चला! सकाळी ६.३० ची स्वारगेट - वेल्हा - घिसर बस मिळाली... आता घिसरला उतरायचं... समोरची डोंगररांग चढून मोहरी आणी मग सिंगापूर... सिंगापूरला मुक्काम करायचा आणि दुसर्या दिवशी पहाटे सिंगापूर-नाळेनं खाली कोकणात उतरुन पुण्याला परत...
"मास्तर, ३ घिसर द्या..."
"पावसात घिसर पर्यंत जात नाही बस..."
"कुठ पर्यंत जाते मग?"
"विहिर... त्यापुढं नाही जात..."
काय करायचं आता?... विहिर पासून चालत घिसरला जायचं म्हणजे १७-१८ कि.मी. चालावं लागणार... त्यात ४ तास तरी जाणार...
"सध्या वेल्ह्या पर्यंतच तिकिट द्या..."
तिकिटं काढली आणि आता काय करावं ह्यावर आमच्यात विचार सुरु झाले... बरच काही सुचत होतं आणि तितक्यात "ढवळ्याहून अर्थर-सीट करायचा का?" असं स्वानंद म्हणाला...
"ह्या पावसात जायचं तिथे?... दाट रान... अवघड वाट... पाऊस आणि धुक्यामुळे अजूनच अवघड होणार... ट्रेक पुर्ण होईल का?" असा विचार माझ्या डोक्यात आला...
"जाऊत रे... आता नाहीतर कधी करणार मग..." असं स्वानंद आणि यशदीप दोघं एकदमच म्हणाले... मग काय? नसरापुर फाट्याला बस सोडली आणि ट्रकनं वाई फाटा आणि मग बसनं महाबळेश्वरला पोहचलो... पोलादपुरची बस पकडली आणि आंबेनळी घाटात वाडा-कुंभरोशीच्या जरा पुढे दाभिळ-टोकाला उतरलो... पाऊस नव्हता, पण वातावरण ढगाळ होतं... समोर दूरवर मंगळगड दिसत होता...
(एकदम मागच्या रांगेत डावीकडून ३रा डाँगर म्हणजे मंगळगड (कांगोरी गड)...)
सावित्रीचं खोरं न्याहाळत सोंडेवरुन उतरायला लागलो... साधारण १.५ तासात सावित्री नदीच्या काठी पोहचलो... गार नितळ पाण्यात डूंबलो आणि समोरचा चढ चढून कंरजे गावात पोहचलो...
(सावित्री नदी...)
गावामागची खिंड पार करुन ढवळ्याला जाणार्या डांबरी रस्त्यावर उतरलो...
(करंजे खिंड चढताना दिसणारं सावित्रीचं खोरं...)
ह्या रस्त्याच्या कडेलाच एक मोठ्ठा धबधबा कोसळतो... सध्या त्यात पाणी कमीच होतं, पण जोराचा पाऊस झाला की हा धबधबा बघण्यासारखा असतो...
इथून साधारण अर्ध्या तासात ढवळं गाठलं...
(डोंगराच्या कुशीत वसलेलं ढवळं...)
शाळेच्या पडवीत मुक्काम मांडला... घरुन आणलेलं खाल्लं आणि लवकरच झोपी गेलो... रात्री २ वाजता जाग आली आणि असंच जरा चक्कर मारायला बाहेर पडलो तर एक अजबच नजारा अनुभवला... करोडो काजवे दरीमधे, झाडावरती चमकत होते... केवळ अप्रतिम... आणि काजवे सारखे जागा बदलत असल्यामुळे तो देखावा अजूनच मनोहर दिसत होता... थोडावेळ निसर्गाचा हा चमत्कार अनुभवला आणि परत झोपी गेलो...
पहाटे लवकर उठून सामान आवरलं आणि ७ वाजता चालायला सुरुवात केली... पुढची वाट दाट रानातून जाते आणि शेवट पर्यंत बहिरीची घुमटी किंवा आर्थर सीट दिसत नाही... एकदा जंगलात शिरलो की आपण नक्की कुठे आहोत आणि आपल्याला नक्की कुठे जायचय हे नीटसं कळत नाही... वाट चुकली तर आर्थर सीटला पोहचणं जवळ-जवळ अशक्यच आहे... उन्हाळ्यात एकदा मी ह्या वाटेने गेलो होतो, पण आता पावसात जरा अवघडच जाणार ह्याची खात्री होती... सोबत कोणी वाटाड्यापण घेतला नाही... ढवळ्याच्या जरा पुढं कोळ्यांचा वाडा लागतो, तो पार केला आणि जंगलात शिरलो... कोणत्याही मानव वस्तीतून जंगलात असंख्य वाटा शिरतात आणि सगळ्याच वाटा मळलेल्या असतात आणि नेमकं अश्या वेळीच चुकीची वाट पकडली जाते... आज आमचं पण असंच झालं... चुकीच्या वाटेवर वीसेक मिनीटं चालल्यावर कळालं की आपण चंद्रागडाच्या जरा जास्तच जवळ जातोय... माघारी वळलो आणि बरोबर वाट शोधून गाढव-माळला पोहचण्यात साधारण दिड तास लागला... गाढव-माळ म्हणजे कोळ्यांच्या वाड्यापासून जवळच असणारं लहानंस पठार...
(गाढव-माळ इथून दिसणारा देखावा...)
जंगल अनुभवायचं तर ते पावसात किंवा रात्री... दोन वर्षापुर्वी इथे आलो होतो तरी आता पावसात जंगल एकदमच अनोळखी वाटत होतं... पायाखाली ओल्या-पीकलेल्या पानांचा खच पडला होता... काही ठीकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे वाट एकदमच नाहीशी होत होती, पण जरा अंदाज घेत घेत शेवटी एका मोठ्या ओढ्यात पोहचलो... हा ओढा माझ्या चांगलाच लक्षात होता... ऑढ्याच्या उगमाकडे तोंड करुन उभे राहिलो की उजव्या हाताला चंद्रगड आणि डाव्याहाताला अजून एक प्रचंड डोंगर आहे...
ओढा नितळ पाण्याने खळखळून वाहात होता... गार पाण्यात मस्त डुंबून घेतलं आणि ऑढ्याकाठी नाष्टा उरकला... तसं पाहिलं तर ओढ्यापर्यंत नीट वाट आहे, पण पावसामुळे जंगल माजलं होतं आणि वाट सारखी हरवत होती... आणि ओढ्याच्या पुढची वाट तर अजूनच अवघड होती आणि त्यात पाऊस आणि धुकं...
आता पुढची वाट ओढ्याच्या उजवीकडून की डावीकडून हे नीटसं आठवत नव्हतं... मग डावीकडूनच वाट शोधायला लागलो... वाळक्या कारवीच्या झुडपांमुळे काहीच अंदाज येत नव्हता आणि नविन कारवी पण कंबरभर माजली होती... वाट नसल्यामुळे सगळीकडे भटकून अंदाज घेत होतो... चढ खूपच तीव्र होता... एक ते दीड तास वाट शोधली, पण सापडलीच नाही... अजून ओढ्याच्या जवळच होतो... उजवीकडून वाट शोधावी म्हंटलतर तिथेपण दाट रान होतं आणि वाट दिसत नव्हती... मग ओढ्यातूनच वर जाऊयात असं ठरवलं आणि चढायला लागलो... `आता काय आपण वर पोहचत नाही' असं सारखं वाटत होतं... अश्या जागी योग्य वाट सापडली नाहीतर ठरलेल्या जागी पोहचणं जवळ-जवळ अशक्यच असतं... पण पुरेपुर प्रयत्न करायचेच असं ठरवून चढत होतो... "काहीही झालंतरी चालेल, पण आता माघार घ्यायची नाही" असं स्वानंद म्हणाला... वेळ पडलीच तर जंगलात रात्र काढूत, पण आता वर जायचंच...
(वाटेत ह्याच्याशी भेट झाली...)
प्रवाहाच्या विरुध्द ओढ्यातून चढताना मजा येत होती... न थाबंताच तासभर चढलो... ओढा संपला आणि उजवीकडे चढायला लागलो... अजून वाटेचा, अर्थर-सीटचा काहीच अंदाज येत नव्हता... अधून-मधून पाऊस पडतच होता... दमट वातावरणामुळे घाम पण तेवढाच निघत होता... वाटेच्या शोधात दमल्याची जाणिवच होत नव्हती... ओढा सोडून बराच वेळ चढत होतो... थोडावेळ थांबून घोटभर पाणी प्यायलो आणि पुन्हा चढायला लागलो... का कोणास ठावूक पण आता आपण वाटेवर आहोत असं वाटू लागलं... भरभर थोडं अंतर पार केलं आणि एकदमच वाट सापडली असं वाटू लागलं... तेवढ्यात दाट धूकं आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला... आम्ही सरळ रेषेत चढत होतो... ही तर दरड कोसळल्यामुळे झालेली वाट होती... तरी चढून गेलो, पण पुढे तर कातळकडा होता... माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता... जपून उतरलो... पावसात दरड कोसळलेल्या वाटेवरुन उतरणं खूपच रीस्की असंत... माघार घेऊन परत वाट शोधू लागलो तर उजव्या हाताला एक पुसटशी वाट कारवीच्या रोपांमधून पळताना दिसली... मगाशी वर चढताना धूक्यामुळे आणि समोर असलेल्या वाटेमुळे ह्या वाटेकडे लक्षच नाही गेलं...
(अनमोल मोत्याची माळ...)
"काय रे! किती टक्के वाटतयं की ही बरोबर वाट आहे म्हणून?" स्वानंदने मला विचारलं... म्हणालो निदान ९० टक्केतरी वाटतयं... त्या पुसटश्या, नागमोडी आणि अतिशय अरुंद वाटेवर अर्धा तास चालल्यावर लहानसा, सोपा कातळ-टप्पा लागला आणि आम्ही योग्य वाटेवर चालतोय ह्याची १०० टक्के खात्री पटली... "चला! आता आपण पोहचणार..." असं तिघांना पण एकदमच वाटलं... धुकं होतच, पण आता नाकासमोरच्या वाटेवर निमुटपणे चालत होतो... अर्धातास चालल्यावर वाट डावीकडे वळली आणि फारच ट्रीकी झाली... डाव्या हाताला साधारण पाच फुटांवर खोलदरी होती आणि जागोजागी पावसामुळे माती वाहून गेली होती आणि वाट बर्यापैकी अवघड झाली होती... मागचे ५-७ तास स्वानंदची खूप बडबड चालू होती, पण ह्या जागी त्याचं तोंड एकदमच बंद झालं होतं... त्याला थोड्याफार मदतीची गरज पडत होती आणि तिच गत यशदीपची होती... हे थोडंस अंतर पार करायला बराच वेळ लागला, पण सगळे सुखरुपपणे बहिरीच्या घुमटीला पोहचलो...
तिथे पोहचलो तेव्हा यशदीपच्या चेहर्यावरचे एक्सप्रेशन्स बघण्या सारखे होते... त्यात भिती, आनंद आणि समाधान सगळ एकदमच होतं... दुपारचे ३.३० वाजले होते... जास्त वेळ वाया घालवणं परवडण्या सारखं नव्हतं... पटपट भेळ केली, खाल्ली आणि अर्थर-सीटच्या दिशेने निघालो... बहिरीच्या घुमटीच्या इथून जोर ला देखील जाता येतं आणि ती वाट अर्थर-सीटच्या वाटेपेक्षा सोपी आहे... धुकं खूपच दाट होतं, त्यामुळे यशदीप म्हणाला "पश्या, जोरला जायचं का? अर्थर-सीटची वाट वेळेत नाही सापडली तर फार उशीर होईल..."
"खूप नाही ना दमलास... अजून वर्ट्स केस निदान ४ तास तरी चालशील ना?े" मी...
"हो..."
"मग चल... अर्थर-सीटलाच जाऊत..."
(धुकं, धुकं आणि दाट धुकं...)
परत दाट रानात पाऊल टाकलं... इथून पुढे अर्थर-सीटचा चढ प्रचंड तीव्र आहे... दमलो होतो, पण भर पावसात हा चढ चढताना मजा येत होती... तीव्र चढ संपला आणि मग जरा सपाटीवर चालायला लागलो... धुकं नसंल तर इथून अर्थर-सीट दिसतो... आता परत कारवी आणि बांबूच्या रानातून वाट काढत पुढे सरकत होतो... कधी-कधी वाट एकदम दरीच्या काठाला चिकटून जात होती... साधारण एक तासात शेवटच्या कातळ-टप्प्याजवळ पोहचलो... आधी स्वानंदला चढवला, मग यशदीपला आणि मग एक-एक करुन सगळ्या पाठपिशव्या चढवल्या... आता मात्र जाम दमलो होतो... अर्थर-सीट हाकेच्या अंतरावर होतं... मग शेवटचा थोडासा चढ संपवला आणि अर्थर-सीटवर पाय ठेवला... अहहहहा!!! काय ते समाधान? काय तो देखावा? आणि काय तो निवांतपणा?... मला ते शब्दात वर्णन करणं शक्यच नाही... पावसामुळे कोणीच पर्यटक नव्हते... दरीत दाट धुकं साठलं होतं आणि पाऊस चालूच होता... आज आम्ही अर्थर-सीटवर पोहचू असं मला खरंच वाटल नव्हतं, पण ते शक्य झालं... खूप खूप आनंद झाला होता... जग जिंकल्या सारखं वाटत होतं... अर्थर-सीट वरुन लीफ्ट मिळाली आणि वेळेत बस-स्थानकावर पोहचलो... ६.३० ची शेवटची पुण्याला जाणारी बस मिळाली... भिजलेल्या अवस्थेतच ३.३० तासांचा प्रवास करुन रात्री १०ला पुण्याला पोहचलो... बस मधे बरेच विचार डिक्यात घोळत होते... "असा वेडेपणा परत करणे नाही... देवाच्या कृपेने आज सुखरुप घरी परततोय..." हा विचार सारखा येत होता...
नोटः हा ट्रेक पावसात अजिबात करु नका... पावसा नंतर करण्या सारखा ट्रेक आहे, पण ढवळ्यातून वाटाड्या जरुर घ्यावा... उगीच अनाठायी धाडस करण्यात अर्थ नाही...
विमुक्ता पुन्हा एकदा भन्नाट
विमुक्ता पुन्हा एकदा भन्नाट ट्रेक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझं खरंच खुप कौतुक वाटते. कसल्या अनवट जागा शोधुन काढतोस मित्रा!!!!!
अनमोल मोत्याची माळ तुझ्या लेखासारखीच सुंदर
थरारक अनुभव. शेवटच्या
थरारक अनुभव. शेवटच्या वाक्यातला सल्ला मी पण दिला असता. वाटाड्या बरोबर असणे अत्यंत गरजेचे आहे. जंगलातील अडचणींवर कशी मात करायची. वाट कशी शोधायची याचे अनुभवातून आलेले ज्ञान त्यांच्याकडे असते. त्यामानाने ते मागत असलेला मोबदला नगण्य असतो.
सॉलीडच रे. काय खतरनाक अनुभव
सॉलीडच रे. काय खतरनाक अनुभव आहे. अजून फोटो पहायला आवडतील. पिकासाची लींक असेल द्यावी.
सुंदर फोटु आणि भन्नाट ट्रेक!!
सुंदर फोटु आणि भन्नाट ट्रेक!!
छान. मोत्यांच्या माळेचा फोटू
छान. मोत्यांच्या माळेचा फोटू मस्त आलाय. आर्थर-सीट म्हणजे नेमकं काय? जंगलातील गाव अथव कुठला पॅच आहे काय? या बद्द्ल आधी पण ऐकलय.
मोत्यांची माळ भन्नाट
मोत्यांची माळ भन्नाट आहे....बाकीचेही फोटो मस्त आणि ट्रेकचा अनुभव मस्तच
मोत्यांची माळ क्लासच!!!!
मोत्यांची माळ क्लासच!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ट्रेकचं वर्णन पण मस्तच.
मोत्यांची माळ परत दाट रानात
मोत्यांची माळ
परत दाट रानात पाऊल टाकलं...
फोटो मस्त आणि ट्रेकचा अनुभव मस्तच.............!
आवडल..
मोत्याच्या माळेचा फोटो
मोत्याच्या माळेचा फोटो अप्रतिम.
ट्रेकचा अनुभव मात्र खरोखर धाडसी.
विमुक्त, जबरी ट्रेक दिसतोय.
विमुक्त, जबरी ट्रेक दिसतोय. मस्त वर्णन आणि फोटोही मस्तच. जरा वेगळा ट्रेक वाचायला मिळाला ते छान वाटलं.
हा ट्रेक पावसात अजिबात करु नका... पावसा नंतर करण्या सारखा ट्रेक आहे, पण ढवळ्यातून वाटाड्या जरुर घ्यावा... उगीच अनाठायी धाडस करण्यात अर्थ नाही... >>>>अगदी खरं. असा वेडेपणा कधीच करू नये.
माझ्या निवडक १० मध्ये.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही रे. आर्थर-सीट म्हणजे
सही रे.
आर्थर-सीट म्हणजे नेमकं काय? जंगलातील गाव अथव कुठला पॅच आहे काय >>> महाबळेश्वर मधील एक पॉईंट. एकदम जबरी जागा आहे. आर्थरने शोधून काढली व तो तिथे बसायचा म्हणून त्या पॉईंटला त्याचे नाव दिले आहे.
अप्रतिम मोत्यांची माळ खल्लास
अप्रतिम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोत्यांची माळ खल्लास !!
मस्त रे...
मस्त रे...
मोत्यांची माळ...खासच
मोत्यांची माळ...खासच
मोत्यांची माळ खासच
मोत्यांची माळ खासच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पावसाळ्यात हा ट्रेक म्हणजे अबबब! _/\_
मस्त रे.... मला हा ट्रेक
मस्त रे....
मला हा ट्रेक कधीपासून करायचा आहे...
मला मेल टाका पुढच्या ट्रेकसाठी....
सर्वांचे खूप खूप आभार...
सर्वांचे खूप खूप आभार...
ढवळं गावं, मोत्याची माळ...
ढवळं गावं, मोत्याची माळ... पहिल्यांदातर पहिले काही फोटो उत्तर भारतातलेच वाटले. सिंगापूरबद्दल ऐकलं होतं. तिथे शेतकर्यांचे खूप हाल आहेत, जमिन कसायला सुद्धा पैसा नाहीये तेव्हा आहे त्या जमिनी विकून स्थलांतर चालू आहे तिथल्या लोकांचे. अन बडे श्रीमंत मंडळी, तिथल्या जमिनी विकत घेवून मातीचा व्यापार सुरू केला आहे![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
धाडसी ट्रेक आणि फोटो तर
धाडसी ट्रेक आणि फोटो तर लाजवाब![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक मन :- जादा शहाणे, वेडे,
एक मन :- जादा शहाणे, वेडे, मूर्ख लोक्स आहात तुम्ही
नशिब बलवत्तर म्हणून काही दुर्घटना घडली नाही.
दुसरं मन :- खूप धाडसी, जिद्दीची बाळं आहात तुम्ही. ही अॅडव्हेंचर्स ज्याच्या रक्तात भिनली आहेत तो जगात कशालाही भिणार नाही. आपल्या सैन्यात देखिल असेच कैच्याकै साहस करणारे लोक्स असतील![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही रे.... पुढच्या ट्रेक आणि
सही रे....
पुढच्या ट्रेक आणि लिखाणासाठी शुभेच्छा!
जबरी..
जबरी..
एकदम भारी... <<अनमोल मोत्याची
एकदम भारी...
<<अनमोल मोत्याची माळ...>>
एकदम छान!!
अर्थेर सीट वरून खाली पाहिले
अर्थेर सीट वरून खाली पाहिले तर दरीतून खलून वर येणे शक्यच वाटत नही.
धन्य आहे तुमची. वाचतानासुध्धा थरार जाणवतो !
अर्थेर हा इन्ग्रजी फोरेस्ट अधिकारी होता. त्यची बायको आणी मुलगी पावसात एका ओड्।यात वाहून गेले असे सन्गितले जाते (त्या जागेचा "आर्थेर सीट" शी काही संबन्ध नाही). तो एकटा येथे तासन तास बसत असे. म्हणून 'arther seat" हे नाव पडले अशी अख्यायिका आहे.
मागे Ludwick point चढून आलेले वीर मला भेटले होते. पण ते उन्हळ्यात !
सन्जीव
असं म्हणतात की अर्थरची बायको
असं म्हणतात की अर्थरची बायको आणि लहान मुलगी बाणकोटच्या जवळ सावित्री नदीत बुडून मेले... बाणकोटलाच सावित्री नदी समुद्राला मिळते...
तर अर्थरला त्यांची आठवण आली की तो ह्या टोकावर येऊन बसायचा... कारण इथूूनच सावित्री नदीचा उगम होतो आणि सावित्रीचं खोरं दिसतं...
असं कुठेतरी मी वाचलं होतं...
वाह खूपच सुंदर.. अश्विनीला
वाह खूपच सुंदर..
अश्विनीला अनुओदन .. एक मन .. दुसरे मन
पण पुढच्या वेळेस अती धाडसीपणा करू नका .. नशीब प्रत्येक वेळेस बलवत्तर असेल नसेल..
भटकंतीचा नकाशा टाकलाय...
भटकंतीचा नकाशा टाकलाय...
विमुक्त, भन्नाट ट्रेक आणि
विमुक्त,
भन्नाट ट्रेक आणि सुरेख वर्णन, अश्या आडवाटेवरच्या ट्रेकचे वर्णन वाचण्यात मजा येते.....
जबरी अनुभव...आणि सुरेख कथन
जबरी अनुभव...आणि सुरेख कथन !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोत्यांची माळ खास आहे एक्दम!....इतर फोटोही सुरेख आहेत अगदी
फारच भारी आहात तुम्ही
फारच भारी आहात तुम्ही लोकं!!
ती मोत्याची माळ तर काय अप्रतिम दिसतीय !!