प्रवेशिका - ३५ ( mi_anandyatri - मोकळा आहे बरा मी... )

Submitted by kaaryashaaLaa on 12 October, 2008 - 23:48

मोकळा आहे बरा मी, कोणत्या गर्तेत नाही
रात्र माझी, स्वप्न माझे, झोप उसनी घेत नाही

प्रेम मी केले तुझ्यावर, यात माझी चूक नाही
प्रेम कोणावर नसावे?- हा कुठे संकेत नाही

आखल्या रेघेत हल्ली बरसते आभाळ माझे
एकही वादळ अताशा सोबतीला येत नाही

आपुल्या नात्यास कोणी पाहिजे ते नाव द्यावे...
ते तसेही कोरलेले हातच्या रेषेत नाही

धूळ आहे, मळभ आहे, ही हवाही उष्ण आहे
उंच आकाशात उडण्य़ाचा मनाशी बेत नाही

ताटवे फुलतात बाकी आजही बागेत माझ्या
फूल तू चुरगाळलेले आजही बागेत नाही!

एक आहे विश्व माझे माणसांनी घेरलेले
एक व्यक्ती सोडुनी कोणी तुझ्या दुनियेत नाही

पालखी उठताच माझी दोन डोळे चिंब झाले
आणि विझण्याची तयारी माझिया राखेत नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली गझल.

आखल्या रेघेत हल्ली बरसते आभाळ माझे
एकही वादळ अताशा सोबतीला येत नाही

मस्त!

मतला आणि मक्ता आवडला.

आखल्या रेघेत हल्ली बरसते आभाळ माझे
एकही वादळ अताशा सोबतीला येत नाही

हा ही शेर छान उतरला आहे.

माझे ७ गुण.

झोप उसनी घेत नाही ....छान

५ गुण

अतिशय सुन्दर. साध्या श्ब्दात खोल अर्थ सान्ग् न्यतिल सहजता आवद्ली.

१० गुन.

क्या बात है! खूप आवडली.
९ गुण
--------------------------------
आली दिवाळी! Happy

छान आहे. मतल्यात 'मोकळे असणे' आणि 'गर्तेत नसणे' यांचा परस्पर संबंध मला स्पष्ट झाला नाही.
'हातावरच्या रेषात..' हा शेर आवडला. छान कल्पना आहे.
ताटवे फुलतात बाकी आजही बागेत माझ्या
फूल तू चुरगाळलेले आजही बागेत नाही!

हा खूपच सुंदर वाटला. सुख-दु:ख, आनंद, समाधान याबद्दल खूप छान भाष्य आहे असं वाटलं.
शेवटचा शेर - विशेषतः दुसरी ओळ खूपच छान.
माझ्या मते ६ गुण.
-सतीश.

खुपच छान.....

१० पैकी १०...

आखली रेघ छान कल्पना. ७ गुण.

छान!
वादळ, फूल हे शेर आवडले.
माझे - ६.

शेवट जीवघेणा.
माझे १० गुण

उत्तम गझल

माझे १०