एका जंगलात एक सिंह आपल्या कळपाबरोबर रहात होता. कळपातील सिंहीणी रोज त्याच्यासाठी शिकार करून आणत. एक दिवस दुसर्या एका सिंहाने त्याला कळपातून हुसकावून लावले. तेव्हा तो सिंह रानामधे एकटाच राहू लागला. शिकार आणण्यासाठी त्याने एक गाढव, एक रानडूक्कर, एक घुबड आणि एक कोल्हा असे चार मदतनीस कामास लावले. तेही राजाकडे काम मिळते आहे म्हणून तयार झाले. सिंहाला वाटले की या प्रत्येकाची वैशिष्टे एकत्रित काम करून भरपूर शिकार मिळवून देतील.
गाढव दिवसभर रानात चरत फिरायचे. चरायचा कंटाळा आला की लोळत पडायचे. खुशीत आले की दोनचार तानाबिना मारून सर्वांची करमणूक करायचे. सिंह त्याच्याकडे एक आळशी पण गमतीदार प्राणी म्हणून बघायचा. चमूला मनोरंजन येवढाच त्याचा उपयोग होता.
रानडुक्कर शिकार दिसली रे दिसली की तिच्यामागे सुसाट धावत सुटे. त्याला फक्त सरळ रेषेत धावणे जमायचे. गरज पडलीच तर अचानक पावित्रा बदलून शिकार पकडण्याची कला त्याला माहीत नव्हती. जर शिकार यदाकदाचित तावडीत आलीच, तर धडाधड धडका देउन तिला पाडणे येवधेच त्याला माहीत होते. ह्या धकाधकीत रनडुक्कर खूप काम करून थकून जायचे. हा मूर्ख प्राणी सतत काही उपयोगी, काही निरूपयोगी उद्योगात असतो येवढीच माफक माहिती सिंहाला त्याच्याविषयी होती.
घुबड आपले सतत चिंतामग्न बसून असायचे. त्याला उडतांना किंवा काम करतांना कोणीच पाहिले नसावे. चुपचाप एका जागी बसून, डोळे शुन्यात लावून विचार करीत असायचे. कामाच्या चिंतेने रात्रभर झोपायचे नाही. सिंहाला त्याचा एकूण थाट एखाद्या अभ्यासू विचारवंताचा वाटायचा.
सिंहाचा सर्वात विश्वासू मात्र कोल्हाच होता. त्याच्या समयोचित सल्ल्यावर सिंह अवलंबून रहायचा. कोल्हा नेहमीच सिंहाच्या कानाशी लागलेला असायचा. आपल्याला सिंहाची कसी काळजी वाटते, त्याचा पुर्वीचा कळप परत कसा मिळवता येईल वगैरे गुजगोष्टी सिंहाशी बोलत रहायचा. हा काय सारखी कानाफुसी करत असतो हे कोणालाच कळायचे नाही. पण सिंहाचा विश्वासू म्हणून दबदबा असल्याने बाकी चमू त्याला घाबरून होती.
एकदा जंगलामधे वणवा पेटला. जंगल सोडून जायची वेळ आली. त्यावेळी आळशी गाढव व मूर्ख रानडूक्कराला पेटलेल्या जंगलात सोडून, विचारी घुबड आणि विश्वासू कोल्हा या दोघांना घेऊन सिंह दुसर्या जंगलात निघून गेला.
बोध-
आराम नव्हे, काम कर.
काम नव्हे, कामाची फिक्र कर.
फिक्र देखील नव्हे, फिक्रची जिक्र कर.
गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह
Submitted by अरुण मनोहर on 14 July, 2010 - 02:50
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फिक्र देखील नव्हे, फिक्रची
फिक्र देखील नव्हे, फिक्रची जिक्र कर.
चांगलं लिहीलयं!
चांगलं लिहीलयं!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>आजच्या युगातला मंत्र. अगदी
>>आजच्या युगातला मंत्र.
अगदी अगदी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोजक्या शब्दात मोठा आशय !
मोजक्या शब्दात मोठा आशय !