांच्या पालखीत अलवार वाहण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही आणि शब्दात आकळावं एवढं त्यांचं मोठेपण खुजं नाही. तरिही त्यांच्या आठवणींसमोर ही बाराखडीची रांगोळी काढण्याचा प्रयत्न करतो आहे. >>

पुढल्या रांगोळींची मी खरच वाट बघतेय.
आज आता अजून काहीही वाचायचं नाही....

(आजकाल माझं हे मायबोलीवर वारंवार होतय.... इतकी मायबोली समृद्धं आहे)

ह.बा अप्रतिम....माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागणे या शिवाय दुसरी कोणती जात नाही आणि धर्मही नाही.......एखादयाचं वर्णन करण्याचीची पु.लं ची जी ढब होती तसेच वाटले.......वासुबामणांचे वर्णन वाचताना तर पु.लंच्या अंतुबर्वाची आठवण झाली.....पु.ले.शु

क्या बात है... एकदम छान लिहीलय....शेवटी जरा आटोपत घेतल्यासारख वाटलं... पण भाषा...शैली एकदम मस्त !!!!...अन अमितन म्हटलय तो ओलावा अगदी स्पष्ट जाणवतो...
हबा : तुम्ही मायबोलीवर लिहायला लागलात ही अलीकडच्या काळातली अतिशय सुखावह गोष्ट... मी पुर्वीच म्हटलय... यू आर अ सुपरस्टार मॅन... अँड यु आर प्रुव्हींग मी राईट !!!!

छान कथा खुप आवडली.....
असे मन देवाने दिलय त्याला अजुन काय हवय. जे काही उरले ते भोग भोगुन ती मुक्त होतात ..

व्वा हबा... चांगलंच व्यक्तीचित्रण...... वाचल्यावर मनात एक हु रहूर मागे थेउन जाणारं....

डॉ.कैलास

कैलासजी, पनू, जागू

प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहे.

ह.बा,

वासू बामण ब्रह्मज्ञानी आहे हे ठीक! पण तुमचे लिखाण उत्तम आहे. मनापासून दाद द्यावीशी वाटेल असे! मनापासून अभिनंदन!

आणखीन लिखाणाच्या प्रतीक्षेत!

-'बेफिकीर'!

नीधप, इन्द्रधनु

प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहे.

अतिशय आवडले! लिहीण्याची शैली आणि भाषा दोन्ही सुंदर आहे.

आता आठवले की तेव्हा लेख पाहिला होता पण बहुधा मागच्या पानांवर गेला आणि वाचायचा राहून गेला.

Pages