मासे ८) कालवं

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2010 - 03:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कालवाचे सुक्याचे साहित्य :
कालव १ ते दोन वाटे
१ मोठा कांदा
७-८ लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळ्द
मसाला १ ते २ चमचे
चविपुरते मिठ
१टोमॅटो किंवा ३-४ कोकम
थोडी कोथिंबीर चिरुन
तेल

कालवांच्या वड्यांचे साहित्य
कालव १ वाटा
१ कांदा बारीक चिरुन
बेसन १ छोटी वाटी
२ चमचे तांदळाचे पिठ
आल लसूण पेस्ट १ चमचा
थोडा गरम मसाला
मसाला १ चमचा
हिंग, हळद
थोडी कोथिंबीर चिरुन
चविपुरते मिठ
तेल

क्रमवार पाककृती: 

कालवांच्या सुक्याची पाककृती:
प्रथम कालव साफ करायची. कालवांमध्ये दगडी कच असतात ते कालव हातात घेतली की हाताला लागतात. ते काढायचे. कालव धुवायची आणि कढईत तेलावर लसणाची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळावा. आता त्यावर हिंग, हळद, मसाला घालून कालव घालावी वाफेवर थोडावेळ शिजु द्यावी. पाणी घालू नका कारण कालवांना पाणी सुटत. ५ ते ७ मिनीटांनी त्यात चिरलेला टोमॅटो किंवा कोकम घाला व मिठ घाला. जरा परतुन कोथिंबीर घाला थोडावेळ वाफेवर ठेउन गॅस बंद करा.

कालवांच्या वड्यांची पाककृती :
कालवांच्या वड्यांचे दिलेले वरील तेल सोडून सर्व साहित्य कालवांसकट एकत्र करा थालीपिठाप्रमाणे घट्ट पिठ मळा जर कालव टाकुन पातळ होत असेल तर त्यात अजुन बेसन घाला. आणि चांगल मळून छोट्या छोट्या वड्या तव्यावर शॅलोफ्राय करा.

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांसाठी
अधिक टिपा: 

कालव समुद्राच्या खडपातील दगडाला चिकटलेल्या कवचीत असतात. कोयत्याने टोचून कवचीचे आवरण फोडून आतील कालव काढतात. त्यामुळे त्याला चिकटलेली कच राहते. म्हणून कालव व्यवस्थित साफ करावित. एकादा कच राहीला तर दाताखाली येतो.
कालवांचे कालवणही करतात पण त्यापेक्शा वड्या किंवा सुकेच चांगले लागते.
कालव मोठ्या आकाराचीही येतात. ती कापुन घ्यावी लागतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी तुमच्या आशिर्वादामुळेच. तुम्ही माझ्या विपुचे उत्तर नाही दिलेत.
वर्षा चव पहायला येतेच मी.
हसरी इथे रेसिपीमध्ये फोटो लोड करता येत नाही त्यामुळे प्रतिसादात करावा लागतो.

जागु आमच्याइथे नाहि मिळत कालव Sad आम्ही त्याला कालवाचे गोळे म्हणतो . माझ्या नणंदेने दिले होते एकदा करून , खुप छान लागले होते .

जागु, बाजारात कोळीण ताटलीत थोडे पाणी घेऊन त्यात असेच दिसणारे काहीतरी घेऊन बसलेली असते, ते जीव म्हणजेच ही कालवे काय???

साधना तुला माहीत नाही ? मला आश्चर्य वाटल.
हो अगदी बरोबर कोळणी ही कालवे ताटात, टोपात, तांब्यात पाणी टाकुन घेउन येतात. हे पाणी समुद्राचेच असते. त्यामुळे ति कालव पाणीदार असतात. पण ही जर जास्त वेळ असली पाण्यात तर ती जास्त फुगतात आणि चव कमी होते.

कालवाची एक बाजू खडकाला चिकटलेली असते, त्यामुळे ते आयूष्यभर एकाच जागी असते. मालवणला सुकतीच्या वेळी, काकी स्वतः जाउन कालवे आणायची. तिकडे मुबलक मिळतात ती.
माझे चुलतभाऊ तर ते कच्चेच खायचे. अंडी फोडून आमटी करतात, तशी त्याची आमटी व्हायची, आमच्या घरी.

जागू, लहानपणचे दिवस आठवतात कोकणात घालवलेले. आम्ही तर नुसती उकडून खायचो कालवं. माझ्या आईच्या हाताला अशी चवं होती न कोणताही पदार्थ केला की चवदारच असायचा. मच्छीचं कालवण, सोड्याची खिचडी, सुक्या बोंबलाच मिरवणी. तिच बघून करायला शिकले पण तिच्या हाताची चव कधीच उतरली नाही.

आता मला तुझा चक्क हेवा वाटायला लागलाय बरं Happy
असुदे, >>>जागु, फोटो पाहून मनात "कालवाकालव" झाली<<< अगदी अगदी Happy

जागू, काय एकेक रेसिपी असतात तुमच्या. अगदी तोंपासु Happy
असुदे, तुम्हाला हल्ली जिथे-तिथे मारच दिसतो. ( पांशा : तुम्हाला खावा लागतो म्हणून ) का हो ? : खूप मोठ्ठा Light 1 :

वर्षू, दक्षीणा, अगो, धन्यवाद.
दिनेशदा, हे कच्च खाण मी पहिल्यांदाच आईकतेय. मी रेसिपी टाकतेय त्यामुळे माझेही त्या पदार्थांचे ज्ञान वाढत आहे.
भ्रमर, गरम मसाला टाकुनही छान होत सुक.
आर्च नुसत्या आम्ही खुबड्या आणि खुबे खातो उकडून कालव तुझ्याकडूनच ऐकतेय. आणि प्रत्येक मुलाला आपल्या आईच्या हातच्या चविची दुसर्‍या कुणाकडून येत नसतेच. माझेही तसेच आहे. आईच्या हातच कालवणच काय कोणताही पदार्थ मला खुप आवडतो.
आर्च, नविन नाव कळल.
आरती, अग तु ये मेवा खायला हेवा नको करु.
कविता कश्या पाठवायच्या त्या ? मी क्वचीत कधीतरी बघते तो प्रोग्राम.

<< भ्रमर, गरम मसाला टाकुनही छान होत सुक. >> मीं तर असंच खाल्लंय. वरील पद्धतही करून बघायला हवी.
[ थोडं विषयांतर : लहानपणीं आमचे समुद्रकिनारीं रहाणारे एक नातेवाईक आमच्या आजोळीं पाठीवर गोण घेऊन हजर झाले. मग खळ्याच्या बाहेरच तो गोण त्यानी रिकामा केला . आम्ही बघतो तर त्यांत नुसते काळपट दगड ! मग कोयतीने कोचून त्यानी त्यातून काळजीपूर्वक एकएक कालवं काढलीं. हा कार्यक्रम पाऊण एक तास चालला होता. घरातल्यानी आधी चहा ,फराळ घ्यायचा आग्रह केला तर टिपीकल मालवणीत ते म्हणाले, " पोरांसाठी मुद्दाम फाटफटी उठान ह्यां काढून आणलंय; त्येंच्या घशाक काय लागांक नको म्हणान स्वतः साफ केल्याशिवाय चाय गोड नाय लागाचो माकां ! ". पण तो सगळा प्रचंड उपदव्याप पाहून आमचा त्यातला इंटरेस्ट जरा कमीच झाला होता. आज कोळणींकडे ताटलींत ठेवलेलीं स्वच्छ कालवं पाहिलीं कीं त्यामागची मेहनत कळते व ' पोरां'साठी पहांटे उठून खडकांतून तें सर्व उचकून काढून ,पुढचा हा सगळा घटाटोप करणार्‍या त्या नातेवाईकांची मायाही तीव्रतेने आठवते व जाणवते..]

वेल ही खुप काळजीपूर्वक साफ कर. प्रत्येक कालव बोटांमध्ये घ्यायचा. हाताला जाणवणारी कडक दगडाची कप्ची काढून टाकायची.

त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.. कालवं (Oysters) ही खडकांवर तयार होतात. तिसर्‍या, खुबे, मुळे, शिंपले इत्यादी Shell मधे असतात. हे Shell माती मधून काढले जातात.

Pages